दुर्ग देवराई - पुन्हा एकदा

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
17 Oct 2024 - 9:51 am

सप्टेंबरच्या मध्यात जोरदार पावसात आंबे-हातविज, दुर्ग देवराईची भटकंती करुन आलो होतो, जेमतेम ३ आठवड्यात परत एकदा ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच नाणेघाटात जाण्यास निघालो. जुन्नर सोडलं पण काय वाटलं कुणास ठाऊस, ऐनवेळी आपटाळ्यावरुन नाणेघाटासाठी उजवी मारण्याऐवजी सरळ आंबोलीच्या रस्त्याला लागलो. आणि दुर्गवाडीस जाण्यासाठी निघालो. ह्यावेळी सोनावळेच्या आधीच्या फाट्यावरुन जाण्याऐवजी थोडं सरळ पुढे जाऊन उच्छिलवरुन भिवडे बु. आणि तेथून इंगळून गाठले आणि घाटमार्गावरचा प्रवास सुरु झाला.
३ आठवड्यांपूर्वी हाच मार्ग काळ्याकुट्ट मेघांनी आच्छादिला होता आणि पावसाची झड लागली होती, आता मात्र पाऊस उणावला होता आणि स्वच्छ ऊन पडलं होतं, हिरवंगार गवत उन्हात चमकत होतं, सोनकीचा बहर वाढला होता.

इंगळूण घाट वर चढून येताच आंबेगावच्या पठारावर नयमरम्य नजारा पसरला होता. शिवलिंगासारखे दिसणारे एक शिखर कुकडेश्वरामागच्या शंभू डोंगराचे आहे.

a

पठारावरचे दृश्य विलक्षण सुंदर दिसत होते.

a

डावीकडे दिसतोय तो ढाकोबा

a

आंब्यातले वाजणारे दगड पाहून दुर्गवाडीत शिरलो.
वाडीतली लहान लहान कारवीच्या काटक्यांपासून बनवलेली झोपडीवजा घरे सुरेख दिस्त होती.

a

ढाकोबा खरं तर इंगळूण घाटातूनच दिसायला लागतो पण मागच्या फेरीत तो सतत ढगांआड असल्यामुळे अजिबातच दिसत नव्हता, यावेळी मात्र तो सतत नजरेसमोर होताच.

a

दुर्गवाडीसमोरचा तलाव रानफुलांच्या ताटव्यात बंदिस्त झाला होता.

a

मागच्या वेळी अस्पष्ट दिसत असलेला दुर्ग आता मात्र त्याचे सर्व सौंदर्य आमच्यासमोर उघडे टाकत होता.

a

a

दुर्गाच्या पायथ्याचा पाणवठा आता स्पष्ट दिसत होता, जेमतेम १५ दिवसांपूर्वी येथे जणू समुद्र होता असेच वाटत होते.

a

दुर्गच्या राईत शिरलो

a

a

मागच्यावेळी धुकटात बुडालेले दुर्गादेवीचे मंदिर आता अजूनच खुलून दिसत होते.

a

राईतून बाहेर पडत आता कोकणकड्याच्या दिशेने निघालो.

a

इथे निसर्गाने आपले दान भरभरुन मांडून ठेवले होते. पाठीमागे नजर टाकली झाडीभरली देवराई विलक्षण सुंदर दिसत होती.

a

सोनकीचे ताटवेच्या ताटवे फुलले होते.

a

a

दुर्गदेवीचा कोकणकडा सोनसळी पठाराने लखलखत होता.

a

a

a

डावीकडे नाणेघाट तर उजवीकडे ढाकोबा आपल्या आभाळात घुसलेल्या शिखरांनी खुणावत होते.

a

कोकणकड्यावर पोहोचलो. मागच्यावेळी काहीच दिसत नसलेल्या कड्याचे रौद्र रूप आता नजरेसमोर येत होते. सह्याद्रीचे कोकणात कोसळणारे कडे आपले कराल रूप दाखवत होते.

a

नाणेघाटाचा सुळका स्पष्ट दिसून येत होता.

a

कोकणातले पळू सोनावळे गावही अगदी सुस्पष्ट दिसत होते.

a

येथून फुफाटत अज्ञातात कोसळणारा धबधबा नेमका कुठे प्रवाहत असतो ते आता नीट दिसत होते.

a

मागे आडवी दिसतेय ती पिंपरगणेची सह्यधार, ह्याच्याच पाठीमागे आहुपे आहे.

a

सगळीकडेच अशी रानफुले फुलली होती

a

नाणेघाट, मध्यभागी जीवधनची अस्पष्टशी कड आणि ढाकोबा

a

बर्‍याच वेळ हे दृश्य डोळ्यात साठवत पुन्हा परतीच्या वाटेकडे निघालो.

a

राई ओलांडून पलीकडे आलो, पुन्हा एकदा दुर्गचे दर्शन घेतले.

a

आणि परतीच्या मार्गाला लागलो.

a

प्रतिक्रिया

कंजूस's picture

17 Oct 2024 - 10:50 am | कंजूस

सुंदर फोटो.

दुर्ग हातवीज घाट भाग भटकायचा राहून गेला आहे. नाणेघाट, चावंड,जीवधन पाहिले आहे. पूरचे मंदिरात गेलो होतो. तिथला पुजारी, बुवा म्हणाला की तो पळू सोनावणे गावचा.पण आता घाट वाटेने येजा करत नाही. एसटीनेच जातो.

प्रचेतस's picture

17 Oct 2024 - 6:38 pm | प्रचेतस

पळू सोनावळे हे कोकणातले गाव. घाटवाटेने इकडे उतरायला दुर्गचे डोणीचे दार ही अवघड वाट तर दार्‍या आणि आंबोली घाट हा मध्यम ते अवघड श्रेणीच्या घाटवाटा आहेत, नाणेघाटाने इकडे उतरणे लांब पडते. सोनावळे नावाचे गाव घाटमाथ्यावर आहे जे इंगळूण घाटाच्या आधी लागते.

स्वच्छंदी_मनोज's picture

18 Oct 2024 - 12:27 pm | स्वच्छंदी_मनोज

याच पळू गावाच्या शेजारिल डोंगरात प्राचीन लेण्या आहेत. आम्ही १५ एक वर्षांपुर्वी बघीतल्या होत्या.

प्रचेतस's picture

18 Oct 2024 - 1:26 pm | प्रचेतस

हो, ती गणपती गडद लेणी. डोणीच्या दराने उतरून ती पाहता येतात किंवा पळू सोनावणे मार्गाने सोपी चढाई करुन बघता येतात.

कर्नलतपस्वी's picture

17 Oct 2024 - 10:57 am | कर्नलतपस्वी

दररोजच्या धकाधकीत अधून मधून विरंगुळा हवा.
अप्रतिम प्रकाश चित्रे.

धन्यवाद.

टर्मीनेटर's picture

17 Oct 2024 - 11:48 am | टर्मीनेटर

काही कौटुंबिक कारणांमुळे ह्यावर्षीच्या पावसाळ्यात खुपच कमी फिरतां आले आणि शिरस्त्याप्रमाणे सह्याद्रीच्या निसर्ग सौंदर्याचा तर अजिबात आस्वाद घेता आला नाही.
ह्या आणि आधीच्या लेखातले सुंदर सुंदर फोटोज पाहिल्यावर ती कमी पूर्ण होऊन मन प्रसन्न झाले!

मागच्या वेळी गूढ असलेले हे ठिकाण किती स्पष्ट सुंदर दिसत आहे.निसर्गाची किमया!

किल्लेदार's picture

18 Oct 2024 - 12:27 am | किल्लेदार

या भागात अद्याप जाणे झाले नाही.

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 Oct 2024 - 11:12 am | राजेंद्र मेहेंदळे

प्रचि पाहुन एकदम गारेगार वाटले बघा!! आणि तुमच्या भटकंतीचा हेवा सुद्धा वाटला. जर मध्यम अवघड श्रेणीतली भटकंती असेल तर जाउया का एखाद्या विकांताला परत?
एक दिवसात पुणे ते पुणे करता येईल असे अंतर आहे का?

प्रचेतस's picture

18 Oct 2024 - 1:30 pm | प्रचेतस

भटकंती अगदी सोप्या श्रेणीची आहे. जुन्नरवरुन हातवीजला सकाळी साडेदहा आणि दुपारी ४ वाजता एसटी आहे (वेळापत्रक तपासून घ्यावे लागेल), दुर्गवाडीला उतरुन ३ किमीची पायपीट करुन इकडे जाता येते, स्वतःचे वाहन असल्यास थेट दुर्ग देवराईपर्यंत पोहोचता येते. मात्र ह्यात ढाकोबा अंतर्भूत केला तर मात्र भरपूर पायपीट आणि डोंगरदर्‍या चढा उतराव्या लागतात.

एक दिवसात पुणे ते पुणे करता येईल असे अंतर आहे का?

स्वतःच्या वाहनाने गेलात तर संध्याकाळी ४/५ वाजेपर्यंत परत येता येते.

श्वेता२४'s picture

20 Oct 2024 - 4:10 pm | श्वेता२४

वॉलपेपर म्हणून लावावेत असे अप्रतिम सुंदर फोटोज आहेत. मन अगदी प्रसन्न झाले.

गोरगावलेकर's picture

30 Oct 2024 - 4:15 pm | गोरगावलेकर

या भागात भटकंती झालेली नाही . खूप छान निसर्ग आणि आपण तो टिपलाही अप्रतिम

हेम's picture

13 Nov 2024 - 8:56 pm | हेम

आम्ही 15 दिवसांपूर्वीच खूटेदार घाट चढाई - दुर्ग माथा - ढाकोबा माथा- दाऱ्या घाट उतराई अशी एक दिवसीय भटकंती केली.. जांभळी कारवी पूर्ण भरात फुललेली होती. खूटेदार चढताना अक्षरश: अंगावर कारवीची फुले टपटपत होती. सर्वत्र सडा होता. अविस्मरणीय!

प्रचेतस's picture

14 Nov 2024 - 6:36 am | प्रचेतस

एकाच दिवसात खुटे दार, दुर्ग, ढाकोबा, दाऱ्या म्हणजे एकदमच मोठी आणि दमदार भटकंती केलीस की. आम्ही गेलो तेव्हा कारवीला बहर अगदी कमी होता.