पुराच्या पाण्यातला थरार
*******************
पाऊस जोरात होता. मुसळधार !
संभा तशा पावसात भिजत होता . बरोबर राजा होता. त्याचा दोस्त . त्याचा कुत्रा . असा पाऊस त्यांनी कधी पाहिला नव्हता. त्यामुळे दोघेही तो आश्चर्याने पाहत होते . समोरचा परिसर उन्हात नेहमी स्वच्छ दिसायचा . तो आता पावसाने झाकला गेला होता . डोक्यावरून पदर घेतलेल्या गावातल्या बाईसारखा .
संभा येळवंडी नदीच्या काठावर रहायचा. म्हशिवली गावाजवळ . त्याच्या जवळपास दुसरी घरं नव्हती .त्याचे वडील मासे धरायचे आणि विकायचे . तो एक लुकडा पण चुणचुणीत मुलगा होता . आणि राजा ? तो एक पांढऱ्या रंगाचा , साधा पण मजबूत कुत्रा होता .
आकाश पूर्ण राखाडी झालेलं आणि सतत पडणारा मोठ्या धारांचा पाऊस . सकाळपासून लागून राहिलेला . आकाशातून बरसणारं पाणी , खाली पाणी , नदीलाही पाणी . चोहीकडे पाणीच पाणी !
असा पाऊस भयंकर असतो . काहीही घडू शकतं ... पुढे काय वाढून ठेवलंय , हे त्यावेळी संभाला तरी काय माहिती ?
अशा पावसात मासे तरी कुठले मिळायला ? त्याच्या वडलांनी थोडेफार मासे धरले होते . ते विकायला गावात गेले होते . आईला घेऊन . अशा पावसातही . नाहीतर खाणार काय ?
येळवंडी फुगतच चालली होती. लालसर गढूळ पाण्याने . त्याला त्यांच्या होडीची काळजी वाटली . ती पाण्यात वाहून गेली तर ? … त्या आकाशी रंगाच्या होडीवर त्यांचं पोट होतं . तो तिच्या दिशेने चालू लागला .
त्याच्या वडलांनी होडी आधीच अलीकडे आणली होती . एका झाडाला बांधली होती . पाणी होडीपर्यंत पोचणं शक्य नव्हतं. त्याला बरं वाटलं . तो तिच्यापासून पुढे गेला . अगदी पाण्यापाशीच .
पाण्याकडे रोखून पाहिलं तर ते स्थिर आहे आणि आपणच पुढे चाललोय असं वाटत होतं .संभा ते पाहण्याचा आनंद घेत होता . शेजारी राजा . संभा आणखी पुढे सरकला . आता तो एका दगडावर पाय देऊन उभा राहिला . एका उंचवट्यावर . खाली पाणी थोडं खोल होतं .
पलीकडे काहीतरी सळसळलं .तो एक फण्या नाग होता . मोठा आणि खतरनाक . चमकदार चॉकलेटी . चावला की सुट्टीच ! तो पुरात अडकला होता . वाहत चालला होता .त्याला या काठापाशी आधार मिळाला आणि तो वर चढला . तो मातीवर सरसरत निघाला तर नेमका संभाच्या दिशेने . आणि त्याचं लक्ष नव्हतं ... चावला तर ?
पण राजाचं लक्ष होतं .तो लगेच त्या नागावर धावून गेला. भुंकू लागला .नागाने चटकन दिशा बदलली आणि तो गेलाही .
हे सारं क्षणात घडलं होतं . पण राजाच्या भुंकण्यामुळे संभाचं लक्ष तिकडे गेलं मात्र - त्याला ते मोठं जनावर दिसलं आणि तो गडबडला . तो दगडावरून घसरला आणि धपकन पाण्यात पडला . आता ? ...
संभा पट्टीचा पोहणारा होता . पाण्याला वेग होता , तरी ठीक होतं . पण - राजाभाऊ ? त्यांनी टाकली की उडी पाण्यात. राजाही पट्टीचा पोहणारा होता . कुत्र्यांना पोहता येतंच . त्यांना पोटाला भोपळा बांधून शिकण्याची गरज पडत नाही . इतर वेळी पाणी कमी असताना दोघे पाण्यात डुंबायचे . आत्ताही राजाला तसंच वाटलं होतं बहुतेक . संभा असताना पाण्याची कसली भीती ? की संभाला वाचवायला ? …कोणास ठाऊक ? वा रे बहाद्दर ! पण आजची वेळ वेगळी होती . राजा प्रवाहात सापडला आणि तो पाण्यात वाहत वाहत पुढे जाऊ लागला .
संभा चार हात मारून बाहेर आलाही. पण राजा ? त्याचा जिवलग मित्र तर क्षणाक्षणाला दूर चालला होता . आजूबाजूला मदत करायला कोणीही नव्हतं .
अशा वेळी संभा काय करणार होता ? अशा पाण्यात होडी घालायची नसते , असं वडलांनी सांगितलेलं होतं . आज सकाळी त्यांनी स्वतः नाईलाजाने होडी पाण्यात घातली होती ; पण काठापाशीच . त्यातही संभाला त्यांनी होडीत घेतलं नव्हतंच.
मध्यभागी पाण्याला चांगलाच वेग होता . आता पाणी शिरजोर होतं .राजा जिवाच्या आकांताने पाय मारत होता . पाण्यात उतरून त्याची चूक झाली होती …
संभाच्या डोळ्यात पाणी आलं .राजा त्याचा खासमखास मित्र होता . त्याने आधी नागाचं संकट पळवून लावलं होतं . वर त्यालाच सोबत म्हणून पाण्यात उडी टाकली होती . म्हणूनच तो पुरात अडकला होता . आता ? - आता संभाची पाळी होती .
त्याने तिरमिरीत होडी सोडली . ढकलत आणली अन घातली की पाण्यात . त्याने वल्ही सावरली व ती मारायची सुरुवात केली . वडलांबरोबर तो होडी वल्हवायला शिकला होताच . तो काटक होता .अंगात असलेल्या साऱ्या शक्तीनिशी तो होडी चालवत होता .
राजा पुढे गेला होता . होडी चालवता येत असली तरी पुराची ताकद वेगळीच होती . आता संभाला कळलं, वडलांनी पुरात होडी घालायची नसते , असं का सांगितलं होतं ते . होडी आपोआप पुढे जात होती . फक्त त्याला ती राजाजवळ काही नेता येत नव्हती . पण संभाने जोर लावून होडी त्याच्यापर्यंत नेली . खरं तर ते अजिबात सोपं नव्हतं . पण त्याच्या अंगात आता वेगळीच शक्ती संचारली होती . मित्राला पाहताच राजा ओरडू लागला . आधी घाबरलेला तो आता आनंदी झाला . पण ते पुरेसं नव्हतं ना . त्याला होडीत घ्यायचं कसं ? काठ धरून वर चढून यायला तो काही पोरगा नव्हता . मग त्याला उचलून घ्यावं लागणार होतं . पण तो जड होता . संभासाठी ते अवघड होतं . त्याला उचलणं काही जमेना . तो त्याच्या गळ्यात असलेला पट्टा धरून ओढण्याचा प्रयत्न करत होता . होडी आणि राजा दोघेही पुढे पुढेच चाललेले .
पुढे खेचणारं पाणी , वाहत जाणारी होडी , धडपडणारा राजा आणि छोटा संभा , त्यात आजूबाजूला मदतीसाठी कोणी नाही . काय दुःखद दृश्य होतं ते !
संभाला वाटलं की तो नदीतून असाच वाहत पुढे जाणार आणि भाटघर धरणाच्या भिंतीला जाऊन धडकणार किंवा पाणी वाढलं असलं तर त्याच्या उघडलेल्या दरवाजांमधून खाली सांडव्यात पडणार .
भाटघर हे भोर परिसरातील एक मोठं धरण आहे . येळवंडी नदीवरचं . इंगजांनी बांधलेलं . वैशिष्ट्यपूर्ण . पाणी वाढलं की धरणाच्या भिंतीचे स्वयंचलित दरवाजे आपोआप उघडतात आणि पाणी खाली पडू लागतं .
संभा होडीत खाली बसला ,त्याने राजाचा गळपट्टा धरला आणि त्याने त्याला उचललं . पण दुर्दैव ! तो त्याच्या हातातून निसटला आणि पाण्यात पडला . एवढंच नाही तर - होडीच उलटली आणि संभाही पाण्यात पडला . दोन्ही वल्ही वाहून गेली . आता खरी परीक्षा होती .
संभाने गावातल्या मारुतीला आठवलं . तो गरजला - जय बजरंग बली ! आणि तो हात मारत होडीजवळ पोचला . होडीला धरलं आणि उलट्या होडीवर चढून बसला . तो पुढे गेला . राजाजवळ . आता त्याने त्याचा पट्टा धरला आणि ओढलं त्याला होडीवर . जमलं ! या झटापटीत ती शहाणी पुन्हा सुलटी काही झाली नाही . आणि उलट्या होडीवर राजाभाऊ आरामशीर चढू शकले . हे तर ब्येस काम झालं ! पण एक काम झालं, पुढे काय ? पाणी पुढे नेत होतं . हाताशी वल्ही नव्हती .
त्यात गंमत ! राजा ओलं अंग झटकू लागला .केसातून पाणी निथळण्यासाठी . मग संभा त्याला ओरडला - ए , वरून पाणी कमी पडतंय म्हणून तूही पाणी उडव . पुन्हा पडायचंय का पाण्यात ? तेव्हा तो गप्प बसला .
संभाचं डोकं पाण्यापेक्षा वेगात पळू लागलं . तो आजूबाजूला पाहू लागला . पाण्यातून येणारी एक मोठी फांदी त्याने उचलली . झालं वल्हं तयार . पण पाणी त्याच्या मनाप्रमाणे होडीला ओढत होतं . मग ? संभाने पुन्हा डोकं चालवलं . पुढे एक झाड होतं . त्याने निकराचा प्रयत्न केला आणि होडी तिकडे नेली .कशासाठी ? झाडावर चढण्यासाठी ? तो चढला असता ; पण झाडावर राजा कसा चढणार ? नाही . त्याची युगत तशी नव्हती .
होडी त्या झाडाला जाऊन अडकली . त्याला तेच हवं होतं . त्याने सुटकेचा निःश्वास सोडला . त्याने नजर फिरवली आणि अंदाज बांधला की ते टाळं - म्हशिवली असावं . पुढचं गाव . एकंदर त्यांच्या त्या भयंकर पूरप्रवासाला टाळं लागलं होतं.
त्याने तोंडावरचं पाणी पुसलं . जरा दम खाल्ला . पलीकडे काठावर माणसं दिसत होती . त्याने हाका मारल्या ; पण नाही . पावसाच्या रपारप आवाजात त्याचा आवाज पोचला नाही . मग राजा भुंकू लागला . तरीही नाही . मग संभाने अंगातला केशरी टी शर्ट काढला आणि हवेत फिरवायची सुरुवात केली . आणि एकदाचं त्या माणसांचं लक्ष यांच्याकडे गेलं . त्या ढगाळ वातावरणात तो केशरी रंग उठून दिसत होता . त्यांनी तो म्हशिवलीच्या ढोल पथकाचा टी शर्ट ओळखला . त्यांचा गलका सुरु झाला - पोरगं पुरात अडकलंय म्हणून
लोक जमा झाले . दुसरी एक होडी पाण्यात घातली गेली . त्यामध्ये काही माणसं . ते यांच्याजवळ आले . यांना त्या होडीत घेण्यात आलं . त्यांची होडी झाडातून सोडवण्यात आली . ती सरळ करून त्यामध्ये दोघे जण बसले . मग दोन्ही होड्या किनाऱ्यावर आणण्यात आल्या . लोक संभाला ओरडले . पण त्याची हकीकत ऐकून त्यांनी देवाचे आभारच मानले . संभा राजाला मिठी मारून रडत होता .
त्याची होडी तिथे बांधून ठेवण्यात आली . मग दोन माणसं त्याला घरी सोडायला आली . आता काठाकाठाने पायीच प्रवास होता .
त्याचे आई-वडील झोपडीच्या बाहेरच उभे होते . आश्चर्य करत - की हे दोघे कुठे गेले असावेत ?
संभा आईला जाऊन बिलगला . राजा वडलांच्या अंगावर उड्या मारू लागला . आलेल्या माणसांनी सगळं सांगितलं . वडलांना काय बोलावं सुचेना . आईच्या डोळ्यांत पाणी . आईने नदीला हात जोडले . जिवावरचं संकट टळलं होतं . तिने दोघांच्या अंगावरून मीठमोहरी उतरवून टाकली .
गरमागरम जेवण झाल्यावर संभा मस्त गोधडीत शिरला . राजा त्याच्या कुशीत . खूप थंडी भरली होती दोघांना .
झोपेत संभाला स्वप्न पडलं . तो पाण्यात वाहून चाललाय . मग त्याला एक होडी दिसली . तो तिच्यावर चढून बसला . खरं म्हणजे तो राजाच्या अंगावर चढून झोपला होता . राजाला झालं ओझं. त्याने त्याला खाली पाडलं . स्वप्न सुरूच होतं . संभा पुन्हा पाण्यात वाहून जाऊ लागला म्हणून तो ओरडला - राजा !
राजाने त्याच्या कानात नुसतं कुंई केलं. त्याला म्हणायचं होतं - झोपू दे ना यार ! जरा गप पड आता . एकदम शांत !
प्रतिक्रिया
23 Jul 2024 - 9:49 pm | बिपीन सुरेश सांगळे
पावसाची गोष्ट पावसात वाचण्यातच मजा !
25 Jul 2024 - 7:37 am | बिपीन सुरेश सांगळे
वाचक मंडळी आभारी आहे .
25 Jul 2024 - 10:24 am | श्रीरंग_जोशी
थरारक गोष्ट खूप आवडली. पूराचे वर्णन अगदी चपखल आहे.
ही गोष्ट वाचून भाटघर धरणाला २००७ सालच्या पावसाळ्यात दिलेली भेट आठवली.
25 Jul 2024 - 12:14 pm | कर्नलतपस्वी
सासवड च्या कर्ता नदीचा किस्सा, बहुतेक आचार्य अत्रे यांनी लिहीला असावा नक्की आठवत नाही.
पट्टीचा पोहणारा,सकाळी प्रातर्विधीला नदी काठी गेलेला. पात्र कोरडे होते. पावसाळ्याचे दिवस अचानक पाणी वर चढू लागले. तसा हा नदीपात्रातील खडकावर चढला. काठावरील लोकांनी त्याला बोलावले पण जरा आणखीन पाणी चढू द्या मग येतो. पुढे इतके पाणी आले की त्याने वाहून जायच्या आगोदर हात जोडून लोकांना नमस्कार केला.
अश्या आशयाचा धडा. निसर्गा बरोबर पंगा घेतला तर महागात पडते हे लहानपणापासून माहीत आहे.
भीमा नदीच्या पुरात खुप पोहलो आहे.
कथा आवडली.
25 Jul 2024 - 2:32 pm | टर्मीनेटर
पन्नाशीच्या दिशेने वाटचाल सुरु असलेल्या वयातुन डायरेक्ट आपण ८-१० वर्षे वयाचे झाल्या सारखे वाटायला लावणारी बालकथा आवडली 😀
3 Aug 2024 - 3:08 pm | श्रीगणेशा
वाचताना चित्र उभं राहतं डोळ्यासमोर. छान लिहिली आहे कथा!
3 Aug 2024 - 3:59 pm | श्वेता२४
पण शेवट सुखद केला म्हणून आवडली. :))
4 Aug 2024 - 4:17 pm | मुक्त विहारि
हेच म्हणतो...