केरळ कन्याकुमारी लेखमाला : पूर्वतयारी

श्वेता२४'s picture
श्वेता२४ in भटकंती
5 Jul 2024 - 5:39 pm

     नमस्कार. खूप दिवसांनी मिसळ पाववरती येत आहे. निमित्त आहे आमच्या केरळ-कन्याकुमारी भटकंती लेखमालेचे....... खूप दिवसापासून केरळ माझ्या बकेट लिस्ट मध्ये होते. मिपावर केरळ वरती अनेक लेख आहेत. तसेच युट्युब वरती सुद्धा केरळ बद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे. माझ्या सासूबाई वर्षभरापूर्वी सेवानिवृत्त झाल्या. त्यांना कुठेतरी फिरायला जायचे होते. आपण सर्वजण कुठल्यातरी निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाऊयात याबाबतचे तू नियोजन कर असे सासूबाईंनी मला सप्टेंबर मध्ये सांगितल्यामुळे माझा आधीच तयार असलेला केरळ प्लान त्यांना सांगितला आणि आमचे दिवाळीनंतर केरळला जायचे निश्चित झाले. माझ्या हातात नियोजनासाठी जवळ जवळ तीन महिने होते. कुठेही गेलो तरी बजेट सहल करावी असा माझा आग्रह असतो. उगाच अवास्तव खर्च करणे टाळावे यावर माझा कटाक्ष असतो. तथापि सासुबाई म्हणाल्या की एक तरी प्रवास हा विमानाने करूयात. मग काय .... मी विमानाची तिकिटे मॉनिटर करायला सुरुवात केली. त्यावेळी विमानाचा दर साधारण साडेआठ हजार प्रतिमाणशी चालू होता. केरळमध्ये दोन विमानतळ आहेत. एक म्हणजे कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ. आम्ही साधारण पूर्ण केरळ फिरायचे ठरवले होते. आमच्या हातात आठ रात्री नऊ दिवस होते. त्यातले शेवटचा दिवस मला आराम करण्यासाठी ठेवायचा होता. जेणेकरून सोमवारपासून परत ऑफिस जॉईन करता येईल. आधी मी जाताना कोचीपर्यंत रेल्वेने व येताना त्रिवेंद्रम वरून विमानाने अशा पद्धतीने प्लॅन आखला होता. कोची व त्रिवेंद्रम या दोन्ही ठिकाणची जातानाची व परतीची अशी तिकिटे मी सतत मॉनिटर करत होते. बुकिंग करण्याची घाई केली नाही कारण कॅन्सलेशन चार्जेस भरपूर असतात हे मी पाहिले होते. आश्चर्यकारक रित्या सप्टेंबर नंतर कधीतरी तिकिटाचे दर अचानक खाली आले व साधारण चार-पाच हजाराच्या आसपास किंमत दिसू लागली. मुळात विमानासाठी आठ ते नऊ हजार रुपये एका वेळचे खर्च करण्याची तयारी ठेवली होती. आता दर निम्म्यावरती येत आहेत तर सरळ जाताना आणि येतानाही विमानाने जायचे असे ठरवून स्थलदर्शनामध्ये काही जागा अजून समाविष्ट केल्या.
     केरळ मुळातच एका खेपेमध्ये पाहणे अन्यायकारक आहे असे माझे स्पष्ट मत आहे. केरळ पाहायचा झाला तर उत्तर केरळ, मध्य केरळ आणि दक्षिण केरळ असे केरळचे सरळ सरळ 3 भाग करता येतील. उत्तर केरळमध्ये बघण्यासारखी ठिकाणे म्हणजे कासारगोड, बेकल, कोझिकोडे व वायनाड. मध्य केरळमध्ये बघण्यासारखी ठिकाणे म्हणजे त्रिशूल, गुरुवायुर, अथीरपल्ली वॉटरफॉल, कोची, कलाडी, मुन्नार, टेकडी व आलेप्पी. दक्षिण केरळचा विचार केला तर मून्रो आयर्लंड, कोल्लम, जटायू अर्थ सेंटर, वर्कला, त्रिवेंद्रम, पूवर व कन्याकुमारी असा प्लॅन करता येईल. उत्तर केरळमध्ये रस्ते हे अतिशय निमुळते व घाटाचे वळणावळणाचे असल्यामुळे उत्तर केरळ पाहण्यासाठी जास्त दिवस लागतात त्यामुळे उत्तर केरळ व मध्य केरळ अशी ट्रिप शक्यतो क्लब करू नये. तथापि थोडे जास्त दिवस हाताशी असतील तर मध्य केरळ व दक्षिण केरळ ही सहल एकत्र करता येणे शक्य आहे. मी स्वतः राजस्थान जसे चार टप्प्यात करायचे ठरवले आहे तसेच केरळ सुद्धा तीन टप्प्यांमध्ये करायचा ठरवला होता. परंतु एवढा विमानाचा खर्च करतच आहोत व सासूबाईंना काही सारखे सारखे येणे जमणार नाही हा विचार करून मध्य केरळ व दक्षिण केरळ ही ट्रीप एकत्र करून टाकावी त्याचबरोबर कन्याकुमारी सुद्धा या सोबतच करावी असा विचार केला. आणि हा विचार अत्यंत योग्य ठरला. आमच्या आठ रात्री नऊ दिवस या प्लानमध्ये गुरुवायूर व अथीरपल्ली हे काही बसेना. शेवटी ही दोन ठिकाणे उत्तर केरळाच्या ट्रिपमध्ये समाविष्ट करायचे असे ठरवून कोची, a)कलाडी, b)मुन्नार, c)थेकडी, d)मूनरो आयलंड, वर्कला, e)जटायू अर्थ सेंटर, i)त्रिवेंद्रम, h)पूवर, f)पद्मनाभ पुरम पॅलेस, सुचिंद्रम टेम्पल(f व g च्या मधील गोल) व g)कन्याकुमारी ही ठिकाणे कव्हर करण्याचे निश्चित झाले. नकाशा खालीलप्रमाणे

नकाशा

     Go इबिबो व बुकिंग डॉट कॉम या वेबसाईटवरून मी कोची आंतरराष्ट्रीय विमानतळापाशी Base9Airport हे हॉटेल एका रात्री करिता, Durga Budget Stay हे हॉटेल मुन्नार येथे दोन दिवसांसाठी, Holiday Villa हे हॉटेल थेकडी येथे व वर्कला येथे एक दिवस व Hotel JAAS कन्याकुमारी येथे दोन दिवस असे हॉटेलचे बुकिंग करून टाकले. प्रत्येक ठिकाणी एक मोठी फॅमिली रूम व एक स्वतंत्र बेड आम्हाला उपलब्ध करून देणार होते. जेणेकरून आम्ही सर्वजण एकाच खोलीत राहू शकणार होतो. हे सर्व आम्हाला अत्यंत स्वस्त मिळाले व सर्वच ठिकाणी सोय अतिशय चांगले झाली. पेपर केरला या कंपनीच्या कारचे रिव्ह्यू अतिशय चांगले होते. पेपर केरला या कंपनीकडून मला सगळ्यात कमी रकमेचे कोटेशन मिळाले, त्यानुसार मी या कंपनीचे सुरुवातीचे काही पैसे भरून बुकिंग करून टाकले. हिंदी बोलणारा ड्रायव्हर द्यावा अशी आवर्जून सूचना केली होती. जवळपास तीन आठवडे आधी मी या सर्व गोष्टी पूर्ण केल्या आणि सहलीची आतुरतेने वाट पाहू लागले.
     शेवटी जायचा दिवस उजाड उजाडला. आमचे विमान संध्याकाळी सात वाजता होते. त्यामुळे चार वाजताच घरी पोहोचायचे या हिशेबाने ऑफिस मधून लवकर निघायचे आधीच सांगितले होते.पण शेवटपर्यंत काही ना काही अर्जंट काम येत राहिले व शेवटी एकदाचे मी चार वाजता ऑफिस सोडले. धावत पळत चर्चगेटला लोकलमध्ये बसले तर स्पाइस जेट कडून मेसेज आला की आपले विमान दोन तास उशिरा येणार आहे. त्यामुळे विमान नऊ वाजता निघणार होते. मनातल्या मनात थोडे बरेच वाटले. घरी पोहोचून थोडे फ्रेश होऊन आम्ही साधारण साडेसहा वाजताच विमानतळावर पोहोचलो. सर्वांचाच हा पहिला विमान प्रवास असल्यामुळे चेक-इन प्रोसेस तसेच अन्य कोणत्याही औपचारिकतेबद्दल माहिती नव्हती. त्यामुळे लवकर जाऊन सर्व प्रोसेस करून तिथे निवांत थांबूयात हा विचार करून आम्ही लवकरच गेलो. सिक्युरिटी चेकिंग झाले. बॅगा केबिनमध्ये टाकण्यासाठी दिल्या आणि आम्ही मग तिकडे फिरत राहिलो. सात वाजता तिथेच असलेल्या एका साउथ इंडियन काउंटरवरून आम्ही रात्रीचे डिनर करून घेतले कारण रूमवर पोहोचायला उशीर होणार होता. तसे मी हॉटेल मालकाला फोन करून सांगितलेही होते. सर्व काही व्यवस्थित पार पडेल ना याचे मला जरा टेन्शन आले होते. शेवटी एकदाचे दहाच्या सुमारास आमच्या विमानाने उड्डाण केले. आम्ही साडेबारा वाजता कोची विमानतळावरती पोहोचलो. तिथे चक्क पाऊस पडत होता. हवेत गारवा होता. आम्ही प्रीपेड टॅक्सीने जवळच असलेल्या आमच्या हॉटेल वरती पोहोचलो. त्यावेळी रात्रीचा एक वाजला होता. विमानात मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी हॉटेल मालकाला उतरल्यानंतर फोन केला. त्याने तो उचलला आणि तुम्ही सावकाश या असे सांगितले. हॉटेलचे लोकेशन त्याने व्हाट्सअप वर आधीच पाठवून दिले होते. आम्ही तिथे पोहोचेपर्यंत तोही गाडीतून आला. त्याने आम्हाला रूम दाखवली. रूम प्रशस्त होती . साधारण दोन रूम होत्या. आतल्या रूम मध्ये डबल बेड व एक एक्स्ट्रा बेड व अटॅच बाथरूम होते तर बाहेरच्या रूममध्ये सोफा व डायनिंग टेबल होते. एकूणच आम्हाला रूम अतिशय आवडली. आम्ही त्यांना एक बेड बाहेर एक्स्ट्रा टाकायला सांगितला. त्यालाही त्याने कोणतीही खळखळ न करता पटकन व्यवस्था करून दिली. शेवटी एकदाचे केरळमध्ये पोहोचलो होतो. आता जरा मला सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्यासारखी वाटू लागली. मी निश्चिंत होऊन नेत्रादेवीच्या अधीन झाले. उद्या आम्हाला सर्वप्रथम शंकराचार्यांचे जन्मस्थान असलेल्या कलाडी येथे भेट द्यायची होती आणि वाटेत येणाऱ्या स्थळांना भेट देत मुन्नारला पोहोचायचे होते. हा सर्व वृत्तांत पुढील भागात........!

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

5 Jul 2024 - 5:39 pm | श्वेता२४

हा धागा भटकंती या सदरामध्ये हलवावा

कर्नलतपस्वी's picture

5 Jul 2024 - 7:08 pm | कर्नलतपस्वी

यशस्वी होण्याची पहिली पायरी म्हणावी लागेल.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

सन दोन हजार नऊ मधे आम्हीं कन्याकुमारी जायचे ठरवले. सैन्यात असल्याने भरपुर तामीळ,मल्याळी सहकर्मी होते. माझा एक सहकर्मी, माझा उजवा हात म्हणावा लागेल त्याने त्याची स्पोर्ट्स कार व गाईड म्हणून त्याचा मेव्हणा दिला. मदुराई, कोडाईकॅनाल, रामेश्वरम, कन्याकुमारी,नागरकाॅईल,पद्मनाभपुरम आणी तिरूअनंतपुरम असा प्रवास केला. बरे आजी, माजी आणी काही पाजी(घनिष्ट मित्र) सहकर्मी,काही सेवानिवृत्त तर काही सेवारत ,केरळ व तामीळ नाडू मधे असल्याने आमची भटकंती मस्तच झाली.
केरळ,तामीळ नाडू मधील आपले अनुभव वाचताना पुन्हा एकवार फिरून आल्यासारखे वाटेल.

टर्मीनेटर's picture

7 Jul 2024 - 8:49 am | टर्मीनेटर

छान सुरुवात!

उत्तर केरळमध्ये बघण्यासारखी ठिकाणे म्हणजे कासारगोड, बेकल, कोझिकोडे व वायनाड

उत्तर केरळ मधील ही ठिकाणे अजुन बघायची राहिली आहेत!

आमच्या आठ रात्री नऊ दिवस या प्लानमध्ये गुरुवायूर व अथीरपल्ली हे काही बसेना.

गुरुवायूरचे समजु शकतो, पण धबधब्याच्या अगदी जवळ जायला दरीत खुप खाली उतरुन जायला आणि परत ते अंतर चढुन वर येण्यात बरीच दमछाक आणि वेळ लागत असला तरी 'अथीरापल्ली' हा भव्य धबधबा तुम्हाला रस्त्यावरुन लांबुनही पहाता आला असता, आणि तेथे गेला असतात तर 'महेंद्र बाहुबली', 'सांगा', तिचा नवरा आणि त्यांच्या कबिल्यालाही आनंद झाला असता 😀

पुढच्या भागांत, तुमच्या नजरेतुन पुन्हा केरळ बघण्यास उत्सुक आहे!

चौथा कोनाडा's picture

7 Jul 2024 - 2:19 pm | चौथा कोनाडा

अ-ति-श-य सुंदर सुरूवात !
एक नंबर नकाशा !
❤️❤️❤️

बरेच तपशिल दिल्याने ही मालिका सर्व वाचकांसाठी केरळ सहल नियोजनासाठी खुप महत्वाची ठरणार यात शंका नाही !
लेखन असेच ऐसपैस होऊ द्यात.
या साठी आपण आपला बहुमुल्य वेळ देता आहात याचं विशेष कौतु़क !

प्रचेतस's picture

8 Jul 2024 - 7:14 am | प्रचेतस

सुरेख सुरुवात.
तपशीलवार लेखमाला येऊ द्यात.

गोरगावलेकर's picture

8 Jul 2024 - 10:00 am | गोरगावलेकर

या लेखमालेच्या निमित्ताने दहा वर्षांपूर्वी केलेल्या केरळ-कन्याकुमारी सहलीच्या आठवणी ताज्या होणार

श्वेता व्यास's picture

31 Jul 2024 - 3:36 pm | श्वेता व्यास

वाह छान झाली पूर्वतयारी, चित्र काही मला दिसत नाहीये.
केरळ एकदा पाहून झालंय पण स्वत: प्लॅन नव्हता केला.
ट्रॅव्हल कंपनी कडून गेलो होतो, एकंदरच स्वतः प्लॅन करून जाणाऱ्यांबद्दल कौतुक आहे :)

श्वेता२४'s picture

1 Aug 2024 - 11:56 am | श्वेता२४

तुम्ही चूक लक्षात आणून दिली त्याबद्दल धन्यवाद नकाशा परत अपडेट केला आहे

अमर विश्वास's picture

1 Aug 2024 - 3:04 pm | अमर विश्वास

उत्तम सुरुवात ..
इतकी ठिकाणे ८-९ दिवसात ... म्हणजे बरीच धावपळ होणार ...

श्वेता२४'s picture

1 Aug 2024 - 9:08 pm | श्वेता२४

व्यवस्थित नियोजन केले तर धावपळ होत नाही. उलट आपणच सर्व ट्रीप प्लॅन केलेली असल्याने वाटेत पाहिजे तिथे गाडी थांबवता येते. मुळात आम्ही सर्वजण शिस्तबद्ध आहोत. रोजचे उठणे, रात्रीचे झोपणे, उद्या काय काय पाहायचे आहे, कुठली कुठली ठिकाणी कव्हर करायचे आहेत याचा विचार करून त्याप्रमाणे आदल्या दिवशी रात्री लवकर झोपून दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठणे हे आम्ही जमवतो. कोणत्याही परिस्थितीत सकाळी आठच्या आधी आम्ही आवरून तयार असतो आणि जर एखाद्या ठिकाणी लवकर पोहोचायचे असेल तर अगदी सकाळी सहा वाजता देखील आम्ही उठून तयार होतो. याबाबतीत मुलाचे देखील अतिशय सहकार्य असते. त्यामुळे सर्व काही वेळेत काहीही घाईगडबड न होता व्यवस्थित जमवता आले. उगाचच कुठे पळापळ केली आहे असे अजिबात झाले नाही