वडोदरा,पावगढ-चंपानेर-१
https://www.misalpav.com/node/52359
वडोदरा,पावगढ-चंपानेर-२
https://www.misalpav.com/node/52364
श्री क्षेत्र गरूडेश्वर
भरपुर नाष्टा झाला होता. सहलीचा पहीला दिवस, उत्साह ओसंडून वहात होता. साधी वेषभूषा,कॅमेरा,दुर्बीण,मोबाईल घेऊन खाली पार्किंगमधे आलो.चालक वाट पहात होता. संभाषणाला वाचा फोडण्या साठी मी "जय श्रीराम", म्हणालो तर उत्तरादाखल तो "जय कुबेर",म्हणाला,हाडाचा गुज्जुभाई. हसतमुख, कपाळावर गंधाचा टिळा,"छरहरी काया", पस्तीशीतला तरूण.पर्यटन करताना सर्व गुणसंपन्न चालक मिळणे हे सुद्धा खरे नशिबच म्हणले पाहीजे. चालक कसा असावा? तो बोलभांड असावा पण आघाव डबडा नसावा. स्थानिक असो वा नसो पण पर्यटन स्थळ आणी पर्यटंकाची नाडी ओळखणारा असावा.स्मार्ट असावा पण C C (चटक तात्या) नसावा इत्यादी.....
"मै अमरिशभाई,अमरिश जोशी,अगले दो तीन दिन आपका मार्गदर्शक ,हलकेच स्मितहास्य फेकत त्याने आपली ओळख दिली. प्रत्युत्तरा दाखल मी माझी व परीवाराची ओळख करून दिली. सर्व जण गाडीत बसलो, गाडी गंतव्य स्थानाकडे निघाली.कुठे जायचे ते चालकाला माहीत होते.गरूडेश्वर,एकतानगर व केवडिया एकाच दिशेला असल्याने ते एकाच दिवसात करायचे ठरले होते. सकाळचे नऊ सव्वा नऊ वाजले होते.प्रशस्त, खड्डे रहित रस्ते,सुरळीत वाहतूक पाहून आपले पुणं आठवलं.मरणाची घाई पुण्यात कधीही,कोठेही बघा वाहतूक कोंडी.
नुकत्याच संपन्न झालेल्या आयोध्या राममंदिर सोहळ्याचे शहरात जागोजागी मोठ्ठे मोठ्ठे होर्डिंग्ज अजून दिसत होते. एका रस्त्याला छत्रपती शिवाजी महारांजाचे नाव दिलेले दिसले.पाटी गुजराथी भाषेत होती. सैनिक अस्पताल अहमदाबाद येथे काही दिवस राहिलो असल्याने गुजराथी भाषेतील काही अक्षरां बरोबर जुजबी ओळख झाली होती. जसे,वडोदरा,मराठी तर વડોદરા गुजराथी मधे. दुकानावरील पाट्या वाचता येत असल्या तरी काही अक्षरे कळत नसल्यामुळे पाट्या वाचणे हे शब्द कोडे सोडवण्या सारखेच वाटत होते.
आता आम्ही शहराच्या बाहेर आलो होतो. दोन्ही कडेला शेती व हिरवळ,पाणथळ जागां गाडी बडोदा-डभोई रस्त्यावर पळत होती. गुजरात मधील सुहाना मौसम बघून १९७६च्या मंथन चित्रपटातील चुलबूली स्मिता पाटील व तीचे गाणे आठवले...
मेरो गाम काठा पारे
मंथन (1976)
संगीतकार- वनराज भाटिया
गीतकार- निती सागर
गायीका-प्रीती सागर
मेरो गाम काठा पारे
जहाँ दूध की नदियाँ बाहे
जहाँ कोयल कू कू गाये
म्हारे घर अंगना न भूलो ना
म्हारे गामड़ नीला लेर
जहाँ नाचे मोर नडेल
जहाँ दूध की रेलम छेल
जहाँ वड़ती पल्ली छैय्याँ
माँ सुत्ती जाती गैय्याँ
आवो रे
आओ-आओ म्हारे गाम
सबसे प्यारो म्हारो धाम
याद रखियो मेरो श्याम
म्हारे घर अंगना न भूलो ना
कभी रुकना म्हारे गाम
ओ परदेसिया
अगदी असेच वातावरण होते.दोन्ही बाजुला विवीध पक्षी दिसत होते. वेगळा,अनोळखी पक्षी दिसल्यावर थांबून निरिक्षण करावे,फोटो काढावा अशी तीव्र इच्छा होत होती पण वेळेचे बंधन आणी सहप्रवाश्यांची संमती या मर्यादा सांभाळाव्या लागत होत्या.निवडणूक तोंडावर होत्या, राजकारण, विषय निघणे स्वाभाविक. सौं. चा अतिशय प्रिय विषय आणी कर्म धर्म संयोगाने चालक महोदयांना सुद्धा या विषयात विशेष रूची, मग मी श्रोत्याची भुमिका घेतली.
प्रवास चालू होता. चालकाने अचानक गाडी साईडला घेतली. ताजी भाजी व जाबं(गुलाबी पेरू) विकायला काही शेतकरी बसले होते.
अमरिशभाईने घरच्यासाठी भाजी पेरू घेतले. गुजराती पेरू सगळ्यात कसे चांगले हे पटवून देत आम्हाला पण एक किलो खरेदी करायला लावले. पेरू खाता खाता शहरातील भाजी बाजारा पेक्षा अशा रोड साईडवर मिळणाऱ्या भाज्या किती ताज्या व किफायतशीर असतात यावर थोडे बौद्धिक घेतले,किती पैशांची बचत झाली याचा हिशेब सुद्धा त्याने आमच्या समोर मांडला.
आम्ही डभोई-व्हेगा रोडवर वळालो. बडोदा ते श्री क्षेत्र गरूडेश्वर ऐंशी कि.मी. दिड तासाचा रस्ता गप्पांच्या नादात कधी संपला व कधी मंदिर परिसरात येवून पोहोचलो कळाले नाही. श्री क्षेत्र गरूडेश्वर, वाडी,गाणगापुर प्रमाणे दत्तसंप्रदायीक भक्तांसाठी महत्त्वाचे तीर्थक्षेत्र. अतिशय सुंदर स्थान.नर्मदा मैय्याचा किनाऱा, अप्रतीम निसर्ग,स्वच्छ सुंदर बैठे मंदिर यांच्या सान्निध्यात सात्विक भाव न जागतील तर नवलच!
प्रवेशद्वारातून आत गेले की ट्रस्ट चे ऑफिस, धर्मशाळा,रहाण्याची व्यवस्था.दोन प्रसादाची दुकाने. मुख्य महादेव मंदिर, दत्तात्रेय मंदिर आणी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज समाधी ही येथील मुख्य मंदिरे.प्रशस्त अशा मुख्य मंदिरात सभा मंडप आणी गर्भगृह. भक्त आणी भगवान यांच्यामधे कुणीच नाही. फार गर्दी नव्हती. इतर मंदिरात सुद्धा दर्शन घेतले. दुपारच्या मध्यान्ह आरती नंतर माफक दरात भोजनाची सोय.तीन दिवस रहाण्या साठी धर्मशाळा.सात दिवस खोली हवी असेल तर आगोदर संपर्क साधावा.इथे हाॅटेल,लाॅज वगैरे काही नाही. काही परिक्रमावासी दिसत होते.
====
====
====
====
====
====
==
मातुल घराण्यातील आमचे आजोबा श्रीपाद दत्तात्रय देशपांडे ,परमपूज्य मामा देशपांडे यांची प्रकर्षाने आठवण झाली. मामाआजोबा, दत्तसंप्रदायातील अनुग्रहित अधिकारी होते. आजोबा वय वर्ष तेरा असताना पणजोबा बरोबर इथे आले होते.आठवण का झाली त्यांची सविस्तर माहीती खाली दिली आहे.
नर्मदा किनारी जाण्यास सिमेंटच्या पायर्या आहेत.मंदिर उंचावर असल्याने खाली उतरून जावे लागते.विस्तीर्ण नदीपात्र मन मोहून घेते. भक्त मैय्याच्या प्रेमात पडतोच.बघीतले तेव्हां मी सुद्धा प्रथमदर्शनीच आकर्षित झालो. विस्तीर्ण नदी पात्रात अनेक पाणपक्षी क्रिडा करत होते. काहीजण धार्मिक विधी मधे मग्न होते तर स्थानिक आपल्या दिनचर्येत. विशेष नमूद करावेसे वाटते की पुर्ण प्रवासात जेव्हां जेव्हां नर्मदा दर्शन झाले तेव्हां पायी परिक्रमा करावी अशी तिव्र इच्छा झाली.याचे कारण, नर्मदा एक नैसर्गिक चमत्कार आहे,नर्मदा तीरी असलेले जैववैविध्य, आध्यात्मिक आभा इतर कुठेच अनुभवास आली नाही. विशेष म्हणजे मैय्याशी डायरेक्ट संवाद,पंडित,पुजारी,पंडे असे कुणीच मध्यस्थ नाही.
स्थान महात्म्य म्हणाल तर अनेक अख्यायिका प्रचलित आहेत.गजासुर,भगवान शंकर, नारद, गरूड व त्या बरोबरच नर्मदा महात्म्य जोडलेले आहे.अंतरजालावर भरपूर माहीती आहे, त्याची पुनरावृत्ती करण्यापेक्षा लिंक देत आहे. या लिंकवर वाचक तीर्थक्षेत्रे, दत्तसंप्रदायातील अधिकारी,अनुग्रहित महात्म्यांची माहीती वाचू शकतील. आमचे आजोबा पं. पू.मामा देशपांडे यांचे जीवन कार्य सुद्धा आहे.
दत्त संप्रदायातील अधिकारी व अनुग्रहीत, सर्वमान्य,दत्तस्वरुप श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये महाराज यांनी आपले इहलोकातील कार्य संपवून २४ जुन १९१४ या दिवशी ब्रह्मलिन झाले. स्वामींची समाधी व श्री दत्तात्रेय मंदीर श्री गांडा महाराज यानीं स्वामी आज्ञेनुसार बांधले आहे. दत्ताची संगमरवरी मुर्ती अतिशय सुंदर आहे. महाराज सुद्धा अनुग्रहित होते.
आमचे पणजोबा,प.पू.श्री दत्तोपंत देशपांडे हे प.प.श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांचे एक अधिकारी शिष्य आणी पणजी,प.पू.पार्वती देवी राजाधिराज, श्री अक्क्लकोट स्वामी समर्थ महाराजांच्या पूर्ण कृपांकित शिष्या. या सत्वशील दांपत्याच्या पोटी २५ जून १९१४ रोजी पं.पू मामांचा जन्म झाला.श्री क्षेत्र नृसिंहवाडीला श्री दत्तप्रभूंची या दांपत्याने मनोभावे प्रार्थना केली.प.पू.श्री टेंब्ये स्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन,त्यांना ‘पतितोद्धारक पुत्र होईल’असा आशीर्वाद दिला. प्रसूती वेदना सुरू झाल्यावर पार्वती देवींनी प.पू. टेंब्येस्वामी महाराजांची करूणा भाकली.श्री स्वामी महाराजांनी दिव्य रूपात प्रकट होऊन “काळजी करू नये,परवा आमच्याच पूर्णांशाने तुम्हास पुत्र होईल,त्याचे नाव श्रीपाद ठेवा, आता आम्ही देह सोडत आहोत”,असे सांगितले.गरूडेश्वरी २४ जुन १९१४ रोजी श्री स्वामी महाराजांनी समाधी घेतली शास्त्रा नुसार स्वामींचा पार्थिव देह नर्मदा नदी मध्ये विसर्जित केला आणि इकडे पार्वतीदेवींना आषाढ शुद्ध व्दितीयेला पुत्र झाला. त्याचे नाव श्रीपाद ठेवण्यात आले.
पं पू मामांचा सहवास आणी आशिर्वाद मला लाभला.२१ मार्च १९९० मधे मामा ब्रह्मलिन झाले. मी स्वताला भाग्यवान समजतो.
(वरील माहीती माझ्या घरातील वडीलधारी मंडळींच्या बोलण्यात अनेकदा आलेली मी ऐकली आहे. माझ्या कुटुंबियांसमवेत अनेक भक्त गणांच्या श्रद्धेचा भाग आहे. त्यामुळे श्रद्धेला ठेच पोहोचेल असे वक्तव्य कृपया करू नये. )
स्टॅच्यू ऑफ युनिटी
देव,सरीता व पक्षीदर्शन झाल्यावर पुढील प्रवासा साठी निघालो.एकतानगर पुढचा पडाव होता.वडोदरा-श्री क्षेत्र गरूडेश्वर ऐंशी कि.मी. तेथून पुढे दहा बारा कि.मी. केवडिया म्हणजे एकतानगर.नर्मदेच्या काठा काठाने प्रवास सुरू होता.नर्मदा मैय्या लंपडाव खेळत होती.जसजसे गंतव्य स्थान जवळ येत गेले तसतशी नर्मदा निकट येत होती. चालकाने आम्हांला नियोजीत गाडीतळावर सोडले.
मिपाकर कंजूस भाऊंनी माहितीपूर्ण भटकंती डकवली आहे. त्याचा फायदा घेऊन आगोदर नियोजन,तिकीट आरक्षण व कुठे कितीवेळ भ्रमण करायचे हे ठरवले. लिंक देत आहे. माझा अनुभव अगदी थोडक्यात खाली देत आहे.
https://www.misalpav.com/node/51829
एक गोष्ट फार आवडली ती म्हणजे पर्यावरण पुरक वाहन व्यवस्था. ई-रिक्षा चालक महिला होत्या. जंगल सफारी,बटरफ्लाय गार्डन, व्हॅली ऑफ फ्लाॅवर्स व इतर जवळपास असलेली प्रेक्षणीय स्थळे बघण्यासाठी फ्रि राईडस्, माफक शुल्क घेऊन प्रवाशांना वाहन आणी वाहन चालक तत्पर होते.
आम्हीं प्रथम जंगल सफारी व सरते शेवटी एकता का पुतळा बघीतला.
जंगल सफारी
नऊ वर्षाची नात बरोबर असल्याने जंगल सफारीला भेट हीच आमची पर्यटनातील वरीयता.मुख्य आकर्षण डायनो ट्रेल,जापनी उद्यान. इथे प्राणी पक्षी यांची भरपूर संख्या आहे. त्यांचा अधिवास जास्तीतजास्त नैसर्गिक कसा होईल याकडे लक्ष दिले गेले आहे.पर्यटकां साठी पर्याप्त सुचना फलक लावले आहेत.कर्मचारी वर्ग लक्ष ठेवून असतो. खुप मोठा परीसर व उतार चढाव असल्याने इ-वाहन थांबे आहेत.पर्यटक सोयीनुसार चढू किंवा उतरू शकतात.वाहन सेवा फुकट आहे. (कदाचित तीस रुपये असे माफक शुल्क, आता आठवत नाही) खाजगी वाहनांना प्रवेश प्रतिबंध आहे. जंगल सफारी सर्व वयाच्या पर्यटकांना पाहण्यासाठी एक सर्वोत्तम ठिकाण आहे.
सरदार पटेल यांचा पुतळा
==
====
==
====
==
पुतळ्याचा आकार आणि तिची भव्यता बघून थक्क झालो.सोबतच विस्तीर्ण नर्मदेचे पात्र, लोह पुरूष वल्लभभाईच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वा सारखेच भव्य सरदार सरोवर धरण व सुंदर निसर्गदृश्ये. एकूणच,हे ठिकाण मानवनिर्मित अभियांत्रिकी चमत्कार व नैसर्गिक सौंदर्याचा एक उत्कृष्ट नमुना,प्रेक्षणीप पर्यटन स्थळ आहे.
पुतळा व परिसर बघण्यासाठी दोन प्रकारची तिकिटे उपलब्ध आहेत. एक रु.१५०, प्रवेश तिकीट. दुसरे ४५ व्या माजल्यावर,व्ह्यू गॅलरी, पुतळ्याच्या छातीपर्यंत जायचे असेल तर रु. ३८०.माझ्या मते, व्ह्यूइंग गॅलरी भेट ही एक वेळची भेट आहे आणि इथे पैसे वाचवायचे असतील तर तुम्ही निश्चितपणे भयंकर चुकत आहात. रु १५० मधे पुतळ्याच्या पायथ्यापर्यंत जाणे तितकेच सुंदर आहे पण पंचेचाळीसाव्या मजल्यावरून दिसणारे नर्मदा व्हॅलीचे सौंदर्य ही काही वेगळीच अनुभुती व संपुर्ण आयुष्यात कदाचित एकमेव मिळणारी संधी सोडतोय असेच मी म्हणेन.
विस मिनीटाचा प्रकाश आणि ध्वनी प्रोग्राम एकदा पाहणे एक वेगळाच अनुभव आहे.या कार्यक्रमाची तिकीटे लवकर संपतात म्हणून आगोदरच बुक करणे इष्ट.हा कार्यक्रम पहाताना काळ वेळ विसरलो होतो. मंत्रमुग्ध करून सोडले होते विषेशता धरणावर पडणारा प्रकाश आणि आवाज.युनिटी ग्लो गार्डन साठी १०० रुपयाचे स्वतंत्रपणे तीकीट बुक करणे आवश्यक आहे.
एका दिवस मुख्य पुतळा,सोबत जंगल सफारी आणि प्रकाश आणि ध्वनी कार्यक्रमा साठी पुरेसा आहे.गॅलरी, संग्रहालय आणि SOU चे संपूर्ण क्षेत्र, नीटनेटके आणि स्वच्छ आहे.ज्येष्ठ नागरिक आणि अपंग लोकांसाठी गोल्फ इलेक्ट्रिक कार.SOU च्या आजूबाजूला पाणी नसल्याने क्रुझ व एक सुंदर दृश्याला आम्ही मुकलो.
एव्हढी पायपीट केल्यावर पोटोबा साठी पुतळ्याच्या आवारात स्टार बक्स रेस्टॉरंट आहे. खमण बरोबरच कोल्ड काॅफीचा आनंद घेणे हा सुद्धा एक युनिक अनुभव होता. रात्री हाॅटेलवर परतायला उशीरच झाला. दिवस मात्र आयुष्यभर स्मरणात राहाणार आहे.
प्रतिक्रिया
27 Jul 2024 - 1:42 pm | कर्नलतपस्वी
क्रउपया धागा भट्कन्तीत हलवावा.
काही छायाचित्रे आन्तर्जालावरून घेतली आहेत. ज्यानी दकवली अहीत त्यान्चे आभार.
28 Jul 2024 - 7:42 am | प्रचेतस
हा भागही आवडला.
गरुडेश्वर मंदिरात चक्क मराठी पाट्या बघून आनंद वाटला. मंदिराची आणि स्वामींची दिलेली तपशीलवार माहिती आवडली. सरदारांच्या लोह पुतळ्याचे मात्र मला तितके आकर्षण नाही. बाकी दभोई रस्त्यावरून गेलात तर दभोई पाहिलेत की नाही की त्याच्याबद्दल पुढील भागात येणार आहे?
28 Jul 2024 - 11:44 am | कर्नलतपस्वी
डभोई व वधवाना लेक वेगळी ट्रिप करूयात असे म्हटल्याने पुढे गेलो. जर वाट वाकडी केली असती तर नक्कीच आर्धा दिवस तरी खाल्ला असता हे घरच्यांना माहीत होते.
बाकी तुम्ही इतके बारकाईने, लक्ष देऊन लेख वाचता याचा आनंद झाला.
नाहीतर आमचे मिपावर चे लेखन म्हणजे चितळ्यांच्या शेजारीच बाकरवडीचे दुकान टाकल्या सारखेच
धन्यवाद.
29 Jul 2024 - 7:39 am | गवि
तो पुतळा साधारणपणे सातवाहनकालीन इतका जुना झाला की मगच आपल्या प्रचुला त्यात रस उत्पन्न होईल.
28 Jul 2024 - 8:45 am | झकासराव
छान सुरुय यात्रा
28 Jul 2024 - 10:45 am | श्वेता२४
आमच्या आजोळी ही दत्त संप्रदायाचे साधक आहेत. त्यामुळे आपली माहिती वाचून आणि जी नावे आपण दिली ती वाचून भाऊक व्हायला झाले. भाग्यवान आहात इतकेच म्हणेन. दत्त महाराजांचे दर्शन आणि श्री टेंबे स्वामी यांचे दर्शन इथूनच झाले त्याबद्दल धन्यवाद. आपले ओघवते वर्णन व जागोजागी प्रसंगोचित कविता, यामुळे हा भागही खूप वाचनीय झाला आहे. पुढील भागाच्या प्रतीक्षेत आहे.
28 Jul 2024 - 11:07 pm | टर्मीनेटर
छान! गरुडेश्वर येथे मागे (गाडीत बसुन 😀) केलेल्या नर्मदा परिक्रमेच्यावेळी भेट दिली होती. गेल्या वर्षी कुटुंबियांनी गरुडेश्वर, नारेश्वर आणि स्टॅच्यु ऑफ युनीटी अशी तीन दिवसीय सहल केली होती, पण वरती प्रचेतस ह्यांनी म्हंटल्याप्रमाणे मलाही "सरदारांच्या लोह पुतळ्याचेच काय कुठ्ल्याही राजकारण्याच्या पुतळ्या/स्मारकाचे बिलकुल आकर्षण/कौतुक नाही" त्यामुळे मी नव्हतो गेलो!
पुढील भागाच्या प्रतिक्षेत...
29 Jul 2024 - 7:12 am | कर्नलतपस्वी
पसंद अपनी अपनी खयाल अपना अपना.
इंजिनिअरिंग मार्व्हल म्हणून बघायला काही हरकत नाही असे मला वाटते.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
29 Jul 2024 - 8:54 pm | कंजूस
लेखमाला चांगली होत आहे.
ठिकाणांबद्दल बोलायचे तर सहप्रवाशांची आवड आणि जाण लक्षात घ्यावी लागते. एकमत होणे गरजेचे. सरदार सरोवर धरण आणि त्याला जोड म्हणून मनोरंजनाची ठिकाणे कशी बनवली, विकसित केली, काय आराखडा केला आणि विकास केला हे मात्र नक्की पाहण्यासारखे आहे. ठिकाणांना वर्षातील विविध काळानुसार महत्त्व प्राप्त होत असते. असे सर्व एकत्र आणले की पर्यटक वर्षभर सतत येत राहतात आणि तिथे व्यवसाय करणाऱ्यांनाही स्वारस्य वाटू लागते. धार्मिक (गरुडेश्वर वगैरे), ऐतिहासिक (डभोई), राजकीय (पुतळा), पायाभूत विकास (धरणाचे पाणी आणि कालवे राजस्थान पर्यंत गेले आहेत), साहसी पर्यटन ( राफ्टिंग ) , चैन ( अहमदाबादहून विमानाने थेट तलावात उतरता येणे, तंबूत राहाणे), प्राणी संग्रहालय एकत्आरित आराखडा आवडला.
30 Jul 2024 - 5:45 pm | गोरगावलेकर
श्री क्षेत्र गरूडेश्वर पाहिलेले नाही त्यामुळे त्याची ओळख विशेष आवडली.
स्टॅच्यू ऑफ युनिटी/जंगल सफारीचे फोटो देतांना हात मात्र आखडता घेतलेला दिसतो.
लेख नेहमीप्रमाणेच मस्त.
30 Jul 2024 - 7:17 pm | कर्नलतपस्वी
फोटो भरपूर काढले आहेत. इथे डकवणे महादिव्य वाटते.
नर्मदा मैय्या चे वेगळे फोल्डर होते पण करप्ट झाले.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.