पूर्वरंग
वित्तीय वर्ष संपत असताना बडोदा ट्रिप संपन्न झाली. स्टॅच्यू ऑफ युनिटी वर कंजूस भाऊंनी खरडलेल्या धाग्याचा भरपूर फायदा झाला. त्यामुळे त्याच जागेवर पुन्हा खरडणे पुनरावृत्ती होईल म्हणून थोडे धावते वर्णन लिहीणार आहे. मुख्य उद्देश चावडा घराण्यातील राजाने दहाव्या शतकात बांधलेल्या लकुलिश मंदिर व महमंद शहा बेगडा याने चौदाव्या शतकात वसवलेल्या गुजरातच्या राजधानीला भेट देणे. तेथील अप्रतिम इमारती व मशीदी,लकुलिश मंदीर, शक्तीपिठ मंदीर,जैन मंदिरे,जागतीक ऐतिहासिक धरोहर दर्जा मिळालेल्या पुरातत्व विभागाच्या उत्खनन परिसराला भेट देणे हा होता.
ही सहल करताना ,विषेशत: चंपानेर, पावागढ पहाताना प्रकर्षाने असे जाणवले की पुरातन पर्यटनस्थळे बघताना काही दिवसांचा,तासाचा वेळ पुरेसा नसतो.पावागढ,चंपानेर बघावयास कमीत कमी तीन ते पाच दिवस हवेत ते सुद्धा पुर्वाभ्यास केल्या नंतर.बाकी भोज्याला शिवून आल्यासारखे.....
-------------------------------------------
पुणे ते बडोदा
तेच किल्ले, तेच किनारे
एकसमान ती उदास शहरे
त्याच कहाण्या, त्याच विराण्या
तशीच शिल्पे, तशाच लेण्या..
भग्न स्मृती अन् इतिहास ठेवा...
असे जरी असले तरी हा पर्यटन स्थळांचा मेवा पुन्हा पुन्हा खावासा वाटतो.कधी मिपाभटक्यां द्वारे मिळतो तर कधी स्वता:भटकल्यावर मिळतो.काही काळ जरी नैराश्य आले तरी अज्ञाताची ओढ पुन्हा उसळी मारते आणी आतला सिंदबाद पुन्हा ताज्या दमाने नव्या सफरी करता उतावळा होतो.इतिहासाच्या भग्न खुणा खुणवायला लागतात आणी मग...
तद्वत,घरात खलबतं सुरू झाली. बहुचर्चित वडोदरा (बडोदा) व आसपासच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्याचे निश्चित झाले.मसलत फत्ते करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. वांछित, अवाछिंत सल्ले,गुगल वरच्या फेऱ्या वाढल्या. योजना तय्यार झाली. बकेट लिस्ट तयार झाली.एकता नगर,गरूडेश्वर,स्वामीनारायण मंदिर, पोऐचा आणी स्थानिक प्रेक्षणीय स्थळे, बडोदा बघायचीअसे एकमताने ठरले.पावागढ हे बावन्न शक्तीपिठां पैकी एक असे कुरुक्षेत्र येथील भेटीत कळाले होते व चंपानेर ,वधवाना लेक,डभोई सुद्धा जवळच आहे ते सुद्धा बघून घेऊ असा प्रस्ताव मांडला.तीकडे गेल्यावर बघू म्हणत घरच्यांनी प्रस्ताव तात्पुरता लांबणीवर टाकला.(मी मात्र माझ्य प्रस्तावा वर ठाम होतो, कदाचित तेच माझ्यासाठी मुख्य आकर्षण होते).
बडोदा मुक्कामी राहून आसपास फिरायचे ठरले. सर्व तिकिटे झाली,रहाण्याचे ठिकाण ठरले.ओळखीने स्विफ्ट डिझायर चालकासह मिळाली.यावर्षी कुठेच गेलो नसल्या मुळे अर्थ संकल्पातील तरतूद शिल्लक होती"बजेट तरतुदी नुसार सढळ हाताने खर्च करण्यास काहीच हरकत नाही", अशी हल्की पुटपुट कानावर आली.
दुपारी एक वाजता विमानाने प्रस्थान होते. सकाळी आकरा वाजता ब्रंच करून घरातून बाहेर पडलो.शुक्रवार असूनही रस्त्यावर गर्दी कमी होती.विमानतळावर सुद्धा पटकन काम झाले.काही अपरिहार्य कारणामुळे प्रस्थान वेळ अर्धा तास पुढे ढकलण्यात आली.अजून दोन तास तरी होते. पु. ल.च्या शंकर्या सारखे, मला सुद्धा कुठेही बाहेर गेलो की प्रचंड भुक लागते (ब्रंच करून जेमतेम तासभर झाला होता).बसुन काय करायचंय म्हणून विंडो शाॅपिंग करू या विचाराने इकडे तीकडे फिरू लागलो. विमानतळावर फिरताना वामन आवताराची आठवण झाली. पुणे विमानतळ इन मीन तीन पावलांचा....
यथावकाश,उद्घोषणा झाली. हवाई सुंदरींचे स्मितहास्य सुहास्य वदने स्वीकारताना उगाचच बुवाचें(जितेंद्र अभिषेकींचे) गाणे आठवले ,
सुहास्य तुझे मनास मोही
जशी न मोही सुरा सुरही
तुझ्या लोचनी या प्रकाश विलसे
ज्याची लोभस बघ चंद्रिका ही
तव यौवनाचा वसंत बहरे
ज्याची लोभस बघ कोकीळ हा...
ते लोभस रुपडं बघून काही क्षण थबकलो. दुसरे गाणे आठवले,"नयन तुझे जादूगार", मनातल्यामनात चित्रहार सुरू होण्यापूर्वीच आमच्या कोकिळेने मागुन कोपरखळी मारली, म्हणाली,"चला की लवकर,लवकर". " नाही मी बोलत नाथा..." हे पद सुरू होईल या भीतीने मी पटकन पुढे सरकलो.कार्यकारण भाव कळाला, की भारतीय पत्नी पतीच्या मागे का असते?
निर्धारित सीटवर स्थानापन्न झालो. गुज्जू भाई भरपूर दिसत होते, केम छो? मजामा वगैरे वगैरे शब्द कानावर पडत होते.प्रवास छोटासा, एक तास दहा मिनिटाचा,उत्तम झाला.वडोदरा विमानतळ सुद्धा छोटाच वाटला पण मोकळा, मोकळा.गर्दी अजीबात नव्हती.स्वच्छता, टापटीप, सजावट बघण्यासारखी होती.
दुपारचे तीन वाजले होते. बाहेर आलो.थोडी थंडी,थोडी गर्मी,मस्त प्रसन्न वातावरण होते. उंच,उंच पाम वृक्ष एका ओळीत उभे होते जणू सैनिकांची तुकडी. दुर पाठीमागे मोठा वटवृक्ष आणी त्यावर चाललेला पक्षांचा किलबिलाट जणू मिलीटरी बॅण्ड. तांबट पक्षी " ठक,ठक" असा ठेका धरून आपल्या उपस्थितीची जाणीव करून देत होता.जवळच प्रीपेड टॅक्सी बुथ होता.टॅक्सी पकडली,हाॅटेलकडे निघालो. पाच एक कि.मी.अंतरावर, हाॅटेलकडे जाताना शहराबद्दल प्रथमदर्शनी मत बनायला सुरूवात झाली.विमानतळा जवळच मिलीटरी एरीया, स्वच्छ सगळं कसे चकाचक. सैनिक हाॅस्पिटल ची पाटी दिसल्यावर जरा भावूक झालो.खड्डे विरहित रस्ते,वहातूक सुरळीत शिस्तबद्ध, दुचाकीस्वार,चारचाकी चालक लाल,हिरव्या, पिवळ्या रंगाच्या दिव्यांचा योग्य तो मान राखताना दिसले. शहर संपन्न आणी सुखवस्तू असावे याचा अंदाज येत होता.
++++
हाॅटेल सहा मजली,नदीच्या काठावर वसलेले. समोरच सायाजी उद्यान आणी त्याला लागूनच लक्ष्मी विलास पॅलेस. पहिल्याच मजल्यावर रुम होती पण नदीकाठ असल्याने डासाचा त्रास नक्कीच असणार या भीतीने रूम बदली करून घ्या असा आदेश आला. काऊंटर वर थोडी हुज्जत घालावी लागली पण पाचव्या मजल्यावर रुम मिळाली.सहाव्या मजल्यावर टेरेस रेस्टॉरंट आहे त्याचा त्रास होऊ शकतो असे धमकीवजा सांगण्यात आले.भुक लागली असल्याने धमकी कडे दुर्लक्ष करत विचारले जेवण मिळेल काय? ,"होय पण रूम सर्व्हीस, रेस्टॉरंट बंद झाले आहे". सोन्याहून पिवळे...
मस्त खाऊन दोन तास सर्वांनी ताणून दिली. बाहेर अंधार पडायला सुरुवात झाली होती, चहा मागवला व तयार होऊन समोरच्याच सायाजी बागेत फिरायला गेलो. बागेत गर्दी होती संपुर्ण भरलेली होती.बागेला लागूनच प्राणीसंग्रहालय, लक्ष्मी विलास राजवाडा आणी म्युझियम असल्याचे कळाले. प्राणिसंग्रहालय पाच वाजता बंद होते,टाॅय ट्रेन (फुलराणी) सध्या बंद आहे,संग्रहालय उद्या अकरा वाजता उघडेल इत्यादी नकारघंटा ऐकू आल्या. थोडेफार फिरून सरळ रेस्टॉरंट वर हल्ला केला.गुजराथी सोडून बाकी सर्व प्रकारचे जेवण उपलब्ध होते. पोटपूजा केली व एकमेकांना शुभरात्री म्हणत निद्राधीन झालो.
प्रतिक्रिया
20 Jul 2024 - 7:02 am | कर्नलतपस्वी
क्रुपया सदर धागा भटकन्ती मधे हालवावा.
20 Jul 2024 - 8:58 am | कंजूस
सुरूवात दमदार.
हॉटेल मोक्याचे गाठले आहे.
..............
>>तेच किल्ले, तेच किनारे
एकसमान ती उदास शहरे........>>
हेच आमचं झालं होतं. अगोदरच्या तीन चार वर्षांत हे प्रकार झाल्याने पावागढ चंपानेर आता नको असे ठरले. त्यात यूट्यूबवरच्या विडिओंनी भर घातली. पुतळा नवीन म्हणून थोडक्यात जमवले. ( चंदेरी करता येईल का विचारणा सूचना झाली होती. पण पाटणजवळच्या रानी की वाव ची आठवण झाली. पाटोळा साडी केंद्र फक्त टूअरच्या बसेस येतात तेव्हाच उघडतात. एरवी उपऱ्यांसाठी उघडत नाहीत. तसेही सर्व राज्यांची प्रदर्शने बांद्रा लीलावती ग्राऊंडवर थंडीत भरतात आणि खरेदीची संधी मिळते. तसं पाहिलं तर साड्या खरेदी ही आता डेड इनवेस्टमेंट आहे.)
गेली दहा वर्षे पर्यटन केलं पण खरेदी शून्य. हे लिहिण्याचं कारण की ट्रिप ठरवताना हा मुद्दा फारच जोर करतो.
20 Jul 2024 - 9:20 am | कर्नलतपस्वी
अगदी,अगदी...
१९९२ मधे जयपुर गेलो होतो. पर्यटक जेवढा खरेदी करेल तेव्हढी रिक्षाचालक, टॅक्सीचालक यांची अतिरिक्त कमाई म्हणून ते ठरावीक एमापौरियम ,हाॅटेल मधे जबरदस्तीने घेऊन जातात. आम्हांलाही जावे लागले. तीथे महाराणी साडी गळ्यात मारली. सहाशे रूपये ढिले करावे लागले. त्यावेळचा पाच सहा दिवसांचा पगार,मरता क्या न करता साडी घेतली आणी वरती नच सुंदरी करू कोपा हे पद सुद्धा म्हणले. अलवर नोकरीचे गाव , घरी परत आल्यावर सर्वांना दाखवली तर कळाले हिच साडी तीनशे रूपयात मिळते.
बडोद्याला खरेदी झाली. खरेदी झाली नाही तर भटकंतीचे त्यांना समाधान आणी आमची हळहळ याचे सुख कसे मिळणार?
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
20 Jul 2024 - 10:34 am | Bhakti
चलो गुजरात!
वाचत आहे.रच्यकाने हवाई सुंदरीसाठीचे गाणी मस्तच.मला प्रवासात भेटलेले इतर प्रवासी (चांगले) की नेहमी आठवत राहतात... आणखी काही वर्षांनी मी अशा सह प्रवाशांवर सहज लेख लिहू शकेल 😀
20 Jul 2024 - 4:04 pm | श्वेता२४
तुमची वर्णन करण्याची पद्धती गंमतशीर आहे. हा भाग गेल्या तीन-चार वर्षांपूर्वी आमचा एक मित्र बडोदा येथे राहत असल्यामुळे आमचे तिथे जाणे होत होते. त्यामुळे पाहून झाला आहे. मात्र चंपानेर पाहिलेला नसल्यामुळे त्याबाबत वाचायला उत्सुकता आहे. पुढील भागाच्या प्रतीक्षेत....
20 Jul 2024 - 4:36 pm | भागो
नेहमी प्रमाणे सुरेख.
तुम्ही फार कमी लिहिता अशी माझी तक्रार आहे.
21 Jul 2024 - 2:20 am | टर्मीनेटर
+१ तीन वेळा ह्या शहराला दिलेल्या भेटीतुन "हे शहर संपन्न आणी सुखवस्तू आहे" असेच माझेही निरीक्षण आहे!
शिर्षकात पावागढचे नाव वाचुन पाचेक वर्षांपुर्वी तीथे केलेला एक उपद्व्याप आठवुन हसु आले! त्या बद्दल पावागढ विषयीच्या धाग्यावर लिहितो 😀
सुरुवात आवडली, पुढील भागाच्या प्रतिक्षेत...
21 Jul 2024 - 2:41 pm | चित्रगुप्त
सुरुवात खूप छान झाली आहे. पुढचे भाग लवकर यावेत.
तुम्ही उतरला होता त्या हाटेलीचे फोटो / नाव द्यावेत, कधी गेलो तर उपयोगी पडेल. (तसेच प्रत्येक भागाचे शेवटी त्या दिवसातले मुख्य खर्च किती हेही दिल्यास वडोदरापर्यटतोत्सुकबंधुभगिनींस उपयोगी होईल)
(सत्तरचे दशकात एका मित्रासह साध्या सायकलने इंदौर-बडोदे-इंदौर असा प्रवास करून एक आठवडा राहिलो होतो. ही सफर मुद्दाम तिथली संग्रहालये बघण्यासाठी केली होती. त्याचा वृत्तांत तेंव्हाची रोजनिशी हुडकून लिहीता येईल. प्रयत्न करेन)
राजवाड्यानजीकचे फत्तेसिंह संग्रहालय बघितले का ?
21 Jul 2024 - 6:48 pm | कर्नलतपस्वी
होय पाहीले आहे. सुंदर कलेक्शन आहे. ऑडिओ इक्विपमेंट ची सोय केल्याने भरपूर माहीती मिळते. अधुनिक तंत्रज्ञानाचा य्योग्य वापर केला आहे.
तिकीटे, फिरण्याचा खर्च तसा नगण्यच आहे. बाकी हाॅटेल,खाणेपिणे हे प्रत्येकाच्या आवडी निवडी व बजेटवर अवलंबून असेल.
21 Jul 2024 - 5:45 pm | मुक्त विहारि
पुभाप्र...
21 Jul 2024 - 6:48 pm | कर्नलतपस्वी
मनापासून आभार.
21 Jul 2024 - 8:08 pm | प्रचेतस
ह्या लेखमालेची कधीपासून प्रतिक्षा होती.
सुरेख सुरुवात. येऊ द्यात आता पटापट पुढचे भाग.
22 Jul 2024 - 2:15 pm | गोरगावलेकर
मालिका सुंदर होणार यात शंकाच नाही
24 Jul 2024 - 6:10 am | किल्लेदार
पावागड, चंपानेर ने जुन्या आठवणी जाग्या झाल्यात. २००६ मधे कामानिमित्त वडोदऱ्यात महिन्याच्या वर तळ ठोकून होतो. विकांताला भरपूर उंडारायचो. पावागडाची उंची आणि चंपानेरचे स्थापत्य विशेष लक्षात राहिले.
28 Jul 2024 - 11:47 am | कर्नलतपस्वी
प्रतिसादाबद्दल आभार.