केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस दुसरा- मुन्नार स्थानिक स्थलदर्शन

श्वेता२४'s picture
श्वेता२४ in भटकंती
20 Jul 2024 - 3:06 pm

आधीचे भाग
1)पूर्वतयारी

2)केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस पहिला

     आज सहलीचा दुसरा दिवस होता. सकाळी लवकरच उठून आवरल्यानंतर समोर असलेल्या हॉटेल अन्नपूर्णा मध्ये आम्ही नाश्ता करायला गेलो. नेहमीप्रमाणे साउथ इंडियन नाश्ता आम्ही ऑर्डर केला. इडली, मेदुवडा, डोसा अशा पदार्थांवर आम्ही आडवा हात मारला. त्याचबरोबर कॉफी ऑर्डर केली. सगळ्याची चव अतिशय उत्तम होती.
फोटो

     मून्नारला पाहण्यासारखी ठिकाणे म्हणजे एरावीकुलम नॅशनल पार्क, मुटिपट्टी डॅम, टॉप स्टेशन, कुंडला डॅम इ. ही एकाच मार्गावर आहेत. परंतू वेगळे काही बघुयात असे ठरलेले असल्याने पोटभर नाश्ता करून आम्ही ड्रायव्हर सोबत काल जिथे जिप ठरवली होती त्या ठिकाणीच आलो. आज ते आम्हाला रीप्पल वॉटर फॉल, पोनमोडी डॅम, इको पॉईंट व हँगिंग ब्रिज जिथे बऱ्याच चित्रपटांचे शूटिंग झालेले आहे त्याचबरोबर एक व्ह्यू पॉईंट अशा ठिकाणी फिरवणार होते. या ठिकाणांवरती जाण्याचा मार्ग हा कच्चा रस्त्याचा असल्यामुळे इथे आपली नेहमीची गाडी जात नाही. त्याकरिता जीपच करावी लागते असे आम्हाला सांगण्यात आले. आणि खरंच जो रस्ता होता, तो रस्ता नाही, खरं म्हणजे तिला पायवाट म्हणावे अशा प्रकारचा तो रस्ता होता.त्यामुळे इथे नॉर्मल गाडी जाणार नाही हे खरेच होते.आमची जीप खाजगी मसाल्यांच्या बागांमधून देखील गेली. आमची ठरवलेली जीप

फोटो

      सर्वप्रथम आम्ही रीप्पल वॉटर फॉल ला भेट दिली. रीप्पल वॉटर फॉल हे अतिशय छान ठिकाण आहे. ईथे बसण्यासाठी सुविधा आहे. थोडे चालत खाली वर उतरावे लागते. तथापि हा वॉटरफॉल हा दुरून बघण्याचा एक वॉटरफॉल आहे. इथे देखील तुम्ही झीप लाईन करू शकता. ही झीप लाईन वॉटरफॉलच्या वरुन पार करुन जाते. इथे बरेच लोक झीप लाईन करत होते.

फोटो

फोटो

फोटो

      नंतर आम्ही हैंगिंग ब्रिज ला भेट दिली. हैंगिंग ब्रिज वरून बराच चित्रपटांचे शूटिंग झाले आहे असे आम्हाला सांगितले. खालून असाच एक धबधबा वाहत होता आणि वरती तो ब्रिज होता. फार काही ग्रेट वाटले नाही.
फोटो

फोटो

फोटो

     त्यानंतर ते आम्हाला पोनमोडी डॅम वरती घेऊन गेले आणि तिथूनच जवळ असलेल्या इको पॉइंटवर घेऊन गेले. हे डॅमच्या मागे असलेल्या बॅकवॉटरच्या बाजूला एक पॉईंट होता. इथे म्हणे चेन्नई एक्सप्रेस चे शूटिंग झाले होते. आम्हाला काही तो प्रसंग आठवेना. इथे एक गंमत होती की प्रत्येक जण तिथे ओरडून इको येतोय काय ते पाहत होता. अचानक माझ्या मुलाने एका जागेवरून आई अशी जोरात हाक मारली आणि इको आला. तेव्हा सगळे चमकून त्याच्याकडे पाहू लागले. मग माझे मिस्टर देखील तिथे गेले आणि जोरात मुलाच्या नावाने हाक मारली. तथापि एको आला नाही. मुलाने बाबा अशी जोरात हाक मारली आणि इको आला. तेव्हा लक्षात आले की मुलगा ज्या ठिकाणी उभा होता तिथूनच केवळ इको ऐकू येत होता. मग काय!! आलेल्या सगळ्या पर्यटकांनी एका मागोमाग एक तिथे उभारून इको येतोय का हे पाहायला सुरुवात झाली आणि आम्हाला तो इको पॉईंट एकदाचा सापडला!! त्यामुळे तिथे मात्र आम्हाला खूप मज्जा आली. याचा व्हीडीओ आहे. परंतू मला व्हीडीओ कसा चढवायचा ते जमत नाही.

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

     नंतर ते एका पॉईंटला घेऊन गेले. तिथून डोंगर रांगा दिसत होत्या.

फोटो

फोटो

      भर दुपारचे आम्ही तिथे उभे होतो. तिथूनही वरून एक लांबचा धबधबा दिसत होता. तथापि फार काही ग्रेट वाटले नाही. खरंतर ही सर्व ठिकाणे सुंदर होती. परंतु एकंदरीतच साडेतीन हजार रुपये एक्स्ट्रा देऊन अशा पद्धतीची ट्रीप करणे फार काही वर्थ वाटले नाही. पण ठीक आहे. आम्ही ठरवले होते. जे काही आपल्याला दिसेल त्याचा पुरेपूर आनंद घ्यायचा. त्यामुळे आम्हाला जे काही दिसले, ते आम्ही फोटो वगेरे काढून एन्जॉय करत होतो.
      जीप ड्रायव्हरने आम्हाला परत जिथे होते तिथेच सोडले. साधारण दुपारचा 1.30 वाजला होता. आता आम्ही तिथल्याच एका चांगल्या हॉटेलमध्ये जेवायचं ठरवले. तिथे काही साउथ इंडियन जेवण मिळत नव्हते. त्यामुळे आम्ही फ्राईड राईस आणि नूडल्स मागवले आणि भूक भागवली. शमी भाईला आमचा एक्सपिरीयन्स फार काही ग्रेट नव्हता हे सांगितले. त्यावर तो म्हणाला, आता मी तुम्हाला एक पॉईंट ला घेऊन जातो तो बघितल्यावर मात्र तुमचं मन खुश होऊन जाईल. हा पण एक धबधबाच आहे आणि इथे नॉर्मली कोणीही तुम्हाला घेऊन जाणार नाही.
      जाताना त्याने आम्हाला केरळामधला पहिला हायड्रो प्रोजेक्ट दाखवला

फोटो

फोटो

      आणि तो आम्हाला आटूकडू वॉटर फॉल्स कडे घेऊन गेला. हा धबधबा मात्र फारच जवळून दिसत होता. पाण्याचा मोठा प्रवाह जोरात वाहत होता. आम्ही तेथेदेखील ब्रिजवर उभे होतो आणि धबधबा खूप जवळून दिसत होता.

फोटो

फोटो

फोटो

फोटो

परंतु इथे जाण्याचा मार्ग मात्र अतिशय अप्रतिम होता. तिथे जाण्याचा मार्ग हा चहाच्या मळ्यातून जात होता. त्यामुळे आम्ही मध्येच उतरून एका चहाच्या मळ्यामध्ये काही फोटो काढले. त्याच्यामागे आम्हाला बॅकग्राऊंड वरती एक लांबचा धबधबा दिसत होता. खूपच मजा आली.

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

वेलचीची झाडे तळाला जो हिरवे हिरवे शेंगा सारखे दिसत आहेत ते वेलची आहेत
फोटो

     त्यानंतर तो आम्हाला पोथमेडू या व्यू पॉइंटवर घेऊन गेला. इथून पूर्ण मुन्नारचा सुंदर नजारा दिसत होता. हे दोन्ही ठिकाणी आम्हाला अतिशय आवडली आणि सकाळी फारसे काही बघायला नाही मिळाले याबाबत जे काही असमाधान होते ते क्षणात दूर पळाले.

फोटो

फोटो

फोटो

फोटो

      संध्याकाळचे 5.00 वाजले होते. चहाची तल्लफ आली होती. वाटेत आमचे अन्नपूर्णा हॉटेल लागले. तिथे चहा आणि केरळची प्रसिद्ध केळ्याची भजी ट्राय केली. याला मल्याळीमध्ये पाळम पोरी असे नाव आहे. गोड व तिखट असे दोन्ही प्रकार मिळतात. कोल्हापूरी मिरची भजीचे फॅन आसणाऱ्या आम्हा कुणालाच हा प्रकार अजिबात आवडला नाही. आवर्जून खावा असा काही हा प्रकार नाही. पण इथे हा प्रकार बराच चालतो.

फोटो

      चहा पिऊन झाला. का कुणास ठाऊक मला मुटूपट्टी डॅम बघायचा होता. तिथे बोटिंग करायला मिळाले तर करायचे होते. शमीभाई ने आता गाडी तिकडे वळवली. खरं तर ते खूप लांब होते. नेमका कुठलातरी उत्सव असल्यामुळे गाडी मुन्नार शहरातच बराच वेळ अडकली. नंतर आम्ही जे मुटूपट्टी डॅमच्या रस्त्याला लागलो तो मात्र सुंदर नजारा होता. तथापि डॅमच्या अलीकडे खूप सार्‍या गाड्या लागलेल्या असल्यामुळे ड्रायव्हरने आत मध्ये जितके शक्य आहे तिथपर्यंत सोडून परत रिव्हर्स घेऊन पार्किंगसाठी गेला आणि आम्हाला पुढे जायला सांगितले. कारण आता तिथे संध्याकाळ झालेली असल्यामुळे कदाचित आम्हाला फिरता येणार नव्हते. त्यामुळे आम्ही चालत चालत पुढे गेलो. बऱ्यापैकी अंधार झाला होता. वेळ संपलेली होती. सर्वजण ते पाहून परत निघाले होते. आम्ही काही फोटो काढले. आजूबाजूला फिरत राहिलो. तेवढ्यात एक घोडेस्वार आला. मुलाला त्याच्यावरती बसायचे होते. त्यामुळे त्याला सवारी करवली आणि आम्ही परत फिरलो.
फोटो

फोटो

फोटो

      एकंदरीतच आज एकाच दिवसात आम्ही बरेच पॉईंट फिरलो होतो आणि छान वाटत होते. साधारण साडेसात-आठच्या दरम्यान आम्ही हॉटेल वरती परत पोहोचलो. उद्या आम्हाला थेक्कडी ला जायचे होते. प्रामाणिकपणे सांगायचं तर मुन्नारला लोक दोन ते तीन दिवसाचा मुक्काम कराच असे सांगतात. तथापि मला मुन्नार का कुणास ठाऊक पण फार काही आवडले नाही. जेवढी हाइप मुन्नार बद्दल लोकांनी करून ठेवली आहे तितके काही ते ग्रेट आहे असे वाटत नाही. कदाचित मी मुन्नारबाबत फारच अपेक्षा ठेवून गेले होते म्हणून हे झाले असेल. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. कोचीहून मुन्नारला पोहोचण्याचा एक दिवस व त्यानंतरचा एक दिवस हा मुन्नार साठी खूप झाला. मी तर म्हणेन दुसरे दिवशी सरळ मुन्नार होऊन थेकडीला सावकाश जावे. हा प्रवास अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. येथे मात्र तुम्हाला जागोजागी थांबून निसर्गाची वेगवेगळी रूपे पहावे असे वाटेल. त्यामुळे मुन्नार ते थेकडी हा प्रवास जरी गुगल मॅप वरती तीन तासाचा असला तरीही तुम्हाला पोहोचेपर्यंत चार ते साडेचार तास आरामात लागू शकतात आणि खरोखर तेवढा वेळ दिला पाहिजे. इतकी जागोजागी अप्रतिम निसर्गाची मुक्तहस्ताने उधळण झालेली दिसते आणि आपण केरळ मध्ये आलो आहोत याचा परिचय होतो. असो. याचे वर्णन आता पुढील भागात......

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

20 Jul 2024 - 3:09 pm | श्वेता२४

हा धागा भटकंती या सदरामध्ये हलवावा. त्याचबरोबर विनंती की बरेच दिवस झाले मी केवळ माझ्या मोबाईल मधूनच ॲटो लॉगिन होत आहे म्हणून ही लेखमाला लिहू शकते.अन्यथा माझा आयडी व पासवर्ड लॉक झाला आहे. त्यामुळे मी कुठल्याही पीसी वरून किंवा मोबाईल वरती लॉगिन करू शकत नाही आहे. त्यामुळे माझा पासवर्ड रिसेट करून द्यावा. आपणास योग्य वाटेल तो पासवर्ड रिसेट करावा व मला तसे माझ्या व्यक्तिगत संदेशात किंवा मेल आयडीवर कळवावे. मी यापूर्वीही अनेकदा संपादक मंडळ, सरपंच तसेच श्री प्रशांत यांना व्यक्तिगत संदेशाद्वारे कळवले आहे. तथापि अजूनही माझ्या पासवर्ड रिसेट करून दिला गेलेला नाही. पासवर्ड रिसेट करायला गेले तर तो होत नाही आहे. कृपया सहकार्य करावे.

चौथा कोनाडा's picture

24 Jul 2024 - 6:28 pm | चौथा कोनाडा

मोबाईल मधूनच ॲटो लॉगिन होत आहे

नशीब, मोबाईल वरुन लॉगिन आहात .. एकदा का आयडी व पासवर्ड लॉक झाला की मिपावरून स्वर्गवासी झाल्यात जमा ... मग पुन्हा नविन आयडीने उघडावा लागतो (तेंव्हाही तांत्रिक घोळ होतातच )


पासवर्ड रिसेट करून द्यावा. आपणास योग्य वाटेल तो पासवर्ड रिसेट करावा व व्यक्तिगत संदेशात किंवा मेल आयडीवर कळवावे.


या विनंतीचा आदर राखून संपादक मंडळ, सरपंच, मिपामालक यांनी प्राधान्याने लक्ष देऊन मिपाकरांचा दुवा घ्यावा अशी माझी ही मिपाकर या नात्याने नम्र विनंती !

श्वेता२४'s picture

24 Jul 2024 - 11:09 pm | श्वेता२४

नशीब, मोबाईल वरुन लॉगिन आहात .. एकदा का आयडी व पासवर्ड लॉक झाला की मिपावरून स्वर्गवासी झाल्यात जमा
मध्यंतरी बरेच महिने हाच प्रॉब्लेम झाला होता की मी इथे केवळ वाचन मात्र होते. इथे कोणाचा आहे पर्सनल मोबाईल नंबर माझ्याकडे नाही. त्यामुळे कुणाला कॉन्टॅक्ट करून याबाबत व्यक्तिगत संदेश संपादकांना पाठवावा हे मला कळत नव्हते योगायोगाने काही महिन्यांपूर्वी चोपदार आहे मीपावाचक आहेत हे मला ऑफिसमध्ये कळाले त्यामुळे त्यांना मी माझा पासवर्ड रिसेट करायला सांगितला तो रिसेटही झाला परंतु नंतर काय प्रॉब्लेम झाला कळालं नाही तर पुन्हा लॉक झाला आहे त्यामुळे गेले काही महिने मी पुन्हा वाचन मात्र झाले चोपदारांनी बरेच व्यक्तिगत संदेश मालकांना पाठवले तथापि काहीही कार्यवाही झाली नाही त्यामुळे नोव्हेंबर नंतर आता बरेच महिने झाले तरी मला ही मालिका प्रसिद्ध करता आली नव्हती योगायोगाने एकदा माझ्या मोबाईल वरती मी उघडून बघितले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे लॉगिन झाले त्यामुळेच केवळ ही लेखमाला घेऊ शकते आहे परंतु हा लेख मोबाईल वरून अपलोड करताना खूप जीकीरीचे होत आहे. जर इथूनही भविष्यात ऑटो लॉगिन झाले नाही तर माझा आयडी उडालाच म्हणायचा.

केवळ माझ्या मोबाईल मधूनच ॲटो लॉगिन होत आहे म्हणून ही लेखमाला लिहू शकते.अन्यथा माझा आयडी व पासवर्ड लॉक झाला आहे.

मोबाईलवरून तुमचे लॉगिन होतंय म्हणजे तुमचा आयडी व पासवर्ड लॉक वगैरे झालेला नाहिये!
ज्यावरुन लॉगीन होतंय त्या तुमच्या मोबाइलच्या ब्राउझर सेटिंग्स मध्ये जाऊन, तुमच्या फोनच्या os आणि ब्राउझर नुसार 'Saved logins', 'Passwords' किंवा 'password manager' पैकी जो कुठला ऑप्शन दिसेल त्यात जाऊन misalpav.com साठी सेव्ह केलेला पासवर्ड तुम्ही 'Show Password' किंवा 'View Password' वर क्लिक करून बघू शकता आणि तो PC, लॅपटॉप मध्ये टंकून लॉगिन करु शकता!
त्यासाठी पासवर्ड रिसेट करण्याची काही आवश्यकता आहे असे वाटत नाही.

वाह! धबधबे,वेलची,मेदूवडे,केळ्याची भजे,चहाचे मळे मस्तम मस्त!
आणि तुमचा आयडी पासवर्ड लवकर सेट होवो 😀

श्वेता२४'s picture

21 Jul 2024 - 11:40 am | श्वेता२४

धन्यवाद!

टर्मीनेटर's picture

21 Jul 2024 - 1:40 am | टर्मीनेटर

कोल्हापूरी मिरची भजीचे फॅन आसणाऱ्या आम्हा कुणालाच हा प्रकार अजिबात आवडला नाही.

😀
केरळमध्ये खाद्यपदार्थ बनवताना खोबरेल तेलाचा वापर मुबलक प्रमाणात होत असल्याने मला तिथल्या अनेक पारंपारीक पदार्थांप्रमाणेच विशेषत: खोबरेल तेलात तळलेले खाद्यपदार्थ अजिबात आवडत नाहित, अगदी तिथल्या प्रसिद्ध बनाना चिप्स सुद्धा...

मुन्नारला लोक दोन ते तीन दिवसाचा मुक्काम कराच असे सांगतात. तथापि मला मुन्नार का कुणास ठाऊक पण फार काही आवडले नाही. जेवढी हाइप मुन्नार बद्दल लोकांनी करून ठेवली आहे तितके काही ते ग्रेट आहे असे वाटत नाही.

सहाजीक आहे! मुन्नारला तुम्ही कुठल्या सिझनमध्ये जाता ह्यावर पण थोडे अवलंबुन असते. मुळात आपल्या पर्यटनाचा प्रकार कुठला आहे ह्यावर पण ठिकाणांची निवड चुकिची किंवा बरोबर ठरु शकते. leisure travel हा उद्देश असेल तर निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या मुन्नारला दोन ते तीन दिवसाचा किंवा त्यापेक्षा जास्त दिवस मुक्काम करणे हा आनंददायी अनुभव ठरु शकतो.

श्वेता२४'s picture

21 Jul 2024 - 11:45 am | श्वेता२४

टर्मिनेटरची तुमचे म्हणणे अगदीच बरोबर आहे. जर कोणी नवविवाहित दांपत्य असेल आणि ते जर मधुचंद्रासाठी जाणार असेल तर त्यांच्यासाठी मुन्नार हा स्वर्ग असेल व तिथे तीन-चार दिवस सुद्धा त्यांच्यासाठी कमी पडतील. ज्यांना रेंडाळायला आवडते, निवांतपणे निसर्गाचा अनुभव घ्यायला आवडतो, ज्यांना आराम करायला जायचं आहे, त्यांच्यासाठी देखील हे ठिकाण अतिशय उत्तम आहे. परंतु आपण फॅमिली सोबत असू आणि आपल्याला केरळमधील इतरही ठिकाणे एक्सप्लोर करायची असतील, हाताशी निवडक वेळ असेल ,तर मुन्नार हे तिथे पोहोचण्याचा एक दिवस आणि एक दिवस स्थानिक स्थळ दर्शन खूप झाले. विशेषतः लहान मुले जर सोबत असतील तर ती दोन दिवसांपेक्षा जास्त काळा नंतर कंटाळू शकतात.

कर्नलतपस्वी's picture

21 Jul 2024 - 11:10 am | कर्नलतपस्वी

काय मेदू वडे,काय धबधबे,काय डोंगुर काय झाडी...लई झ्याक.

वर्णन आवडले.

श्वेता२४'s picture

21 Jul 2024 - 11:46 am | श्वेता२४

धन्यवाद कर्नल साहेब!!

प्रचेतस's picture

22 Jul 2024 - 10:08 am | प्रचेतस

हा भागही आवडला.
येथील धबधबे मात्र अगदीच लहान आहेत. निसर्गसौंदर्य तर उत्तमच.

श्वेता२४'s picture

22 Jul 2024 - 11:53 am | श्वेता२४

येथील धबधबे मात्र अगदीच लहान आहेत.
- हो. नोव्हेंबर एंडला आमची सहल झाली. त्यामानाने धबधब्यांमध्ये पाणी खूप जास्त नव्हते असेच म्हणावे लागेल. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये ज्यांनी ट्रेक केला आहे त्यांना असे दुरूनच धबधबे पाहणे म्हणजे काहीच वाटणार नाही. धबधब्याचा आनंद घ्यायचा असेल तर अगदी भिजायचे नाही असे ठरवले तरी किमान सुखरूप पणे पाय तरी सोडून बसता आले पाहिजे. पण इथे कुठल्याच धबधब्याला असा थेट एक्सेस नाही. कारण ते रिस्की आहेत. लांबूनच बघावे लागते. त्यामुळे आमचा नाही म्हणलं तरी हिरमोड झाला.

@ प्रचेतस

"येथील धबधबे मात्र अगदीच लहान आहेत."

नाही हो, येथील सगळेच धबधबे इतकेही लहान नाहीयेत 😀
अथिरापल्ली जबरदस्त आहे आणि खाली गोरगावलेकर ताईंनी उल्लेख केलेल्या इरवीकुलम राष्ट्रीय उद्यानातही अनेक लहान मोठे धबधबे आहेत. वायनाडला केरळमधला सगळ्यात मोठा धबधबा आहे म्हणतात, पण तो अजुन तरी पाहिला नाहीये. अर्थात सगळा सीझनचा खेळ आहे, अथिरापल्ली धबधब्याला केरळचा नायगारा का म्हणतात ते पाहायला एकदा जुलै-ऑगस्ट मधेच जायला पाहिजे.
२०२० पासून केरळमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस पडतोय. गेल्या महिन्यात एक मित्र त्रिशुर ह्या आपल्या मूळ गावी जाऊन आला. जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे पावसाला सुरुवात होऊन महिनाही झाला नसतानाचा त्याने पाठवलेला खालचा अथिरापल्ली धबधब्याचा फोटो पाहिल्यावर आता चालकुडी नदी दुथडी भरून वहायला लागल्यावर तो कसला भन्नाट दिसत असेल ह्याची कल्पना करतोय!

@ श्वेता २४

"पण इथे कुठल्याच धबधब्याला असा थेट एक्सेस नाही. कारण ते रिस्की आहेत. लांबूनच बघावे लागते. त्यामुळे आमचा नाही म्हणलं तरी हिरमोड झाला."

हो, असंख्य घळी तयार झाल्यामुळे पाण्यात उतरणे रिस्की असल्याने काहीसे लांबूनच बघावे लागतात खरे! गेल्या केरळ भेटीत अथिरापल्लीकडे जातानाच्या रस्त्यावर ज्या ठिकाणाहून त्याचे लांबून पूर्णरूपात दर्शन घडते तिथुन त्याचा झूम करून काढलेला हा फोटो...

सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत तीनशे फुटांपेक्षा जास्त रुंद दिसणाऱ्या ह्या धबधब्याच्या जानेवारीच्या अगदी शेवटी शेवटी त्याच्या केवळ तीन धाराच कोसळत असलेल्या लांबुन पाहून आमचाही तेव्हा काहीसा हिरेमोड झाल्याने आता दरी उतरण्याची मेहनत घेऊन त्याच्या पायथ्यापर्यंत जावे कि नाही अशा विचारात आम्ही पडलो होतो पण ड्रायव्हरने सांगितले "नक्की जा, आत्ता पाण्याचा फोर्स कमी असल्याने तुम्हाला सीझनमध्ये कधीही जाता येणार नाही इतके त्याच्या जवळ जाता येईल."

त्याच्या सांगण्यावरून ती निसर्गरम्य दरी उतरून खाली जाऊन परत वर येण्यात खूप दमछाक झाली पण धबधब्याच्या डावीकडच्या धारेच्या खूप आणि उजवीकडच्या त्या दोन सुप्रसिद्ध (मणिरत्नम स्पेशल) धारांच्या बऱ्यापैकी जवळ जाता आल्याने आणि थोड्या अंतरावर पाण्याचा प्रवाह अगदी मंद असलेल्या उथळ भागात उतरताही आल्याने मजा पण खूप आली होती.

बाकी मणिरत्नम ह्यांच्या 'दिल से' मधल्या "जिया जले जान जले", 'गुरु' मधल्या "बरसो रे मेघा मेघा" आणि 'रावण' मधल्या "बेहने दे मुझे बेहने दे" ह्या गाण्यांमुळे अथिरापल्ली धबधब्याला देशभरात चांगली प्रसिद्धी मिळाली पण VFX चा भरपूर वापर केला असला तरी 'बाहुबली' चित्रपटाने मात्र त्याला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणले.

श्वेता२४'s picture

24 Jul 2024 - 11:10 pm | श्वेता२४

धबधब्याच्या अनुषंगाने दिलेली सिनेमांची माहिती देखील छानच.

गोरगावलेकर's picture

22 Jul 2024 - 2:54 pm | गोरगावलेकर

काय बघावं, काय नाही ते प्रत्येकाच्या आवडीवर अवलंबून आहे. दूरवरच्या ठिकाणी आपले नेहमी नेहमी जाणे होत नाही. त्यामुळे मुख्य ठिकाणे जोडून काही अनवट ठिकाणे पाहायला मिळाली तर उत्तमच.
इरवीकुलम राष्ट्रीय उद्यान, मुटिपट्टी डॅम, बोटॅनिकल गार्डन हि खरोखर चांगली ठिकाणे आहेत.

श्वेता२४'s picture

22 Jul 2024 - 6:37 pm | श्वेता२४

काय बघावं, काय नाही ते प्रत्येकाच्या आवडीवर अवलंबून आहे. दूरवरच्या ठिकाणी आपले नेहमी नेहमी जाणे होत नाही. त्यामुळे मुख्य ठिकाणे जोडून काही अनवट ठिकाणे पाहायला मिळाली तर उत्तमच.
अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं .प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद.

किल्लेदार's picture

24 Jul 2024 - 6:31 am | किल्लेदार

कौटुंबिक सहल असेल तर रुळलेली ठिकाणं आणि ती सुद्धा पीक सीझनमधे बघण्याशिवाय इलाज नसतो. पण चहाचे मळे सह्याद्रीत दिसायचे नाहीत तेव्हा मुन्नार इज ए मस्ट :). वीस वर्षांपूर्वी मुन्नारला गेलो होतो तेव्हा अनामुडी हे सर्वोच्च शिखर विशेष आवडले होते. मधूनच रस्त्यावर धावत आलेला निलगिरी थारचा कळप त्या सहलीचा कळसबिंदू होता. थेक्कडी प्रसिद्ध अभयारण्य असूनसुद्धा काहीही दिसले नाही.

चहाचे मळे महाराष्ट्रात फक्त एकाच ठिकाणी आहेत ते म्हणजे आंबा घाटात, आंबा गावाच्याअलीकडे चहा फॅक्टरी होती, डोंगरउतारावर चहाचे मळे होते. खास तिकडे जाऊन प्रत्यक्ष बघितलेले होते. हल्ली ही फॅक्टरी बंद पडलीय असे ऐकिवात आहे.

"मधूनच रस्त्यावर धावत आलेला निलगिरी थारचा कळप त्या सहलीचा कळसबिंदू होता. थेक्कडी प्रसिद्ध अभयारण्य असूनसुद्धा काहीही दिसले नाही."

वाह! वीस वर्षांपूर्वी रस्त्यावर त्यांचा कळप बघायला मिळाला म्हणजे खुप नशीबवान आहात. आता खास त्यांच्यासाठी राखीव अभयारण्य असलेल्या एरवीकुलम नॅशनल पार्कमध्येही निलगिरी थारचे दर्शन घडेल ह्याची शाश्वती नाही. आम्हाला तीथे त्यांचे दोन कळप तरी दिसले होते पण थेक्कडीचा अनुभव तुमच्यासारखाच होता. प्रसिद्ध अभयारण्य असूनसुद्धा तिथे काहीही दिसले नाही!
बाकी सहलकाळात एखादा दिवस रिकामा ठेउन दरीचा 'व्ह्यु' मिळणाऱ्या हॉटेलच्या रुमच्या टेरेस्/बाल्कनीत तासंतास निवांतपणे बसुन दक्षिणेकडच्या राज्यांत प्रचंड लोकप्रिय असलेल्या 'मॅन्शन हाउस' ह्या फ्रेंच स्टाईल ब्रँडीचा आस्वाद घेत धुक्याच्या लपंडावात मध्येच हरवणारी तर मध्येच दॄष्यमान होणारी दुरवरची पर्वतशिखरे आणि दरीची विलोभनिय दृष्ये पहाण्यासाठीही मुन्नार इज ए मस्ट 😀

@ प्रचेतस

"चहाचे मळे महाराष्ट्रात फक्त एकाच ठिकाणी आहेत ते म्हणजे आंबा घाटात"

रोचक! महाराष्ट्रात चहाचे मळे आहेत हे आजच समजले.

रोचक! महाराष्ट्रात चहाचे मळे आहेत हे आजच समजले.

+१

मूळ लेखाबद्दल:

लेख तपशीलवार आणि उत्तम.

मुन्नार फारसे आवडले नाही, या वाक्याचा पुन्हा पुन्हा विचार करत आहे. मी पंधरा सोळा वर्षांपूर्वी बघितले होते तेव्हा मला तो केरळ ट्रिपमधला हाय पॉइंट वाटला होता. आता इतर अनेक पर्यटन स्थळांप्रमाणे मुन्नारलाही उतरती कळा लागली की काय? ठिकाणे हळूहळू बदलतात, क्राऊड वाढत जातो तसे माहोल आणि वातावरण देखील बदलत जाते असा अनुभव आहे.

गोरगावलेकर's picture

24 Jul 2024 - 11:54 am | गोरगावलेकर

आम्हालाही निलगिरी थारचे अगदी जवळून दर्शन झाले होते आणि अगदी बाजूला उभे राहून त्याच्यासोबत फोटोही घेतले होते.

टर्मीनेटर's picture

24 Jul 2024 - 12:01 pm | टर्मीनेटर

मस्तच आहेत फोटोज... आम्हाला इतक्या जवळुन नव्हते दिसले.
बाकी खास शेळीच्या एखाद्या प्रजातीसाठी राखीव असणारे हे जगातले एकमेव अभयारण्य असावे. चु.भु.दे.घे.

किल्लेदार's picture

24 Jul 2024 - 8:03 pm | किल्लेदार

माझ्याकडे २३ वर्षांपूर्वी कोडॅक केबी २० हा फिल्म कॅमेरा होता. तेव्हा माझे फोटो सर्वोत्कृष्ट आहेत असा माझा दावा आहे :). ज्यांच्याकडे कधी हा कॅमेरा होता ते नक्की सहमत होतील. अर्थात ते फोटो माझ्या जुन्या अल्बम्स मध्ये असल्यामुळे हे मी सिद्ध करू शकणार नाही :D...

(फोटो डेव्हलप होईतो निघाले आहेत का नाही याचीही शाश्वती नव्हती)

श्वेता२४'s picture

24 Jul 2024 - 11:13 pm | श्वेता२४

@ किल्लेदार प्रतिसादासाठी धन्यवाद
@ गोरगावलेकर निलगिरी थार चे फोटो सुरेख आले आहेत
@ गवि प्रतिसादासाठी धन्यवाद

अथांग आकाश's picture

25 Jul 2024 - 1:29 pm | अथांग आकाश

लेख, फोटो आणि प्रतिसाद सुद्धा आवडले!
पुभाप्र!!

सिरुसेरि's picture

27 Jul 2024 - 6:56 pm | सिरुसेरि

सुरेख वर्णन आणी फोटो . मुन्नार येथे कलरी पय्यटु या युद्धकलेचे आणी कथकली या नॄत्यकलेचे रोज संध्याकाळी तेथील मुद्रा कलासंस्थेकडुन सादरीकरण केले जाते. तेही अवश्य पाहण्यासारखे आहे .

श्वेता२४'s picture

27 Jul 2024 - 7:13 pm | श्वेता२४

प्रतिसादासाठी धन्यवाद

श्वेता व्यास's picture

31 Jul 2024 - 5:16 pm | श्वेता व्यास

हा भागदेखील आवडला. मला आवडले होते मुन्नार, पण तुम्ही म्हणता तसे लहान मुलांसाठी कंटाळवाणे होऊ शकते.