मंडपेश्वर लेणी, दहिसर

गोरगावलेकर's picture
गोरगावलेकर in भटकंती
3 Jul 2024 - 3:48 pm

मुंबईच्या मध्यवर्ती भागात असूनही थोड्याश्या अपरिचित असलेल्या दोन लेण्यांना गेल्या वर्षी भेट दिली होती.
आंबोली लेणी आणि कोंडिविते लेणी (जोगेश्वरी लेणी आणि महाकाली लेणी)
अशाच एका तिसऱ्या लेणीला गेल्या आठवड्यात भेट दिली ती म्हणजे दहिसर (प) येथे असलेली मंडपेश्वर लेणी. सहाव्या शतकात निर्माण झालेले हे एक बौद्ध लेणे. इतर लेण्यांप्रमाणेच या लेण्यांचा वापर देखील धर्मप्रसार आणि भिक्खुंच्या राहण्यासाठी त्याचबरोबर सागरी मार्गाने येऊन घाटवाटांनी प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांची राहण्याची व्यवस्था, भिक्खुंमार्फत त्यांचे संदेश वहन असाही होत असणार.
लेणी दहिसरला असली तरी बोरिवली स्टेशनपासून अवघ्या दोन किमी अंतरावर. शिवाय बोरिवली येथे जाणासाठी मुंबई लोकलच्या फेऱ्या व पर्यायही जास्त असल्याने सोईस्कर.नव्या मुंबईतून जाण्यासाठी थेट गोरेगाव जाणारी लोकल पकडली. तेथून लोकल बदलून दहा मिनिटात बोरीवलीला पोहचलो.रेल्वे स्टेशनच्या बाहेरच रिक्षा उभ्या असतात. तीनचार रिक्षावाल्यांना विचारले. कोणालाही लेणी माहीत नव्हती. एक रिक्षावाला यायला तयार झाला. परत कधी आलात तर शिवाजी नगर विचारा असे म्हटला. दहा मिनिटात स्टॉपला पोहचलो.

बुद्ध विहार असलेल्या या लेण्या नंतरच्या काळात जोगेश्वरी व घारापुरी लेणीप्रमाणे शैव/हिंदू/ब्राह्मण लेण्या म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. जोगेश्वरी लेणीच्या काळातच येथील शिल्पकाम करण्यात आले असावे.लेणीच्या आवारात प्रवेश करताच एक दगडी फरशी बसवलेली वाट लेणीकडे जाते.

दोन्ही बाजूला बाग विकसित करण्याचे काम सुरु आहे

थोडेसे पुढे जाताच लेणी नजरेस पडते.

चार खांब असलेला एक भव्य मंडप आहे. या मंडपावरूनच लेणीचे नाव 'मंडपेश्वर' पडले असावे. मंडपातून गर्भगृहात प्रवेश करण्याच्या आधी एक भग्न नंदी व अलीकडच्या काळातील अजून एक नंदी आहे.

गर्भगृहात शिवलिंग आहे. हा लेणीचा पूर्वीचा सर्वात मोठा विहार. याच्या दोन्ही बाजूला विहार आहेत.

लेणीच्या 'L" आकाराच्या बाजूला एक विहार असून त्यात मात्र एक मोठा शिल्पपट दिसतो तो थोडयाफार बऱ्या स्थितीत आहे.

या शिल्पपटात नटराज दिसत आहे.

वरील उजव्या कोपऱ्यात यक्ष/गंधर्व आहेत.

डावीकडील वरच्या भागात ब्रह्मदेव आहे.

त्या खाली डाव्या बाजूस बहुतेक लकुलीश व शिष्य असावेत, (जोगेश्वरीच्या लेणीतही लकुलिशाचे शिल्प होते. लकुलीशाबद्दल माहिती जोगेश्वरीच्या लेखातील लिंक मध्ये दिलेली आहे).

डाव्या बाजूस खाली वाद्य वाजवणाऱ्या दोन व्यक्ती दिसत आहे.

खाली उजव्या बाजूस तीन स्त्री प्रतिमा आहेत. त्यातील मधली पार्वती असून हा शिव पार्वती लग्नाचा पट आहे असे सांगतात पण मधली स्त्री पार्वती असावी असे वाटत नाही.

(या सर्व शिल्पांबद्दल जाणकारांनी भर घालावी. विषेशतः प्रचेतस यांनी)

अजून काही अवशेष व कोरीव काम व पाण्याचे टाके

सोळाव्या शतकात हा भाग पोर्तुगीजांकडे आला. त्यांनी लेण्याचे रूपांतर चर्च मध्ये केले. एक शिल्प तोडून त्याजागी कोरलेला क्रूस याची साक्ष देतो.

ही लेणी असलेल्या टेकडीला पोर्तुगीज 'माउंट पोईनसर' म्हणत. याचाच अपभ्रंश होऊन लेणीला मंडपेश्वर नाव पडले असेही सांगितले जाते.
टेकडीवर जाण्याची वाट

टेकडीच्या वर दगडी चर्चच्या बांधकामाचे अवशेष आहेत. मधे एक पॅसेज व त्याच्या दोन्ही बाजूला अनेक खोल्या आहेत. कदाचित येथील खोल्यांचा वापर पोर्तुगीज सैनिकांनी राहण्यासाठीही केला जात असेल.

टेकडीवर लेणीच्या आवाराबाहेर चर्च आहे व ख्रिश्चन लोकांची एक स्मशानभूमीही दिसते.

इ.स.१७३९ मध्ये मराठ्यांनी स्वारी करून हा प्रदेश काबीज केला. त्यानंतर कित्येक वर्ष हा भाग ओसाड पडला. विसाव्या शतकात या स्थळाचा परत शोध लागून त्याला पुरातत्व वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले.
टेकडीहून उतरून परत एकदा बाहेरूनच लेणीचे दर्शन घेतले.

बोरिवली स्टेशनला परत आलो. भूक लागली होती. स्टेशनबाहेरच एक सुरभी नावाचे हॉटेल दिसले त्यात शिरलो. 'तट्टे इडलीची' ऑर्डर दिली. मस्तपैकी वर तूप घातलेली आणि गन पावडर (पोडी चटणी) भुरभुरलेली इडली समोर आली. छान चव होती.

इडली खाता खाता भक्तीताईचा लेख तट्टे इडली पोडी आठवला हे वेगळे सांगायला नकोच

थोडे अवांतर: लेणी बघायला जास्त वेळ लागला नाही. आमच्याजवळ भरपूर वेळ होता. 'क्वीन्स नेकलेस' पाहायचे ठरले. बोरिवली-चर्चगेट लोकल पकडली आणि चर्नी रोडला उतरलो आणि बाजूलाच असलेल्या मारिन ड्राइव्हला पोहचलो. अजूनही समोर कोस्टल रोडचे काम सुरु आहे. चर्नी रोडहून मारिन लाइन्सकडे येताना मात्र काम पूर्ण होऊन पदपथ वापरासाठी खुला झाला आहे. समुद्राला भरती असल्याने लाटा किनाऱ्यावर आपटून उंचच्या उंच उसळत होत्या. अधून मधून पावसाचा शिडकावा होत होता.

मस्त वातावरण होते, एक-दिड किलोमीटर पदपथावर चालत फेरफटका मारला आणि शिवाजी महाराज टर्मिनसला येऊन परतीच्या प्रवासासाठी बेलापूर लोकल पकडली.

प्रतिक्रिया

Bhakti's picture

3 Jul 2024 - 4:12 pm | Bhakti

वाह!
सुंदरच भटकंती, पुण्यात पाताळेश्र्वर पाहून वेरूळला असल्याचा फील येतो.तसच मुंबानगरीत ही लेणी पाहून वेरूळ वाटलं :) ते समुद्राच्या भरतीच्या लाटा,मरीन ड्राईव्ह भारीच, समुद्र मात्र पुण्यनगरीत नाही ;)

इडली खाता खाता भक्तीताईचा लेख तट्टे इडली पोडी आठवला हे वेगळे सांगायला नकोच

कसलं भारी मन लावून वाचता ओ :) आनंद वाटला,धन्स!

किल्लेदार's picture

4 Jul 2024 - 6:32 pm | किल्लेदार

"पुण्यात पाताळेश्र्वर पाहून वेरूळला असल्याचा फील येतो"
अगदी बरोबर

नेहमीप्रमाणे माहितीपर लेख. मंडपेश्वरातल्या मूर्ती बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत दिसत आहेत.

कर्नलतपस्वी's picture

3 Jul 2024 - 7:09 pm | कर्नलतपस्वी

दृष्टीकोन असेल जवळपास सुद्धा अनेक चांगल्या गोष्टी सापडतात.

पावगढ, गुजरात मधे लकुलिश चे मंदिर व माहीती प्रथमच कळाली. छावडा राजांनी आठव्या शतकात हे मंदिर बांधले. काही मुर्ती सुस्थितीत आहेत पण मंदिर मात्र भग्न आवस्थेत आणी दुर्लक्षित आहे.

पुरातन मुंबईची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

प्रसाद गोडबोले's picture

4 Jul 2024 - 9:08 pm | प्रसाद गोडबोले

वाह , उत्तम लेख !
आवडले !

लेख आणि वर्णन नेहमीप्रमाणेच उत्तम. लेणीची रचना बरीचशी घारापुरी आणि पाताळेश्वरासारखी वाटते आहे. ह्याचे कर्तृत्व बहुधा कोंकण मौर्यांकडे असावे.

वरील उजव्या कोपऱ्यात यक्ष/गंधर्व आहेत.

उजव्या कोपर्‍यातील शेवटची मूर्ती गरुढारुढ विष्णूची आहे.

डावीकडील वरच्या भागात ब्रह्मदेव आहे.

यातील सर्वात पहिला हत्तीवर आरुढ इंद्र आहे. इतर दिक्पाल अजिबात ओळखू येत नाहीत, शेवटचा ब्रह्माच.

या खाली डाव्या बाजूस बहुतेक लकुलीश व शिष्य असावेत

हा लकुलिश नाही, त्याची ठळक लक्षणे ह्यात अजिबात नाहीत, बहुधा राजा असावा. मूर्तीचे खूपच विदारण झाले आहे मात्र.

खाली उजव्या बाजूस तीन स्त्री प्रतिमा आहेत. त्यातील मधली पार्वती असून हा शिव पार्वती लग्नाचा पट आहे असे सांगतात पण मधली स्त्री पार्वती असावी असे वाटत नाही.

सर्वात उजव्या बाजूची पार्वती आहे, तिची दृष्टी नटराजावर खिळली असून इतर दोन स्त्रिया सखी असाव्यात. हा नटराज पट असल्याने शिव पार्वती विवाह प्रसंग हा नव्हे.

बाकी कान्हेरी लेणी प्रमाणेच येथील स्तंभही खूप झिजलेले दिसताहेत.

फिरत राहा व अशाच हटके ठिकाणांबद्द्ल लिहित राहा.

गोरगावलेकर's picture

5 Jul 2024 - 12:16 pm | गोरगावलेकर

प्रत्यक्ष चित्र समोर असूनही बऱ्याच गोष्टी आम्हाला दिसत नाही किंवा दिसूनही कळत नाहीत. प्रत्येक गोष्ट उलगडून सांगितल्याने व्यवस्थित कळली. नंतर कोणी या ठिकाणाला भेट दिली तर त्यांनाही लेणी बघायला मजा येईल.
( राजाचे जे शिल्प आहे त्या शिल्पात मांडीजवळ ताठरलेले लिंग असावे असे भासले त्यामुळे तो लकुलीश असावा असा अंदाज केला होता)

प्रचेतस's picture

5 Jul 2024 - 3:23 pm | प्रचेतस

नाही तो पायाचा भाग आहे. लकुलिश हा उर्ध्वरेता आहे त्यामुळे लिंगाचा भाग आकाशाच्या दिशेने असतो. शिवाय हातात लगूड असते. लगूडाशिवाय लकुलिशाला पूर्णत्व येत नाही. येथे दोहोंचा अभाव आहे.

गोरगावलेकर's picture

8 Jul 2024 - 10:03 am | गोरगावलेकर

धन्यवाद. आपल्याकडून नेहमीच नवीन नवीन माहिती मिळत असते

सोळाव्या शतकात हा भाग पोर्तुगीजांकडे आला. त्यांनी लेण्याचे रूपांतर चर्च मध्ये केले. एक शिल्प तोडून त्याजागी कोरलेला क्रूस याची साक्ष देतो.

हे वाचून माफ करा पण राहवत नाही म्हणून लिहितो... हा फोटू तमाम उदार मतवाद्यांना दाखवला पाहिजे , स्पीड पोस्टाने रा. गांधी यांना दिललीस पाठवून द्यवा म्हणतो ! कसे !
यावरून एक नुकताच आलेला अनुभव

एका भारतीय / बहू देशीय सांस्कृतिक कार्यक्रमात गेलो होतो ,, ठिकाण एका चर्च चे पटांगण होते ,,, बहुतेक लोक केरळ भागातील दिसत होते ,,, आणि असे समजले कि हे चर्च भारतीय सीरियन ख्रिस्ती पंथाचे आहे (पंथ हा शब्द वापरला कारण ख्रिस्ती धर्माचे अनेक भाग आहेत हे कित्येकांना माहित नसते म्हणून )
तर्‍....
फिरत फिरत चर्च च्या बाजूला गेलो तर एक उंच असा पितळ्याचा स्तंभ होता .. आणि वरती अर्थात क्रॉस होता पण स्ताम्भाची सजावट हि भारतीय पद्धतीची होती , नुसतीच भारतीय पद्धतीची होती असे नव्हे तर असा स्तंभ हा त्याचा शहरातील तामिळ हिंदू मंदिरातील स्तंभासारखाच होता... फरक फक्त वरील क्रोस आणि पायथ्यवरील चित्रे ....
म्हणजे काय कि जरी धर्माने ख्रिस्ती असले तरी त्यांचे मूळ हिंदूच आहे ( अर्थात हे ते मेनी करणार करणार नाहीत म्हणा )
चर्च = https://www.quora.com/Why-do-some-churches-in-South-India-have-a-long-to...
मंदिर = https://www.youtube.com/shorts/fcu9KsgDdKI

पुढे मी खादाड म्हणून पदार्थ विकणाऱ्याला विचारले कि हे जेवण केरळी पद्धितीचे आहे हे दिसतंय पण त्यात पण हिंदू पद्धत / ख्रिस्ती पद्धत / इस्लामी पद्धत असे काही आहे का? तर त्याने उध्दट पने उत्तर दिले कि चर्च च्या पटांगणात आहे म्हणजे ख्रिस्तीच असणार ना? मग मी त्याला दाखवून दिले कि असे काही नाही तुमचचा हा मेळावा काही धार्मिक मेळावा नाहीये तर सगळ्या जनतेचं सहभाग व्हावा असा असा मेळावा आहे त्याची जाहिरात हि तशीच आहे ,, येथे हिंदू आणि शीख स्टाल हि दिसत आहेत ,
जसे गोव्यात हिंदू आणि ख्रिस्ती जेववण्याचं पद्धतीत फरक आहे तश्या अर्थाने मी विचारत होतो ...
भारताबाहेर अनेकदा हे मी बघितलंय " आपण कसे सर्वसामान्य हिंदू भारतीय नाही किंवा त्या भारतिचे संस्कृतीशी आपला काही संबंध नाही कारण कि आपण भारतीय ख्रिस्ती किंवा मुस्लिम आहोत म्हणून " असे दाखवण्याची काहींना ओढ असते ... का कोण जाणे !
(का ते माहिती आहे म्हणा , सुन्यास अधिक सांगणे ना लागे )

अवांतर :

चौकस२१२,

जेव्हा पोर्तुगीज व इतर युरोपीय मिशनरी भारतात आले तेव्हा त्यांची पहिली भांडणं सीरियन ख्रिस्त्यांशी झाली. भारतात येशूची पूजा/भक्ती केली जाते हे पाहून मिशनऱ्यांना आश्चर्य वाटलं. येशूचा संदेश फक्त आपणंच फैलावतो असा ग्रह झाला होता. त्यास तडा गेला. तेव्हा मिशनऱ्यांणी सीरियन ख्रिस्त्यांना आपल्या नामाभिधानात ( denomination मध्ये ) सामील व्हायची गळ घातली. ते भारतीय येशूभक्तांना अमान्य होतं. याचं कारण म्हणजे भारतीयांची येशूभक्ती उर्वरित हिंदूंप्रमाणे बिगर-राजकीय होती. पण पोर्तुगीज पडले राजकीय ख्रिस्ती. मग काय झालेच राडे.

भारतीय सीरियन ख्रिस्ती हे पर्शियन ख्रिस्ती पंथाच्या अखत्यारीत येतात. त्याप्रमाणे त्यांनी सदर नामाभिधानानुसार अनेक विदेशी धर्मगुरूंना आधारासाठी पत्रे लिहिली. त्यापैकी कोणीच प्रत्युत्तरे दिली नाहीत. मात्र एका पर्शियन ख्रिस्ती धर्मगुरूने भारतीयांना पाठिंबा दिला. त्याचं नाव अब्दुल जलील बाबा द ग्रेगेरियस. हा पुढे भारतात आला व सामोपचाराचा प्रयत्न केला.

एकंदरीत भारतीय येशूभक्तांणी पोर्तुगीज सत्तेपुढे न नाम्याची शपथ घेतली. तीस कूनन क्रूसची शपथ म्हणतात. कूनन शपथेने अंकित येशूभक्तांनी परकीय दडपशाहीच्या विरोधात नवीन स्मृतीही लिहिल्या. ही प्रतिक्रिया स्थानिक हिंदूंप्रमाणेच आहे.

कोणे एके काळी दडपशाही झुगारून देणारे येशूभक्त आज त्याच मिशनऱ्यांच्या गळ्यात गळे घालून हिंडतात, हे पाहून खेद वाटतो. हिंदूंनी सजग होऊन पाववाल्यांना मिसळपावाची चटक लावणे हा यावरील उपाय आहे.

आपला नम्र,
-नाठाळ नठ्या

गोरगावलेकर's picture

5 Jul 2024 - 12:15 pm | गोरगावलेकर

@Bhakti, किल्लेदार, कंजूस, कर्नलतपस्वी, प्रसाद गोडबोले, चौकस२१२. प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद.

उत्तम लेख, वर्णन , आणि छायाचित्रे.

मंडपेश्वर रस्त्यावर फार पूर्वी खूपच वावर असायचा. नंतर देखील तिकडून प्रसंगोपात्त येणे जाणे असते

तिथे लेणी आहेत आणि ती इतपत बऱ्या अवस्थेत आहेत हे कळून आश्चर्य वाटले. कधी अशा जागा जाऊन बघाव्या असा विचारच रूटीन मध्ये मनात येत नसावा.

महाकाली केव्हज रोड वर पूर्वीच्या एका नोकरीत मी कित्येक वर्षे रोज ये जा केली. पण तिकडे लेणी आहेत हे नावात स्पष्ट होत असूनही ते केवळ एका रस्त्याचे नाव म्हणूनच राहिले मनात. कधीही ती लेणी कुठे आहेत शोधायला गेलो नाही (आहेत का?)

तीच गत शनिवारवाड्याची. पूर्वी पुण्यात दोनेक वर्षे राहून रोज शनिवार वाड्यावरून जाऊन येऊन त्याला वळसा घालून देखील एकदाही आत गेलो नाही.

एरवी दूरदूरची पर्यटन स्थळे पैसे खर्चून आणि प्रवास करून बघितली जातात. पण रूटीनच्या रस्त्याला "अतिपरिचयात अवज्ञा" चा शाप असतो.

टर्मीनेटर's picture

7 Jul 2024 - 8:11 am | टर्मीनेटर

छान आहेत लेणी 👍
बोरिवली, कांदिवली, एस्सेल वर्ल्ड-वॉटर किंगडम इत्यादी ठिकाणी जाताना घोडबंदर रोडवरून दहिसर चेकनाकामार्गे अनेकदा जाणे-येणे झाले आहे, परंतु दहिसर आणि बोरिवली ह्या दोन्ही ठिकाणांहून जवळपास सारख्याच अंतरावर असलेल्या ह्या लेण्यांबद्दल काहीच माहिती नव्हती. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत, मुंबई आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेनजीक असूनही हि लेणी इतकी अप्रसिद्ध कशी राहिली ह्याचे आश्चर्य वाटले!

गोरगावलेकर's picture

8 Jul 2024 - 10:06 am | गोरगावलेकर

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार

गोरगावलेकर's picture

8 Jul 2024 - 10:08 am | गोरगावलेकर

लेख भटकंती विभागात हलवावा ही संपादकांना नम्र विनंती

बिपीन सुरेश सांगळे's picture

9 Jul 2024 - 7:31 am | बिपीन सुरेश सांगळे

सुंदर परिचय
आवडला
आणि फोटोही