----
ययाति
----
वि. स. खांडेकर -- ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले, मराठीतील पहिले साहित्यिक. ययाति -- वि. स. खांडेकरांनी १९५९ मधे लिहिलेली, पौराणिक संदर्भ आणि सामाजिक आशय असलेली कथा. या कादंबरीसाठी १९७४ साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.
----
अगदी ओघवतं, प्रवाही लिखाण. साधे शब्द, पण तरीही कथेतून सामाजिक आशय अगदी प्रखरपणे मांडलेला. कथेच्या शेवटी मन विषण्ण, व्यथित होतं. कथा संपते, पण वाचकाला स्वतःशी संवाद करायला भाग पाडूनच.
एवढं प्रभावी लिखाण दुर्मिळच. प्रत्येक व्यक्तिरेखा अगदी भिन्न स्वभाव, आणि विचारांनी साकारलेली. मानवी मूल्ये वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अगदी सहज, सोप्या पण अगदी प्रभावी शब्दात टिपलेली.
----
अहंकार आणि ईर्ष्येच्या अधीन झालेली, शेवटपर्यंत स्वतःतच गुरफटलेली, देवयानी.
मोह आणि आसक्तीत आकंठ बुडालेला, ययाति.
अगदी छोट्या चुकीची शिक्षा म्हणून, केवळ असहाय्य वडीलांच्या वचनासाठी, राजवैभवाचा त्याग करून आयुष्यभर दासी बनून, उपेक्षित राहिलेली, शर्मिष्ठा.
कथेतील सर्व पात्रांना ज्याच्याविषयी नितांत आदर, विश्वास आणि आधार वाटतो, असा कर्तव्यनिष्ठूर आणि विरक्त, कचदेव.
----
अगदी मोजक्या शब्दात ययाति कादंबरीचा सारांश सांगायचा म्हटलं, तर असा सांगता येईल:
अहंकार-ईर्ष्या. मोह-आसक्ती. त्याग-निराशा. आदर्श-कर्तव्यनिष्ठूरता.
देवयानी. ययाति. शर्मिष्ठा. कचदेव.
----
शेवटी, प्रत्येकजण ही सर्व मानवी मूल्ये, यातील सामाजिक आशय, कधी ना कधी, थोड्याफार फरकाने का होईना अनुभवतोच. त्यावेळी असं साहित्य सोबती बनून, आपलं जगणं समृद्ध करतं!
----
"ययाति" ही कादंबरी html स्वरूपात इथे वाचता येईल:
https://online.fliphtml5.com/bxrrq/rizc/#p=1
----
प्रतिक्रिया
26 Jun 2024 - 7:56 am | पॅट्रीक जेड
परीक्षण आवडले. ययाती खूप आधी वाचलीय. वडिलांच्या शापामुळे दोन्हीमुले कधीही सुखी राहत नाहित. अतिशय छान कथा.
26 Jun 2024 - 8:51 am | कर्नलतपस्वी
खुपच गाजलेली कादंबरी.
फार दिवसांनी, कांदबरी सारखेच ओघवते लिखाण.
लिहीत रहा वाचत राहू ,प्रतिसाद तर नक्कीच देणार.
28 Jun 2024 - 4:40 pm | भागो
माझ्या प्रतिसादा बद्दल रागावू नये.
शाळेत असताना मला "वाईट संगत" लागली. त्यामुळे वि. स. खांडेकर, ना. सी. फडके (गालावर गुलाब किलवणारे.) इत्यादींच्या लिखाणाची, विशेष करून भाषेची, भरपूर खिल्ली उडवत असू. सत्यकथा, वासूनाका, माहीमची खाडी, नंतर सखाराम बाईडर. वर पोसलो गेलेलो.
तर मुद्दा असा कि "ययाति" ही केवळ ड्राइंगरूम मधल्या शोकेसची -काच पाहिजे हा म्हणजे येणाऱ्याच्या नजरेत टचकन भरणारी- शोभा वाढणाऱ्या काही पुस्तकातील एक.
पुन्हा एकदा माफ करावी.
28 Jun 2024 - 6:49 pm | नठ्यारा
भागो,
फडक्यांच्या शैलीच्या खिल्लीबाबत तुम्ही एकटेच नाहीत. प्र.के.अत्र्यांनी ययाति कादंबरीची बरीच पिसं काढलेली होती. असं वाचल्याचं अंधुकसं आठवतंय. कादंबरीतला ययाति लंपट दाखवलाय. प्रत्यक्षात तो आजीबात तसा नव्हता. शिवाय अत्रे विरुद्ध फडके इत्यादि इतर वादही होते.
-नाठाळ नठ्या
28 Jun 2024 - 8:08 pm | कंजूस
ययाती कादंबरी कधी वाचावी वाटली नाही कारण शाब्दिक वर्णने वाचायला आवडत नाहीत. पण असे काही वाचक असतात की त्यांना असे लेखन आवडते. काही जण म्हणतात की ते मराठीतले शेक्सपिअर होते.
28 Jun 2024 - 8:12 pm | भागो
मराठीतले शेक्सपिअर?
राम गणेश गडकरी.
28 Jun 2024 - 8:19 pm | भागो
स्रोत विकिपीडिया
28 Jun 2024 - 8:13 pm | प्रचेतस
मूळ महाभारतातील ययातीचे रसपूर्ण उपाख्यान वाचल्याने खांडेकरांची ययाती खूपच फिक्की वाटली होती.
30 Jun 2024 - 12:39 am | श्रीगणेशा
प्रतिसादासाठी सर्वांचे आभार.
प्रतिसादातील चर्चेवर माझं स्वतःचं, नोंद घ्यावी असं मत मांडण्याएवढं माझं वाचन नक्कीच नाही.
----
पण एक सामान्य वाचक म्हणून कादंबरीतील साधी भाषा भावते, आपली वाटते. तसंही प्रत्येक लेखकाची स्वतःची भाषा शैली असतेच, जे की नैसर्गिक आहे, म्हणूनच खरं तर तुलना होऊ नये.
----
कथेबद्दल बोलायचं झालं तर, लेखकाने स्वतः लिहिलं आहे की, ययातिमधे पौराणिक कथा फक्त संदर्भ म्हणून वापरली आहे, सामाजिक आशय व्यक्त करण्यासाठी.
----