मद्यपानाचे वैद्यकीय निदान

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
29 May 2024 - 8:58 am

मद्यपान - एक बहुचर्चित आणि ज्वलंत विषय !!

समाजात विविध कारणांसाठी मद्यपान करणारी भरपूर माणसे आहेत. उत्सुकता, आवड, चैन, व्यसन आणि मानसिक असंतुलन अशा अनेकविध कारणांमुळे माणसे मद्यपान करतात. जोपर्यंत मद्यपि ही कृती त्यांच्या घरी शांततेत किंवा सार्वजनिक परवाना असलेल्या ठिकाणी स्वपरवान्यासह करीत असतात तोपर्यंत ते कायदेशीर ठरते.

शांतपणे मद्यपानाचा आस्वाद आणि आनंद घेऊन एखाद्याने कुठलीही कौटुंबिक अथवा सार्वजनिक समस्या निर्माण केली नाही तर अन्य समाज व कायदा यांना त्यात लक्ष घालण्याची गरज नसते.
परंतु बेफाम मद्यपान करून सार्वजनिक गोंधळ घालणे, रस्त्यावर वाहन चालवणे किंवा अन्य आक्षेपार्ह कृत्य करणे अर्थातच बेकायदेशीर आणि समाजविघातक आहे. मद्यधुंद अवस्थेत स्वयंचलित वाहन चालवल्याने रस्त्यावरील अपघात होण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते. अशा कितीतरी प्रसंगांत संबंधित वाहनचालक निष्पाप पादचाऱ्यांच्या किंवा अन्य वाहनचालकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले आहेत. अशा घटना वारंवार घडताना दिसतात. नुकत्याच घडलेल्या अशा एका गंभीर घटनेने संपूर्ण राज्यभर जनक्षोभाची लाट उसळलेली आहे.

हा विषय अर्थातच व्यापक असून त्याला वैद्यकीय, न्यायिक आणि सामाजिक पैलू आहेत. वैद्यकीय दृष्टीने पाहता सर्वात महत्त्वाचा प्राथमिक प्रश्न हा असतो की,
एखाद्या बेधुंद संशयित व्यक्तीने खरोखरीच मद्यपान केलेले आहे काय?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी डॉक्टर संबंधित माणसाची तीन टप्प्यांमध्ये तपासणी करतात :
1. संबंधिताची मद्यपानाची कबुली
2. शारीरिक तपासणी आणि
3. प्रयोगशाळा चाचण्या

आता हे मुद्दे विस्ताराने पाहू.
1. मद्यपानाची कबुली : जेव्हा संशयित मद्यपी डॉक्टरांकडे आणला जातो तेव्हा सर्वप्रथम डॉक्टर त्याला ‘बोलते’ करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याच्याकडून कबुलीजवाब घ्यायचा प्रयत्न अर्थातच केला जातो. समजा, त्याने जबाब देण्यास नकार दिला किंवा तो अर्धबेशुद्ध अवस्थेत असेल, तर त्याच्या बरोबरीच्या माणसांकडून माहिती मिळवली जाते. त्यामध्ये कोणत्या प्रकारचे, प्रतीचे (देशी/ विदेशी/हातभट्टी, इ.) आणि किती मद्यपान केले आहे हे मुद्दे महत्त्वाचे ठरतात.

2. शारीरिक तपासणी : मद्यप्याच्या जवळ जाताच त्याच्या श्वासाला मद्याचा वास येतो आहे का ते प्रथम पाहिले जाते. त्यानंतर त्याच्या एकंदरीत अवस्थेनुसार डॉक्टर त्याची शुद्धीची पातळी, सामान्य प्रश्नांना दिलेली उत्तरे आणि एकंदरीत देहबोलीचे निरीक्षण करतात.
आतापर्यंतच्या विचारपूस आणि निरीक्षणातून बऱ्याचदा बराचसा अंदाज येतो. अर्थात मद्यपीच्या हातून जर फौजदारी गुन्हा घडला असेल तर मद्यपानाचे निदान पुराव्यासह सिद्ध होणे अत्यावश्यक असते. त्या दृष्टीने प्रयोगशाळा चाचण्यांना महत्त्व आहे. अशा रासायनिक चाचण्यांची माहिती, उपयुक्तता आणि मर्यादा यांचा आढावा आता घेतो.
प्रत्यक्ष चाचण्यांकडे वळण्यापूर्वी ethyl अल्कोहोलच्या शरीरातील चयापचय आणि उत्सर्जनासंबंधी काही मूलभूत माहिती घेऊ.

अल्कोहोलचा शरीरप्रवास
अल्कोहोल पचनसंस्थेत गेल्यानंतर लहान आतड्याच्या सुरुवातीच्याच भागातून त्याचे वेगाने शोषण होते. सुमारे 30 ते 90 मिनिटांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होते. (अल्कोहोलच्या रक्तपातळीचा उच्चबिंदू मद्यपान पूर्ण संपल्यानंतर सुमारे 30 मिनिटांपासून तीन तासांपर्यंत असू शकतो. मद्यपान रिकाम्या पोटी केले असता तो लवकर येतो हे उघड आहे आणि मद्यपानाच्या आणि अन्न खाण्याच्या प्रमाणानुसार तो उशिराने येतो). अल्कोहोल रक्तप्रवाहात गेल्यानंतर पुढील चयापचयासाठी यकृतात ( 90%) पोहोचते. तिथे काही एंझाइम यंत्रणांच्या मदतीने त्याचे acetaldehyde >> acetic acid मध्ये रुपांतर आणि अंतिमतः कार्बन डाय ऑक्साईड आणि पाण्यात रूपांतर होते. प्रौढांच्या तुलनेत मुलांमध्ये या चयापचयाची गती काहीशी अधिक राहते. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या रक्त-अल्कोहोलपातळीचा उच्चबिंदू अधिक असतो; स्त्रियांमधील मेदाचे प्रमाण जास्त असल्याचा हा परिणाम.

अल्कोहोलचे उत्सर्जन मूलतः लघवीतूनच होते. त्याच्या जोडीने ते श्वास, घाम आणि शौचामार्फतही थोड्या प्रमाणात होते. श्वासातून बाहेर पडणाऱ्या आणि रक्तात असणाऱ्या अल्कोहोल प्रमाणाचे गुणोत्तर सरासरी 2100 असते (म्हणजे 1 mL रक्तामध्ये जेवढे अल्कोहोल असते तेवढेच अल्कोहोल 2100 mL श्वासात असते). तर लघवीतील आणि रक्तातील अल्कोहोलचे गुणोत्तर 1.4 असते. मद्यपानानंतर एक तासाने लघवीतील अल्कोहोलचे प्रमाण उच्च बिंदूवर असते.

प्रयोगशाळा चाचण्या
विविध प्रकारच्या चाळण्या उपलब्ध असून त्यासाठी श्वास, रक्त, लघवी आणि थुंकीचे नमुने उपयुक्त असतात.

श्वास चाचणी
यासाठी दोन प्रकारची उपकरणे असतात. त्यापैकी सर्वात सुटसुटीत म्हणजे हातात मावणारा श्वासमापक. हा चाळणी चाचणीसाठी वापरला जातो. रस्त्यावर बेफाम वाहनचालकांची पोलिसांच्याद्वारे तपासणी केली जाते तेव्हा याचा उपयोग केला जातो. खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे संशयित व्यक्ती त्या उपकरणाच्या वरील भागातून तोंडाने जोरात श्वास सोडते. या पद्धतीने श्वासाचे दोन नमुने तपासले जातात. त्यानंतर उपकरणाच्या स्क्रीनवर अल्कोहोलचे अंदाजे प्रमाण एक मिनिटभरात ++/+ /- या स्वरूपात दर्शवले जाते. दोन नमुन्यांच्या रीडिंगमध्ये जर 15 टक्क्याहून अधिक फरक आला तर एरर दर्शवली जाते आणि चाचणी विश्वासार्ह नसते.

शास्त्रशुद्ध श्वासमापक चाचणी अशी असते :
1. सभोवतालच्या हवेची मोजणी ब्लँक चेक म्हणून करतात.
2. त्यानंतर प्रमाणित अल्कोहोल (35 μg/100 mL air) यंत्रावर तपासले जाते. अशा प्रकारे उपकरण प्रमाणित होते. (35 μg/100 mL air : हे प्रमाण देशानुसार बदलेल).

3. त्यानंतर संशयीताचा पहिला श्वास मोजला जातो
4. त्यानंतर पुन्हा एकदा भोवतालच्या हवेचे मापन होते

5. त्यानंतर दुसरा श्वास मोजला जातो
6. सर्वात शेवटी पुन्हा एकदा हवा आणि प्रमाणित अल्कोहोल मोजले जाते.

ok

ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यास संबंधित व्यक्तीला पोलीस स्थानकात नेऊन तिथे पुढची वरच्या दर्जाची चाचणी केली जाते, जी न्यायालयीन पुराव्यासाठी अधिकृत असते.
या चाचणीमध्ये खालील चित्रात दाखवल्यानुसार संबंधित व्यक्ती तोंडात धरलेल्या पाईपद्वारा श्वसन करत राहते.

ok
संबंधित उपकरण fuel अथवा इन्फ्रारेड सेलच्या तत्वावर काम करते. व्यक्तीने सोडलेल्या श्वासाचे सलग पृथक्करण केल्यानंतर अल्कोहोलच्या प्रमाणाचा आलेख सुमारे 10 मिनिटांत मिळतो.

ok

या चाचण्या करण्यास अतिशय सोप्या असल्या तरी त्यांच्या निष्कर्षाबाबत बऱ्याच मर्यादा लक्षात घ्याव्या लागतील :
1. वेळमर्यादा : एखाद्या व्यक्तीने चाचणी करण्यापूर्वी काही मोजक्या तासांपूर्वीच मद्यपान केलेले असल्यास चाचणी वैध ठरते.

2. तोंडातील इतर घटक : मद्यपानानंतर जर काही सुगंधी रसायनांनी गुळण्या केल्या किंवा श्वास दुर्गंधीनाशकाचा वापर केला अथवा अल्कोहोलयुक्त औषध घेतले असल्यास त्याचा निष्कर्षावर परिणाम होतो.

3. उपकरणीय घटक : संबंधित उपकरणाचे प्रमाणीकरण आणि नित्यनेमाने देखभाल करणे आवश्यक असते. तसेच उपकरणाची बॅटरी आणि sensor यांचेही काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. अल्कोहोलच्या एका विशिष्ट कमाल मर्यादेपर्यंतच या चाचणीने शोध घेता येतो. तसेच ही चाचणी करणाऱ्या तंत्रज्ञाचे कौशल्यही विचारात घ्यावे लागते.

4. वातावरणीय घटक : बाह्य तापमान, आर्द्रता, तसेच त्या व्यक्तीची श्वसन पद्धत ( मुद्दामून श्वास रोखून धरणे किंवा बळेबळे दीर्घश्वसन करणे) यांचाही निष्कर्षावर परिणाम होतो.

5. आरोग्य घटक : अल्कोहोलच्या चयापचय-गतीतील व्यक्तीभिन्नता, शरीराचे तापमान, फुफ्फुसक्षमता आणि श्वसनाचा व्हॉल्युम हे घटकही निष्कर्षावर परिणाम करतात. तसेच त्या व्यक्तीला जठराम्लतेचा (reflux) अथवा तीव्र मधुमेहाचा त्रास असल्यास त्याचाही विपरीत परिणाम होतो. अनियंत्रित मधुमेहामध्ये श्वसनातून ऍसिटोन बाहेर टाकले जाते.

6. कायदेशीर आव्हान : या चाचणीची अचूकता, विश्वासार्हता आणि शास्त्रशुद्ध नोंदणी यांवर न्यायालयात बचाव पक्षाकडून हरकतीचे मुद्दे येऊ शकतात, नव्हे, येतातच !

रक्तचाचणी
ही प्रत्यक्ष मद्यपानानंतर शक्य तितक्या लवकर करतात. साधारणपणे एक पेग ‘हार्ड’ मदयपानानंतर एक तासाच्या आत रक्त घेणे आवश्यक (a detection window of approximately 1 h per drink consumed). यासाठी व्यक्तीच्या शिरेतून रक्त काढले जाते. ते काढण्यापूर्वी एक महत्त्वाची खबरदारी घ्यावी लागते. ज्या जागी इंजेक्शनची सुई टोचतात तिथे जंतुनाशक म्हणून कुठल्याही अल्कोहोलयुक्त द्रावणाचा वापर करायचा नसतो. (काही अन्य पर्याय वापरतात). रक्त काढून झाल्यावर तो नमुना व्यवस्थित सीलबंद करतात. आता तो प्रयोगशाळेत पाठवल्यानंतर 4 तासांच्या आत त्याची तपासणी करणे आवश्यक असते.

या चाचणीतून आपल्याला रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण नेमके समजते. त्यामुळे ही चाचणी वैद्यकीय आणि न्यायवैद्यकीय प्रकरणांत प्रमाण-चाचणी म्हणून प्रस्थापित झालेली आहे. या चाचणीचा निष्कर्ष आणि संबंधित व्यक्तीची एकंदरीत अवस्था व निर्णयक्षमता यांची व्यवस्थित सांगड घालता येते.
गुन्हेगारी प्रकरणांमध्ये ही अत्यंत महत्त्वाची चाचणी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये केली जाते आणि तिथे ती अत्याधुनिक गॅस क्रोमॅटोग्राफी किंवा त्याहून आधुनिक GC-MS या पद्धतीने केली जाते. या उपकरणांचे प्रमाणीकरण आणि देखभाल अत्यंत काळजीपूर्वक करावी लागते. तसेच ती हाताळायला उत्कृष्ट प्रशिक्षित तंत्रज्ञ नेमले जातात.

लघवीची चाचणी
लघवीमध्ये उतरणारे अल्कोहोल हे विविध रूपांमध्ये असते - चयापचय न झालेले अल्कोहोल आणि चयापचयादरम्यान निर्माण झालेली अल्कोहोल-संयुगे. लघवीतील प्रत्यक्ष अल्कोहोलची मोजणी तांत्रिकदृष्ट्या विश्वासार्ह नसते आणि कटकटीची असते. तसेच ते उशिराने उत्सर्जित होत असल्यामुळे त्याची रक्तातील अल्कोहोल पातळीशी सांगड घालणे कठीण जाते. त्यामुळे त्याच्या काही संयुगांवर आधारित चाचण्या केल्या जातात.

अल्कोहोलच्या चयापचयातून ethyl glucuronide (EtG) या नावाचे एक संयुग तयार होते आणि ते लघवीत उत्सर्जित होते. जर एखाद्याने बेसुमार मद्यपान केलेले असेल तर लघवीतील हा घटक त्या घटनेनंतर 5 दिवसांपर्यंत शोधता येतो. कमी प्रमाणात मद्यपान केले असल्यासही या चाचणीतून ते उघड होते. या चाचणीचा उपयोग अधिकतर रुग्णांच्या बाबतीत केला जातो. मात्र गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये या चाचणीचा पुरावा म्हणून विचार अद्याप बाल्यावस्थेत आहे.

( रच्याकने,
EtG हे संयुग संबंधित व्यक्तीच्या केसांमध्येही जाऊन बसते आणि ते चाचणीने शोधता येते. मद्यपानाच्या कित्येक महिन्यांनानंतर देखील हा दीर्घकाळ टिकणारा पुरावा ठरतो आणि त्यात खोटेपणा करणे अवघड असते).

महत्त्वाची टीप :
वर उल्लेख केलेल्या आणि अन्य काही चाचण्यांची अल्कोहोल शोधण्याची आणि मोजण्याची संवेदनक्षमता भिन्न असते. कुठलीही चाचणी 100% उत्कृष्ट (ideal) म्हणता येत नाही. या चाचण्यांचे निष्कर्ष व्यक्तीच्या वय, लिंग, वजन, मद्यपानाची सवय, वारंवारिता आणि अवलंबित्व या घटकांवर अवलंबून असतात. तसेच त्या व्यक्तीच्या दीर्घकालीन आजारांचा आणि औषधोपचारांचाही या निष्कर्षांवर प्रभाव पडतो. मद्यपिच्या डॉक्टरांनी केलेल्या शारीरिक तपासणीला पूरक मदत म्हणूनच चाचण्यांचा विचार केला जातो.

या चाचण्यांमधून अल्कोहोलचे निदर्शनास आलेले प्रमाण आणि रस्त्यावर वाहन चालवण्याच्या अल्कोहोल-प्रमाणमर्यादेच्या कायद्यांमध्ये देशांनुसार भिन्नता आहे. तसेच खाजगी आणि सार्वजनिक वाहनचालकांसाठी काही देशांमध्ये वेगळे नियम असून सार्वजनिक वाहनचालकांना कामादरम्यान मद्यपनाची अजिबात परवानगी नाही, तर खाजगी वाहनचालकांना अल्कोहोलच्या अल्पमर्यादेपर्यंत परवानगी आहे. ते सर्व तांत्रिक तपशील या लेखाच्या कक्षेबाहेर आहेत.
ok
*************************************************************************************संदर्भ :
1.
2.
3. विविध वैद्यकीय पाठ्यपुस्तके
. . . . . . . .
चित्रसौजन्य : BMJ

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

Nitin Palkar's picture

29 May 2024 - 11:06 am | Nitin Palkar

माहितीपूर्ण लेख... नेहमीप्रमाणेच.

तांत्रिक वैद्यकीय माहिती सोप्या शब्दात सांगण्याचे तुमचे कौशल्य प्रशंसनीय आहे.

Bhakti's picture

29 May 2024 - 8:48 pm | Bhakti

तिथे ती अत्याधुनिक गॅस क्रोमॅटोग्राफी किंवा त्याहून आधुनिक GC-MS या पद्धतीने केली जाते.

इतक्या महाग टेस्टपण कराव्या लागतात तर!

नठ्यारा's picture

29 May 2024 - 9:38 pm | नठ्यारा

कुमार१,

माहिती उत्तम आहे. कायदेशीर बाबीतली वैद्यकीय प्रक्रिया उलगडून सांगितल्याबद्दल आभार.

-नाठाळ नठ्या

अवांतर : मी पहिल्यांद वाचलं तेव्हा गद्यपान असं वाचलं. म्हंटलं ३०० शब्दांचा गद्य निबंध लिहायला सांगितला त्यात कसलं आलंय वैद्यकीय निदान !

कुमार१'s picture

30 May 2024 - 7:29 am | कुमार१

अभिप्राय व प्रोत्सानाबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद !

1.

इतक्या महाग टेस्टपण

GC-MS या गटातील चाचण्यास सर्वोच्च संदर्भ चाचण्या असतात. देश आणि उपकरणांमधील उपलब्धतेनुसार अन्य चाचणी वापरली जाऊ शकते.

2.

द्यपान

हे अगदी भारीच आवडले !. . . :)))))))

सुधीर कांदळकर's picture

31 May 2024 - 10:17 pm | सुधीर कांदळकर

मद्यपानापुरता सीमित जरी असला तरी मी थोडे सीमोल्लंघन करणार आहे कारण वाहनचालन ऊर्फ ड्रायव्हिंग याच्याशी संबंधित आहे.
१. ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह कायद्यात हल्लीच कांहीं महिन्यापूर्वी सुधारणा घडवून कडक शिक्षेची तरतूद सरकारने केली होती. परंतु ही कायदा-सुधारणा जरी लोकहिताची असली तरी मालवाहतूक चालक संपामुळे सुधारित कायद्याची अंमलबजावणी मागे घेतली गेली.

२. मी व्यक्तिशः या सुधारणेच्या बाजूनेच आहे.

३. या कायद्याचे शब्दांकन मला ठाऊक नाही. इथिल अल्कोहोलबरोबर त्यात इतर अंमली पदार्थांचा समावेश आहे की नाही हे ठाऊक नाही. माझा अनुभव असा की अ‍ॅन्टीहिस्टॅमिनिक औषध घेतल्यानंतर काही तास प्रतिक्षिप्त क्रिया ऊर्फ रीफ्लेक्सेस किंचित विलंबाने घडून येतात. विचार करा आडगल्लीतून वाहन चालवतांना एखादे मूल अचानक समोर आले आणि ब्रेक एकदोन सेकंद उशिरा दाबला गेला तर काय होल.

३. एके काळी खोकल्यावरील औषधात इफिड्रीन, डायफीन हायड्रमाईन, कोडीन इत्यादी औषधांचा समावेश असे. यातील काही औषधे आता नार्कोटीक अर्थात मादक द्रव्ये यात गणली जातात आणि त्यांच्या वापरावर कठोर बंधने आहेत. एकदा माझ्या एका अतरंगी बंधूने मला खोकला झाला असतां कपभर पाण्यात भरपूर एफीड्रेक्स घालून मला दिले होते तेव्हा छान नशेचा अनुभव मी घेतलेला आहे.

४. चरस या द्रव्याची नशा केल्यास मोजमापाचा अंदाज येत नाही. अनेक वर्षांपूर्वी आमचा एक चर्सी मित्र रस्त्यावरून येणार्‍या मोटारी किती दूर आहेत याचा अंदाज न आल्यामुळे बराच वेळ रस्ता पार करू शकला नव्हता. एकाने जाऊन घेऊन येऊन त्याची सुटका केली होती. अशा व्यक्तीने वाहन चालवले तर काय होईल.

५. काही व्यसनग्रस्तांच्या मज्जासंस्थेवर, निर्णयशक्तीवर आणि रीफ्लेक्सेसवर कायमचे दुष्परिणाम झालेले असतात. कचकन थांबावे वा बाजूने वळून जावे याचा निर्णय या व्यक्ती वेळेवर घेऊ शकत नाहीत. थांबायचे असले तरी विलंबानेच थांबू शकतात.

६. मादक प्दार्थांचे सेवन नंतर चाचणीत पकडले जाऊं तर शकते. पण परवाना देण्यापूर्वी या चाचण्या आवश्यक नाहीत. शिवाय परवाना मिळाल्यानंतर व्यसन लागूं शकते.

मी कोणतीही सूचना करीत नाही, फक्त वस्तुस्थिती मांडतो आहे. वाचकांस आवाहन मात्र जरूर करेन की त्यांनी औषध घेतले असल्यास कोणतेही वाहन चालवूं नये.

कुमार१'s picture

1 Jun 2024 - 7:29 am | कुमार१

अ‍ॅन्टीहिस्टॅमिनिक औषध घेतल्यानंतर काही तास प्रतिक्षिप्त क्रिया ऊर्फ रीफ्लेक्सेस किंचित विलंबाने घडून येतात.

अतिशय चांगला मुद्दा.
मी तरी नेहमी माझ्या परिचितांना या औषधासंबंधी हाच सल्ला देतो की, ते शक्यतो ते दुपारी घेऊच नका आणि घ्यावे लागलेच तर स्वतः वाहन चालवू नका. हे खूप महत्त्वाचे आहे.

3-4 वर्षांपूर्वीच या संदर्भातील एक दुर्घटना एका मराठी अभिनेत्याच्या संदर्भात घडली होती. पण आता नक्की नाव व तपशील आठवत नाही.

मुक्त विहारि's picture

31 May 2024 - 11:08 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद...

समयोचीत लेख...

शास्त्रीय आणि कायदेविषयक माहिती आवडली 👍

कुमार१'s picture

8 Jun 2024 - 7:34 am | कुमार१

सर्व प्रतिसादकांचे आभार !

वाहन चालकांच्या संदर्भात अल्कोहोल आणि व्यसनी ड्रग्स वगळताही अन्य 2 मुद्दे महत्त्वाचे असल्याने लिहितो.
१.
बऱ्याच जणांना विविध आजारांसाठी निरनिराळी आधुनिक वैद्यकातील औषधे चालू असतात. त्यापैकी काही औषधांमुळे गुंगी आल्यासारखे अथवा डोके बधिरल्यासारखे होऊ शकते. अशा औषधाचा डोस घेतला असता त्यानंतर काही तास तरी स्वतःहून वाहन चालवणे टाळले पाहिजे.

संबंधित औषधांच्या बाबतीत डॉ. तसा सल्ला देतीलच. तरीसुद्धा सामान्यज्ञान म्हणून अशा काही औषधांची गटनावे काही उदाहरणांसहित लिहितो :
Sedatives and Hypnotics (Diazepam, Phenobarbital).
Opioid Analgesics ( Morphine)

Antidepressants (Amitriptyline, Fluoxetine)
Antipsychotics (Olanzapine)

Antihistamines (Diphenhydramine, Cetirizine) : सर्दीसाठी
Muscle Relaxants (Cyclobenzaprine)

Anticonvulsants (Phenytoin) : फिट्ससाठी
Stimulants (Amphetamines ) : ADHD चा उपचार
Antiemetics( Promethazine) : उलटीसाठी

कुमार१'s picture

8 Jun 2024 - 7:37 am | कुमार१

हा मुद्दा खालील औषधे घेणाऱ्या कोणालाही लागू आहे.

काही प्रकारची औषधे चालू असताना मद्यपान टाळले पाहिजे (किंवा काहींच्या बाबतीत अत्यल्प ठेवले पाहिजे) अशा काही औषधांची यादी :
*** टाळले पाहिजे :
Diazepam class, muscle relaxants (cyclobenzaprine and carisoprodol),
Antidepressants, morphine class,
metronidazole : Amoebic पोटविकारांचे औषध

*अत्यल्प ठेवले पाहिजे :
Non-benzodiazepine sleep aids, Antihistamines,
Antidiabetics (sulfonylureas and biguanides),
Antihypertensives (ACE inhibitors)