हृदयसंवाद (२) : हृदयरचना आणि कार्य

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
22 Apr 2024 - 8:21 am

भाग १
... .. .. ..

या लेखात आपण हृदयाचे आपल्या शरीरातील स्थान, त्याची बाह्य व अंतर्गत रचना आणि त्याचे रक्ताभिसरणातील मध्यवर्ती स्थान यांचा आढावा घेऊ.

मूलभूत रचना व कार्य
हृदय आपल्या छातीच्या पिंजऱ्यामध्ये मधोमध वसलेले असून ते थोडेसे डाव्या बाजूस झुकलेले आहे. एखाद्या बलदंड पैलवानाच्या एका मुठीत मावेल एवढाच त्याचा आकार आणि वजनही जेमतेम 300 ग्रॅम.
खालील चित्रात हृदयाची अंतर्गत रचना दाखवलेली आहे. ती आपल्याला ढोबळ मानाने शालेय अभ्यासक्रमातून माहित झालेली असते.

ok

चित्रात दाखवल्यानुसार हृदयाचे चार कप्पे असतात- दोन वरचे तर दोन खालचे. वरच्या दोन कप्प्याना कर्णिका (atria) तर खालच्या दोन कप्प्यांना जवनिका (ventricles) असे म्हणतात.
हृदयाच्या मधोमध एक उभा पडदा असल्यामुळे त्याच्या कप्प्यांची उजवी आणि डावी अशी विभागणी झालेली आहे. अशा प्रकारे या चार कप्प्यांना खालील अधिकृत नावे आहेत :
1. उजवी कर्णिका
2. उजवी जवनिका
3. डावी कर्णिका
4. डावी जवनिका
(टीप : चित्र पाहताना जी गोष्ट वाचकाच्या डावीकडे असते ती प्रत्यक्ष शरीरातील उजवी बाजू असते).

दोन्ही उजवे कप्पे दोन्ही डाव्या संबंधित कप्प्यांपासून मधल्या पडद्यामुळे विभाजित असतात. परंतु कुठल्याही एका बाजूचे एकाखाली एक असलेले कप्पे एकमेकांपासून वेगळे असले तरी एका छिद्राने संपर्कात असतात. त्या छिद्रात विशिष्ट प्रकारच्या झडपा(valves) असतात. हृदयातला रक्तप्रवाह फक्त एकाच दिशेने वाहण्याच्या दृष्टीने या झडपा आवश्यक असतात.

उजव्या जवनिकेपासून फुफ्फुस-रोहिणीचा उगम होतो तर डाव्या जवनिकेपासून महारोहिणीचा (aorta) उगम होतो.

आता हृदय आणि रक्ताभिसरणातील एक मूलभूत गोष्ट लक्षात घ्यावी. संपूर्ण शरीराकडून आलेले ऑक्सिजनन्यून रक्त उजव्या कर्णिकेत महानीलांद्वारे पोहोचते. तिथून ते उजव्या जवनिकेत येते. इथून पुढे ते फुफ्फुस-रोहिणी मार्फत फुफ्फुसांना पाठवले जाते. फुफ्फुसांमध्ये श्वसनामधून मिळालेला ऑक्सिजन पोचलेला असतो. तो इथे आलेल्या वरील रक्ताला समृद्ध करतो. अशा प्रकारे फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजनसमृद्ध झालेले रक्त फुफुसनीलांच्या मार्फत डाव्या कर्णिकेत पोहोचते. तिथून ते डाव्या जवानिकेत उतरते. यानंतर ते महारोहिणीत शिरून पुढे तिच्या शाखांच्याद्वारे सर्व शरीराला पुरवले जाते. दोन्ही जवनिका आणि त्यांच्यापासून निघणाऱ्या मोठ्या रोहिणींच्या उगमापाशी देखील झडपा असतात. त्यांच्यामुळे रक्ताचा प्रवाह एका दिशेने राहतो.

वर वर्णन केलेल्या झडपांचे एक वैशिष्ट्य आहे. हृदयाच्या आकुंचन आणि प्रसारणाबरोबर या झडपांची सतत उघडझाप होत असते. त्यांच्या उघडण्याची प्रक्रिया हळुवार असते, परंतु बंद होताना मात्र त्या झटकन बंद होतात. त्या झटकन बंद झाल्यामुळे काही कंपने निर्माण होतात आणि त्यातूनच हृदयाचे ध्वनी निर्माण होतात. आपण जर छातीवर स्टेथोस्कोप ठेवला तर आपल्याला सातत्याने हृदयाचे दोन ध्वनी एका पाठोपाठ ऐकू येतात. त्यातला पहिला ध्वनी कर्णिका आणि जवनिकेच्या मधल्या झडपांशी संबंधित असतो तर दुसरा ध्वनी जवनिका व मोठ्या रोहिणी यांच्यामधील झडपांशी संबंधित असतो.

हृदय-आवरणे
हृदयाच्या चारही कप्प्यांना आतल्या बाजूने एक पातळसे अस्तर असते त्याला endocardium म्हणतात.
त्याच्यानंतरचा बाहेरील थर म्हणजे हृदयाचे स्नायू अर्थात myocardium. सर्वात बाहेरचा थर म्हणजे pericardium, जी एक दुपदरी पिशवी असते. त्या पिशवीच्या दोन थरांमध्ये एक द्रव पदार्थ असतो, जो वंगणाचे काम करतो आणि हृदयाला बाहेरील धक्क्यांपासून संरक्षण देतो.

हृदयचेतना
हृदयाची धडधड आणि पर्यायाने कार्य सतत चालू राहण्यासाठी एका चेतनेची (impulse) गरज असते. अशी चेतना हृदयातील काही विशेष टिशूत निर्माण होते. अशा टिशू चार ठिकाणी असून त्यातील प्रमुख केंद्राला SA node असे नाव आहे. त्यामध्ये P नावाच्या पेशी असतात ज्यांच्यामधून मूलभूत चेतना निर्माण होते. या केंद्राला हृदयाचा पेसमेकर म्हटले जाते.

हृदयस्पंदन
जेव्हा डावी जवनिका आकुंचन पावते तेव्हा तिच्यातील रक्त महारोहिणी मार्फत शरीरातील सर्व रोहिणींमध्ये एका दाबाने सोडले जाते. यातूनच या रक्तवाहिन्यांमधून सतत एक स्पंदन पुढे जात राहते. यालाच आपण नाडी (pulse) म्हणतो. या नाडीच्या ठोक्यांची विशिष्ट गती असते. प्रौढावस्थेत हे ठोके एका मिनिटाला 70 ते 80 इतके असतात. परंतु आयुष्याच्या विविध टप्प्यांवर या ठोक्यांचे प्रमाण वेगवेगळे आहे ते असे :
• गर्भावस्था 140 ते 150 प्रति मिनिट
• जन्मतः 130 ते 140
• वयाच्या 12व्या वर्षापर्यंत 100 पर्यंत
• प्रौढ व्यक्ती 70 ते 80
• म्हातारपण 100 पर्यंत
पुरुषांशी तुलना करतात स्त्रियांमध्ये या ठोक्यांची गती थोडी जास्त असते. हृदयाला चेतविणाऱ्या काही चेतातंतूच्या टोनमधील फरकामुळे ठोक्यांमध्ये वरीलप्रमाणे गतीबदल होतात.

हृदयाचा रक्तपुरवठा
हृदय जरी संपूर्ण शरीराला रक्त पंप करीत असले तरी खुद्द त्याच्या पेशींना सतत कार्यरत राहण्यासाठी शिस्तबद्ध रक्तपुरवठ्याची गरज असते. हे काम करणाऱ्या रक्तवाहिन्यांना करोनरी असे नाव आहे.

ok

वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे महारोहीणीतून दोन प्रमुख करोनरी रोहिणींचा उगम होतो. त्यांना उजवी आणि डावी अशी नावे आहेत. डाव्या करोनरीला लगेचच दोन उपशाखा फुटतात. या मुख्य करोनरी वाहिन्यांपासून पुढे छोट्याछोट्या शाखा निर्माण होतात आणि त्या खालवर पसरतात.
हृदयस्नायूंना (myocardium) होणाऱ्या रक्तपुरवठ्याचे एक वैशिष्ट्य आहे. या स्नायूंचा प्रमुख रक्तपुरवठा विशिष्ट करोनरी वाहिन्यांमधून होतो. परंतु या संदर्भात माणसामाणसात फरक आहेत ते असे :
1. सुमारे 50% लोकांमध्ये हा रक्तपुरवठा मुख्यत्वे उजव्या करोनरीतून होतो.
2. 30% टक्के लोकांत तो उजव्या आणि डाव्या करोनरीतून समसमान प्रमाणात होतो.
3. 20% लोकांमध्ये तो मुख्यत्वे डाव्या करोनरीतून होतो.

काही रंजक पैलू

आपल्या हृदयाची धडधड (अर्थात दिल की धडकन) अगदी गर्भावस्थेपासून ते थेट मृत्यूपर्यंत आयुष्यभर आपली सतत सोबत करते. रक्ताभिसरणाचे अत्यंत महत्त्वाचे काम करणारे हृदय आयुष्यभर क्षणभर देखील विश्रांती घेत नाही. हे काम करताना त्याच्या स्नायूंना किती आणि कसे कष्ट पडतात याचे थोडे कल्पनारंजन :
१. दर २४ तासांत हृदयाचे तब्बल एक लाख ठोके पडतात.

२. रक्त सतत पंप करीत असताना हृदयाला किती बरे कष्ट पडत असतील, हे समजून घेण्यासाठी आपण एखादा टेनिसचा चेंडू जीव खाऊन पूर्णपणे दाबून पहावा. या कृतीसाठी आपल्या हाताला जेवढे कष्ट पडतात तेवढेच कष्ट हृदय ठोक्यागणिक घेत असते.

३ . हृदयाच्या या सततच्या कार्यातून जबरदस्त ऊर्जानिर्मिती होत असते. एखाद्या संपूर्ण दिवसाची ही ऊर्जा जर मोजली, तर त्या ऊर्जेत एखादा ट्रक 32 किलोमीटर अंतर पळवता येईल. म्हणजे, सरासरी 70 वर्षांच्या एखाद्याच्या आयुष्यात हृदयातून निर्माण झालेल्या ऊर्जेतून हाच ट्रक चक्क पृथ्वी-चंद्र-पृथ्वी इतके अंतर पार करू शकेल !

४ . हृदयाच्या शारीरिक तपासणीमध्ये छातीवर स्टेथोस्कोप ठेवून त्याचे ठोके लक्षपूर्वक ऐकणे डॉक्टरांसाठी खूप महत्त्वपूर्ण असते. या स्टेथोस्कोपचा शोध मोठा रंजक आहे. तो प्रसिद्ध फ्रेंच डॉक्टर Rene Laënnec यांनी लावला. त्याची कथा थोडक्यात पाहू. हा शोध लागण्यापूर्वी डॉक्टर मंडळी गरजेनुसार रुग्णाच्या थेट छातीलाच आपला कान लावून हृदयठोके ऐकत. परंतु तो अनुभव समाधानकारक नसे.
ok

एकदा Laënnec यांच्या दवाखान्यात एक तरुण टंचनिका ‘छातीच्या दुखण्यासाठी’ आली होती. Laënnec यांनी नेहमीप्रमाणे थोडीफार हाताने तपासणी केली परंतु त्यातून चित्र स्पष्ट होणार नव्हते. आता हृदयाचे ठोके ऐकणेही आवश्यक होते. परंतु एकंदरीत त्या मादक सौंदर्यवतीकडे पाहिल्यावर त्यांना तिच्या छातीला कान लावायला भयंकर अडखळल्यासारखे झाले ! मग त्यांनी एक युक्ती केली. पटकन टेबलावरचा कागद उचलून त्याची सुरनळी केली. मग सुरनळीचे एक टोक तिच्या छातीला आणि दुसरे टोक स्वतःच्या कानाला लावले आणि काय आश्चर्य ! त्यांना ठोके चांगल्यापैकी ऐकू आले. पुढे या कल्पनेवर सखोल विचार करून त्यांनी प्राथमिक अवस्थेतील स्टेथोस्कोपचा शोध लावला.
...
असा आहे आपला आयुष्यभराचा हृदयप्रपंच !
******************************************************************************************************************************
क्रमशः
विशेष संदर्भ : https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC1570491/#:~:text=Rene%20The...

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

विअर्ड विक्स's picture

22 Apr 2024 - 10:27 am | विअर्ड विक्स

वाचतोय. पुलेशु .

नवीन मराठी शब्द समजले.वाचत आहे.

सुधीर कांदळकर's picture

23 Apr 2024 - 9:12 pm | सुधीर कांदळकर

पेरिकार्डिअमची रचना वाचून आश्चर्य वाटले. भिजवलेल्या कडधान्याच्या सालीसारखा एक साधा पडदा असावा असा मूर्ख समज होता.

१. आमच्या एका स्नेह्यांचे चिरंजीव एमडी कार्डिओलॉजिस्ट आहेत. त्यांनी मालवणात एक कॉरोनरी व्याधीवरील उपचारांसाठी एक आधुनिक यंत्र आणले आहे. यंत्राचे आणि तंत्राचे नाव विसरलो. या यंत्राच्या शय्येवर रुग्णाला झोपवतात. मग त्याच्या हातापायांना, हवेचे पट्टे बांधतात. हृदय आकुंचित होते तेव्हां पट्ट्यांतल्या हवेचा दाब वाढतो आणि हृदय आकुंचनाला कृत्रिम मदत मिळते. तसेच हृदय प्रसरण पावते तेव्हां पट्ट्यातल्या हवेचा दाब कमी होतो. हे सारे संगणकीय यंत्रणेद्वारा अचूकतेने घडवून आणले जाते.

कांही मिनिटांची या यंत्रातली एक बैठक (सिटींग) आणि अशा कांही बैठकांचे एक उपचारसत्र (कोर्स) आहे.

या विनाऔषध उपचारांमुळे कोरोनरी रोहिण्यांना फाटे (ट्रायब्युटरीज) फुटतात आणि कोरोनरी रोहिणीमधील अडथळ्यांमुळे (ब्लॉकेड्स) होणार्‍या परिणामांची तीव्रता कमी होते असा दावा केला जातो.

उपचारादरम्यान होणार्या जोरदार रक्तप्रवाहामुळे अडथळा निर्माण होण्याचे प्रमाण आणि अडथळ्यांची वाढ होण्याचे प्रमाण कमी होते असाही दावा केला जातो.

एका सत्राचे शुल्क सव्वा लाखाच्या आसपास आहे.

२. उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील विलंबित ख्याल ऐकायची सवय असल्यास निर्माण होणार्‍या संयत मानसिकतेमुळे (माईंडसेट) भावनावेगामुळे निर्माण होणारा हृदयावरील तात्कालिक परिणाम कमी होण्यास मदत होते असे काही तज्ञांचे मत आहे.

वरील दोन मुद्द्यांवरील आपले मत ऐकायला आवडेल

दोन्ही लेख आवडले. सुरेख मुद्देसूद, सचित्र, नेमक्या आणिअचूक भाषेतील लेखाबद्दल अनेक अनेक धन्यवाद.

कुमार१'s picture

24 Apr 2024 - 7:42 am | कुमार१

माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

१. तुम्ही म्हणता ते नवे तंत्र अद्याप माझ्या पाहण्यात नाही. त्याचे नाव समजल्यास काही माहिती काढता येईल. एखाद्या मोठ्या शस्त्रक्रियेनंतर पायाच्या पोटरीतील खोलवर असलेल्या veins साठी न्यूमॅटिक कॉम्प्रेशन नावाचे एक तंत्रज्ञान आहे, ज्यामुळे त्यांच्यात रक्तगुठळ्या होत नाहीत. परंतु त्याची कारणमीमांसा वेगळी आहे.

कुमार१'s picture

24 Apr 2024 - 7:43 am | कुमार१

२. गेल्या दहा पंधरा वर्षांमध्ये विविध दीर्घकालीन आजारांमध्ये संगीतोपचार म्हणून या विषयावर संशोधन होत आहे. तरी पण ते अजूनही प्राथमिक अवस्थेतच आहे. रुग्णाला ज्या प्रकारचे संगीत मनापासून आवडते तेच संगीत ऐकल्यास काही फायदा होतो.

हृदयविकाराच्या संदर्भात ताणतणाव कमी करण्यासाठी जे काही संगीतोपचार प्रयोग झालेले आहेत त्यातले बरेचसे रुग्णांचे स्वयंनिवेदन किंवा निरीक्षणात्मक या प्रकारचे आहेत. अशा प्रयोगांमध्ये व्यक्तिगत biasचा मोठा प्रभाव असतो.

जेव्हा मोठ्या प्रमाणावर शास्त्रशुद्ध (R.C.Trials) अभ्यास होतील तेव्हाच या विषयावर काही शास्त्रीय मत देता येईल.

सुबोध खरे's picture

26 Apr 2024 - 7:33 pm | सुबोध खरे

Enhanced External Counterpulsation (EECP)

https://my.clevelandclinic.org/health/treatments/16949-enhanced-external...

हे आपण म्हणता आहात ते यंत्र असावे.

याचा उपयोग सरसकट सर्वांसाठी नसून साधारणपणे ज्यांना अँजिओप्लास्टी किंवा शल्यक्रिया करणे शक्य नाही अशांसाठी आहे.

अर्थात कोणता उपचार करायचा हा निर्णय तज्ज्ञ डॉक्टरांचा असतो

सुधीर कांदळकर's picture

28 Apr 2024 - 7:26 pm | सुधीर कांदळकर

EECP हे मी विसरलो होतो. मी उल्लेख केलेल्या डॉक्टरसाहेबांनी २०१५-१६ साली हे ८०-८५ लाखांचे यंत्र घ्यावयाचे ठरविले तेव्हां त्यांच्या तीर्थरूपांनी या यंत्राचे माहितीपत्रक माझ्याकडे आणले. त्यातील डॉक्टरी शब्दांचे अर्थ जाणून घेण्यासाठी. आपला डॉक्टर मुलगा यंत्रनिर्मात्याकडून फसविला तर जात नाहींना या काळजीपोटी शाळेचे मुख्याध्यापक असलेला हा पिता माझ्याकडे आला होता.

माझ्या तुटपुंज्या ज्ञानाच्या आधारे सारे ठीक दिसत होते. माझ्या मतामुळे त्या काळजीत पडलेल्या पित्याचा जीव भांड्यात पडला होता.

कांही मिनिटांची या यंत्रातली एक बैठक (सिटींग) आणि अशा कांही बैठकांचे एक उपचारसत्र (कोर्स) आहे.

या विनाऔषध उपचारांमुळे कोरोनरी रोहिण्यांना फाटे (ट्रायब्युटरीज) फुटतात आणि कोरोनरी रोहिणीमधील अडथळ्यांमुळे (ब्लॉकेड्स) होणार्‍या परिणामांची तीव्रता कमी होते असा दावा केला जातो.

कॉरोनरी आर्टरी ब्लॉकेड होण्याची शक्यता असलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी हा उपचार उपकारक असे त्या माहितीपत्रकांत म्हटलेले मला अजूनही आठवते आहे. माझ्या सौ. (वय वर्षे ६५) ला हल्ली डोंगर चढतांना थोडासा त्रास जाणवतो आहे. उपचार करणारे मान्यवर विद्यापीठाचे मान्यवर एम डी हृदयरोगत्ज्ञ डॉक्टर. शिवाय हे डॉक्टरसाहेब उच्च मानवी मूल्ये जपणारे एक श्रेष्ठ व्यक्ती आहेत. तेव्हां मी या उपचाराचे एक सत्र तिला देण्याच्या विचारात होतो. आता तो विचार पक्का केला आहे. अर्थातच माझ्या जबाबदारीवर.

डॉ. खरे साहेबांना अनेक अनेक धन्यवाद. हे प्रबोधन ज्या मूळ लेखमालेमुळे होते आहे. त्या लेखक डॉक्टरसाहेबांना देखील अनेक अनेक धन्यवाद.

कुमार१'s picture

29 Apr 2024 - 7:48 am | कुमार१

अभिप्राय व पूरक माहितीबद्दल सर्वांना धन्यवाद.

भाग-3 इथे