स्वेच्छामरणाच्या वैद्यकीय पद्धती

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
10 Mar 2024 - 9:33 pm

काही दिवसांपूर्वी नेदरलँडचे माजी पंतप्रधान ड्राइस व्हेन एग्त आणि त्यांच्या पत्नी यांनी त्यांच्या देशात कायद्याने मंजूर असलेले स्वेच्छामरण वयाच्या 93 व्या वर्षी स्वीकारले. अधूनमधून अशा बातम्या वाचनात येतात. आजच्या घडीला जगभरात सुमारे डझनभर देशांमध्ये या प्रकारच्या मरणाला कायदेशीर मान्यता आहे. त्यापैकी नेदरलँडस, बेल्जियम, कॅनडा आणि स्वित्झर्लंड ही आघाडीची मंडळी आहेत. असा कायदा अन्यत्रही असावा या उद्देशाने विविध देशांमध्ये या विषयावर चर्चा आणि विचारमंथन होत असते. सध्या या संदर्भात युकेमध्येही जोरदार चर्चा, सर्वेक्षण आणि विचारमंथन चालू आहे आणि या विषयावर संसदीय मत घ्यावे म्हणून सह्यांची मोहीम राबवली जात आहे.

गेल्या महिन्यात या विषयावरील “आता वेळ झाली” हा मराठी चित्रपट प्रदर्शित झालाय. त्या निमित्ताने त्यातील प्रमुख भूमिका करणाऱ्या दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी या ज्येष्ठ कलाकारांची मुलाखत प्रसारित झालेली आहे. मुलाखत चांगली असून त्यामध्ये दोघांनीही काही चांगले मुद्दे मांडलेत. स्वेच्छामरण (voluntary euthanasia) हा विषय समाजाने निषिद्ध न मानता त्यावर खुलेपणाने चर्चा करावी असा त्यांच्या चर्चेचा सूर आहे. सत्यघटनेवर आधारित असलेल्या त्या चित्रपटात, ‘

धडधाकट असलेल्या माणसालाही स्वेच्छामरणाचा अधिकार असायला हवा’

ही मागणी अधोरेखित केलेली आहे.

या विषयाला वैद्यकीय, कायदेशीर, सामाजिक, नैतिक आणि भावनिक असे अनेक पैलू आहेत. त्या दृष्टिने या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. या लेखात विषयाची फक्त वैद्यकीय बाजू मांडत आहे.

(मरणासन्न अवस्थेत असलेल्या रुग्णांच्या बाबतीत त्यांची स्वतची ‘त्या वेळेस’ परवानगी हा प्रश्न उपस्थित होत नाही. अशा प्रकरणांमध्ये (अन्य परवानगीने) त्या रुग्णांचे जीवरक्षक उपचार थांबवून त्यांचा मृत्यू जवळ आणणे याला Non-voluntary euthanasia असे म्हणतात. त्या प्रकारची कायदेशीर सशर्त परवानगी बऱ्याच देशांमध्ये आहे. हा प्रकार लेखात घेतलेला नाही कारण त्यावर पूर्वी अनेकदा चर्चा झालेल्या आहेत).

ज्या देशांमध्ये स्वेच्छामरणाला कायदेशीर मान्यता आहे तिथे त्यासाठी संबंधित व्यक्तीच्या निवडीचे काही वैद्यकीय निकष ठरवलेले आहेत ते असे :
1. संबंधित व्यक्तीचे वय किमान 18 वर्षे पूर्ण पाहिजे
2. ती व्यक्ती स्वतःच्या तब्येतीविषयी निर्णय घेण्यास सक्षम असावी
3. त्या व्यक्तीला कुठल्यातरी प्रकारचा बरा न होणारा वेदनामय दुर्धर आजार झालेला असावा.

संबंधित प्रत्येक देशातील कायद्यांमध्ये वरील निकषांमध्ये थोडेफार फरक/शिथिलता असू शकतात. परंतु त्याच्या खोलात आपण शिरणार नाही. असे मरण आणण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वैद्यकीय पद्धतींचा औषधांसह तपशील मांडणे हा या लेखाचा उद्देश आहे.

महत्त्वाची टीप
: जे वाचक या विषयाबाबत अत्यंत संवेदनशील आहेत किंवा ज्यांना ही संकल्पनाही नकोशी वाटते, त्यांनी पुढील लेख वाचण्यापूर्वी पूर्ण विचार करावा. अन्यथा इथूनच माघार घेणे उत्तम.
..
..
..
..
स्वेच्छामरणाची कार्यवाही करण्याच्या दोन पद्धती आहेत :
1. वैद्यकीय सल्ल्यानुसार केलेली आत्महत्या (physician-assisted suicide), आणि
2. डॉक्टरांनी औषधी इंजेक्शन देऊन घडवलेला मृत्यू (euthanasia).

मूलतः या दोन्ही पद्धतीत आधुनिक वैद्यकातील औषधांच्या मोठ्या डोसचा वापर केला जातो (ती ‘औषधे’च आहेत, विषारी पदार्थ नव्हेत). या औषधांमुळे संबंधित व्यक्तीला मृत्यू लवकरात लवकर आणि वेदनारहित यावा अशी अपेक्षा असते. परंतु वास्तवात वेगवेगळे अनुभव येऊ शकतात. काही रुग्णांना या प्रक्रियेदरम्यान बराच त्रास होऊ शकतो. या सगळ्याची कल्पना रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना दिली जाते आणि त्यानंतरच त्यांची मरणपद्धतीच्या प्रकारासह परवानगी घेतली जाते.
आता दोन्ही पद्धती विस्ताराने पाहू.

• वैद्यकीय सल्ल्यानुसार केलेली आत्महत्या
यासाठी ज्या औषधांचे पर्याय उपलब्ध आहेत त्यांची आता माहिती घेऊ. औषधांच्या गटाचे नाव (व कंसात त्याचे एखादे उदाहरण) आणि त्याचे गुणधर्म अशा पद्धतीने माहिती देतो.
1. Sedatives (Chloral Hydrate) : मेंदूला गुंगी आणून झोप आणणारे हे औषध आहे.
2. Barbiturates (Pentobarbital) : ही औषधे मेंदूचा संवेदना स्वीकारणारा भाग बधीर करतात आणि त्यानंतर गुंगी आणि झोप आणतात.

3. Benzodiazepines (diazepam) : ही मन शांत करून गुंगी आणतात.
4. Opioids (morphine) : ही वेदनाशामक, गुंगी आणणारी आणि श्वसनक्रिया मंद करणारी असतात.

5. Cardiotoxic Agents (digoxin) : मुळात हृदय दुर्बलतेसाठी दिले जाणारे हे औषध अतिरिक्त डोसमध्ये हृदयाचे आकुंचन थांबवते आणि हृदयक्रिया बंद करू शकते.
वरील औषधांपैकी कोणती वापरायची त्यामध्ये देशागणिक काही फरक आहेत. फक्त एकाच औषधाऐवजी खालील प्रकारच्या संयुक्त प्रणाली देखील वापरल्या जातात :
1. ‘DDMA’ (diazepam, digoxin, morphine and amitriptyline) किंवा
2. ‘DDMP’ (diazepam, digoxin, morphine and propranolol).

वरील १ मधील amitriptyline हे नैराश्यविरोधी औषध आहे
आणि
२ मधील propranolol हे beta blocker या प्रकारचे औषध असून एरवी उच्चरक्तदाब आणि हृदयविकारांसाठी उपचार म्हणून वापरले जाते. तसेच घबराट (panic) कमी करणे हा त्याचा गुणधर्म आहे.

रुग्णांचे प्रत्यक्ष अनुभव
वरील प्रकारची औषधे घेतल्यानंतर मृत्यू लवकरात लवकर आणि अन्य कुठल्याही शारीरिक कटकटी व त्रास निर्माण न होता यावा अशी अपेक्षा असते. परंतु वास्तवात तसे होतेच असे नाही. या बाबतीत बरीच व्यक्तीभिन्नता आढळते. मुळात असे औषध खूप मोठ्या डोसमध्ये तोंडाने घ्यायचे असल्याने ते घेणे हे सुद्धा एक आव्हान असते. उदाहरण द्यायचे झाल्यास barbiturate या औषधाच्या १०० गोळ्या चूर्ण स्वरूपात करून त्या एखाद्या गोड द्रवात मिसळून लवकरात लवकर पिऊन टाकायच्या असतात. असले हे अघोरी मिश्रण पिताना जबरदस्त मळमळ आणि उलटीची भावना होतेच. त्यामुळे अनेकांना असा प्रकार केल्यानंतर अन्ननलिकेतील जळजळ, मळमळ व आतडी पिळवटून टाकणारी उलटी असे त्रास होतात. असा त्रास फारच झाल्यास शरीरात जलन्यूनता होते आणि या सगळ्याचा त्या औषधाच्या शोषणावर परिणाम होतो. कित्येकदा या औषधाच्या प्रभावाखाली बेशुद्ध अवस्थेत जात असलेला रुग्ण पुन्हा एकदा शुद्धीवर येऊ शकतो. म्हणून असे औषध देण्यापूर्वी उलटी-प्रतिबंधक औषधही द्यावे लागते.

ज्यांच्या बाबतीत उलट्या वगैरे न होता या मिश्रणाचे शोषण व्यवस्थित होते त्यांचा मृत्यू होण्यास लागणारा सरासरी वेळ एक ते दोन तास असतो. परंतु काहींच्या बाबतीत ही वेळ जवळजवळ साडेचार दिवसांपर्यंत लांबलेली आहे ! ही सर्व प्रक्रिया रुग्णाच्या घरी त्याच्या नातेवाईकांच्या उपस्थितीतच होत असते. जर तो मृत्यू बऱ्याच त्रासदायक पद्धतीने झाल्यास उपस्थितांनाही मनोवेदना होतात.
त्यामुळे या प्रकारच्या मृत्यूप्रक्रियेपूर्वी अजून एक खबरदारी डॉक्टरांना घ्यावी लागते. जर का तोंडाने गोळ्या घेऊन मृत्यू होण्यास खूपच वेळ होऊ लागला आणि रुग्णाची तडफड होऊ लागली तर अशा वेळेस डॉक्टरांनी मध्यस्थी करून इंजेक्शनच्या मदतीने मृत्यू लवकर आणावा लागतो. या प्रक्रियाबदलाची लेखी परवानगी रुग्णाने तोंडी औषध घेण्यापूर्वीच देणे महत्त्वाचे ठरते.

तोंडाने स्वतः मृत्यूचे औषध घेण्याच्या पद्धतीच्या मर्यादा आणि त्यातले संभाव्य त्रास/वेदना वरील विवेचनातून लक्षात येतील. ज्या इच्छुकांच्या बाबतीत असे त्रास होतात त्यांच्या नातेवाईकांना खालील प्रश्न नक्की पडतात :
१. “अरेरे ! हाच का तो शांतपणे आणि सन्मानाने मिळणारा मृत्यू?”
२. “याचसाठी त्या कुटुंबाने केला होता का सारा कायदेशीर खटाटोप?”

औषधी इंजेक्शन देऊन घडवलेला मृत्यू
या प्रकारात वरती उल्लेख केलेल्या सर्व औषधी इंजेक्शनसचा समावेश आहेच. त्या व्यतिरिक्त अन्य काही औषधे वापरली जातात :
• भूल द्यायची (बेशुद्ध करणारी) औषधे (Propofol)
• स्नायू गलितगात्र करणारी औषधे (Pancuronium)
• हृदयक्रिया बंद पाडणारी औषधे (Potassium chloride)

ok
या पद्धतीतही निरनिराळी औषधांची मिश्रणे - अर्थातच इंजेक्शनच्या स्वरूपात- वापरली जातात. सर्वसाधारण पद्धत अशी असते :
१. सर्वप्रथम चिंतामुक्तीचे औषध दिले जाते
२. त्यानंतर बेशुद्ध करणारे औषध देतात.
३. यानंतर शरीरातील हालचालींशी संबंधित सर्व स्नायू गलितगात्र (paralyze) करणारे औषध देतात. त्यामुळे श्वसनाचे स्नायू सुद्धा दुर्बल होतात. तसेच मोठ्या स्नायूंचे झटके येत नाहीत. असे झटके येताना न दिसणे हे नातेवाईकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.
४. गरजेनुसार हृदयक्रिया बंद पडणारे औषधही दिले जाते.

इंजेक्शनद्वारा आणलेला मृत्यू हा तोंडी गोळ्या घेण्याच्या पद्धतीपेक्षा अर्थातच सुलभ आहे. तरीसुद्धा या संदर्भात काही वादग्रस्त मुद्दे उपस्थित केलेले आहेत. इंजेक्शनद्वारा द्यायच्या औषधांचे डोस म्हणावे तितके प्रमाणित नाहीत. त्यामध्ये डॉक्टरांच्या अनुभवानुसार काही फरक होऊ शकतात. जर का या पद्धतीने इंजेक्शन देताना त्या व्यक्तीची बेशुद्धी पुरेशी नसेल तर तिला श्वास कोंडल्यावर किंवा पाण्यात बुडल्यावर जशा वेदना होतात त्या प्रकारचा त्रास होऊ शकतो. म्हणजेच या पद्धतीने होणारा सर्वांचाच मृत्यू अगदी शांतपणे होईल असे नाही. या लेखाच्या मुख्य संदर्भातील खालील वाक्य त्या दृष्टीने बोलके आहे :

While assisted suicide and euthanasia is often portrayed as a ‘Hollywood’ style peaceful and painless death, evidence from jurisdictions where the practice is legal reveals that this is not always the case.

धोरणातील त्रुटी आणि विचाराधीन मुद्दे
सामाजिक पातळीवर पाहता स्वेच्छामरण हा अतिशय संवेदनाशील आणि वादग्रस्त विषय आहे. सामान्यजनांच्या मनात यासंबंधी एक बाळबोध असा गैरसमज आढळतो तो म्हणजे, संबंधित व्यक्तीला एक ‘घातक’ इंजेक्शन दिल्यावर पाच दहा मिनिटात सारे काही शांत शांत होते आणि मृत्यू येतो. परंतु वास्तव काय आहे ते आपण वर पाहिले. या संदर्भात आतापर्यंतच्या वैद्यकीय अनुभवावरून खालील मुद्दे लक्षात आलेले असून त्यावर भविष्यात गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे :

१. मृत्यू येण्यासाठी जी औषधे वापरली जातात त्यांच्या डोसबाबत एकवाक्यता नाही. तसेच प्रत्येक देशागणिक औषधांच्या मिश्रणामध्येही (cocktails) फरक आहे.

२. ज्या प्रकरणांमध्ये डॉक्टरांनी दिलेल्या इंजेक्शनद्वारा मृत्यू घडवलेले आहेत त्या सर्व प्रकरणांच्या अधिकृत नोंदी उपलब्ध नाहीत. ज्याप्रमाणे नेहमीच्या वैद्यकीय संशोधनाची विविध विज्ञानपत्रिकांमधून जाहीरपणे चर्चा होते, तसे काही या घटनांच्या संदर्भात होत नाही. परिणामी अशा मरणघटनांचा अभ्यासाला आवश्यक असलेला विदा फारसा उपलब्ध नाही.

३. या संदर्भातील वैद्यकीय धोरणांचे नियमन करणारी सरकारी समिती/यंत्रणा देखील सक्षम नाही. त्यामुळे निरनिराळ्या वैद्यकीय संघटनांच्या मतानुसार संबंधित औषधांची निवड आणि डोस ठरवले जातात.

४. या मरण प्रक्रियेदरम्यान जर रुग्णाला अत्यंतिक त्रास होऊ लागला किंवा त्याची तडफड दिसू लागली तर डॉक्टरांनी मध्येच (जीवरक्षक) हस्तक्षेप करायचा की नाही यासंबंधी सुद्धा मार्गदर्शक तत्वे असण्याची आवश्यकता आहे.

५. मानवी शरीराच्या परिपूर्ण अभ्यासामध्ये मरणोत्तर शवविच्छेदन हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. स्वेच्छामरण स्वीकारलेल्या व्यक्तींची या प्रकारे मरणोत्तर तपासणी करण्यासंबंधी निश्चित अशी नियमावली आखली गेली पाहिजे. अशा प्रकारच्या अभ्यासातून भविष्यातील या प्रकारचे मृत्यू अधिक सुखावह करता येतील.


समारोप

लेखाच्या प्रास्ताविकात म्हटल्यानुसार या विषयाला अनेक महत्त्वाच्या बाजू आहेत. त्यापैकी वैद्यकीय पैलू या लेखातून सादर केले. या विषयावरील आतापर्यंतच्या वैद्यकीय अनुभवातून लक्षात आलेल्या अधिक/उणे अशा दोन्ही बाजू वाचकांसमोर ठेवल्यात. या वास्तवातून कोणताही गैरसमज किंवा भीती पसरू नये अशी आशा वाटते; तसा अजिबात उद्देश नाही. विषयाच्या कायदेशीर बाजूबाबत कायदा अभ्यासकांनी स्वतंत्रपणे सविस्तर विवेचन केल्यास ते उपयुक्त ठरेल. या व्यतिरिक्त या संवेदनशील विषयाच्या सामाजिक, नैतिक आणि भावनिक बाजूंसंबंधी मते व्यक्त व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य लोकशाहीतील प्रत्येक नागरिकाला आहे.
**************************************************************************
संदर्भ :
१.

२.

३. विविध वैद्यकीय पाठ्यपुस्तके

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

11 Mar 2024 - 4:04 am | चित्रगुप्त

या अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणे ही काळाची गरज आहे. त्याची सुरुवात केलीत हे फार चांगले झाले.
-- 'मेडिकल विल' वा तत्सम नावाचा एक फॉर्म भरून द्यायचा असतो असे ऐकले आहे. त्याबद्दलही लिहावे. अनेक आभार.

कुमार१'s picture

11 Mar 2024 - 8:49 am | कुमार१

'मेडिकल विल'

यासंबंधी मूलभूत माहिती इथे आहे. 'पॅसिव्ह' प्रकाराबाबत (मला अमुकतमुक उपचार देऊ नयेत, वगैरे)) पूर्वी देखील आपल्याकडे भरपूर चर्चा झाल्या असल्याने सध्या तरी मी तो विषय घ्यायचा टाळले आहे.

' ऍक्टिव्ह' हा खऱ्या अर्थाने नवीन विषय आहे.

‘मृत्यूविषयीचे इच्छापत्र’ या विषयावर डॉ. निखिल दातार यांचा लेख आजच्या (17 मार्च) मटा संवाद पुरवणीमध्ये आहे.
त्यांनी पीआयएल/3/2024 ही जनहित याचिका न्यायालयात दाखल केली होती. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जी उपाययोजना सुचवली आहे त्याचा ऊहापोह लेखात आहे.
जरूर वाचा

विषय अत्यंत महत्वाचा आहे.

जिथे उदाहरणार्थ शिक्षा म्हणून इंजेक्शन द्वारे मृत्यू घडवून आणला जातो तिथे देखील खुद्द डॉक्टर्स स्वहस्ते असे इंजेक्शन देत नाहीत, तुरुंगातील अधिकाऱ्यांना हे प्रशिक्षण दिले जाते असे वाचले होते. दुवे शोधावे लागतील.

कायदेशीर शिक्षा म्हणून देण्याच्या मृत्यूबाबतही जर डॉक्टर स्वहस्ते असे " कोणाचेही जीवन संपवू " शकत नसतील तर ऐच्छिक मरणा बाबत कसे तयार होतात?

याही पुढे जाऊन, जे तुरुंग अधिकारी अपराधी कैद्यांना अशी इंजेक्शन्स देतात तेही कोणी एक व्यक्ती थेट हाताने इंजेक्शन देत नाही. तीन वेगवेगळी बटणे आणि तीन ठिकाणांहून औषध रिलीज होण्याची सोय. त्यापैकी एकातून random पद्धतीने डोस रिलीज होणे असे असते. हेही वाचलेले आहे. याचा उद्देश असा की नक्की कोणाच्या हाताने तो डोस दिला गेला हे अज्ञात राहून त्या व्यक्तींना अपराधी भाव कमी होण्यास मदत.

एकूण काय तर यात मृत्यू देणाऱ्यांच्या देखील भावना गुंतलेल्या असतात, वैद्यकीय डॉक्टर तर त्यांच्या प्रतिज्ञेने बांधलेले असतात. त्यांच्या दृष्टीने देखील थोडे विवेचन यावे. अर्थात लेखाचा स्कोप सुरुवातीलाच तुम्ही स्पष्ट केलाय याची जाणीव आहेच..

कुमार१'s picture

11 Mar 2024 - 8:55 am | कुमार१

चांगली पूरक माहिती दिलीत. <blockquote>
शिक्षा म्हणून इंजेक्शन द्वारे मृत्यू घडवून आणला जातो तिथे देखील खुद्द डॉक्टर्स स्वहस्ते असे इंजेक्शन देत नाहीत</blockquote>

परंतु नुकत्याच घडलेल्या <a href="https://www.cbsnews.com/news/thomas-creech-execution-delayed-idaho-seria...या प्रकरणात</a> मात्र खुद्द डॉक्टरांच्या चमूनेच दहा वेळा (अयशस्वी) प्रयत्न केल्याचा उल्लेख आहे.

28 फेब्रुवारी 2024 ची ही बातमी सर्वत्र प्रसिद्ध झाली आहे. तिचा<strong> सारांश :</strong>

अमेरिकेतील थॉमस क्रीक याने पाच खून केलेले असून त्याला मृत्यूची शिक्षा जाहीर झालेली आहे. परंतु तिची अंमलबजावणी करताना, <strong>डॉक्टरांना त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी दहा वेळा प्रयत्न करून सुद्धा</strong> त्याची रक्तवाहिनी सापडली नाही. जर ती सापडली असती तर त्यातून pentobarbital चे इंजेक्शन देऊन त्याला मृत्यू आणला जाणार होता.

वरील घटनेमुळे तूर्त ती शिक्षा स्थगित केलेली आहे.

डॉक्टर्स हा शब्द रूढ म्हणून वापरला असेल का? प्रत्यक्षात वैद्यकीय अधिकारी (तुरुंग किंवा कायदा व्यवस्थापनपैकी) असतील का?

प्रत्येक देशागणिक वेगळे असू शकेल. पण एक डॉक्टर म्हणून रुग्णांस मृत्यू देणे याबद्दल काय मते असतात ?

कुमार१'s picture

11 Mar 2024 - 11:43 am | कुमार१

या लेखाचा मुख्य संदर्भ पहिला असता त्यात असे म्हटलेले आहे :

Clinicians throughout the world are prescribing and administering a wide variety of lethal drug combinations for patients who request an ‘assisted death’.

माझ्या एकंदरीत वाचनावरून मला असे वाटते की त्या देशांमध्ये डॉक्टरच इंजेक्शन द्यायचे काम करीत आहेत. त्या संदर्भात पुढे असेही म्हटलेले आहे की, अशा ज्या घटना होतात त्या सर्वांचेच दस्तावेजीकरण होत नाही. किंबहुना या विषयावर वैद्यकीय परिषदांमध्येही खुली चर्चा टाळली जाते.

कुमार१'s picture

11 Mar 2024 - 11:49 am | कुमार१

एक डॉक्टर म्हणून रुग्णांस मृत्यू देणे याबद्दल काय मते ?

मतभेद आहेतच !

या संदर्भात युकेमध्येही जोरदार चर्चा, सर्वेक्षण आणि विचारमंथन चालू आहे. या विषयावर संसदीय मत घ्यावे म्हणून सह्यांची मोहीम राबवली जात आहे

खुद्द डॉक्टरांच्या संघटनांमध्ये या विषयावर मतभेद आहेत. ब्रिटिश वैद्यकीय संघटनेने या संदर्भात तटस्थ राहण्याचे ठरवलेले आहे.
ज्या शाखांमधील डॉक्टरांनी याला विरोध केलेला आहे त्यांच्या मते खूप आजारी असलेल्या रुग्णांना त्यांच्याकडे उत्तम दर्जाची palliative सेवा मिळत असल्यामुळे इच्छामरणाची काही आवश्यकता नाही.

समजा, तिथे भविष्यात हा कायदा झाला तरी एक गोष्ट स्पष्ट आहे. मरण घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये डॉक्टरचा सहभाग हा ऐच्छिक राहणार आहे. ज्या डॉक्टरांना त्यात सहभागी व्हायचे नाही त्यांच्यावर कुठलीही सक्ती केली जाणार नाही.

. ज्या डॉक्टरांना त्यात सहभागी व्हायचे नाही त्यांच्यावर कुठलीही सक्ती केली जाणार नाही.

जर हे डॉक्टर्स तुरुंग अधिकारी किंवा कर्मचारी नसतील तर या कामाबद्दल डॉक्टर्सना काही आर्थिक मोबदला दिला जात असावा का?

डॉक्टर्सनी अशा कामासाठी आर्थिक मोबदला घ्यावा का, आणि तसे असल्यास इतर वैद्यकीय सेवांपेक्षा खूप अधिक मोबदला देऊन डॉक्टर्सना त्याकडे आकर्षित करणे असे घडल्यास त्याला थेट सक्ती नसली तरी इन्फ्लुएन्स करणे असे म्हणता येईल का? खूपच तात्विक प्रश्न वाटत असले तरी ते प्रत्यक्षात येऊ घातले आहेत.

कुमार१'s picture

3 Apr 2024 - 1:40 pm | कुमार१

या कामाबद्दल डॉक्टर्सना काही आर्थिक मोबदला दिला जात असावा का?

प्रश्न महत्त्वाचा आहे खरा.
यासंबंधी जी काही शासकीय माहिती असेल ती बहुता गुप्तच राखली जात असणार; कळणे अवघड आ.
हे या लेखासाठी जो मुख्य संदर्भ वापरला आहे त्यात त्या लेखकांनी असे म्हटले आहे की, मृत्यूच्या प्रत्यक्ष प्रक्रियेची माहिती सुद्धा त्यांनी माहितीतल्या डॉक्टरांशी खाजगी ई-मेल संपर्क साधून मिळवली आहे.

या संदर्भात बऱ्याच गोष्टींची जाहीर वाच्यता होणार नाही.

संवेदनशीलतेचे उदाहरण _/\_

त्यापैकी एकातून random पद्धतीने डोस रिलीज होणे असे असते. हेही वाचलेले आहे. याचा उद्देश असा की नक्की कोणाच्या हाताने तो डोस दिला गेला हे अज्ञात राहून त्या व्यक्तींना अपराधी भाव कमी होण्यास मदत.

मुक्त विहारि's picture

11 Mar 2024 - 1:08 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद...

रीडर's picture

12 Mar 2024 - 2:54 am | रीडर

काही ठिकाणी पूर्ण सेटअप डॉक्टर आणि technicians नी करून दिल्यावर पेशंटनी स्वतः डोस iv डोस सुरू करायचा अशी पद्धत असल्याचं वाचलं..

कुमार१'s picture

12 Mar 2024 - 8:11 am | कुमार१

चांगली माहिती दिलीत.


या लेखात विषयाची फक्त वैद्यकीय बाजू मांडत आहे.

असे आपण नमूद केलेले आहे. परंतु वैद्यकीय उपायांना इतर उपायांची जोड देण्याचा पण विचार झाला पाहिजे. अर्थातच तज्ञांकडूनच. आपण खालील उपाययोजना दिलेली आहेच.
१. सर्वप्रथम चिंतामुक्तीचे औषध दिले जाते
२. त्यानंतर बेशुद्ध करणारे औषध देतात.
३. यानंतर शरीरातील हालचालींशी संबंधित सर्व स्नायू गलितगात्र (paralyze) करणारे औषध देतात. त्यामुळे श्वसनाचे स्नायू सुद्धा दुर्बल होतात. तसेच मोठ्या स्नायूंचे झटके येत नाहीत. असे झटके येताना न दिसणे हे नातेवाईकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.
४. गरजेनुसार हृदयक्रिया बंद पडणारे औषधही दिले जाते.

ही पद्धत शास्त्रीय तसेच संवेदनाशील तज्ञांनी बनविली आहे यात जराही शंका नाही.

तरीही मृत्यू न येण्याची शक्यता ही समस्या आपण पुढे मांडली आहे. मृत्यूदर्शनेच्छु नातेवाईक व्यक्ती देखील मानसिक्दृष्ट्या सक्षम असतीलच असे नाही त्यामुळे मृत्यूघटकेच्या वेळी कोणाही नातेवाईकांस त्या व्यक्तीचे दर्शन होऊं नये. मृत्यूस विलंब होत असल्यास योग्य तज्ञांकडून उच्च दाब वीज झटका याचाही अंतर्भाव व्हावा.

अशी माझी हिंस्त्र वाटणारी नम्र सूचना आहे.

मृत्यूनंतरचे वैद्यकीय तसेच कायदेशीर सोपस्कार योग्यच दिसताहेत.

माझ्या माहितीप्रमाणे सावरकरांनी मृत्यूसमयी कांही दिवस अन्न आणि पाणी यांचाही संपूर्ण त्याग केला होता. त्यानंतर दोनचार दिवसांतच त्यांना मृत्यू आला होता. माझ्यासारख्या सध्या सत्तरीनंतरही निरोगी असणार्‍या व्यक्तीने मृत्यू येण्याची इच्छा असल्यास हा प्रयोग करण्यास हरकत नाही. फक्त निकटवर्तियांनी व्यक्तीस इस्पितळात न हलवणे आवश्यक आहे. माझ्या मते औषधे, अन्न आणि पाणी यांचा संपूर्ण त्याग करणे हा प्रत्येक वयस्कर व्यक्तीचा हक्क आहे.

असो. एका संवेदनाशील विषयावरील उत्कृष्ट लेखाबद्दल अनेक, अनेक धन्यवाद.

कुमार१'s picture

12 Mar 2024 - 6:19 pm | कुमार१

विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
....

मृत्यूस विलंब होत असल्यास योग्य तज्ञांकडून उच्च दाब वीज झटका याचाही अंतर्भाव व्हावा.

उच्चदाब विजेच्या झटक्याने येणारा मृत्यू हा अत्यंत वेदनादायी असतो. त्या प्रक्रियेदरम्यान शरीराच्या स्नायूंची भयंकर (violent) आकुंचने होतात तसेच अंतर्गत इंद्रियांना गंभीर इजा आणि उष्णतेचा दाह होतो. ही पद्धत मुळातच अमानवी मानली गेलेली आहे.

अगदी मृत्यूदंडाच्या बाबतीतही विकीनोंदीनुसार ती अमेरिका व फिलिपिन्स याच देशांमध्ये होती/आहे. तूर्त अमेरिकेतही फक्त चार राज्यांनीच ती टिकवली आहे. अन्यत्र औषधी इंजेक्शनचाच वापर केला जातो.

कुमार१'s picture

12 Mar 2024 - 6:23 pm | कुमार१

कांही दिवस अन्न आणि पाणी यांचाही संपूर्ण त्याग

संथारा/ प्रायोपवेशन हे मरणाचे पारंपरिक घरगुती उपाय असून ते सुरू करताना डॉ चा संबंध येत नाही. ते इच्छेनुसार कोणालाही करता येतील.

रीडर's picture

12 Mar 2024 - 6:34 pm | रीडर

पूर्ण बेशुद्धता येणे ही दुसरी स्टेप फारच महत्वाची.

कर्नलतपस्वी's picture

12 Mar 2024 - 7:38 pm | कर्नलतपस्वी

टर्मिनल केअर केसेस, व्हेजीटेटीव अवस्थेतील रुग्ण, वैद्यकीय उपचारा पलीकडे गेलेले रुग्ण यांची व नातेवाईकांची अवस्था दयनीय असते. भावनेचे बंध तुटत नाही.वैद्यकीय खर्च झेपत नाही. अशावेळेस इच्छामरण हाच एक उपाय. व्हेन्टी वर किती दिवस ठेवायचे हा निर्णय घेणे फारच आवघड असतो. पण तो योग्यवेळी घेणे सर्वांच्याच सोयीचे ठरते.

बरेच निरोगी परंतू आपला काहीच उपयोग नाही,मुलांवर आपलं ओझं,आपल्यामुळे त्यांना उमेदीच्या दिवसांचा उपभोग घेता येत नाही असेही काही वरिष्ठ नागरीक नैराश्याने ग्रासलेले किवां नाही सुद्धा, पण आता पुरे झाले असा विचार.

एकुण काय एन केन प्रकारेण शेवटचा दिवस गोड व्हावा अशी इच्छा सर्वांचीच असते.
इच्छामरण पत्करलेला जीव निघून जातो पण मागे रहाणार्यांनां आयुष्यभर बोचणी लागून रहाते. या साठी मनाची तयारी असावी लागते.

इच्छामरण हा शेवटचा मार्ग असावा.

खुशाल गळता गळा दळांनो
हसत सरा माझीया क्षणांनो.....

नेहेमीसारखाच माहितीपूर्ण आणि मुद्देसूद लेख. अभिनन्दन.

विषयाला जोडूनचे काही बारिक सारिकः

"विषयाच्या कायदेशीर बाजूबाबत कायदा अभ्यासकांनी स्वतंत्रपणे सविस्तर विवेचन.............." : मी काही "कायदा अभ्यासक" नाही, पण काही काळापूर्वी वाचलेल्या एका युरोपातील (बहुतेक स्वित्झर्लन्ड) डॉक्टरान्च्याबद्दल वाचलेल्या लेखातील आठवणारा भाग असा होता. हे महाशय स्वेच्छामरणाला मदत करण्याआधी ज्याला स्वेच्छामरण हवे असेल त्याची मरण्याची इच्छा आणि त्यामागची कथा या सगळ्याचा शक्य तेव्हढा अभ्यास करून, खरोखरच स्वेच्छामरणाला पर्याय नाही आणि त्याबद्दल स्वेच्छामरण हवे असणार्‍याने पूर्णपणे विचार केला असल्याची खात्री करून मगच "स्वेच्छामरणाची इच्छा पूर्णपणे आपली असून त्याची आणि मदत मागण्याच्या निर्णयाची पूर्ण जबाबदारी आपली आहे" अशा सारखे काहीतरी लिखित कागदपत्र तयार झाल्यावर सर्व "तयारी" अशा पद्धतीने करीत की स्वेच्छामरणाची प्रक्रिया सुरू होण्याकरता स्वेच्छामरण हवे असेल त्यालाच काहीतरी करावे लागे जसे एखादा स्विच दाबणे किन्वा पम्प सुरू करणे (किन्वा IV सुरु करणे जसे वरती "रीडर" यान्च्या प्रतिसादात आहे).

पुण्यातल्या वॄत्तपत्रात अधुन मधुन काही जैन लोकानी आपले "व्रत पुरे केले" आणि मग त्यान्चा मृत्यु झाला अशासारखे उल्लेख वाचले आहेत. यात बहुतेक अन्न आणि पाण्याचा त्याग करून स्वेच्छामरण मिळवले जात असावे. संथारा हा प्रकार बहुतेक वयोवृद्ध किन्वा मरणान्तिक आजार असलेले यान्च्याबद्दल असतो तर सल्लेखना हा इतरान्च्या बाबतीत असतो. काही माहिती इथे आहे: https://en.wikipedia.org/wiki/Sallekhana

'मेडिकल विल': मी जरी माझे 'मेडिकल विल' केलेले असले तरी त्याच्या वेगवेगळ्या देशातील कायदेशीर वैधतेबद्दल आणि जो काही कागद बनवला गेला आहे तो जगभरातल्या सगळ्याच अटी आणि नियम यात मान्य ठरेल याची मला खात्री नाही. मी सध्या अमेरिकेत आहे आणि त्यामुळे माझ्या हे लक्षात आले आहे की व्हर्जिनिया आणि मेरिलान्ड या एकमेकान्च्या शेजारच्या राज्यात देखील अशा 'मेडिकल विल'च्याबद्दल एकवाक्यता नाही.

कुमार१'s picture

13 Mar 2024 - 8:26 am | कुमार१

वरील तिन्ही प्रतिसादांतून मिळालेली पूरक आणि काव्यमय माहिती तसेच कायदेकानू संबंधीची आंतरराष्ट्रीय माहिती उपयुक्त आहे.
सर्वांना धन्यवाद !

Nitin Palkar's picture

14 Mar 2024 - 7:59 pm | Nitin Palkar

नेहमी प्रमाणेच विचारांना खाद्य पुरवणारा आणखी एक लेख.
एका महत्वाच्या पण अतिशय दुर्लक्षीत विषयावर खूपच अभ्यासपूर्ण माहिती या लेखाद्वारे मिळाली. स्वित्झर्लंडमध्ये इच्छामरणाला कायदेशीर परवानगी आहे हे वाचले होते. पण त्यातही एवढे कंगोरे असतात याची कल्पनाच नव्हती. वैद्यकीय दृष्ट्या स्वेच्छा मरण मागणे आणि त्याची वैद्यकीय व कायदेशीर दृष्ट्या पूर्तता होणे हे तथाकथित सुधारीत जगातही कठीण किंवा अशक्य आहे हे समजले.
भारतामध्ये या विषयावर उघड सार्वत्रिक चर्चा होणे कठीणच वाटते. ही चर्चा सुरू करण्याचे धाडस केल्याबद्दल कुमार १ यांचे अभिनंदन. अनेक जाणकार मिपाकरांनी माहितीपूर्ण प्रतिसाद देऊन धाग्याची वाचनीयता वाढवली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रयोपावेशन करून केलेला देहत्याग सामान्य माणसांना जमणे कठीण आहे.
'आता वेळ झाली' या चित्रपटात सूचित केल्यानुसार, या लेखाद्वारे या चर्चेस चालना मिळावी असे वाटते.

कुमार१'s picture

15 Mar 2024 - 7:47 am | कुमार१

धन्यवाद !

स्वित्झर्लंडमध्ये इच्छामरणाला कायदेशीर परवानगी आहे

या देशात स्वेच्छामरणाचे नियम अन्य देशांच्या मानाने काहीसे शिथिल आहेत. याचा फायदा घेऊन परदेशी नागरिकांनी तिथे पर्यटनातून जाऊन स्वेच्छामरण घेतले. आता स्वित्झर्लंड या प्रकारावर नियंत्रण आणत आहे.

स्वेच्छामरणासाठी पर्यटन असाही प्रकार यानिमित्ताने वाचायला मिळाला.

चौथा कोनाडा's picture

21 Mar 2024 - 11:16 pm | चौथा कोनाडा

आयुष्याला सन्मानपूर्वक पूर्णविराम
-
(लेखक मुंबईतील अग्रगण्य स्त्रीरोगतज्ज्ञ व कायदेतज्ज्ञ आहेत.)

(मटा संवाद पुरवणी टीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स | 17 Mar 2024, 10:37 am)
-प्रा. डॉ. निखिल दातार

स्थळ : मुंबई उच्च न्यायालय.

लोकमान्य टिळकांनी ज्या दालनात ‘स्वराज्य हा माझ्या जन्मसिद्ध हक्क आहे’ असे उद्गार काढले होते, त्याच दालनात, दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी मी याचिकाकर्ता म्हणून मुख्य न्यायाधीश आणि न्यायमूर्ती आरीफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे, नागरिकांच्या हक्कासाठी माझी भूमिका मांडली. ‘महोदय, मी माझे स्वतःचे लिव्हिंग विल केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने नागरिकांना सन्मानाने मरण्याचा अधिकार दिलेला आहे; त्या बरहुकूम मी हे केले आहे. परंतु अद्यापि सरकारी यंत्रणांनी त्याची दखल घेतलेली नाही आणि त्यासाठी आवश्यक ती व्यवस्था तयार केलेली नाही. यासाठी मी ही याचिका दाखल करीत आहे.’ मुख्य न्यायमूर्ती उद्गारले : ‘याचिकाकर्त्याने हा मोठा सामाजिक प्रश्न मांडला असून, आम्ही राज्य सरकार, केंद्र सरकार आणि मुंबई महानगरपालिका यांना त्यांचे म्हणणे सहा आठवड्यांत सादर करण्याचा आदेश देत आहोत’.

प्रा. डॉ. निखिल दातार आणि इतर (आनंद राऊत, गरिमा पाल) विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर (पी आय एल/३/२०२४) या जनहित याचिकेचा हा ऊहापोह .

‘लिव्हिंग विल’ म्हणजे काय? मी ते का केले?
-‘लिव्हिंग विल’ला मराठीमध्ये ‘वैद्यकीय इच्छापत्र’ असा शब्द अनेकदा वापरला जातो; पण तो समर्पक नाही. ‘मृत्यूविषयीचे इच्छापत्र’ हे अधिक योग्य वाटते. या इच्छापत्राद्वारे प्रत्येक व्यक्ती आपल्यावर कुठवर आणि कितपत उपचार करावेत आणि ते कधी थांबवावेत, हे ठरवू शकतो. तसेच यातना कमी करण्यासाठीचे उपाय (palliative care) द्यावेत की नाही, अवयवदान करावयाचे आहे का, या बाबीही या इच्छापत्रात नमूद करता येतात. तसेच याविषयीची संमती देण्यासाठी जवळच्या नातेवाईक किंवा डॉक्टरचे नाव या इच्छापत्रात लिहिता येते, वा त्याची एक प्रत त्याच्याकडे देता येते.

आज वैद्यकीय तंत्रज्ञान पुरेसे प्रगत झाले आहे. अनेक उपकरणांचा वापर करून माणसाचे जीवन लांबवता येते. पण त्याला ‘जगणे लांबवले’ असे म्हणावे, की ‘आजचे मरण पुढे ढकलले’ असे म्हणावे हा प्रश्नच आहे. मराठी चित्रपट ‘व्हेंटिलेटर’मध्ये थोड्याश्या गंमतीदार पद्धतीने हे सर्व दाखवले आहे आणि तीच वस्तुस्थिती आहे. एखादी खूपच वयस्क व्यक्ती कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने शेवटच्या घटक मोजत असताना तिच्यावर कितपत उपाय करावे, हे ठरवणे कठीण आहे. विशेषतः त्या व्यक्तीची इच्छा जर ‘मला जाऊ द्या’ अशी असेल तर काय? त्या रुग्णाला लावलेला व्हेंटिलेटर काढण्याचा अधिकार डॉक्टरांना आहे का? एक नातेवाईक ‘जास्तीत जास्त प्रयत्न करा’ असे म्हणतो; तर दुसरा ‘विशेष काही करू नका’ असे म्हणतो. मग डॉक्टरांनी नेमके कोणाचे ऐकायचे? या साऱ्यात हॉस्पिटलचा खर्च प्रचंड वाढत जातो, त्याचे काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. वाचकांपैकी बहुतांश जणांनी ही परिस्थिती अनुभवली असेल. बऱ्याचदा डॉक्टर नातेवाईकांना सांगतात, ‘पुढे उपचार करायचे नसतील तर स्वतःच्या जबाबदारीवर रुग्णाला रुग्णालयातून घरी घेऊन जा.’ पण अशा रुग्णाची घरी देखभाल कशी करणार? आणि ह्या सगळ्या गदारोळात फरफट होते ती त्या गलितगात्र आजारी व्यक्तीची.

नेमक्या ह्याच कारणामुळे ‘अरुणा शानभाग’सारखी प्रकरणे झाली. सर्वोच्च न्यायालयाने Common causes Vs Union of India या प्रकरणात ‘नागरिकांना सन्मानाने मरण्याचा अधिकार एका मर्यादेपर्यंत आहे’ असा निर्वाळा दिला आहे. काही पाश्चिमात्य देशांत तर अगदी औषध घेऊन देहत्याग करणे कायदेशीर आहे. नुकतेच भूतपूर्व डच पंतप्रधान व त्यांच्या पत्नीने असा देहत्याग केला, अशी बातमी आपण वाचली आहे. भारतात ते कायदेशीर नसले तरी मरण लांबवणाऱ्या अनाठायी उपायांना नकार देणे, किंवा त्या बंद करणे हे आता शक्य झाले आहे, ते सर्वोच्च न्यायालयाच्या सन २०२३मधील निर्वाळ्यामुळे.

यानंतर लगेचच मी माझे स्वतःचे ‘लिव्हिंग विल’ फेब्रुवारी २०२३ मध्ये केले. तेव्हापासून मी इतर लोकांना असे इच्छापत्र कसे करावे, याविषयी मोफत मार्गदशन करतो आहे.

या इच्छापत्राची अंमलबजावणी कशी होईल?

- सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्याप्रमाणे प्रत्येक महानगरपालिकेपासून ते ग्रामपंचायतीपर्यंत यासाठी एक ‘कस्टोडियन’ नेमणे अपेक्षित आहे. नागरिकांनी आपले इच्छापत्र दोन साक्षीदारांच्यासमोर नोटरी करून एक प्रत त्या कस्टोडियनकडे देणे अपेक्षित आहे. त्यामुळे या व्यवस्थेचा दुरुपयोग कोणी करू शकणार नाही.

जेव्हा ती व्यक्ती दुर्धर आजाराने ग्रस्त असेल तेव्हा रुग्णाचे नातेवाईक डॉक्टरांना या इच्छापत्राची प्रत देतील. डॉक्टर कस्टोडियनकडून ते खरे असल्याची पडताळणी करतील. पुढील काही दिवसांत प्रत्येकी तीन डॉक्टरांची दोन पथके रुग्णाची तपासणी करतील. त्यातील एक डॉक्टर हा तालुक्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा प्रतिनिधी असेल. थोडक्यात म्हणजे रुग्ण, नातेवाईक आणि सहा डॉक्टर यांचे मतैक्य झाले तर उपचार थांबवले जातील आणि त्या व्यक्तीला ‘जाऊ’ दिले जाईल, अशी व्यवस्था सर्वोच्च न्यायालयाने सांगितली आहे.

संबंधित व्यक्तीचे असे इच्छापत्र नसले तरीसुद्धा नातेवाईक आणि सहा डॉक्टर एकत्र येऊन असा निर्णय घेऊ शकतात, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. अर्थात त्यासाठी सर्वांचे एकमत हवे हे आलेच.

माझ्या जनहित याचिकेचे प्रयोजन काय?
- सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला असला तरीही मला असे लक्षात आले, की त्याची अंमलबजावणी अद्याप महाराष्ट्रात झालेलीच नाही. आमच्यासारख्यांनी ‘लिव्हिंग विल’ तयार केले; पण सरकारने त्यांचे काम केले नाही तर प्रक्रिया अर्धवट राहणार. मग गरज पडेल तेव्हा नुसत्याच कागदोपत्री असलेल्या या तरतुदी काय कामाच्या? वारंवार पत्रव्यवहार करून, माहितीच्या अधिकारात माहिती मिळवूनही काही होत नाही, हे पाहून मी ही जनहित याचिका दाखल केली. याचिकेवर ८ मार्च २०२४ रोजी सुनावणी होती. त्याआधीच महाराष्ट्र सरकारने अध्यादेश काढून राज्यात ४१३ अधिकाऱ्यांची नेमणूक कस्टोडियन म्हणून केली आहे. याबद्दल सर्वांनी सरकारचे अभिनंदन केले पाहिजे.

याचिकेतील इतर मागण्या काय आहेत?

१) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने डॉक्टरांचे पॅनल तयार करावे.

२) ‘लिव्हिंग विल’ हे डिजी लॉकरसारख्या डिजिटल माध्यमात साठवण्याची सोय असावी.

३) समाजातील सर्व घटकांपर्यंत याविषयीची माहिती योग्य पद्धतीने पोहोचण्यासाठी उपाययोजना कराव्यात.

माझ्या या इतर मागण्या अद्याप तरी पूर्ण झालेल्या नाहीत. त्याच्या पूर्तीसाठी माझा न्यायालयीन लढा सुरूच राहणार आहे. हा विषय महत्त्वाचा आणि प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याला स्पर्श करणारा आहे. त्यामुळे या उपायांसंदर्भात सरकारदेखील अशीच झपाट्याने पावले उचलेल आणि या नव्या व्यवस्थेची सुरुवात महाराष्ट्रापासून होईल, अशी आशा ह्या लेखाच्या निमित्ताने मी व्यक्त करतो.

(लेखक मुंबईतील अग्रगण्य स्त्रीरोगतज्ज्ञ व कायदेतज्ज्ञ आहेत.)

संस्थळावरून थेट कॉपी पेस्ट.. वाचकांच्या सोयी साठी
माहिती लिन्क सौजन्य : मा कुमार१

कर्नलतपस्वी's picture

22 Mar 2024 - 6:02 am | कर्नलतपस्वी

कस्टोडिपन,वैद्यकीय समीती,नातेवाईक यांची सांगड बसणे इच्छा पत्र करणार्या व्यक्तींच्या दुर्धर आजार इतकेच कठीण वाटते. पण इलाज नाही. कारण स्वार्थ आडवा येवू शकतो. एवढी काळजी घेतलीच पाहीजे.

शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त परंतु काही मानसिक आजारांनी ग्रस्त असलेल्या 28 वर्षाच्या नेदरलँड्समधील तरुणीला इच्छामरणाची कायदेशीर परवानगी या बातमीनुसार मिळालेली दिसतेय.

मे महिन्यात त्याची कार्यवाही होणार आहे. त्या तरुणीला depression, autism, and borderline personality disorder हे मानसिक विकार आहेत.

या कारणांसाठी इच्छामरणाची परवानगी दिली असेल तर अनेक प्रश्न उभे राहतात.

मुळात आता आणखी काहीही उपाय केले जाऊ शकत नाहीत असे मानसिक आजारांच्या बाबतीत डॉक्टर कसे म्हणत आहेत ते समजत नाही. पूर्ण बरे होत नसेल, पण लक्षणे आटोक्यात राहतील असे काही ना काही उपचार असणार, आणि ते करत राहण्यासाठी मानस उपचार तज्ञांनी पेशंटला प्रोत्साहित केले पाहिजे. हा काही कॅन्सर किंवा अल्झायमरसारखा शारीरिक आजार नाही.

एकूणच या स्वेच्छामरणाबाबत हाच मोठा अडथळा आहे की एकदा का मरण हा वैयक्तिक निर्णय / हक्क मानला की कोणत्याही अटी न घालता तो मान्य करावा लागेल. नेमका कोणता आजार आहे ?, नेमके किती वय झाले आहे?, जीवन वेदनादायी आहे का? , कोणाचे काही देणे, जबाबदाऱ्या डोक्यावर आहेत का? हे सर्व बाजूला ठेवावे लागेल.

कुमार१'s picture

3 Apr 2024 - 1:50 pm | कुमार१

मरण हा वैयक्तिक निर्णय / हक्क मानला की कोणत्याही अटी न घालता तो मान्य करावा लागेल.

होय.
याचा पुढचा टप्पा म्हणजे मुंबईतील नारायण कृष्णाजी लवाटे यांनी सातत्याने लावून धरलेली मागणी. त्यांच्या मागणीनुसार धडधाकट माणसालाही असा अधिकार कायद्याने दिला गेला पाहिजे.

लवाटे नवरा बायकोंना एकाच दिवशी एकाच वेळी दोघांना मृत्यू हवा आहे. हे नैसर्गिकरित्या तर काही शक्य नाही - जवळजवळ अशक्य. म्हणून त्यांची ती मागणी आहे.
त्या लेखात त्यांच्या तोंडी असे वाक्य आहे :

‘‘मला राज्यातल्या सगळ्या खासदारांचे पत्ते, ई-मेल आयडी पाहिजेत. त्यांच्याकडे पत्रव्यवहार करायचाय.’’

याच सत्य घटनेवर आधारित लेखात उल्लेख केलेला चित्रपट आहे.

विअर्ड विक्स's picture

20 Apr 2024 - 6:07 pm | विअर्ड विक्स

लवाटे मॅडमचा विषय आलं म्हणून चार ओळी टंकतो . दोघेही नवरा बायको ८०+ आहेत . गिरगावात वास्तव्य . लवाटे मॅडम या शालेय शिक्षिका होत्या व पुढे त्याच शाळेच्या मुख्याध्यापकसुद्धा झाल्या. वैयक्तिक कारणामुळे यांनी मूल न होण्याचा निर्णय घेतला होता तो त्या काळात सुद्धा काळाच्या पुढचा विचार होता.

लवाटे मॅडम ज्या शाळेत शिकवायच्या त्याच शाळेचा मी विद्यार्थी , म्हणून हे टंकन ...

बाजी स्वेच्छा मृत्यूवरील लिखाण आवडले.

कुमार१'s picture

20 Apr 2024 - 6:49 pm | कुमार१

माहिती दिल्याबद्दल.
बघा योगायोग कसा असतो.

कुमार१'s picture

4 Apr 2024 - 10:15 am | कुमार१

नेदरलँड्समध्ये बऱ्याच वर्षांपासून मनोविकारग्रस्तांना हा हक्क दिलेला दिसतो.
हा 2022 मधील तिथला आढावा

. . . Studies of Dutch casefile summaries show that all patients who received PAD on the basis of psychiatric suffering were ultimately considered capable of making an informed decision. . .
( PAD = Physician Assisted Death).

..
त्यांच्याकडेही तो बऱ्यापैकी वादाचा मुद्दा आहेच.
तो अहवाल जेव्हा मी चाळला तेव्हा अजून एक मुद्दा लक्षात आला.
"मानसिक आजार असल्यास मरणाचा निर्णय घेण्याची क्षमता असणार नाही' असे विधान काही जणांकडून केले जाते.
त्यावर दुसऱ्या गटाचा आक्षेप असा आहे की,
" वृद्धापकाळच्या काही शारीरिक आजारांनी जर्जर झाल्यानंतर सुद्धा (मानसिक आरोग्य चांगले असले तरीही) निर्णय घेण्याची क्षमता प्रौढावस्थेइतकीच शाबूत असते का ?"

मग " मनोविकार असणाऱ्या रुग्णांवरच फक्त 'क्षमता' या मुद्द्याचा अन्याय का व्हावा", वगैरे ..

या प्रकारचे वाद चालूच राहतील. एकंदरीत पाहता त्यांच्याकडे मानवी हक्क या मुद्द्याला प्राधान्य दिले जाते असे दिसते

कुमार१'s picture

20 Apr 2024 - 8:16 am | कुमार१

फ्रान्समध्ये स्वेच्छामरणाचे विधेयक संसदेच्या पटलावरती चर्चेसाठी आलेले आहे.

त्यांनी जो मसुदा तयार केला आहे त्यातली काही वैशिष्ट्ये :
१. तीव्र मनोविकार आणि अल्झायमरसारखे चेतनाऱ्हासाचे विकार असणाऱ्या लोकांना अशी इच्छा व्यक्त करण्याची परवानगी नाही.
२. अशा मरणासाठी डॉक्टरने लिहून दिलेले प्रिस्क्रिप्शन फक्त तीन महिने वैध असणार.
३. तिकडेही या विधेयकावर अर्थातच वादविवाद आणि धार्मिक कारणास्तव विरोध आहेत.

कुमार१'s picture

28 Apr 2024 - 9:33 am | कुमार१

पेरू देशातील Estrada या 47 वर्षीय मानसवैज्ञानिक बाई स्वेच्छामरणाने मृत्यू स्वीकारणाऱ्या प्रथम नागरिक ठरल्यात.

त्यांना polymyositis हा स्नायू पेशींच्या ऱ्हासाचा आजार होता. वयाच्या विशीपासून त्या व्हीलचेअरवर आयुष्य काढत होत्या. सदर हक्क मिळवण्यासाठी त्यांना सर्वोच्च न्यायालयापर्यंत झगडावे लागले.