सन 2018 मध्ये मी आपल्या आणि अन्य एका संस्थळावर “ट्रोपोनिन : ‘हार्ट अॅटॅक’वर शिक्कामोर्तब“ हा लेख लिहिला होता आणि त्यावर चर्चाही झाली होती. त्यानंतर ऑगस्ट 2023मध्ये ध्यानीमनी नसताना त्या लेखाच्या एका वाचकांनी अन्यत्र स्वतःच्या हार्ट अटॅकसंबंधी अनुभवकथन केले. त्यात त्यांनी ट्रोपोनिनच्या त्या लेखाचा जीवरक्षक म्हणून उपयोग झाल्याचे नमूद केले. ते वाचून आनंदयुक्त समाधान वाटले. त्या निमित्ताने हृदयविकारावर अनेकांशी व्यक्तिगत संपर्कातून ओझरती चर्चा झाली. तेव्हा त्यांनी असे सुचवले, की पूर्वीचा ‘ट्रोपोनिन’ संबंधीचा लेख हा फक्त एकाच महत्वाच्या प्रयोगशाळा चाचणीशी संबंधित आहे; परंतु आता हृदयविकार या विषयावर सविस्तर लेखन केल्यास ते अनेकांना उपयुक्त वाटेल. या अतिशय चांगल्या सूचनेवर विचार करून प्रस्तुत लेखमालेचा आरंभ करीत आहे.
मानवी हृदय आणि त्याचे विकार हा एक अवाढव्य व गुंतागुंतीचा विषय असून आधुनिक वैद्यकात त्यावर प्रचंड संशोधन झालेले आहे. सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून हृदयासंबंधी काही मूलभूत माहिती, हृदयविकारांचे प्रकार आणि त्यांची कारणमीमांसा याचे विवेचन महत्त्वाचे आहे.
त्या अनुषंगाने या लेखमालेत खालीलप्रमाणे विभाग असतील :
1. मानवी हृदय : रचना आणि कार्य
2. हृदयरोग निदानाच्या प्राथमिक तपासण्या
3. हृदयविकाराचे विविध प्रकार
4. करोनरी हृदयविकार (पूर्वार्ध)
5. करोनरी हृदयविकार (उत्तरार्ध)
वरील मुद्दे झाल्यानंतर मी एक लक्ष्मणरेषा आखलेली आहे. त्या रेषेपलीकडे रोगनिदानाच्या प्रतिमातंत्र चाचण्या, अत्याधुनिक invasive चाचण्या, औषधोपचार आणि शस्त्रक्रिया हे विषय येतात. हे सर्व विषय हृदयरोगतज्ञांच्या अखत्यारीतील असल्याने मी त्यांना हात घालणार नाही.
हृदयविकाराच्या संदर्भात भारतातील काही निरीक्षणे महत्त्वाची आहेत :
१. समाजातील एकूण मृत्यूंपैकी सुमारे एक चतुर्थांश मृत्यू हृदयविकारामुळे होतात
२. गेल्या दोन दशकांमध्ये या विकारांचे प्रमाण वाढलेले असून ते समाजातील सर्व सामाजिक-आर्थिक स्तरांमध्ये दिसून येते.
३. विकाराची सुरुवात होण्याचे वय सुमारे दहा वर्षांनी अलीकडे सरकलेले आहे.
४. रोगनिदान आणि उपचार सुविधांतील कमतरतेमुळे या विकारांचा मृत्यूदर प्रगत देशांपेक्षा जास्त आहे.
या लेखमालेसाठी प्रामुख्याने वैद्यकीय अभ्यासक्रमातील विविध पाठ्यपुस्तकांचा आधार घेतला आहे. या व्यतिरिक्त जे जालसंदर्भ वापरलेले आहेत त्यांचा उल्लेख संबंधित लेखाच्या तळटीपेत करेन.
अशा प्रकारे हृदयाच्या काही महत्वाच्या पैलूंचे विवेचन करणारा हा ‘हृदयसंवाद’ सादर करीत आहे. सर्व वाचकांचे हृदयपूर्ण स्वागत ! नेहमीप्रमाणेच शंकाकुशंका, पूरक माहिती, सूचना आणि अर्थपूर्ण चर्चेची प्रतीक्षा आहे.
**************************************************************
क्रमशः
प्रतिक्रिया
18 Apr 2024 - 7:18 pm | कंजूस
++++++
18 Apr 2024 - 7:58 pm | कर्नलतपस्वी
,-----
19 Apr 2024 - 1:31 am | चित्रगुप्त
अतिशय महत्वाच्या विषयावरील ही लेखमाला सर्वांनाच ही खूप उपयोगी आणि मार्गदर्शक ठरेल.
भारतात जास्त मृत्युदर असण्यामागे हेच एकमेव कारण आहे की आणखीही कारणे आहेत ?
19 Apr 2024 - 7:46 am | कुमार१
सर्वांना धन्यवाद !
..
हे एक कारण नसून तो अनेक कारणांचा समुच्चय आहे. “निदान आणि उपचारांमधील कमतरता” हे शब्द आता विस्ताराने पुढच्या प्रतिसादात पाहू म्हणजे लक्षात येईल, की त्यांच्यामध्ये कित्येक अंतर्गत कारणे दडलेली आहेत :
19 Apr 2024 - 7:48 am | कुमार१
१. आरोग्य जागरूकता कमी : चाळीशीच्या दरम्यान कुठलाही त्रास होत नसेल तरीसुद्धा चाळणी चाचण्या करून घेणे हितावह असते त्याकडे दुर्लक्ष.
२. समतोल आहार आणि नियमित एरोबिक व्यायामांच्या सवयीचा अभाव
३. हृदयविकाराच्या कारणामध्ये अत्यंत महत्त्वाचा वाटा असलेले दोन आजार म्हणजे मधुमेह आणि उच्च रक्तदाब. आपल्यातील अनेकांना हे आजार असूनही त्यांचे नियंत्रण पुरेसे झालेले नसते. मध्यंतरी एक बातमी येऊन गेली की सुमारे 30 टक्के मध्यमवयीन भारतीयांनी आपला रक्तदाब कधी तपासलेलाच नव्हता.
४. करोंनरी विकाराची सुरुवात झाल्यानंतरही शास्त्रशुद्ध उपचारांचा अभाव. जनतेतील मोठा वर्ग असा आहे की जो आधुनिक उपचारांना नकार देऊन अशास्त्रीय/अप्रमाणित उपचारांच्या नादी लागतो.
५. प्रत्यक्ष हार्ट अटॅक आल्यानंतर जर प्रत्येक रुग्ण एक तासाच्या आत हृदय-सुसज्ज रुग्णालयात पोहोचला तर खूप फरक पडतो. आता हे आपल्याकडे किती अवघड आहे हे वेगळे सांगणे न ल.
19 Apr 2024 - 11:36 am | अमर विश्वास
अतंत्य महत्वाचा विषय ..
खूप वर्षांपूर्वी "माझा साक्षात्कारी हृदयरोग" हे डॉ अभय बंग यांचे पुस्तक वाचले होते ..
अर्थात त्यावेळी ऐन विशीत असल्याने फारसे मनावर घेतले नव्हते ,,,
पण आता ही लेखमाला फार उपयुक्त ठरेल
19 Apr 2024 - 12:40 pm | Bhakti
+१
परवाच समोरच्या काकूंची बायपास झाली.७-८ ब्लॉकेज होते.मालिका वाचायची उत्सुकता आहे.
22 Apr 2024 - 9:23 am | कुमार१
भाग २ इथे
22 Apr 2024 - 10:21 am | विअर्ड विक्स
वाचण्यास उत्सुक
रबबब ( RBBB ) आणि लबबब (LBBB ) पण कव्हर करणार का ?
22 Apr 2024 - 10:52 am | कुमार१
या मर्यादित लेखमालेत तो नाही. तो माझ्या नेहमीच्या वाचनातला विषय नसल्याने अवघड वाटते.
22 Apr 2024 - 12:39 pm | गवि
डॉ बंग यांचे साक्षात्कारी हृदयरोग हे पुस्तक जेव्हा प्रकाशित झाले तेव्हा खूप जणांना प्रेरक ठरले. त्या पुस्तकात खूप छान उहापोह आहे. पण एकच प्रॉब्लेम झाला की ते पुस्तक डॉ बंग यांना कमी वयात हार्ट अटॅक आल्यानंतर लगेच प्रकाशित झाले. त्यांनी स्वतःच्या आरोग्याबाबत घालून घेतलेले काटेकोर नियम आणि रूटीन यांचा दीर्घकालीन परिणाम काय झाला आणि अन्य हृदय रुग्णांपेक्षा फरक किती पडला याचे फॉलो अप लेखन शोधून देखील वाचनात आले नाही. ती सर्व काळजी घेतल्याने पुढे किती काळ ते लक्षणमुक्त राहू शकले हे कळत नाही. काही बातम्यांत त्यांना काही वर्षांनी पुन्हा admit व्हावे लागले किंवा सौम्य झटका / त्रास झाल्याने उपचार असेही वाचले होते. अशा बातम्या एकाहून अधिक सालच्या तारखांना दिसतात. अर्थात जे पुन्हा उद्भवले ते सौम्य असावे प्रत्येक वेळी, किंवा वेळेत दखल घेऊन उपचार घेतले असावेत. कारण ते अद्याप ॲक्टिव आहेत. मोठे समाजकार्य करतात. दुर्गम भागात राहून कार्य करतात. ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांना दीर्घायुरारोग्य लाभो. केवळ इतकीच उत्सुकता की काटेकोर पालन करून पूर्ण रिस्क गेली का?
22 Apr 2024 - 1:51 pm | कुमार१
कितीही सुयोग्य आणि वेळेत उपचार केले असले तरीही पुढील आयुष्यात त्या आजाराचा धोका पूर्णपणे संपला असे म्हणता येत नाही. त्यात अनेक जर . . . तर आहेत.
या मुद्द्यावरून अजून काही स्पष्टीकरण द्यायचे आहे परंतु ते आत्ताच या प्रास्ताविकाच्या लेखात नको.
भाग चार व पाच पूर्णपणे करोनरी विकारासाठी ठेवलेले आहेत. तेव्हा देईन. :)
22 Apr 2024 - 2:06 pm | गवि
धन्यवाद.
अतिशय आदर्श रूटीन, आहार, व्यायाम अत्यंत विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक प्लॅन करून देखील जर पुन्हा धमन्या ब्लॉक होणे टळत नसेल तर असे उपाय करणाऱ्या रुग्णांच्या मनात एक विफलतेची भावना येऊ शकते.
याच्या अगदी उलट, अनेक हृदय विकार तज्ञ खुद्द आहार विहाराच्या बाबतीत कोणतीही काळजी घेताना दिसत नाहीत. डॉ मांडके यांचे उदाहरण कुठेतरी वाचले होते. आहाराचे पथ्य किंवा तणाव टाळणे असे काही केल्याचे वाटत नाही. त्यांना हार्ट अटॅक आल्यावर ते स्वतः ड्राईव्ह करत हॉस्पिटलात पोचले. स्वतः उपचारांबद्दल सूचना दिल्या. अत्युच्च दर्जाची उपकरणे असलेल्या हॉस्पिटलात ते होते. तरीही त्यांना वाचवणे शक्य झाले नाही.
अशा स्थितीत ते निष्काळजी होते असे म्हणवत नाही. कदाचित त्यांना पथ्य पाळणे किंवा अन्य खबरदारी घेण्यातली व्यर्थता जाणवली असेल का?
दोन्ही बाजूंचे लोक दिसतात आणि शंका उत्पन्न होतच राहतात.
22 Apr 2024 - 2:20 pm | कुमार१
त्यांना काय वाटलं असेल याबद्दल आपण केवळ तर्कच करू शकतो. तरीपण माझा अंदाज सांगतो.
खबरदारी घेण्यातली व्यर्थता असे नसावे.
परंतु एखादा (कुठल्याही क्षेत्रांतला) माणूस जर अत्यंत महत्त्वाकांक्षेने झपाटलेला असेल तर तो त्या ध्येयापोटी स्वतःची हेळसांड होते आहे याकडे फारसा लक्ष देत नसावा.