भटकंती कोंकण किनारपट्टीची (निमित्त-महिला दिन): भाग ३

गोरगावलेकर's picture
गोरगावलेकर in भटकंती
27 Mar 2024 - 3:52 pm

भाग २ येथे वाचा

आज गणपतीपुळ्याहून हरीहरेश्वरसाठी प्रवास सुरु केला. साधारण पंधरा मिनिटातच कवी केशवसुतांचे गांव मालगुंड येथे पोहचलो. केशवसुतांचे जन्मस्थान असलेले घर आज त्यांचे स्मारक म्हणून उत्तम प्रकारे जतन केलेले आहे. प्रवेश फी रु.१०/- प्रत्येकी.
केशवसुतांचे घर

पडवी

जन्मखोली

येथे त्यांच्या कविता वाचता येतात

मागील बाजूस सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आहे.

स्मारक पाहून पुढच्या प्रवासाला निघालो . वाटेत लागलेला 'उंडी' बीच

जयगडजवळ पोहचलो. गेल्या सहलीत येथील किल्ला पाहिला होता त्यामुळे तिकडे न वळता पुढे निघालो. गुहागरकडे जाण्यासाठी शास्त्री नदी अरबी समुद्राला जेथे मिळते ती खाडी पार करावी लागते. यासाठी जयगडजवळच्या साखर मोहल्ल्यातून पैलतीरावरील तवसाळपर्यंत फेरीबोट सेवा आहे. फेरीबोटीतून प्रवासी आणि वाहने दोन्हीचीही वाहतूक होते.
जयगड धक्क्यातूनआम्ही गाड्यांसहित फेरीबोटीवर दाखल झालो.

तवसाळ धक्क्यावर उतरून पुढचा प्रवास सुरु झाला.

जवळचे हेदवी आणि वेळणेश्वर किनारा दोन्हीही पाहिलेले असल्याने थांबायचा विचार नव्हता पण अचानक एका वळणावर अगदी समोरच हेदवीचे दशभुजा लक्ष्मी गणेश मंदिर आले. आम्ही थांबावे असाच काही संकेत असावा. अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी लहानशा टेकडीवर हे मंदिर आहे. आंबा, काजू व इतर फळाफुलांनी समृद्ध असा हा भाग.

थोड्याशा पायऱ्या चढून वर जात येते.

आता गाड्या अगदी मंदिरापर्यंत जाऊ शकतात. मंदिर पेशवे कालीन असावे. पेशव्यांनी दिलेल्या निधीतून केळकर स्वामींनी हे मंदिर उभारले अशी आख्यायिका आहे. मंदिरात दहा भूजा असलेली गणपतीची संगमरवरी सुरेख मूर्ती आहे. (मंदिरात फोटो घेऊ देत नाहीत)

येथून जवळच असलेल्या हेदवीचा समुद्रकिनारी आलो.

उमा महेश्वर मंदिराच्या मागे असलेली बामन घळ बघायची होती. खडकाळ किनाऱ्याहून चालत येथे जावे लागते.

भरतीच्या वेळी काळ्या कातळांमध्ये असलेल्या लांबच लांब घळीत पाणी शिरून तयार होणारा निसर्ग निर्मित जलस्तंभ हे येथील वैशिष्ठ. आम्ही पोहचलो तेव्हा ओहोटी असल्याने आम्हाला घळ तर बघायला मिळाली पण तो निसर्ग चमत्कार मात्र दिसला नाही.

दुपारच्या जेवणाला बराच उशीर झाला होता. वाटेत एक शाकाहारी जेवणाची सोय असलेलले श्री व सौ. जोग यांचे हॉटेल 'अगत्य' लागले. मालकीण जोग बाईंनी जेवण बनवायला थोडा वेळ घेतला पण १३०/- रुपयात ताजे, रुचकर, पोटभर जेवण दिले. हॉटेलच्या नावाप्रमाणेच बाई अगत्याने विचारपूस करीत वाढत होत्या. ठिकाणचे नाव विचारले असता 'मोडकाघर' असल्याचे समजले.
पुढे निघालो. अजून बरेच अंतर जायचे असल्याने आज गुहागरलाही थांबायचे नव्हते. रस्त्यालगत असलेले व्याढेश्वर मंदिर मागे पडले. गुहागर पार करून पुढे अंजनवेल फाटा आला. मागील सहलीत येथील गोपाळगड किल्ला आणि दीपगृहास भेट दिली होती त्या आठवणी ताज्या झाल्या. पुढे उजवीकडे वळून दापोलीकडे जाण्यासाठी दाभोळ धक्क्याचा रस्ता पकडला. थोडी चढण चढत उंच टेकडी पार करून दोभोळ-धोपावे जंगल जेट्टीला पोहचलो. वाशिष्ठी नदी सागराला मिळते ती खाडी पार करण्यासाठी गाडीसहित आम्ही फेरीबोटीवर चढलो.

धोपावे येथे उतरून दापोली कडे निघालो. दापोलीस पोहचल्यावर हर्णे-आंजर्ले-केळशी मार्गे हरिहरेश्वरला जाण्याचा विचार होता पण वेळ कमी असल्याने मधलाच एक जंगलमार्गे जाणारा रस्ता निवडला. घाटवळणांचा रस्ता, आजूबाजूने घनदाट जंगल आणि वाहतूक तर जवळजवळ नसल्यासारखी. संध्याकाळ होऊन प्रकाशही अंधुक झाला आणि GPS गंडले. थोडी भीती जाणवली. थोड्या वेळात एक रिक्षा आली. त्याला विचारले असता तुम्ही रस्ता चुकलात, आधीच वळण घ्यायला पाहिजे होते असे त्याने सांगितले. आता याच रस्त्याने केळशीला जाऊन पुढे निघा असा सल्ला देऊन तो गेला. थोड्याच वेळात एक मोटार सायकल आली. त्याने सांगितले येथून दोनच मिनिटावर मागे वळण आहे तेथून गेल्यास तुम्ही काही वेळात मुख्य रस्त्याला लागाल.
त्याने सांगितल्याप्रमाणे निघालो. थोड्याच वेळात मोबाईलला GPS ही आले. मुख्य रस्त्याला पोहचलो. हरिहरेश्वर जवळ आले. रस्त्याला समांतर उजव्या बाजूने सावित्री नदी दिसू लागली. हळूहळू अंधार झाला आणि आम्ही वेश्वी-बागमांडला जेट्टीला पोहचलो. फेरीबोटीचा निघण्याचा भोंगा वाजला. एकजण पटकन गाडीतून उतरून तिकिटासाठी पळाला. तो येईपर्यंत गाड्या बोटीवर चढवल्या देखील गेल्या. एखादा मिनिट जरी उशीर झाला असता तरी बराच खोळंबा होणार होता. उतरून अगदी १०-१५ मिनिटात MTDC च्या रिसॉर्टला पोहचलो. रिसेप्शनला आमचीच वाट पाहत होते. आज येथे पोहोचणारे आम्ही शेवटचेच पर्यटक. (वाट पाहण्याचे खरे कारण म्हणजे त्यांना आठ वाजता कार्यालय बंद करायचे होते). पटकन रूम ताब्यात घेतल्या. रूम चांगली असली तरी बाथरूममध्ये अनेक त्रुटी होत्या.

रूममध्ये जेवण पाठवणार का विचारले असता हॉटेलमध्ये सध्या आम्ही दोघेच कर्मचारी आहोत त्यामुळे देता येणार नाही असे सांगितले. जेवणाची शेवटची ऑर्डरही दहाच्या आतच घेतली जाईल असेही सांगितले. आम्हालाही प्रवासाचा थकवा होता. पटकन जेवण आटोपून झोपायला गेलो.

क्रमश:
भटकंती कोंकण किनारपट्टीची (निमित्त-महिला दिन): भाग ४

प्रतिक्रिया

हाही भाग कोकणाचे छान दर्शन घडवणारा.

एक सांगावेसे वाटते. मोडके गुहागर असे नसून मोडका आगर किंवा मोडकाघर (अपभ्रंश) असे त्या गावाचे नाव आहे.

धन्यवाद..

गोरगावलेकर's picture

8 Apr 2024 - 3:29 pm | गोरगावलेकर

लेख भटकंती विभागात हलवला गेल्याने बदल करणे शक्य झाले. संपादकांचे आभार

गोरगावलेकर's picture

27 Mar 2024 - 9:02 pm | गोरगावलेकर

माहितीबद्दल आभार. माझी नांव ऐकण्यात चूक झाली असावी. आपल्यासाख्या कोंकणवासियांकडून लेखास दाद मिळावी हे निश्चितच प्रेरणादायी.

कर्नलतपस्वी's picture

27 Mar 2024 - 9:14 pm | कर्नलतपस्वी

बरेच वेळा किनार्‍यावर असलेल्या मामाच्या बनात राहातो. सुंदर सुर्यास्त व चटकदार खेकडा भजी आवडते काॅम्बीनेशन.

सुंदर वर्णन. हरिहरेश्रवर ला बरेच दिवस गेलो नाही.

कोकणा प्रमाणेच सुंदर वर्णन आहे.

गणपती पुणे जयगड रस्त्यावर जिंदल उद्योग चे सुंदर गणपती मंदिर आहे.

कंजूस's picture

28 Mar 2024 - 5:16 am | कंजूस

सुंदर आहे.

पाटीलभाऊ's picture

28 Mar 2024 - 12:06 pm | पाटीलभाऊ

सुमारे २० वर्षांपुर्वी याच भागात फिरणे झाले होते. तेव्हा मालगुंड, हेदवी, वेळणेश्वर, हरिहरेश्वर, दशभुजा मंदिर असा सगळा परिसर पाहिला होता.
सुदैवाने बामन घळ बघायला गेलो तेव्हा भरती असल्याने तो नैसर्गिक चमत्कार बघायला मिळाला होता.

बामन घळ फोटो १

बामन घळ फोटो २

पाटीलभाऊ's picture

28 Mar 2024 - 12:12 pm | पाटीलभाऊ

माफ करा वरील प्रतिसादात फोटो दिसत नाहियेत.
आता तरी दिसतील अशी अपेक्षा आहे.

बामन घळ फोटो १

बामन घळ फोटो २

गोरगावलेकर's picture

28 Mar 2024 - 3:27 pm | गोरगावलेकर

कर्नलतपस्वी : मालगुंड परिसर सुंदरच आहे. नवीन ठिकाण सुचवल्याबद्दल धन्यवाद. परत कधी जाणे झाले तर निश्चितच बघण्याचा प्रयत्न राहील

@कंजूस : प्रतिसादाबद्दल धन्यवाद

@पाटीलभाऊ : प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मिपावर फोटो देणे थोडे किचकट आहे, मला सुद्धा जमत नाही. मदत घ्यावी लागते

केशवसुतांचे घर सुंदर आहे!

प्रचेतस's picture

31 Mar 2024 - 1:01 pm | प्रचेतस

हा भागही आवडला.
केशवसुतांचे स्मारक उत्तमप्रकारे जतन केलेले दिसतेय.
हेदवीचा किनारा अतिशय सुंदर आणि सुरक्षित आणि गर्दीविरहित असतो. किनाऱ्यालगतचे सुरुची कॉटेज मस्त आहे. सर्वच परिसर अतिशय सुंदर.

गोरगावलेकर's picture

1 Apr 2024 - 3:13 pm | गोरगावलेकर

@ Bhakti, प्रचेतस यांचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच इतर सर्व वाचकांचेही आभार.

balasaheb's picture

8 May 2024 - 9:47 am | balasaheb

खुप सुन्दर