भटकंती कोंकण किनारपट्टीची (निमित्त-महिला दिन): भाग २

गोरगावलेकर's picture
गोरगावलेकर in भटकंती
17 Mar 2024 - 11:26 pm

भाग-१ येथे वाचा

कशेळीहून गणपतीपुळेला निघालो. सागरी किनाऱ्याच्या रस्त्याने प्रवास करत वाटेत जमेल तेव्हडी ठिकाणे पाहणार होतो. कशेळीजवळ कातळशिल्प आहेत ती बघायची होती. शिल्प मुख्य रस्त्यापासून थोडी दूर आहेत. थोडे अंतर पायी चालावे लागते. चालायची तयारी होती पण कोणी वाटाड्या मिळाला नाही म्हणून विचार रद्द केला. कशेळी हे कनकादित्य मंदिरासाठी प्रसिद्ध असले तरी येथे अजून एक सुंदर मंदिर आहे ते म्हणजे श्री लक्ष्मीनारायण मंदिर.
थोड्याच वेळात येथे पोहचलो.

रस्त्यापासून थोडेसेच खाली काही पायऱ्या उतरून गेल्यावर मंदिर आहे.

मंदिराला सभोवताली भिंत आहे. प्रवेश केल्यावर दोन दीपमाळा आहेत त्यानंतर लाकडी खांब असलेला कौलारू सभामंडप आहे.

त्यानंतर अजून एक सभागृह आहे. प्रवेशद्वारावर गणेश पट्टी आहे.

लाकडी खांब, तुळ्या यावर सुंदर नक्षीकाम आहे.

त्यानंतर गाभारा आहे. गाभाऱ्यात विष्णूची काळ्या पाषाणातील सुंदर मूर्ती आहे. आम्ही मूर्तीला अभिषेक करायच्या थोडा वेळ आधी पोहचलो होतो. मूर्तीवरचा आदल्या दिवशीच्या पूजेच्या वेळचा बहुतेक साज उतरवलेला असल्याने मूळ मूर्तीचे देखणे रूप पाहावयास मिळाले. फोटोही मिळाला पण मंदिर नियमांचा मान ठेवत फोटो सार्वजनिक करणे योग्य वाटत नाही.

माझा मूर्ती अभ्यास नाही पण थोडेफार वाचनात आले त्याप्रमाणे आयुधक्रमानुसार (गदा,चक्र,शंख,पद्म) ही मूर्ती माधव विष्णूची आहे. असे असले तरी हे मंदिर लक्ष्मीनारायण (नारायण विष्णू) नावानेच ओळखले जाते. मूर्तीच्या डाव्या हातास लक्ष्मी व उजव्या हातास भूदेवी (विष्णू अवतार वराहाची पत्नी) आहे. गरुडाचीही मूर्ती आहे.
साधारणतः मंदिरात एकच शिवलिंग असते परंतु येथे लागूनच असलेल्या मंदिरात दोन शिवपिंडी आहेत. यातील एक स्वयंभू आहे असे सांगतात.

बाजूलाच एक तुटलेले शिल्प दिसते. त्यावर विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत.

लाकडी सभा मंडपाच्या सुरवातीला विष्णू मूर्तीकडे तोंड करून असलेले विष्णूचे वाहन गरुड

काल कनकादित्य मंदिरात पाहिलेली विहिरीतून पाणी काढायची पद्धत येथेही दिसून आली. पुजाऱ्याच्या सांगण्यानुसार हिस 'कोळंब' किंवा 'उक्ती' (का युक्ती?) असे म्हणतात. पाणी काढतांनाचे प्रात्यक्षिकही पाहावयास मिळाले. (मला मिपावर व्हिडीओ चढविता आले नाहीत त्यामुळे यू ट्यूबवर चढवून लिंक देत आहे)
लिंक १
https://youtube.com/shorts/fC0U-_cPlF8?feature=share

लिंक २ विहिरीच्या आत तोंडाशी गोलाकार भिंतीत दगड बसवून पाणी काढणाऱ्यास उभे राहता यावे यासाठी व्यवस्था केली आहे.
https://youtube.com/shorts/BfFE7H9TP58?feature=share

निसर्ग सानिध्यातले हे सुंदर मंदिर बघून पुढचा प्रवास सुरु केला.

थोड्याच वेळात गावखडी समुद्र किनाऱ्यास पोहचलो. पांढऱ्या, काळपट अशा मिश्र वाळूचा छान स्वच्छ किनारा

काल पूर्णगड किल्यावरूनहा बीच पाहत होतो तर आज बीचवरुन खाडीच्या पलीकडील किल्ला.

विविध आकाराचे आणि रंगांचे शिंपले

किनाऱ्यावरील सुरूचे बन

थोडा वेळ थांबून पुढे निघालो गणेशगुळेला. काही अंतर मुख्य रस्त्याने गेल्यावर डाव्या बाजूस उतरत जाणाऱ्या वळणावळणाच्या अरुंद रस्त्याने साधारण ३-४ किमी अंतरावर हा समुद्र किनारा. वाटेत ठिकठकाणी आंब्याच्या मोहराने बहरलेल्या आमराई.

पांढरीशुभ्र, मुलायम वाळू असलेला हा अतिशय सुंदर किनारा

स्वछ आणि नितळ पाणी. स्फटिकासारख्या स्वच्छ पाण्यातून टिपलेला तळ .

पाण्यात जायचे ठरवलेले नव्हते पण येथली मुलायम पुळण, नितळ पाणी पाहून राहवले नाही. मनसोक्त समुद्र स्नानाचा आनंद लुटला.
पाण्याबाहेर पडून चहा घेतला. सुरुच्या वनात स्थानिक महिला,शाळकरी मुले वन- विहाराचा तसेच वन-भोजनाचा आनंद घेत होती. शहरी पर्यटक मात्र दिसले नाहीत. गणेशगुळे येथे गणेश मंदिर तसेच नारायण मंदिरही आहे पण वेळेअभावी पाहता आले नाही.

वाटेत भाट्ये बीच लागला. अगदी रस्त्याला लागून. रस्त्यालगतच गणेश मंदिर आहे.

किनाऱ्यालगत नारळ बागा आहेत.

उत्तरेस दूरवर रत्नागिरीच्या बाजूस समुद्रात शिरलेला एक डोंगरकडा आणि त्यावरील दीपगृह नजरेस पडत होते.
किनारा बराच अस्वच्छ वाटला. जास्त वेळ थांबलो नाही.

रत्नागिरी पार करून सागरी रस्त्याने गणपतीपुळ्याकडे निघालो. आरे बिचला पोहचलो. रस्त्यावरून थोडेसे खाली उतरले की पांढऱ्या शुभ्र वाळूचा हा लांबच लांब किनारा.

खेकडयाच्या छोट्या छोट्या पिल्लानी बिळातून उपसलेल्या वाळूमुळे तयार झालेले हे सुंदर नक्षीकाम

बाजूला नारळ व सुरूचे बन आहे. पर्यटकांना उंचावरून समुद्र सौंदर्य पाहता यावे तसेच खेळाची मजा अनुभवता यावी यासाठी आरेवारेच्या कड्यावरून येणारी झिपलाइन दिसली.

आरे वारेच्या कड्याहुन दिसणारे आरे समुद्र किनाऱ्याचे मोहक दृष्य .

एका बाजूने घाट व दुसऱ्या बाजूने समुद्र किनारा असा सुंदर रस्ता आहे.

आणि हा वारे समुद्र किनारा.

वारे किनाऱ्याचे वरूनच दर्शन घेऊन पुढे निघालो. गणपतीपुळे पर्यटक निवासाला पोहचेपर्यंत संध्याकाळ झाली.
थोडावेळ आराम करून सर्वजण बाहेर येऊन बसलो. अंधार झाल्यामुळे समोरच असलेला समुद्र दिसत नसला तरी लाटांचा आवाज स्पष्ट येत होता.


थोडावेळ गप्पा गोष्टी झाल्यावर येथील उपहारगृहात जेवलो व परत येऊन झोपायला गेलो. सकाळी सातलाच सर्व आवरून बाहेर पडलो. समोरच्या कुंपणाच्या बाजूने किनाऱ्यावर उतरायला पायऱ्या होत्या.

किनाऱ्यावर वॉटर स्पोर्ट्सची भरपूर उपकरणं दिसत होती.

खाण्यापिण्याची सुविधा, लहान मुलं -तरुणांना आकर्षित करणारे पाण्यातील खेळ, व जोडीला धार्मिक पर्यटन यामुळे खुप लोक पुळ्याकडे आकर्षित होत आहेत. थोड्याच वेळात किनारा माणसांनी फुलून जाणार होता. शनिवार-रविवार आणि जोडून सार्वजनिक सुटी आली तर विचारायलाच नको. किनाऱ्याहून चालत चालत गणपती मंदिरापर्यंत पोहचलो.

लगतच असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी मंदिर आहे. मूर्ती स्वयंभू आहे. खारफुटी व नारळाच्या झाडांनी वेढलेला हा परिसर.
२५-२६ वर्षांपूर्वी येथे आले होते तेव्हा लहानसे मंदिर होते. खूप शांत वातावरण होते. आज मात्र येथे भव्य मंदिर उभारले गेलेले दिसले. सकाळी लवकरच दर्शनाला आलो असल्याने गर्दी नव्हती पण दर्शनासाठी असलेली अनेक पदरी रांगांची व्यवस्था पाहून किती गर्दी होत असेल याचा अंदाज येत होता. मंदिरात फोटो घेता येत नाही त्यामुळे बाहेरून घेतलेले काही फोटो.

दर्शन घेऊन हॉटेलला परत आलो.

चहा-नाश्ता घेतला आणि हरी-हरेश्वरचा प्रवास सुरु केला.

क्रमश:
भटकंती कोंकण किनारपट्टीची (निमित्त-महिला दिन): भाग ३

प्रतिक्रिया

कंजूस's picture

18 Mar 2024 - 6:37 am | कंजूस

छान फोटो आणि सहल.
कातळ शिल्पांचे काही विडिओ पाहिले त्यात त्यांनी म्हटले आहे की ड्रोन वापरून फोटो काढून पाहणे सोपे पडते. समोरून काही कल्पना येत नाही.

कशेळी ते रत्नागिरी रस्त्यात पावसला स्वामी स्वरुपानंदाचा आश्रम आहे. खुप शांत आणि रम्य ठिकाण आहे.

कोकणातल्या मंदिरांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे काष्ठमंडप, कशेळीतील लक्ष्मीनारायण मंदिर दुर्लक्षित दिसत असल्याने येथील काष्ठमंडपही जीर्ण झाल्याचा दिसतोय. आरे वारे किनारा आणि किनार्‍याला लागून जाणारा रस्ता प्रचंड सुंदर आहे. गणपतीपुळ्याचे मात्र आता बाजारीकरण झालेले आहे. गणेशगुळेचा किनारा मात्र अप्रतिम आहे आणि काहीसा धोकादायकही आहे. मधेमधे खड्डे आहेत आणि वाळू जोरात सरकते.

चौकस२१२'s picture

22 Mar 2024 - 6:28 am | चौकस२१२

गणपतीपुळ्याचे मात्र आता बाजारीकरण झालेले आहे
मनातले बोललात , सोयी चांगलया व्हावय्यात हे बरोबर पण त्यात मूळ आत्मा विरून गेला असे वाटते
त्या मामाने आजही बाली ( इंडोनेशिया ) सारख्या ठिकाणी प्रचंड बाजरी करण होऊन सुद्धा विमानतळापासून ते गावातील सभामंडपा पर्यंत/ लोकांची घरे यात " बाली पण" जपून आहे ... नाहीतर सगळी कडेच फेल्क्स आणि त्याच आधुनिक इमारती झाल्या तर पुळ्याला काय किंवा बालीला जायचे कशाला ?
माझारुचीचा विषय स्थापत्य शास्त्र आहे म्हणून डोळ्यांना जे दिसते ते ...

झकासराव's picture

19 Mar 2024 - 10:00 am | झकासराव

छान फोटो आणि प्रवासवर्णन

छान छान समुद्र किनारे! मस्त भटकंती!

गोरगावलेकर's picture

21 Mar 2024 - 10:42 am | गोरगावलेकर

प्रतिसादाबद्दल कंजूस, परिंदा, प्रचेतस, झकासराव, Bhakti यांचे तसेच इतर सर्व वाचकांचे आभार.

टर्मीनेटर's picture

21 Mar 2024 - 8:16 pm | टर्मीनेटर

वाचतोय…
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

राजेंद्र मेहेंदळे's picture

21 Mar 2024 - 9:59 pm | राजेंद्र मेहेंदळे

मंदिराचे फोटो आवडले. आरे वारे रस्ताही छानच आहे.

गणपतीपुळे ते हरीहरेश्वर एकदम बरेच अंतर आहे. सुट्टी असेल तर मधे अधे मुक्काम करता येईल अशा बर्याच जागा आहेत.

चौकस२१२'s picture

22 Mar 2024 - 6:15 am | चौकस२१२

कनकादित्य मंदिर पाहून मनात आलेले विचार
गणपती पुळ्याचे मंदिर "नवीन" बांधल्यावर जेवहा पाहिले तेव्हा मनात आलेले विचार (क्षमा करा पण खालील विधान कदाचित बरेच जणांना पटणार नाहीट)
"अरेरे .... जीर्णोद्धार करताना विश्वस्तांनी मूळ मंदिराची जी रचना /पद्धती होती ती पूर्ण पण बदलली नुसतीच बदलली नाही तर जुन्या स्थानिक रचनेशी अजिबात ना मिळणारी हि वास्तुरचना का केली? पैसे तर भरपूर असणारं पण हे का नाही सुचले ?
कनकादित्य मंदिर बघा तसे काहीसे होते जुने गणपती पुळ्याचे मंदिर होते ,,, ती रचना / ते साहित्य निदान बाहेरून वापरून ( आतून पोलादी सांगाडा) ते रूप ठेवता आले असते ...
पुळ्याच्या गणपती मंदिराचे विषेश म्हणजे मूर्ती त्या मागील डोंगराला चिकटलेली आहे त्यामुळे प्रदक्षिणा कर्यायाची तर डोंगराला प्रदक्षिणा करावी लागते
त्यामुळे छपराची शाकारणी छान दिसायनाची

असो ..... जर आता
- उंटाची "सफारी" पण तिथे घेता येत असेल तर मग काय बोलणार
- कदाचित आजकाल मोदक बरोबर पुळ्याचे मोमो पण प्रसिद्ध झाले असतील ! ( नाहीतरी साहित्य सारखेच लागते मग काय वाढवा धंदा ...)
- उद्या सिंहगडवर तंदुरी चिकन हि मिळेल !
सर्व पुळे वासियांची आणि तंदुरी चिकन प्रेमींची क्षमा मागून .....

"स्थानिक " गोष्टींशी एकरूप "असेलेलया गोष्टी असाव्यात असे कोणाला आजकाल वाटत नाही का ? मग ते कपडे असोत/ वास्तू रचना असो / जेवण असो निदान अश्या "प्रमुख ठिकाणी " जिथे देशातून पर्यटक येतात
हे म्हणजे कसे झाले कि नाव " श्रीलंकन रेस्टारंट किंवा केरळ करी हाऊस " आणि पदार्थ बहुतेक उत्तर भारतीय ....

अ ति श य सुंदर भटकंती वर्णन आणि अप्रतिम प्रचि !
मंदिरातील काष्ठ सौंदर्य बेहद्द आवडलं !
NCadssadL456

प्रतिसादाबद्दल टर्मीनेटर, राजेंद्र मेहेंदळे, चौकस२१२, चौथा कोनाडा या सर्वांचे तसेच इतर सर्व वाचकांचेहि धन्यवाद