तुम्हाला ज्युरासिक पार्क या सिनेमातला तो जगप्रसिद्ध संवाद आठवत असेल "Life Finds way"
तसाच काहीसा अनुभव मला नुकताच आला आणि तो आपल्या सर्वाबरोबर शेअर करावा या साठी हा लेखन प्रपंच.
आणि हो या सगळ्या अनुभव प्रापंचात आपल्या मिपाचाही तेवढाच महत्वाचा वाटा आहे हे देखील मला आनंदाने नमूद करावेसे वाटते.
फक्त त्या याआधी मला तो संवाद थोडा बदलायचा आहे "धर्म आपला मार्ग स्वतः निवडतो", धर्म आणि जीवन खरेतर एकमेकांना पूरक असे काम करतात म्हणून मी तो संवाद थोडासा बदलायचे धाडस केले.
पुढे जाण्या आधी अजून एका खुलासा "या लेखाच्या निमित्ताने यत्र तत्र झडणाऱ्या सर्व धर्म चर्चांकडे दूर्लक्ष करण्यात येईल् याची गरजूंनी कृपया नोंद घ्यावी
नव्या मिपाकरांच्या माहिती करता फार फार प्राचीन काळी इथे मिपावर एक विलासराव नावाचे लेखक होते, जे त्या काळी इथे जगप्रसिद्ध होते.
आता एवढे तेल वाया घालवल्यावर मूळ विषया कडे जातो
" धर्म आपला मार्ग स्वतः निवडतो " हे वाचल्यावर तुम्हाला प्रश्न पडला असेल की धर्माचा, मिपाचा आणि विलासरांचा काय संबंध आहे?..... सांगतो....
त्याचे काय झाले फार फार वर्षांपूर्वी म्हणजे अनाहिता पूर्व काळात मिपावर "लिमाउजेट" नावाच्या लेखिका होत्या (याही मिपावर जगप्रसिद्ध होत्या बरका....)
त्यांनी २०१० साली विपश्यनेचा १० दिवसांचा कोर्स केला आणि त्याचा एका खुसखुशीत वृत्तांत त्यांनी इथे मिपावर लिहिला
https://www.misalpav.com/node/15515
त्यावरून पेरणा घेऊन आपल्या विलासरावांनी विपश्यना करायचे मनावर घेतले आणि मग ते त्यांनी फारच सिरियसली घेतले, इतके की त्यानंतर ते कोर्स मागून कोर्स करत सुटले. १० दिवस, २० दिवस, ३० दिवस, ४५ दिवस, ६० दिवस, सत्तीपठाण, वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा, टीचर्स कोर्स, काय काय आणि काय काय.
तो बाटलीतला राक्षस कसा एक काम झाले की दुसरे काम दे असा आपल्या मालका कडे हट्ट धरून उभा असतो, तोच प्रकार विलासरावांनी विपश्यनेच्या बाबतीत आरंभला. दणादणा ते कोर्स मागून कोर्स करू लागले.
बरं हे सगळं नुसतं टाईमपास म्हणून चाललं नव्हतं, तर विलासरावांनी विपश्यनेलाच आपल्या आयुष्याचे धेय्य म्हणून नक्की केले होते.
गोयंका गुरुजींना जे काही शिकवायचे होते ते सगळे शिकायचे, नुसते शिकायचे नाही तर ते पक्के आत्मसात करायचे या ध्यासाने प्रेरित होऊन ते विपश्यनेच्या मार्गातले एका मागे एक टप्पे मोठ्या वेगाने पार करत चालले होते. इतके वेगाने की सध्या त्यांना, विपश्यना वर्तुळात, कमीत कमी वेळात शिक्षक पदावर पोचलेली व्यक्ती, म्हणून ओळखले जाते. अनेक विपश्यना शिबिरांना त्यांनी विपश्यना शिक्षक म्हणून हजेरी लावली आहे.
"इष्टोरी इधर खतम नाही होती बॉस" एका क्लायमॅक्स तो अभी बाकी है.
"समान शीले व्यसनेषु सख्यम" या उक्ती प्रमाणे या वेडसर माणसा भोवती मग तशीच वेडसर माणसे गोळा झाली तर काही नवल नाही. ज्यांना विपशेनेच्या भाषेत धम्मसेवक म्हणतात. मग साधारण दोन अडीच वर्षांपूर्वी या धम्म्सेवकांनि ठरवले की "बॉस अपने नगर जिल्हेमे बहोत ही कम विपश्यना केंद्र है तो चलो नगर मे एक विपश्यना केंद्र बनाते है"
ज्यांनी विपश्यना केंद्राला भेट दिली आहे त्यांना या आयडियेमागचा वेडसर पणा लक्षात येईल. लहानातल्या लहान केंद्रावर सुद्धा एका वेळी कमीत कमी ५० ते ६० लोकांची राहायची जेवणाखाणाची व्यवस्था असते. त्यासाठी लागणाऱ्या सुविधा उभा करायच्या. जसे की जेवणाकरता स्वयंपाक घर, पिण्याच्या आणि इतर पाण्याची व्यवस्था, सांडपाण्याची व्यवस्था, धोबीसेवा, पार्किंग, सिक्युरिटी, वीज पुरवठा, या शिबिरार्थींसोबत येणाऱ्या इतर लोकांची व्यवस्था, अंतर्गत रस्ते , परिसरातील झाडांची व इतर वनस्पतींची देखभाल. त्यातही पुरुषांकरता वेगळी व्यवस्था व स्त्रियांकरिता वेगळी. एक ना दोन..... एका केंद्रा मागे अशी अनेक कामे उभी असतात
आणि हे सगळे करायचे ते केवळ दानाच्या पैशातून
आणि दान कुणाकडून घ्यायाचे तर तेही अशा व्यक्ती कडून ज्याने १० दिवसांचे कमीत कमी एक तरी शिबीर केले आहे.
आणि शिबिरार्थींकरिता ही सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून द्यायची.
या सगळ्या अटींची पूर्तता करत केंद्र उभारायचे म्हणजे काही सोपा खेळ नाही. पण या वेडसर लोकांनी तो खेळायचा निश्वय केला.
आणि या खेळातून उभे राहिले आहे कान्हूर पठार, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर येथे "धम्मपठार" नावाचे एक नवे कोरे विपश्यना केंद्र.
जागेच्या शोधापासून ते विजेच्या जोडणी पर्यंत येणाऱ्या अनंत अडचणींचा मोठ्या खंबीर पणे सामना करत हे केंद्र आता साधकां करता सुरु झाले आहे. उदाहरण म्हणून सांगतो अनेक जमिनी पाहिल्या नंतर सध्या ज्या जमिनीवर केंद्र उभे आहे ती फायनल झाली पण जागा मालकाला १५ एकर जमीन एका कट्टा विकायची होती तर विपश्यना समितीचे बजेट होते केवळ १० एकरांचे. आता सौदा तुटतो की काय असे वाटले होते. पण त्यावेळी धम्मसेवक कामी आले ते धम्मसेवक. या लोकांनी उरलेली ५ एकर जमीन विकत घेऊन टाकली. तीच गोष्ट वीज जोडणीची. एखाद्या निर्जन पठारावर जिथे दूरदूर पर्यंत कोणतीही वस्ती नाही तिथे वीज आणायची हे मोठे दिव्य काम होते पण तिथेही हेच धम्मसेवक कामी आहे आणि हा हा म्हणता ४५ खांबांची जोडणी करत वीज विपश्यना केंद्रा पर्यंत येऊन पोचली.
प्रत्येक गोष्टीला अशी कोणती ना कोणती मदत मिळत गेली आणि केंद्र उभे राहिले. दान म्हणून कोणी जांभ्याचे दगड दिले तारा कोणी स्वयंपाकाची भांडी. अगदी ठरवल्या प्रमाणे सगळ्या गोष्टी घडत गेल्या.
याचे सगळे श्रेय हे धम्मसेवक केवळ आणि केवळ "धर्मा"ला देतात आणि आम्ही केवळ निमित्त मात्र आहोत असे मोठा विनयाने सांगतात. म्हणून मी म्हणालो की " धर्म आपला मार्ग स्वतः निवडतो "
या केंद्राचे अजून बरेच काम व्हायचे बाकी आहे. पण धम्मसेवक खंबीर आहेत कारण त्यांना माहीत आहे की धर्म त्यांच्या पाठी ठाम पणे उभा आहे.
सध्या या केंद्रात एक धम्महॉल, किचन, डायनिंग, टॉयलेट, २ बोअर वेल, पाणी साठवण्या करता १ लाख लिटर ची टाकी, ४० लाख लिटर क्षमतेचे शेततळे, वीज आणि सॅनिटेशन इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत ज्या विपश्यनेचा कोर्स घेण्या करता पुरेश्या आहेत.
हे लोक म्हणतात गोयंका गुरुजींनी तर याही पेक्षा कितीतरी जास्त प्रतिकूल परिस्थितीत विपश्यना कोर्स घेतले होते. प्रसंगी त्यांनी तंबूत शिबीरे घेऊन या विदेयचा प्रसार भारतात केला होता. त्या मानाने "धम्मपठार" येथील सुविधा कितीतरी जास्त आहेत.
अनमग काय मंडळी, आहो परवाच्या रविवारी म्हणजे दि २५ फेब्रुवारी रोजी या आपल्या नव्याकोऱ्या विपश्यना केंद्रात विपश्यनेचा शुभारंभ झाला की हो.
या दिवशी केवळ जुन्या साधकांकरता आयोजित केलेल्या एका दिवसीय शिबीरा करता केवळ पारनेर मधून नाही, केवळ नगर पुणे मुंबई नाशिक जिल्ह्यातून नाही, महाराष्ट्रातून नाही, भारतातून नाही तर परदेशातून सुद्धा आवर्जून आलेल्या ६० पेक्षा जास्त साधकांनी सहभाग घेतला.
माऊताईनी मिपावर लिहिलेला लेख, ज्यामुळे आपल्या विलासरावांना प्रेरणा मिळाली व ते या कार्याचा एक भाग झाले सगळे धर्मकार्यच होते. धर्माने ते यांच्या माध्यमातून करवून घेतले.
याची देही याची डोळा मला अनुभवता आलेलया त्या प्रसंगाची ही काही क्षणचित्रे.
धम्मपठार विपश्यना व ध्यान केंद्राचे पहिले दर्शन
४० लाख लिटर क्षमतेचे शेततळे लवकरच इथे कागद पसरायचे काम सुरु होणार आहे
शेततळ्याच्या बाजूने दिसणारे धम्मपठार व एकलाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी
शिबिरार्थी
बेसिन व इतर सुविधा
भोजनक्ष
मिपाकरांसाठी सर्वात महत्वाचा फोटो
हा फोटोही तेवढाच महत्वाचा आहे.
प्रतिक्रिया
1 Mar 2024 - 4:16 pm | चित्रगुप्त
लीमाउजेट आणि विलासराव हे मिपाकर ज्या अचाट कामगिरीच्या केंद्रस्थानी आहेत, तिची हकीगत वाचून रोमांचित झालो. सर्वांना अनेक शुभेच्छा.
1 Mar 2024 - 4:23 pm | मुक्त विहारि
माहिती बद्दल धन्यवाद..
1 Mar 2024 - 4:39 pm | श्वेता व्यास
अद्भुत! आता "काय 'ध्यान' आहे!" हे वाचणं आलं.
धम्मकार्याकरिता सर्वांना शुभेच्छा.
1 Mar 2024 - 5:55 pm | गवि
उत्तम माहिती. विलासराव, माऊ - ली यांचे अभिनंदन.
1 Mar 2024 - 6:15 pm | स्वधर्म
पैजारबुवा, लेख वाचला आणि आजचा दिवस आनंदमय झाला. धन्यवाद.
मला तर वाटतं ही प्रत्येकच विपश्यना केंद्राची गोष्ट असावी. विलासराव सरांना आवर्जून भेटलो आहे आणि त्यांचा ध्यास पाहिला आहे. ते धम्माच्या मार्गावरून वेगात चाललेले आहेत.
थोडीफार अशीच गोष्ट आहे मिरजेजवळच्या भोसे येथील धम्मसुगंध या केंद्राची. माझे आदरणीय मित्र कै. शितल मुळे हे असेच त्या कामासाठी झपाटलेले होते. त्यांच्याकडून अनेक धम्मसेवकांच्या प्रयत्न व तळमळीतून हे असे काम कसकसे आकाराला आले, ते ऐकत व पहात आलो. एकेक अनुभव ऐकण्यासारखे. हे सर्व करताना कुठेही मुल्यांशी तडजोड नाही. पैसे, संस्थांच्या, शासकीय परवानग्यांच्या कामात अपरिहार्यपणे येणारा भ्रष्टाचार याचा लवलेशही तिकडे नाही. शिवाय आपण भव्य काहीतरी करत आहोत, किंवा गोयंका गुरूजींची महती वगैरे असला काही तद्दन कल्टचा प्रकार नाही. एकदम शुध्द काम. यामुळे अनेक लोकांच्या जीवनाला वेगळे, नैतिक वळण लागावे, याच शुभेच्छा.
1 Mar 2024 - 8:04 pm | Bhakti
वाह!माझ्या मैत्रिणीने दहा दिवसांच शिबीर केलं होतं,ती सांगायची सगळं.
2 Mar 2024 - 3:32 am | सोत्रि
पैजारबुवा,
धम्मपठार केंद्र सुरू झाले आणि तुम्ही तिथे एक दिवसाचे शिबीर करून आलात हे वाचून फार आनंद झाला आहे.
छान ओघवत्या लेखात मिपाऐतिहासिक रेफरंसेस देत केंद्राबद्दलची माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद, खासकरून फोटोबद्दल.
पुढच्या भारत दौऱ्यात केंद्राला भेट देण्याचा मानस आहे.
भवतु सब्ब मंगलम्
- (साधक) सोकाजी
2 Mar 2024 - 11:33 am | सौंदाळा
मस्तच, विलासराव आणि बाकी टीम म्हणजे या काळातले भगीरथच म्हणायला हवे.
इतका ध्यास आणि एका ध्येयाने प्रेरीत होऊन काम करत आहेत.
विलासरावांचा फोटो दिसला नाही वर?
3 Mar 2024 - 10:26 pm | चौथा कोनाडा
अतिशय कौतुकास्पद !!!
विलासराव यांच्या कडून फार मोठे कार्य घडले आहे.
आगामी वर्षांत धम्मपठारचा विशाल वटवृक्ष होणार या त का ही वाद नाही.
हार्दिक शुभेच्छा !
या निमित्त विलासराव लिखित अद्भुत मिपा हिट मालिका :
आमची पहिली परदेशवारी
4 Mar 2024 - 6:08 pm | टर्मीनेटर
विपश्यना, ध्यान, साधना, अध्यात्म वगैरे माझे क्षेत्र नाही, त्यामुळे त्यावर काही बोलण्याचा मला अधिकार नाही!
परंतु,
+१०००
एका 'अर्थ-सामाजिक' संकल्पनेवर आधारित असलेला भव्य उपक्रम तडीस नेण्याच्या ध्येयाने पछाडलेल्या अशाच काही 'ध्येय वेड्यांच्या' सहवासात गेल्या काही वर्षांपासून असल्याने विलासरावांचे हे 'ध्येय वेड' कसे आणि किती सकारात्मक विचारांतून आलेले असते हे चांगलेच माहिती असल्याने त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला आहे 🙏
लेख आणि फोटोज छान!
टर्मीनेटर (मोदी का परीवार)
4 Mar 2024 - 7:49 pm | अहिरावण
लगे रहो
6 Mar 2024 - 4:02 pm | विवेकपटाईत
लेख आवडला. कार्य ही आवडले. एकही पुरोगामी फोडणी कुणी टाकली नाही. याचे आश्चर्य.
6 Mar 2024 - 5:56 pm | अमरेंद्र बाहुबली
जळी स्थळी काषिटी पाषाणी पुरोगामीच दिसत असतात का??
6 Mar 2024 - 6:38 pm | वामन देशमुख
आपल्या आरोग्याची काळजी घेणारा मनुष्य 'आपल्याला जंतुसंसर्ग तर होत नाही ना' याची काळजी घेत असतो.
6 Mar 2024 - 7:43 pm | अहिरावण
कारण अशा विषयांवर कारण नसतांना गरळ ओकणारे तथाकथित पुरोगामी विज्ञानवादीच असतात.
नाही पटत?
हे बघा... एक स्वतःला विज्ञानवादी समजणारे महाशय काय लेख लिहितात ते पहा इथे क्लिक करा
या लेखावरील प्रतिक्रिया वाचनीय आणि मननीय आहेत. हे महाशय सोईस्कर नसलेल्या प्रश्नांना उत्तर देत नाहीत.
बरे हे असु द्या. हिंदूंबर दिसेल तिथे तोंडसुख घेणारे हे महाशय मुस्लिम धर्म, सुफी परंपरा आल्या की अगदी भावुक होतात.. इतके की हिंदू सुद्धा राम, कृष्णासाठी होत नाही.
नाही पटत ? हे बघा ... क्लिक करा
असले हे स्वतःला पुरोगामी समजणारे पण प्रत्यक्षात जे काही हिंदू, भारतीय असेल त्याचा द्वेष करणारे महानुभाव !!! हल्ली असली मंडळी आयुर्वेदाला शिव्या देत असतात.
7 Mar 2024 - 5:14 pm | अमरेंद्र बाहुबली
नानावटींचे लेख छान आहेत
11 Mar 2024 - 1:38 pm | नगरी
पैजारबुवां सारखे लोक मिपाचे आधारस्तंभ आहेत.त्यांच्या मुळे विलासराव यांच्या बद्दल समजले. मी ही नगरीच,पण माहित नव्हते. आता नक्कीच भेटायचा प्रयत्न करणार.
मलाही गोयन्कांची सर्व लेक्चर्स आवडतात,व इगतपुरीला जायचा मानस आहे. मी नक्की शिंदे साहेबांना भेटणार.
बघू कधी योग येतो.
20 Mar 2024 - 10:35 am | किसन शिंदे
या केंद्राचा अथः पासून इतिपर्यंतचा प्रवास विलासरावांकडूनच पाह्यला आहे. विलासराव म्हणजे खरोखरच धेय्याने झपाटलेला माणूस! गेल्या १५ वर्षांपेक्षा जास्त काळ पाहतोय, त्यांनी एकदा एखादी गोष्ट करायची ठरवली की ती पूर्ण झाल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही, 'धम्मपठार आणि तिथले विपश्यना केंद्र' हा त्यांच्या धेय्याचा उत्कृष्ट नमुना आहे.
20 Mar 2024 - 5:58 pm | प्रचेतस
हा लेख लिहून उत्तम केलेत.
28 Jul 2024 - 6:02 am | विलासराव
28 Jul 2024 - 4:49 pm | ज्ञानोबाचे पैजार
पैजारबुवा,
28 Jul 2024 - 5:08 pm | प्रचेतस
धन्यवाद.
रोपट्याचा आता वटवृक्ष होतोय.
28 Jul 2024 - 4:56 pm | ज्ञानोबाचे पैजार
https://youtu.be/97zsL-_3wy4
पैजारबुवा,