नेपाळ : एक जीवंत सांस्कृतिक संग्रहालय - भाग २ (जानकी मंदिर)

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in भटकंती
22 Jan 2024 - 11:59 pm

संध्याकाळी उठून आवरल्यावर पाच- साडे पाचच्या सुमारास आम्ही आसपासच्या परिसरातल्या भटकंतीसाठी बाहेर पडलो...
आधीचा भाग - नेपाळ : एक जीवंत सांस्कृतिक संग्रहालय - भाग १

बाहेर पडल्यावर स्थलदर्शनाची सुरुवात हॉटेल पासून अगदी जवळ असलेल्या जानकी मंदिरापासून करायचा आमचा विचार होता, पण हॉटेलच्या व्यवस्थापकाने तिथून एखाद किमी अंतरावर असलेल्या 'गंगासागर तलाव', 'बाबा भूतनाथ मंदिर 'आणि त्या परिसरात असलेली काही लहानमोठी मंदिरे आज पाहावीत आणि उद्या सकाळी आधी जानकी मंदिर, आणि राम मंदिर व दुपारनंतर तिथून तीन किमी अंतरावर जेथे श्रीराम आणि सीतामातेचा विवाह संपन्न झाला होता तो 'मणी मंडप' पाहावा असे सुचवले. प्रत्येक ठिकाणी आपले घोडे पुढे दामटण्यापेक्षा अनेकदा स्थानिकांनी केलेल्या सूचना अंमलात आणणे श्रेयस्कर ठरते असा आजवरचा अनुभव असल्याने त्याप्रमाणे करण्याचे ठरवून गंगासागर तलावाच्या दिशेने मार्गक्रमण सुरु केले.

इथे सकाळी लवकर उजाडत असल्याने संध्याकाळी अंधारही लवकर पडतो, त्यामुळे सव्वापाच-साडेपाचच्या सुमारासच जानकी मंदिरावरचे दिवे लागलेले त्याच्या समोरून जाताना दिसले.


.
अगदी रमत गमत चालूनही आम्ही जेमतेम पंधरा मिनिटांत त्या भल्या मोठ्या 'गंगासागर' तलावावर पोचलो होतो पण आरती सुरु होण्यास एक तासाहून जास्त वेळ असल्याने आसपासचा परिसर न्याहाळत हिंडत होतो. तिथे चौपाटीवर असतात त्याप्रमाणे आईस्क्रीम, भेळ-पुरी आणि अन्य काही खाद्यपदार्थांच्या गाड्या दिसल्याने हलकीशी पोटपूजा करावी ह्या उद्देशाने प्रचंड आवडणारी पाणी पुरी खायचे ठरवले. पहिली पुरी तोंडात घातली आणि काय सांगावे महाराजा... इतकी वाईट पाणीपुरी आपण ह्याआधी आयुष्यात कधीच खाल्ली नसल्याचा साक्षात्कार झाला. काहीतरी विशेष/अलौकिक असे कौशल्य अंगी असल्याशिवाय इतकी बकवास पाणीपुरी कोणाला बनवता येणे निव्वळ अशक्य!

'रन' चित्रपटातला 'कौवा बिर्यानी' फेम 'गणेश' (विजय राज) पाणचट चहा मिळाल्यावर "चाय मांगी थी बे... पानी नही" असे चहावाल्याला ऐकवत त्या ग्लासातल्या चहाने हात धुण्याचा एक प्रसंग आहे, त्याच धर्तीवर (पण इथे मूळ ऑर्डरच 'पाणी' पुरीची असल्याने तसला काही डायलॉग मारणे शक्य नसल्याने) पुढच्या पुरीतल्या अत्यंत फिकट पोपटी रंगाच्या पाण्याने हात धुवून इतकी भंकस पाणीपुरी खीलवणाऱ्या त्या महान पाणीपुरीवाल्याला कोपरापासून हात जोडून नमस्कार करावा असा विचार मनात येऊन गेला पण भावनांना थोडा आवर घालून, "बस, आता पाणीपुरी नको, एक प्लेट 'शेव बटाटा पुरी' दे" असे सांगितले. अनुभव सारखाच होता, शेव बटाटा पुरी पण अत्यंत बेचव होती. ह्या पुढे नेपाळमध्ये 'चाट' हा प्रकार कुठेही खायचा नाही असा मनोमन निश्चय करून आम्ही तिथून निघालो (पण पुढे हा निश्चय फार दिवस टिकला नाही, काठमांडूला 'पाटण दरबार स्क्वेअर' जवळ एके ठिकाणी हे दोन्ही पदार्थ चविष्ट मिळाल्याने तो मोडावा लागला 😀)

असो, तिथून निघाल्यावर 'नगर डीहवार मंदिर' पाहून मग आरतीची वेळ होईपर्यंत संपूर्ण तलावाकाठी बांधलेल्या घाटावरून चक्कर मारत त्याच्या किनाऱ्यावरची अन्य मंदिरे पाहायला सुरुवात केली.
.

.

गंगासागर तलाव आणि त्याच्या समोरच्या किनाऱ्यावर दिसणारे बाबा भूतनाथ महादेव मंदिर.


.
बाबा भूतनाथ महादेव मंदिर:

महादेवाचे हे मंदिर स्मशानात आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. मिथिला नरेश आणि सीतामाईचे पिता 'जनक' राजांच्या मृत्यनंतर त्यांच्या पार्थिवावर ज्याठिकाणी अंत्यसंस्कार केले त्या स्मशानभूमीला खेटून हे सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या आवारात शिव-पार्वतीचे कुठल्याश्या प्रसंगाचे शिल्प साकारले असून समोर एक पंचमुखी रुद्राक्षाचे मोठे झाड आणि त्यापुढे स्मशानभूमी आहे.
.

.

.

रुद्राक्षाचे झाड.

हे भूतनाथ मंदिर पाहून झाल्यावर तलावाकाठची अन्य लहान-मोठी मंदिरे पाहात आम्ही पुन्हा गंगारती होणाऱ्या ठिकाणी पोचलो तेव्हा आरती सुरु झाली होती.


.

.

.
प्राचीनकाळी हा तलाव पाण्याने भरण्यासाठी गंगाजल आणण्यात आले असल्याची आख्यायिका असल्याने गंगेसमान पवित्र मानल्या जाणाऱ्या ह्या तलावाकाठी बऱ्यापैकी भाविक आणि पर्यटक मंडळींच्या उपस्थितीत झालेली तालबद्ध गंगारती पाहून छान वाटले. आरती झाल्यावर तिथून निघालो. त्या दिवशी रक्षाबंधन होते व नेपाळमध्ये हा एक महत्वाचा सण म्हणून साजरा केला जात असल्याने कित्येक उपाहारगृहे कर्मचाऱ्यांअभावी बंद होती, त्यामुळे सकाळच्याच उपाहारगृहात पुन्हा जाऊन जेवण करून आम्ही हॉटेलवर परतलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून झाल्यावर 'साडे दहाच्या सुमारास जानकी मंदिरात प्रवेशकर्ते झालो.
'

.
सुमारे १२००० वर्षांपूर्वीचा काळ मानल्या जाणाऱ्या 'त्रेता युगात' मिथिला नरेश जनक राजाच्या राजधानीचे नगर म्हणजे आजचे जनकपूर. इ.स. १६५७ मध्ये ज्या ठिकाणी सीतेची सोन्याची मूर्ती सापडली त्या ठिकाणी जानकी मंदिर बांधण्यात आले. जनकराजाला शिव धनुष्याची प्राप्ती, सीतामातेचा जन्म, तिचे वास्तव्य आणि स्वयंवर ह्या स्थानी झाल्याचे मानले जाते.

आज जे भव्य मंदिर आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते ते स्वातंत्र्यपूर्व भारतातील ओर्च्छा (टिकमगढ) संस्थानाची राणी 'वृषा भानू' हिने १९१० साली बांधले आहे. त्याकाळी नऊ लाख सुवर्णमुद्रा ह्या मंदिराच्या बांधकामासाठी खर्च झाल्या होत्या त्यामुळे स्थानिक लोकं ह्या मंदिराला 'नौलखा मंदिर' ह्या नावानेही ओळखतात. मुघल, हिंदू आणि मैथिली अशा मिश्र वास्तुशैलीत, संपूर्णपणे दगड आणि संगमरवराचा वापर करून बांधलेल्या ह्या तीन मजली महालसदृष्य मंदिरात तब्बल साठ खोल्या असून त्या नेपाळचा ध्वज, रंगीत काचा, कोरीवकाम आणि मिथिला चित्रे, सुंदर जाळीदार खिडक्या आणि सज्जानी सजवलेल्या आहेत.

विवाह पंचमी हा इथला वार्षिक उत्सव असून त्यात सीता आणि राम यांचा विवाह असंख्य पवित्र संस्कार आणि विधींनी साजरा केला जातो. ह्या उत्सवादरम्यान मंदिर अतिशय निगुतीने सजवले जाते. दररोज असंख्य दिवे प्रज्वलित केले जात असून दिवसभर भजने गायली जातात. जगाच्या कानाकोपऱ्यातून यात्रेकरू आणि प्रवासी या पवित्र हिंदू मंदिराला विशेषतः नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये विवाह पंचमी उत्सवासाठी साठी मोठ्या संख्येने भेट देतात.

महालाच्या मध्यभागी भव्य-दिव्य असे मुख्य मंदिर असून गाभाऱ्यात अयोध्येत सापडलेल्या सीतेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. आज पर्यंत पाहिलेल्या असंख्य लहान मोठ्या मंदिरांपैकी मला सर्वात जास्त आवडलेल्या मंदिरांपैकी एक असल्याने त्याच्या सौन्दर्याविषयी मी फार काही लिहीत नाही, त्याविषयी मंदिराचे काही फोटोज पाहून आपले मत बनवावे.
.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.
महालात एक सांस्कृतिक संग्रहालय आणि ऍनिमेटेड स्वरूपात सीतेचे प्रकट होणे, तिचे बालपण ते स्वयंवर आणि विवाह असे रामायणातील काही प्रसंग दर्शवणारे दालन आहे जे पाहण्यासाठी १५ नेपाळी रुपये किंवा १० भारतीय रुपये अशी नाममात्र प्रवेश फी आहे.


.

.

.

.

.

.

.

.

.

.

.
* आज २२ जानेवारी २०२४ रोजी रामल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त जानकी मंदिरात १,२५,००० तुपाचे दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात येणार होता. त्या दीपोत्सवात मंदिर किती सुंदर दिसत असेल हे पाहण्यास उत्सुकता असल्याने त्याचे आजचे फोटोज मिळवण्याचा प्रयत्न आहे, पण तूर्तास ANI ने 'एक्स' वर पोस्ट केलेला ह्या दीपोत्सवाचा छोटा व्हिडिओ येथे पहाता येईल.

ह्या लेखाची लांबी आता आणखीन न वाढवता जानकी मंदिर परिसरातील हनुमान मंदिर आणि विवाह मंडप, तिथून थोड्या अंतरावरचे राम मंदिर आणि मणी मंडपाविषयी पुढच्या भागात लिहितो.

पुढचा भागः
नेपाळ : एक जीवंत सांस्कृतिक संग्रहालय - भाग ३ (जनकपुर)

प्रतिक्रिया

लेख आवडला. फोटोंतून जनकपूर मंदिराची कल्पना आली. सुंदर.

सौंदाळा's picture

23 Jan 2024 - 10:13 am | सौंदाळा

सुंदर आणि समायोचित लेख.
मंदीर आवडले

काहीतरी विशेष/अलौकिक असे कौशल्य अंगी असल्याशिवाय इतकी बकवास पाणीपुरी कोणाला बनवता येणे निव्वळ अशक्य!
:=)
भारी चालु आहे.मंदिर मस्त. पुभाप्र.

गोरगावलेकर's picture

23 Jan 2024 - 11:32 am | गोरगावलेकर

जनकपूर मंदिर तलावाकाठची भटकंती आवडली आणि पाणीपुरीचा किस्सा तर भारीच

मिश्र शैलीतले जानकी मंदिर खुप सुरेख दिसतंय! जनकपुरबद्दल काही महिती नव्हती!! रुद्राक्षाचे झाड पहिल्यांदाच फोटोत पाहिले!!!
पुढचे भाग लवकर येउद्यात.
like

ते दागिने छान आहेत.मुकूटशैली हळूहळू पूर्व आशियात वेगळी दिसत जाते.

राजेंद्र मेहेंदळे's picture

24 Jan 2024 - 11:51 am | राजेंद्र मेहेंदळे

जानकी मंदिराचे फोटो सुरेख आहेत. नेपाळ भटकंतीमधे काठमांडु, पशुपतीनाथ वगैरे माहीत असते पण जनकपूरविषयी फारशी माहीती नव्हती. मालिकेवर लक्ष ठेवुन आहे :) भविष्यातील ट्रिपसाठी. पुभाप्र

अवांतर--मला वाटते आपले सगळे देव आपले पूर्वजच असावेत काय? मनालीला गेलो असताना एका चालकाशी बोलताना श्री शंकराचा उल्लेख नेपाळचा किवा कुठल्यातरी जमातीचा राजा/जावई म्हणुन केलेला ऐकला होता. पार्वती तर हिमालय कन्या म्हणुनच ओळखली जाते, पण तो हिमालय पर्वत नसुन एखादा तत्कालीन राजाही असु शकेल.

राम / कृष्ण यांचे उल्लेख तर अयोध्या,नाशिक, चित्रकूट, रामेश्वर किवा मथुरा,वृंदावन्,द्वारका असे सगळ्या भारतभर आढळतातच. असो, अजुन फाटे फोडत नाही.

कंकाका|सौंदाळा|रंगीला रतन|गोरगावलेकर |अथांग आकाश|भक्ती|राजेंद्र मेहेंदळे
प्रतिसादासाठी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏

@ भक्ती

मुकूटशैली हळूहळू पूर्व आशियात वेगळी दिसत जाते.

+१०००

@ राजेंद्र मेहेंदळे

पार्वती तर हिमालय कन्या म्हणुनच ओळखली जाते, पण तो हिमालय पर्वत नसुन एखादा तत्कालीन राजाही असु शकेल.

तार्किकदृष्ट्या हे बरोबर वाटते!

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Jan 2024 - 1:39 pm | अमरेंद्र बाहुबली

दोन्ही लेख आवडले.

मुक्त विहारि's picture

24 Jan 2024 - 1:39 pm | मुक्त विहारि

पुभाप्र...

कर्नलतपस्वी's picture

24 Jan 2024 - 9:00 pm | कर्नलतपस्वी

आपले लेख वाचून असे म्हणावेसे वाटते....

काय सांगू देवा....

तुषार काळभोर's picture

25 Jan 2024 - 7:18 am | तुषार काळभोर

मंदीर प्रचंड सुंदर आहे. अगदी राजवाडा!
संग्रहालय देखील छान!
मंदिरात गर्दी कमी वाटते. ऑफ सिझन होता का?
इन जनरल, नेपाळ म्हटलं की देव आनंद, झीनत अमान आणि हरे राम हरे कृष्ण आठवतो. हिप्पी नसले तरी, पर्यटकांचे प्रमाण वाढले आहे का? साधारण भारतीय, पूर्व आशियाई आणि पाश्चिमात्य पर्यटकांचे प्रमाण कसे असते?
सोयी सुविधा भारतातील आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळांच्या तुलनेत कशा आहेत?

अमरेंद्र बाहुबली। मुविकाका । कर्नलतपस्वी । तुषार काळभोर
प्रतिसादासाठी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏

@ तुषार काळभोर

"मंदिरात गर्दी कमी वाटते. ऑफ सिझन होता का?"

जनकपूरला पोचलो त्यादिवशी न जाता त्याच्या दुसऱ्या दिवशी मंदिरात जाण्याची जी सूचना हॉटेलच्या व्यवस्थापकाने केले होती त्यामागे गर्दी हे देखील एक कारण होते. आधीचे दोन दिवस रक्षाबंधन निमित्ताने मंदिरात आयोजित केलेल्या अनेक धार्मिक कार्यक्रमांमुळे भाविकांची प्रचंड गर्दी होती, जी नंतर थोडी आटली.

"हिप्पी नसले तरी, पर्यटकांचे प्रमाण वाढले आहे का? साधारण भारतीय, पूर्व आशियाई आणि पाश्चिमात्य पर्यटकांचे प्रमाण कसे असते?"

आता हिप्पीही नाहीत आणि पूर्वीप्रमाणे अमलीपदार्थ सेवन/विक्रीला अधिकृत मान्यता नसून ती कायद्याने प्रतिबंधित आहे (अर्थात अशी बंदी असलेल्या जगातल्या सर्व देशांप्रमाणेच त्याची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते हा भाग वेगळा 😀) पण निदान कायद्याने तरी बंदी आहे! आणि हिप्पी नसले तरी पर्यटकांच्या संख्येवर त्याचा काही परिणाम झालेला आढळत नाही, अपवाद २०१५ साली तिथे झालेला प्रलयकारी भूकंप आणि कोविड काळ!
जनकपूर हे हिंदू धर्मीयांसाठी तीर्थक्षेत्र असल्याने तिथे भारतीय यात्रेकरू/पर्यटकांची संख्या मोठी असते पण काठमांडू आणि पोखरामध्ये जगभरातील पर्यटक/गिर्यारोहक फार मोठ्या संख्येने येतात.
बाकी अर्थव्यवस्थेत पर्यटनक्षेत्राचा वाटा मोठा असल्याने पर्यटकांसाठीच्या सोयी सुविधाही भारतापेक्षा तुलनेने महाग असल्या तरी दर्जेदार आहेत. इंधनाचे दर जास्त असल्याने प्रवास आणि खानपानावरील खर्च देखील आपल्या तुलनेत पर्यटक आणि स्थानिक जनता दोघांसाठी जास्त आहे.

श्वेता व्यास's picture

25 Jan 2024 - 2:24 pm | श्वेता व्यास

जनकपुरातील या मंदिरास भेट देणे अविस्मरणीय आनंद देणारे ठरेल असे वाटते.
माहितीबद्दल धन्यवाद!

कुमार१'s picture

25 Jan 2024 - 4:10 pm | कुमार१

सुंदरच !

विजुभाऊ's picture

27 Jan 2024 - 6:23 am | विजुभाऊ

मस्त लेख.
एक शंका लहानपणापासून मनात आहे.
नेपाळ मधले सगळेजण "चपट्या नाकाचे" असतात का?

प्रचेतस's picture

30 Jan 2024 - 9:29 am | प्रचेतस

जनकपूरचे जानकी मंदिर खूपच आवडले, एखाद्या राजवाड्यासारखे भले थोरले प्रशस्त दिसते आहे. संग्रहालयातल्या सीतेच्या जीवनातले प्रसंग दर्शवणार्‍या मूर्ती मात्र साधार्ण दर्जाच्या वाटल्या. आपल्याकडे गणेशोत्सवातल्या मूर्ती देखील याहून अधिक देखण्या असतात. दागिने मात्र सुरेख.

श्वेता व्यास। कुमार१ । विजुभाऊ । प्रचेतस । निनाद
प्रतिसादासाठी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏

@ विजुभाऊ

"नेपाळ मधले सगळेजण "चपट्या नाकाचे" असतात का?"

सगळेच नाही म्हणता येणार पण बहुसंख्य लोकं तसे असतात 😀
जसे आपण दक्षिणेकडून उत्तरेकडे वर जातो तसे चपट्या नाकांचे प्रमाण वाढत जाते!

@ प्रचेतस

"संग्रहालयातल्या सीतेच्या जीवनातले प्रसंग दर्शवणार्‍या मूर्ती मात्र साधार्ण दर्जाच्या वाटल्या. आपल्याकडे गणेशोत्सवातल्या मूर्ती देखील याहून अधिक देखण्या असतात."

अगदी अगदी 😀
वास्तविक आता त्या मुर्त्या खूप जुन्या झाल्या आहेत त्यामुळे त्यांचे विग, दाढी-मिशा आणि कठपुतळी सारख्या त्यांच्या यांत्रिक हालचाली खूप विनोदी वाटतात. मस्तपैकी सिलिकॉन किंवा गेला बाजार TPE पासून बनवलेल्या आणि मानवी हालचालींशी साधर्म्य ठेवतील अशा नवीन मुर्त्या बनवल्यास बघायला नक्कीच जास्त मजा येईल!

निनाद's picture

30 Jan 2024 - 9:36 am | निनाद

लेखमाला खूप सुरेख चालली आहे. चित्रे आणि लेखन दोन्ही प्रवाही!

२२ जानेवारी रोजीचा जानकी मंदिरातील दिपोत्सव...

1
फोटो सौजन्यः अमरेंद्र कुमार यादव.

drone image
ड्रोन इमेज जालावरुन साभार (प्रेषक - संत तुकाशेठ)

नेहमीप्रमाणेच बहारदार मालिका चालू आहे. पाणीपुरी हा अत्यंत वीक पॉईंट असल्यामुळे पाणीपुरी बेचव मिळाल्यामुळे तुम्हाला किती दुःख वाटले असेल याची मी कल्पना करू शकते.:)) आधीच सावध केले ते बरे झाले. जेव्हा कधी इथे फिरायला जाण्याचा योग येईल त्यावेळी ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवीन.नेपाळमध्ये आवर्जून खावे असे काय आहे, येथील स्थानिक कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत याबद्दल लेखांमध्ये जरूर लिहा. जानकी मंदिरा बाबत एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. हे मंदिर आहे हे तुम्ही लिहिलेत म्हणून बरे. मी या मंदिराचे असेच जर फोटो पाहिले असते तर कदाचित मला हे सर्व फोटो एखाद्या मशिदीचेच वाटले असते. मंदिर सुंदर आहे यात शंका नाही. तथापि आपल्या भारतातल्या मंदिरात आढळणारी जी प्रमुख वैशिष्ट्ये आहेत जसे की कळस, गोपूर किंवा मंदिरावरती असलेले कोरीव काम, शिल्पकाम जसे की देवादिकांची शिल्पे इत्यादी काहीही या मंदिरावर दिसत नाही. तुम्ही लिहीले आहे की, मुघल, हिंदू, मैथिली अशा प्रकारचे मिश्रित शैली असली तरीही एखादे मंदीर मुघल शैलित बांधावे असे तत्कालीन हींदु राणीला का वाटले असेल ? नेपाळमधील सर्व मंदिरे अशीच आहेत की केवळ हेच मंदिर असे आहे? यामागचा इतिहास जाणून घ्यायला आवडेल.

टर्मीनेटर's picture

14 Feb 2024 - 3:27 pm | टर्मीनेटर

@ श्वेता२४
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
उत्तर देण्यासाठी उशीर झालाय त्यासाठी माफ करा!
तुमच्या बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरे मालिकेच्या पुढच्या भागांमध्ये ओघाने येतीलच, त्यामुळे इथे लिहुन त्यांची पुनरावृत्ती टाळतोय.

किल्लेदार's picture

10 Mar 2024 - 7:04 am | किल्लेदार

शहर सोडून डोंगरात पळायची घाई असल्यामुळे या गोष्टी बघायच्या राहून जातात. गेल्या वेळी तब्बल आठ दिवसांच्या मुक्कामात दरबार चौकात बाहेरून मंदिरे बघितली तेवढीच. पशुपतीनाथ मंदिराला जातांना रस्त्यावरची गर्दी बघून पशुपतिनाथाला टेलिपथीने नमस्कार केला आणि परत फिरलो. या लेखामुळे मंदिरांची सहज यात्रा झाली.

विवेकपटाईत's picture

10 Mar 2024 - 9:09 am | विवेकपटाईत

लेख आवडला. जिवंत प्रवास वर्णन.

अथांग आकाश's picture

22 May 2024 - 12:09 pm | अथांग आकाश

पुढचा भाग कधी येणार?

टर्मीनेटर's picture

22 May 2024 - 7:18 pm | टर्मीनेटर

"४ जूनला निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर (तथाकथित) भक्तांचा भावनिक 'उन्माद' आणि (तथाकथित) गुलामांचे 'मातम', रडारड संपून मिपावरचे सध्याचे 'दुषित' वातावरण निवळण्यास जुलै किंवा ऑगस्ट महिना उजाडेल." असा अंदाज वर्तवतानाच हवामानखात्याने, "अशा 'दुषित' वातावरणाची ऍलर्जी असलेल्या मिपाकरांनी आपले मनःस्वाथ्य अबाधित ठेवण्यासाठी दुषित वातावरण निवळेपर्यंत मिपापासून संपूर्णपणे 'दूर' रहावे" असा सल्लाही दिला आहे 😀

आमचे 'ह. भ. प. , प. पू. , श्री श्री श्री मुक्त विहारी महाराज डोंबिवलीकर' त्यांच्या प्रवचनात नेहमी सांगतात कि, "मिपा हे कधीही नं सुटणारे व्यसन आहे".
सत्यवचन! हे व्यसन जडलेल्या माझ्यासारख्या मिपाखंराला (शब्द सौजन्य: मिपाकर वामन देशमुख) उपरोल्लिखित 'सल्ल्याचे' तंतोतंत पालन करून मिपापासून संपूर्णपणे 'दूर' राहणे निव्वळ अशक्य असल्याने त्यातल्या त्यात आपला एक सावधगिरीचा उपाय म्हणून इथल्या अनेक समान व्यसनी मिपाखंरांचा कित्ता गिरवत मी पण आता काही निवडक लेखक-लेखिकांच्या धाग्यांपुरताच 'वाचनमात्र' रहाण्याचा साधा-सोपा पण 'मनःस्वास्थ्यकारक' पर्याय निवडला आहे!
अर्थात त्याचा, "इच्छा असूनही अशा चांगल्या लेखक-लेखिकांच्या आवडलेल्या धाग्यांवर प्रतिसाद देता नं येणे" हा एक मोठा दुष्परिणाम आहे, पण 'नाईलाज को क्या इलाज'?

असो, हल्ली हवामानखात्याचे अंदाज बऱ्यापैकी अचूक ठरतात, त्यामुळे त्यांचा वरील अंदाजही बरोबर ठरून जुलै किंवा ऑगस्ट पर्यंत इथले वातावरण निवळले तर पुढचे भाग लिहिण्याचा विचार करता येईल, आणि जर तो चुकला तर आमचे एक मिपाकर मित्र आपल्या 'तुकाशेठची अमृतवाणी' मधलया एका ओवीत लिहितात त्याप्रमाणे,

तु.का. म्हणे 'वाचनमात्र' रहावे
जे जे 'आवडते' त्यांचेच वाचावे।
'उकिरड्यासमीप' फिरकू नये
चित्त राहील 'थाऱ्यावर' मिपावरी।।
ॐ मन:शांतिः मनःशांतिः मनःशांतिः

हेच पुढेही करत राहायचे! हाय काय, नाय काय 😀

ॐ मिपा:शांतिः मिपाशांतिः मिपाशांतिः

सं - दी - प

आता विसाव्याचे क्षण माझे सोनियाचे मणी
मिपा वाचता वाचता त्यांची ओढतो स्मरणी
काय सांगावे नवलं कधी होती डोळे ओले
कधी भुकटी होते गोळा कधी हसू गाली फुले

सहमत.

रात्रीचे चांदणे's picture

7 Jun 2024 - 8:37 pm | रात्रीचे चांदणे

टर्मिनेटर, निवडणुका झाल्या आणि निकालही लागला. अत्ता येऊ द्या तुमचे पुढचे भाग.

टर्मीनेटर's picture

10 Jun 2024 - 8:00 pm | टर्मीनेटर

येस सर! तिसरा भाग प्रकशित केला आहे...

नेपाळ : एक जीवंत सांस्कृतिक संग्रहालय - भाग ३