युरोप! कधी आपण युरोपात जाऊ असं वाटलंही नव्हतं, मिपा, माबो अश्या साईट्सवर जाऊन आलेल्यांचे अनूभव ऐकणे ह्यापलिकडे कधी युरोपशी संबंधं आला नव्हता. बैलपोळ्याच्या दिवशी बैलासारखं काम करून आल्यावर रूमवर पडलो होतो. मोबाईल हातात धरला नी वाट्सअप पाहीलं “I have enrolled you for ***** advanced training in Denmark in November”
बाॅसचा मॅसेज होता. काय?? डेन्मार्क?? माझा विश्वास बसला नाही. पण बाॅसलोक अश्या चेष्टा करत नाहीत. मला विश्वासच बसेना. आपण डेन्मार्कला जाणार. ज्या युरोपच्या सुरस नी चमत्कारीक कथा फक्त ऐकायला मिळतात त्या प्रत्यक्ष पहायला मिळणार म्हणून भयानक आनंदं झाला. मी तयारीला लागलो, पासपोर्ट वगैरे रेडी होताच. विसा प्रोसेसींग वगैरे सर्व सोपस्कार पार पाडले. मला एक वर्षाचा मल्टी एंट्री नव्वद दिवसांचा विसा मिळाला. मध्यंतरी आणखी दोन जण भारतातून माझ्यासोबत येणार हे कळाले नी एक माघरेबहून. माघरेब नावाचा देश ऐकला नव्हता गूगलल्यावर कळालं की अल्जेरीया लिबीया मोरोक्को वगैरे भागास माघरेब म्हणतात. आम्ही ४ जण ट्रेनींगसाठी तयार झालो. इतर दोघे गुजरातहून येणार असल्याने मी सुध्दा अहमदाबाद- दुबई - कोपनहागेन तिकीट घेतले. मी नंतर पाहील्यावर लक्षात आलं की दिवाळीच्या सुट्ट्या लागूनच येताहेत मग बाॅसची परवानगी घेऊन मी दिवाळी पॅरीसलाच साजरी करायचं ठरवंलं. ठरलं! मी कोपनहेगन ते पॅरीस स्कॅन्ड्न्वीयन एअरलाईन्सचे तिकीट बूक केले. ते मला ९००० (४४युरो) ला पडले. (तिकडच्या मानाने फारच स्वस्त नाही का?) मी तयारीला लागलो. थाॅमस कूकच्या ओफीसला धडका देऊन २०० युरो घेऊन आलो. माझ्यासाठी १०० नी १०० सोबत्यासाठी. “जिथे जाल तिथले व्हा” हा माझा नियम असल्याने तिथे जाऊन त्यांचे पदार्थ खाऊ हे ठरवून जास्त खायचे पदार्थ मी घेतले नाहीत. हा सर्वात चुकीचा निर्णय ठरला :( एक मॅगीचं मोठं पॅकेट घेतलं ते बरं केलं. बरोबर चितळे काजू कतली, हल्दीराम संत्रा बर्फी बळजबरीने देण्यात आली. इतकं गोड मला नकोसं झालं होतं.
शेवटी दिवस ऊजाडला अहमदाबाद एअरपोर्ट ला पासपोर्ट दाखवून प्रवेश केला मी आमचा एक दुसरा बाॅस आणी सार्थक अश्या आम्ही तिघांनी प्रवेश केला. “ऐमीरेट्सला” ला चेकीन करून इमीगिरेशनला पोहोचलो. तिथे आम्ही दोघे पास झालो पण सार्थक (सोबती) अडकला. त्याच्या पासपोर्ट वर नेपाळहून यायचा
शिक्का होता. पण नेपाळला गेल्याचा शिक्का नव्हता. पासपोर्ट ओफीसर नकाराची मान हलवत त्याच्या साहेबाच्या कॅबीन मध्ये गेला. तोपर्यंत सार्थकचं तोंड पाहण्यासारखं झालं होतं. तो आणी मी पहील्यांदाच विदेशात चाललो होतो. “सु थयो?” म्हणून आमच्या बाॅसने त्याला विचारले. तो हाताने काही नाही म्हणून गेला नी शिक्का मारून पासपोर्ट सार्थकला दिला. आम्ही. सूटकेचा निश्वास सोडला. सार्थक ने प्रचंड धसका घेतला होता. मला ऐअरपोर्टलाच बोलला की तुझ्यासोबत बूक केलेली पॅरीसची फ्लाईट मी रद्द करतो ना कोपनहेगन वरूनच परत येतो. हे लोक मला पकडून जेल मध्ये टाकतील. आम्ही खुप हसलो. त्याला १२ दिवसाचाच विसा मिळाला होता.
आम्ही विमानात प्रवेशलो, मी ह्या आधी इंडीगोचं तीन इकडे तीन तिकडे असे सहाच सीट असलेलं विमान पाहीलं होतं, पण इथे तर प्रचंडं मोठं एका रांगेत दहा सीट असलेलं विमान होतं. फक्त विमानाने लादेनने ट्वीन टाॅवर कसे पाडले हा प्रश्न मला पाडला होता हे विमान पाहून लक्षात आलं का लादेनने केवढं खुळ धडकवलं असावं. चुकीच्या वेळी चुकीचा विचार. प्रवेश केल्या केल्या इतक्या अलिाशान सिट्स वगैरे पाहून मी भारावून देलो पण बाॅसने सांगीतले की आपल्या जागा इकोनोमीत आहेत .हा बिसीनेस क्लास आहे
एका रांगेत खिडकी पकडून बसलो. सार्थक ने खिडकी धरली, ढठरल्याप्रमाणे खिडकीची अदलाबदल दुबइत होणार होती, विमानात प्रचंड सोयीसुविधा होत्या पुढील सीटच्या मागल्या स्क्रिनवर सिनेमा पाहता येणार होता, गेम खेळता येणार होता, एअरशो तसेच विमानाला बसवलेल्या कॅमेराने लाईवही पाहता येणार होतं. एअर होस्टेस ने ऊशी, ब्लॅंकेट नी हेडफोन आणून दिले. मी प्रवासात पाहण्यासाठी “फौदा” नावाची वेबसीरीज डाऊनलोड करून ठेवली होती पण ती ज्यू मुस्लिम संघर्षावर असल्याने प्रवासात पाहू नको असा सल्ला मला आला. फ्लाईट मध्ये वेज हिंदू मील आलं पण ते इतकं चांगलं नव्हतं. दुबईत लॅंडल्यावर आम्ही पुढील कोपनहेगन फ्लाईटच्या गेटवर आलो. येताना प्रचंडं मोठी दुकाने एअरपोर्टभर पसरलेली होती. तीथे गेटवरही सार्थक चा पासपोर्ट भिंग वगैरे लावून चेक करण्यात आला, त्याला पुन्हा धास्ती बसली. मी दुबई एअरपोर्ट वायफायला मोबाईल कनेक्ट केला नी लगेच वेळ आपोआप दुबईप्रमाणे सेट झाली. दुबईहुन फ्लाईट निघाली. मी आता खिडकी पकडली होती. वरून बुर्ज खलिफा दिसली. आकाशातूनही ती इमारत भव्य दिसत होती. समोरच्या स्क्रिनवर दिसत होतं विमान कुठल्या देशावर आहे ते. बराच वेळ समूद्र दिसत हता नंतर विमान इराक वर आलं तेव्हा इराकमधील टेकड्या स्पष्ट दिसत होत्या. हिरवळ नव्हती. मध्ये जेवण नी झोप घेतली. शेवटी कोपनहेगन जवळ आल्यावर ऊठलो. जसजसं कोपनहेगन जवळ येऊ लागलं समुद्रात ऊभारलेल्या पवनचक्क्या दिसू लागल्या. कोपनहेगन ला लॅंड झालो. विमानतळावर आजिबात गर्दी नव्हती, प्रचंडं शांतता होती, काचेच्या पलिकडे विमान लॅंड होत असूनही आवाज नव्हता. लगेज बेल्टवरून ऊचलून आम्ही बाहेर आलो तर प्रचंडं थंडी झोंबली, एअरपोर्ट वातानबकूलीत होते हे लक्षात आले. एक टॅक्सी बूक करून आम्ही आमच्या “अर्बन हाऊस” हाॅटेल कडे निघालो. टॅक्सीवाला तुर्की मुस्लिम होता. आम्हाला भारतातून म्हणजे हिंदू का असे विचारता झाला. नंतर गप्पात इस्रायलचे अत्याचार आमच्या बाॅसला सांगू लागला. आम्ही दोघे खिडकीतून सूंदर इमारती, भव्य ट्रॅफीकरहीत आखीव रेखीव रस्ते डोळे भरून पाहत होतो. आपल्या इथे जसे डबके असते तसे तिथे तळे होते, त्यात बदक होते, भटके कुत्रे, गायी दिसंनात, टॅक्सी म्हणून मर्सीडीज होती. २० मिनीटाने आम्ही हाॅटेलला पोहोचलो. टॅक्सीचे बाल ३५० डॅनीश क्रोन्स झाले होते म्हणजे जवळपास चारेक हजार :(
प्रतिक्रिया
18 Jan 2024 - 5:15 pm | चित्रगुप्त
वा. बहुप्रतीक्षित लेखमालिकेची सुरुवात झकास झाली आहे. पुढील भाग लवकर टाका. भरपूर फोटो पण येऊद्या.
18 Jan 2024 - 5:22 pm | कंजूस
सगळं लिहा .
वाचायला गंमत वाटते. अमेरिकेतल्या नातेवाईक आहेत,येतात पण त्यांना आम्ही काही विचारत नाही,ते सांगत नाहीत. तुम्ही लिहा. युरोपातलं लेखन पुस्तकातलं वेगळं असतं. आपलं वेगळं.
हमास - इस्राअलचं टीव्हीवर
दिसतं. पण प्रत्यक्ष तिथे जवळ वेगळं.
18 Jan 2024 - 6:11 pm | Bhakti
मस्तच रे! येऊ द्या डिटेलवारी!
18 Jan 2024 - 6:21 pm | सरिता बांदेकर
कोपनहेगन कधी जाणं झालं नाही.संपूर्ण वर्णन वाचायला आवडेल.
पुभाप्र
18 Jan 2024 - 6:43 pm | राजेंद्र मेहेंदळे
मस्त झालेय सुरुवात. पण फोटो पाहीजेतच. नाहीतर काय मजा राव?
आता पुढचे भाग डिट्टेल वारी येउद्या.
रच्याकने- पासपोर्टवर नेपाळला यायचा शिक्का होता पण जायचा नव्हता म्हणजे? असे पण होउ शकते? बाब्बो
आणि एक--युरो घ्यायला थॉमस कूककडे? कोणीही बँक किवा फोरेक्स वाला देउ शकतो ना?
पुभाप्र
18 Jan 2024 - 7:14 pm | अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद. फोचो पुढील भागात डकवतो. तो नेपाळला गाडीने गेला होता नी परत येताना विमानाने आला होता.(की ऊलट होतं)
एक नाही २०० युरो.
18 Jan 2024 - 8:38 pm | कुमार१
सुरुवात झकास !
18 Jan 2024 - 8:55 pm | कर्नलतपस्वी
आता मस्त फोटो येवू द्या.
18 Jan 2024 - 10:09 pm | मुक्त विहारि
Emirates is my favourite...
19 Jan 2024 - 1:04 pm | टर्मीनेटर
+१०००००
19 Jan 2024 - 1:24 pm | अमरेंद्र बाहुबली
एअर इंडिया एमीरेट्सपेक्षा स्वस्त असूनही त्य्चे तिकीट बूक केले नाहीत म्हणून मला नंतर झापण्यात आले होते. :(
19 Jan 2024 - 7:03 am | प्रचेतस
मस्त सुरुवात अबा, छायाचित्रेही येऊ द्यात.
19 Jan 2024 - 8:24 am | Nitin Palkar
केवळ माहिती साठी... परदेशी चलन घरपोच आणून देणाऱ्या अनेक कंपन्या, सहल कंपन्या आहेत, त्यांच्याशी घासाघीस करून विनिमय दरात थोडी सूट मिळवता येते (व्हिसा आणि विमानाचे तिकीट हातात हवे).
19 Jan 2024 - 9:15 am | अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद. चित्रगुप्त काका, कंकाका, भक्तीताई, सरिताताई (तुमचाही ऊल्लेख आहे पुढील लेखांत), राजेंद्रसर, कुमार १ काका,मुविकाका, प्रचेतस सर.
सर्वांचे आभार.
19 Jan 2024 - 12:44 pm | टर्मीनेटर
मस्त सुरुवात 👍
फोटोयुक्त पुढील भागाच्या प्रतिक्षेत!
😀
हा असा अनुभव सप्टेंबर मध्ये नेपाळहुन परतताना मुंबई एअरपोर्टवर आला होता!
मी, वडील आणि माझा भाचा अशा तिघांनी रेल्वेमार्गे नेपाळमध्ये प्रवेश केल्याने आमच्या पासपोर्टवर नेपाळमध्ये प्रवेश केल्याचा शिक्का नव्हता. मुंबईत परतल्यावर आम्ही तिघेही शेजार-शेजारच्या स्वतंत्र काउंटरवर इमिग्रेशन साठी उभे होतो. मला आणि वडीलांना काही अडचण आली नाही पण भाच्याला मात्र इमिग्रेशन ऑफिसरने "नेपाळ मध्ये प्रवेश केल्याचा शिक्का का नाही" ह्याचे स्पष्टीकरण विचारुन विनाकारण खोळंबा केला होता. हा प्रसंग भारताबाहेर घडला असता तर त्यात काही वावगे वाटले नसते, त्यांना भारत-नेपाळ बॉर्डर क्रॉसींग नियमांविषयी* सखोल माहीती असलीच पाहीजे अशी अपेक्षा नाही. परंतु तुम्हाला अहमदाबाद आणि आम्हाला मुंबई एअरपोर्टवर असा अनुभव यावा हे फार विचित्र वाटते, 'इमिग्रेशन ऑफिसर' सारख्या महत्वाच्या/जवाबदारीच्या पदावरही अशा अडाणी लोकांची वर्णी कशी काय लागते ह्याचे नवल वाटते!
*भारतीय नागरीकांना भारतातुन नेपाळमधे आणि नेपाळी नागरीकांना नेपाळमधुन भारतात रस्ता किंवा रेल्वेमार्गे (इकडुन तिकडे किंवा तिकडुन इकडे) जाण्या-येण्यासाठी पासपोर्ट लागत नाही. पण विमानमार्गे प्रवास करायचा असल्यास मात्र प्रवाशाकडे 'पासपोर्ट' किंवा 'मतदार ओळखपत्र' असणे अनिवार्य आहे.
(भारत - नेपाळ किंवा नेपाळ - भारत अशा विमान प्रवासाच्या बाबतीत आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हींग लायसन्स किंवा अन्य कोणत्याही सरकारी/खाजगी ओळखपत्राची किंमत शुन्य आहे. फक्त 'पासपोर्ट' किंवा 'मतदार ओळखपत्र'च ग्राह्य मानले जाते.)
19 Jan 2024 - 2:35 pm | गोरगावलेकर
परदेशवारी अजूनतरी माझे स्वप्नच. येऊ द्या पटापट फोटोंसहित पुढील भाग.
19 Jan 2024 - 5:23 pm | श्वेता व्यास
छान सुरुवात केलीत, पुढील अनुभव वाचण्यास उत्सुक आहे.
20 Jan 2024 - 1:49 pm | रंगीला रतन
झक्कास. और आंदो....
पुभाप्र.
22 Jan 2024 - 11:56 am | मनो
अबा, मघरेब مغرب mag̠ẖrib हा अरबी शब्द आहे, त्याचा अर्थ - पश्चिम - सूर्यास्त होतो ती दिशा. हे देश मक्केच्या पश्चिमेस मावळतीच्या अंगास असल्याने त्यांना हे नाव पडले आहे.
22 Jan 2024 - 9:20 pm | अमरेंद्र बाहुबली
माहीतीबदिदल धन्यवाद. वरील सर्व प्रतिक्रीया देणार्यांचे आभार.
23 Jan 2024 - 8:03 am | नचिकेत जवखेडकर
मस्त लेख! पुढचे भाग लवकर येऊ द्या. मला पण हा प्रश्न पडला होता की जरी
गाडीने नेपाळला गेलं असेल कोणी तरी कोणत्याही देशाची हद्द पार करताना पारपत्रावर स्टॅम्प असणारच की! परंतु टर्मिनेटर यांनी त्याचं उत्तर दिलंय वरती.
24 Jan 2024 - 6:11 pm | चौथा कोनाडा
व्वा ... एक नंबर मस्तच ! तपशिलात डिटेलवारी लिहिल्याने लैच विंटरेस्टींग वाटतंय !
झकास शैली !
चीयर्स भाऊबळी !
पुभाप्र !
24 Jan 2024 - 10:03 pm | अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद.