दिवाळी अंक २०२३ - एक प्रवास असाही

मित्रहो's picture
मित्रहो in दिवाळी अंक
12 Nov 2023 - 12:00 am
1

अंधार, फक्त अंधार, सर्वत्र फक्त काळोख आणि काळोख होता, अशा काळोखातून आमची गाडी चालली होती. फार रात्र झाली नसेल, साडेआठ ते नऊ वाजले असतील, पण मध्यरात्र झाल्यासारखे वाटत होते. माणूस, प्राणी, झाडी काही दिसत नव्हते. अगदी रस्त्यावर उगाच भुंकणारी कुत्रीदेखील दिसत नव्हती. ना आमच्या बाजूने गाडी जात होती, ना दुसऱ्या बाजूने गाडी येत होती. संपूर्ण परिसरावर फक्त काळोखाचे राज्य आहे आणि आम्ही त्यात सापडलो आहोत या थाटात आमची सुमो चालली होती. आपण येताना याच रस्त्याने आलो होतो का.. अशी शंका मला आली. त्या शंकेचे निरसन होण्याची शक्यता नव्हती, कारण येताना आम्ही बसमधून आलो होतो. गाढ झोपेत होतो, तेव्हा रस्ता लक्षात असणे शक्यच नव्हते. परतीच्या वेळेला जो काही तमाशा घडला होता, त्यामुळे परतीच्या प्रवासात आम्ही जागे होतो. सुमोमध्ये मी, माझा मित्र आणि आमच्या दोघांच्या बायका असे चार आणि ड्रायव्हर होतो. ड्रायव्हरसुद्धा तासाभरापूर्वी सुमो केली, त्यातला - म्हणजे फार ओळख वगैरे नाही. आम्ही तामिळनाडूमधल्या कुठल्यातरी भागातून जात होतो आणि आजूबाजूला अंधार होता. अशा परिस्थितीत एकमेकांकडे न बघताही आमच्या चेहऱ्यावर काय भाव असतील, याचा अंदाज आला होता. अशा या भयाण काळोख्या शांततेत एका ठिकाणी मध्येच कुठेतरी गाडी थांबली. त्या क्षणाला मनात विचित्र शंका आल्या - गाडी का थांबली? आता हा काय करणार? ड्रायव्हर खाली उतरला, अंधारात कुठे तरी चालायला लागला. काही क्षण भीती दूर झाली, तरी अशा अंधारात ड्रायव्हर कुठे चालला ते कळत नव्हते. चौघांनाही एकच प्रश्न सतावत होता. "आपण का आलो इथे?"

मी आणि माझ्या मित्राचे लग्न एकाच दिवशी झाले होते. आम्ही दोघे अगदी शाळेपासूनचे मित्र होतो. लग्न झाले, त्या वेळी तो बंगलोरला तर मी पुण्याला राहत होतो. लग्नानंतर दीड वर्षांनी मीदेखील बंगलोरला गेलो. तेव्हा आम्ही आजूबाजूलाच राहायचो. लग्नाचा वाढदिवस आला, तेव्हा आपण आता दोघे मिळून वाढदिवस साजरा करायला कुठे बाहेर जाऊ या असे ठरविले. त्याकाळी कार वगैरे नव्हती, तेव्हा बसचे पॅकेज घेऊ असा विचार केला. अशात आमच्या दोघांकडेही बाळ येणार होते, तेव्हा आमच्या सोबतच्या स्त्रीवर्गाची अतिरिक्त काळजी घेणे जरुरी होते. मित्र बरीच वर्षे बंगलोरला राहत असल्याने सारे त्यानेच ठरविले. मी तर बंगलोरला आल्यानंतर प्रथमच बाहेर कुठे फिरायला जात होतो. आम्ही बंगलोरवरून बस करून म्हैसूरमार्गे उटीला पोहोचलो. रात्री म्हैसूर आले, तेव्हा मला जाग आली होती. म्हैसूर जाईपर्यंत जागा होतो आणि म्हैसूरचा महाल बाहेरुन का असेना, मी पहिल्यांदाच बघतिला. पुढील प्रवास मात्र छान झोपेत गेला आणि सकाळी सात-साडेसात वाजता आम्ही उटीला पोहोचलो.

आता परतीच्या वेळेला प्रश्न पडला होता 'आपण इथे का आलो?' मी समोरच्या सीटवर बसलो होतो. तिघे मधल्या सीटवर बसले होते. मी गाडीत बसूनच ड्रायव्हर कुठे दिसतो का ते बघत होतो. त्या अंधारात गाडीतून खाली उतरायची हिंमत होत नव्हती. मित्राने विचारले,
"कुठे गेला रे तो?"
"माहित नाही, समोर कुठेतरी अंधारात गेला."
"इथे तर आसपास काहीच दिसत नाही."
"हो ना यार, काय करतोय हा अंधारात?"
आमचा असा संवाद चालू असतानाच अंधारात दोन मानवसदृश आकृत्या आमच्या गाडीच्या दिशेने चालत येताना दिसल्या. गाडीजवळ येताच त्यातला एक ड्रायव्हर होता, हे लक्षात आले. त्याच्यासोबत आणखीन एक व्यक्ती होती. दोघे तामिळ भाषेत जोरजोरात बोलत होते. ती व्यक्ती आमच्या गाडीच्या ड्रायव्हरला सुनावत आहे असे वाटले. आजूबाजूच्या दोन व्यक्ती तुमची भाषा सोडून बोलत असतील, तर ते एक तर भांडताहेत किंवा कुजबुज करताहेत असेच आपल्याला वाटते. त्या व्यक्तीने एक आगकाडी काढून पेटविली. ती पेटती काडी घेऊन ती व्यक्ती गाडीच्या मागे गेली. त्या उजेडात त्या व्यक्तीच्या अंगावरील कपडे दिसले. तेव्हा ती व्यक्ती पोलीस किंवा कदाचित फॉरेस्ट डिपार्टेमेंटमध्ये काम करणारी असावी, असे वाटत होते. ते दोघे काय बोलत होते, कोणत्या भाषेत बोलत होते काही समजायला मार्ग नव्हता. बहुतेक तामिळ भाषेतच बोलत असावे. काही वेळाने ड्रायव्हर गाडीत बसला आणि गाडी सुरु केली, तेव्हा आमचा जीव भांड्यात पडला. गाडी सुरू करताच ड्रायव्हरने मला सांगितले,
"सार, ट्वेंटि रुपीज"
मी लगेच वीस रुपये काढून त्या व्यक्तीला दिले आणि आमची गाडी चालायला लागली. गाडी थोडी पुढे आल्यावर मी विचारले
"कौन था वो?"
"फॉरेस्टवाला है यहा फॉरेस्ट चौकी है."
"किधऱ?"
"उधर है पॉवर नही है अभी इसिलिये अंधेरा है." आमच्या ड्रायव्हरच्या बोलण्यावरुन त्याला हिंदी बऱ्यापैकी बोलता येते याचा अंदाज आला.
"ट्वेंटी रुपीज क्यू?"
"फॉरेस्ट है रातमे ये गेट बंद होता है, ऐसे छोडते नही वो."
"फिर रातमे बंगलोर जाना कैसे?"
"उधरसे दुसरा रस्ता है पर वो लंबा रस्ता है. टू अवर्स एक्स्ट्रा"
"अरे ऐसी रातमे ये जंगलके रास्तेसे आनेका ही क्यू?" हा शेवटला प्रश्न मी मनातच ठेवला. मी आमचा आतापर्यंतचा प्रवास आठवत होतो.

आम्ही उटीला सकाळी नऊपर्यंत पोहोचलो होतो. माझ्या मित्राने आधीच बोलून ठेवले होते, त्यामुळे आमच्या रूम प्रशस्त आणि सुंदर होत्या, तसेच आम्हाला इतरांसारखे मिनीबसमध्ये सर्वांबरोबर प्रवास करायचा नव्हता, तर आमच्यासाठी वेगळी कार बुक केली होती. याचा आणखी एक फायदा होतो की तुम्ही तुमच्या शेड्यूलप्रमाणे जाऊ शकता. उगाच घाई होत नाही, तसेच कुणाची वाट बघत थांबावे लागत नाही. अर्थात या साऱ्याचे वेगळे पैसे द्यायचे होते. पुढचे तीन दिवस दोन रात्री उटीमधल्या हॉटेलमध्ये काढायच्या होत्या. उटी आणि कुन्नूर असे आमचे पॅकेज होते. पोहोचलो त्या दिवशी फारसे काही करायचे नव्हते. आमच्या ड्रायव्हरचा फोन आला. "उद्या सकाळी नऊ वाजता तयार रहा" असे सांगितले. त्या दिवशी फार काही काम नव्हते. आमचे हॉटेल उटी मार्केटच्या जवळच असल्याने आम्ही मार्केट फिरून आलो. खरेदी झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर नऊ वाजता ड्रायव्हर आला आणि आम्हाला कुन्नूरला जायचे आहे सांगितले. साधारण पंचवीस कि.मी. अंतर होते, तरी पोहोचायला जवळजवळ एक तास लागला. रस्त्याने चहाचे मळे होते. आयुष्यात पहिल्यांदीच असे मळे बघत होतो. आता सांगू शकतो की मुन्नार अधिक सुंदर आहे. आता नाव आठवत नाही, पण एक बाग बघितली होती. भारतातील बहुतेक साऱ्या चित्रपटांचे शूटिंग इथेच झाले, असेच तो गाइड सांगत होता. काश्मीरमधील दहशतवादाच्या त्रासामुळे रोजा चित्रपटातील बरेच प्रसंग कुन्नूर, उटी परिसरात शूट झाले होते. रोजा चित्रपटाचे शूट झाले अशा बऱ्याच जागा त्याने दाखविल्या. लॅम्ब रॉक पॉइंट, एक दोन धबधबे बघितले आणि संध्याकाळपर्यंत आम्ही उटीला आमच्या हॉटेलमध्ये पोहोचलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही नाष्टा केला आणि हॉटेलमधून चेकआउट केले. उटीच्या आसपासचाच भाग बघायचा असल्याने आम्ही जरा उशिराच निघालो. उटी असले, तरी दुपारी गर्मी जाणवत होती. जवळचाच उटी तलाव बघितला. बॉटॅनिकल गार्डन, रोझ गार्डन बघितले. आणखी काय बघितले ते आता काही आठवत नाही. जेवण करून आम्हाला डियर पार्क आणि दोडाबेट्टा शिखर बघायला जायचे होते. दोडाबेट्टा शिखराकडे जाणारा रस्ता घाटाचा होता आणि रस्ता फारसा चांगला नव्हता. खूप नाही, पण गचके बसत होते. कार असल्याने गचके काहीसे सुसह्य वाटत असले, तरी दोन प्रेग्नंट स्त्रियांना घेऊन इथे का आलो, असे सारखे वाटत होते. दोडाबेट्टा शिखरावर पोहोचताच हे सारे विचार बाजूला पडले. खूप सुंदर जागा होती. दिवसभराची गर्मी, थकवा सारा पळाला. शिखरावरून सारा परिसर बघायला छान वाटत होते. साधारण तासभर तिथे घालवून आम्ही निघालो. आम्हाला साडेसातपर्यंत उटीच्या बस स्टँडजवळ बस पकडायची होती. उटीची सहल संपली होती, परतीचा शेवटला टप्पा उरला होता.

आमची सुमो अंधारातून जात होती, तसे विविध शंकांनी मन ग्रस्त होत होते. ड्रायव्हरने बदमाशी केली किंवा कुणाच्या सोबतीने काही चोरी वगैरे करायचा प्रयत्न केला, तर? जंगलाचा भाग असल्याने ताशी शक्यता कमी वाटत होती, पण मोठी भीती होती जंगलातल्या प्राण्याने हल्ला केला तर.. काहीही झाले तरी तो जंगलाचा भाग होता. तिथे वाघ, बिबटे, हत्ती यासाररखे वन्य पशू राहत होते. हा सारा काही विचार करूनच हा रस्ता रात्री गाड्यांसाठी बंद करण्यात आला होता. आम्ही बळजबरीने प्राण्यांच्या भागात जात होतो. चौकीदाराला पटवून बंगल्यात राहण्यासारखे होते, तेव्हा मालक आला तर काय, ही भीती होतीच. मी ड्रायव्हरला विचारले,
"पहिले बोलते तो इधरसे नही आते."
"नही सार, लेट हो जाता."
"अरे भाई, जल्दी किसको है, बंगलोरही तो पहुचना है."
माझ्या या उत्तरावर ड्रायव्हर काही बोलला नाही. थोडा वेळ शांततेत गेला. ड्रायव्हरने गाडी थांबवून हरणांचा मोठा कळप दाखविला. रात्रीच्या अंधारात पळणारा हरणांचा कळप सुंदर दिसत होता. काही वेळाने गाडी थांबवून त्याने आम्हाला दूर एक हत्ती दाखविला. मग एक रानगवा दिसला, तसेच काही रानटी कुत्री दिसली. थोडे अंतर जाताच त्याने सडन ब्रेक मारल्यासारखी गाडी थांबविली. समोर एक हत्तीण तिच्या पिल्याबरोबर रस्ता ओलांडत होती. दृश्य खूप सुंदर होते, परंतु वेळ चुकीची होती. आता पर्याय नव्हता. असेच प्राणी बघत आम्ही चाललो होतो.
"कभी कभी सार टायगर भी दिखता है. पर ये जंगलमे जादा नही है."
अरे बाबा, अशा अर्ध्या रात्री जंगलात शिरून वाघ बघायची कुणाला इच्छा आहे! जर खरेच तसे बघायचे असेल, तशी रितसर तयारी करून येऊ. माझ्या मनातून तो जंगलात प्रवेश केला तो प्रसंग जात नव्हता. मी विचारले,
"हमने गेटसे एंट्री करनेके लिये पैसा दिया, अब बाहार निकलेंगे तब फिरसे देना पडेगा."
"नही, एक्झिट मे जरुरत नही."
"ऐसे कैसे?"
"एक्झिटमे कोई नही होता." मला तरी त्याचे गणित पटत नव्हते. आता अगदी तुरळक का असेना, विरुद्ध बाजूने येणाऱ्या गाड्या दिसत होत्या. आमची गाडी चालली होती. अशात आमच्या गाडीच्या बाजूला एक गाडी थांबली. आमची गाडीदेखील थांबली.

बस थांबत होत्या, जात होत्या, परंतु आमची बस यायची होती. आम्ही सातपर्यंत बस स्टँडवर पोहोचलो. तिथे जवळच आमच्या ट्रॅव्हल्सची बस येणार होती, तिथे उभे होतो. काही वेळाने ट्रॅव्हल एजंटने आम्हाला बोलावले आणि सांगितले,
"आप चार वो बस मे जाईये."
आम्ही आमच्या बसजवळ आलो आणि चाटच पडलो. बस पूर्ण पॅक होती. मित्राने विचारले
"कहॉं बैठना है बस तो पॅक है?"
"बॅक जाईयें, जगह है." मी आणि माझा मित्र आत गेलो आणि अगदी शेवटल्या रांगेत दोन वेगवेगळ्या टोकाला चार जागा शिल्लक होत्या. घाटाच्या रस्त्यावरुन दोन प्रेग्नंट बायकांना मागच्या रांगेतल्या जागेवर प्रवास करणे अशक्य होते.
"हमे बोला था, सीट नंबर सेमही होगा."
"आगे जगह नही है. बस कुन्नूरसे ही पॅक आयी है."
"हमने बोला था हमे आगेकी सीट चाहिये."
"अभी नही है, अ‍ॅडजस्ट कर लिजिये. आपका तीन दिनका पैकेज है. आज आपके ट्रवेल्सकी बस नही आयी है. ये दुसरे ट्रॅव्हेल्सकी है, इसमे जगह नही है."
"वो हमे पता नही. हमे आगेकी सीट दो, नही तो पैसा वापिस कर दो."
"पैसे की लिये ऑफिसमे जाके बात करो." मी आणि माझा मित्र आम्ही दोघेही ऑफिसमध्ये गेलो. मी तिथल्या माणसाला सारी परिस्थिती समजावून सांगितली. तेवढ्यात माझ्या मित्राने ट्रॅव्हल्स कंपनीच्या बंगलोर ऑफिसला फोन करून सांगितले. तिथला माणूस उठून परत बसजवळ आला. मी त्याच्यासोबत आलो. ते दोघे काय बोलले माहीत नाही, तो परत ऑफिसमध्ये आला. त्याने इकडे तिकडे फोन लावले.
"नही सार, आज सारी गाडीया पैक है. आप टॅक्सी करके जाईये."
"ठीक है. पर उतना पैसा रिटर्न कर दिजीये."
"रिटर्न नही होता."
"जो भी एक्स्ट्रा था, उसका एक्स्ट्रा पैसा दिया तो अभी यहासे बंगलोर रिटर्नका जितना होगा वो दे दो." परत त्याने फोनाफोनी केली. बंगलोरला फोन लावला. शेवटी माणशी ३०० रुपये याप्रमाणे त्याने बाराशे रुपये परत केले. एक व्यक्ती मघापासून हा सारा तमाशा बघत ऑफिसच्या बाहेरच उभी होती. मी आणि मित्र बाहेर येताच त्या व्यक्तीने लगेच विचारले,
"टॅक्सी चाहिये?"
"हां"
"आईये, एकदम आरामसे जायेंगा. बसवालोंका ऐसाही नाटक रहता है." असे म्हणत ती व्यक्ती आम्हाला रस्ता ओलांडून समोरच्या दुकानात घेऊन गेली. बंगलोरच्या टॅक्सीचे चार हजार सांगितले. आता पर्याय नव्हता. तरीही आमच्या आतापर्यंतच्या अनुभवावरुन गाडी चांगली आहे ना ते विचारले तर त्याने लगेच
"सुमो है सार, वो सामने खडी है." गाडी चांगली वाटत होती, तेव्हा कसलीही घासघीस न करता आम्ही लगेच पैसे भरले. दोघीही बस जिथे उभ्या होत्या तिथेच सामानाकडे लक्ष ठेवत बसल्या होत्या. आम्ही सुमोजवळ आलो. ड्रायव्हर वाट बघत उभा होताच. त्याने सामान आत चढविले. आम्ही गाडीत बसलो आणि सर्वांनी सुस्कारा टाकला. जास्त पैसे भरून का असेना, आता सुखाचा प्रवास होणार. पण पुढच्या दहा-पंधरा मिनिटांतच आमची सुमो गडद काळोखातून जाऊ लागली. आम्ही चौघे प्रचंड घाबरलो .

आता जंगलात आमच्या बाजूला ही कोणती गाडी आहे आणि यांच्याशी हा ड्रायव्हर काय बोलतोय, ते काही कळत नव्हते. काही वेळ त्यांचे बोलणे चालले होते. त्यांनी गाडीत नजर टाकली आणि गाडी निघून गेली. ती गाडी फॉरेस्टची होती. थोड्या वेळाने परत काही फॉरेस्टच्या माणसांनी आमची गाडी अडवली. गाडीत आत बघितले आणि जाऊ दिले. आता जंगल असले, तरी घनदाट नव्हते. अधूनमधून दूर कुठेतरी एखादी झोपडी आणि त्यातला दिवा दिसत होता. दोन-तीन ठिकाणी पोलिसांची आणि फॉरेस्टची माणसे उभी दिसली, पण आम्हाला थांबविले नाही. नंतर जरा जास्तच पोलीस आणि फॉरेस्टची माणसे दिसायला लागली. काही काळानंतर परत गाडी थांबली. ड्रायव्हरने उतरायच्या आधीच माझ्याकडून वीस रुपये घेतले. इथे एक-दोन दिवे होते, त्यामुळे प्रवेश केला तेव्हा जितकी भीती वाटत होती, तितकी आता वाटली नाही. पाच-दहा मिनिटांत ड्रायव्हर आला. गाडी पुढे जाताच खूप सारी पोलीसची माणसे दिसली. मी माझा मघाचा मुद्दा सर करण्यासाठी म्हणून ड्रायव्हरला म्हटले,
"मैने बोला था ना आपको एंट्रीमे पैसा दिया तो एक्झीट मेभी देना पडेगा."
"नही सार कोइ होता नही यहांपे. हमारा डेलीका है."
"आज तो बहुत फोर्स है."
"पुलीस है सार. ये मधुमलाईका जंगल विरप्पनका जंगल है. खबर है की वो अभी ये जंगलमे घूम रहा है, इसलिये इतनी फोर्स है, नही तो यहा कोई नही होता." हे ऐकल्यावर या माणसाचे पाय धरावे की काय असे वाटत होते. अरे बाबा कशाला घेऊन आलास या रस्त्याने.. आता असे काही बोलायची हिंमत नव्हती. मी विचारले,
"अभी जंगल खतम हो गया?"
"अभी है हायवेतक, फिर खत्म." त्यानंतर हायवे लागेपर्यंत कुणीच कुणाशी बोललो नाही. सारे शांत होते.
एकदाचा तो हायवे लागला आम्ही साऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. हायवे लागताच खूप हायसे वाटले आणि मी लगेच विचारले,
"आगे कोई अच्छा ढाबा होगा तो रोक देना." आता भूक लागली आहे, हे जाणवायला लागले होते.

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

12 Nov 2023 - 1:31 pm | तुषार काळभोर

कुटुंब बरोबर असेल तर अशा वेळी टेन्शन शतपटीने वाढते!

Nitin Palkar's picture

12 Nov 2023 - 7:26 pm | Nitin Palkar

जंगलातील वातावरणाचे चांगले वर्णन.

Nitin Palkar's picture

12 Nov 2023 - 7:30 pm | Nitin Palkar

चित्रामधील सुमो रस्त्याच्या उलट बाजूला (उजवीकडे) दाखवली आहे...

चौथा कोनाडा's picture

9 Dec 2023 - 12:07 pm | चौथा कोनाडा

छान निरीक्षण.
आणि आकारावरून ती सुमो सुद्धा वाटत नाहीय
त्यांनी ते चित्र प्रतीकात्मक म्हणून वापरले असावे.
काय म्हणता @मित्रहो?

मित्रहो's picture

11 Dec 2023 - 1:19 pm | मित्रहो

तेंव्हा आमच्याकडे कोडॅक फिल्म कॅमेरा होता. त्यात अंधारात कसा फोटो आला असता माहित नाही. मुळात फोटो घेण्याची मनस्थिती नव्हती. जंगलातले फोटो नाहीत.

हा वरील फोटो संपादक मंडळांने बहुतेक Dall.E किंवा Dream Studio किंवा तत्सम generative AI वापरुन तयार केले असेल. त्यात अशा चुका होण्याची शक्यता आहे.

मित्रहो's picture

11 Dec 2023 - 4:31 pm | मित्रहो

एक मु्द्दा राहिला त्या फोटोमुळे लेखाला छान सजावट लाभली. त्यामुळे अशी छोटी चूक सहज दुर्लक्ष करता येईल.

अथांग आकाश's picture

12 Nov 2023 - 11:37 pm | अथांग आकाश

छान वर्णन! आवडलं!!

मित्रहो's picture

13 Nov 2023 - 11:30 am | मित्रहो

धन्यवाद तुषार काळभोर, nitin palkar, अथांग आकाश

हो कुटुंब सोबत असताना अशा वेळी खूप भिती वाटते. दोन कुटुंब, दोघांच्याही बायका प्रेग्नंट त्यामुळे आणखीन भिती.

अगदी रोमांचक प्रवास झाला म्हणायचा 😀
छान वर्णन केलंय, काही फोटोज असते तर आणखिन मजा आली असती!

कर्नलतपस्वी's picture

14 Nov 2023 - 12:07 pm | कर्नलतपस्वी

असा थरार अनुभवास येतो.
लेख आवडला.

मित्रहो's picture

14 Nov 2023 - 2:39 pm | मित्रहो

धन्यवाद टर्मीनेटर अणि कर्नलतपस्वी
हो आमच्यासाठी अनुभव थरारक होता परंतु त्या ड्रायव्हरसाठी त्यात काही नवीन नव्हते. त्याच्या चेहऱ्यावर तरी हे रोजचेच असा भाव होता.

@टर्मीनेटर ही घटना २००४ सालातील आहे, त्यानंतर लवकरच तो मारला गेला. तेंव्हा फोनमधे कॅमेरा नव्हता आणि आमच्यापैकी कुणाकडे तेव्हा डिजीटल कॅमेरा नव्हता. त्या फोटोवरुन फोटो घ्यावा लागेल. बघतो. अंधारातले फोटो नाहीत जे आहेत ते उटीमधल्या स्थानाचे

बापरे, फारच भितीदायक अनुभव!

- (प्रवासी) सोकाजी

मुक्त विहारि's picture

14 Nov 2023 - 7:54 pm | मुक्त विहारि

पण, असे थरार आता नकोसे वाटतात...

गोरगावलेकर's picture

15 Nov 2023 - 7:55 am | गोरगावलेकर

रेल्वेचा प्रवास सोडला तर आमच्या सहलीत रात्रीचा प्रवास नसतोच. त्यामुळे असा अनुभव नाही आणि कधी येऊही नये

मित्रहो's picture

15 Nov 2023 - 11:13 am | मित्रहो

धन्यवाद सोत्रि, मुवि, गोरगावलेकर

प्रचंड भितीदायक प्रवास होता असे म्हणणार नाही पण थरार होता. जर जंगलात शिरताच विरप्पन बद्दल कळले असते तर मात्र रामगोपाल वर्माचा जंगल चित्रपट नक्की आठवला असता. जेव्हा कळले तेंव्हा जंगल संपत आले होते आणि दिवे दिसायला लागले होते.

@गोरगावलेकर रात्रीचा प्रवास बसचाच होता पण वेळेवर बसची गडबड झाली म्हणून असा प्रवास करावा लागला.

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Nov 2023 - 12:45 pm | ज्ञानोबाचे पैजार

फारच सुरेख शब्दबद्ध केला आहे, प्रसंग अगदी समोर घडतो आहे वाटत होते.

कितीही चांगले प्लॅनिंग केले तरी सहलीत असा अनुभव येऊ शकतो,

मदुराई ला जाताना ट्रेन मध्ये ओळख झालेले एक कुटुंब रात्री 2 वाजता आमच्या बरोबर आमच्या हॉटेल मध्ये आले होते, त्यांच्या दुर्देवाने ते हॉटेल फुल झाले होते, मग त्या कुटूंब प्रमुखा सोबत मी रात्री अडीच तीन वाजता मदुराई मध्ये हॉटेल शोधत फिरत होतो, व त्याचे कुटुंब माझ्या पत्नी सोबत आमच्या रुम वर थांबले होते

फारच बिनधास्त असतात काही लोक सहल प्लॅन करताना, हे कुटुंब त्यातलेच होते

पैजारबुवा,

मित्रहो's picture

15 Nov 2023 - 4:05 pm | मित्रहो

धन्यवाद पैजारबुवा
प्लॅनिंग तर व्यवस्थित केली होती परंतु बसच्या सिस्टिमने वेळेवेर धोका दिला

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 Nov 2023 - 4:32 pm | राजेंद्र मेहेंदळे

कितीही नियोजन केले तरी कधी कधी आपल्या किवा ईतरांच्या चुकीमुळे किवा बदलत्या परीस्थितीमुळे असे अनुभव येतातच. म्हणुनच "केल्याने देशाटन...." ही म्हण आली आहे.

आमचा भर खाजगी वाहनांवर नसतो. म्हणजे सार्वजनिक वाहन करूनच जाण्याकडे कल असतो. एक दिवस/अर्धा दिवसाच्या स्थानिक सहली असतात त्यात मात्र गेलो आहे. पण त्याचे बुकिंग मिळाले नाही तरीही खाजगी वाहन करतच नाही. त्यामुळे बहुधा कधी खडतर अनुभव आले नाहीत.
२००२ साली मैसुर -उटी एक दिवसीय सहल करून परत मैसूरला यायचे होते. प्रथम कर्नाटक एसटी स्टँडवर विचारले एका कंडक्टरला. त्याने सांगितले की खाजगी टुअरनेच जा. एसटीच्या मोठ्या बसेस लांबच्या रस्त्याने जातात. फार वेळ लागेल. मग खाजगी टुअर वाल्यांचे दुसरे दिवशीचे बुकिंग केले आणि त्याने सकाळी नऊला निघून संध्याकाळी सातला परतही आणले. त्यात मुदुमलाईतले प्राणीही भरपूर पाहता आले.
तुमचा अनुभव थरारकच होता.

मित्रहो's picture

16 Nov 2023 - 11:12 am | मित्रहो

धन्यवाद राजेंद्र मेहेंदळे, कंजूस
म्हैसूर उटी सरकारी बसचा प्रवास हा लांबच्या बसने असतो. नंतर मी स्वतःच्या वाहनाने देखील गेलो आहे.

नुकताच कुणीतरी श्रीशैलमचा प्रवास सांगितला. फार पूर्वी ते तिरुपती ते श्रीशैलम असा प्रवास करीत असताना रात्री ९ वाजता सरकारी बस रात्री दहा वाजता मधेच थांबली सर्वत्र अंधार होता. तासभर झाला बस सुटत नाही तेंव्हा त्याने खाली उतरुन बघितले तर ड्रायव्हर कंडक्टर छान आरामात बसले होते. विचारले तर सांगितले की जंगल रस्ता बंद आहे चार वाजता उघडेल तेंव्हा बस निघेल पोहचेल सकाळी सहा वाजता श्रीशैलम. आता माहित नाही परंतु मुबंईत देखील आरे कॉलनी रस्ता रात्री बंद असायचा.

जंगलाचा नाही पण आणखीन एक प्रवासाचा मस्त अनुभव आला होता नागपूर-रायपूर-जगदलपूर-जोपुर-कोरापुट-विझीनगरम.

कंजूस's picture

16 Nov 2023 - 4:16 pm | कंजूस

श्रीशैलमचा प्रवास

हैदराबाद - नागार्जुन सागर-श्रीशैलम-हैदराबाद अशी सरकारी सहलही असते दोन दिवसांची. त्यानेही बरेच लोक जातात.

हल्ली यूट्यूबवर खूप विडिओ असतात त्यातूनच ठरवता येते की कुठे जायचे/नाही किंवा कसे. खूपसा त्रास वाचतो. पण ग्रूपने गेलो की चार जणांची नऊ मते पडतात आणि प्रवासाच्या आराखड्याची वाट लागते. कौटुंबिक प्रवासात तसे होत नाही. आपण एकटेच ठरवतो,एकटेच जबाबदार असतो आणि निर्णय पटकन होतात.

एक गोष्ट मात्र नक्की की जाऊन येणारे जेव्हा सविस्तर वर्णन चांगले/वाईट दोन्ही देतात तेव्हा त्याचा पुढच्यांना खूप उपयोग होतो. तुमच्या लेखाने वाचकांना कुठे सावधानता ठेवायची ते कळेल.

फार लांब कशाला इथेच नाशिक -कसारा टॅक्सी सर्विसवाले कसे गंडवतात हे माहिती आहे. नाशिकहून पाचची(किंवा अगोदरची) टॅक्सी करून कसाऱ्याला पोहोचून कसारा-मुंबई लोकल मिळते. पण हे लबाड टॅक्सी वाले इगतपुरीला गाडी बंद पाडतात. प्रवाशांना मागून येणाऱ्या बस/टॅक्सी मध्ये बसायला लावतात. घेतलेले पैसे अर्धे परत करत नाहीत. मग शांतपणे इगतपुरीच्या गराजवाल्याकडे रिपेअरिंग करून नाशिकला परत जातात. (ड्रायवरशेजारी तीन शिटा आणि मागे चार ठोसतात तरीही लोक जातात).

शिवाय प्रवाशांना घाबरणे हा टॅक्सीवाल्यांचा हातखंडा असतो.

मित्रहो's picture

17 Nov 2023 - 1:18 pm | मित्रहो

हो तशी सरकारी सहल असते. हल्ली तर बरेच असे पॅकेज उपलब्ध आहेत.

प्रवाशांना गंडवणे पूर्वापार चालत आलेले आहेत. यामागे हा माणूस परत येणार नाही आहे तेंव्हा आज जितके मिळवता येईल ते मिळवून घ्या. रिपिट कस्टमर ही संकलपना फारसी महत्वाची नव्हती. पूर्वी इंटरनेट नव्हते तेंव्हा फार माहिती नव्हती. हल्ली बऱ्यापैकी माहिती असते. त्यामुळे फसगत कमी झाली असली तरी फसवणूक होते अडवणूक होतेच. प्रवासी एकटे असतात आणि फसवणारे समूहामधे. तुम्हाला माहिती असते हा लुटतोय तरी तुम्ही तयार होता. गोव्यात गेल्यानंतर टॅक्सी करायची म्हटली की किंमत आकाशातच असते.

चौथा कोनाडा's picture

4 Dec 2023 - 5:58 pm | चौथा कोनाडा

थरारक वर्णनाने गुंतवून ठेवले !

भारी लिहिलाय अनुभव +१

मित्रहो's picture

8 Dec 2023 - 5:34 pm | मित्रहो

धन्यवाद चौथा कोनाडा

श्वेता व्यास's picture

13 Dec 2023 - 3:49 pm | श्वेता व्यास

बापरे, थरारक प्रवास झाला अगदी!
वर्णन छान केलं आहे, सुखरूप पोहोचलात हे महत्त्वाचं.

मित्रहो's picture

15 Dec 2023 - 9:15 pm | मित्रहो

धन्यवाद श्वेता व्यास
हो थरारक प्रवास होता. प्रवास झाल्यावर जेंव्हा आम्ही हायेवला लागलो आणि धाब्यावर जेवलो ते आजही आठवते. तो केरला पराटा चांगला लक्षात आहे.

मित्रहो's picture

19 Dec 2023 - 11:37 am | मित्रहो

नुकतीच विरप्पनवर आधारीत नेटफ्लिक्सवर माहितीपट बघितला. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. चार भाग आहेत, विरप्पनचे साथीदार, त्याची पत्नी, पत्रकार, गावातील लोक, एसटिएफ मधील अधिकारी या सर्वांच्या मुलाखतीतून माहितीपट बनविला आहे मस्त आहे. एका घटनेकडे बघण्याचे विविध पैलू दिसतात.