कोणी कुणाला किती आवडावे
काही तुला अन् मलाही न ठावे
करून बहाणे, दोघे धडपडतो
कशाही निमित्ताने बोलू बघतो
दिवसा मोरपिशी मौजा लुटाव्या
रात्रीने पुन्हा विरह घेऊन यावे
घराच्या बाहेर दारापुढे जराशी
तुझ्या उतावीळ येरझारा मघाशी
पाहून, हलके हाक देशील, वाटे
पुन्हा तू नेहमीचे संकोचून जावे
मग कधी तू व्यस्त होऊन जाते
इथे अवघे माझे अवसान गळते
व्याकूळ नजरेस आस दिसण्याची
तू दिसताक्षणी मी मोहरून उठावे
सखे सोबती अन् कुणी साद देते
त्यात चित्त कसले जराही न जाते
व्याप काही, काही उद्योग पाठी
सारे सोडून तुझ्या समीप असावे
ती लाजरी हवीशी तिरपी नजर
आणि तुझ्या उरीचे स्पंदनस्वर
तुझ्याच ओंजळीत भरण्यासाठी
मी, सांग कसे, कुठे साठवावे?
उभय डोळ्यांत मौनाची गाणी
न स्पर्शता हाता गुंफू पहाती
पुरे अनामिक थरथरते दडपण
मिठीतून पुढले हितगूज व्हावे
प्रतिक्रिया
13 Nov 2023 - 8:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रेमभावना छान व्यक्त झाली आहे, लिहिते राहावे.
-दिलीप बिरुटे
13 Nov 2023 - 1:54 pm | तुषार काळभोर
संदीपराव फॉर्मात असले की असं काहीतरी जीवघेणं लिहितात!
16 Nov 2023 - 12:52 pm | चौथा कोनाडा
व्वा, सुंदर प्रेमकविता !
... हळूवारपणे प्रणय फुलत जातो ... आणि आमच्या सारख्या रसिकांना अलगदपणे गुंतवून टाकतो !
- सुरेख !
-- आणि कविताचित्रही खुपच बोलके !
22 Nov 2023 - 10:16 am | बिपीन सुरेश सांगळे
प्रेमकविता आवडली . दिवाळीच्या वातावरणात चैतन्य फुलवणारी . मस्त !
22 Nov 2023 - 12:26 pm | कर्नलतपस्वी
देर ना कर फरयादी
जख्म सुख जायेगा
देखते रह जाओगे
और आशियाना लुट जायेगा
कवीता आवडली हे वेगळे सांगावयास नको.
2 Dec 2023 - 12:56 pm | रंगीला रतन
छान कविता.