दिवाळी अंक २०२३ - इजाट

सन्जोप राव's picture
सन्जोप राव in दिवाळी अंक
12 Nov 2023 - 12:00 am
Wada


“बहिणी आहेत तोपर्यंत ठीक आहे हो. माझी ताई, माझी छकुली हे ते.. सगळं. उद्या दोघी लग्न होऊन एकाच घरात गेल्या की एकमेकींच्या झिंज्या धरतील, त्याचं काय?” नाना देशपांडे भातात आमटी ओतून घेत म्हणाले. जेवायला जरा वेळच झाला होता.

“झिंज्या कशाला धरतील? नांदतील की सुखानं. माझ्या मुली आहेत त्या. माझ्यावर गेल्यायत दोघी. सुखानं राहतील. आमच्या जोशांकडचा गुण आहे. तुमचं देशपांड्यांचं
भांडकुदळ वळण नाही त्यांना.” यशोदाबाई ठसक्यात म्हणाल्या.

“असं का? आमचं देशपांड्यांचं वळण भांडकुदळ का? बरं बरं. असू दे. अहो, पण जावा जावा कितीही गुणाच्या असल्या, तरी एका घरात म्हणजे भांड्याला भांडं लागायचंच. आता कशाला कळून सवरून आपण असं कशाला करायचं? त्यातनं उजूचं अजून सगळं व्हायचं आहे. शिक्षण पूर्ण व्हायचं आहे. नोकरी लागायची आहे. ” नानां भात कालवत म्हणाले.

“अहो, पण त्यांनाही कुठे घाई आहे?” यशोदाबाई म्हणाल्या. “आणि उजूची काय, येऊनजाऊन शेवटची एकच सेमिस्टरच राहिली आहे ना? अजून मार्गशीर्ष लागायचा आहे. यंदा सगळे मुहूर्त आहेत वैशाखात. तोवर तिची परीक्षा होऊन जात्येय, सगळं होतंय. नाहीतरी वैजूचं मे महिन्यातलं ठरतंय ना. आपल्यालाही तेवढा वेळ लागेलच की तयारीला. कार्यात कार्य होऊन जाईल. काय हो दादा?”

दादा झोपाळ्यावर बसले होते. त्यांची, लक्ष्मीबाईंची आणि यशोदाबाईंची चतुर्थी होती आणि चंद्रोदयाला अजून वेळ होता. ते काही बोलायच्या आधीच नाना म्हणाले, "अहो, खालच्या कोर्टाचा निकाल लागायचा आधीच तुम्ही अपीलात गेला होय? आम्ही काय म्हणालो, की उगीच उद्या बहिणीबहीणींत वितुष्ट नको, सगळं सुसूत्र होणार असेल तर मग काय उत्तमच. वैजू त्यांना पसंत आहे हे त्याच दिवशी सांगितलं की त्यांनी. वैजूलाही स्थळ पसंत दिसतंय. पण त्या वेळी हे उजूचं काही डोक्यात नव्हतं. त्यांचं होय नाही काय ते विचारायला पाहिजे का नको? त्यांना विचारायला पाहिजे, उजूला विचारायला पाहिजे. काय दादा? मी म्हणतो ते बरोबर आहे की नाही?”

“ थांब, थांब. जरा श्वास तरी घे वसंता. तू म्हणतोस ते आहे बरोबर.” दादा पायानं झोपाळ्याला रेटा देत म्हणाले. “तसं काही बोलणं झालं काय यशोदा?”

“झालं म्हणजे दादा..” नानांना थोडी आमटी वाढत यशोदाबाई म्हणाल्या, “थोडं सूतोवाच केलं गणपुलेबाईंनीच त्या दिवशी. वैजूला बघायला आले होते, त्या दिवशीच बारकाईनं बघत होत्या त्या. तुमच्या नसेल आलं लक्षात, पण मला समजलं ते बरोबर. हीसुद्धा मुलगी मनात भरलीय त्यांच्या. म्हणजे असं मला वाटतंय, बरं का. त्या दिवशी तीपण होतीच ना ताईच्या मागंमागं. त्यांनी बघितलं असणार. मग जाताना कुंकू लावायला मी त्यांना देवघरात बोलावलं, तेव्हा मला म्हणाल्या की धाकटीसाठी पण बघताय का? मी म्हटलं की हो, म्हणजे आता बघायलाच पाहिजे ना आता. आज नाही तर उद्या. तर त्या म्हणाल्या की आमचा आनंद आणि संतोषही अगदी पाठीला पाठ लावून आलेत. त्यामुळं आम्हालाही संतोषचं बघायलाच लागणार लगेचच. बघू या, काही योग आहे का. हे त्यांचे शब्द बरं का. बघू या काही योग आहे का, असं म्हणाल्या त्या.”

“असं?” दादांनी झोका थांबवला. “संतोष म्हणजे त्या दिवशी कोचावर आनंदच्या बाजूला बसला होता, तोच ना? करड्या रंगाचा टी शर्ट घातलेला? गोरटेला?”

“होय.” नाना पानावरनं उठले. “तोच ना हो?” त्यांनी यशोदाबाईंना विचारलं.

“होय, तोच.” यशोदाबाई हसल्या. “दोघेही गोरटेलेच आहेत हो. आनंद किंचित सावळा असेल संतोषच्या मानानं, एवढंचं.”

“आणि हा काय करतो धाकटा? संतोष?” दादांनी विचारलं.

“एमबीए झालाय. एचडीएफसी बँकेत आहे. मोठ्या पोस्टवर आहे. कराडलाच पोस्टिंग आहे. वर्षभर तरी बदलीबिदली काही असणार नाही, असं त्याची आई म्हणत होती.”

“मग आता पुढे काय?”

“आता घर, माणसं सगळं बघून झालंय की त्यांचं. काही तसं ठरलं तर ती सगळी मंडळी काही यायची नाहीत पुन्हा. आपल्यालाच एकदा बघून यायला पाहिजे. बोलणी, देणं-घेणं तर काही नाहीच आहे. उजू आणि संतोष भेटतील कुठेतरी. म्हणजे, हे माझ्या मनातलं हं. उजू नाहीच म्हणत्येय एवढ्यात, पण मी तिला म्हटलं की अगं एकदा भेटून तरी घे, आज भेटलात म्हणजे काय उद्या लग्न करा असं नाही म्हणत आम्ही. बघू काय योग आहेत ते. दादा, तुम्ही सांगा तिला. तुम्हाला नाही म्हणणार नाही ती. किती झालं तरी तुमची लाडकी आहे ती.”

दादा हसले. “बघू. मी बोलतो तिच्याशी. वाजले किती? झाला का चंद्रोदय? हिला बोलावतेस का, यशोदा?”

पुढच्या गोष्टी ‘मिल्स अँड बून’मधल्या एखाद्या कादंबरीतल्या प्रसंगासारख्या झाल्या. उज्ज्वला आणि संतोष कराडच्या जवळ असलेल्या पुणे-बंगळुरू रस्त्यावरच्या एका ढाब्यावर जेवायला म्हणूनच भेटले आणि तिथलं पनीर बटर मसाला छान होतं आणि कुल्फी तर फारच भारी होती इथपासून आपल्या दोघांना एकमेकांशी लग्न करायला आवडेल, या मतापर्यंत त्यांची मतं जुळली. संतोष बोलका होता. उज्वलालाही गप्पा मारायला आवडत होतं. उज्ज्वलाची परीक्षा होईपर्यंत कसलीच घाई करायची नाही आणि लग्नानंतर तिने पोस्ट ग्रॅजुएशन करायचं या उज्ज्वलाच्या मतांना संतोषचा संपूर्ण पाठिंबा होता. लग्न नोंदणी पद्धतीने व्हावं, हे आनंद आणि वैजयंतीचं मत त्या दोघांनी उचलून धरलं. एकूण सगळं जमलं.

गणपुल्यांचं घराणं प्रतिष्ठित होतं. बापू गणपुले कराडमधलेच नव्हे, तर सातारा जिल्ह्यातले नामांकित वकील होते. त्यांचा थोरला मुलगा आनंद त्यांच्या पावलावर पाऊल टाकून वकिली करत होता. एकत्र कुटुंब होतं. कराडपासून पाच मैलावर कृष्णाकाठी गणपुल्यांची पंधरा एकर शेती होती. घरात गडीमाणसांचा राबता होता. खटाला मोठा होता, पण घरात खेळीमेळीचं वातावरण होतं. गणपुल्यांचा कराडचा वाडा जुना असला, तरी बळकट होता. वाड्यात मुलांनी सगळ्या सोयी करून घेतल्या होत्या. बापू गणपुले साखर कारखान्याचे कायदा सल्लागार होते. त्यांच्या शब्दाला गावात मान होता. त्यांच्या पत्नी सुलभाताई विद्यानगरमधल्या आर्ट्स कॉलेजमध्ये प्राध्यापक होत्या. मंडळी सुसंस्कृत आणि आधुनिक विचारांची होती. इकडे वैजू याच वर्षी हॉर्टिकल्चरमध्ये एमएस सी. झाली होती आणि शेती करण्यात तिला रस होता. दादा, नाना, लक्ष्मीबाई, यशोदाबाई, आणि चार माणसं असे सगळे जाऊन कराडला गणपुल्यांना भेटले आणि दिवस पक्का करूनच आले.

दोन्ही घराण्यांचे संबंधित खूप लोक होते, त्यामुळे एक रिसेप्शन तरी ठेवायला लागणारच होतं. पण बाकी काही व्याप नको यावर एकमत झालं. वैजयंती देशपांडे आणि उज्ज्वला देशपांडे यांची अनुक्रमे आनंद गणपुले आणि संतोष गणपुले यांच्यांशी लग्नं ठरली. आनंद आणि संतोषच्या लग्नाचा साखरपुडा आदल्या दिवशी आणि लग्न दुसर्‍या दिवशी, असं ठरलं. लग्न साधं असलं, तरी रिसेप्शन दणक्यात झालं. आहेराच्या भेटीमध्ये इतर भेटवस्तूंबरोबर एकेक पिंपळाचं, अर्जुनाचं किंवा कडुनिंबाचं रोप द्यावं, असं बापूंनी सुचवलं आणि सगळ्यांनी ती कल्पना उचलून धरली. रिसेप्शननंतर नवीन जोड्या वाड्यात आल्या, तेव्हा सुलभाताईंबरोबर पाच सवाष्णींनी त्यांचं औक्षण केलं. तिसर्‍या दिवशी चारही नवविवाहित लोक युरोपच्या टूरवर रवाना झाले.

बघता बघता तीन वर्षं निघून गेली. आनंद आता हायकोर्टातल्या केसेस स्वतंत्रपणे चालवायला लागला होता. संतोषचं आणखी एक प्रमोशन झालं होतं. वैजयंतीनं शेतात पाच गुंठ्यांचं पॉलीहाउस बांधलं होतं आणि त्याची सगळी व्यवस्था ती एकटी बघत होती. उज्ज्वलाचं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं आणि तिला सातार्‍याला नोकरी लागली होती. कराड-सातारा काय, आता एक तासाचा प्रवास. बापूंनी उजूला नवीन इलेक्ट्रिक कार घेऊन दिली होती. उज्ज्वला आधीपासूनच गाडी सफाईदारपणे चालवत असे. आता तर काय ही नवीन गाडी तिच्या हातात चांगली बसली होती. घरात दोन ड्रायव्हर होते, पण ती क्वचितच त्यांच्यापैकी कुणाला बरोबर नेत असे.

पंचमीला वैजू आणि उजू माहेरपणाला आल्या, तेव्हा दोघींच्या चेहर्‍यावर सुखाची साय पसरलेली होती. लक्ष्मीबाईंच्या जाणत्या नजरेला उजूच्या पोसलेल्या कांतीवरची वेगळी चमक लक्षात आली. त्यांनी उजूला जरा बाजूला घेऊन खाजगी आवाजात काहीतरी विचारलं आणि उजूने लाजून काकूच्या कुशीत तोंड लपवलं. नानांनी दादांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि दादांनी नानांना मिठीतच घेतलं. लाडकौतुकाच्या वर्षावात पोरगी न्हाऊन निघाली.

**********

गणपुल्यांच्या घराने धाकट्या पहिलटकरिणीला केळीच्या कोक्यासारखं जपलं. तिला एक दिवस गाभुळ्या चिंचा खाव्याश्या वाटल्या, तर बापूंनी मोठा डालगाभर चिंचा मागवल्या. एकदा तिला ताजा गूळ खावासा वाटला, तर राहायला शेतावर असणारा घरातला जुना गडी लक्ष्मण गुर्‍हाळातून अजून कोमट असलेला गुळाचा रवाच घेऊन आला. तिचे डोहाळे तर सगळ्यांनी पुरवलेच, त्याबरोबर तिला डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या ती वेळेवर घेते आहे ना, यावर बापूंपासून सगळ्यांचं लक्ष होतं. तिला आठवा महिना लागला, तशी तिला माहेरी आणण्यासाठी यशोदाबाईंचा नानांमागे लकडा सुरू झाला. उजूला सोबतीला म्हणून वैजूपण माहेरी आली. गावातल्याच देशमुखांच्या दवाखान्यात उजूचं नाव घातलं होतं.

डोहाळजेवण जोरात झालं. दिवस पुरे झाले आणि उजूला वेणा सुरू झाल्या. यशोदाबाई देवापुढे उभ्या राहिल्या आणि त्यांनी हात जोडले. हातावरचं चमचाभर दही तोंडात टाकून टाकून उजू गाडीत चढली. नऊ महिने भरलेले. चांगलं पोसवलेलं बाळ. उजूला जरा त्रास झाला, पण तिची सुखरूप सुटका झाली. मुलगा झाला. गणपुल्यांच्या आणि देशपांड्यांच्या घरांत आनंदीआनंद झाला. बाराव्या दिवशी बाळाचं बारसं जोरात झालं. अनिरुद्ध नाव ठेवलं. तीन महिन्याचं माहेरपण अंगावर लेवून उजू सासरी आली. तिची आणि तिच्या बाळाची दृष्ट काढायला सुलभाताईंबरोबर वैजयंतीपण दारात उभी होती. “ही थोरली असून धाकलीनं आधी नंबर लावला बगा.” आत वळता वळता वैजयंतीच्या कानावर कुणीतरी म्हटलेले हे शब्द पडले. बायकांची खूप गर्दी होती. कुणी हे म्हटलं कसं सांगावं? “अवो, आसू द्या. हिलाबी हुत्याल की. कुंभार कुंभारीण घट्ट असलं की मडक्याला काय तोटा..” त्या बाईला कुणीतरी परस्पर म्हटलेलं, पण वैजयंतीच्या कानावर आलं. “हुत्यात का वांझोटी हाय कुणाला ठावं”

वैजयंतीच्या कानात हे इंगळासारखे शब्द पडले.

गणपुल्यांचा एवढा मोठा वाडा, पण बाळ रांगतं झालं, तसा त्याला रांगायला सगळा वाडा अपुरा पडायला लागला. बाळाला सांभाळायला काय एक सोडून सतरा माणसं होती. आईलाच आपल्या लेकाला भेटायची पंचाईत होऊन बसली. आज काय बाळाच्या दाताची पहिली कणी दिसायला लागली, आज काय त्यानं पिकलेला चिक्कू तोंडात घालून चोखला. आज काय त्यानं गालावर नख लावून घेतलं. कौतुक करून घेणारा एक आणि कौतुक करणारे शंभर. बापू शेतावर जाताना नातवाला बरोबर घेऊन जायला लागले. “नातू आमचा” ते सांगत असत. “आनंदाचा काय, बापू?” ज्यांना माहीत नव्हतं, ते विचारत. “नाही, संतोषचा.” बापू सांगत. “मग आनंदाला काय?” “नाही अजून.” बापू सांगत. “आं? थोरल्याला काय न्हाई? आसं कसं काय वो बापू?” कुणीतरी विचारत असे. खेड्यात असं मोकळेपणानं विचारायला कुणाला काही वाटत नाही. तसंच हे. सुट्टीच्या दिवशी सगळं कुटुंब शेतावर जाई, तेव्हाही हा विषय होई. हे कधीकधी वैजयंतीच्या कानावर पडत असे, कधी नाही. श्रावणातल्या शुक्रवारी सवाष्ण म्हणून सुलभाताईं जोशांच्या घरी जात असत.

आता गेल्या वर्षापासून त्यांना मधुमेहाचं निदान झाल्यानंतर त्यांनी त्या घरात ‘आता या वर्षापासून आमच्या सूनबाई येतील जेवायला’ असं त्या घरात सांगितलं. जोशीबाई जराशा घुटमळल्या. “हरकत नाही, ताई. पण धाकटीला पाठवा. म्हणजे काय आहे, तुम्हाला माहीतच आहे, जिवतीची पूजा असते. पुत्रवती सवाष्णीने जेवायला आलेलं बरं. वाटल्यास दोघींनाही पाठवा. म्हणजे, तसं काही नाही.” त्या बाई अडखळत म्हणाल्या. चहा घेऊन आलेली वैजयंती कशीतरीच हसली. तिने चहाचा कप काकूंसमोर ठेवला.

यथावकाश बापूंच्या कानावर सगळ्या गोष्टी गेल्या. बापूंचा बाहेर दबदबा असला, तरी घरात त्यांनी आपल्या दोन्ही मुलांशी जाणीवपूर्वक मित्रासारखे संबंध ठेवले होते. दुसर्‍या दिवशी सातार्‍याच्या कोर्टात जाण्यासाठी ड्रायव्हरला बरोबर न घेता ते आणि आनंद दोघेच निघाले. आनंद गाडी चालवत होता. बापूंनी त्याला काय आहे ते विचारलं. बाळ व्हावं अशी दोघांचीही इच्छा आहे, वैवाहिक संबंधही नॉर्मल आहेत, डॉक्टरांनाही दाखवलं आहे असं आनंद म्हणाला. “अनएक्स्प्लेन्ड इनफर्टिलिटी, बापू.” तो रस्त्यावरची नजर न हटवता म्हणाला. “प्रयत्न करत राहा, म्हणाले डॉक्टर. ट्रीटमेंट सुरू आहे, पण ती अशी नॉन-स्पेसिफिक आहे. यश येईल, नाही येणार, काही सांगता येणार नाही, ते म्हणाले.” ‘असू दे, असू दे.” बापूंनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. “उपचार सुरू आहेत ना, मग झालं.”

अनिरुद्धचा चौथा वाढदिवस होता. त्याचा पहिला वाढदिवस दणक्यात झाला होता. त्यामुळे या वाढदिवसाला फक्त घरचे लोक होते. आजोळचे सगळे होतेच. नानांनी नातवाला सोन्याचा गोफ केला होता. बापू आणि नाना फार दिवसांनी भेटत होते. वाडीची बासुंदी मागवली होती. बाकीचा बेत होताच. जेवणं झाली. "आता रात्री उशिरा कुठे जाता?" असं बापू म्हणाले म्हणून पाहुणे कराडलाच मुक्कामाला थांबले. दुसर्‍या दिवशी सकाळच्या चहाला बैठकीत नाना आणि बापू बसले होते. आतल्या बाजूला काहीतरी गडबड ऐकू आली म्हणून बापू उठले. उज्ज्वला न्हाणीतून तोंड धुऊन येत होती. दोन पावलं पुढे आली आणि पुन्हा न्हाणीकडे माघारी वळली. “काय हो, सूनबाईला बाधलं का काय कालचं जेवण?” बापूंनी विचारलं.
“हूं , बाधतंय.. घरचं जेवण. बाधलं बिधलं नाही.” सुलभाताई हसत म्हणाल्या.
“मग?”
“मग काय? पेढे झाले, आता बर्फी नको काय?”
“आं? खरं का काय?”
कामं खोळांबली असतील, अंघोळी करून निघू या काय असं विचारायला आत आलेल्या नानांच्या कानावर हा संवाद पडला.
“बापू, काय ऐकलं ते खरं की काय?’ त्यांनी बापूंचे हात हातात घेत हसत विचारलं. “अहो, आमच्या मंडळींचा अनुभव आहे. जाणकाराची नजर आहे. चुकायची नाही.” बापू म्हणाले. “आता तोंड गोड करायचं पाव्हणे. जायची गडबड करायची नाही.”

सुलभाताईंचा होरा खरा ठरला. अनिरुद्धच्या पाठीवर त्याला बहीण झाली. गणपुल्यांच्या घरात जन्मलेलं पहिलं नातवंड. बाळ-बाळंतीण खुशाल होते. तिसर्‍या दिवशी घरी घेऊन जा असं हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी सांगितलं. जुन्या वळणाच्या शेजारपाजारच्या बायका उजूचं पोट बांधा, डोकं बांधा, बाहेरचा उजेड, वारं लागू देऊ नका असं काय पाहिजे ते सांगत, पण बापू चोख स्वभावाचे होते. शेक-शेकोटी, काजळ, तीट, गुटी असलं काही न करता डॉक्टर जे म्हणतील ते करायचं, मुलीला लसींचे सगळे डोस वेळेवर द्यायचे, उगीच आल्यागेल्यानं बाळाला हाताळायचं नाही, त्याने इन्फेक्शन होतं, रोज भरपूर तुपातला शिरा आणि डिंकाचे लाडू यापेक्षा बाळाच्या आईने पुष्कळ फळं, पालेभाज्या खायच्या , चांगलं उकळलेलं भरपूर पाणी प्यायचं, आणि सारखं झोपून राहायचं नाही. जमेल तेवढा हलका व्यायाम करायचा... त्यांच्या या सूचना घरातल्या सगळ्यांना माहीत होत्या आणि मान्यही होत्या. पण गणपुल्यांच्या घरातलं वातावरण सुधारलेलं असलं, तरी गावाचं वळण जुन्या पद्धतीचं होतं. बापूंचे शेतावरचे वाटेकरी, गावातले इतर संबंधित बाळाला बघायला म्हणून येत होते, बाळंतविडा म्हणून कायकाय घेऊन येत होते. येणार्‍याजाणार्‍यांची मोठी वहिवाट होती. लक्ष्मण आणि त्याची बायको आकुबाई काही दिवस वाड्यावरच राहायला आले होते. बाळाला आंघोळ घालण्याचं काम आकुबाईकडंच होतं. शास्त्र म्हणून बाराव्या दिवशी बारसं उरकून घ्यावं असं दोन्ही घराण्यातल्या लोकांचं मत पडलं. बारसं झालं.
मुलीचं नाव ‘स्वरदा’ ठेवलं.

आठवड्यानंतरची गोष्ट. आकुबाई परसातल्या आळवाची पानं काढत होती. अचानक तिच्या किंचाळण्याने बापू आणि संतोष धावत परसात गेले. आकुबाईच्या हातातली पानं खाली विखरून पडली होती आणि ती हातात डोकं धरून खाली कापर्‍या अंगाने खाली बसली होती. “काय झालं, आकुबाई? कशाला भ्यालीस काय?” संतोषने विचारलं. आकुबाईचं काही एक नाही का दोन नाही. ती घाबरलेल्या चेहर्‍यानं परसातल्या आंब्याच्या झाडाकडं बोट दाखवत होती. तेवढ्यात सुलभाताई आणि वैजयंतीही आल्या. उज्ज्वलाही आली.

वैजयंतीने आकुबाईला हाताला धरून उठवलं. तिला उठवून कट्ट्यावर बसवलं आणि भांडंभर पाणी प्यायला दिलं.
“इजाट हुतं आक्का. लई दांडगं. आसलं काळं काळं तोंड. लालबुंद डोळं. मला बगून वाव करून आंगावर आलं माझ्या. मी वराडली तसं आंब्याच्या झाडावर गप्प झालं बगा. बया गं..” ती शहारली.
“इजाट? इजाट म्हणजे काय?” उज्वलानं विचारलं.
“अवो वयनी, दांडगं जनावर आसतंय वागावाणी. ल्हान पोरांची टाळू खातंय ते. दातं घुसवतंय टाळूत. धाकली पोरगी बगून आलं आसल वं. बया.. ”
“तू आत जा बरं आकुबाई.” बापूंच्या आवाजात जरब होती. “काय बोलावं, कुठं बोलावं काही म्हणजे काही कसं कळत नाही तुम्हा लोकांना?” आकुबाई वरमून आत गेली.
“बरं का उज्ज्वला,” बापू म्हणाले. घरातले सगळे तिला उजू म्हणत असले, तरी बापू मात्र उज्वला असं म्हणत असत. “आकुबाईच्या म्हणण्याकडं लक्ष देऊ नकोस. ती अडाणी बाई आहे. कशावरही विश्वास ठेवते ती.”
“पण तिने बघितलं ना ते बापू? इजाट की काय? काय असतंय ते”
“अगं, इजाट म्हणजे ऊदमांजर. जंगली प्राणी आहे. लहानसं असतं ते - दोन अडीच फूट लांबीचं. वाघाएवढं वगैरे हा सगळा भ्रम. दिसायला थोडासा उग्र दिसतो, पण लाजरा प्राणी आहे हा. लहान प्राणी, उंदीर, बेडूक, छोटे पक्षी वगैरे खातो हा. फळं, फुलं वगैरे. फार गैरसमज आहेत याच्याविषयी.”
“पण बापू.. ते लहान मुलांची.. आकुबाई काय म्हणाली ते..”
“अगं, काही खरं नाही त्यातलं. इजाट लहान मुलांची टाळू फोडतं आणि रक्त पितं, असा एक गैरसमज आहे. गैरसमजच. तसलं काही नसतं. माणसाला घाबरणारा प्राणी आहे तो. चुकून आलं असेल, जाईल ते परत जंगलात.” बापू म्हणाले.

Ijaat

पण ते इजाट काही जंगलात परत गेलं नाही. याला त्याला ते वाड्याच्या आसपास दिसत राहिलं. कधी तिन्हीसांजेला परसात काहीतरी उकरून खाताना, कधी त्याच्या पुढच्या पायात काहीतरी धरून झाडावर चढताना, तर कधी पानांच्या आड दडून दात विचकून आपल्या लाल डोळ्यांनी याच्याकडे, त्याच्याकडे बघताना. वैजयंतीला तर ते बर्‍याच वेळा दिसलं. एकदा तर घराच्या खिडकीत बसून ते दात विचकत होतं, असं ती म्हणाली.

आकुबाई फारच घाबरून गेली होती. स्वरदाला आंघोळ घातल्यावर तिला थोडा वेळ कोवळ्या उन्हात घेऊन बसत जा असं तिला दादांनी सांगितलं होतं. आधी ती तसं बसतही असे, पण आता तिने ते अजिबात सोडून दिलं. आता बाळाची आंघोळ झाली की ती बाळाला घेऊन सरळ उज्ज्वलाच्या खोलीत जायला लागली. तिथे पाळण्यात स्वरदा झोपली की त्या खोलीच्या बाहेर आकुबाई पहारा देत बसत असे. कुणी काही काम सांगितलं तरी दुसरं कुणीतरी आल्याशिवाय ती जागेवरनं उठतसुद्धा नसे. बापूंनी एकदा तिला विचारल्यावर कधी नव्हे ते बापूंकडं बघत तिनं दुपट्यात गुंडाळलेल्या स्वरदाला बापूंसमोर धरलं. तिच्या डोक्यावरची कुंची जरा बाजूला केली. स्वरदा झोपेत होती. तिची अजून न भरलेली टाळू पकपक हलत होती.
“गरीब लेकरू हाय बापू. तेला कायतरी झालं तर दादास्नी, वयनीस्नी काय तोंड दाकवू बापू.”
आकुबाईच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. “त्ये माकडं धरनारी मानसं हाईत म्हनं पारगावला. तेनास्नी बलवून ह्या चांडाळाला पकडून न्ह्यायला लावा. त्याशिवाय मी लेकराला परड्यात न्ह्यायची न्हाई, बापू.” आकुबाई म्हणाली.
बापू निरुत्तर झाले.
पारगावला माणसं पाठवून माकड धरणार्‍यांना बोलावून आणलं. दोन दिवस त्यांनी इकडे बघ, तिकडे बघ असं करून तपास केला. त्यांना काहीच दिसलं नाही. इजाट तर नाहीच. पण आकुबाईचं समाधान झालं नाही. तिला जिकडे तिकडे काळं, शेपटीवालं काहीतरी दिसल्यासारखं वाटत होतं. वैजयंतीलाही परसात किचकिच ऐकू आल्यासारखं झालं.

सकाळची वेळ होती. घरात नुसती गडबड चालली होती. बापूंच्या एका महत्वाच्या केसचं मुंबईला अर्ग्युमेंट होतं, म्हणून ते आणि आनंद मुंबईला निघाले होते. शेतावरची ज्वारी आली होती, पण ती सगळी पोती तोंडं बांधलेली होती. पेठेला ज्वारी लावायची म्हटल्यावर ती बांधलेली तोंडं सोडून दाभण आणि सुतळीने ती तोंडं शिवायला लागणार होती. चार गडी त्या कामात होते. उन्हाळ्याचे दिवस. वर्षाभराचे मसाले, शेवया, कुरडया, पापड करायचे होते. त्या करायला दोन बायका आल्या होता. सुलभाताई त्या नादात होत्या. उजूच्या खोलीचं दार नुसतं लोटलेलं होतं आणि त्या दारासमोर आकुबाई बसून राहिली होती.

सोप्यातून आत जाणार्‍या सुलभाताईंनी तिला बघितलं आणि त्या जराशा चिडल्याच.
“नुसती बसून राहू नकोस, आकुबाई” त्या म्हणाल्या. “जा, वर गच्चीवर पापड गोळा करून ठेवलेत, ते घेऊन ये खाली.”
थोड्याशा अपराधीपणाने, थोड्याशा अनिश्चिततेने आकुबाई उठली. खोलीचं दार तिनं घट्ट ओढून घेतलं आणि ती वर गच्चीत गेली. उज्ज्वला गडीमाणसांसाठी चहा टाकत होती.
ड्रायव्हर बापू आणि आनंदाच्या बॅग गाडीत ठेवत होता.
पापड गोळा करून खाली आलेल्या आकुबाईने सवयीने उज्ज्वलाच्या खोलीच्या दाराकडं बघितलं. तिने घट्ट ओढून घेतलेलं दार आता जरा किलकिलं झालं होतं आणि आतून कुणाच्या तरी हालचालींचा आवाज येत होता.. आतून स्वरदाच्या रडण्याचाही अस्पष्ट आवाज ऐकू येत होता.
आकुबाईच्या काळजात धस्स झालं. तिच्या हातातला डालगा खाली पडला आणि त्यातले पापड विखुरले. त्यांचे तुकडे तुकडे झाले.
“आगंबाई, इजाट!” ती किंचाळली. अशुभाची चाहूल लागलेले घरातले सगळे लोक त्या खोलीच्या दिशेने धावले. संतोषने लाथेने ते अर्धवट उघडं दार सताड उघडलं. त्याची नजर पाळण्यावर गेली. पाळणा रिकामा होता.

खोलीच्या कोपर्‍यात स्वरदाला एका हातात घेऊन वैजयंती उभी होती. स्वरदाच्या डोक्यावरची कुंची मागे सारलेली होती. तिची टाळू हलत होती. वैजयंतीचा दुसरा हात स्वरदाच्या डोक्यावर उगारलेला होता. खोलीत आलेल्या लोकांना बघताच तिचा हात कुणीतरी कापून टाकल्यासारखा खाली आला. तिच्या हातात असलेले दोन टोकदार दाभण खण्ण खण्ण असा आवाज करत गळून खाली पडले.

प्रतिक्रिया

थरारक.. धक्कादायक.. अप्रतिम..

जेपी's picture

12 Nov 2023 - 6:00 pm | जेपी

खूप धक्कादायक कथा.

तुषार काळभोर's picture

12 Nov 2023 - 6:50 pm | तुषार काळभोर

थरारक कथा!

सरिता बांदेकर's picture

12 Nov 2023 - 7:11 pm | सरिता बांदेकर

शेवटचा ट्विस्ट मस्त.

Nitin Palkar's picture

12 Nov 2023 - 7:45 pm | Nitin Palkar

अनपेक्षित धक्कादायक शेवट.

कर्नलतपस्वी's picture

12 Nov 2023 - 8:02 pm | कर्नलतपस्वी

खूप छान, आवडली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Nov 2023 - 3:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कथा सुंदर जमून आली आहे. 'इजाट'मुळे मिपा अंकाला चार चांद लागले आहेत. पात्र, प्रसंग आणि वर्णनामुळे कथा मनाची पकड घेते. आपल्यासमोर सर्व घटना घडत जातात आणि कथेचा शेवट तर अप्रतिमच. प्रत्येक माणसाच्या मनात एक सुप्त इजाट दडलेला असतो. असूयेच्या निमित्ताने कधी तरी तो बाहेर पडतो आणि उघडही होतो. कथा नंबर एक. आवडली.

अनिरुद्धच्या पाठीवर जी बहीण झाली ती वैजूलाच झाली होती असे कथा वाचता वाचता राँग साईडला गेलो आणि मग घोळ झाला. मुलगा नाही म्हणून 'इजाट' अशी समजूत करून घेतली होती. ज्येष्ठ, मिपाकर गविंनी पुन्हा योग्य वळणावर आणून उभे केले. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

सोत्रि's picture

13 Nov 2023 - 5:53 pm | सोत्रि

संजोपराव, सिर्फ नामही काफी है!

सुरुवतीपासून पकड घेऊन शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी जबरदस्त कथा!

- (संजोपरावांचे लेखन वाचून एकेकाळी मिपावर रुळलेला) सोकाजी

श्वेता व्यास's picture

13 Nov 2023 - 6:13 pm | श्वेता व्यास

कथा म्हणून छान आहे, पण प्रत्यक्षात कल्पना करवत नाही.
अर्थात अशी मनोवृत्ती देखील असतेच!

टर्मीनेटर's picture

16 Nov 2023 - 10:59 am | टर्मीनेटर

कथा आवडली 👍

नठ्यारा's picture

16 Nov 2023 - 8:00 pm | नठ्यारा

वैजयंती काहीतरी करणार असा अंदाज होता. पन ह्यो कायतरी इपरीतच म्हनायचं. कथा खिळवून ठेवते. शेवटची कलाटणी एकदम अनपेक्षित. 'सजोप राव' बस नामही काफी है.

बाकी, वाडा आणि ऊदमांजराची चित्रं आवडली.

-नाठाळ नठ्या

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Nov 2023 - 10:24 pm | अमरेंद्र बाहुबली

कथा आवडली नाही. इतरांना कशी आवडली कळत नाहीये.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Nov 2023 - 3:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कथा का आवडली नाही ? कथेतलं कथाबीज की अन्य काही ?

-दिलीप बिरुटे
(उत्सुक कथाप्रेमी_

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Nov 2023 - 5:45 pm | अमरेंद्र बाहुबली

ऊगाच वांझ आहे म्हणून एका स्त्रीला खलनायक ठरवलंय, आधीच्या काळी वांझ स्त्रीला त्रास दिला जायचा, टाकून दिलं जायचं पण अजूनही तीच मानसिकता दिसतेय. सदर कथमूळे समाजात वाईट संदेश जाऊ शकत.

नेत्रेश's picture

21 Jan 2024 - 8:06 am | नेत्रेश

कथाबीज कमजोर होते असे नाही म्हणु शकत, पण तरीही शेवट फारसा तर्कसंगत वाटत नाही. सख्या बहीणीचे छोटे मुल मारुन मोठीचा काय फायदा होणार होता?
उलट मोठी चांगली शिकलेली होती, कर्त्रुत्व होते, चांगले संस्कार होते, पैसा होता, पुढारलेल्या विचारांची माणसे होती. टेस्ट ट्युब बेबी (In vitro fertilization) साठी प्रयत्न करता आले असते. पण पुरेसे कारण न देता मोठीला थेट हत्येचा प्रयत्न करताना दाखवले आहे, कथेला कलाटणी देण्यासाठी मोठीला जबरदस्तीने वाईट बनवल्यासारखे वाटते, एवढेच. तिचा वाईटपणा पर्यंत प्रवास कसा झाला हे दाखवायला हवे होते.

बाकी तुमच्या लेखनाचा चाहता आहेच. (कदाचित म्हणुनच हा प्रतिसाद देत आहे).

सच्चा's picture

24 Nov 2023 - 10:34 pm | सच्चा

इजाट कथा आवडली
इथे वैजयंती खलनायिका आधी नाही आहे, कथाबीज अशाप्रकारे आहे कि एखादी व्यक्ती कोणत्या वेळी कशाप्रकारे आत्यन्तिक टोकापर्यंत जाऊ शकते. सदर कथेचा कालावधी हा निदान ७-८ वर्षांचा तरी आहे आणि कथेचा काळ १९९० ते २०२३ या कोणत्याही कालावधीत असू शकेल. कथानक जास्तीतजास्त ग्रामीण भागातील वातावरण आणि परिसर चित्रित करते, आणि त्यानुसार लोकांच्या समजुती समज गैरसमज चालीरीती याचे पुरेपूर आणि यथोचित वर्णन आहे. बापूसाहेबांचे आधुनिक विचारही बऱ्याच ठिकाणी कथेत अधोरिखित होतात त्यामुळे हि कथा कोणत्याही स्त्रीला वांझ म्हणून खलनायिका ठरविणारी नाही आहे, तर सामाजिक आणि मानसिक परिस्थिती कोणत्याही व्यक्तीचे नैतिक अधःपतन कसे घडवून आणू शकते यावर प्रकाश टाकणारी आहे. ज्याप्रमाणे वैजयंतीच्या मनातील इजाट उसळी मारून गैरकृत्य करण्यासाठी परिस्थितीचा वापर करू पाहतो त्यामागे निश्चितपणे आजूबाजूची सामाजिक जडणघडण आणि कोणत्याही स्त्रीच्या मनात असणारी मातृत्वाची आस कारणीभूत ठरू शकते.
ज्या दाम्पत्यानां संतती नसते त्यांना काही वेळी वेगळ्या प्रकारे बघितले आणि वागवले जाते, यामध्ये स्त्री पुरुष असा भेद नाही, असं प्रत्येक ठिकाणी असेलच असे नाही परंतु पुरुषांकडेही साशंक नजरेने बघितल्या जाते, जास्त करून शहरी भागात.
कथानकाचा उद्देश हा मानवी स्वभावातील दडलेला प्राणी दाखवणे हा आहे, यात तो इजाटाच्या रूपाने प्रकट होतो, जर कथावस्तू आणि परिस्थिती बदलली तर भुजंग, अजगर, कोल्हा, तरस, गिधाड, या स्वरूपात माणसातील जनावर दृश्य होते.

सिरुसेरि's picture

29 Nov 2023 - 2:36 pm | सिरुसेरि

कथा शेवट पर्यंत खिळवुन ठेवते . पण कथेचा शेवट एका ठराविक साचेबद्ध पद्धतीने होतो . तो अधिक रंजक/ वेगळा / धक्कादायक हवा होता ( हे मा वै म आ ) .

चौथा कोनाडा's picture

3 Dec 2023 - 5:29 pm | चौथा कोनाडा

बाप रे ... काय खतरनाक कथा आहे !

NashasCL456

शेवटाला इजाट प्रसंग वाचता वाचता टूण्ण्कन उडी मारून खुर्चीतुन पडलो !

संजोप रावांची कथा म्हटल्यावर काहीतरी जबरी असणार याची खात्री होती !
फुल्ल मिसळपावपैशे वसुल कथा !

चांदणे संदीप's picture

6 Dec 2023 - 11:12 am | चांदणे संदीप

उत्तम लेखन. खूप आवडले.

सं - दी - प

संजोपरावांनी त्यांचे हितसंबंध वापरुन नेमके वर्णन करणारी माझी प्रतिक्रिया अप्रकाशित करुन घेतली त्याबद्द्ल त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !
तात्या जाऊन किती तरी काळ गेला पण पिरंगुटमधील काही हितैषी अजूनही सक्रिय आहेत हे पाहून मन भारावले.