सारणासाठी साहित्य -
१) १ चमचा जिरे.
२) १ चमचा धणे.
३)२ चमचे पांढरे तीळ.
४) ३ चमचे बारीक किसेलेल सुके खोबरे.
५) घट्ट चिंच-गूळ चटणी (रेडिमेड चालेल)
६) बारीक शेव.
७) लाल तिखट १ छोटा चमचा.
८) चवीनुसार मीठ.
९) साखर १ छोटा चमचा.
सारणाची कृती -
सर्वप्रथम एक तवा किंवा पॅन मंद आचेवर तापवून घ्यावा. तवा तापला की त्यात आधी जिरे आणि धणे भाजून घ्यावेत. ते भाजल्याचा सुगंध यायला की त्यात तीळ घालावे. तीळ तडतडले की शेवटी सुके खोबरे घालावे आणि मस्त खरपूस भाजून घ्यावे. मिश्रण करपणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठीच गॅसची आच मंद ठेवावी. आता हे मिश्रण गार होऊ द्यावे. मिश्रण गार झाले की मिक्सरमध्ये फिरवून त्याची पावडर करून घ्यावी. आता ह्या सारणामध्ये अनुक्रमे मीठ, साखर, लाल तिखट आणि मूठभर बारीक शेव घालून दळून पुन्हा मिक्सरमध्ये फिरवावे. हे आपले बाकरवडीचे सारण तयार आहे.
आता बाकरवडीचे पीठ मळून घेऊ या. त्यासाठी साहित्य -
१) १ कप मैदा.
२) २ चमचे बेसन.
३) चवीनुसार मीठ.
४) ३ चमचे कडक तेलाचे मोहन.
कृती - एका परातीत मैदा घेऊन त्यात बेसन आणि चवीनुसार मीठ कोरडेच एकत्र करून घ्यावे. आता त्यात कडक तेलाचे मोहन घालून पिठाला चांगले चोळून घ्यावे. मोहन सर्व पिठाला व्यवसथित लागले पाहिजे आणि कोरड्या पिठाची मूठ तयार व्हायला लागली की मोहन परफेक्ट आहे असे समजावे. मूठ होत नसेल आणखी थोडे तेल तापवून घालावे. आता ह्या पिठात थोडे थोडे पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. पीठ घट्ट असेल तरच बाकरवडी खुसखुशीत होईल. पीठ मळून झाले की १५ मिनिटे झाकून ठेवावे.
आता या पिठाचा साधारण एका मोठ्या चपातीला लागेल इतका गोळा घेऊन पातळ व एकसमान लाटून घ्यावा. त्यावर चिंच-गूळ चटणी सर्व पोळीला सारखी पसरवून घ्यावी. आता त्यावर आपले सारण व्यवस्थित पसरवून घ्यावे. आता त्यावर पुन्हा बारीक शेव पसरवून लाटण्याने हलकेच फिरवून ग्यावे, म्हणजे सारण सगळ्या पोळीला एकसारखे लागेल.
आता या पोळीची गुंडाळी / रोल करून घ्यावी. या रोलच्या एक इंच आकाराच्या वड्या कापून घ्याव्या. कापलेल्या वड्या उभ्या ठेवून बोटाने हलकेच दाबून थोड्या चपट्या करून घ्याव्या. आपल्या बाकरवड्या तळण्यासाठी तयार आहेत.
आता एका कढईत तेल आधी तापवून घेऊन आच मध्यम ठेवून सर्व बाकरवड्या खरपूस तळून घ्याव्या. (आच मोठी असेल तर बाकरवडी बाहेरून तळली जाते, पण आतून कच्ची राहते).
आपली खमंग खुसखुशीत बाकरवडी तयार आहे.
प्रतिक्रिया
12 Nov 2023 - 10:56 am | Bhakti
मस्त बाई खुसखुशीत दिसत आहेत
मीही यंदा पहिल्यांदाच बाकरवडी केली आहे,जरा नरम पडलीय पण सारण मस्त झालय.
(स्वगत-चला फिरायला म्हटलं आणि आधी स्वयंपाकघरातच आले ;))
13 Nov 2023 - 12:08 pm | पियुशा
सुंदर ! हवामान ढगाळ आहे त्यामुळे नरम पडल्या असतील गार झाल्या की लगेच एअर टाईट कंटेनर मध्ये भरून ठेवायच्या आणि तू म्हणते तसेच आपल पर्यटन किचन पर्यंत ;)
12 Nov 2023 - 9:08 pm | कर्नलतपस्वी
मस्त रेसिपी.
करून बघतो.
13 Nov 2023 - 10:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाह ! बाकरवडी मस्त. कुरकुरीतच झाल्या असतील असे समजतो. भाकरवडी आवडल्या गेली आहे.
चखण्याला पण भारी लागतात असं 'चखणाशास्त्र' ग्रंथात लिहिलं आहे. ;)
-दिलीप बिरुटे
13 Nov 2023 - 12:06 pm | पियुशा
हो अशा पद्धतीने कुरकुरीत च होते गार झाली की एअर टाईट कंटेनर किंवा स्टील डब्ब्यात भरून ठेवावी. आणि चाखण्या साठी हा जो मसाला आहे ना बाकरवडी चा त्यात थोड पाणी घालून घट्ट पेस्ट बनवून त्यात शेंगदाणे किंवा काजू बुडवून dip fry करू शकता सुंदर चाखणा होईल असे मला वाटते तुमच्या जबाबदारीवर ट्राय करून बघावे ;)
13 Nov 2023 - 12:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माहितीबद्दल आभार. धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
13 Nov 2023 - 12:58 pm | तुषार काळभोर
नो वन कॅन इट जस्ट वन!
14 Nov 2023 - 7:27 pm | मुक्त विहारि
पण, आता ह्या बाकरवड्या खायलाच मिळाल्या नाहीत तर, तुलना कशी होणार?
पण, निदान फोटोत तरी उत्तम चवीच्या दिसत आहेत...
16 Nov 2023 - 12:02 pm | टर्मीनेटर
वा... झकास पाकृ 👍
दोन वर्षांनी का होईना दिवाळी अंकाच्या निमीत्ताने एक सुगरण पुन्हा लिहिती झाली ह्याचा आनंद झाला 😊
16 Nov 2023 - 4:03 pm | श्वेता२४
याच्या वाटेस कधी गेले नाही. एकदा करुन बघतेच.
17 Nov 2023 - 5:35 pm | चौथा कोनाडा
फर्मास पाकृ ! खमंग खुसखुशीत बाकरवडी !
फोटो झकासच. तोंपासू
9 Dec 2023 - 10:17 am | विवेकपटाईत
मस्त
29 Dec 2023 - 11:57 am | श्वेता व्यास
मस्त दिसतेय बाकरवडी, तोंपासू!
29 Dec 2023 - 3:26 pm | विवेकपटाईत
भाकरवडी आवडली.