नमस्कार मिपाकर सुजनहो!
यंदाचा प्रवास/पर्यटन/भटकंती ह्या विषयास वाहिलेला मिसळपाव दिवाळी अंक २०२३ सर्व रसिक वाचकांसमोर ठेवताना मला अतिशय आनंद होत आहे.
पिढ्या बदलल्या, वाचकांच्या अभिरूचीला नवे धुमारे फुटले, नवनवीन तंत्रज्ञान आणि माध्यमांचा विळखा पडला तरीही मराठी माणसाच्या मनात दिवाळी अंकाचे स्थान अबाधित आहे. वृत्तपत्र , प्रसारमाध्यमे आणि समीक्षक-पुस्तके/लेख यांच्यातून होणाऱ्या वर्षभराच्या निरर्थक वैचारिक मंथन माऱ्याला दिवाळीच्या मंगल काळात येणारे हे दिवाळी अंक नवीन तजेलदार वातावरण निर्मिती करतात आणि काही काळासाठी का होईना वाचकांच्या डोक्यावरून ते वैचारिक ओझे उतरवून ठेवण्यासाठी मदत करतात. अशा दिवाळी अंकाच्या परंपरेला जपण्यात मिपाही आपल्या परीने खारीचा वाटा उचलत असते, यापुढेही उचलत राहील. एकदम परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन वगैरे कुठूनतरी माझ्या डोक्यात घुमले. ते एक असो.
मंडळी, गलेमातील लेख वाचून होत आहेत तोवर मिपाचा दिवाळी अंक आला इतक्या लवकर वेळ निघून गेलेला आहे. असे माझ्या बाबतीत तरी घडले आहे. अर्थात, वेळ हा पुढेच सरकत राहणार आहे आणि तो पुन्हा रिलेटीव्ह म्हणजेच प्रत्येकासाठी वेगवेगळ्या पध्दतीने जाणवणारा विषय आहे. थोडक्यात, ऑफिसमधल्या किचकट रखडलेल्या कामात नाईलाजास्तव रोज उशिरा बसणाऱ्यांसाठी एकेक तास एकेका महिन्यासारखा जातो (एक दिवसाच्या मेहनतीसाठी कंपनीने एक महिन्याचा पगार दिला पाहिजे असे विचार मनात त्या कामाला तडीस नेताना येत असतील) तर कुणाला, ऑफिसनंतर एखाद्या सुबक ठेंगणीला भेटून कुठल्याशा कॅफेत गप्पा मारत असताना एकेक तास एकेका सेकंदात निघून जातोय का काय असे वाटते.
वेळेच्या प्रवासानंतर आपण खऱ्याखुऱ्या आयुष्यातल्या खऱ्याखुऱ्या प्रवासाकडे येऊया. तर, माणूस हा खरे पाहता भटका प्राणी होता पण नंतर संसार, समाज, प्रांत अशा सीमा स्वतःवर लादून तो स्थिरसावर झाला. पण, एका जागी बसेल किंवा त्याचे विचार एका जागी थांबतील तो माणूस कसला. मग त्याचा प्रवास सुरू झाला त्यातून अमेरिकेचा शोध लागला, चंद्राला गवसणी घालण्यात आली, पर्वतशिखरांची उंची तसेच महासागरांची खोली धुंडाळून काढण्यात आली. थोडक्यात प्रवास हाही माणसाच्या आयुष्याचा एक भाग बनला. ज्ञानार्जनासाठी, रंजनासाठी, पोटाची खळगी भरण्यासाठी तर काही वेळा तीर्थयात्रा करण्यासाठी प्रवास हा केला जातो. निमित्त काहीही असो, हा प्रवास जेव्हा वर्णनातून इतरांसमोर येतो तेव्हा त्यांच्याही प्रवासाच्या सुप्त इच्छा जागवतो. मिपावर प्रसिद्ध अशा लेखनप्रकारात भटकंती हा लेखनप्रकार आहे आणि मला लगेचच आठवतील अशा लेखकांपैकी सुहास म्हात्रे, टर्मिनेटर, प्रचेतस, अनिंद्य असे सिद्धहस्त लेखक आहेत ज्यांच्या प्रवासवर्णनाच्या लेखमालिका गाजलेल्या आहेत. माझ्यासारख्या कित्येकांनी घरीबसल्या भारतातल्या किंवा जगातल्या अद्भुत आणि रम्य अशा पर्यटनस्थळांचा आस्वाद घेतलेला आहे. ते निव्वळ वाचूनच कित्येकदा मित्रांच्या चर्चेत त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन आल्यासारखेही त्या ठिकाणांबद्दल मत मांडले आहे. इतके ते प्रभावी लेखन/वर्णन झालेले आहे.
यंदाच्या मिपाच्या दिवाळी अंकातील सर्वच लेखनाविषयी इथे लिहिणे शक्य नाही. तसे करायला गेलो तर इथेच रसिक वाचक दमून परत फिरण्याची शक्यता आहे म्हणून ठराविक लेखनाचाच उल्लेख करून बाकी लेखनमोती आपले आपण ते वेचून घ्यावेत अशी सर्व रसिक वाचकांना विनंती करतो.
यंदाच्या प्रवास/पर्यटन/भटकंती ह्या विषयावर आधारलेल्या मिपाच्या दिवाळी अंकात तसे पाहता विविधरंगी लेख आलेले आहेत. पैजारबुवांच्या लेखणीतून त्यांच्या रोजच्या घर ते ऑफिसचा बस स्टॉप ह्या (केवढ्या लांबच्या!) प्रवासात रोज भेटणाऱ्या व्यक्तींबद्दल त्यांच्या मनात येणारे विचार त्यांच्या नेहमीच्या खुमासदार शैलीत त्यांनी लिहिले आहेत. राजेंद्र मेहेंदळे यांच्या कोकण भटकंती लेखात सुरेख वर्णन व सुरेख फोटो आलेले आहेत. प्राजक्तफुलांचा सडा तर केवळ लाजवाब. क्षितीज जयकर यांचा मालवण व इतर ठिकांणासंबंधीचा लेख म्हणजे तर वाचकांसाठी अस्सल मेजवानीच. इतर लेखांमध्ये सन्जोप राव, बिपीन सांगळे यांचे लेख विशेष लक्ष वेधून घेतात. आजींनीही नेहमीच्या खुसखुशीत शैलीत दिवाळी अभ्यंगस्नानाविषयी उत्तम स्मरणरंजन केले आहे. याशिवाय इतरही लेख नक्कीच वाचनीय आहेत. कविता या विभागात अगदीच शुकशुकाट नको म्हणून संपादक मंडळाने माझी एक कविता लोटून दिलेली आहे. ती आपल्याला आवडेल अशी आशा आहे. हे लिहून होईपर्यंत काही कविता आल्या. अनंत यात्रींच्या सुरेख रचनेने दिवाळी अंकातला काव्यचांदवा अजून बहरात आलेला आहे. अजून काव्य आहेच.
श्रीगणेश लेखमाला संपली आणि दिवाळी अंकाचे वेध लागल्यावर यथावकाश मिपा दिवाळी अंक समितीची अंतर्गत चर्चा सुरु झाली.
त्या चर्चेत गविंनी "या वेळी एकूणच अंक Dall-E , बिंज इमेज क्रिएटर यांच्या मदतीने ओरिजिनल आणि लेखांशी, कथेशी सुसंगत अशा इमेजेस बनवून सजवावा असे वाटते" असे मत मांडले आणि काय आश्चर्य, सर्व सदस्यांनी ती कल्पना नुसती उचलूनच धरली नाही तर मिपाचे पूर्वाश्रमीचे पैलवान - तुषार काळभोर यांनी AI च्या बखोटीला धरून चित्रे नसलेल्या लेखांसाठी तयार केलेल्या सुरेख चित्रांकरता त्यांचे विशेष आभार.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवीन आकर्षक ढंगात मिपाचा दिवाळी अंक वाचकांसमोर येत आहे. मी सोडून इतर काही मिपासदस्य, संचालक मंडळ आणि साहित्य संपादक यांचे मी मनापासून आभार मानतो ज्यांनी या दिवाळी अंकाच्या कामासाठी आपापला व्याप सांभाळून ह्या निर्मीतीप्रकीयेत आपले अमोल योगदान दिले.
ह्या संपादकीय लेखाचा समारोप करताना शेवटी इतकेच म्हणतो की संपादकीय स्वरूपात माझे विचार मिपा वाचकांसमोर मला मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मिपा संपादक मंडळाचा मी मनापासून आभारी आहे
सर्व मिपाकर आणि कुटुंबियांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!
- चांदणे संदिप
प्रतिक्रिया
12 Nov 2023 - 7:23 am | निमी
संपादकीय उत्तम.. फराळ आधी करावा की अंक आधी वाचावा असा संभ्रम होईल इतके सुयोग्य संपादकीय लेखन..पूर्ण संपादक मंडळाचे आणि त्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.
14 Nov 2023 - 8:35 pm | मुक्त विहारि
सहमत आहे
12 Nov 2023 - 7:37 am | भागो
संपादक मंडळींचे अभिनंदन. पहिल्या नजर भेटीतच प्यार हो गया.
आत्स एकेक करून सगळा अंक वाचणार आहे.
12 Nov 2023 - 7:42 am | ज्ञानोबाचे पैजार
विमानाचे कॅप्टन संदीप चांदणे आणि त्यांच्या क्रु मेंबर्स चे विशेष अभिनंदन
फराळा आधी अंकावर तुटून पडतो,
उत्तम संपादकीय लिहून विमानाचे जोरदार उड्डाण झाले आहे,
आता एक एक ठिकाणाचा आस्वाद घेतो
पैजारबुवा,
12 Nov 2023 - 7:51 am | भागो
हे काय चारच कथा?
संपादक मला सुरवातीची चित्रे दिसत का नाहीत ? ब्राउझार बदलून बघतो.
12 Nov 2023 - 8:16 am | भागो
आता दिसायला लागली. एक app होते ते डिसेबल केलंं.
काय सांगू सर. असा भन्नाट दिवाळी अंक आयुष्यात प्रथमच बघतो आहे.
12 Nov 2023 - 8:06 am | प्रचेतस
सहज सुंदर संपादकीय आणि उत्कृष्ट अंक
12 Nov 2023 - 9:25 am | मदनबाण
संपादकीय आणि मिपा दिवाळी अंक सुरेख आहे. या अंकासाठी लिखाण करणार्या तसेच अंकासाठी विशेष मेहनत घेणार्या सर्व मिपाकरांना आणि मिपा वाचकांना दिवाळीच्या खूप सार्या शुभेच्छा ! :)
मदनबाण.....
12 Nov 2023 - 9:41 am | तुषार काळभोर
आज दिवाळी सुरू झाली!
12 Nov 2023 - 11:24 am | गोरगावलेकर
उत्कृष्ठ अंक सादर करणाऱ्या संपादक मंडळाचे आभार
12 Nov 2023 - 12:32 pm | कर्नलतपस्वी
लेख.
खुप आवडला.
12 Nov 2023 - 5:48 pm | जेपी
दिवाळी अंक प्रकाशित करण्यासाठी मेहनत केलेल्या सर्व मिपाकरांचे आभार.
12 Nov 2023 - 6:04 pm | सौंदाळा
सुंदर आणि नेटके संपादकीय.
रच्याकने तुम्ही गद्य खूपच कमी लिहिता ही प्रेमाची तक्रार आहे. तेवढे मनावर घ्याच.
सर्व लेखक, तंत्रज्ञ, मुद्रीतशोधक, सजावटकार सर्वांचेच आभार.
चला आता पुढच्या प्रवासाला निघतो.
12 Nov 2023 - 7:11 pm | कंजूस
मिसळपाव दिवाळी अंक आताच संपूर्ण वाचला. अतिशय चांगला झाला आहे अंक. लेखांना दिलेली चित्रे. या नवीन तंत्रज्ञानाची चित्रे यासाठी मिपाकर तुषार काळभोर यांचे विशेष आभार. ही गोष्ट इतक्या लवकर अमलात येईल याची कल्पनाच नव्हती. एआइ संबंधित कित्येक लेख वाचून समजणार नाही ते इथे प्रत्यक्ष अवतरले.
बोर्डिंग पास दिल्याबद्दल धन्यवाद टर्मिनेटर.
12 Nov 2023 - 8:47 pm | अथांग आकाश
सुरेख सुंदर दिवाळी अंक! तितकेच सुंदर संपादकीय!!
12 Nov 2023 - 10:06 pm | स्नेहा.K.
अंकासाठी काम करणाऱ्या सर्व सदस्यांचे खूप कौतुक आणि मनःपूर्वक धन्यवाद.
13 Nov 2023 - 11:31 am | मित्रहो
संपादकीय छान आता हळूहळू सारे लेख वाचतो. दिवाळीच्या प्रवासाच आनंद यावेळी वाचनातून नेहमीचा साहित्य फराळ तर आहेच
13 Nov 2023 - 1:53 pm | नंदन
संपादकीय नेमके आणि नेटके आहे. अंकाचं दृश्य स्वरूप तसंच मुद्रितशोधनासारख्या बाबींवर घेतलेले परिश्रम याबद्दल संपूर्ण चमूचे अभिनंदन!
आता अंकातले लेख निवांत वाचायला घेतो. समस्त मिपाकर आणि कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!
13 Nov 2023 - 4:44 pm | पाषाणभेद
दिवाळी अंकाची अगदी निराळी मांडणी आहे ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल. संपादकीय वाचतांना मिपाकरांना कायमच असलेला नव्याचा ध्यास जाणवतो. या अंकात तो प्रत्यक्षात आलेला आहे. दिवाळी अंक तयार करतांना अनेकांनी कष्ट घेतलेले आहेत. चांदणे संदीप, गवि, तुषार काळभोर, सुधांशु नूलकर तसेच मिपा मालक यांचे आभार.
(या अंकाची पीडीएफ आहे का? नसल्यास शांततेने करावी अशी विनंती.)
15 Nov 2023 - 8:42 am | उग्रसेन
ऑनलाइन दिवाळी अंक चाळला. संपादकीय उत्तम. AI चा जागोजागी उत्तम उपयोग केलेला दिसला. संपादक टीमचं उत्तम अंकाबदल अभिनंदन.
वेळ मिळेल तसा वाचत राहीन.
15 Nov 2023 - 10:20 am | बिपीन सुरेश सांगळे
दिवाळीच्या सर्व मिपाकरांना खूप शुभेच्छा !
एकूण अंक लै म्हणजे लै च भारी झाला आहे !
त्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे खूप कौतुक न आभार .
( नंतर सविस्तर लिहितो )
15 Nov 2023 - 11:08 am | रंगीला रतन
एक नंबर अंक झालाय! थोडा वाचला थोडा बाकी आहे. परिश्रम घेतलेल्या सर्वांचे आभार.
22 Nov 2023 - 10:12 am | बिपीन सुरेश सांगळे
संदीपजी
अतिशय नेटके अन उत्तम संपादकीय .टॉप च्या दिवाळी अंकात आपल्या अंकाचे स्थान आहे .
( इतरांना कमी कसे लेखावे ? पण सुमार अंकाची भरताड असते . )
संपादन उत्तम . अन एकूण परिश्रमांसाठी दाद .
खूप कौतुक अन अभिनंदन !
6 Dec 2023 - 6:28 pm | श्वेता व्यास
संपादकीय आवडले.
आधी कथा वाचून संपवल्या, आता संपादकीय पासून अंक सुरु केला आहे.
बाकी अंक अगदी प्रेक्षणीय झाला आहे, वाचनीय तर असतोच!