काही शब्द खूप दिवस वापरले गेले नाहीत की धूळ जमल्यासारखे हरवूनच जातात. काही दिवसापूर्वी मी "चहाचं 'आधण' ठेवलंय" म्हटल्यावर माझ्या भावाने म्हटलं "अगं, किती दिवसांनी ऐकला हा शब्द! आजी वापरायची!" खरंच काही शब्द, वस्तू इतिहासजमा झाल्यात.. आणि मला अचानक आठवला तो आमच्या घरचा होल्डाॅल!!
अनेक वस्तू, कपडे बसवायला खूप लहान-मोठे कप्पे असणारा असल्याने त्यात खूप गोष्टी एकत्रित समाविष्ट व्हायच्या, म्हणून खरं नाव 'होल्ड ऑल' आणि अर्थात घरचं.. म्हणायचं नाव 'होल्डाॅल'. रेल्वेत, फलाटावर, बसमध्ये बसायला जागा नसेल तर चक्क ठिय्या मारून ह्या होल्डाॅलवरच बसता यायचं. आत कपडे, पांघरुणं असल्याने होल्डाॅल चांगला गब्दुल्ला असायचा. मिलिटरी ग्रीन रंगाचा कपडा असलेला आणि त्याच रंगाच्या कापडी पट्ट्यांनी आवळून बंद करता येणारा होल्डाॅल ही त्या काळी मला विशेष चैनीची वस्तूच वाटायची. त्या वेळी सैनिकांकडे पत्र्याच्या जड ट्रंक किंवा मोठा होल्डाॅल असायचा त्यामुळेही असेल, मला आमच्या घरचा 'बेबी होल्डाॅल' घेऊन प्रवासाला जाताना आपण 'देशप्रेमाचं' काम करतोय अशी भावना यायची.
लहानपणी प्रवासात लहानांचं तिकीट काढलं जायचं, पण रिझर्व्ह बर्थ नसायचा. स्वतंत्र, राखीव बर्थ नसताना या होल्डाॅलवर मी लहानपणी रेल्वे प्रवासात अनेकदा छान झोपले आहे.. आणि त्याच्या आतही काही कपडेच भरलेले असल्याने मला रेल्वेत गादी मिळाल्याचा थाट वाटायचा. तेव्हा इतर सहप्रवासी वर्तमानपत्र किंवा एखादं जुनं पांघरूण अंथरून झोपायचे, त्यामुळे तर आपण तुलनेने जास्तच सधन असल्याची भावना माझ्यात डोकवायची. त्या काळी ट्रेनने-बसने प्रवास करायला आई-बाबा नेताहेत हेच अप्रूप वाटायचं, कारण माझ्या इतर मैत्रिणी केवळ हातातल्या पिशव्यांमधून सामान न्यायच्या आणि बसप्रवास परवडेल इतक्याच जवळच्या नातेवाइकांकडे जायच्या. त्यामुळे बालपणीच्या काळात होल्डाॅल माझा विशेष लाडका होता.
आमच्या आईला प्रवासात घरातल्या इतक्या तमाम वस्तू का न्यायच्या असायच्या माहीत नाही, पण बहुतेक वेळा सर्व प्रवासी बॅगा नववा महिना पूर्ण झालेल्या बाईसारख्या अगदी 'अवघडलेल्या' असायच्या. चेन लावताना एका व्यक्तीने त्यात ठासून भरलेल्या कपड्यांना चेपटवून दोन्ही कडांना 'समीप' आणायचं काम करावं लागे.. तुडुंब भरणं म्हणजे काय, हे त्या वेळी अगदी चांगलंच कळायचं. चेनची दया यायची आणि बॅगच्या शिवणीतर अगदी असहकार चळवळीत सामील होण्याच्या तयारीत असायच्या. या बॅगा घरातून निघताना मोजणं, बस किंवा रेल्वेपर्यंत नेणं, त्यांच्यासाठी जागा पटकावणं आणि त्यांना सांभाळत इच्छित स्थळी पोहोचल्यावर उतरवणं हे खास जोखमीचं काम असे. 'किती डाग झाले?' असा कुणीतरी प्रश्न विचारायचे, तेव्हा मी नकळत माझ्या बुडाखालच्या होल्डॉलवरच्या असंख्य डागांकडे दयाळू दृष्टीने पहात, त्यावर पडलेले छोटे-मोठे डाग मोजेपर्यंत कुणीतरी हक्काने, ठणकावून, संपूर्ण आत्मविश्वासाने उत्तर द्यायचे 'सात डाग!' तेव्हा कळायचं, या प्रवासी सामानाच्या पिशव्या/बॅगांना 'डाग' म्हणतात. हा होल्डाॅल बसप्रवासात इतरांना त्रासदायक वाटायचा, कारण एस.टी.मध्ये प्रवासी बॅगांसाठीच्या जागेत तो बसायचा नाही, एसटीमधील सीटखाली तो घुसायचा नाही.. पर्यायने येण्याजाण्याच्या वाटेत त्याला ठेवावं लागायचं. येणाऱ्या जाणाऱ्याला तो अडथळा वाटल्याने आवडायचा नाही आणि इतरांची नाराजी, लाथा झेलत तो 'नावडता' ठरायचा. उभ्याने प्रवास करणाऱ्या कुणाला अथवा त्यांच्या लेकराला याच होल्डाॅलवर थोडा वेळ टेकायला मिळालं, तर मात्र दोन-चार जणांचा तो 'आवडता' व्हायचा.
'स्वीकारा अथवा नाकारा, स्थितप्रज्ञ राहून नेमलेले कार्य करणारा, तो मात्र सगळ्यांना नावाप्रमाणे 'होल्ड ऑल' म्हणत सगळ्यांच्या पायाशी राहून होल्ड ठेवायचा.. माझा तो लाडका होल्डाॅल!!
प्रतिक्रिया
12 Nov 2023 - 11:11 am | गवि
नॉस्टॅल्जिया जागवणारा लेख. उत्तम.
बऱ्याच आठवणी होल्डोलमध्ये गुंडाळून आपण सोबत वागवत असतो.. :-)
12 Nov 2023 - 9:01 pm | Nitin Palkar
जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
लहानपणी होल्डऑल मध्ये किती समान मावते याचे नवल वाटत असे. अलीकडे तेवढ्या मोठ्या बॅगा मिळतात.
12 Nov 2023 - 9:37 pm | कर्नलतपस्वी
असणार. नोकरीत सर्वात जरूरी गोष्ट म्हणजे होल्ड ऑल आणी हाऊस वाईफ.
विशेषतः जेव्हां दुर्गम भागात बदली होते तेव्हां सर्व सामान बेस कॅम्प मधे सोडावे लागते. जरूरी सामान होल्ड ऑल मधे गुंडाळून पुढे जायचे. आता रेल्वे श्रीनगर, बारामुल्ला पर्यंत जाते. आमच्या वेळेस जम्मू शेवटचे रेल्वे स्थानक. पुढे लेह लदाख ,व इतर सीमावर्ती भागात मिलिटरीच्या गाडीतून प्रवास. बरेच वेळा लॅण्ड स्लाईड, बर्फबारी मधे रस्ता बंद झाल्यास होल्ड ऑलचाच सहारा.
हाऊस वाईफ म्हणजे सुई धागा आणी प्लास्टिक ची शर्ट पॅन्ट ची वेगवेगळी बटणे. सीमेवर ना हाऊस ना वाईफ आशावेळेस मेक ॲण्ड मेण्ड करता हीच हाऊस वाईफ कामाला येते.
जुन्या आठवणी जाग्या झाल्या. एकदा आग्र्याचा पेठा होल्ड ऑल मधून नेला गर्दीत कोण त्याच्यावर बसले आणी कुणाकुणाचा पिछवाडा पाकाने माखला माहीत नाही.
14 Nov 2023 - 6:33 pm | रामचंद्र
आणि तशीच पोत्यासारखीच पण नाडीने तोंड आवळता येणारी 'बंगी'!
13 Nov 2023 - 4:31 pm | निमी
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल आणि अभिप्रायाबद्दल आभार..काही गोष्टींच्या आठवणीने नोस्टॅलजीक होऊन त्या काळात थोडा वेळ रमणे फार भारी वाटते.
14 Nov 2023 - 7:10 pm | स्नेहा.K.
आठवणीदेखील आपल्या सर्वांच्या मनाच्या होल्डॉलमध्ये अशाच जपून ठेवलेल्या असतात..
14 Nov 2023 - 7:13 pm | मुक्त विहारि
आमची आजी, पत्र्याची ट्रंक आणायची...
14 Nov 2023 - 8:44 pm | नठ्यारा
लहानपणापासून होल्डॉल ओळखीचा आहे. कोलाडजवळ जननीचा डोंगर आहे. त्यावर चैत्रात उत्सव असतो. तिथे लहानपणी खूपदा गेलोय. ठाण्याहून एसटीने गोवा महामार्गावरील तळवली गाठावं लागे. तिथे उतरून पायथ्याचं तिसे गाव गाठायचं. मग तिथनं डोंगर चढायला घ्यायचा. प्रवासात वाहून न्यायला आणि गडावर उलगडून ठेवायला होल्डॉल चांगलाच कामी येई. माझ्या डोक्यात होल्डॉल म्हणजे जननीचा उत्सव हे समीकरण घट्ट बसलं आहे.
-नाठाळ नठ्या
14 Nov 2023 - 11:05 pm | सतिश गावडे
जननीच्या डोंगराच्या लिखित स्वरूपातील उल्लेख वाचून मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
मला हा डोंगर माझ्या बालपणापासून तुम्ही उल्लेख केला आहे त्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे सुतारवाडी - पाथरशेत - जावटे या रस्त्याच्या दिशेने माहिती आहे. इकडच्या बाजूच्या पायथ्याला बहुतेक पहूर गाव आहे.
ताम्हिणी घाट उतरून कोलाडच्या रस्त्याला सुतारवाडी परिसरात आलो की समोर हा डोंगर दिसायला लागतो तो अगदी सुतारवाडी वरुन डाव्या हाताच्या भाले रोड लागलो तर अगदी जावटे गाव येईपर्यंत दिसत राहतो.
16 Nov 2023 - 7:02 pm | नठ्यारा
अवांतर :
सतीश गावडे,
तुम्ही कोलाडच्या आसपासचे स्थानिक दिसताय. :-) वाचून आनंद झाला. तुमच्या बाजूचं पहूर गाव हे नाव बरोबर आहे. जननी पहूरवासिनी आहे. डोंगराचं नाव पहूरगड असं ठेवलेलं आहे. त्यास जनीचा माळ असंही म्हणतात. आम्ही मंडळी कोकणातनं येणारी चाकरमानी. आम्हांस ताम्हिणीची बाजू माहित नाही. पुण्याचे लोकं पूर्वी खंडाळा खोपोली मार्गे यायचे. हल्ली ताम्हिणी घाटरस्ता चांगला विकसित केला आहे. त्यामुळे पुणेकरांना उत्सवास येणं अधिक सोयीस्कर पडतं आहे. आम्हां मुंबई ठाणे करांसाठी कोकण रेल्वे आहे.
फार पूर्वी १९५५ सालच्या आसपास कोण्या शहरी भक्तास दृष्टांत झाला होता की जननी तुझं कुळदैवत आहे. त्याने काही लोकांना बरोबर घेऊन डोंगर धुंडाळायला सुरुवात केली. बरीच शोधाशोध केल्यावर स्थान सापडलं. त्या वेळेस मंडळी पुणे --> भोर --> ताम्हिणी असा शोध घेत भेंबटमाळ गावाजवळ आले. तिथे त्यांना पहूरपाशी कुठलासा डोंगर आहे व त्यावर पडकं मंदिर असल्याची माहिती मिळाली. तिथून मग नीट माग लागला. म्हणून जननीस पहूरवासिनी म्हणतात.
नंतर कोकणातनं अधिक सोयीस्कर रस्ता सापडला. तेव्हा मुंबई --> पनवेल --> धरमतर --> वडखळ --> पेण ? --> पाली ? --> असं करीत पहूरला यावं लागे. प्रवासात दोनेक दिवस सहज जात. त्या काळी मुंबई-गोवा महामार्ग नव्हता. फार काय, पनवेलहून पेणला यायलाही नीटसा रस्ता नव्हता. धरमतरच्या खाडीतून वडखळमार्गे पेण गाठावं लागे. नंतर गोवा महामार्ग झाला. त्यामुळे एसटीने तळवलीस उतरून चालंत वा बैलगाडीने तिसे गाठणं बरं पडायचं. आता तर कोकण रेल्वे झालीये. कोलाडवरून रमतगमत तिसे गाठता येतं.
-नाठाळ नठ्या
14 Nov 2023 - 9:47 pm | अथांग आकाश
लेख आवडला!
15 Nov 2023 - 5:35 am | कंजूस
सगळा मिपा अंकच होल्डॉल झाला आहे हे परवाच सांगितले.
मी एकदाच कुणा वर्गमित्राचा होल्डॉल पाहिलेला आठवतोय. त्यात गादीसुद्धा होती. पण झोपण्यासाठी गादी का लागते हे कळलं नाही. तर हे विचित्र प्रकरण कसं काय लोकप्रिय होतं याचं आश्चर्य वाटलं.
हुं एन सोंग आठव्या शतकात नालंदा येथे आणि थोडा भारत फिरायला आला होता तेव्हाचं एक चित्र आहे कुठेतरी जालावर. त्यातली त्याची पाठीवरची पेटी फार आवडली होती. तीच अधिक योग्य आहे. ती उतरवून त्यावर स्टुलासारखे बसताही येत असावं. न्यायला सोपी आणि पावसातही आतल्या वस्तू कोरड्या राहातं असतील.
15 Nov 2023 - 7:46 am | गोरगावलेकर
लेखाशी समर्पक चित्रही आवडले.
15 Nov 2023 - 12:20 pm | ज्ञानोबाचे पैजार
आमच्या कडे एक जुनी प्रवासी ट्रंक होती, ती कधी प्रवासाला वापरली नाही, प्रवासा करता आमच्या कडे एक निळी बॅग होती, सगळ्यांचे कपडे त्या एका बॅगेत बसवायचे, मग बाबा त्याला एक कुलूप लावायचे जे मुक्कामी पोचले की उघडले जायचे
पैजारबुवा,
15 Nov 2023 - 12:27 pm | सतिश गावडे
होल्डाॅल संबंधी मी कथा कादंबरी मध्येच वाचले होते, नेमके काय असते ते हा लेख वाचून कळले.
छान झाले आहे स्मरण रंजन !!!
15 Nov 2023 - 3:52 pm | तुषार काळभोर
+१
मला होल्डॉल म्हणजे ही बॅग वाटायची.
22 Dec 2023 - 4:07 pm | श्वेता व्यास
छान आठवणी आहेत होल्डॉलच्या.
22 Dec 2023 - 6:38 pm | सरिता बांदेकर
आम्ही अजूनही वापरतो.आम्हाला आमची गाडी घेऊन ठिकाण न ठरवता फिरायला जायला आवडतं.अशा वेळी होल्डॅाल कामाला येतो.
खेडेगावात कुणाच्या तरी पडवीत झोपायला परवानगी मागायची आणि गाव आवडलं तर दोन/ तीन दिवस मुक्काम करायचा.
संध्याकाळी शेतात काम करून आलेल्या लोकांच्या गप्पा ऐकायच्या.
शहरातले असल्यामुळे एक मच्छरदाणी पण ठेवतो.ते लोक जे देतील ते खातो.मग निघताना मुलांना खाऊसाठी पैसे द्यायचे.
हल्ली स्लिपींग बॅग मिळतात पण होल्डॅालची मजा नाही.
आणि पूर्वी फिरकीचा तांब्या असायचा.
छान वाटला तुमचा लेख.