साहित्यः
> चिकन खिमा / मटण खिमा / पोर्क खिमा / गोखिमा : अर्धा किलो : खिमा ताजा असावा. चामड्यासहित केलेला खिमा असेल तर अजून चवदार लागतो. मटण खिमा किंवा तुमच्या आवडीचा कोणताही खिमा घ्या. मी शक्यतो कोणतेही मांस कमीतकमी दोन तास ८ टक्के मीठाच्या पाण्यात भिजवून ठेवतो. खिमा भिजवायची गरज नाही. गरज नसेल पण खाज असेल तर मात्र ब्रायनिंग जरूर करून घ्या. नंतर चाळणीतून गाळून पाणी पूर्ण निथळू द्या. थोडी हळद चोळून घेतली तरी चालावे.
> पारमेजान चीज: दोन मुठी: पारमेजान चीज नसेल तर पनीर सोडून इतर कुठलेलंही घट्ट चीज किसून. तेही नसेल तर ऑपशनला टाकावे. चरबी जास्त घ्यावी थोडीशी. पनीर घातले तरी माझी हरकत नाही पण देव बघतो आहे हे ध्यानात असू द्यावे.
> पार्सली/कोथिंबीर : मूठभर: बारीक चिरून.
> अंडी : एक/दोन : अर्धा किलोला दोन, पाव किलोला एक. देशीच हवीत असं काही नाही.
> ब्रेडक्रम्ब/पांको : दोन मूठ: जपानी पांको आकाराने मोठे असतात. ब्रेडक्रम्ब घरी करणे हेही अवघड नाही. घरी कसे करावेत याचे युट्युबवर खूप व्हिडीओ आहेत. ब्रेडचे बारीक तुकडेही टाकले तरी चालतील. यांना पर्याय काय यावर विचार केला. मोठा भरडा रवा भाजून? फार गाळ व्हायला नको आणि चवही बिघडायला नको. त्यामुळे ब्रेडचे बारीक तुकडे इथवर तडजोड करू.
> लाल कांदे: एक/दोन: बारीक चिरून
> लसूण: आवडेल तसे: बारीक चेचून
> पाप्रिकापूड/ तिखट मसाला/ हिरव्या मिरच्या ठेचून: आवडेल तसे : पाप्रिका नसेल तर आपले घरचे तिखट + काश्मिरी तिखट. खिमा जर मुळातच मसालेदार असेल म्हणजे त्यात मिरपूड घातलेली असेल तर प्रमाण कमी करावे. आवडत असेल तर चिमूटभर चिकन/मटण मसाला भुरभुरावा. तिखट वापरायचे नसेल तर हिरव्या मिरच्या ठेचून घातल्या तरी चालेल. आलंही टाका मग.
> मीठमिरे : चवीनुसार
> स्टार्च : दोन चमचे : बटाट्याचे किंवा मक्याचे कोणतेही स्टार्च चालेल. स्टार्च थेट मिश्रणात घालता येते अथवा लाडूंना फासता येते.
कृती:
.
१. वरचे पदार्थ एका भांड्यात कालवून त्यांचे लाडू वळून घ्या.
२. लाडू किंचित दाबून त्यांच्या गोल वड्या / पॅटी करून घ्या.
.
शेकून -
३. चिकन लाडू तेलाचा हात लावून लाडू २० मिनिटे २०० सेल्सियसला शेकून घ्या.
४. मटण/पोर्क/गो लाडूला तेलाचे प्रमाण दुप्पट ठेवून मंद उष्णतेवर ४५ मिनिटे तरी शेकावे लागेल. हा अंदाज आहे. करून पाहिले नाही.
.
तळून -
३. दोन चमचे तेलात तव्यात परतवून घ्या. चिकन शिजले पाहिजे.
४. मटण असेल तर जास्त वेळ लागेल. (मटणातली चरबी वितळेपर्यंत ) वडीला तेल सुटेपर्यंत परतवायला लागेल. तव्यावर झाकण ठेवून वाफा देखील काढाव्या लागतील.
.
वरकड वेळ असेल तर
५. वड्या न करता लाडवांना लहान लाडूच ठेवून ते शेकून शिजवून घ्यावेत.
६. जिऱ्याची फोडणी करावी. आवडत असतील तर बारीक कापलेला कांदा परतून घ्यावा. त्यात कापलेली दोन टमाटी, थोडा गरम मसाला (किंवा मॅगीचा मसाला, गोडा मसाला, किचन किंग मसाला असा आवडेल तो कोणताही मसाला), थोडे लाल तिखट, अगदी किंचित केचप घालून शिजवावीत. प्रकार थोडा दाटसर होईल असे पाहावे. लाडू या शिजवणात फेकावेत आणि एक वाफ काढून घ्यावी. चवीपुरते मीठ विसरू नये. नंतर कोथमीर किंवा बेझिल किंवा दोन्ही बारीक कापून भुरभुरावेत.
.
७. थोड्या मोठ्या गोलाकार पॅटी करून बर्गर मध्ये चीजचा काप टाकून, लेट्यूसादि सॅलट, मेयो किंवा आवडते सॉस घालून खा.
प्रतिक्रिया
23 Aug 2023 - 7:52 am | तुषार काळभोर
बरीच फ्लेक्झिब्ल करून सांगितली आहे.
ओपन एंडेड.
बरेच प्रयोग, RnD करायला वाव आहे.
23 Aug 2023 - 8:36 am | चौकस२१२
चांगले वर्णन आहे . बर्गर ची ची सारणाची वडी हि तर.. छान, देशी आणि विदेशी
पण जर पारमेजान चीज आणि पार्सली ह्या प्रकारचे करायचे तर त्यात "तिखट मसाला/ हिरव्या मिरच्या ठेचून:" हे मारक ठरेल
माफक लसूण / पाप्रिकाआणि काळीमिरी पुरेल... पार्मेजन तर महाग असते , मग त्याची मूळ चव अशी झाकोळून गेली तर काय फायदा
असो
एकतर देशी तरी करावे किंवा पारमेजान चीज आणि पार्सली / पाप्रिका तरी अशी सूचना
23 Aug 2023 - 11:37 am | हणमंतअण्णा शंकर...
शक्यतो जिथे अनेक चांगले चीजचे प्रकार मिळतात तिथे पाप्रिका सुद्धा उपलब्ध असतेच असतेच.
शिवाय कोणतेही प्रयोग करायला कचरू नये. मी हिरव्या मिरच्यांचा ठेचा, ऑलिव्ह ऑईल, बाकीची सुगंधी पाने आणि चीज यांचा पेस्तो करून खातो. छान लागतो.
23 Aug 2023 - 1:01 pm | चौकस२१२
ठीक आहे अण्णा . फ्युजन जरूर करावे... पण काही पदार्थ जे दुर्मिळ असतात किंवा महाग असतात त्यांच्या बरोबर भेसळ करणे कधी कधी निरर्थक ठरते एवढेच माझे म्हणणे . आपण काळजीपूर्वक दोन प्रकार सांगितलेत आणि क्षणभर मला वाटले कि कोणी हे वाचून मिसळ करेल कि काय आणि दोन्ही "मसाल्यांचा " मूळ मांसावर अगदी वेगळं वेगळा परिणाम / फरक पडतो पडतो .. असो
जसे अतिशय महाग लॉबस्टर किंवा ऑक्टापस च्या वेटोळ्या किंवा जर प्रचंड तिखट आणि जळजळीत मसाले घालू केलं तर त्यातील लॉबस्टर हरवतो ..( हे निसरग नामक हाटिलात पहिले आहे )
पार्मेजन चीज भारतात माहित नाही किती महाग आहे पण येथे अगदी स्वस्त घेतले तर १००० रु किलो किंमत
अर्थात हे भारतीय पाककृतील हि लागू होते .. येथे थंडीत कोथिंबीर लै महाग कमीत कमी १५० रु छोटी जुडी अश्यावेळी तिचे फ्युजन करणे टाळून त्यातील कोथिंबीरिचा स्वाद जास्तीत जास्त कसा घेता येईल हे बघावे लागते ,,
असो आपलया खिमा पॅटिस /मीट बॉल पाककृतीचा अपमान करण्याचा हेतू नव्हता
23 Aug 2023 - 8:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फोटो नसल्यामुळे पास.
-दिलीप बिरुटे
23 Aug 2023 - 9:43 am | आंद्रे वडापाव
हे पदार्थ उपवासाला चालतील का ?
23 Aug 2023 - 10:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हीच पाककृती अंडी सॉरी, बटाटे घालून केले तर,
उपवासाला चालतील असे वाटते.
-दिलीप बिरुटे
23 Aug 2023 - 10:33 am | प्रचेतस
शाकाहारी लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्द्ल तुमचा जाहिर निषेध.
23 Aug 2023 - 10:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नोंद घेतलीय. शाकाहारी लोकांच्या आहाराचं मला
कायम कौतुक आहे, सालं कसं जमतं नुसतं
नारळपाण्यावर राहणं. बाय द वे,
माझ्या प्रतिसादाने हर्ट झाला असाल
तर दिलगिरी आहेच ;)
-दिलीप बिरुटे
23 Aug 2023 - 10:57 am | प्रचेतस
मी कशाला हर्ट होऊ भो :). गो वड्या खाऊन या आता ;)
23 Aug 2023 - 11:38 am | हणमंतअण्णा शंकर...
उपवासाला पदार्थ चालतात हाच एक जबरदस्त विरोधाभास आहे तर ह्याच पदार्थांनी काय घोडं मारलंय?
25 Aug 2023 - 7:43 pm | Nitin Palkar
न चालायला काय झालं? सबुदाण्याच्या खिचडीच्या जोडीला बटाट्याची फक्त जिरे फोडणी दिलेली भाजी करतो त्या ऐवजी नक्की चालू शकतील.
25 Aug 2023 - 7:46 pm | अहिरावण
जि-याची फोड्णी तेलात द्यायची की तुपात?
23 Aug 2023 - 10:19 am | Bhakti
असे सोया चंक्स लाडू फ्लेवरड विथ बटाटा :)
त्या लाडूचा मग पराठा केला ;)
तुमच्या टीप्स वापरते.
23 Aug 2023 - 11:39 am | हणमंतअण्णा शंकर...
यांचा लाडू असाच मीही करून पाहिला. चंक्स बारीक असतील तर जमून जातो प्रकार.
23 Aug 2023 - 10:26 am | गवि
छान. बनवून ताबडतोब गरमागरम खाण्याचा पदार्थ दिसतोय. भूक लाडू तहान लाडू म्हणून उपयोग नसावा.
23 Aug 2023 - 11:41 am | हणमंतअण्णा शंकर...
हा तसा खूप ठिकाणी किंचीत वेगळ्या पद्धतीने केला जाणारा पदार्थ आहे. गरम गरमच खाल्ला जातो शक्यतो. बर्गरमध्ये पॅटी करूनदेखील मस्त पण गरमच खाल्ला जातो.
23 Aug 2023 - 1:05 pm | विजुभाऊ
किती काळ टिकतात हे लाडू?
23 Aug 2023 - 3:25 pm | अहिरावण
ते किती आणि कसे खाता यावर अवलंबुन असावे
25 Aug 2023 - 11:52 pm | चामुंडराय
.
26 Aug 2023 - 2:41 am | उन्मेष दिक्षीत
गोडच आणि शाकाहारी असतात ! अतीशय टेस्ट्लेस नाव आणि धागा !