आधीचे भाग
काल संध्याकाळीच हॉटेलवर सोडताना उडता पंजाब ने सकाळी ७.३० ला तयार राहायचे फर्मान सोडले होते. कारण ८ वाजता एलिफंटा बीचवर जाण्यासाठी बोट सुटणार होती.तिकिटे तिथेच काढायची असल्याने वेळेत जाणे सोयीचे होते. त्याप्रमाणे आम्ही ७ वाजताच तयार होऊन बसलो. थोडाफार नाश्ताही करून घेतला. इकडे स्टेपल्ड डाएट असल्याप्रमाणे सर्वत्र पुरी आणि वाटाणा उसळ हाच नाश्ता मिळत होता. कदाचित सगळा माल बाहेरून मागवावा लागत असेल किंवा दाक्षिणात्य लोक तसेही नाश्त्याला पुरी खातात म्हणून असेल. पण तेच तेच बघून कंटाळा येत होता. तरीही दोन घास खाल्ले. गाडीची वाट बघत बसलो पण ती काही येईना. मग फोनाफोनी सुरु झाली. पहिले ड्रायव्हर आणि मग ट्रॅव्हल एजंट यांचे डोके खाल्ले आणि शेवटी एकदाची गाडी आली. दहा मिनिटात फेरीबोटच्या धक्क्याशी पोचलो.
तिथे बरेच तिकीट काउंटर होते आणि वॉटर स्पोर्ट साठी तिकिटे विकत होते. प्रत्येक एजंटचा काउंटर ठरलेला दिसत होता त्याप्रमाणे आमच्या एजंटने एका टेबलाकडे मला नेले. तिथल्या मुलीने सगळी माहिती दिली. योजना बरी वाटली. प्रत्येक खेळाचे ६०० रुपये अशी तुम्हाला पाहिजे तेव्हढी कुपन्स घ्यायची. मग बोट तुम्हाला एलिफंटा बीचवर नेणार. तिथे तुम्हाला पाहिजे ते खेळ खेळायचे.जितकी तिकिटे उरतील ती इथे आल्यावर परत करायची आणि ते पैसे परत घ्यायचे.
ही योजना फक्त पॅरासेलिंग या प्रकाराला लागू नव्हती कारण ते सगळ्यात महाग होते (प्रत्येकी ३५०० रुपये). शिवाय स्नॉर्केलिंग साठी अधिकचे १००० रुपये दिल्यास १५-२० मिनिटे जास्त फिरून प्रवाळ बघायला मिळतील असे सांगितले. अर्थातच आम्ही त्याला तयार होतो. तर अशा तर्हेने व्यवस्थित लुटून झाल्यावर आम्हाला एका बोटवाल्याच्या ताब्यात दिले गेले. १० जणांची फायबर बोट. सुझुकी किंवा यामाहाचे इंजिन पण एकाच गोष्ट चांगली म्हणजे सर्वांना लाईफ जॅकेट दिली होती. बोटवाल्यानेही हयगय न करता ते घातले होते. एकुणातच लोकांच्या सुरक्षेची काळजी (कायद्याच्या धाकाने असेल किंवा कसेही) घेतली जाते होती.
बोट सुरु झाली आणि किनाऱ्यापासून १००-१५० मीटर आतल्या बाजूने एलिफंटा बीचकडे प्रवास सुरु झाला. ऊन मी म्हणत होते, पण दूरवर कुठेतरी काळ्या ढगांचा पुंजकाही दिसत होता.
मधेच वाऱ्याची झुळूक येऊन जात होती. १०-१५ मिनिटात एलिफंटा बीचला पोचलो. इथेही कपडे बदलायला साध्याच पण खोल्या होत्या. माफक दरात लॉकर होते. स्टॉलवर खाण्यासाठी भेळपुरी, सामोसा, सरबत, चहा /कॉफी, फळे असे प्रकार होते. मंडळी उत्साहात तयार झाली पण तोवर लांबवर दिसलेला पाऊस आमच्या भेटीला तिथे येऊन पोचला आणि वातावरण कुंद झाले. टपटप पडणारे थेम्ब म्हणता म्हणता धारा बनले आणि सुरक्षेच्या कारणास्तव सगळे खेळ थांबले. मंडळी जरा हिरमुसली. वेळ घालवायला म्हणून थोडे खान पान झाले. सुदैवाने पाऊस ओसरला आणि खेळ पुन्हा सुरु झाले.
प्रथम स्नॉर्केलिंगचा आनंद घेतला. साधे पोहताना पाणी स्वच्छ होते त्यामुळे समुद्र तळ दिसत होताच, पण मास्क लावून जरा ५० मीटर आत गेल्यावर तळाचा नजारा जो खाडकन बदलला की माझा आपल्या नजरेवर विश्वासच बसेना. अचानक समुद्रतळ खोल झाला आणि मी जणू काही एखाद्या पर्वत शिखरावरून खाली बघतोय असे वाटू लागले. खालच्या खोल काळोखी दऱ्यांचा अंदाजच येईना. सर्वत्र फक्त प्रवाळ दिसत होते. आता आमच्या गाईडने आम्हाला रव्याच्या पुड्या हाती दिल्या आणि थोडा थोडा रवा बाहेर सोडायला सांगितले. त्याबरोबर रंगीबेरंगी माशांच्या झुंडीच्या झुंडी आमच्या बरोबर खेळू लागल्या आणि रवा खायला धडपडू लागल्या. मासे अक्षरश: हाताला लुचत होते आणि पुडी ओढायचा प्रयत्न करत होते. त्यांचे इतके नानाविध रंग होते की मी लहान मुलासारखा हरखून गेलो. काय काय बघू असे झाले. स्कुबा पेक्षा हा प्रकार मला आवडला. तांत्रिक बाजूनेही सोपा वाटला.
१० मिनिटात स्नॉर्केलिंग करून झाले आणि आम्ही इतर खेळ खेळायला मोकळे झालो.
सगळीकडे असतात तसेच खेळ इथेही होते त्यामुळे विशेष काही लिहिण्यासारखे नाही.
थोडा वेळ खेळून झाले आणि पुन्हा ढग दाटून आले. यावेळी मात्र पावसाचा नूर काही वेगळाच होता. सपासप धारा सुरु झाल्या आणि सगळे बोटवाले आणि वॉटर स्पोर्ट्स वाले आपापली दुकाने आवरू लागले. खेळाचे सामान किनाऱ्यावर आणून ठेवू लागले. बोटी एकमेकींना बांधून ठेवू लागले. खेळ थांबल्याने लाईफ जॅकेट अशी झाडाला टांगली गेली
थोडा वेळ लोकांनी खाण्यापिण्याच्या दुकानांवर गर्दी केली, परंतु लवकरच सगळ्यांना कळून चुकले की मेरीटाईम बोर्ड किंवा जी कोणती नियामक संस्था आहे तिच्या इशाऱ्याने सगळे खेळ थांबवले गेले होते. हळूहळू पर्यटक पांगू लागले. स्टाल वालेही दुकाने आवरू लागले. सकाळपासून इथवर उकाड्यात आलो असल्याने सुरुवातीला पाऊस छान वाटत होता. मात्र आता थंडीने अंग काकडून सगळे गार पडले. त्यातच आमचा बोटवाला कुठे दिसेना. हळूहळू इतर पर्यटक एक एक करून बोटीत बसून निघू लागले. गर्दी कमी होऊ लागली. तितक्यात आमचा बोटवाला दिसला. तो कुठल्या घाईत होता काय नाहीत पान आम्हा सगळ्यांना एकाच ठिकाणी बसायला सांगून तो कुठेतरी गायब झाला. अजून १०-१५ मिनिटे गेली. सुरुवातीला या सगळ्या गोष्टी चेष्टेवारी नेणारी मंडळी आता मात्र कातावली. त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी होती कि स्टाल वाल्यांच्या म्हणण्याप्रमाणे मागच्या जंगलझाडीतून मुख्य बेटावर चालत जाण्यासाठी रस्ता होता. अर्थातच ते लोक स्थानिक असल्याने त्यांच्या रोजच्या वापरातील असला तरी आम्हाला काही तो झेपला नसता. पान अगदीच बोट न आल्यास निदान एक पर्याय होता. मात्र आमचा अंत पाहून शेवटी बोटवाला आला. काय झाले होते माहित नाही, मात्र त्याने हिकमतीने लांबून कुठून तरी आमची बोट आणली होती. पटापट बोटीत बसलो आणि परतीचा प्रवास सुरु झाला. येताना छान वाटणाऱ्या लाटा आणि उडणारे तुषार आता मात्र तितके छान वाटत नव्हते. समुद्र खवळलेला होता. जरी आम्ही किनाऱ्यापासून १०-१५० मीटर आतमध्ये होतो तरी तिथे पाणी चांगलेच खोल होते. दहा माणसांची छोटी बोट थपडा खात खात पुढे जात होती. वरतून पडणाऱ्या थंडगार पाऊसधारा आणि समोरून चापचाप उबदार समुद्री पाण्याचा मारा अशा दुहेरी कात्रीत आम्ही सापडलो होतो. तोच लांबवर एक मोठे जहाज दिसले . बोटवाल्याला विचारले तर तो म्हणाला की हे रेस्क्यू जहाज आहे. अशी ४ जहाजे इथे आसपास तैनात आहेत, त्यामुळे तूम्ही घाबरू नका. थोडा धीर आला. यथावकाश तो २५-३० मिनिटाचा एरोलार कोस्टर प्रवास संपवून आम्ही किनाऱ्याला आलो आणि जीव भांड्यात पडला. एकुणात सकाळी गमती जमतीत सुरु झालेली सहल हवामान बदलल्याने एकदम साहसी झाली होती. आधीच्या सगळ्या "पेड" वॉटर स्पोर्ट पेक्षा हा येतानाचा खेळ सर्वात भारी ठरला.(क्रमश:)
प्रतिक्रिया
19 Jun 2023 - 4:35 pm | सौंदाळा
हे भारीच. पुभाप्र
19 Jun 2023 - 4:41 pm | कर्नलतपस्वी
ऑफिस मधे विचारणा केली रूपये त्रयाहत्तर हजार दोन माणंसा करता. सात दिवस ट्रिप, बघू कसे जमते ते
बाकी फिरून आल्यावर याच क्रमाने,हेच धागे नाव,तारीख, वेळ बदलून माझ्या आयडी वर डकवायचा विचार डोकावून गेलायं.
हा सुद्धा धागा नितांत सुंदर.
19 Jun 2023 - 4:44 pm | कर्नलतपस्वी
प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट
20 Jun 2023 - 8:50 am | प्रचेतस
खूपच भारी लिहिलंय, खरोखरच जबरदस्त अनुभव घेतलात तुम्ही.
पुभाप्र
24 Jun 2023 - 12:06 pm | गोरगावलेकर
आपल्या लेखातून उपयुक्त माहिती मिळत आहे. फोटो छानच.
5 Aug 2023 - 5:38 pm | Nitin Palkar
खरोखरच सुंदर माहिती.