भारताबाहेरचा भारत -अंदमान २

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in भटकंती
6 Jun 2023 - 1:26 pm

आधीचा भाग-- भारताबाहेरचा भारत -अंदमान १

आज सहलीचा दुसरा दिवस. रात्रभर मस्त झोप झाल्यामुळे ताजेतवाने वाटत होते.
b

आज पोर्ट ब्लेअरहून हॅवलॉक बेटावर बोटीने जायचे होते. त्यामुळे पटापट नाश्ता करायला खाली उतरलो. पण अजून सातच वाजले असल्याने नाश्ता तयार नव्हता. त्यामुळे किचनमधून आम्हाला सँडविच आणि फ्रुटीची पाकिटे पार्सल म्हणून दिली गेली. ती सॅकमध्ये टाकून सामान घेऊन खाली उतरलो. तोवर गाडी आम्हाला घ्यायला आलीच होती.

b

१०-१५ मिनिटात जेट्टीवर पोचलो. आमच्यासारखे बरेच पर्यटक पोर्ट ब्लेअर ते हॅवलॉक प्रवास करणार होते त्यामुळे तिथे थोडी रांग लागली होती. विमानतळावर असते तशीच सुरक्षा तपासणी सुद्धा होत होती. सी आय एस एफ चे जवान बारकाईने लक्ष ठेवून होते. कदाचित इथे एकूणच सैन्याचा प्रभाव जास्त असावा. त्यामुळे की काय माहित नाही, पण एकूणच लोक शांत प्रवृत्तीचे वाटले. पूर्ण सहलीत कुठेही फार कटकटी, भांडणे वगैरे ऐकू आली नाहीत. सुरक्षा तपासणी करणाऱ्या एका जवानाच्या शर्टावर देशमुख असे नाव दिसले त्यामुळे मी पुढे होऊन जरा आस्थेनी मराठीत चौकशी केली. तर ते औरंगाबादचे होते. मराठी ऐकून त्यांच्याही चेहऱ्यावर जरा स्मित झळकले. परमुलखात अचानक माहेरची माणसे भेटल्यावर कसे होईल तसेच काहीसे. पुढे होऊन बाकड्यावर विसावलो. बोट यायला वेळ होता. २-३ टी व्ही लावले होते त्यावर टिपिकल बॉलीवूडी गाणी लावली होती. मिका सिंग, बादशाह आणि कोण कोण रॅपर्स अंगविक्षेप करताना दिसत होते. गाडीत सुद्धा तसलीच बॉलीवूडी श्रीमंती प्रेम विव्हळ गीते किंवा तेनुं काला चष्मा सारखी ढिनच्यॅक गाणीच वाजताना दिसत होती. एकुणातच इथले लोक बॉलिवूडचे दिवाने असावेत. आसपास पोरांचे रडणे,खाणे,आयांचे धपाटे घालणे असा मस्त गदारोळ चालू होता. त्यातल्या त्यात छान म्हणजे हनिमूनला आलेले बरेच लव्हबर्ड्स दिसत असल्याने नेत्रसुख होते. तर अशा तर्हेने वाट बघता बघता अर्धा तास गेला आणि एकदाची बोट बंदराला लागली. आधीचे उतारू उतरले आणि आम्ही आत गेलो. आमच्या बोटीच्या बाजूलाच भारतीय नौसेनेची तुलनेने प्रचंड जहाजे उभी होती. एक तर जवळजवळ ४ मजली होते.

b

b

b

यथावकाश बोट निघाली आणि पोर्ट ब्लेअरहून बाहेर पडून खुल्या समुद्रात जाऊ लागली.
b

b

खानपान सेवा सुरु झाली आणि त्याबरोबरच फोटो काढायची स्पर्धाही.
b

b

b

b

बोटीला सगळीकडे खिडक्या असल्याने लोक कुठे कुठे बसून फोटोसाठी पोझ देत होते. बाहेरही सुंदर देखावे दिसत होते. गुगल मॅप बोटीचे ठिकाण दाखवत होता. इथे रेंज मिळणार नाही अशा बेतानेच अंदमानला आलो होतो, पण मित्तल गुरुजेनच्या कृपेने बहुतेक ठिकाणी ५ जी सेवा मिळत होती. तरीही एक सूचना- जवळ बऱ्यापैकी रोख रक्कम ठेवावी कारण बऱ्याच ठिकाणी रेंज असली तरी यु पी आय चालले नाही.

जवळपास दीड तासाच्या प्रवासानंतर बोट हॅवलॉक बंदरात पोचली आणि सामानसुमान घेऊन बाहेर पडायची लगबग सुरु झाली. बाहेर पडायचा अरुंद मार्ग ,प्रवाशांची दाटीआणि त्यातच त्यांना घेण्यासाठी आलेले ड्रायव्हर लोक्स याची नुसती वर्दळ उडाली. सुदैवाने आमच्या ड्रायव्हरला मी आधीच फोन करून ठेवला असल्याने जास्त अडचण आली नाही आणि आम्ही गाडीपाशी पोचलो. ह्या ड्रायव्हरची हेअर स्टाईल बघून आम्ही त्याला उडता पंजाब नाव देऊन टाकले. दहाच मिनिटातच गाडीने आम्हाला हॉटेलवर सोडले आणि दुपारी ३ वाजता तयार राहण्याची सूचना देऊन उडता पंजाब निघून गेला. हे हॉटेल पोर्ट ब्लेअरच्या हॉटेलपेक्षा मस्त होते.

b

b

प्रशस्त आणि स्वच्छ खोल्या, आजूबाजूला नारळ सुपारीचे झाडे यामुळे अचानक कोकणात आल्यासारखे वाटू लागले.

b

बाहेर ऊन सणसणीत तापले होते, त्यामुळे पहिले आत जाऊन ए सी लावला आणि गारेगार झालो. मग सावकाशीने अंघोळी वगैरे उरकल्या आणि खोलीवरच जेवण मागवले. टी व्ही ला मस्त अमेझॉन फायरस्टिक लावली होती, त्याच्यामुळे नेटफ्लिक्स,अमेझॉन प्राईम,झी स्टुडिओ सगळेकाही उपलब्ध होते. त्यामुळे दुपार आनंदात गेली. गारेगार खोलीत तंगड्या ताणून पडलेले असतानाच पुन्हा उडता पंजाब चा फोन आला आणि नाईलाजाने खाली उतरलो.
b

संध्याकाळचा कार्यक्रम म्हणजे राधानगरी बीचवर पोहणे हा होता. १०-१५ मिनिटात गाडीने आम्हाला तिथे नेऊन सोडले. जगातला ७ क्रमांकाचा स्वच्छ बीच अशी ह्याची ख्याती आहे आणि खरोखरच "टरकॉईज ब्लु " (मराठीत??) रंगाचे नितळ पाणी बघून आम्हाला वेड लागायची पाळी आली.

b

b

b

कपडे बदलायला आणि अंघोळीला खोल्या आणि कपडे ठेवायला लॉकर अशी छान सोय असल्याने धन्य झालो. आपल्याकडे कोकणात इतके सुंदर समुद्रकिनारे आहेत, तिथे माफक दरात नाही का अशा सोयी करता येणार? असा विचार मनात आलाच.

b

सुरुवातीला थोडेफार फोटो काढून झाल्यावर सरळ पाण्यात शिरलो आणि २ तास मस्त दंगा केला. आजूबाजूला काही मराठी/गुजराती लोक पोहत होते त्यामुळे तुम्ही कुठले आम्ही कुठले वगैरे झाले. मनसोक्त पोहून झाल्यावर भूक लागल्याने नाईलाजाने बाहेर यावे लागले आणि तोवर निघायची वेळही झाल्याचा साक्षात्कार झाला. त्यामुळे कपडे बदलून आणि थोडेफार खाऊन तेथून निघालो आणि हॉटेलवर येऊन पोचलो. उतरताना ड्रायव्हरलाच विचारले की जवळपास कुठली चांगली रेस्टोरंटस आहेत का? त्याने एक दोन नावे सांगितली.

b

रात्री जेवायला तिथेच गेलो आणि चांदण्यात , रातकिड्यांची आवाज ऐकत शतपावली करत हॉटेलवर परत आलो. दुपारी ब्रम्हास्त्र बघून डोके पिकले असल्याने यावेळी रिस्क न घेता दिल चाहता है लावला आणि बघता बघता झोपून गेलो. (क्रमश:)

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

6 Jun 2023 - 1:31 pm | कुमार१

वा !
झकास चालू आहे

कर्नलतपस्वी's picture

6 Jun 2023 - 2:41 pm | कर्नलतपस्वी

फोटो,स्पेशली नारळाच्या पाठीमागे दडलेल्या नारायणाचा फोटो फारच आवडला. त्याच ठिकाणाहून आणखीन आगोदर आणी नंतर
फोटो घेतला असला तर शेअर करा.

धर्मराजमुटके's picture

6 Jun 2023 - 4:01 pm | धर्मराजमुटके

छान चालली आहे सहल. 'उडता पंजाब' उल्लेख ऐकून ती केशरचना बघायची फारच उत्सुकता लागली आहे. एखादे छायाचित्र असेल तर इथे डकवा.

राजेंद्र मेहेंदळे's picture

6 Jun 2023 - 4:15 pm | राजेंद्र मेहेंदळे

c

सुबोध खरे's picture

6 Jun 2023 - 7:40 pm | सुबोध खरे

दुर्दैवाने अंदमानचे तिकीट मुंबई पासून साधारण माणशी २५ हजार एकेरी इतके येते. म्हणजेच जोडप्याचा नुसता १ लाख रुपये खर्च विमानाच्या तिकिटावर येतो.

यामुळे यावर्षी परत एकदा अंदमानला जायचा बेत मी रद्द केला. या मार्गावर सरकारने तिकिटाच्या किमतीवर बंधन टाकले पाहिजे असे वाटते.

अर्थात असेही वाटते कि एवढे तिकीट असल्यामुळेच अंदमानमध्ये इतर ठिकाणी आहे तशी पर्यटकांची तोबा गर्दी नाही. आणि ती ठिकाणे अजूनही अत्यंत सुंदर अशा निसर्गसौंदर्याने नटलेली आहेत.

मौरिशसच्या निम्म्या आणि मालदीव च्या एक चतुर्थांश खर्चात तुम्हाला तेवढीच मजा करता येते हे हि खरे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

7 Jun 2023 - 12:41 pm | राजेंद्र मेहेंदळे

मुंबईहुन मॉरिशसला ईतकेच काय न्युयॉर्क लाही थेट विमान आहे, पण अंदमान्,श्रीलंका ईथे मात्र व्हाया चेन्नई किवा कलकत्ता जावे लागते आणि मग खर्च वाढतो. कदाचित या थेट मार्गावर जास्त प्रवासी नसतील त्यामुळे परवडत नसावे.

अजुन एक गणित म्हणजे जितका मोठा ग्रुप असेल तितके माणशी पैसे कमी होतात(चीपर बाय द डझन) त्यामुळे मोठ्या ग्रुपने गेल्यास फायदा होईल. मात्र ट्रॅव्हल कंपन्या (केसरी/वीणा) लुटतात. त्यातल्या त्यात अंदमान साठी कॅप्टन निलेश गायकवाड कमी पैसे घेतात असे वाटते.

https://www.youtube.com/watch?v=2whNm-__6ig

येथे थेट विमाने सुद्धा फुकटची महागडी आहेत.

नोव्हेंबर महिन्यात चेन्नई ते पोर्ट ब्लेअर कमीत कमी तिकीट ८५०० आहे (अंतर १३६८ किमी) तर कोलकाता ते पोर्ट ब्लेअर १४५०० आहे( अंतर १४०५ किमी) .

चेन्नई दिल्ली तिकीट सहा हजार आहे. (अंतर १७६१ किमी).

मुंबई दिल्ली तिकीट ४५०० (अंतर ११५० किमी)

हा विमान कंपन्यांचा हलकटपणा दिसतो

राजेंद्र मेहेंदळे's picture

8 Jun 2023 - 11:42 am | राजेंद्र मेहेंदळे

हे सगळे प्रवासी संख्येवर अवलंबुन आहे, अंतरावर नाही. मुंबई-दिल्ली, पुणे- दिल्ली या मार्गावर नेहमीच मागणी जास्त असते, त्यामुळे एकच विमान दिवसात ३ -४ वेळा जा-ये करते आणि म्हणुन कंपन्याना कमी तिकिट परवडते. पण अंदमान्,लक्शद्विप, श्रीलंका, मालदिव्हज ईथे फक्त टुरिस्ट जात असल्याने प्रवासी कमी आणि तिकिट जास्त असावे.

हे सगळे प्रवासी संख्येवर अवलंबुन आहे,
एकदम तसे वाटत नाही. प्रवासी कमी असल्याने, कमी विमाने त्यामुळे कमी स्पर्धा आणि नेहमीचा खर्च होत असल्याने विमानाचा दर भरपुर आहे.
पावसाळ्यात पर्यटक अंदमान-निकोबारला जात असतील असे वाटत नाही.

सुबोध खरे's picture

9 Jun 2023 - 10:11 am | सुबोध खरे

नाही

अंदमानला जाणारे प्रवासी भरपूर आहेत. केवळ पर्यटक नव्हे.

त्यात बरेचसे सरकारी नोकर आहेत आणि त्यांना चेन्नई किंवा कोलकाता येथून जाण्यायेण्यासाठी प्रवासी भत्ता मिळतो याचा फायदा विमान कंपन्या घेतात असे वाटते. कारण अंदमानला जाणारी विमाने कायमच भरलेली असतात.

यामुळेच बर्याच लष्करी अधिकाऱ्यांना आयत्या वेळेस तेथे जायचा प्रसंग आला तर ( ताम्बरम) चेन्नई येथून हवाई दलाच्या वाहतूक करणाऱ्या विमानातून बाकड्यावर बसून प्रवास करावा लागतो. असा प्रवास मी एकदा केलेला आहे. (तो मुळीच आरामदायक नाही)

चौकस२१२'s picture

10 Jun 2023 - 8:26 am | चौकस२१२

प्रवासी भत्ता मिळतो याचा फायदा विमान कंपन्या घेतात असे वाटते.
हा एक मुद्दा नकीच असेल , असे इतरत्र हि होताना पहिले आहे

क्वांटास या ऑस्ट्रेलियातील विमानसेवककडे देशात जवळ जवळ एकाधिकारशाही आहे ( अजून एक दोन विमान सेवा आहेत पण त्या कधी जगतात कधी नामशेष होतात) येथील अंतरे आणि कमी लोकसंख्या यामुळे काही मार्गांवर जे भाडे आकारले जाते ते प्रचंड असते, त्या पैशात त्यापेक्षा लांबवर म्हणजे आशियात जाता येते

अर्थात विमान प्रवासाचे भाडे हे एक शास्त्र असावे कारण त्यात इतके अनाकलनीय प्रकार बघायला मिळतात
- काही सेवा ह्या काही श्रीमंत सरकारने चालवलेलया असतात आणि भरपूर पैशाचे पाठबळ असल्यामुळे टाय स्वस्तात शिरकाव करून घेतात जेणेकरून केवळ मुक्त बाजारपेठेतील
- काही जागी दुर्गम ठिकाणी पूर्ण विमान हे "फ्लाय इन फ्लाय आऊट" वाले खाण कामगारांनी भरलेले असते त्यांना "किती भाडे" हा प्रश्न नसतो.. फटका बसतो तो एका दुसऱ्या सर्वसामान्य प्रवाश्याला )
- असे बरेचदा ऐकले आहे कि मुंबई दिल्ली एवढया पैशात मुबई दुबई/ बँकॉक जाता येते ? खरे का ?
- एक अनुभव असा कि ऑस्ट्रेल्यात ते मुबई ( युएई मार्गे ) जे भाडे होते त्यात फक्त २०% जास्त घालून थेट लंडन पर्यंत जाता येत होते .. आता बघा हे गणित कसे जमते? २०% अधिक देऊन जवळ जवळ ७५% जास्त अंतरावर कसे काय जात येते ?

चौकस२१२'s picture

10 Jun 2023 - 8:45 am | चौकस२१२

हलकटपणा ?!
नाही म्हणणार अगदी धंद्याचे गणित आहे ते शेवटी ,
जाहिरातीतील "चापलुसी " मात्र विमान कंपन्या नक्कीच करतात , विशेष करून उभे / आडवे लांब पसरलेलय देशात
जाहिरात असते "चला बाली ला केवळ ३०० $ आपण बघायला जातो तर
ते भाडे एकतर
- फार कमी दिवशी उपलब्ध असते
- प्रत्येक उड्डाणात फार कमी जागा या दारात असतात
- निघायचे ठिकाण ज्वलंत जवळचे असते - पर्थ बाली केवळ ३ तास ४५ मिनिटे पण हि जाहिरात करतात सिडनी ला ! जिथून बाली आहे ६ तास १५ मिनिटे एवढे !
- म्हणजे चाल कोलंबो ला फक्त क्सक्सक्स रुपयात असे म्हणायचे आणि ते असणार फक्त कोची ते कोलबाबा आणि जाहिरात करणार दिल्ली भागात किंवा अमृतसर ला!

याउलट कधी गंमतशीर फायदा हि होतो
"जनता क्लास" मध्ये पूर्वी रिकाम्या शीटा असतील तर जो तो झोपायःची सोय होतीय का बघायला धडपडत असतो .. एकदा प्रवासाचं आधी विमान कंपनी चे ई-मेल आले कि "३ च्या रांगेत तुम्ही एकटेच आहेत तर तुम्हाला उरलेली दोन "शिट " अगदी स्वस्त दारात विकत घायचंय आहेत का ?"
मी घेतल्या निदान ७ तासाच्या रात्रीच्या प्रवासात जरा तरी आडव पडायला मिळटाय तर हि किंमत फार नवहती
...! अर्थात जवळच्या प्रवासाचं डोळ्यातील असूया दिसली .. शेवटी एकाला ३ बोर्डिंग स दाखवले .. तो हि बहुतेक मनात म्हणाला असेल कि "काय चक्रंम आहे हा माणूस" ३ इकॉनॉमी तिकिटे काढण्या पेक्षा हा माणूस सरळ बिझिनेस क्लास चे तिकीट का नाही काढत आहे ! अर्हताःत त्याला मी अंदरकी बात सांगत बसलो नाही ..

सुबोध खरे's picture

10 Jun 2023 - 9:57 am | सुबोध खरे

३ च्या रांगेत तुम्ही एकटेच आहेत

ऍमस्टरडॅम वरून परत येताना इतिहादच्या विमानात मागच्या एका बाकावर कोणीच आलेलं नव्हतं ते मी पाहून ठेवलं होतं आणि विमानात जेवण आल्यावर घाईघाईने जेवून घेतलं आणि साधारण रात्री ११ ला त्या बाकावर जाऊन आडवं झालो. आणि आमच्या दोन सीटवर बायको आडवी झाली.

अगदी बिझनेस क्लास नाही तरी पाठ सरळ करून तीन चार तास झोपून ऍमस्टरडॅम ते अबू धाबी आलो. मग पुढचे चार तास अबू धाबी ते मुंबई येताना बरेचसे ताजे तवाने होतो. अन्यथा या सगळ्या फ्लाईट्स फारच आडनिड्या वेळेस निघतात किंवा पोचतात.

प्रचेतस's picture

7 Jun 2023 - 8:47 am | प्रचेतस

अत्यंत सुंदर. काय शुभ्र समुद्रकिनारा आहे. तुमचे हॉटेलही अगदी निसर्गरम्य जागी आहे. सुरेख वर्णन.

टर्मीनेटर's picture

7 Jun 2023 - 12:43 pm | टर्मीनेटर

हा भागही आवडला 👍
पोर्ट ब्लेअरहून हॅवलॉक बेटावर बोटीने जाताना किंवा येताना तुम्हा चौघांपैकी कोणाला मळमळण्याचा त्रास झाला का? मला दोन्ही वेळेस भयंकर त्रास झाला होता, उलट्या करुन करुन जीव अर्धमेला झाला होता 😀

राजेंद्र मेहेंदळे's picture

7 Jun 2023 - 12:49 pm | राजेंद्र मेहेंदळे

बोट फारशी हलत नव्हती, आणि तसेही मला कधीच बोट किवा बस लागत नाही, उलट बोट आणि एस टी प्रवास मला फार आवडतो(ट्रेकिंग मुळे).

एस टी चे सगळ्यात मागचे ते लांब बाकडे त्याच्या पुढची दोन बाके आणि मग दरवाजा ही ट्रेकर लोकांची हक्काची जागा. सगळ्या सॅक, रोप, चित्र विचित्र सामान आणि त्याहुन चित्र विचित्र दहा बारा ट्रेकर तिथे आरामात मावतात.

गोरगावलेकर's picture

10 Jun 2023 - 10:43 am | गोरगावलेकर

हॉटलमधून दिसणारा नजारा मस्तच! नितळ पाणी असलेला स्वच्छ बीच
तर खूपच आवडला.

तुषार काळभोर's picture

10 Jun 2023 - 11:43 am | तुषार काळभोर

स्वच्छ, नितळ, सुंदर!!

Nitin Palkar's picture

5 Aug 2023 - 5:31 pm | Nitin Palkar

हा ही भाग सुंदर.