माझा होर्डिंग ओसीडी

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in काथ्याकूट
24 May 2023 - 11:29 am
गाभा: 

पुस्तके आवरायल घेतल की नैराश्य येत. काय ठेवायच काय नाही हे ठरवताच येत नाही . ज्योतिषातील अनेक दुर्मिळ पुस्तके, अंधश्रद्धा, तत्वज्ञान, मानसशास्त्र समाजशास्स्त्र ,अध्यात्म, विज्ञान, अशा विषयांवरील विविध पुस्तके त्या त्यावेळी घेतली होती. कधी वाटत आता बास झाल घालून टाकाव रद्दीत पण धाडस होत नाही. किती भूतकाळ उराशी बाळगायचा? पत्रव्यवहार कात्रणॆ हस्तलिखिते लेख यांच्या फाईली किती कवटाळायच्या. दर वेळी आवरायला घेतो व धाडस होत नाही. याला कचरा म्हणवत नाही. तरी महत्वाचा भाग ई ग्रंथालायांवर अपलोड करुन ठेवला आहे आपण गचकलो तरी तो जालसागरात उपलब्ध असेलच. एकदा प.वि वर्तकांचा मंगळा संदर्भात जुना लेख मिळवला होता. अनेक वर्षे पडला होता फाईलीत. एकदा कुणीतरी चर्चेत त्याचा संदर्भ मागितला लगेच मी तो या गदारोळातून शोधून काढून जालावर अपलोड केला. कसल कृत कृत्य वाटल. अगदी नारायणाने ऐनवेळी पंचांग काढून द्यावे तसे. असे अनेकदा झाले. मग असा खजाना रद्दीत टाकावा का? असा विचार करुन परत जागेवर ठेवतो सगळे. तरी निग्रहाने एक दोनदा कचरा काढला होता. पण तो परत साचत राह्तो. प्रत्येक लिहिलेल्या महत्वाच्या खाजगी पत्राची सुद्धा माझ्याकडे कार्बन कॉपी असायची. कितीही फिकी झाली तरी ती ठेवली होती कधी कधी वाचली की जरा बरंही वाटायचे. त्यावेळी आपण कसे होतो नै! हा विचार येउन जायचा. कधी कधी मन कुशंकेने ग्रासले की तो पत्रव्यवहार पाहून हुश्श्य वाटायचं. अनेक पाठवलेल्या पत्रांची उत्तरे वा पोच सुद्धा यायची नाही. आपले पत्र पोहोचले की नाही याची खात्री करण्य़ाची सोय नसायची. पोस्टाने पाठवले म्हणजे पोहोचले या अंधश्रद्धेवर माझा विश्वास होता.काही पत्रोत्तरे मात्र हुरुप वाढवायची.
कधी कधी विरक्तीचा झटका आला की मी माझ्याकडची कागदपत्रे नष्ट करतो. किती काळ ओझ बाळगायचं? पत्रव्यवहार,टिप्पणे, नोटबुके जे जरुरी नाहीत , जुने आहेत पण आता कामाचे नाहीत, अशा कागदपत्रांना नष्ट करा. असे अधूनमधून वाचत असतो. पटत ही असतं.
हे जरुरी प्रकरण फार सापेक्ष आहे. कित्येक वर्षांचा जुना पत्रव्यवहार मी ठेवत आलेलो आहे. एखाद्याला पत्र पाठवले तर त्याची कार्बन प्रत माझ्याकडे ठेवतो.कधीतरी संदर्भ म्हणून उपयोगाला येतो. कधी कधी आयुष्यात आपणच आरोपी, आपणच फिर्यादी व आपणच न्यायाधीश असतो अशावेळी पुरावा म्हणुन ही कागदपत्रे उपयोगी पडतात. सामाजिक लेखनात तर कधी कधी आपल्याला निरोपयोगी असणारा कचरा इतरांसाठी संदर्भमूल्य असतो.अशी कागदपत्रे चिवडताना मी कधी कधी कालकुपीत जातो.अडकूनही बसतो.परत काळच बाहेर काढतो. वैराग्याचा झटका आला की 25-30 वर्षांपुर्वीची कागदपत्रे नष्ट करतो.त्या त्या काळाची ती अपत्ये असतात. आपण जीवापाड जपलेल्या गोष्टी इतरांसाठी कचरामूल्याच्या असतात हे माहित असूनही आपण त्या आपल्या अस्तित्वासाठी जपत राहतो.आताच्या डिजिटल युगात मी काही कागदपत्रांचे/ पुस्तकांचे डिजिटायझेशन केले आहे. पण मूळ फेकवत नाहीत. आता आवरायला हवं. तुम्ही मेलात की तुमच्यासाठी जग बुडाल.मग ते ओझे इतरांसाठी. संदर्भमूल्यावरुन आठवल की उपक्रमावर मी ज्योतिषाच्या माझ्या पुस्तकाची लेखमाला लिहित होतो. त्यात एक संदर्भ साप्ताहिक सकाळ 1989 चा होता. मी तो लिहून ठेवला होता. पुस्तक लिहिताना तो लिहिला होता. उपक्रमाचे वाचक चिकित्सक. किस पाडणारे. कुणी मागितलाच तर तयार ठेवा म्ह्णुन कागदपत्रे शोधू लागलो. मूळ तो लेख मला सापडलाच नाही. . त्यावेळी मी तो अंक उगीच सारखे पैसे का खर्च करा म्ह्णुन घेतला नव्हता असे लक्षात आले.मग अस्वस्थ झालो. लगेच सकाळ कार्यालय गाठले. तिथे तो त्यांच्या ग्रंथालयात मिळाला. त्यांच्या नियमानुसार प्रतिवर्षी असलेल्या संदर्भ फी नुसार काहीतरी 110 रुपये भरले व त्या लेखाची झेरॉक्स मिळवली. त्यावेळी वाचवलेले चार रुपये वसूल झाले.पण शांत झोप लागली. पुढे तो कोणी पुरावा म्हणून मागितलाच नाही ही गोष्ट वेगळी. आत्ता संगणक चाळताना मी वि.म.दांडेकरांच्या पत्नी कुमुदिनी दांडेकर यांच्याशी ईमेलद्वारा केलेला पत्रव्यवहाराचा स्क्रिन शॉट ठेवला होता. तो आपद्प्रसंगी मला जाब विचारणार्‍याला देता आला असता या विचारानेही जरा सुरक्षित वाटलं. नको सगळ नष्ट करायला. येत कधी कधी उपयोगाला. असा विचारही मनात येउन गेला. असो! आता मात्र आवरलच पाहिजे.नाहीतर अडकून बसायचो कलकुपीत.

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

24 May 2023 - 2:12 pm | राजेंद्र मेहेंदळे

मस्त लेख!!

मिपावर आधीही अशी काहीतरी चर्चा/लेख आली आहे असे आठवते. संदर्भ तपासायला पाहीजे :)

सहसा घरातल्या एका माणसाचा छंद ही दुसर्‍या माणसासाठी अडगळ असते. पण एकत्र राहायचे असल्याने वाद नको म्हणुन सहन केले जाते. आमच्या घरीही मी बरीच "अडगळ" जमवली आहे. सध्या तरी टाकुन द्यायचा विचार नाही. त्यापेक्षा शिव्या खात राहीन म्हणतो.

कर्नलतपस्वी's picture

24 May 2023 - 2:52 pm | कर्नलतपस्वी

असेच झटके मला पण येतात. घरच्यांना माझ्या कचऱ्याचे ना कौतुक ना अडगळ. नोकरीच्या पहिल्या पगारा पासूनचे टिपण.

हा सगळा कचरा काढून मधून मधून वाचण्याचा अनुभव वेगळाच असतो.

असाच एकदा झटका आला आणी बराचसा कचरा वाटी लावला आता त्याचे दु:ख होते.

पहिली चार चाकी,जमा खर्च व इंधन,मायलेज,मित्रांना दिलेली ओली पार्टी इ. सर्व काही अजुनही कधी कधी काढून वाचतो.

पाचव्या वेतन आयोगा नंतर हिशोब वगैरे लिहीणे बंद केले कारण आता महिन्या काठी काही रक्कम शिलकीत पडू लागली होती.

मासिके,बाबरी मस्जिद ,ब्ल्यू स्टार,इंदिरा, राजीव गांधी ,मंडल आयोग एक ना अनेक महत्त्वपूर्ण घडामोडींवर साठवली पण सेवानिवृत्तीनंतर सगळी कबाडातच गेली. आता असती तर किती उपयोगी पडली असतो.

पुस्तके मात्र सर्व ठेवतो. कोबोल,वर्डस्टार, बेसिक , पिवळी डमी सिरीज, ट्वेण्टी वन डे सिरीज सारखी पुस्तके मात्र एका प्रोफेसर मित्राला दिली आता तो पहिल्या वर्षांच्या इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना दाखवतो.

असो,आपल्या लेखाने आम्हाला पण भावूक केले. लेखा वर प्रतिसाद सव्वालाख (लेख) होईल म्हणून आवरते घेतो.

प्रकाश घाटपांडे's picture

24 May 2023 - 7:04 pm | प्रकाश घाटपांडे

असो,आपल्या लेखाने आम्हाला पण भावूक केले. लेखा वर प्रतिसाद सव्वालाख (लेख) होईल म्हणून आवरते घेतो.

तुमचे अनुभव येउ द्यात की सविस्तर

कानडाऊ योगेशु's picture

24 May 2023 - 4:00 pm | कानडाऊ योगेशु

निदा फाजलींचा सुरेख शेर लागु होईल ह्या त्रांगड्यासाठी..
दुनिया जिसे कहते है बच्चे का खिलौना है
मिल जाये तो मिट्टी खो जाये तो सोना है..

अश्या वस्तु/पुस्तके वगैरे जोपर्यंत जवळ असतात तो पर्यंत अडगळ/रद्दी वाटु शकते आणि त्या नाहीश्या झाल्यावर ती गोष्ट काय मोलाची होती असे वाटत राहते.

प्रकाश घाटपांडे's picture

24 May 2023 - 4:48 pm | प्रकाश घाटपांडे

कुठली वस्तू वा पुस्तक कधी उपयोगाला येईल हे सांगता येत नाही अशा भीती पोटी ते टाकवत नाही. आता तीस बत्तीस वर्षांपुर्वी प्रसिद्ध झालेल्या लेखाच्या हस्तलिखित कार्वन कॉपी ठेवण्याची काही गरज आहे का?

फोटो काढुन गूगल ड्राईव्ह वर टाकुन द्या आणि मोकळे व्हा

चौथा कोनाडा's picture

24 May 2023 - 5:34 pm | चौथा कोनाडा

फोटो काढुन गूगल ड्राईव्ह वर टाकुन द्या

गुगल ड्राइव्ह बंद झालं / किंवा पेड झालं तर ?

राजेंद्र मेहेंदळे's picture

24 May 2023 - 7:16 pm | राजेंद्र मेहेंदळे

बिंदू योग्य आहे, पण मग ही न संपणारी साखळी होईल :)

लॅपटॉपचा बॅक अप, हार्ड डिस्कवर, त्याचा बॅक अप गूगल वर, त्याचा अजुन एक बॅक अप ड्रॉप बॉक्स वर अँड सो ऑन...

प्रकाश घाटपांडे's picture

24 May 2023 - 9:12 pm | प्रकाश घाटपांडे

म्हणूनच त्याला होर्डिंग ओसीडी म्हटले आहे. संग्रहलोलुपता

चौथा कोनाडा's picture

26 May 2023 - 11:42 am | चौथा कोनाडा

रामें,
आपल्या हयातीत उतार वयात काही वर्षे "समृद्ध अडगळ"
आणि आपल्या नंतर इतरांसाठी कचरा.

नाशिकच्या कला महाविद्यालयाला भेट दिली होती तेव्हाचा किस्सा: थोर चित्रकारांची पेन्सिल / चारकोल स्कचेस तिथल्या तरुण स्टाफ ने कचरा म्हणून फेकून दिली होती. प्राचार्य चित्रकार प्रफुल्ल सावंत यांनी ती मोठ्या कष्टाने कचऱ्यातून परत आणली.. (आम्हाला मोठ्या अभिमानाने अप्रुपतेने दाखवली, अप्रतिम होती) स्टाफ ने जागा नाही, ठेवायची कुठे म्हणून टाकून दिली होती.

लेख आवडला. 'संग्रहलोलुपता' हा शब्दही.

एकाचा संग्रह ती दुसऱ्याची अडगळ हे आहेच :-) स्वतःला जमेल, पटेल ते करावे हे उत्तम.

संग्रह करणे ! हा गुण कि अवगुण ? इतपत प्रश्न पडावा ! आमच्या तिर्थरुपांना अशीच हौस [ की खोड ? ] आहे, त्यांनाही मला अधुन मधुन आता जुना पसारा तरी आवरा असा डोस द्यावा लागतो. त्यांचाच कुलदिपक असल्याने हीच हौस [ की खोड ? ] मला देखील आहे आणि प्रकाका तुम्ही जसे म्हणता तसे विरक्ती आली की शिफ्ट डिलीट मारुन कार्यभाग आटपता घेतो... कधी काही आठवण्यासाठी, कधी संदर्भ देण्याची हौस भागवण्यासाठी तर कधी उगाच युट्युबवरुन एखादा व्हिडियो उडवला गेला असला तरी तो माझ्याकडे आहे अशी आत्मसंतुष्टीला बळ देण्यासाठी हे संग्रहाचे उद्योग चालतात... परंतु आता ज्या प्रमाणे मिपावरील कालावधी वाढला त्याप्रमाणे वय देखील वाढलेच... हल्ली प्रयत्नपूर्वक स्वतःला बदलतोय...शेवटी रिकाम्या हातानेच मृत्यूलोकात आलो आणि रिकाम्या हातानेच दुसरा देह घेण्यासाठी हा देह सोडणार आहे असे देखील स्वतःला सांगतो. [ यमाचा रेडा काही डोअर बेल वाजवुन येत नाही ! ] आणि उगाच मौन होतो...

जाता जाता :- बर्‍याच काळाने मला जुने प्रकाका आज लिखाणातुन भेटले ! फक्त यात ते हॅहॅहॅ असं हसले नाहीत इतकीच काय ती तक्रार ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- SHOORVEER 3 - A Tribute to छत्रपति शिवाजी महाराज | Rapperiya Baalam Ft. Shambho I Meetu Solanki

प्रकाश घाटपांडे's picture

27 May 2023 - 9:31 am | प्रकाश घाटपांडे

हॅहॅहॅ वरुन जुना लेख आठवला. तो डिझायनर लेख देत नाही पण पूरक असा दुसरा लेख आठवला. बरी नव्हे ही थट्टा
जुने दिवस आठवले मदनबाणा!

चित्रगुप्त's picture

28 May 2023 - 9:35 am | चित्रगुप्त

घाटपांडे साहेब, तुमच्या या बाबतीतल्या दोलयमान मनस्थितीचा मी चांगलाच अनुभव घेतलेला आहे. ऑगस्ट २०२२ मधे मी खूप व्याप कमी केले, त्याची हकिगत खालील लेखात दिलेली आहे:
'आम्ही जातो आमुच्या गावा (भाग १: व्याप आवरते घेणे)

http://misalpav.com/node/51037

प्रकाश घाटपांडे's picture

28 May 2023 - 1:43 pm | प्रकाश घाटपांडे

सुंदर लेख व त्यावरील प्रतिक्रिया

प्रदीप's picture

28 May 2023 - 12:51 pm | प्रदीप

आपणा सर्वांना हा अनुभव कधीना कधीतरी, वयानुसार येतोच. तसा तो मलाही आला.

अनेक वर्षांपूर्वी, जेव्हा डिजिटायझेशन नवीन होते, तेव्हा माझ्या अनुभवावरून लक्षांत आले की ध्वनीसाठी एम.पी. ३ हा दीर्घकाळ चालणारा फॉर्मॅट आहे. तेव्हा, तत्कालीन उपलब्ध सॉफ्टवेयर व माझ्याकडेव तेव्हा असलेल कॅसेट प्लेयर वापरून मी जवळजवळ सर्वच गीतांच्या एम. पी. ३ स्वतः तयार केल्या. मग अलिकडे, एकाद दोन वर्षांपूर्वी घरच काय, रहातो ते शहरही सोडायची वेळ आली, तेव्हा अतिशय कोरडेपणाने मी त्या जुन्या कॅसेट्स फेकून दिल्या. जवळ होती नव्हती ती जवळजवळ सर्व पुस्तके मात्र आणली, त्यांच्यासाठी कपाटे केली.

हीच बाब जुन्या फोटोजची. ते सर्व माझ्या प्रिंटरवर स्कॅन केले, व मूळ प्रती नष्ट केल्या.

वयानुसार व थोडाफार स्वभावानुसार निदान माझ्यात तरी कोरडेपणा आलेला आहे. गेल्या दोन वर्षांत माझी जन्मभूमी असलेले गाव व माझी कर्मभूमी असलेले शर सोडावे लागले. तिसर्‍याच गावांत, जाऊन रहावे लागले आहे. पण मी ह्या सर्व बाबतीत आता अलिप्त झालो आहे. कोडगा म्हटले तरी चालेल. तेव्हा तसे होणे जमते तर पहा. मनस्ताप कमी व्हावा, ह्यासाठी शुभेच्छा!

प्रकाश घाटपांडे's picture

28 May 2023 - 1:49 pm | प्रकाश घाटपांडे

खरतर प्रतिसाद वाचताना सुद्धा मी काळाच्या एका वेगळ्यात मिती मधे जातो. समविचारी (की दु:खी) मिळाले की बर वाटत. पाहू या काय जमते ते? ( हे ही पुन्हा नेमिची येतो पावसाळा प्रमाणे)