बदामी १: चालुक्यांचा संक्षिप्त इतिहास आणि बदामी लेणी
बदामी २: बदामी किल्ला, मंडप, धान्यकोठारे आणि शिवालये
बदामी ३: भूतनाथ, मल्लिकार्जुन मंदिरे, विष्णूगुडी आणि सिदलाफडीची प्रागैतिहासिक गुहाचित्रे
ऐहोळे १ - जैन लेणे आणि हुच्चयप्पा मठ
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मागच्या भागात आपण जैन बसादी आणि हुच्चयप्पा मठ पाहिला, गावाची सुरुवात येथूनच होते. मठाच्या बाजूने जाणारा रस्ता गावामधूनच जातो. रस्ता अतिशय अरुंद आहे दोन्ही बाजूंना ऐहोळेतील लहानलहान दुमजली घरे तर त्यांच्यामध्येच मंदिरे. किंबहुना हे गावच मंदिरांमध्ये वसलेले आहे. सर्वात पहिल्यांदा उजव्या बाजूस दिसतो तो त्र्यंबकेश्वर मंदिर समूह.
त्र्यंबकेश्वर मंदिर समूह
पाच मंदिरांचा असलेला हा समूह द्वित्रिकुटाचल पद्धतीत आहे अर्थातच त्रिदल गाभारा. ऐहोळेतील इतर मंदिरे जरी जुनी असली तरी हा मंदिरसमूह मात्र इसवी सनाच्या ११/१२व्या शतकात कल्याण चालुक्यांच्या राजवटीत निर्मिला गेला.
एका उंच अधिष्ठानावर निर्मित ह्या शिवमंदिराचे शिखर हे फांसना पद्धतीचे असून हा मंदिरसमूह एकमेकांना जोडला गेलेला आहे. रचीगुडी, मद्दिनागुडी ही येथील प्रमुख मंदिरं.
त्र्यंबकेश्वर मंदिर समूह
त्र्यंबकेश्वर मंदिर समूह
ह्या मंदिरसमूहात मूर्तीकाम जवळपास नाही, मात्र येथील बघण्यासारख्या गोष्टी म्हणजे येथील मंदिरातील लेथ मशिनवर तासून काढल्यासारखे गुळगुळीत स्तंभ आणि ग्रॅनाईटपासून बनवलेल्या चकचकित शिवपिंडी. प्रवेशद्वारातील अर्धमंडप, स्तंभयुक्त सभामंडप आणि गर्भगृह अशी यांची रचना. हे मंदिर अगदी गावातच असले तरी येथे फारसे कुणी येत नाही आणि गाभार्यात वटवाघूळांचा वावर आहे त्यामुळे येथे अगदी कुबट वातावरण आहे. टॉर्च घेऊनच येथील अंधार्या गर्भगृहांमध्ये शिरावे.
त्र्यंबकेश्वर मंदिर समूह
द्वारशाखेवरील गजलक्ष्मीची मूर्ती प्रेक्षणीय आहे.
सभामंडप आणि तेथील गुळगुळीत स्तंभ
राचीगुडी मंदिराच्या शिखरभागावर लाडकी ओंडक्यांसारखे दगडी ओंडके आहेत. ऐहोळे, पट्टदकलला अशी रचना सर्रास आढळते.
दगडी ओंडके आणि फांसना पद्धतीची शिखररचना
सभामंडपाच्या छतावर कमळाकृती कोरलेल्या आहेत.
मंदिर संकुल
मंदिर संकुल
हे मंदिर बघूनच बाहेर आलो, रस्त्याच्या पलिकडच्या भागात अजून एक मंदिरसमूह आहे. तो मात्र जैन मंदिरांचा.
जैन मंदिर समूह (चरंथी मठ)
दक्षिणच्या चालुक्य, राष्ट्रकूट, होयसळ, यादव ह्या सर्वच राजवटी हिंदू असल्यातरी ह्यांचे कित्येक महाल हे जैनांतून आलेले होते. ह्यापैकी काही राजांनी जैन धर्म देखील स्वीकारला होता किंवा जैनांना राजाश्रय देखील दिला होता. साजहिकच ह्या राजवटींनी जैन मंदिरांची देखील उभारणी केली. त्यापैकीच एक मंदिरसमूह येथे आहे. चरंथी मठ ह्या नावाने ओळखले जाणारे संकुल ऐहोळेतील सर्वाधिक दुर्लक्षित मंदिरसमूह मानता यावा. ऐहोळेतील इतर बहुतेक मंदिरांचा परिसर स्वच्छ असला तरी येथे मात्र बरीच अस्वच्छता आहे. ऐन गावांत असल्याने हे मंदिर येथील रिकामटेकड्यांचा एक अड्डाच झाले आहे. तंबाखू, गुटख्यांची पाकिटं, बिडी सिगारेट्सची थोटके, खाद्यपदार्थांच्या फाटलेल्या पिशव्या येथे सर्रास आढळतात. पुरातत्त्व खात्याने नीट निगा न राखलेला हा एकच मंदिरसमूह मला येथे आढळला.
तीन जैन मंदिरांचा हा समूह फांसना शैलीत असून १२ व्या शतकात कल्याण चालुक्यांच्या राजवटीत बांधला गेला. चौकोनी सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी याची रचना.
जैन मंदिर संकुल
मंदिराचे स्तंभ नक्षीकामामुळे देखणे दिसत आहेत.
महावीरांच्या ह्या मंदिरात दोन प्रवेशद्वारे असून प्रत्येक प्रवेशद्वारावर १२/१२ तीर्थंकरांच्या उभा मूर्ती कोरलेल्या असून त्यांच्या बाजूला आसनस्थ जैन देवीची प्रतिमा आहे. ह्या मंदिरात आल्यावर ही शिल्पे बघणे अजिबात चुकवू नये.
प्रवेशद्वारारील जैन तीर्थंकरांच्या प्रतिमा
प्रवेशद्वारारील जैन तीर्थंकरांच्या प्रतिमा
आतील सभामंडप, गर्भगृहात महावीरांची मूर्ती आहे.
ह्या मंदिराच्या समोरचे जैन मंदिर मात्र मी वर म्हटल्याप्रमाणे अतिशय अस्वच्छ आहे. बाहेरुन जरी हे छान दिसत असले तरी आतमध्ये ह्याची अवस्था वाईट आहे.
जैन मंदिराचा बाह्यभाग
जैन मंदिराचा बाह्यभाग
गर्भगृहाच्या द्वारपट्टीकेवर महावीर असून बाजूला त्यांचे दोन सेवक आहेत.
गर्भगृहात महावीरांची आसनस्थ मूर्ती आहे. ही मूर्ती देखील ग्रॅनाईटमध्ये कोरलेली आहे.
हा मंदिरसमूह पाहून येथील पुढिल एका मंदिरसमूहाकडे निघालो. हे आहे मल्लिकार्जुन मंदिर संकुल
मल्लिकार्जुन मंदिर संकुल
येथवर जवळपास साडेदहा वाजत आल्याने आणि ह्या पुढे दुर्ग मंदिर, रावणफडी, मेगुती टेकडीवरील जैन मंदिर आणि दुपारनंतर पट्टदकल येथील मंदिरे बघायची असल्याने वेळ मात्र अतिशय कमी उरला होता त्यामुळे ही मंदिरे झटपट बघून पुढे जाण्याचे ठरवले.
मल्लिकार्जुन मंदिरसमूह एका विस्तृत प्रांगणात आहे. पाच मंदिरांचा हा समूह फांसना पद्धतीत बांधला गेलेला आहे. येथील सर्वात जुने मंदिर आठव्या शतकातील वातापिच्या चालुक्यांच्या कारकिर्दित बांधले गेले असून शेवटचे मंदिर १२ व्या शतकांत कल्याण चालुक्यांच्या राजवटीत बांधले गेले आहे.
मल्लिकार्जुन मंदिर संकुल
एका उंच अधिष्ठानावर उभारल्या गेलेल्या ह्या मंदिरसंकुलांचे बांधकाम अपूर्ण दिसते किंवा कालौघात उद्वस्त झाले असावे. मुखमंडप, रंगमंडप आणि गर्भगृह अशी याची रचना. द्वारपट्टीकेवर गजलक्ष्मीचे शिल्प असून सभामंडपातील स्तंभांवर वादक, नर्तकी, नृसिंह अशी शिल्पे आहेत.
मल्लिकार्जुन मंदिर समूहाचा पाठीमागचा भाग
येथे पुढ्यात अवशेष शिल्लक राहिलेला नंदीमंडप आहे. शिखर फांसना पद्धतीचे असून त्यावर आमलक आहे.
आतील स्तंभ आणि स्तंभशिल्पे
वेगेवगळ्या प्रकारची मंदिरशैली हे ऐहोळे येथील मंदिरांचे वैशिष्ट्य. दक्षिण भारतातील मंदिर परंपरा ऐहोळेपासून सुरु झाली असे मानता यावे. साहजिकच येथे प्राथमिक अस्वस्थेतील विविध प्रकारची मंदिररचना, शिखररचना आढळते. ऐहोळेस आल्यावर येथील विविध मंदिरे पाहात हे अवश्य जाणून घ्यावे. असेच उतरत्या छपरांच्या रचनेचे आणि फांसना पद्धतीच्या शिखराचे हे मल्लिकार्जुन मंदिर. मंदिरसमूहाच्या आवारात एक विस्तीर्ण पुष्करिणी देखील आहे.
मंदिरसमूहातील एका मंदिरावर असलेली गजलक्ष्मी आणि नक्षीदार प्रवेशद्वारे
मंदिरसंकुल
मंदिरसंकुलातील अजून एक मंदिर
ह्या मंदिराच्या समोरच गौरी मंदिर आहे मात्र वेळेअभावी येथे जाता आले नाही, तर मंदिराच्या बाजूला ज्योतिर्लिंग मंदिर संकुल आहे, हा देखील एक मोठे समूह संकुल आहे मात्र येथील कुंपण कुलुपबंद केले असल्याने येथेही जाता आले नाही. मात्र बाहेरुन त्यांची काही काही छायाचित्रे घेता आली.
ज्योतिर्लिंग मंदिर संकुल - फांसना पद्धतीचे शिखर
ज्योतिर्लिंग मंदिर संकुल - मंडप रचना
मल्लिकार्जुन मंदिर संकुल हे मेगुती टेकडीचा उतार संपल्यावर लगेचच बांधले गेले असल्याने येथून मेगुती टेकडी, मेगुती किल्ल्याची तटबंदी आणि टेकडीच्या वरच्या बाजूस असणारे बौद्ध मंदिर अगदी सुरेख दिसते.
मेगुती टेकडी व बौद्ध मंदिर
येथे आपण जाणारच आहोत मात्र त्यापूर्वी येथील सर्वात प्रसिद्ध असे दुर्ग मंदिर आपल्याला पाहावयाचे आहे, त्याविषयी पुढील भागात.
क्रमशः
प्रतिक्रिया
10 May 2023 - 11:53 am | टर्मीनेटर
बहुप्रतीक्षित भाग आवडला! वर्णन आणि सर्व फोटोजही सुंदर 👍
"येथील मंदिरातील लेथ मचिनवर तासून काढल्यासारखे गुळगुळीत स्तंभ आणि ग्रॅनाईटपासून बनवलेल्या चकचकित शिवपिंडी."
प्रवीण मोहन ह्या युट्युबरचे भारतातील प्राचीन मंदिरावरील व्हिडीओज मी अधून मधून बघत असतो. त्याचे हंपी येथील प्राचीन लेथ मशीन आणि होयसळेश्वर मंदिराविषयीचे दोन व्हिडीओजही पाहिले असल्याने तुम्ही म्हणताय तसा ह्या मंदिराच्या उभारणीत लेथ मशीनचा वापर झाला असावा ह्यात मला तरी काही शंका नाही!
बाकी 'ज्योतिर्लिंग मंदिर संकुल - मंडप रचना' ह्या फोटोतील दोन 'बकऱ्या' देखील मंदिर परिसरातील शिल्पकलेचा भाग असल्या सारख्या वाटत आहेत 😀 😀 😀
पुढील भागाच्या प्रतिक्षेत...
10 May 2023 - 12:34 pm | राजेंद्र मेहेंदळे
रुमाल टाकुन ठेवतो. सविस्तर प्रतिक्रिया नंतर देईन.
10 May 2023 - 12:49 pm | Bhakti
वाह! ऐहोळे २ लेख आला!
विविध मंदिर रचना आवडल्या.दगडी ओंडके म्हणजे कमालच कल्पना वापर आहे.
10 May 2023 - 12:50 pm | चौथा कोनाडा
खुप सुंदर वृतान्त आणि अप्रतिम प्रचि !
सगळीच मंदिरे अतिशय सुंदर !
लेथ मचिनवर तासून काढल्यासारखे गुळगुळीत स्तंभ जबरी सुंदर दिसत आहेत ! जैन मंदिर संकुल स्तंभ, किती सुंदर नक्षीकाम ! खरोखर देखणे आहेत.
प्रचू वल्लींचा धागा म्हणजे सुंदर मेजवानीच असते !
धन्यवाद प्रचेतस सर, घर बसल्या ऐहोळे मंदिरांची सहल घडवलीत
10 May 2023 - 1:35 pm | राजेंद्र मेहेंदळे
सुंदर फोटो आणि उत्तम माहितीने सजलेला प्रचेतस यांचा ऐहोळे मलिकेतील अजुन एक धागा. फोटो बघुन डोळ्याचे पारणे फिटले.
रच्याकने- फांसना म्हणजे नक्की काय पद्धत? आणि ते दगडी ओंडके छतावर ठेवण्याचे कारण काय असावे?
10 May 2023 - 4:28 pm | प्रचेतस
फांसना शैली म्हणजे एकावर एक वर निमुळत्या होत जाणार्या आकारात आडव्या दगडी स्लॅब्स बसवून केलेली रचना. ह्यात उभे अर्धस्तंभ किंवा लहान लहान शिखरांची रचना नसून एकावर एक ठेवलेल्या फासळ्या जशा दिसतील तशी रचना असते. प्रारंभीच्या नुसत्या आडव्या छतावरुन ही उत्क्रांत झालेली प्राथमिक शिखरपद्धतीची रचना.
प्राचीनकाळी घरांचे, मंदिरांचे बांधकाम लाकडात असे. त्या रचनेशी साध्यर्म्य म्हणून असे लाकडाच्या ओंडक्यांसारखे दगडी ओंडके मंदिरांच्या छतांवर ठेवले गेले. हे अगदी जुन्या काळापासून चालत आलेले आहे, बौद्ध चैत्यगृहांची गवाक्षांची रचना ही त्याकाळच्या लाकडी प्रासादांच्या कामावरुन प्रेरीत होती. वेरुळ येथील १० व्या क्रमांकाच्या बौद्ध चैत्यगृहाला आजही सुतार लेणे म्हणतात हे विशेष.
11 May 2023 - 6:00 pm | चौथा कोनाडा
हाच अंदाज केला होता ..
..... नाही तर अश्या जड वस्तू छ्त उडून जायला नको म्हणून वर ठेवतात !
10 May 2023 - 4:41 pm | कर्नलतपस्वी
उत्तम फोटो.
आपले सर्व लेख एक विद्यार्थी म्हणून वाचतो गुणग्राहक म्हणून नाही.
10 May 2023 - 5:46 pm | कंजूस
मंदिरांचे प्रयोग इथे पाहण्यासाठी लेख वाचून जावे. शिवाय पायपीट करायची तयारी असलेले लोकच बरोबर हवेत.
11 May 2023 - 7:58 am | सुखी
मस्तच.. छान सांगितल आहे
11 May 2023 - 8:16 am | गवि
लेख, फोटो सर्वच उत्तम.
बाकी...
श्री प्रचेतस यांच्या दृष्टीने ११ वे, १२ वे शतक हा देखील कदाचित हल्लीचाच काळ असावा. बाकी १५ व्या शतकाच्या पुढील तर ते मोजतच नाहीत. त्या काळातले काही मंदिर शिळा असेल तर थेट "आधुनिक" म्हणून सोडून देतात. :-))
11 May 2023 - 12:30 pm | चांदणे संदीप
श्री प्रचेतस! लोल! =))
सं - दी - प
11 May 2023 - 12:43 pm | Bhakti
श्री प्रचेतस यांच्या दृष्टीने ११ वे, १२ वे शतक हा देखील कदाचित हल्लीचाच काळ असावा. बाकी १५ व्या शतकाच्या पुढील तर ते मोजतच नाहीत. त्या काळातले काही मंदिर शिळा असेल तर थेट "आधुनिक" म्हणून सोडून देतात. :-))
हा हा हा!खरच की!
11 May 2023 - 10:05 am | गोरगावलेकर
फोटो अप्रतिम. मंदिरांची रचना, बांधकाम शैली, याबाबत रोचक माहिती वाचावयास मिळत आहे.
11 May 2023 - 3:56 pm | तुषार काळभोर
पुर्ण लेखातील फोटोंमध्ये केवळ दोन जीवित प्राणी - त्याही शेळ्या. एकही मनुष्य नाही. हे प्रकर्षाने जाणवले.
11 May 2023 - 5:01 pm | अनिंद्य
नेहेमीप्रमाणे सरस लेख.
फोटो मात्र तुमच्या लेखांमध्ये असतात त्यापेक्षा डावे आहेत, नेहेमीसारखे रसरशीत नाहीत. (सॉरी, स्पष्ट लिहिले)
12 May 2023 - 7:16 am | प्रचेतस
धन्यवाद.
सर्वच छायाचित्रे मोबाईलमधूनच काढली आहेत आणि येथे असलेल्या मंदिरांच्या दाटीमुळे योग्य तो कोन मिळणे जिकिरीचेच आहे. स्पष्ट अभिप्रायाबद्दल आभार.
16 May 2023 - 8:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
यादव, वातापी, चालूक्य, कोणकोणती घराणी त्यांचा काळ त्यांच्या काळातील शिल्प, मंदिरं. सगळंच भारी. आम्हा वाचकांना आपलं लेखन एक सुंदर सहलच असते. अभ्यासही होतो. या पाठात आम्ही फासना शैली समजून घेतली. या भागातील मंदिरं आणि परिसर स्वच्छ वाटला. मंदिराची रचना शैली आवडली. आपल्याकडे मंदिरं नागरशैलीतील किंवा हेमांडपंथी शैलीतील मंदिराचं टोक म्हणजे कळस इकडे मात्र तसे दिसत नाही. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह, एकदम घासून-पुसुन लखलखीत केली आहेत असे दिसते. लेखनशैली आणि छायाचित्र सुंदर आली आहेत. माहितीपूर्ण लेखनाबद्दल मनापासून आभार. लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे