नमस्कार मंडळी
पहीलेच सांगतो की भटकंती विभागात एरर येत असल्याने ईथे धागा काढला आहे त्याबद्दल क्षमस्व.
एप्रिल्/मे महीन्याचे ऊन तापत आहे, त्यामुळे हे काही भटकंतीचे दिवस नव्हेत गड्या. पण मुलाची परीक्षा संपुन पुढचे क्लास सुरु व्हायला २-३ दिवस होते, आणि अभ्यास "करुन" तो आणि "बघुन" मी कंटाळलो असल्याने एक तरी वन डे करावा असा विचार केला. त्याचे १-२ मित्रही तयार झाले. मग काय, विकांताला निघालो गाडी घेउन सकाळी ६-६.१५ वाजता. थंड वातावरण होते, ट्रॅफिकही कमी होते, वाटेत घोरावडेश्वर लागले, म्हटले जरा वॉर्म अप होईल, म्हणुन गाडी बाजुला घेतली आणि निघालो वर जायला. डावीकडे सूर्यदेव वर येत होते.
उजवीकडे सोमाटणे फाट्याचा गणपती बाप्पा दिसत होता
पाठीमागे बेगडेवाडी स्टेशन
वर पोचलो आणि एक फोटो तो बनता हय
बरीच मंडळी मित्र कुटुंबियांसहीत कुत्रे वगैरे सहीत आलेली दिसली. पुणेकरांचा व्यायामाचा उत्साह बघुन गदगदुन आले. त्याच आनंदात खाली उतरलो आणि भरपेट नाश्ता केला.
पोटोबा झाल्यावर भरकन पुढे निघलो आणि मळवलीला डावीकडे आत शिरलो. रेल्वे फाटक आणि एक्स्प्रेस् वे वरचा पूल ओलांडुन पुढे आलो , भाजे गावात टोल रुपी खंडणी दिली आणि भाजे लेण्यांच्या पायथ्याशी गाडी लावली. वेळ सुमारे ९ वाजताची.
उन फार नसल्याने पटकन वर येउन तिकिटे काढली आणि पुढे झालो. वाटेत एक मास्टिफ दमुन ह्यॅ ह्यॅ करत बसला होता त्याला पाणी पाजले आणि त्याच्या मालकाला तिकिटासाठी ५०० रुपये सुट्टे देउन दोघांचा दुवा घेतला. (मला खरेतर तो लॅब वाटला होता पण मुलाने चूक लक्षात आणुन दिली--काय बाबा? तुला ईतके पण समजत नाही वगैरे वगैरे. ही नवीन तूनळी पिढी फारच स्मार्ट बुवा. आमच्यावेळी तर वगैरे वगैरे)
पुढचे सगळे फोटो वर्णन करण्याची माझी कुवत नसल्याने प्रचेतस यांना निमंत्रित करतो.
इथुन लोहगडाचा विंचुकाटा खुणावत होता
त्यामुळे झपझप खाली उतरलो, एक सरबत प्यायलो आणि गाडी लोहगडाकडे घेतली. वाटेतला अवघड घाट पार करताना ड्रायव्हिंगचा कस लागला. ७० अंशात गाडी वळवताना आणि चढवताना जरा फाफललीच. नशीब समोरुन एखादी गाडी आली नाही. १०.३० च्या सुमारास लोहगड-विसापुरची खिंड पार केली आणि गावात आलो. उन व्हायच्या आत वर पोचु म्हणुन पटकन गाडी पार्क केली आणि चढायला लागलो.
लोहगडावर अजुनही बुरुज्,दरवाजे,मारा करायच्या गंज्या, तटबंदी फारच चांगली टिकुन आहे, त्याबद्दल देवाचे आणि शासनाचे आभार मानावे तितके कमीच
पहारेकर्यांच्या देवड्या
लोहगडावरुन विसापुर चे दर्शन
गणेश दरवाजा
नारायण दरवाजा
हनुमान दरवाजा
हनुमान दरवाज्यावरील सुबक कोरीव काम
एका सुंदर अँगलने दिसलेला तिकोना किल्ला
तुंग(डावीकडे) आणि तिकोना (उजवीकडे)एकाच दृष्टीक्षेपात
दर्गा
तलाव
बेडुकराव शिकारीच्या शोधात. ईथे बराच वेळ व्हिडिओ करायचा प्रयत्न केला पण त्याचा चतुर पकडतानाचा क्षण काही टिपता आला नाही. मुलांनी चपटे दगड फेकुन डबलिंग वगैरे हौस भागवुन घेतली. ओंजळीत टॅड पोल वगैरे पकडुन झाले.अजुन काही वेळ थांबलो तर बाटलीत आणि खिशात मासे किवा बेडुक भरुन घरी घेउन येतील अशी भिती वाटल्याने त्यांना हाकलले आणि पुढे झालो.
खांबटाके(एकुणातच किल्ल्यावर पाणी चिकार आहे)
विंचुकाटा- पण वेळे अभावी ईथे गेलो नाही, फक्त वरुनच बघितला.
अष्ट्कोनी तलाव
सगळ्यात वरच्या टोकाला हे नवीनच उद्योग केले आहेत एका विशिष्ट जमातीने
साडेबारा वाजले होते. ऊन तळपत होते आणि पोटात कावळे कोकलत होते. टोकावरुन एक सुंदर व्ह्यु मिळाला तो घेउन उतरणीला लागलो.
एक वाजता खाली येउन दिडच्या सुमारास वेट अँड जॉय जवळ एका हॉटेलात जेवलो आणि परतलो.(समाप्त)
प्रतिक्रिया
7 May 2023 - 4:06 pm | कुमार१
सुंदर भटकंती !!
7 May 2023 - 5:14 pm | गोरगावलेकर
अप्रतिम फोटो. माझ्या भाजे आणि विसापूर भटकंतीच्या आठवणी ताज्या झाल्या.
7 May 2023 - 5:36 pm | कर्नलतपस्वी
फोटोही मस्त. वाचताना गप्पा मारतोय असेच वाटले.
7 May 2023 - 6:45 pm | कंजूस
लक्ष्मी कोठार बंद केलं आहे का? तिथे मी राहिलो होतो.
तो दर्गा खूप जुना आहे. नवीन उद्योग नाहीत.
वरून म्हणजे वरून तुंग चार पोटात काढलात तिकडे खाली दुधिवरे गाव आणि सातारकर महाराजांनी(किर्तनकारांनी) एक देऊळ बांधलेले दिसते. ते आता दिसते का? तिकडून मागच्या बाजूने शिवखिंडमार्गे(?) लोणावळा गाठता येतो. काही सायकलवाले तिकडून जातात.
___________
एक विनंती - जुन्नर लेण्याद्री (२६ लेणी आणि लेख) अधिक शिवनेरी करून फोटो काढून आणा. पावसाळ्यात अगोदर!!
7 May 2023 - 6:50 pm | कंजूस
१)लक्ष्मी कोठार बंद केलं आहे का? तिथे मी राहिलो होतो. प्रवेशद्वारानंतर उजवीकडे , खाली लोहगडवाडी दिसते तिकडे आहे.
२)तो दर्गा खूप जुना आहे. नवीन उद्योग नाहीत.
३) वरून तुंग'चा फोटो काढलात तिकडे खाली दुधिवरे गाव आणि सातारकर महाराजांनी(किर्तनकारांनी) एक देऊळ बांधलेले दिसते. ते आता दिसते का? तिकडून मागच्या बाजूने शिवखिंडमार्गे(?) लोणावळा गाठता येतो. काही सायकलवाले तिकडून जातात.
___________
एक विनंती - जुन्नर लेण्याद्री (२६ लेणी आणि लेख) अधिक शिवनेरी करून फोटो काढून आणा. पावसाळ्याच्या अगोदर!!
8 May 2023 - 9:25 am | प्रचेतस
नाही, बघता येते. पण हल्ली सुरक्षारक्षक असतात. हे कोठार एकदम भारी आहे. आतल्या आत असंख्य कक्ष आहेत.
दर्गा जुनाच आहे मात्र मेहेंदळे म्हणत आहेत ती एक कबर आहे. लक्ष्मी कोठीवरुन वरच्या भागात गेल्यास इथे जाता येते. येथे प्रचंड अतिक्रमण झाले आहे. जणू काही विशाळगडाची लहान आवृत्तीच आहे म्हणा ना.
हो, दिसते. किल्ल्याच्या दरवाजाच्या बाजूस असलेल्या कड्यावरुन अगदी सहज दिसते. चारचाकींना इकडून येणे सोपे आहे. चढ त्यामानाने कमी.
7 May 2023 - 10:43 pm | राजेंद्र मेहेंदळे
कंकाका
१.माहित नाही
२. दर्गा जुनाच आहे, पण माथ्यावरची कबर नवीन उद्योग आहेत
३. माहित नाही
7 May 2023 - 11:58 pm | श्रीगणेशा
पुढील पिढीसोबत वेळ काढून फिरायला जाण्याची कल्पना छान! फोटोही छान आलेत. एवढ्या सुस्थितीतला एखादा किल्ला पाहून आश्चर्य वाटलं.
8 May 2023 - 10:44 am | कंजूस
असं म्हणण्यापेक्षा आपल्याबरोबर आठवीपर्यंतच्या मुलांना किंवा बारावीपर्यंतच्या मुलींना घेऊन जाणे बरे. कारण त्यांना समवयस्क मुलांबरोबर गडभटकंती आयोजकांकडून जाणे आवडत असले तरी फारशा सहली निघत नसतात. सुट्या संभाळून नेलेल्या ट्रिपांना गर्दी फार असते.
आपण नेऊन त्यांच्या आवडीप्रमाणे वेळ देऊ शकतो आणि विविध ठिकाणे पाहता येतात.
8 May 2023 - 9:21 am | प्रचेतस
भटकंती एकदम मस्त झालेली दिसते. गर्दीमुळे हल्ली घोरावडेश्वरला जाणं नको वाटतं.
भाजे चैत्यगृहातील स्तूप तिथल्या मौर्यकालीन झिलईच्या तंत्राने एकदम गुळगुळीत झाला असल्या कारणाने प्रेक्षणीय आहे. २० नंबरची सूर्यगुंफा उत्कृष्ट. तबल्याचे प्राचिन शिल्प, पॅगेसस, सेंटॉर इत्यादी ग्रीक मिथिकल शिल्पांमुळे आणि ग्रीक शैलीतल्या योद्ध्यांमुळे विषेश प्रेक्षणीय आहे. तिकिट खिडकीवर त्या लेणीची चावी मागितल्यास सुरक्षारक्षक किल्ली देतात. आतमध्ये योद्ध्यांची शिल्पे तसेच शयनकक्ष आहेत. आवर्जून बघावेत.
लोहगडला किती वेळा गेलो गणतीच नाही. अत्यंत आवडता किल्ला. आता मात्र कधीही गेल्यास खूपच गर्दी असते. लोहगड किल्ला जरी प्राचीन असला तरी त्यावरील काही दरवाजांचे बांधकाम हे उत्तरकालीन आहे. नाना फडवणीसांच्या कारकिर्दित हे झालेले आहे. तसा एक शिलालेखच गणेश दरवाजाच्या ओसरीत आहे त्याचे वाचन असे-
श्री गणेशाय नम: गणेश दरवाजा बांधला बा
ळाजी जनार्दन फडणीस वीद्यमान धों
डो बलाळ नीजसुरे प्रारंभ शक १७१२
साधारणनाम संवत्सरे अस्वीन शु
ध नवमी रवीवार समाप्त शके
१७१६ आनंदनाम संवत्स
रे ज्येष्ठ सुध -----त्रयोदशी बु
धवार कता -----------व्य जयाजी
धनराम गवंडी ------------- त्रिंब
कजी सुतार
अर्थ-
शालिवाहन शकाच्या १७१२ रोजी साधारणनाम संवत्सरातील अश्विन शुद्ध नवमी रोजी रविवारी बाळाजी जनार्दन (नाना) फडणीस यांच्या तर्फे काम पाहणाऱ्या धोंडो बल्लाळ निजसुरे यांनी गणेश दरवाजा बांधायला सुरुवात केली आणि शालिवाहन शकाच्या १७१६ व्या वर्षी आनंदनाम संवत्सरातील ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी बुधवारी हे बांधकाम पूर्ण झाले. हे बांधणारे होते जयाजी धनराम गवंडी आणि त्रिंबकजी सुतार
किल्ल्यावरील सर्वात मोठा अष्टकोनी तलाव आहे तोही नानांच्याच देखरेखीखाली बांधला गेलाय. तसा शिलालेखच तलावाच्या पायर्यांच्या वरील बाजूस आहे.
शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नीजसुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधिवली
बाकी किल्ल्यावर पाणी विपुल असले तरी पिण्याजोगे पाणी मात्र एकाच ठिकाणी शिवमंदिराच्या बाजूस असलेल्या एका भूमिगत सातवाहनकालीन टाकीत आहे, हल्ली तेही दूषित झाले आहे.
8 May 2023 - 10:14 am | Bhakti
मस्तच भटकंती!भाजे पाहायचं आहे कधीचं,एकाच रुटवर लोहगड आहे का?
8 May 2023 - 10:45 am | राजेंद्र मेहेंदळे
एकाच दिवसात भाजे लेणी पाहुन पुढे ४-५ किलोमीटरवर लोहगड्ला जाता येइल(स्वतःचे वाहन असल्यास). पण तसे बघितल्यास भाजे लेणी विसापुर किल्ल्याच्या पोटात आहेत, त्यामुळे विसापुर्+भाजे सुद्धा करता येईल. मात्र विसापुरला बघायला फार काही नाही.
8 May 2023 - 10:52 am | कंजूस
विसापूर आणि लोहगड किल्ले चिकटूनच आहेत. भाजे लेणी ही विसापूर किल्ल्याच्या पोटातच आहेत. नकाशा टाकायचा प्रयत्न करेन नंतर.
या भागांत पावसाळ्यात सुट्ट्या आल्या की प्रचंड गर्दी असते.
8 May 2023 - 10:38 am | टर्मीनेटर
झकास भटकंती 👍
सर्व फोटोज आवडले पण "एका सुंदर अँगलने दिसलेला तिकोना किल्ला" वाला फोटो विशेष आवडला!
8 May 2023 - 10:47 am | राजेंद्र मेहेंदळे
सहज मिळुन गेला तो फोटो :)
9 May 2023 - 2:47 am | रीडर
मस्त गड लेणी भटकंती