कॅव्हॉक हा शब्द पायलट्स अगदी रोजच्या बोलण्यात वापरतात. त्याचा अर्थ आहे सीलिंग अँड व्हिजिबिलिटी ओके.
नेपाळच्या पोखरा एअरपोर्ट वर अगदी उतरता उतरता एक एटीआर ७२ विमान क्रॅश झालं आहे. तर अत्यंत स्वच्छ अशा cavok हवामानात हे विमान क्रॅश झालं आहे.
इमेज आभार wikimedia / wikipedia
विमानांच्या उड्डाणासाठी आणि एकूण मार्गाचं प्लॅनिंग करण्यासाठी जी माहिती लागते त्यातला महत्वाचा भाग म्हणजे मेटार (METAR). याचा अर्थ मेटरॉलॉजिकल टर्मिनल एअर रिपोर्ट. त्यातला हा एक कीवर्ड.
हल्लीच रनवे ३४ या सिनेमाने हा मेटार जगप्रसिद्ध केला असावा असे वाटते. अजय देवगण उर्फ कॅप्टन विक्रान्त खन्ना, ज्याची मेमरी फोटोग्राफिक असते, तो हवामानाचा रिपोर्ट घडाघडा पाठ म्हणून दाखवतो. तोच तो मेटार.
या अपघातात एकूण एक ६८ प्रवासी आणि सर्व म्हणजे ४ क्रू ठार झाले आहेत. या अपघाताचे दोन व्हिडीओज देखील उपलब्ध आहेत. हे अपघाताच्या तपासात फार महत्वाचे ठरणार आहेत. विमानाच्या आतून अगदी क्रॅश होईपर्यंत एक पॅसेंजर लाईव्ह व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रक्षेपित करत होता. या व्हिडिओत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कोणत्याही पॅसेंजरला अपघाताबद्दल जराही पूर्वकल्पना आली होती असं दिसत नाहीये. मजेत गप्पा चाललेल्या दिसत आहेत. नंतर अगदी अनपेक्षितरित्या तीन ते चार सेकंदात विमान पूर्ण विघटित होऊन प्रचंड आगच आग कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पॅसेंजर्सचे शेवटचे श्वासही त्यात ऐकू येत आहेत. अत्यंत विचलित करणारा हा व्हिडीओ आहे.
दुसरा व्हिडीओ कोण्या नागरिकाने आपल्या घराच्या गच्चीवरून काढलेला आहे. त्यात विमानाचे शेवटचे काही क्षण दिसत आहेत. विमान त्यानंतर लगेचच वस्तीच्या मध्ये असलेल्या दरीत कोसळलेलं आहे.
फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर हे दोन्ही सापडले आहेत. त्यावरून अधिक माहिती येईलच. पण तोवर हा क्रॅश फॉलो करण्यासाठी हा धागा सुरु करत आहे.
येती नावाच्या या एअरलाईनचा तत्कालीन मालक हा खुद्द विमानाच्या क्रॅश २०१९ मध्ये ठार झाला. आत्ताच्या पोखरा अपघाताच्या वेळी अंजू, जी विमानाची को पायलट होती, तिचा पती २००६ मध्ये अशाच स्वरूपाच्या विमान अपघातात ठार झाला होता. हा देश गेल्या काही वर्षांत विमान प्रवासासाठी नरक ठरला आहे. त्यात ही आणखी एक अत्यंत विचलित करणारी भर. आता सोळा वर्षांच्या अंतराने अंजू देखील अशीच विमान अपघातात जीव गमावून बसली आहे. ही फ्लाईट तिची को पायलट म्हणून या विमानावर शेवटची फ्लाईट होती. हे एक लँडिंग पूर्ण झाल्यावर ती एटीआर ७२ मॉडेलची पायलट इन कमांड बनणार होती. आत्ताचा पायलट इन कमांड, कमल, हा जवळजवळ २२००० तास उड्डाणाचा अनुभव असलेला जुना जाणता एव्हिएटर होता. तो तिची टेस्ट घेत होता.
एटीआर ७२ हे विमान फ्रान्स आणि इटली या दोन देशांतील कंपन्यांनी एकत्र येऊन बनवले आहे. एअरबस ही या संयुक्त उपक्रमाची एक पेरेंट कंपनी आहे.
या अपघातात नष्ट झालेलं हे विमान आगोदर किंगफिशर एअरलाईन्सच्या वापरात होतं. भारतीय एअरलाईन्सची जुनी विमानं खरेदी करून डागडुजी करून वापरणं ही नेपाळमध्ये अगदी रुळलेली पद्धत आहे. मी खुद्द अशी उदाहरणे पाहिली आहेत. काही एटीआर पायलट्सशी थेट संवादाचा योगही आला आहे. ७० ते ७४ इतकी आसनक्षमता असलेलं हे विमान आहे. दोन टर्बोप्रॉप इंजिन्स असतात. टर्बोप्रॉप इंजिन हे पिस्टन इंजिनपेक्षा खूप वेगळं असतं. यात हवा आत घेऊन दबावाखाली इंधनस्फोटासाठी पुरवली जाते. हे टर्बाईन इंजिन प्रॉपेलरला फिरवतं.
टॉप स्पीड ५१८ किमी प्रति तास, सलग १५०० किलोमीटर प्रवास करण्याची फ्युएल कॅपॅसिटी, सुमारे साडेसात किलोमीटर सर्व्हिस सीलिंग (सर्व्हिस सीलिंग म्हणजे किती उंचीपर्यंत हे विमान जाऊ शकतं. साधारण ७६०० मीटर्स).
याचा प्रॉपेलर कॉन्स्टन्ट स्पीड प्रॉपेलर आहे. म्हणजे तो नेहमी एका विशिष्ट वेगाने फिरतो. पॉवर कमी जास्त करण्यासाठी त्याचा पिच म्हणजे ब्लेडचा अक्षाशी असलेला कोन कमीजास्त केला जातो. हा कोन समोरून येणाऱ्या हवेला समांतर असेल तेव्हा त्याला फीदरींग असं म्हणतात. अशा कोनात तो कितीही वेगाने फिरला तरी हवेत विमानाला पुढे ढकलू शकत नाही.
फीदर केलेला प्रोपेलर ओळखा.
आभार wikimedia / wikipedia
१५ जानेवारी २०२३ या तारखेला नेपाळच्या स्थानिक वेळेनुसार दहा वाजून पन्नास मिनिटांनी (काही ठिकाणी अकरा अशी वेळही नोंदवलेली दिसते) ही २५ मिनिटांची काठमांडू पोखरा फ्लाईट पोखरा एअरपोर्टच्या अगदी जवळ पोचली. पायलटसनी कोणतीही अडचण रिपोर्ट केली नव्हती. फक्त त्यांनी आधी असाईन झालेला रनवे बदलून मागितला होता. आणि अगदी शेवटच्या एखाद दोन मिनिटांत ते काहीही संपर्क न करता कोसळले.
विमानाच्या आतून बनवल्या गेलेल्या व्हिडिओत जे दिसतं त्यानुसार असं भासतं की हसते खेळते लोक क्षणात आगीने वेढले गेले आणि स्फोट झाला. हेच मत प्रथमदर्शनी होईल. म्हणूनच काही शक्यता नीट तपासणं आवश्यक आहे. डेव्हील इज इन द डीटेल्स.
घराच्या गच्चीतून जो व्हिडीओ बनवला गेला आहे तो अत्यंत काळजीपूर्वक फ्रेम बाय फ्रेम पाहिला तर खालील गोष्टी स्पष्ट होतात.
१. विमान स्टॉल झालं आहे. यात कोणतीही शंका नाही. त्यामुळे अचानक आग, स्फोट असं काही दिसत नाही.
स्टॉल होणे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर विमानाच्या पंखांचा हवेशी असलेला कोण अतिशय जास्त वाढल्याने आणि स्पीड अतिशय कमी झाल्याने पंखांवर विमानाचं वजन उचलून धरण्याइतकी लिफ्ट न उरणं आणि विमान एखाद्या दगडांप्रमाणे खाली पडणं. कारण यात त्याचं "विमानपण"च नष्ट होतं. अशा वेळी विमानाचं नाक खाली दाबून आणि इंजिन पॉवर पूर्ण जोरात लावून त्याद्वारे अनुक्रमे
अ . विमानाच्या पंखांचा हवेशी असलेला कोन कमी करायचा असतो
आणि
ब. विमानाला पुरेसा वेग द्यायचा असतो .
अशी कोणतीही हालचाल पायलट्सकडून झालेली या व्हिडिओत दिसत नाही. विमानाचं नाक आगोदर अधिकच वर उचललेलं दिसतं आणि इंजिन पॉवर वाढवल्याचा कोणताही आवाज येत नाही. हा आवाज लपून राहणं अशक्य आहे. इंजिन्स जवळपास आयडल मोडमध्ये आहेत (जे लँडिंगच्या त्या शेवटच्या टप्प्यात योग्यच होतं.) जमिनीच्या इतक्या जवळ नाक खाली दाबणं आणि इंजिन पॉवर वाढवणं हे तांत्रिकदृष्ट्या कितीही आवश्यक असलं तरी ते करायला हात रेटणं कदाचित अवघड झालं असू शकेल. को पायलट तिच्या टेस्टिंग फेजमध्ये होती आणि हे शेवटचं लँडिंग तिला पायलट इन कमांड या नात्याने करायचं होतं. त्यामुळे तिला पायलट इन कमांड पद मिळणार होतं. यातील प्रेशरचा भाग दुर्लक्षित करून चालणार नाही.
२. स्टॉल टाळण्यासाठी कोणतीही हालचाल केली नाही की बहुतांश वेळा विमानाचा एक पंख कलतो आणि विमान 'स्पिन' नावाच्या डेथ स्पायरलमध्ये जातं. वाळकं पान जसं गरगर फिरत खाली येतं तसं. अशा वेळी विमानाच्या गिरक्यांच्या उलट दिशेत कंट्रोल कॉलम फिरवून आणि पॉवर देऊन ते रिकव्हर करण्याची थोडीशी संधी अजून उरलेली असते, जर मन स्थिर असेल तर. पण या सर्वासाठी जमीन आणि आपण यात काही हजार फूट अंतर लागतं. या केसमध्ये विमान जमिनीच्या अगदी जवळ होतं. त्यांच्याकडे वेळ आणि संधी दोन्ही उरले नव्हते.
३. विमानाच्या आतून घेतलेल्या व्हीडीओस काळजीपूर्वक (आणि ते खूप वेदनादायक आहे, पण केवळ अभ्यासक म्हणून तसं करण्याची हिम्मत बांधल्यास) फ्रेम बाय फ्रेम पाहता शेवटचे काही क्षण आग दिसण्यापूर्वी आणि इम्पॅक्टचा धाड आवाज येण्यापूर्वी विमान डावीकडे तीव्रपणे झुकलेलं दिसतं. त्या क्षणी फोकस जरी विमानाच्या आतल्या दृश्याकडे असला तरी हे लक्षात येतं.
आता ही स्टॉल आणि स्पिनची स्थिती त्या क्षणी उत्पन्न झाले की आगोदरपासून बिल्ड अप होत होती ते फ्लाईट डेटा रेकॉर्डरवरून कळेल.
आणखी एक निरीक्षण. लँडिंगच्या वेळी फ्लॅप्स (पंखांवरचा एक अवरोधक भाग, जो लिफ्ट आणि अवरोध दोन्ही वाढवतो आणि टेक ऑफ / लँडिंगच्या वेळी विशिष्ट कोनात खाली केला जातो) खाली केलेले नसावेत असं व्हिडीओजवरून वाटतं. हे कोणत्या कारणाने झालं असेल तेही इन्वेस्टीगेटर्स शोधतील.
आणखी एक तपशील. पोखरा (VNPK) या ठिकाणी दोन विमानतळ आहेत. जुना आणि नवा. नवा एअरपोर्ट एक जानेवारीला सुरु झाला. तोवर जुन्याच विमानतळावर वाहतूक होत होती. विमानाने नव्या एअरपोर्टच्या ३० क्रमांकाच्या रनवेवर लँड करणं अपेक्षित होतं . ही दिशा साधारणपणे वाऱ्याच्या दिशेवर ठरवण्यात येते. पण ऐनवेळी पायलट्सनी रनवे बदलून मागितला आणि १२ क्रमांकाच्या रनवेवर उतरण्याचा बेत केला. सर्वसाधारण माहितीसाठी, रनवेचा नंबर हा त्याची दिशा दाखवतो. उदा. रनवे ०९ म्हणजे ९० डिग्री. म्हणजे बरोब्बर पूर्वेकडे तोंड असलेली दिशा. २७ म्हणजे २७० म्हणजे बरोब्बर पश्चिमेकडे तोंड. (हे आकडे मुंबईच्या मुख्य रनवेचे आहेत अनुक्रमे कुर्ला आणि जुहू या दिशेने उड्डाण.)
दोन्ही एअरपोर्ट खालील नकाशात पाहता येतील. डावीकडे आहे तो जुना विमानतळ. उजवीकडे खाली आहे तो नवा विमानतळ. ते जे स्टेडियम दिसतं आहे ते त्या व्हिडिओत देखील आहे. त्यामुळे विमानाची त्या क्षणीची साधारण पोझिशन दाखवण्याचा प्रयत्न लाल फुलीद्वारे केला आहे. निळी रेघ ही ढोबळ मानाने पुढील उतरण्याचा पाथ आहे. उलट दिशेतला लाल बाण हा मुळात असाईन झालेला रनवे आहे. (दिशा). विमान त्या मधल्या घळीत कोसळलं. आगोदर माहीत असलेली कोणतीही इमर्जन्सी असती तर जुन्या विमानतळावर थेट सरळ रेषेत लँडिंग करणं शक्य होतं.
बेस नकाशा आभार गूगल
तर्क खूप लावता येतील. अधिक माहिती जशी जशी पुढे येईल तसं तसं अधिक कळेल. केवळ पार्श्वभूमी स्पष्ट होण्यासाठी हा प्लेसहोल्डर धागा.
१. संपूर्ण लक्ष केवळ बाहेर लँडिंग वर राहिल्याने स्टॉल उशिरा लक्षात येणं .
२. आपण रनवेच्या जवळ पोचूनही अद्याप पुरेसे खाली आलेलो नाही हे जाणवून पटकन खाली येण्यासाठी विमानाचं नाक किंचित वर उचलून पुढे जाण्याचा वेग कमी आणि त्याच वेळी खाली जाण्याचा वेग वाढवण्याचा नकळत प्रयत्न.
३. स्टॉल आणि शार्प लेफ्ट टर्न यांची एकच वेळ येणं आणि त्यामुळे स्पिन अवस्था येणं.
४. दरीतून येणारी एखादी जबरदस्त विंड गस्ट.
५. जुना एअरपोर्ट आणि नवा एअरपोर्ट यात अचानक प्रोसेस बदलामुळे काही गोंधळ (पण यापूर्वी दोन्ही वैमानिकांनी पोखरा या ठिकाणी लँडिंग केलेलं असल्याने ही शक्यता बाळबोध वाटते.
कोणीतरी विमानात फोन चालू करून व्हिडीओ शूटिंग लाईव्ह केल्याने विमानाच्या सिटीम्स बिघडून क्रॅश झाला अशी एक चर्चा अनेक ठिकाणी दिसतेय. टु कट इट शॉर्ट, त्यात काही तथ्य नाही.
तूर्तास इतकंच. अधिक काळात जाईल तसं अपडेट करूया. लेख विस्कळीत आहे. ललित असा उद्देश नसल्याने हा एक प्लेस होल्डर समजावा.
सर्व मृतांना श्रद्धांजली. आणि नेपाळमधलं हे अपघातसत्र कायमचं संपावं अशी तीव्र इच्छा.
प्रतिक्रिया
17 Jan 2023 - 3:36 pm | अनन्त्_यात्री
ˌमीटिअˈरॉलजिकल ऐवजी मेटराॅलाॅजिकल ?
17 Jan 2023 - 4:13 pm | गवि
टायपो चू भू द्या घ्या.
17 Jan 2023 - 5:10 pm | राजेंद्र मेहेंदळे
५जी सिग्नल्समुळे विमानाची उंची(अल्टिट्युड) मोजणार्या यंत्रणा गंडल्या असा एक मत प्रवाह आहे, त्यात कितपत तथ्य आहे माहीत नाही. पण काही महिन्यांपुर्वी अमेरिकेत ५ जी सेवा सुरु झाली तेव्हा काही काळ एअर ईंडियाने तिकडे जाणारी विमाने बंद केली होती या समस्येवर उपाय मिळेपर्यंत. ते आठवले. पुढील चर्चा वाचण्यासाठी उत्सुक आहे.
अवांतर--एअर क्रॅश इन्वेस्टिगेशन हा कार्यक्रम आमच्या घरी आवडीने बघितला जातो .फार माहितीपुर्ण असतो. "सली" हा टॉम हँक्स चा याच थीमवरचा चित्रपटही उत्तम.
17 Jan 2023 - 5:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गविसेठ, यापूर्वीही तुम्ही या विषयावर मिपावर लेखन केलं आहे, त्यातलाच हा नव्या घटनेच्या अपघाताची तपशीलवार मांडणी माहिती वाचायला मिळाली. पायलट आणि विमान, उड्डाने, पंखे, हवेचे कमी जास्त होणे, तांत्रिक शब्द आणि त्याची सविस्तर माहिती असलेले लेखन. अपघाताची जी काही संभाव्य कारणे आणि शोध घेत असलेले लेखन वाचतोय. आपला अभ्यास मोठाच.
अशा अपघातात कोणाचेही मृत्यु होणे दुःखदायक आहे, अजुन एक दैवदुर्विलास अंजू जी विमानाची को पायलट होती, तिचा पती २००६ मध्ये अशाच स्वरूपाच्या विमान अपघातात ठार झाला, हे तर अजुन विचित्र योगायोग वाटला.
कोणत्याही अपघातानंतर ते अपघात का झाले त्याचा शोध घेऊन भविष्यात होना-या घटना टाळता यावेत यासाठी प्रयत्न केले जातात. ते अपघात का झाले समजावेत 'सर्व मृतांना श्रद्धांजली. आणि नेपाळमधलं हे अपघातसत्र कायमचं संपावं अशी हीच तीव्र इच्छा''
-दिलीप बिरुटे
17 Jan 2023 - 7:08 pm | सरिता बांदेकर
कमेंट वाचतेय.आज हा लेख आलाय त्याचा काही उपयोग तुमच्या चर्चेला होईल असं वाटलं म्हणून लिंक देत आहे.
https://www.facebook.com/100064260206192/posts/pfbid0mpWBnREFTLhrW6kBavC...
एका विमान अपघाताबद्दल आहे.
17 Jan 2023 - 9:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विमानतळावर विमान उतरतांना सरळ जातात मात्र हे विमान जुन्या धावपट्टीकड़े वळत होते म्हणजे वैमानिकांचा विचार असावा तेव्हाच सरळ रेषेत चालणा-या विमानाने डाव्या बाजूला गिरकी घेतलेली दिसते आणि तेव्हाच त्याचा वेगळाच आवाज येत होता असे स्थानिक रहीवासी म्हणत आहेत. पायलेट कडून येणा-या संदेशात सर्व काही अलबेल होते तर असे काय घडले ? कन्फ्यूजन? कोणत्या धावपट्टीवर उतरायचे त्याचे पण तसेही असले तरी त्याची गिरकी आता पुढे निश्चित अपघाता होणार हेच दाखवते आणि जमीनीपासून अंतरही कमी होते. पायलेट निर्णय घेण्यात कमी पडले असेच वाटले.
-दिलीप बिरुटे
17 Jan 2023 - 11:04 pm | तुषार काळभोर
पायलट अंजू व तिच्या पतीचा, दोघांचा मृत्यू विमान अपघातात होणं हा दैवदुर्विलास.
नेहमीप्रमाणे सामान्यांना समजेल असं समजावून सांगणारा, आणि त्याचवेळी केवळ फॅक्ट्स सांगून, कॉस्नपिरसी थिअरी टाळणारा, लेख. जसे अजून अपडेट्स येतील, तसे अद्ययावत करालच.
अपघातात जीव गमावलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली..
18 Jan 2023 - 12:11 am | गवि
आता असं कळतं आहे की या नव्या कोऱ्या विमानतळावर आतापर्यंत रेग्युलर फ्लाईटसची फारशी लँडिंगज झालेली नाहीत. आणि जी झाली त्यातली बहुतांश रनवे ३० वर झाली, म्हणजे त्या बाजूने (म्हणजे दक्षिण पूर्व ते उत्तर पश्चिम अशी दिशा)
रनवे ३० चा अप्रोच बरोबर उलट दिशेने आहे. १२ चा अप्रोच मात्र जुन्या एअरपोर्टच्या रनवेच्या अगदी रेषेत जुन्या एअरपोर्टच्या वर पोचून मग डावे वळण घेणे अशा स्वरूपाचा आहे. पायलट लोकांचे काही डिस्कशन फोरम असतात त्यावर अशी मते येत आहेत की अशावेळी वर्षानुवर्षे जुन्या एअरपोर्टची सवय झालेली असताना वहिवाट म्हणून चुकून तिकडेच उतरण्याची मानसिक तयारी आणि मग अचानक जाणीव होऊन एकदम झटक्यात दिशेत sharp बदल केला जाणं (अर्र असं म्हणून चूक दुरुस्त करण्यासाठी झटक्यात हालचाल) असं होणं वाटतं तितकं अशक्य नाही.
आपण जेव्हा घर बदलतो, ऑफिस किंवा ऑफिसातली दहा वर्षांची नेहमीची जागा बदलतो तेव्हा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण सहज आगोदर जुन्या जागेकडे वळतो. वर्ष बदललं की पहिल्या आठवड्यात आवर्जून नवे वर्ष लिहितो, पण आठवड्यानंतर अचानक एखादे दिवशी जुने वर्ष घालतो.
अर्थात ही एक शक्य कोटीतली शक्यताच.
18 Jan 2023 - 8:17 am | नचिकेत जवखेडकर
छान लेखन आणि माहिती. वाचताना काटा आला. तुम्ही लिहिल्याप्रमाणे नेपाळमध्ये भारतातली जुनी विमानं वापरण्याचा प्रघात आहे. जुन्या विमानांमुळे पण असे अपघात होत असतील का?
जर का सह-वैमानिक विमान उतरवत होती आणि तिची परीक्षा घेणारा इतका अनुभवी वैमानिक होता, तर जेव्हा अपघात होतोय हे कळताक्षणीच त्यांनी का कंट्रोल हातात नाही घेतले? किंवा तुम्ही म्हणताय तसं अजून माहिती सगळी आली नाहीये म्हणून बरेच प्रश्न अनुत्तरित राहतील.
18 Jan 2023 - 8:28 am | गवि
नेपाळची बहुतांश विमाने इतर देशांतून वापरुन झालेली जुनीच असतात.
तिथे १९-२० एअरलाईन्स बनल्या आहेत. त्यामुळे आपोआप स्पर्धा, प्राईस वॉर, सुरक्षिततेशी तडजोड हे आलं आहेच.
अत्यंत डोंगराळ, दुर्गम आणि high altitude भूभाग. त्यामुळे काठमांडूचा मुख्य विमानतळ वगळता अन्यत्र छोटे छोटे रनवेच बनवणे शक्य आहे. (STOL) तिथे लहान आकाराची टर्बोप्रॉप किंवा पिस्टन इंजिन बेस्ड प्रोपेलर विमानेच वापरता येतात. ATR हेच त्यातल्या त्यात जरा मोठे टर्बोप्रॉप विमान असल्याने ते जास्त वापरलं जातं. बाकी बीचक्राफ्ट कंपनीची १९००, किंगएअर वगैरे असतात.
ही सर्व विमाने मोठ्या जेट विमानाइतकी स्टेबल नसतात. विशेषत: तिथल्या सतत आणि झटपट बदलणाऱ्या हवामानात त्यांना कंट्रोल करणं आव्हानात्मक बनतं..
युरोपियन युनियनने नेपाळी एअरलाइन्सना त्यांच्या एअरस्पेसमध्ये बंदी केली आहे. नेपाळला एविएशन सेफ्टीच्या धोकादायक यादीत घातलं आहे.
तीही अनुभवीच होती. ६००० तास जवळपास. या ATR वर १००० तास पूर्ण होत होते म्हणून ही कसोटी. त्यात नकळत लक्ष विचलित होऊ शकते. ती एक शक्यता, जे दिसतं आहे त्यावरून. रिकव्हरी प्रयत्न वेळेत झालेला दिसत नाही ही फॅक्ट आहे.
18 Jan 2023 - 11:18 am | टर्मीनेटर
.container-1 {
position: relative;
width: 100%;
overflow: hidden;
padding-top: 56.25%; /* 16:9 Aspect Ratio */
}
.responsive-iframe {
position: absolute;
top: 0;
left: 0;
bottom: 0;
right: 0;
width: 100%;
height: 100%;
border: none;
}
खूप छान माहितीपूर्ण लेख! तांत्रिक तपशील विशेष आवडले.
हे वाचल्यावर काही दिवसांपूर्वीच पारायण केलेल्या ब्रूस विलिसच्या 'डाय हार्ड' सिरीज मधल्या १९९० सालच्या Die Hard - 2 मधल्या प्लेन क्रॅशचा प्रसंग डोळ्यांसमोर तरळून गेला.
ऍस्परान्झो ह्या दहशतवाद्याच्या सुटकेसाठी त्यच्या सहकाऱ्यांकडून ग्राउंड लेव्हल उणे २०० फूट रीकॅलीब्रेट करून लंडनहुन येउन डल्लास विमानतळावर लँडिंग करणाऱ्या विमानाच्या वैमानिकाची दिशाभूल करत घातपाताने ते विमान क्रॅश केले जाते असे त्यात दाखवले आहे. अशी काही शक्यता नाही तरी ३३ वर्षांपूर्वीच्या ह्या हॉलिवूडपटात दाखवल्या सारखा काही घातपात 'येति'च्या बाबतीत घडवण्यात आला असेल का अशी शंका उगाचंच मनात आली.
18 Jan 2023 - 11:42 am | तर्कवादी
मुद्देसूद लेख
कृपया चित्रफितींचे दुवे द्यावेत.
तुम्ही जी माहिती दिलीत त्यावरुन मलाही हीच शक्यता जास्त वाटते.
18 Jan 2023 - 11:56 am | गवि
चित्रफीत (आतली) अत्यंत विचलित करू शकते त्यामुळे इथे टाकणं योग्य होणार नाही.
अधिक बारकाईने पुन्हा पुन्हा पाहता आता असं दिसतंय की त्या स्टेडियमच्या बाजूने जातानाची पोझिशन जरी बरोब्बर जुन्या विमानतळाच्या रनवे २२ च्या फायनल लेगची असली तरी विमान साधारण ३०० ते ४०० फूट उंच आहे. ही उंची जुना विमानतळ रनवे २२- फायनल लेग या स्थितीपेक्षा नवा विमानतळ रनवे १२ बेस लेग (फायनलच्या आधीचा, वळणापूर्वीचा लेग. अधिक माहिती पूर्वी इथेच एका लेखात लिहिली आहे. सर्किट विषयी. ) या स्थितीशी जुळते. जुन्या २२ वर फायनल लेग असता तर आणखी बरेच खाली असायला हवे होते.
म्हणजे जुन्या एअरपोर्टवर लँडिंग करण्याचा बेत नव्हता हे स्पष्ट होतं आहे. हां त्या आधी काही मिनिटे चलबिचल झाली असेल तर ते कळणे CVR शिवाय शक्य नाही.
आणखी माहिती. गच्चीतील व्हिडीओत धूसर चित्र फ्रीज करून पाहिले तर लँडिंग कन्फिगरेशनमध्ये Flaps तीस डिग्री खाली असणे अपेक्षित असताना ते १५ डिग्री किंवा कदाचित शून्य डिग्रीच दिसत आहेत. चित्र धूसर असले तरी पण फुल ३० डिग्री deployment नक्कीच नाही वाटत.
18 Jan 2023 - 12:30 pm | तर्कवादी
तुम्ही दुवे द्या... ज्यांना बघायची ते बघतील. ज्यांना नाही बघायची ते टाळतील.
तुम्ही ही लेख लिहताना चित्रफीतीचा आधार घेतला आहेच की !!
18 Jan 2023 - 12:43 pm | गवि
यू ट्यूबवर सहज सर्वत्र उपलब्ध आहे. नेमकी कोणती एक लिंक दिली तरी ती स्टेबल उपलब्ध राहतेच असे नाही. कोणत्याही न्यूज चॅनलची वेबसाईट अथवा यू ट्यूब चॅनल बघितल्यास सापडेल.
18 Jan 2023 - 12:46 pm | तर्कवादी
इच्छुकांना या ट्वीटमध्ये दोन्ही चित्रफीती एकत्र पाहता येतील.
श्री गविजी यांनी सांगितले त्याप्रमाणे चित्रफीत कदाचित विचलित करू शकते याचा विचार करुनच ती पहावी.
18 Jan 2023 - 1:30 pm | टर्मीनेटर
दोन्ही चित्रफिती पाहिल्या, धन्यवाद! मलातरी त्या विचलित करणाऱ्या नाही वाटल्या.
20 Jan 2023 - 12:38 pm | कपिलमुनी
पहिली क्लिप नक्कीच संवेदनशील लोकांना विचलित करू शकते.
फ्रीक्वेंट फ्लायर्स ना तर सहजच !
शक्यतो टाळा
18 Jan 2023 - 7:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
-दिलीप बिरुटे
18 Jan 2023 - 12:04 pm | प्रचेतस
थोर आहात गविसर. तपशीलवार मांडणीमुळे अपघात कसा झाला असावा याची पुरेशी कल्पना येत आहे. हल्ली बरेचदा विमानांचे अपघात जस्ट विमान उडाल्यावर किंवा लॅडिंग करतानाच झालेले आढळतात तर क्वचित काही समुद्रात झालेले दिसतात. एकूणातच जगभरात वाढलेली विमानांची संख्या, प्रक्षिशण संस्थांचे फुटलेले पेव आणि त्यामुळे वैमानिकांचा ढासळत्या प्रशिक्षणाचा दर्जा हे कारणीभूत असू शकेल का अशी शंका मनात दाटून आली.
18 Jan 2023 - 12:05 pm | गवि
स्टॉल होणे, बेस लेग, फायनल लेग, सर्किट अशा गोष्टींची काहीशी ओळख होण्यासाठी इच्छुकांना खालील धागा वाचता येईल.
https://www.misalpav.com/node/19258
18 Jan 2023 - 1:10 pm | गणपा
काथ्याकूट वाचला. या माणसाचा सखोल अभ्यास अन या विषयावर असलेली त्याची कमांड शब्दा शब्दाला जाणवत राहीली.
असलं सकस वाचायला मिळण्यासाठी दर वेळी एखाद्या अपघाताची वाट पाहायला लागू नये असेच म्हणावेसे वाटते.
कायम लिहिते राहा.
18 Jan 2023 - 4:22 pm | हणमंतअण्णा शंकर...
नेमके काय झाले असावे याचा थोडाफार अंदाज आला. तरीही सर्व संकल्पना समजल्या नाहीत. अर्थातच त्या तशा मुळातच तांत्रिक आहेत. कदाचित एखादा हे समजावून देणारा विडियो असेल तर पटकन समजूनही जाईल. उदा. फीदरींग म्हणजे काय हे वाचून कळले नाही.
दोन्ही चित्रफीती पाहिल्या. पहिली चित्रफित अतिशय अस्वस्थ करणारी आहे. मला विमानप्रवास, वाहनप्रवास, लांबपल्ल्याचे बसप्रवास करण्याआधी प्रचंड भिती वाटते. (तसे रेल्वे, मेट्रोप्रवासाबाबत अजिबात होत नाही). चित्रफित पाहून माझी तंतरली आहे. शाईट!
लेख नेहमीप्रमाणे गविसिद्ध दर्जेदार आहे.
18 Jan 2023 - 6:09 pm | श्वेता व्यास
एक ब्लॅक बॉक्स सोडून काहीच माहिती नव्हतं, भरपूर नवीन माहिती समजली. धन्यवाद.
18 Jan 2023 - 9:44 pm | स्मिताके
विस्तारपूर्वक लिहून बरीच माहिती सोपी करुन समजावल्याबद्द्ल आभार. विमान चालन किती गुंतागुंतीचं असेल याचा अंदाज आला.
18 Jan 2023 - 10:09 pm | Bhakti
त्या दिवशी नुसत कानावर आलं मोठा विमान अपघात झालाय, दुसर्या दिवशी त्या दुर्दैवी प्रवाशांचा व्हिडिओ पाहिला, खुप काळ सुन्न झाले होते.
माझ्यासारख्या भावनिक व्यक्तीला ,विमान अपघाताच्या तांत्रिक गोष्टी साध्या सहजपणे समजलेल्या बद्दल धन्यवाद.
बर्याच गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत.कोणाच्या जीवाशी खेळ होऊ नये एवढी चूक कधीच नको.
19 Jan 2023 - 1:48 pm | मनो
माझ्यामते स्टॉल वॉरनिंग स्टॉल स्पीडच्या आधी काही काळ कॉकपिटमध्ये नक्कीच आली असणार. कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर पाहिल्यावर नक्की कळेल. अश्या वेळी नाक खाली घेतले तर वेग वाढून स्टॉलमधून बाहेर पडता येते. असे का केले नाही हे रहस्य आहे.
20 Jan 2023 - 8:02 am | गवि
अगदी बरोबर.
स्टॉल वॉर्निंग ही ऑडियो रुपात तर येतेच, पण बहुतांश प्रवासी विमानांत स्टिक शेकर आणि स्टिक पुशर या दोन यंत्रणा असतात. या ATR ७२ ५०० विमानातही त्या होत्या.
स्टिक शेकर ही यंत्रणा जेव्हा स्टॉल स्पीड इतका कमी स्पीड होतो तेव्हा पायलटच्या हातातील कंट्रोल कॉलम खडखड, खडखड असा तीव्र कंपन करून हलवते. त्यामुळे पायलटला थेट इशारा मिळतो आणि कृती करण्यास शारीरिक स्टिम्युलेशन मिळतं.
स्टिक पुशर ही यंत्रणा यापुढे एक पाऊल जाऊन खुद्दच कंट्रोल कॉलम खाली दाबते आणि अँगल ऑफ अटॅक कमी करते. म्हणजे आवश्यक ती कृती स्वतःच करते. पण यात नाक खाली होऊन विमान वेगाने खाली जात असल्याने ही यंत्रणा विशिष्ट उंचीच्या खाली आपोआप डिसेबल होते. इथे या केसमध्ये ५०० फुटाखाली ती बंद झाली असली पाहिजे.
तरीही स्टॉल झाला म्हणजे काहीतरी अनपेक्षित घडलं आहे. गच्चीतून व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीने तो व्हिडिओ का काढला असावा असा प्रश्न उपस्थित होतो. त्या व्यक्तीने याबाबत मीडियाला असं सांगितलं की या १२ नंबर रनवेवर जी काही विमाने येतात ती या स्थितीपर्यंत (या जागी पोचेपर्यंत) ऑलरेडी पूर्ण वळलेली असतात. हे विमान मात्र खूप पुढे आलेलं असूनही वळलेलं नव्हतं आणि अधिकच खालच्या लेव्हलला उडत होतं हे पाहून त्याला आश्चर्य वाटलं. हे विमान त्या घरापासून ५०-१०० मीटर्सच्या आत कोसळलं. त्यामुळे त्याला धक्का बसला असणारच.
4 Feb 2023 - 4:09 pm | सामान्यनागरिक
अनेक विमान अपघात झाले आहेत आता पर्यंत. आणि ब्लॅक बॉक्स पण मिळालेले आहेत. पण दोन चार महिन्यानंतर त्याचा अहवाल प्रसिद्ध झाल्याचे कधी पाहिले नाही.
युट्युब वर अनेक व्व्हि्डीओ आहेत पण त्यांना अधीकृत अहवाल म्हणता येणार नाही. सत्याची बेमालुम सरमिसळ करुन ते बनवलेले असतात. सगळं काही खरं असेलच असे नाही. तसेच ते खोटं आहे असंही म्हणता येणार नाही.
काही अपघातांनंतर तर ब्लॅक बॉक्स शोधण्यासाठी भयंकर कष्ट घेतलेल्याच्या बातम्या वाचल्या. पण नंतर पुढे काही अहवाल बघीतले नाहीत.
कदाचित एयरलाईन्स च्या व्यवसाया वर परिणाम होईल म्हणून ते कधी प्रसिद्ध करत नसतील.
काहीही असलं तरी हा मुद्दा विचारात घ्यायला हवा. एखादी वेबसाईट आहे का जिथे सगळे अधीकृतअहवाल बघु शकतो ?
4 Feb 2023 - 4:16 pm | गवि
खूप तपशीलवार उपलब्ध असतात.
उदा.
भारतासाठी DGCA accident investigation reports
https://www.dgca.gov.in/digigov-portal/?dynamicPage=AccidentReports/5000...
अमेरिका किंवा अमेरिकन विमान ज्यात आहे अशा अपघातांबद्दल
NTSB official website
https://www.ntsb.gov/Pages/AviationQuery.aspx
7 Feb 2023 - 12:28 am | गवि
Flight data recorder चा प्राथमिक रिपोर्ट आला आहे. त्यानुसार बेस लेगमध्ये (लँडिंग सर्किटचा फायनल वळण घेण्यापूर्वीचा लेग किंवा सेगमेंट) असतानाच दोन्ही प्रॉपेलर पूर्ण फीदर्ड मोडमध्ये गेले. वर सांगितल्याप्रमाणे फीदर्ड अवस्थेत पंखे (पाती) असतात तेव्हा ती कोणतीही पॉवर निर्माण करू शकत नाहीत. समोरून येणाऱ्या हवेशी समांतर कोनात राहतात. संदर्भ: लेखातील फोटो
याचाच अर्थ काहीतरी तांत्रिक बिघाड असू शकतो. पायलट खुद्द अशा नाजूक वेळी स्वहस्ते प्रोपेलर फीदर करून टाकेल असे वाटतं नाही. मुद्दाम फीदर करणं फक्त एकाच केसमध्ये केलं जातं ती म्हणजे दोन्ही इंजिनांत आग लागून किंवा अन्य कारणाने ती बंद पडल्याचे लक्षात येणे. मग फीदर करून हवेचा अवरोध (ड्रॅग) कमी केला जातो, जेणेकरून इंजिन पॉवरच्या अनुपस्थितीत विमान तरंगत तरंगत (ग्लायडिंग करत) जास्तीत जास्त अंतरापर्यंत नेता यावं. दोन्ही इंजिन्स एकदम बंद पडणे अगदी दुर्मिळ. कोणते तरी एक इंजिन बंद पडले असेल पण डिटेक्ट व्हायला वेळ लागला असेल तर नेमका दोष कुठे आहे ते शोधेपर्यंत दोन्ही पंखे फीदर केले जाऊ शकतात.
अधिक माहिती येईल. वाट पाहणे आले.
7 Feb 2023 - 10:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गवीशेठ, धाग्यावर आपले प्रतिसाद वाचतोय. नवनवीन येणारी माहिती रोचक असते. माहिती देत राहा. लिहिते राहा. धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
7 Feb 2023 - 11:30 am | गवि
_/\_
8 Feb 2023 - 3:26 pm | आनंद
हे जरा विचित्र वाटतय , इंजिन पॉवर निर्माण करत नाहित हे लक्षात आल्यावर पायलट कडुन काही प्रतिक्रिया यावयास हव्या होत्या, "मे डे " तरी डिक्लेयर करायला हवा होता पण तसे काहिच दिसत नाही.
24 Feb 2023 - 8:52 pm | बोका
अपघाताचा प्राथमिक अहवाल आला आहे.
अंजू डाव्या सीट वर बसून विमान चालवत होती (पायलट फ्लाईंग ). तीचा प्रशिक्षक उजव्या सीटवर होता (पायलट मॉनीटरींग). ७२१ फुटांवर असताना पायलट फ्लाईंग ने फ्लॅप्स ३० मागीतले. पायलट मॉनीटरींग "फ्लॅप्स ३० अॅन्ड डिसेंडींग" म्हणाला. पण प्रत्यक्षात फ्लॅप्स बदलल्या नाहीत आणी दोन्ही प्रॉपेलर पूर्ण फीदर्ड मोडमध्ये गेले.
असा अंदाज आहे की पायलट मॉनीटरींग ने चुकुन फ्लॅप्स ऐवजी प्रोपेलर कंडिशन लिव्हर मागे खेचले असावेत.
खालील चित्रात डावीकडील पांढरा लिव्हर फ्लॅप्स आहे, आणी मधले FTR लिहिलेले प्रोपेलर कंडिशन लिव्हर आहेत.
गवि अधिक लिहितीलच.
24 Feb 2023 - 9:12 pm | गवि
धन्यवाद. तुम्ही अतिशय उत्तम रित्या समजावले आहे. फिदरिंग आणि flap लिव्हर एकाशेजारी असले तरी त्यांना latch आणि unlatch करण्याच्या पद्धती मुद्दाम वेगळ्या ठेवलेल्या असतात. चुकीने असे होऊ नये म्हणून.
पण flight data रेकॉर्डर आणि cockpit voice recorder यांचे events साईड बाय साईड ठेवून बघितले तर तूर्त तरी तुम्ही म्हटले तीच शक्यता चर्चेत आहे. पण तरीही अशी घोडचूक इतके अनुभवी पायलटस करतील याबद्दल चांगलेच तीव्र दुमत आहे सध्या एक्सपर्टस मध्ये.
बघू आणखी काय पुढे येते.
आणखी एक बाब महत्वाची आहे. PM (Pilot monitoring) आणि PF (Pilot flying) या भूमिका बदलत होत्या. आणि क्रॅश पूर्वी काही सेकंद हा रोल अचानक बदलला गेला. म्हणजे जबाबदारी एकदम हस्तांतरित.
25 Feb 2023 - 9:49 am | गवि
आणखी एक दोन तपशील. .. त्यानंतर ( म्हणजे Flaps ३० (केले) असे म्हटल्यानंतर ) एक मिनिटांहून अधिक वेळाने फ्लॅप्स खरोखर खाली केले गेले. म्हणजे घोषणा आणि कृती यात बरेच अंतर होते. लक्षात आल्यावर केले असावे.
दुसरे म्हणजे इंजिन आगोदरच लँडिंगसाठी idle स्पीडवर होते. जरी नंतर जरा adjustment म्हणून थोडी पॉवर वाढवण्याची सूचना pilot in command ने केली असली तरी मुळात इंजिन idle rpm वर होते. अशा वेळी फिदर झाले तरी तसा काही फरक पडला नसता. रनवे अगदी जवळ होता.
27 Feb 2023 - 2:59 pm | योगी९००
https://www.youtube.com/watch?v=wIlO-TBDyaw
वरील व्हीडीओत आधीक माहिती आहे.