/* Global */
body {background-image:url(https://i.postimg.cc/Y06R0KZp/main-bg.png);color:#000;}
/* Typography */
h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0,0.2);} h1 {font-size:30px;} h2 {font-size:24px;}h5{font-size:16px;}
.col-sm-9 p, .col-sm-9 li {font-family: 'Poppins', sans-serif; font-size:15px ! important;}
.samas { text-indent: 16px;}
.first-letter { font-size: 200%; font-weight:700; color: rgba(2,90,93,2); text-shadow: 1px 2px rgb(0,0,0,0.3); text-indent: 16px;}
/* System */
.navbar-fixed-top {background: radial-gradient(ellipse farthest-corner at left top, #FEDB37 0%, #FDB931 8%, #9f7928 30%, #8A6E2F 40%, transparent 80%), radial-gradient(ellipse farthest-corner at right bottom, #FFFFFF 0%, #FFFFAC 8%, #D1B464 25%, #5d4a1f 62.5%, #5d4a1f 100%);margin-bottom:36px;
border-bottom:1px solid #333;border-style: groove;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)}
.row {margin-top: 16px;}
.col-sm-9{text-align:justify;padding:16px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)}
.node header {border-bottom: 1px solid #ff8000;}
.node-info, .node footer{padding:8px;border-left:4px solid #FF5F15;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.16) , 0 2px 4px 0 rgba(0,0,0,.12);}
.node footer ul.links li{border:1px solid rgba(0, 128, 128, .2);background-color:#fff}
.panel-default>.panel-heading{color:#111;background-color:#FEFEFA;border-color:#333;border-bottom-color:#008080;}.panel{background-color:#fff} .region-sidebar-second .block-menu ul.menu > li {
border-bottom: 1px solid rgba(0, 128, 128, .2);}
.jumbotron{display:none} .input-group{display:none!important}
.page-header{
padding-top:16px!important;
text-align:center;border:
background-color: #50C878;
color: #ffffff;
animation-name: mipa;
animation-duration: 8s;
animation-delay: 0s;
animation-timing-function:ease-in-out;
animation-iteration-count: infinite;}
@keyframes mipa {
from {background-color: #0F52BA;}
to {background-color: #FF5F15;}
}
.field-items img{max-width:100%;height:auto;}.author-type-posted,.field-items a:link{color:#004d4d}
.nav > li > a {font-size:16px;} .col-sm-3 a, .panel-body p, .panel-body li {font-size:16px;font-family: 'Noto Sans',sans-serif;}
.navbar-header .logo > img { border-radius: 50%;}
/* bottom borders */
.node header, .nav-tabs, .nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {border-bottom: 1px solid #008080;}
.nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {color: #000;cursor: default;background-color: #fff;border: 1px solid #008080;border-bottom-color: transparent;}
.col-sm-9 a, .col-sm-3 a, .nav > li > a {color: #004d4d;} .nav-tabs {margin-top:48px;}
.mi-image {max-width:100%;height:auto;margin-top:16px;margin-bottom:16px;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19);}
वडिलांना रात्रीच्या गोळ्या देऊन तो कामावर निघाला. वर्षाला सोडून गावी आल्यानंतर दिवस थोडे कठीण गेले होते. आपण वर्षाला समजाविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. ती ऐकायलाच तयार नव्हती, म्हणून नाइलाजाने परिस्थिती स्वीकारली. एक एक दिवस जाता जात नाहीये असे वाटत होते. पण काळ त्याच्या वेगाने जात राहिला.
बाबा पाय घसरून पडल्यानंतर सगळेच बदलले. केव्हा कसली वादळे अंगावर घ्यावी लागतील, कशाचीच खातरी नसते. त्यांच्या मांडीचे हाड मोडले होते. हॉस्पिटलच्या भसाभस खर्चात तुटपुंजी शिल्लक कापरासारखी उडून गेली. रॉड बसवला होता, पण चालता येण्यासारखी सुधारणा झालीच नव्हती. तशी शक्यताही वाटत नव्हती. पैसे असते तर मुंबईसारख्या शहरात चांगले उपचार करता आले असते. बाबांनाही हे कळत असावे. ते गप्प राहू लागले. जगण्याची आसच सोडली असावी, असे त्यांच्याकडे बघून वाटते. आपल्याला त्यांचा भकास चेहरा बघून भडभडून येते, म्हणून आपणही त्यांच्या खोलीत जाण्याचे कमी केले. ते अंथरुणावर खिळून असल्यामुळे दिवसभर कोणीतरी त्यांच्या दिमतीला असणे गरजेचे होते. आपण कामावर असताना शेजारी थोडा वेळ लक्ष द्यायचे. ते तरी सारखे दुसऱ्याकडे कसे जाणार! बाबा घरात एकटेच असतात. आढ्यावरचा एकनएक डाग त्यांच्या ओळखीचा झाला असेल!
पेडल मारत फॅक्टरीच्या दिशेने जाताना त्याच्या मनात विचारांची गर्दी उसळली होती. एकट्याच्या पगारात भागणे दिवसेंदिवस कठीण झाले होते. बाबांकडे बघता येणे शक्य व्हावे म्हणून असलेली नोकरी सोडून जवळच्या एका घरगुती उद्योगात नोकरी घेतली. या छोट्या गावात अशी नोकरी मिळाली हेच मोठे नशीब आहे. पगार कमी असला, तरी मधूनमधून वेळ काढून बाबांकडे बघता येते. मालक ओळखीचा आहे म्हणून! नाहीतर कसे झाले असते? आहे त्या पगारावर सगळे खर्च निभावणार नव्हते.
आपण आणखी एका नोकरीच्या शोधात होतो. गावाबाहेरच्या केबल फॅक्टरी मालकांच्या हातापाया पडून हे रात्रपाळीचे काम मिळवले.
विचार झटकण्यासाठी त्याने मानेला झटका दिला. आभाळाचे मळभ त्याच्या अंगभर पसरले. गावाची हद्द संपत आली. आधी जाणवणारा मानवी गंध कमी कमी होत गेला. गोठ्यांमधल्या शेणामुताचा वास गावाने ठेवून घेतला. त्याची जागा आता शेतांच्या मंद गुबाऱ्याने घेतली. गवताच्या गंजींनी धरून ठेवलेला गुबारा थंड हवेत बाहेर पडून सुखावत होता. नुकतीच कापलेली पिके ढीग करून ठेवली होती. दिवसभर दाणे खाऊन पोट भरलेली पाखरे आता घरट्याच्या उबेत झाकुळली असतील. पेडल मारण्याचे श्रम अधिकच जाणवू लागले. आपल्याच नशीबी अशी वणवण का यावी?
गावात दोन-चारच धनवान कुटुंबे असतील. त्यांच्या तड लागलेल्या पोटाशी गावातले कोणीच स्पर्धा करू शकत नव्हते. जमिनीचे एक-दोन तुकडे असलेले किंवा शेतमजुरी करून जगणारे असेच बहुतांश लोक होते. काही लोक छोट्या दुकानांत किंवा गावाबाहेरच्या फुटकळ फॅक्टऱ्यांमध्ये कामे करायचे. आपलीही कधी छोटीशी जमीन होतीच की! वर्षाने साथ दिली असती, तर इथेच कष्ट करून सगळे एकत्र सुखाने राहिलो असतो. पण तिला मुंबईच्या स्वप्नांनी झपाटले होते. आपल्यालाही वाटले, तिथे काही चांगले जमून येईल.
आज इतक्या वर्षांनीदेखील शेणामुताच्या वासात रात्रीच्या काळोखात पेडल मारतोय! खेळ झालाय आपला.
देवा सरं ना ह्यो भोग कशापायी
हरवली वाट, दिशा अंधारल्या दाही
ववाळुनी उधळतो जीव मायबापा
वनवा असा ह्यो उरी का रे पेटला
खेळ मांडला
खेळ मांडला
गावातून जात असताना घरांनी अडवलेला वारा आता मोकळ्यावर अंगाला झोंबू लागला होता. झाकोळलेल्या आभाळाने ओला केलेला रात्रीचा गारठा हुडहुडी भरवू लागला. त्याने थांबून गळ्यातला मफलर कानाभोवती गुंडाळून घेतला. दोन्ही बाजूंची उघडी शेते रातकिड्यांची कुजबुज ऐकत स्तब्ध पहुडली होती. त्यांना सवयच होती गप्प राहण्याची. आपणही आधी गप्पच राहिलो. बोलण्यातही आणि करण्यातही. नंतर निकराचा प्रयत्न म्हणून आपण पोटासाठी मुंबई गाठली. एका जेमतेम नोकरीशिवाय दुसरे चांगले काही मिळू शकले नाही. शिवाय तिथले धकाधकीचे जीवन. सगळेच कठीण होते. आपण नशीब उघडायला वेळ द्यायला हवा होता. त्याला हसू आले. आपण कोण नशिबाला वेळ देणारे! नशिबाने आपल्याला वेळ द्यायला हवा होता. नशीब आपल्याला चकवा देत राहिले. वडील गावीच राहून जमेल तसे पिकवून पोटापुरते मिळवत होते. पुढे महागाईने कळस गाठला. सलग दोन वर्षे दुष्काळाने धग लावली. कर्जाचा डोंगर उरावर आला. हाय खाऊन आईही गेली. बाबांनी शेत विकून कर्ज फेडले. आपण त्यांना मुंबईला बोलावून घेतले. वर्षाने तरी समजावून घ्यायला हवे होते. तिला आपल्या उरावर बाबांची जबाबदारी नको होती. शेत विकून खाल्ले, म्हणून ती बाबांना दोष देऊ लागली. आई होती तोवर बाबांना कोणाचे ऐकून घ्यावे लागले नव्हते. सगळे जाऊन आश्रिताचे जीणे आले! चाळीतल्या छोट्याशा खोलीत भांड्यांना भांडी लागू लागली. सासरा आणि सुनेच्या सतत कटकटी. यात आपला दोन्ही बाजूंनी बडवलेला ढोल झाला होता. आवाज न काढणारा ढोल. जमीन मुकाट्याने सहन करतेच ना! गुढघा गुढघा पाण्यात गुदमरवा. उन्हात भाजून काढा. कातडी सोलून काढा. आपला आवाजही असाच बंद पडला. लग्नानंतरचा काही काळ किती सुखाचा होता! आपण वर्षाबरोबर रात्ररात्र स्वप्नील गुजगोष्टी करायचो. तो काळ आता स्वप्नवत झाला आहे. कधी आठवू नये अशा स्वप्नांचा.
शेतांमधून जाणारी रुंद पायवाट आता संपत आली होती. डावीकडच्या शेतामधून थोडे पुढे गेले की नेहमीची डांबरी सडक दिसू लागणार. पूर्ण चंद्रप्रकाशात दुरून ती सापासारखी चमकायची. सापासारखीच वळणे घेत ती सडक शेजारच्या गावात जायची. दोन्ही गावांमध्ये झाडीझुडपांनी भरलेला विस्तीर्ण भाग होता. यामधील काही भाग कवडीमोलाने विकत घेऊन कोणीतरी केबल फॅक्टरी सुरू केली होती. फॅक्टरीपासून थोड्या अंतरावरून जाणारा एक हायवे होता. हा फायदा बघून मालकाने अशा आडनीड जागी फॅक्टरी काढली असेल. भरपूर ऑर्डर्स असायच्या, तेव्हा फॅक्टरी रात्रपाळीवरदेखील चालायची. दिवसा कामे करणारे कामगार हायवेला जोडून असलेल्या मोठ्या गावातून यायचे. त्यांच्यासाठी बसची सोय केली होती. रात्रपाळी लागली की मालक आजूबाजूंच्या गावातून कामगार शोधून वेळ निभावून न्यायचा. आपल्याला गरज होती, नेमकी तेव्हाच त्यालाही गरज होती, म्हणून रात्रपाळीत काम मिळाले. आज आपल्याला गरज आहे तरी चंद्राचा प्रकाश नाही. झाकोळल्या आभाळाने चंद्र चोरून नेला आहे. चंद्रदेखील स्वत:च्या मर्जीचा मालक नाही!
शेत पार केल्यावर समोर छोटा रस्ता दिसू लागला. थोडा वेळ आरामात सायकल दामटता येणार! रस्ता संपल्यावर पायवाट! फॅक्टरीच्या मार्गावरचा हा भाग कधी येऊच नव्हे असे वाटते. झुडपांमधील पायवाटांनी रात्री जाणे जिवावर येते. चंद्रप्रकाश नसेल तेव्हा आपण अगदी पेडल पेडल मोजत पुढे जातो. श्वास मोजण्याची आपल्याला सवय झालीच आहे म्हणा! आठवत होते तेव्हापासून नेहमी मोजतच आलोय. पगाराला किती दिवस राहिले, कर्जाचे किती हप्ते राहिले, वर्षाला मुंबईला सोडून किती दिवस झालेत.. मोजत रहा. त्याने गळ्याशी आलेला आवंढा गिळला. रस्ता सोडून सायकल मुकाट्याने माळरानात घातली. आता तरी आभाळ चंद्राला चघळून तृप्त झाले असेल म्हणून तो मोठ्या आशेने चंद्र शोधू लागला. हावरट आभाळ अजूनही गालात चंद्र कोंबून बसले होते. तो मरणाच्या अनिच्छेने पेडल मोजू लागला.
फॅक्टरीपर्यंतचा रस्ता तसं तर नेहमी डोळ्यासमोर येत असलेला. माळरानात शिरल्यावर झुडपांमधून पायवाटेने सायकल दामटीत दहा-पंधरा मिनिटे वाट काढली की डावीकडे एक ओढा लागणार. पाऊस जास्त झाला तेव्हाच त्यामध्ये पाणी असायचे. कोणीतरी त्यात मोठे दगड आणि लाकडी फळ्या टाकून ठेवल्या होत्या. सायकल हातात धरून ओढा पार करायचा. पुढे बाभळीचे रान होते. काटेकुटे चुकवीत जमेल तशी सायकल पुढे न्यायची. थोड्या वेळाने एक पडीक ओसरीसारखे काहीतरी दिसते. पूर्वी कदाचित गुराखी तिथे भाकरी खायला थांबत असावेत. तिथून दोन पायवाटा जातात. एक उजवीकडे. तिकडे बिनकाटेरी झाडीझुडपे होती. दुसरी वाट डावीकडे तिरकी जाणारी. ती ओरबाडणाऱ्या काटेरी झाडाझुडपांनी वेढलेली होती. त्यातून काटे चुकवीत जात रहायचे. बरेच पुढे गेल्यावर फॅक्टरी दिसायला लागते. आरीच्या दात्यांसारखे त्रिकोणी छत दिसायला लागले की पायात जोम यायचा. मामुली गोष्टीदेखील काही वेळा मूल्यवान भासतात!
पाठ असलेला रस्ता मनात घोळत तो जात होता. चंद्राने अजूनही कृपा केली नव्हती. समोर ओसरी दिसली, तेव्हा त्याने आपसूकच पेडल मारणे थांबवले. अंधुक उजेडात तो ओसरीकडे बघणे टाळायचा. त्याची नजर डावीकडील नेहमीच्या काटेरी वाटेकडे गेली. क्षणभर त्याला काही उमजेना. समोर परिचित दृश्य नव्हतेच. बाबा मुंबईला आल्यावर लग्नानंतरची वर्षा अचानक बदलली. आधी प्रेम करणारी व्यक्ती आपला द्वेष करू लागते. असे काय होते की माणूस आमूलाग्र बदलतो? इथे रोज दिसणारे झुडपी वाटेचे चित्र आज कुठे विरले? चित्रकार कुंचल्याच्या फटक्याने क्षणात चित्र होत्याचे नव्हते करतो. आयुष्य क्षणभंगुर आहे म्हणतात. हसत खेळत असलेला माणूस क्षणात आडवा होऊन पडतो.
पण आज हे काही वेगळेच आहे. झुडपांमध्ये वाट असायला हवी होती. तिथे झुडपांचे रान माजले होते. हे स्वप्न तर नसेल? छे! मी आहे, माझी सायकल आहे. हे स्वप्न नक्कीच नाही. कदाचित कोणी झुडपे कापून तिथेच टाकून दिली असावीत. त्याने सायकल स्टँडवर लावली आणि जवळ जाऊन अंदाज घेतला. सायकल आत नेण्यासारखी जागा कुठेच दिसली नाही. कोण जाणे, पुढे ती वाट मोकळी असेल! उजव्या बाजूची वाट मात्र जशीच्या तशी होती. तिकडे तो कधी गेला नव्हता. काय करावे? गोंधळून थोडा वेळ उभा राहिला. आशेने चंद्राकडे पाहिले. करडे कांबळे टाकून त्याने फिकट पांढऱ्या रंगाची झिरझिरीत शाल पांघरली होती. त्यातून ठिबकणारा धूसर प्रकाश ओसरीला गूढ रंगात भिजवत होता. अंगात वरपासून खालपर्यंत एक अनामिक भीती वाहत गेली. सायकलची सुरक्षित सीट सोडून झुडपांजवळ उभे राहणे त्याला धोक्याचे वाटले. तेवढ्यात झुडपांची गर्दी काहीतरी कुजबुजली. रातकिडे असतील का? की आणखी काही?
त्याने भराभरा पावले टाकीत सायकल हस्तगत केली. काहीही विचार न करता उजवीकडे जाणारी वाट पकडून जाऊ लागला. झुडपांमध्ये कसला आवाज आला असेल? लांबडा तर नसेल? आजी रात्रीच्या वेळी ‘साप’ हे नाव घ्यायचे नाही. आज आठवण आली, तेव्हा आपण लांबडा न म्हटता सापच म्हटले! तशाही स्थितीत त्याला हसू आले. सापाचे नाव घेतले तर त्याचा अपमान होतो म्हणे! तो कसाही असला तरी अपमान करायचा नाही. वर्षा कशीही वागली तरी आपण तिला सोडून यायला नको होते! तिचा अपमान झाला असेल का? मग बाबांचे काय? तिने त्यांचा मान ठेवला का? ही वाट पुढे कुठे जाते कोणास ठाऊक. खरं तर वाट जिथल्या तिथेच असते. आपणच मागेपुढे जात राहतो. आपण पुढे कधी गेलोच नाही. उमेदीने मुंबईला गेलो तेव्हा आयुष्य मार्गाला लागल्यासारखे वाटले. कसला चकवा लागला कोण जाणे! तेव्हापासून मागे मागेच जात आहोत. ही वाट तरी फॅक्टरीपर्यंत घेऊन जाईल का? जाईल. थोडे पुढे गेल्यावर कदाचित ओसरीला वळसा घालणारी एखादी वाट दिसेल, जिथून फॅक्टरीच्या वाटेवर जाता येईल.
बाबा जेव्हा मुंबईला आपल्याबरोबर राहायला आले, तेव्हा सुरुवातीला चांगले चाललेले जीवन हळूहळू बदलत गेले. वर्षाला त्यांची अडचण होऊ लागली. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत ती खेकटी काढू लागली. आपण खूप प्रयत्न केले. शेवटी निर्णय घ्यायची वेळ आलीच. बाबांना एकट्याला गावी पाठवून द्यायचे आणि आपण वर्षाबरोबर राहायचे. किंवा वर्षाला सोडून गावी बाबांबरोबर राहायचे. त्या दोन वाटांपैकी वर्षाबरोबर राहायची वाट सुखकर असू शकेल. मुंबईत पुढेमागे चांगले कामसुद्धा मिळाले असते. लाखोंची पोशिंदी आहे ती! गावाकडे रोजच्या जेवणाची मारामार. दिवसेंदिवस क्षीण होऊ लागलेल्या बाबांना घेऊन गावी राहणे. हे सगळे कसे जमेल? त्या वेळी बाबांबरोबर राहणे म्हणजे काटेरी वाट असा विचारही मनात आला नसेल. काटेरी झुडपे नसलेल्या वाटेवरून पेडल मारताना का हे सगळे आठवते आहे? माणूस शक्यतेचा विचार करतोच ना!
बाबांना एकटे गावी पाठवून वर्षाबरोबरच राहण्याच्या शक्यतेचा विचार आपल्या मनात आलाच नव्हता? आज इतक्या वर्षांनी आठवतानादेखील त्याची लाज वाटत आहे. काय केले असते एकट्या बाबांनी? ते पडल्यावर उपचार, देखभाल करण्यास आपण वेळेवर मदत करू शकलो. कोणी केले असते हे? तरी आज काटेरी झुडपांना घाबरून आपण सोपी वाट का धरली? वर्षाला सोडल्याचा आपल्याला पश्चात्ताप होतोय का? ही वाट कुठे जात आहे हे आपल्याला माहीत नसूनदेखील आपण बिनधास्त इकडे आलो. वर्षाबरोबरच राहिलो असतो तर आज कुठे पोहोचलो असतो?
किती वेळ झालाय? घड्याळाकडे बघूनही त्याला थोडा वेळ काहीच उमगेना. त्याने वर पाहिले. सगळी काजळी झटकून चंद्र पूर्ण प्रकाशाने चमकत होता. पूर्ण प्रकाशात चंद्राचे गारुड एकाच वेळी विलोभनीय आणि भीतिदायक वाटू शकते! चंद्राचा पूर्णगोल एका बाजूने घासून टाकल्यासारखा चपटला होता. रात्री-बेरात्री फॅक्टरीत केबलच्या जड चक्री ढकलून आपले तळहात असेच घासले गेले आहेत. आपण आलोय तरी कुठे? तो एकदम भानावर आला. कुठेच ओळखीची चिन्हे दिसत नव्हती. नक्की वाट चुकली. पुन्हा मागे फिरावे का? अरेच्चा! हा कुठला ओढा पुढे दिसतोय? मघा ओलांडलेल्या ओढ्यासारखाच वाटतोय. पण तो ओलांडून तर आपण बरेच पुढे आलो होतो! यातही लाकडे, दगड विखुरले आहेत. ओलांडून पुढे जावे का? कदाचित घरी तरी पोहोचू आपण. पण हे काय! आपण जर विरुद्ध बाजूने ओढ्याकडे येत असू, तर काठावरचे वठलेले झाड डाव्या बाजूला हवे. ते उजव्या बाजूला आहे, म्हणजे ओढ्यापलीकडे फॅक्टरीचा रस्ता असेल. मग मागे फिरलो तर घराकडे जाणार का? पण हे कसे शक्य आहे?
पुढे गेल्यावर अचानक मागच्या ठिकाणी येणे शक्य असते, तर आज वर्षाबरोबर लग्न झाले त्या सुखी काळात पुन्हा जाता आले असते! किती मस्त होता तो काळ! आईबाबा मजेत होते. आपण सातव्या स्वर्गात होतो! मरो ती फॅक्टरी! मागे फिरून सरळ घरी जावे का?
किती वाजले असतील? त्याला घड्याळात बघायचीसुद्धा भीती वाटू लागली. रात्री-अपरात्री एकदम बाबांचा क्षीण आवाज येतो. ‘किती वाजले रे?’ आपण कधी घड्याळात बघून उत्तर देतो. कधी बघण्याची तसदी न घेता, उत्तर दिल्यासारखे काहीतरी पुटपुटतो. उत्तराचा आवाज आला नाही तरी त्यांना त्याचे काहीच नसते. ते सतत ‘किती वाजले’ हेच विचारतात. दुसरी काहीच मागणी नाही. कधीतरी ’भूक लागली’ म्हणावे, कधीतरी ‘माझ्यापाशी बसशील का रे थोडा वेळ?’ विनवावे. कशासाठी पाहिजे असते किती वाजले ते? किती वाजले असले की काय करणार होते ते? त्यांच्यासाठी साती वार चोवीस तास एकच वेळ असते ना? पडून राहण्याची वेळ. आपण तरी काय वेगळे करतो आहोत? त्यांच्याबरोबर आपणही इथे खितपत पडून आहोत ना! मुंबईला राहिलो असतो, तर एखादा छोटा धंदा केला असता. पावभाजीची गाडीसुद्धा हजारो रुपये कमावते! इथे टाचा घासत पडून आहोत. बाबा पलंगावर आणि आपण पेडलवर टाचा घासतोय!
त्याला एकदम जाणवले की पेडल नुसतेच फिरतेय, सायकल हळू झालीय. चेन पडल्याचे लक्षात कसे आले नाही आपल्या! सायकल थांबत आली आहे. आयुष्य थांबत आलेले आपल्या कधीच लक्षात आले नाही! दोन्ही वाटा फॅक्टरीकडेच जात असतील का? ती नेहमीची काट्यातली. ही उलटसुलट, अनोळख्यासारखे वणवण फिरवून नेणारी. चकवा असलेली. दोन्ही वाटा ‘फॅक्टरीकडे जा’ सांगत आहेत! फॅक्टरी म्हणजे मुंबई! लाखोंच्या भाग्याची फॅक्टरी. इथली फॅक्टरी केबलच्या जडशीळ चक्री ढकलायला लावून घाम काढणारी. तिथली फॅक्टरी नवीन शिकण्याचे साधन. नवी आव्हाने. बाबांच्या उपचाराची शक्यता. आपण दटून मुंबईलाच एकत्र राहायला हवे होते. चुकले का आपले? चकवा आत्ता नाही, तेव्हाच लागला होता. त्या वेळी आपण रागाने, लोभाने, प्रेमाची भूल देऊन कसेही वर्षाला समजवायलाच हवे होते. आजची चांदभूल नेमके काय सांगत असावी?
मागे वळून फॅक्टरीकडे जावे का? त्याने खाली उतरून अंदाज घेतला. चंद्र वरुन अजूनही त्याच्याकडे एकटक पाहत होता. नेहमीसारखाच मुक्याने. तो हेच सांगत असेल का? चंद्राचा स्वच्छ प्रकाश अचानक त्याच्या डोक्यात आतवर झिरपला! पौर्णिमेच्या रात्री फॅक्टरीकडे जाताना चंद्र नेहमी डावीकडे असतो. त्याने गुडघ्यावर बसून चेन व्यवस्थित लावली. काळी झालेली बोटे बुडावर पुसली. स्वच्छ हाताने सायकल सावरत चंद्राला डावीकडे घेऊन त्याने फॅक्टरीच्या दिशेने सायकल दामटली.
चांदभूल त्याच्याकडे बघून मंद हसत होती. तो भूल पांघरून शीळ वाजवत सायकल चालवू लागला. शिफ्टवर पोहोचायला वेळ होईल याची भीती उरली नव्हती. त्याच्याकडे आजतरी वेळच वेळ होता.
अरुण मनोहर arunmanohar13@gmail.com
प्रतिक्रिया
5 Nov 2022 - 8:50 pm | Bhakti
अगदी Abstract कथा आहे.चंद्राच्या साथीने एक एक भूलं रंगवली!
11 Nov 2022 - 4:57 pm | टर्मीनेटर
+१ असेच म्हणतो, कथा आवडली 👍
7 Nov 2022 - 8:53 am | चांदणे संदीप
सुरेख लेखन, उत्तम कथा.
सं - दी - प
7 Nov 2022 - 8:12 pm | कर्नलतपस्वी
मन गरगरते आवर्त
मन रानभूल, मन चकवा......
7 Nov 2022 - 9:13 pm | मुक्त विहारि
आश्रीत सासर्याचे दूःख ऐकलेले आहे, त्यामुळे मनाला भिडली ...
11 Nov 2022 - 6:31 pm | पॉइंट ब्लँक
छान जमली आहे. अनेक समांतर गोष्टींची सांगड मस्त घातली आहे
15 Nov 2022 - 9:39 am | सुखी
मस्त कथा... आवडली
16 Nov 2022 - 3:47 pm | श्वेता२४
कथेची मांडणी वेगळ्या पद्धतीची आहे. आवडली. माणसाच्या मनातले विचार असेच असतात. छान रंगवलीय.
16 Nov 2022 - 5:01 pm | श्वेता व्यास
कथा आवडली, सगळे वर्णन सचित्र डोळ्यासमोर उभे राहिले.
17 Nov 2022 - 7:34 pm | सस्नेह
अतिशय सशक्त मांडणीची सुंदर कथा.
3 Dec 2022 - 9:05 am | ज्ञानोबाचे पैजार
फारच मस्त गोष्ट
वाचताक्षणीच आवडलेली
पैजारबुवा,