/* Global */
body {background-image:url(https://i.postimg.cc/Y06R0KZp/main-bg.png);color:#000;}
/* Typography */
h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0,0.2);} h1 {font-size:30px;} h2 {font-size:24px;}h5{font-size:16px;}
.col-sm-9 p, .col-sm-9 li {font-family: 'Poppins', sans-serif; font-size:15px ! important;}
.samas { text-indent: 16px;}
.first-letter { font-size: 200%; font-weight:700; color: rgba(2,90,93,2); text-shadow: 1px 2px rgb(0,0,0,0.3); text-indent: 16px;}
/* System */
.navbar-fixed-top {background: radial-gradient(ellipse farthest-corner at left top, #FEDB37 0%, #FDB931 8%, #9f7928 30%, #8A6E2F 40%, transparent 80%), radial-gradient(ellipse farthest-corner at right bottom, #FFFFFF 0%, #FFFFAC 8%, #D1B464 25%, #5d4a1f 62.5%, #5d4a1f 100%);margin-bottom:36px;
border-bottom:1px solid #333;border-style: groove;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)}
.row {margin-top: 16px;}
.col-sm-9{text-align:justify;padding:16px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)}
.node header {border-bottom: 1px solid #ff8000;}
.node-info, .node footer{padding:8px;border-left:4px solid #FF5F15;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.16) , 0 2px 4px 0 rgba(0,0,0,.12);}
.node footer ul.links li{border:1px solid rgba(0, 128, 128, .2);background-color:#fff}
.panel-default>.panel-heading{color:#111;background-color:#FEFEFA;border-color:#333;border-bottom-color:#008080;}.panel{background-color:#fff} .region-sidebar-second .block-menu ul.menu > li {
border-bottom: 1px solid rgba(0, 128, 128, .2);}
.jumbotron{display:none} .input-group{display:none!important}
.page-header{
padding-top:16px!important;
text-align:center;border:
background-color: #50C878;
color: #ffffff;
animation-name: mipa;
animation-duration: 8s;
animation-delay: 0s;
animation-timing-function:ease-in-out;
animation-iteration-count: infinite;}
@keyframes mipa {
from {background-color: #0F52BA;}
to {background-color: #FF5F15;}
}
.field-items img{max-width:100%;height:auto;}.author-type-posted,.field-items a:link{color:#004d4d}
.nav > li > a {font-size:16px;} .col-sm-3 a, .panel-body p, .panel-body li {font-size:16px;font-family: 'Noto Sans',sans-serif;}
.navbar-header .logo > img { border-radius: 50%;}
/* bottom borders */
.node header, .nav-tabs, .nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {border-bottom: 1px solid #008080;}
.nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {color: #000;cursor: default;background-color: #fff;border: 1px solid #008080;border-bottom-color: transparent;}
.col-sm-9 a, .col-sm-3 a, .nav > li > a {color: #004d4d;} .nav-tabs {margin-top:48px;}
.mi-image {max-width:100%;height:auto;margin-top:16px;margin-bottom:16px;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19);}
अरे, ब्रेक दाब, ब्रेऽऽक. हँडल जवळ ना ऽऽही. उजव्या पायाखाली आहे ब्रेक. पाय दाब. अंगावर घालशील माझ्या. बस्स. थांबव आता". गजाभाऊ ओरडताच, दिनकररावांनी ब्रेकवर जोरात पाय दिला अन स्कूटर गचकन थांबली.
बीडच्या पोलीस परेड मैदानावर दिनकरराव वकील स्कूटर शिकत होते. गजाभाऊ शिकवणी देत होता. दोघे लहानपणापासूनचे
मित्र. एकत्रच शिकले. वकिलीही एकाच वेळेस सुरू केली. गजाभाऊ घरचा श्रीमंत होता. वकिली सुरू करताच, वडिलांनी त्याला स्कूटर घेऊन दिली होती. कोर्टात ती एकमेव स्कूटर होती. दिनकरराव मात्र सायकल रिक्षाने कोर्टात येत. नंतर त्यांनी सायकल वापरणे सुरू केले. मागील एक-दोन वर्षांत दिनकररावांचा वकिलीत जम बसला होता. पैसाही बर्यापैकी मिळत होता. अशात कोर्टासमोर आणखी तीनचार वकीलांच्या स्कूटर उभ्या राहू लागल्या. तेव्हा आपणही स्कूटर विकत घ्यावी, असा विचार त्यांच्या मनात आला. तो त्यांनी गजाभाऊजवळ बोलून दाखवला. तो तर खूप दिवसापासून स्कूटर घे म्हणून मागे लागला होता. एकदम खूश झाला. स्कूटर शिकवायची जबाबदारी त्याने घेतली. त्याची स्कूटर होतीच. शिकवणीसाठी दूर जायची गरज नव्हती. पोलीस परेड मैदान कोर्टाजवळ होते.
शाळांमधे तिमाही परीक्षा सुरू होत्या. त्यामुळे मैदानात मुलांची गर्दी नसे. सकाळी पोलीस परेड झाली की दुपारी मैदान रिकामे असे. म्हणून ही वेळ त्यांनी मुद्दाम निवडली होती. दुपारी आपापले काळे कोट बार रूममधे ठेवून कोर्टातून दोघे शिकवणीसाठी मैदानात येत. पहिल्या
दिवशी गजाभाऊ मागे बसला तोवर ठीक चालले होते. पण मैदानाला तीन-चार चकरा मारल्यावर तो खाली उतरला व स्कूटर पूर्णपणे दिनकररावच्या ताब्यात दिली. तेव्हा गडबड झाली. सुरू करण्यासाठी किक मारली अन स्कूटर कलंडली. दिनकररावहि पडले. हातापायाला खरचटले. नशीब, स्कूटरला काही झाले नाही. कधी ब्रेक दाबायच्याऐवजी वेग वाढे, तर कधी वेग वाढवण्याऐवजी ब्रेकवर पाय पडे आणि सुरू होताच स्कूटर बंद पडे. एकदा तर स्कूटर सरळ समोरून येणार्या सायकलवाल्याच्या अंगावरच जात होती. पण त्याने सफाईने कट मारला व शिव्या देत निघून गेला. दोन वेळा मैदानात चरणार्या म्हशी स्कूटरसमोर आल्या. एकदा भटके कुत्रे मागे लागले. अशा वेळी स्कूटरचा नाद सोडून द्यायचा विचार त्यांच्या मनात येई. पण गजाभाऊ हिम्मत देई आणि पायउतार झालेले दिनकरराव परत स्कूटरवर सवार होत. अशा किरकोळ गोष्टी सोडल्या, तर एकंदरीत शिकवणी व्यवस्थित पार पडली.
शिकवणीनंतर 'गुरुदक्षिणा'म्हणून, कोर्टाच्या कँटीनमध्ये ते रोज गजाभाऊला आवडीची 'मलाईशक्कर',
कांदाभजी, चहा व नंतर 'एकसोबीस तीनसो सुपारी कम 'वाले पान द्यायचे. 'भाऊजी, यांना कोर्टात ती मलाईशक्कर अन ते चारशे वीस का काय ते पान अजिबात खाऊ देऊ नका. दोन्ही चांगलं नसतं म्हणे. " गजाभाऊच्या बायकोने दिलेल्या 'वैधानिक' इशार्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत त्यांनी शिकवणीचे ऋण फेडले.
गजाभाऊच्या आवडीच्या अमिताभचा नवा सिनेमा 'डॉन' लवकरच गावात लागणार होता. अमिताभ दिनकररावना फारसा आवडत नव्हता. ते राजेश खन्ना फॅन होते. पण स्कूटर शिकवण्याच्या बदल्यात त्याला'डॉन' दाखवायचे त्यांनी ठरवले होते. शाळा-कॉलेज संपले, तरी सिनेमाची आवड कायम होती. जुन्या सवयी थोड्याच जातात?
पाच-सहा दिवस नेटाने सराव केल्यावर दिनकररावांना स्कूटर चालवणे हळूहळू जमू लागले. आत्मविश्वास वाढला. मग एके दिवशी
गजाभाऊला घेऊन ते स्कूटरच्या शोरूममध्ये गेले. गावाबाहेर नुकतेच'स्कूटर सेल अँड सर्व्हिसचे' दुकान सुरू झाले होते. दुकानमालक गजाभाऊच्या ओळखीचा होता. त्याच्या मध्यस्थीने व्यवहार झाला. स्कूटरच्या दहा हजारापैकी निम्मी रक्कम नगदी द्यायची व उरलेली हप्त्याने फेडायची होती. दुकानासमोर दोन-तीन नव्या स्कूटर ठेवलेल्या होत्या. त्यातलीच एखादी आज घेऊन जावी अन घरी
सगळ्याना आश्चर्यचकित करावे, अशी त्यांची इच्छा होती.
"त्या आधीच विकलेल्या आहेत. तुमची स्कूटर यायला पंधरा दिवस लागतील. उद्या निम्मे पैसे अॅडवान्स द्या, मग ऑर्डर बुक होईल. "मालकाने हसत सांगून त्यांचा मनोभंग केला. 'हम क्या इतने वो है क्या? भरोसा नही क्या?' वगैरे त्याला सुनवावे, असे त्यांच्या मनात आले. पण गजाभाऊने "सध्या पितृपक्ष चालू आहे. आता खरेदी करत नाहीत. दसर्याच्या मुहूर्तावर घरी घेऊन जाऊ' असे म्हटल्यावर ते शांत झाले. हे पितृपक्षाचे आपल्या लक्षात कसे आले नाही, याचे त्यांना आश्चर्य वाटले.
लवकरच मालकीची स्कूटर येणार म्हणून खूश झालेले दिनकरराव घरी परतले तेच 'मेरे सपनो की रानी कब आयेगी तू ' गुणगुणत.
त्यांच्यापुढे चहाचा कप पुढे करता करता " आता आणखी कोणती रानी यायचीय?" मालतीवहिनींनी संशयाने विचारले.
खरे तर त्यांना बायकोची फिरकी घ्यायची होती, पण केव्हा एकदा ही बातमी सांगतोय असेही झाले होते. त्यामुळे आधी ठरवूनही, " अगं, स्कूटर घेतलीय आपण!" त्यांनी सरळ सांगून टाकले. "काय? स्कूटर? हे काय नवीन खुळ? कशाला पाहिजे स्कूटर अन फिटर? अन या वयात जमणारय का तुम्हाला? नसती बला नको आपल्या घरात. सांगून ठेवते. " मालतीवहिनी जोरात सुरू झाल्या. ' दिवाळीला सोन्याच्या बांगड्या करा',म्हणून अनेक दिवस त्या मागे लागल्या होत्या. पण पैशाची तंगी आहे असे सांगून दिनकररावांनी त्यांची मागणी धुडकावली होती. तो खरा राग होता. आता गजाभाऊच्या हस्तक्षेपाशिवाय स्कूटरचे गाडे पुढे सरकणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले व त्यांनी सुज्ञपणे ठीक आहे, पाहू या म्हणत मौन स्वीकारले.
आईबाबांचे संभाषण ऐकताच, बाजूला अभ्यासाचे नाटक करत बसलेल्या, इयत्ता पाचवीतल्या चिरंजीव सचिन उर्फ पिंट्याचे कान उभे
राहिले. बाबा स्कूटर घेणार हे ऐकल्यावर हातातले पुस्तक बाजूला फेकून तो ताडकन उभा राहिला. बाबा नक्की काय घेणार आहेत, हे
त्याने नीट ऐकले नव्हते. पण काहीतरी महत्त्वाची, महागडी वस्तू आपल्या घरात येणार एवढे त्याला नक्की कळले. ही महत्त्वाची बातमी इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने बाहेर धूम ठोकली. ''अरे, थांब, कुठे चाललास?'' हे आईचे वचन कानावर पडण्याआधीच '' बाबांनी घेतली बाबांनी घेतली " असे ओरडत तो गायब झाला. तो अर्धवट घोष ऐकून, वरवर भले, सज्जन दिसणारे वकीलसाहेब'त्यातले'आहेत की काय असा ऐकणार्यांचा गैरसमज होण्याची मोठी शक्यता होती. पण कुणीतरी सुबुद्धपणे 'काय?' असे विचारल्यावर त्याने मोठ्ठा श्वास घेत 'इसकुटर' असे सागितले, तेव्हा खुलासा झाला. गल्लीतल्या त्या भल्यामोठ्या वाड्यातल्या दहा-बारा घरांपैकी वडिलोपार्जित मिळकतीत, आपापल्या हिश्श्यास आलेल्या दोन किंवा तीन खोल्यांमध्ये आपापले संसार थाटून राहणारी पाच-सहा कुटुंबे दिनकररावच्या भावकीतलेच होते. बहुतेक घरातली कर्ती मंडळी जेमतेम दहावीच्या भोज्जा शिवलेले व नगरपालिका, तहसील, लँड रेकॉर्ड, फारतर बँक अशा ठिकाणी 'थर्ड किंवा फोर्थ क्लास नॉन गॅझेटेड ऑफिसर' या गटात मोडणारे होते. दिनकरराव मात्र डब्बल ग्रॅज्युएटव स्वतंत्र व्यवसाय करणारे! शिवाय उत्पन्नही चांगले. त्यामुळे शेजार्यांमध्ये भावकीबरोबर येणारी 'भाऊबंदकी'ही होती. ते स्कूटर घेताहेत ऐकून बर्याच जणांना नाही म्हटले तरी दुःख झाले. तरीही, अनेकांनी मानभावीपणे त्यांच्या घरी जाऊन ,'अरे वा! छान! आपल्या घराण्यातली पहिली स्कूटर आहे. अभिनंदन! सध्या चहावर भागवू. पण स्कूटर आल्यावर पार्टी पाहिजे, बरं का!' अशी चापलुशी केली. दिनकररावनीहि ' हो हो ' म्हणत, तोंडी आश्वासनावरच त्यांची बोळवण केली.
दुसर्याच दिवशी दिनकररावच्या सांगण्यावरून गजाभाऊ त्यांच्या घरी आला आणि स्कूटरविषयी मालतीवहिनीचे मतपरिवर्तन करायची मोहीम यशस्वी केली. त्यासाठी त्याला फार काही करावे लागले नाही. फक्त त्यांना आपल्या 'ह्यांच्या'बरोबर स्कूटरवर मागे बसून फिरायची स्वप्ने दाखवली, बस्स!
आता पहिल्यांदा स्कूटरवरून जाताना कुठली साडी नेसायची हा प्रश्न त्यांना सतावू लागला. मागच्या दिवाळीला घेतलेली? वन्सच्या लग्नातली? की दादाकडे परभणीला गेलो होतो, तेव्हा त्याने घेतलेली? निर्णय होईना. त्यांनी दिनकररावलाच विचारले.
,''जुन्या कशाला? नवीच घेऊ या की!" स्कूटरच्या नादात, एका गाफील क्षणी आपण काय बोलून गेलो हे त्यांच्या नंतर लक्षात आले. पण आता माघार शक्य नव्हती. दिला शब्द पाळणे भाग होते. समाधान एवढेच की त्यामुळे बांगड्याचा विषय तूर्तास तरी मागे पडला होता.
स्वभावाने मोकळ्या असलेल्या मालतीवहिनी, गल्लीतल्या महिलावर्गात वकीलीनबाई म्हणून प्रसिद्ध होत्या आणि ते मात्र वकीलसाहेबऐवजी ,'वकीलीनबाईचा नवरा' म्हणून ओळखले जात. आधी स्कूटरचा 'स्कू'ही तोंडातून न काढणार्या मालतीवहिनी आता गल्लीतल्या बायकांत स्कूटरविषयी भरभरून बोलू लागल्या. वकीलीनबाईच्या नवर्याची स्कूटर आल्यावर वकीलीनबाईचा थाट आहे, अशी गोड गोड चेष्टा ऐकून त्यापण मोहरून बिहरून जाऊ लागल्या.
असे दिवस जात होते. दिनकररावनी ठरल्याप्रमाणे स्कूटरचे पैसे देऊन वायदा पूर्ण केला. नवरात्र संपले. दसरा उजाडला. दिवाळी आली अन गेली. अजूनही स्कूटरची प्रतीक्षाच होती.
अधूनमधून दिनकरराव स्कूटरच्या शोरूमला जाऊन चौकशी करत होते. नित्य नवनवी कारणे सांगून मालक त्यांना परत पाठवत होता. ते वैतागत होते. चिडत होते. पण करणार काय? अर्धे पैसे देऊन बसले होते. येईल तेव्हा बघू म्हणून दिनकरराव शांत बसले.
इतके दिवस झाले तरी बहुचर्चित स्कूटर आली नाही, तेव्हा वाड्यातल्या लोकांना रिकामपणा घालवायला छान विषय मिळाला. प्रत्येकाने वेगवेगळे मत नोंदवले. चर्चा झडू लागल्या. शेवटी 'स्कूटर बिटर काही नाही, उगीच आपली पुडी सोडलीय ', यावर सर्वांचे एकमत झाले. काही दिवसानी त्या चर्चाही बंद झाल्या.
आणि एके दिवशी, ध्यानीमनी नसताना, दुकानातल्या नोकराने कोर्टात येऊन दिनकररावांना स्कूटर आल्याची बातमी दिली. 'आनंद
मनी मावेना' अशा अवस्थेत हातातली कामे बाजूला ठेवून गजाभाऊला घेऊन ते स्कूटरच्या शोरूमला गेले. आवश्यक सोपस्कार पूर्ण करून स्कूटर ताब्यात घेतली. नवी कोरी स्कूटर स्वतः चालवत घरी न्यायचे धाडस त्यांना होईना. गजाभाऊने अनेकदा समजावले. पण
उपयोग झाला नाही. हाताने धरून ढकलत नेतो म्हणाले. ते बरे दिसले नसते, म्हणून गजाभाऊने ''फक्त आजचा दिवस मी चालवतो, उद्यापासून तू आणि तुझी स्कूटर" म्हणत स्कूटर सुरू केली. दिनकरराव मागे बसले. अशा रितीने एकदाचे स्कूटरचे
आगमन झाले. घरी आनंदीआनंद झाला. स्कूटर आलेली कळताच वाड्यातली, गल्लीतली मंडळी जमा झाली.
मालतीवहिनींनी स्वागत म्हणून स्कूटरच्या चाकावर पाणी ओतले. पुढच्या भागावर ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढले. हळदीकुंकू, फूल
वाहिले. उदबत्ती लावली. नारळ वाढवला. निरांजनाने ओवाळले. अशा पद्धतीने पूजा झाली. नैवेद्यासाठी आणलेले पेढे आणि
उपस्थितांची संख्या पाहून, एकाचे चार करून चतकोर चतकोर पेढ्यानेच तोंड गोड केले गेले. एवढ्याश्या पेढ्याने अनेकांच्या तोंडाची
चव मात्र गेली.
जमलेल्यांपैकी काहींनी, कळत नसूनही स्कूटरची बारकाईने पाहाणी करत, 'खोट ' शोधायचा अयशस्वी प्रयत्न केला. दिनकरराव वेगळ्याच धुंदीत होते. उद्यापासून स्कूटरवरून कोर्टात जायच्या कल्पनेने भीती व आनंद दोन्ही एकाच वेळेस मनात दाटले
होते. आता एखादी चक्कर मारल्यास तेवढाच सराव होईल, असे गजाभाऊने सुचवले. पण संध्याकाळ होऊन गेली होती. त्यामुळे ते
तयार झाले नाहीत.
सगळे निघून गेल्यावर दिनकरराव स्कूटर चालवायचा मनोमन सराव करू लागले. आधी बाहेर काढून स्टँडवर लावायची. डाव्या हाताने क्लच दाबायचे, पहिला गियर टाकायचा आणि उजव्या हाताने एक्सलेटर दाबायचे. मग पायाने किक मारून स्टार्ट करायची. जेवताना व अंथरुणावर पडल्यावरही, हातापायाच्या हालचाली करत काल्पनिक सराव सुरू होता. ते पाहून मालतीवहिनी व पिंट्याची मस्त करमणूक झाली.
दुसर्या दिवशी सकाळी पिंट्याच्या मदतीने दिनकररावांनी स्कूटर घरासमोर आणून लावली. कोर्टात जाण्यासाठी कोट घालून तयार झाल्यावर, पुन्हा एकदा स्कूटर सुरू करायच्या प्रक्रियेची मनोमन उजळणी केली. देवाला नमस्कार करून ते स्कूटरजवळ गेले व सराईताप्रमाणे क्लच, गियर, एक्सलेटर हाताळत किक मारायला सुरुवात केली. स्कूटर पहिल्याच झटक्यात सुरू व्हायला पाहिजे होती. पण वारंवार किक मारूनही स्कूटर सुरूच होत नव्हती. वेगवेगळ्या प्रकारे पाय मारून पाहिले. ती वाकडी करून पाहिली. पण स्कूटर आपली थंडच! दहापंधरा मिनिटे झटापट केल्यावर ते घामाघूम झाले. शेवटी अंगावरचा कोट काढला. बॅड काढला. पँटीत खोचलेला शर्टही बाहेर काढला. शर्टाच्या गुंड्याही सोडल्या. किकवर किक मारत राहीले, तरी उपयोग होईना!
हळूहळू या लाथाळीची बातमी आजूबाजूस पसरली. लोक 'गम्मत' पाहायला जमले. नवीन आणलेली स्कूटर सुरूच होत नाही हे कळल्यावर तर बरेच एकदम खूश झाले. उगीच काहीबाही सल्ले देऊ लागले. दिनकररावचा चुलतभाऊ विश्वाभरच्या मेव्हण्याच्या औरंगाबादच्या साडूकडे स्कूटर होती. तो तिकडे गेला तेव्हा एकदा त्या साडूने त्याला स्कूटरवरून बसस्टँडवर सोडले होते. दुसरा चुलत चुलत भाऊ अशोकच्या बँकेत दोन वर्षापूर्वी जे मॅनेजर होते, त्यांच्या स्कूटरवर एकदा तो त्यांच्या घरी त्यांचे सामान पोहोचवायला गेला होता. त्यामुळे त्या दोघांना स्कूटरवर मागे बसायचा अनुभव होता. पण सुरू कशी करायची हे माहीत नव्ह्ते. तरीही त्यांनी काही उपाय सुचवले. किक मारायलाही मदत केली. काही वेळात ते थकले. मग नवनवे भिडू येऊन स्कूटरला किक मारू लागले. 'धक्का मारला तर सुरू होईल गाडी,' असा सल्ला कुणीतरी दिला. तोही अमलात आणला. पण काही उपयोग झाला नाही.
'पेट्रोल आहे का गाडीत ते पाहा ',असे कुणीतरी म्हणाले.
''कालच येताना टाकी फुल्ल केली होती, तीनचार किलोमीटर तर चालली. पेट्रोल कसे संपेल?"असे दिनकरराव म्हणताच, हल्ली पेट्रोल पंपवाले कसे बदमाश झालेत, पेट्रोलमध्ये पाणी मिसळतात, मापात मारतात असेही सांगण्यात आले. दिनकररावनी घाबरून टाकीचे झाकण उघडून पाहिले, तर टाकीत भरपूर पेट्रोल दिसले. तेव्हा स्कूटर सुरू न होण्याचे कारण काय असावे, याची अनेक कारणे समोर येऊ लागली. चर्चा सुरु झाली, पण स्कूटर सुरू व्हायला तिचा उपयोग नव्हता.
दिनकररावचे चुलत चुलते हणमंतराव आपल्या दारातून ही गम्मत पाहत होते. नक्की काय प्रकार झालाय ते जाणून घ्यायच्या इच्छेने त्यांनी गर्दीत उभ्या असलेल्या रमेशला बोलावले. ती 'मज्जा' सोडून जायला तो तयार नव्हता. पण हणमंतरावचे वय, नाते लक्षात घेऊन काहीशा अनिच्छेनेच तो त्यांच्याकडे गेला. त्याच्याकडून हकीकत ऐकताच हणमंतरावनी त्याला धरून घरात नेले. कपाटातून पंचांग काढून पाहिले. हाताच्या बोटांवर काही आकडेमोड केली. नंतर मनाशी काही पुटपुटले. त्यांच्या चेहर्यावर उत्तर मिळाल्याचे समाधान दिसले. ''हं असे आहे तर!'' रमेशकडे पाहात ते म्हणाले. त्याच्या चेहर्यावरचे प्रश्नचिन्ह पाहून मग त्यांनीच खुलासा केला. 'दिन्याने' स्कूटर बुक केली पितृपक्षात. काल घरी आणली तेव्हा ' व्यतिपात होता. दोन्ही
अशुभकाळ, म्हणून ही भानगड झालीय. " वडीलधार्या लोकाना विचारायचे नाही. सगळा पोरासोरी कारभार. आता भोगा आपल्या कर्माची फळं!"' असे त्यांनी म्हणताच रमेशने संमतीदर्शक मान हलवली. आता त्यांचे यापुढचे पुराण काय असेल हे त्याच्या लक्षात आले. ते ऐकण्यापेक्षा स्कूटरची मजा पाहण्यात त्याला जास्त इंटरेस्ट होता. तो लगेच बाहेर पळाला.
स्कूटरखरेदीत फसवणूक झाली असे दिनकररावनाच नाही, तर जवळपास सगळ्यांनाच वाटू लागले. उपस्थित महिला वर्गापैकी काहींना वकिलीनबाईच्या नवर्याची फजिती पाहून,'बरी जिरली ,फार ऐट दाखवीत होती', या भावनेने मनात गुदगुल्या होत होत्या. मालतीवहिनीला एकंदरीत परिस्थितीचा अंदाज आला आणि त्या हळूच घरात सटकल्या. दिनकररावला तर इथून पळून जावे असे वाटत होते. पण काय करणार? तसेच कमरेवर हात ठेवून स्कूटरकडे पाहत उभे राहिले. गजाभाऊचे घर दूर होते. या वेळेस त्याला बोलावणार कसे? स्कूटरची शोरूम तीन-चार किलोमीटर अंतरावर. जवळपास गॅरेजही नाही. काय करावे सुचेना.
"कोपर्यावरच्या गिरणीवाल्याला बोलवा, त्याच्याकडे छिन्नी हातोडा आहे", एकाने सुचवले. " तो काय करणार? स्कूटर तोडायचीय का छिन्नी हातोड्याने?" आणखी एकाने ती सूचना फेटाळून लावली.
''अरे, त्या बाबूराव मेकॅनिकलला बोलवा की!'अशोक म्हणाला. "मेकॅनिकल नाही, मेकॅनिक आहे बाबूराव तारे, आणि इलेक्ट्रिकल कामे करतो तो! त्याला काय कळतंय स्कूटरमधलं?" त्याची चूक दुरुस्त करत रमेश म्हणाला.
" इलेक्ट्रिक मोटारीची पण कामं करतो. स्कूटरमध्ये पण मोटारच असते म्हणे!बोलावून पाहायला काय हरकत आहे? काय हो वकीलसाहेब?"-अशोक.
गल्लीसमोरच्या रस्त्यावर 'आमच्या इथे इलेक्ट्रिकल पंखे, शेगड्या, इस्तरी, मोटारीची दुरुस्ती, रीवायंडिंगची सर्व कामे किफायतशीर दरात करून मिळतील - प्रो. बाबूराव वारे' अशी पाटी असलेले 'तारे इलेक्ट्रिक सरवीस' नावाचे दुकान काही महिन्यापूर्वी सुरू झाले होते. त्या जाड भिंगाचा चश्मा लावणार्या, कळकट कपडे घालणार्या व कळकट दिसणार्या प्रो. बाबूराव वारे नामे इसमास स्कूटरमधले काही कळत असेल का, याविषयी दिनकरराव साशंक होते. पण प्राप्त परिस्थितीत त्याला बोलवून तर पाहावे, असे त्यांनाही वाटले. त्यांची संमती आहे हे दिसताच कुणीतरी पळत बाबूरावच्या दुकानात गेला. तो रिकामाच बसला होता. पण कुणीतरी आलंय हे दिसताच हातोडा घेऊन एका मशीनवर उगीच ठाकठोक सुरू केली. वकीलसाहेबांची स्कूटर सुरू होत नाही, हे कळल्यावर तो विचारात पडला. स्कूटर दुरुस्तीचे काम त्याने कधी केले नव्हते. 'पण दिवसातलं पहिलंच काम आलंय, नाही कशाला म्हणा?' असा विचार त्याने केला. मेणचटलेल्या बनियनवर तुलनेने कमी मेणचट असलेला सदरा चढवला. हातोडा, स्क्रू ड्रायव्हर, पाना आदी साहित्य घेतले. दुकानाला कडी घातली व निरोप्यासोबत तो निघाला. भोवतीची गर्दी बाजूला सारून तो स्कूटरजवळ गेला व चारी बाजूने बारकाईने पाहाणी केली. मग डोळ्यावरचा चश्मा वर केला. पुन्हा एकदा तशीच पाहाणी केली. थोडा विचार केला. हातोड्याने थोडी ठाकठोक केली. नव्या कोऱ्या स्कूटरला हातोड्याने ठोकल्याने दिनकररावच्या हृदयाचे ठोके वाढले. "काही
जमतंय का?" त्यांनी अधीरतेने विचारले.
"खोलता आली गाडी तर फाल्ट कळंल, असं मुश्कील आहे "असे म्हणत, पाना व स्क्रू ड्रायव्हरने तो स्कूटरचा पत्रा चाचपू लागला.
एकंदरीत हालचालीवरून त्याला काही कळत नसावे, हे दिनकररावच्या लक्षात आले.
''राहू द्या,आम्ही बघतो", याच्या प्रयोगात स्कूटर आणखी खराब होईल असे वाटून दिनकररावनी त्याला थांबवले.
आपण दुकान सोडून आलो, तपासणी केली त्याचा मोबदला मिळावा या अपेक्षेत बाबूराव रेंगाळला व पुटपुटत त्याने मागणीही केली. पण आधीच परेशान असलेले दिनकररावनी त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले.
थोड्या वेळाने काही मिळणार नाही हे त्याच्या लक्षात आले. 'निष्कारण धंदा बुडवून आलो 'असे काही बडबडत तो परत गेला.
सगळ्या प्रकारात एक तासाहून जास्त वेळ गेला. तेच तेच पाहून, आधी येणारी मजा आता संपली होती. लोक कंटाळले होते. नोकरदार
लोक निघून गेले. दिनकररावना कोर्टात काम नव्हते. पण होणारा उशीर आणि पहिल्याच दिवशी स्कूटरचे हे 'असे ' झाल्याने ते वैतागले होते. त्यात त्यांचे अंगही दुखू लागले. डॉक्टरांकडे जावे लागते की काय?'डॉक्टर'! डॉक्टरचा विचार मनात येताच त्यांना देशपांडे डॉक्टरच्या दवाखान्यासमोर नेहमी उभी असणारी स्कूटर आठवली आणि त्यावरून हिंडणारा कंपाउंडर अण्णा आठवला. 'अण्णा! अण्णाला बोलवा. " ते स्वतःशीच पुटपुटले. अण्णा हरफन मौला होता आणि चांगल्या ओळखीचा. नेहमी कामाला
पडणारा, स्कूटरची नक्कीच माहिती असणार त्याला. ' इतका वेळ आपल्याला का सुचले नाही?', त्यांना आश्चर्य वाटले. लगेच गल्लीतल्या एका पोराला पाठवून त्यांनी अण्णाला' असेल तसे यायला ' सांगितले. दवाखाना लांब नव्हता. बाबूरावच्या दुकानाचे पलीकडे, हमरस्त्यावर. या वेळेस वकीलसाहेबांनी एवढ्या तातडीने बोलावणे आल्यावर, अण्णाने आपले काम साहाय्यकावर सोपवले. डॉक्टरांची परवानगी घेतली व तडक दिनकररावचे घर गाठले. ते बाहेरच उभे होते. तो दिसताच त्यांनी उत्तेजित स्वरात नवी स्कूटर सुरू होत नाही हे सांगितले.
" गाडी तर नवीच आहे. सुरू करा बरं " स्कूटरजवळ जात अण्णा म्हणाला. दिनकररावानी किक मारली. पण पुन्हा तेच. "बघ हे असंय" निराश होत ते म्हणाले.
"वकीलसाहेब, किल्ली कुठंय स्कूटरची?" त्याने विचारले. "किल्ली? ही काय !" दिनकररावनी खिशात हात घालून किल्ली काढली व दाखवली. "आणा इकडं", म्हणत त्याने किल्ली घेतली व स्कूटरला लावली अन किक मारली. झटक्यात स्कूटर सुरू झाली.
"कमालच आहे. तुझा पाय लागला की कशी पटकन सुरू झाली?" दिनकररावानी आनंदानेआणि आश्चर्याने विचारले.
"वकीलसाहेब, कमाल माझी नाही, तुमची आहे. किल्ली न लावताच किका मारत बसले तुम्ही. अशी तर जिंदगीभर सुरू झाली
नसती. ही घ्या किल्ली अन ही घ्या स्कूटर, निघा आता कोर्टात " अण्णा हसत म्हणाला आणि आला तसा निघून गेला. दिनकरराव मात्र तोड वासून तिथेच उभे राहिले एकदा स्कूटरकडे, एकदा किल्लीकडे पाहात!
* नीलकंठ वसंतराव देशमुख
प्रतिक्रिया
5 Nov 2022 - 11:39 pm | सौंदाळा
अंदाज आला होताच.
भारी किस्सा. ८७ साली वडिलांनी बजाज कब घेतली होती ते दिवस आठवले.
8 Nov 2022 - 9:43 am | नीलकंठ देशमुख
धन्यवाद प्रतिसादाबद्दल
6 Nov 2022 - 4:01 pm | चौथा कोनाडा
... तर अशा प्रकारे शेवटी स्कूटर राजी झाली!
ओल्ड स्कूल खुसखुशीत कथा, आवडली.
8 Nov 2022 - 9:48 am | नीलकंठ देशमुख
धन्यवाद.अभिप्राय वाचून आनंद झाला. ओल्ड इज गोल्ड..असे आपले आपणच म्हणायचे.
7 Nov 2022 - 6:22 pm | कर्नलतपस्वी
खुसखुशीत,
नवरे सगळे गाढव.
पहिली चार चाकी,बायकोचा वाढदिवस, मी चालवणार म्हणून हट्ट.
ब्रेक च्या जागी अॅक्सिलेटर, एक सायकलवाला धडकला(बायकोचे म्हणणे) सायकलस्वाराच्या आयुष्याचा दोरखंड मजबूत होता.
तेव्हांपासून क्लिनर सीटवर बसून आमच्या श्रीमती गाडी चालवतात.
😀,😐
8 Nov 2022 - 9:46 am | नीलकंठ देशमुख
धन्यवाद. छान वाटले. अभिप्राय वाचून.
7 Nov 2022 - 7:31 pm | मुक्त विहारि
आवडला
8 Nov 2022 - 9:46 am | नीलकंठ देशमुख
प्रतिसाद वाचून छान वाटले.
7 Nov 2022 - 9:54 pm | सरिता बांदेकर
व्हेस्पाचे,चेतकचे बरेच किस्से ऐकले होते.
पण किल्ली न लावता किक् मारण्याचा किस्सा कधी ऐकला नव्हता.
छान खुलवला आहे किस्सा.
8 Nov 2022 - 9:44 am | नीलकंठ देशमुख
आवडले हे वाचून आनंद झाला.धन्यवाद.
8 Nov 2022 - 9:45 am | नीलकंठ देशमुख
आवडले हे वाचून आनंद झाला.धन्यवाद.
8 Nov 2022 - 7:58 pm | एकनाथ जाधव
छान खुसखशीत
9 Nov 2022 - 5:48 pm | नीलकंठ देशमुख
प्रतिसाद वाचून आनंद झाला.
8 Nov 2022 - 11:02 pm | सुखी
खुसखुशीत लेख
9 Nov 2022 - 5:49 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद प्रतिसादाबद्दल
9 Nov 2022 - 3:20 am | पॉल पॉट
मस्त लेख. वातावरण निर्मीतीही छान.
9 Nov 2022 - 5:49 pm | नीलकंठ देशमुख
कथा आवडली हे कळल्यावर छान वाटले.
9 Nov 2022 - 9:55 pm | आलो आलो
वाचता वाचता केंव्हा वाड्याबाहेर जमा झालेल्या गर्दीचा भाग होऊन स्कुटरची आणि दिनकररावांची मज्जा बघायला लागलो कळलेच नाही.
मस्तच
10 Nov 2022 - 7:43 am | नीलकंठ देशमुख
एकदम मस्त प्रतिक्रिया..माझी सकाळ छान सुरु झाली .दिवसही छान जाणार!धन्यवाद.
12 Nov 2022 - 11:37 pm | योगी९००
एकदम सुरेख विनोदी लिखाण. काही प्रसंग तर जसे घडतात तसे त्यात आपणही आहोत असे या लिखाणामुळे वाटले. फार हसलो.
आमच्याकडे प्रिया स्कूटर होती. तिची आठवण या निमित्ताने झाली.
स्वभावाने मोकळ्या असलेल्या मालतीवहिनी, गल्लीतल्या महिलावर्गात वकीलीनबाई म्हणून प्रसिद्ध होत्या आणि ते मात्र वकीलसाहेबऐवजी ,'वकीलीनबाईचा नवरा' म्हणून ओळखले जात.
या वाक्याला डोळ्यात पाणी येईपर्यंत हसलो.
17 Nov 2022 - 1:49 pm | नीलकंठ देशमुख
खूप छान प्रतिसाद दिला.लिखाण एवढे आवडले हे कळवले. धन्यवाद.
13 Nov 2022 - 3:37 pm | तुषार काळभोर
माझी अशीच एक चित्तरकथा आहे :D
२००६. डिसेंबरमधील थंड रात्र.
आमच्याकडे सीडी१०० होती.
एक मित्र तेव्हा नळस्टॉपला परिस्टंट मध्ये होता. एके शुक्रवारी रात्री आम्ही पिक्चर बघायचा ठरवला. प्लॅन असा होता की मी बसने गणेशखिंड रस्त्यावरील ईस्क्वेअरला यावं आणि तो नळस्टॉपवरून तिकडे येणार. रात्री पिक्चर संपल्यावर आम्ही दोघे त्याच्या मोटारसायकलवर हडपसरला येणार.
नेमक्या त्या दिवशी माझा मावसभाऊ त्याची नवीकोरी पल्सर आमच्या घरी ठेवून मित्रांसोबत ट्रिपला गेला होता. पहिल्यांदाच १०० सीसी पेक्षा जास्त ताकदीची गाडी घरी मिळाल्याने मी उगाचच दोनतीन फेऱ्या मारल्या. गाडी प्रचंड शक्तिशाली होती. ती गाडी दारात उभी करून बसने जाणे काही मला पटेना! मी ती गाडी घेऊन गेलो. यथासांग चित्रपट पार पडला. निघायला रात्रीचे साडेबारा वाजले होते. चित्रपटाची नशा डोक्यात होतीच. दोघांकडे पल्सर आणि CBZ अशा गाड्या! आम्ही गाड्या पळवायला सुरुवात केली. जाताजाता एकमेकांना हॉर्न देणे, मागच्याने हाय बीम, लो बीम करून दाखवणे असं व्यवस्थित चालू होतं. मध्ये एम्प्रेस गार्डनजवळ एकदा गाडीने क्षणभर बंद पडल्यासारखा आवाज केला. मला पेट्रोल ची शंका आली, पण पेट्रोल मीटर अर्ध्यापेक्षा जरा कमी टाकी भरल्याचे सांगत होता. विचार डोक्यातून काढून टाकला आणि पुन्हा आमचा खेळ सुरू झाला.
किर्लोस्कर रामटेकडी पुलावर आलो आणि बरोब्बर वर असताना गाडी बंद झाली! सुमारे एक वाजलेला. मित्र पुढे गेलेला. पुढच्या सिग्नलला वळसा घेऊन मागे गेला. पुलाच्या मागच्या टोकाला जाऊन पुन्हा वळसा घालून माझ्यापर्यंत आला. स्टार्टरबटण दाबून दाबून गाडीच चालू होईना. पेट्रोल मीटर पेट्रोल दाखवत होता. टाकीला कान लावून गाडी हलवून पाहिली. भरपूर पेट्रोल हिंदकळल्याचा आवाज आला. काही बेसिक गोष्टी तपासल्या. इंजिनच्या अवतीभोवती सगळ्या नळ्या जिथल्या तिथे होत्या. चावी चालू बंद केल्यावर हॉर्न, हेडलाईट चालू होत होत्या. म्हणजे चावी व्यवस्थित होती. पेट्रोल होतं.
मग किका मारायला सुरुवात केली. डिसेंबरमधील थंडीच्या रात्री घाम येईपर्यंत मी किका मारल्या. मित्राने चार पाच वेळा किक मारून प्रयत्न केला. शेवटी मी एक प्रयत्न करताना टाचेचा वरचा भाग मागच्या फूटरेस्टच्या लोखंडाला घासला. मेंदूत एक जीवघेणी कळ गेली आणि प्रयत्न करणं थांबवलं. एव्हाना दोन वाजत आले होते. मित्राचं म्हणणं होतं गाडी पुलाच्या उतारावरून जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत न्यावी. रस्त्याच्या कडेला लावून घरी जावं आणि सकाळी येऊन पाहावं काय करायचं ते.
एकतर दुसऱ्याची गाडी. नवीकोरी. मी रस्त्यावर लावायला नकार दिला. गाडी साधारण शंकर मठापर्यंत गेली. मग तिथून हळूहळू ढकलत घरी पोहचलो. अधून मधून मी गाडीवर बसून मित्राने मागून सायलेंसरला पाय लावून ढकलायचा अयशस्वी प्रयत्न केला. अडीचला मला घरी पोचवून मित्र त्याच्या घरी गेला. घरी काही सांगितलं नाही.
दुसऱ्यादिवशी मावसभावाला फोन केला. त्याला घाबरत घाबरत हे सगळं सांगितलं. तो म्हणाला काळजी करू नको, मी कोणाला तरी पाठवतो. त्याचा एक चुलतभाऊ आमच्या जवळ शाळेत शिक्षक होता. तो घरी आला. गाडीवर बसला, चावी लावून स्टार्टर बटण दाबले...
आणि गाडी चालू झाली!
मी त्याच्याकडे पाहिले.
त्याने माझ्याकडे पाहिले.
मी गाडीकडे पाहिले.
त्याला टाचेची जखम दाखवली. रात्री किती कष्ट घेतले त्याचा पाढा वाचून दाखवला. त्याला आश्चर्य वाटलं.
गाडी चालू झाल्यामुळे आम्ही निवांत झालो. चहा घेता घेता त्याला अचानक काहीतरी आठवलं, तो मला घेऊन गाडीजवळ गेला. गाडीच्या उजव्या मुठीजवळील एक बटण दाखवून मला विचारलं की या बटणाला काही केलं होतं का? आणि मला साक्षात्कार झाला!! रात्री पिक्चरच्या नशेत मी मित्राला ओव्हरटेक करण्यासाठी ते 'NOS' बटण दाबलं होतं!!
14 Nov 2022 - 4:15 pm | टर्मीनेटर
भारी किस्सा! नव्याने पल्सर हाताळणाऱ्यांच्या बाबतीत असा प्रकार बहुतेकवेळा घडत असे 😀 😀 😀
16 Nov 2022 - 10:19 am | सौंदाळा
भारीच किस्सा
किक मारताना घोटा आपटायचे प्रसंग बर्याचदा आले आहेत.
17 Nov 2022 - 1:51 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद. तुमचा किस्सा रोचक आहे.नशा पिक्चर ची होती हे नंतर लक्षात आले.
14 Nov 2022 - 4:12 pm | टर्मीनेटर
धमाल कथा! मजा आली वाचायला 😀 👍
17 Nov 2022 - 1:53 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद प्रतिसादाबद्दल. छान वाटले.
15 Nov 2022 - 11:27 am | अथांग आकाश
हहपुवा :)
झकास विनोदी गोष्ट!!!
17 Nov 2022 - 1:53 pm | नीलकंठ देशमुख
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद
16 Nov 2022 - 1:26 pm | राजेंद्र मेहेंदळे
मस्त कथा! शंकर पाटलांच्या ग्रामीण कथांची आठवण झाली. नवीन स्कूटर किवा गाडी घेतल्यावर पहिल्याने अशा गंमती जंमती होतातच नाही का?
17 Nov 2022 - 1:54 pm | श्वेता व्यास
छान विनोदी कथा. नर्मविनोद आवडले.
आधी पेट्रोल नसेल वाटलं, पण ते होतं म्हटल्यावर चावीचीच शंका आली होती.
17 Nov 2022 - 1:56 pm | नीलकंठ देशमुख
प्रतिसाद वाचून आनंद झाला.धन्यवाद.
17 Nov 2022 - 1:55 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद प्रतिसादाबद्दल. शंकर पाटलांच्या कथेची आठवण आली हे वाचून तर धन्य झालो.