मराठी प्रतिशब्द / प्रतिवाक्प्रचार / प्रतिवाक्संप्रदाय / प्रतिवाक्यांश ?

Trump's picture
Trump in काथ्याकूट
2 Oct 2022 - 2:54 pm
गाभा: 

मराठी प्रतिशब्द / प्रतिवाक्प्रचार / प्रतिवाक्संप्रदाय / प्रतिवाक्यांश ?

बरेचदा परदेशी लोकांशी गप्पा मारताना भाषेचा विषय निघतो. मग तुमच्या भाषेतील प्रतिशब्द कोणते किंवा वाक्यरचना कोणती असा प्रश्न विचारला जातो. कितीही मराठी भाषेचा अभिमान असला तरी ज्ञान अपुरे पडते आणि कशीबशी वेळ मारुन न्यावी लागते.

--
मद्य, बीयर, कोणतेही पेय जेव्हा उंचावले जाते, तेव्हा 'चीयर्स'(cheers) हे इंग्रजी भाषेतील शब्द वापरला जातो. त्याला मराठी प्रतिशब्द कोणता?
--
हल्ली वाढदिवसाचे स्तोम बरेच वाढले आहे. मग तो साजरा करताना इंग्रजी वाढदिवसाचे गाणे म्हटले जाते. त्याला मराठी प्रतिगाणे कोणते आहे?

--
जेवणाचा आस्वाद घेण्याच्या वेळी फ्रेंचमध्ये 'बोन अपेटीट' (bon appetit) असे म्हटले जाते. त्याला मराठी 'वदनी कवळ घेता..' असे प्रतिवाक्यरचना माहिती आहे. पण ते म्हणताना बराच वेळ लागेल आणि जेवणाची वेळ संपुन जाईल. असे छोटेशी सहज म्हणता येणारी प्रतिवाक्यरचना काय होईल?
--
निरोप घेताना बाय (bye) अगदी सहजपणे म्हटले जाते. त्याला मराठीत बरेचदा टाटा म्हणुन पर्याय दिला आहे. त्यापेक्षा चांगला पर्याय आहे का?
==================================================
ह्या धाग्यामध्ये मराठी प्रतिशब्दावर उत्तम चर्चा व्हावी आणि इतरांना कोणतेही मराठी प्रतिशब्द हवे असतील तर तसे लिहावे अशी अपेक्षा. धन्यवाद.

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

2 Oct 2022 - 3:01 pm | श्रीगुरुजी

वर लिहिलेल्या सर्व कृती मूळ भारतीय नाहीत. त्यामुळे अश्या कृतींसाठी मराठी भाषेत शब्द तयार झालेले नव्हते.

श्री गुरुजी, वरील गोष्टी जरी भारतीय संस्कृतीमध्ये नसल्या तरी त्या बर्‍याच प्रमाणात भारतीय समाजात प्रचलित आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये नव्हत्या समजुन त्यांना प्रतिशब्द शोधणे टाळणे चुकीचे वाटते.

धर्मराजमुटके's picture

2 Oct 2022 - 3:15 pm | धर्मराजमुटके

वाढदिवसासाठी मराठी नाही पण हे संस्कृत गाणे चालेल काय ?

धन्यवाद. गाणे छान आहे. इंग्रजी गाण्याचे थोडेसे भाषांतर केल्यासारखे वाटत आहे.

जेवण संपल्यावरचे आपल्याकडे आहे>>
अन्नदाता सुखी भव !
..
Bye>>अच्छा, पुन्हा भेटू (च)

चौथा कोनाडा's picture

2 Oct 2022 - 5:51 pm | चौथा कोनाडा

मस्त रोचक धागा !
विविध इंग्रजी शब्दांना मराठी पर्याय वाचायला/ सांगायला आवडतील !

चीयर्स = चांगभले !

रामदास फुटाणे त्यांच्या कार्यक्रमात , मैफिलीत चीयर्स म्हणजे मराठीत चांगभले असं सांगत धमाल उडवून देत असत, ..
... तेव्हा पासुन आम्ही नेहमी चांगभले करतो !

Trump's picture

2 Oct 2022 - 9:03 pm | Trump

धन्यवाद.
चीयर्स = चांगभले !
चांगभले हा शब्द माहिती होता पण ह्या अर्थाने वापरला गेल्याचे आताच माहिती झाले. धन्यवाद.

तुषार काळभोर's picture

3 Oct 2022 - 8:19 am | तुषार काळभोर

चियर्ससाठी डोक्यात चांगभले हाच शब्द आला होता. फक्त मी तो पहिल्यांदा "रंग्या रंगीला रे" नाटकात ऐकला होता.

वामन देशमुख's picture

2 Oct 2022 - 8:41 pm | वामन देशमुख

लेखातील प्रश्नांची उत्तरे आत्ताच देऊ शकणार नाही. पण मीच प्रश्न विचारतो!

इंग्लिश - How are you?
हिंदी - कैसे हैं आप?

हे म्हणणे जितके साहजिक / स्वाभाविक वाटते तितके -

मराठी - काय चाललंय? काय म्हणता?

हे (किमान मला तरी) वाटत नाही.

१. मिपाकरांना काय वाटते?
२. वरीलसाठी मराठीत अजून काही पर्याय आहेत का?

तुषार काळभोर's picture

3 Oct 2022 - 11:26 am | तुषार काळभोर

आमच्याकडे कुणाकडे पाहुणे म्हणून गेल्यावर साधारण संवाद असा असतो:

नमस्कार!
नमस्कार! लै/बर्‍याच दिवसांनी (आलात्/दिसलात)?
..
...
बाकी?
निवांत!

त्रयस्थ ठिकाणी हाय, हॅलो, हाउ आर यु? असे शिष्टाचार साधारणपणे मराठीत नाहीतच.
उदा. मोबाइल दुरुस्ती केंद्रात संवाद साधारण असा असतो...

गुड मॉर्निंग सर्/मॅडम. काय प्रॉब्लेम आहे?
माझा मोबाइल बिघडलाय. (गुड मॉर्निंग, हाय हॅलो काही नाही. थेट मुद्द्याचं बोलायचं!)

अवांतर : (बहुधा रविंद्र जैन यांचं) एक भजन ऐकलं होतं वीसेक वर्षांपुर्वी. हाय हॅल्लो छोडिये, जय माता दी बोलिये!

चौथा कोनाडा's picture

3 Oct 2022 - 6:06 pm | चौथा कोनाडा

...... हाय हॅल्लो छोडिये, जय माता दी बोलिये!.....
हॅलो च्या ऐवजी वंदे मातरम् म्हणा ही टूम निघालीच आहे सध्या.
अश्या टूम वेळोवेळी निघतच असतात !
फार काही प्रतिसाद मिळेल असं वाटत नाही!

ओळखितले एक जण फोन वर " श्रीराम, श्रीराम, अंबज्ञ" असं म्हणत असतात, आम्ही जय श्रीराम वर ठाम असतो !

प्रत्येक संस्कृतीत काही भिन्न चालीरिती असतात त्याप्रमाणे शब्द वापरले जातात व प्रचलित होतात.

जेवणाचा आस्वाद घेण्याच्या वेळी फ्रेंचमध्ये 'बोन अपेटीट' (bon appetit) असे म्हटले जाते

बघा ना इथे तुम्ही फ्रेंच वाकप्रचाराचा दाखला दिला आहे. म्हणजेच या करिता इंग्लिशमध्येही शब्द / वाकप्रचार नाही. असो. चालायचेच. उगाच भाषेबद्दल उणेपणा /न्यूनगंड वाटून घ्यायचे कारण नाही.

हल्ली वाढदिवसाचे स्तोम बरेच वाढले आहे. मग तो साजरा करताना इंग्रजी वाढदिवसाचे गाणे म्हटले जाते. त्याला मराठी प्रतिगाणे कोणते आहे?

इथेही वरचेच तत्व दोन प्रकारे लागू होते
एक तर वाढदिवस साजरा होणे हा प्रकार नव्हता.
दूसरे असे की Happy Birthday to You हे गाणे (विकीनुसार) १८९३ सालचे आहे. त्या काळातले वाढदिवसाचे गाणे तर सोडा पण कोणतेही मराठी गाणे (भक्तीगीत नसलेले) आपणास ज्ञात आहे का ? मला वाटते पुर्वीच्या काळात गायन ,वादन ई कला या एकतर सामान्यापर्यंत फारशा पोहोचल्या नसाव्यात. राजे, सरदार यांच्य दरबारी गायक / वादक मंडळी असतील पण त्यांचे संगीत हे प्रामुख्याने रागदारीवर आधारित शास्त्रीय संगीत असावे. सामान्यांपर्यंत पोहोचलेले संगीत म्हणजे विविधप्रकारचे लोकसंगीत- ज्यातही बहुधा भक्तीरचनाच असाव्यात. पोवाडा, भारुडे, अभंग , श्लोक (ज्ञानेश्वरी वगैरे) ई असेल. नाही म्हणायला बहिणाबाई चौधरींचा जन्म १८८० सालचा व त्यांच्या काहि ओव्या थोड्याफार प्रसिद्ध आहेत (पण मला तरी फक्त एकच माहीत आहे ) पण त्या ओव्या नेमक्या कधी प्रसिद्ध झाल्यात ते माहित नाही. मग अशा परिस्थितीत वाढदिवसाचे गाणे सोडा पण सुंदर चालीत बांधलेले एखादे भावगीत प्रसिद्ध होवून कालातीत लोकप्रिय होईल याची शक्यताही किती कमी असणार ?
असो.. मराठीतल्या "मेंदीच्या पानावर" मधले भाव तरी इंग्लिश वा फ्रेंचमध्ये व्यक्त करता येणार आहेत का ?

कपिलमुनी's picture

3 Oct 2022 - 5:35 am | कपिलमुनी

त्या काळातले वाढदिवसाचे गाणे तर सोडा पण कोणतेही मराठी गाणे (भक्तीगीत नसलेले) आपणास ज्ञात आहे का ?

१८९३ पूर्वी आया बाळांना अंगाई म्हणत नव्हत्या कि पाळणा म्हणत नव्हत्या ?
स्त्रिया जात्यावर ओव्या म्हणत नव्हत्या का ? पोवाडे होते.

अभ्यास वाढवा.. हव तर सुरुवात इथून करा

१८९३ पूर्वी आया बाळांना अंगाई म्हणत नव्हत्या कि पाळणा म्हणत नव्हत्या ?

बरं...सांगा मला १८९३ पूर्वीची प्रसिद्ध अंगाई गीते

महत्वाचे

अभ्यास वाढवा.

ही टिप्पणी टाळावी .. अशा हेटाळणी जनक टिप्पणी मिपावर वातावरण खराब करतात असे मला वाटते.
मुद्दामहून एखादा धागा काढताना थोडाफार अभ्यास करुन निदान मोठ्या चुका टाळाव्यात हे योग्यच.
एखाद्या धाग्यात एखादा प्रतिसाद देताना व्यक्ती मनात सहज सुचलेले आलेले विचार मांडत असतो. त्यात काही कमी जास्त असणे शक्य आहे. . . त्यामुळेच तर इथे आपण चर्चा आणि माहितीची देवाण घेवाण करतो ना ? एखाद्याकडून चर्चेत काही चुकीचे वा अपुर्ण मुद्दे मांडले जाणे अगदीच अशक्य नाही पण अशा वेळी जाणकारांनी समोरच्याचा योग्य तो सन्मान राखत त्याची चुक दाखवणे अपेक्षित नाही का ?
असे असताना "अभ्यास वाढवा" अशी हेटाळणी जनक टिपणी करणे योग्य आहे का ? की अशा टिपणींना घाबरुन लोकांनी चर्चांमध्ये भाग घेणे सोडावे अशी आपली अपेक्षा आहे.
आपण सर्वच गोष्टीत कदाचित सर्वज्ञानी असालही. पण मी सर्वज्ञानी नाहीये हे मी नक्कीच मान्य करतो पण त्यामुळे कुणी माझी हेटाळणी करु पाहिल्यास अशा व्यक्तीला (मग भले तो कितीही ज्ञानी असेल तरी) सन्मानाने उत्तर देणे मला कठीण जाईल.

असो.

तर मूळ प्रश्न होता की "त्या काळातले वाढदिवसाचे गाणे तर सोडा पण कोणतेही मराठी गाणे (भक्तीगीत नसलेले) आपणास ज्ञात आहे का ? "
याचे नेमके उत्तर एखाद्या उदाहरणासहित आपल्या प्रतिसादात मिळाले नाही..ते दिल्यास बरे वाटेल.

कर्नलतपस्वी's picture

3 Oct 2022 - 7:23 pm | कर्नलतपस्वी

१८९३ सालचे आहे. त्या काळातले वाढदिवसाचे गाणे तर सोडा पण कोणतेही मराठी गाणे (भक्तीगीत नसलेले) आपणास ज्ञात आहे का ?

दत्तात्रेय कोंडो घाटे उपाख्य कविवर्य दत्त,
यांनी अवघ्या तेविसाव्या वर्षी लिहीलेली
व मराठी आयानीं(अनेकवचन आई) अजरामर केलेली अंगाई कशी विसरता.

रवी गेला रे सोडूनी आकाशाला
निज निज माझ्या बाळा

जन्म १८७५ वैकुंठ गमन १८९९.
हे अंगाई गीत १८९० ते १८९५ च्या दरम्यान लिहीले असावे.

श्री विठ्ठल दत्तात्रय घाटे यांनी आपल्या वडिलांचा काव्य संग्रह १९२५ मधे प्रकाशीत केला.

वयाची सत्तरी आली तरी चाल व शब्द जीभेवरच आहेत. तुमच्या साठी पुर्ण गीत....

बा निज गडे नीज गडे लडिवाळा
निज नीज माझ्या बाळा || धृ ||

रवि गेला रे सोडुन आकाशाला
धन जैसे दुर्भाग्याला
अंधार वसे चोहिकडे गगनात,
गरिबाच्या जेवि मनात
बघ थकुनी कसा निजला हा इहलोक,
मम आशा जेवि अनेक
खडबड हे उंदिर करिती
कण शोधाया ते फिरती
परि अंती निराश होती;
लवकरि हेही सोडितील सदनाला
गणगोत जसे आपणाला || १ ||

बहु दिवसांच्या जुन्या कुडाच्या भिंती
कुजुनी त्या भोके पडती
त्यामधुनी त्या दाखविती जगताला
दारिद्र्य आपुले बाळा
हे कळकीचे जीर्ण मोडके दार
करकरकर वाजे फार ;
हे दु:खाने कण्हुने कथी लोकाला
दारिद्र्य आपुले बाळा
वाहतो फटीतुन वारा;
सुकवितो अश्रुधारा ,
तुज नीज म्हणे सुकुमारा !
हा सूर धरि माझ्या या गीताला
निज नीज माझ्या बाळा || २ ||

जोवरती हे जीर्ण झोपडे आपुले
दैवाने नाही पडले,
तोवरती तू झोप घेत जा बाळा;
काळजी पुढे देवाला !
जोवरती या कुडीत राहिल प्राण;
तोवरि तुज संगोपीन ;
तदनंतरची करू नको तू चिंता;
नारायण तुजला त्राता
दारिद्र्या चोरिल कोण ?
आकाशा पाडिल कोण ?
दिग्वसना फाडिल कोण ?
त्रैलोक्यपती आता त्राता तुजला;
निज नीज माझ्या बाळा || ३ ||

तुज जन्म दिला सार्थक नाही केले;
तुज काही न मी ठेविले
तुज कोणि नसे, छाया तुज आकाश;
धन दारिद्र्याची रास;
या दाहि दिशा वस्त्र तुजला सुकुमारा;
गृह निर्जन रानी थारा;
तुज ज्ञान नसे अज्ञानाविण काही;
भिक्षेविण धंदा नाही
तरि सोडु नको सत्याला
धन अक्षय तेच जिवाला
भावे भज दीन दयाळा;
मग रक्षिल तो करुणासागर तुजला
निज नीज माझ्या बाळा || ४ ||

कवि: दत्त (दत्तात्रय कोंडो घाटे १८७५-१८९९)
इंदूर, सराफा सप्टेंबर १८९७

शोधले तर कदाचित संतानी सुद्धा पांडुरंगा साठी अंगाई गीत लिहीले असेल.

तर्कवादी's picture

3 Oct 2022 - 7:51 pm | तर्कवादी

व मराठी आयानीं(अनेकवचन आई) अजरामर केलेली अंगाई कशी विसरता

छे हो.. अजिबात नाही विसरलो.. विसरनेच कशी ?.. कधीच ऐकलेली नाही त्यामुळे विसरण्याचा प्रश्नच नाही :)
युट्युबवर आहे का ? असल्यास दुवा देवू शकता का ?

श्री विठ्ठल दत्तात्रय घाटे यांनी आपल्या वडिलांचा काव्य संग्रह १९२५ मधे प्रकाशीत केला.

म्हणजे ही अंगाई १९२५ नंतर मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचली का ? तसे असेल तर मी म्हंटलेला मुद्दाच अधोरेखित होतो ना.
असो.

शोधले तर कदाचित संतानी सुद्धा पांडुरंगा साठी अंगाई गीत लिहीले असेल.

या तुमच्या विधानातील ठळक केलेले शब्द माझा मुद्दाच अजून ठळक करत नाहीत का ?
माझा प्रश्न होता "त्या काळातले वाढदिवसाचे गाणे तर सोडा पण कोणतेही मराठी गाणे (भक्तीगीत नसलेले) आपणास ज्ञात आहे का ?"
जर गीत शोधावे लागत असेल तर म्हणजेच ते फारसे ज्ञात नाही / प्रसिद्ध नाही.
पांडुरंगासाठी म्हणजे भक्तीची भावना आलीच ना
माझा मुद्दा कृपया समजून घ्या ..मला मराठी साहित्याला वा भाषेला कमी लेखायचे नाही. कौटुंबिक / सामाजिक रचना /जडणघडण यातला फरक आहे.
Happy birthday हे गाणे कसे प्रसिद्ध पावले असेल ? मुळात ते कसे निर्माण झाले असेल याची कल्पना आपण करु शकतो. त्या समाजात वाढदिवसाचे कौतुक असणे लोकांना जमवून तो साजरा करणे - हे निदान उच्चभ्रू वर्गात तरी प्रचलित असेल. घरी पियानो वा तत्सम वाद्य बाळगणे, ते वाजवणे प्रतिष्ठेचे असावे. मग कधीतरी कुणीतरी ते गाणे बनवून एखाद्या मेजवानीत वाजवले / गायले असेल. सोपी चाल, सहज सोपे शब्द यामुळे ते अनेक सामान्य लोकांना ते भावले असेल. मग तेथील उपस्थितांकडून पुन्हा अशाच वाढदिवसांच्या मेजवान्यातून गायले / वाजवले गेल्यास ते हळूहळू लोकप्रिय झाले असावे. अर्थात ही सर्व माझी कल्पना. अगदी असेच झाले असेल असे नाही. पण असे गाणे लोकप्रिय होण्यासअगदी अशिक्षित (इंग्लिश) माणसालाही कळतील असे सुलभ शब्द , सहज गुणगुणता येईल व पियानोवर सहज वाजवता येईल अशी सोपी चाल (बरं चालीची गंमत अशी तिचा वेग थोडा कमी वा जास्त केला तरी ऐकण्यास विचित्र वाटत नाही) यांचा हातभार लागला असेलच. मराठीत लोकप्रिय संगीताची हीच क्लृप्ती मुख्यतः भक्तीगीत पोवाडा, आरत्या, अभंग, श्लोक यांत वापरली गेली असे वाटते

संगीत सौभद्र या नाटकाचा पहिला प्रयोग १८ नोव्हेंबर, इ.स. १८८२ या दिवशी पुण्याच्या पूर्णानंद थिएटरात झाला.

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%AD%E0%A4%A6%E0%A5...

कर्नलतपस्वी's picture

3 Oct 2022 - 8:32 pm | कर्नलतपस्वी

तर्कवादी आपल्याला काय म्हणायचे ते कदाचित मला नीट कळाले नसेल.
वाढदिवस ही संकल्पनाच मुळात पाश्चात्य आहे ती आता जास्त बोकाळली आहे. त्यामुळे तसले गाणे भारतीय भाषेत असण्याची शक्यताच नाही.

१८९३ पूर्वीचे अंगाई गीत होते का ?
होते व ते आपल्याला माहीत नव्हते. तेव्हा आपल्याला माहीत व्हावे म्हणून प्रतिसाद दिला.

अंगाई गीत प्रकाशीत जरी १९२५ मधे झाले असले तरी त्याचा प्रचार आगोदरच तोंडी झालाच असणार ना?

गाणे लोकप्रिय होण्यासअगदी अशिक्षित (इंग्लिश) माणसालाही कळतील असे सुलभ शब्द , सहज गुणगुणता येईल व पियानोवर सहज वाजवता येईल अशी सोपी चाल (बरं चालीची गंमत अशी तिचा वेग थोडा कमी वा जास्त केला तरी ऐकण्यास विचित्र वाटत नाही) यांचा हातभार लागला असेलच. मराठीत लोकप्रिय संगीताची हीच क्लृप्ती मुख्यतः भक्तीगीत पोवाडा, आरत्या, अभंग, श्लोक यांत वापरली गेली असे वाटते

भारतीय संगीत हे अभिजात आहे.
तेंव्हा आपला कल्पनाविलास अनाठायी आहे.वरील अंगाई गीत शोधून ऐकले तर किती साधे सोपे व गेय आहे हे समजेल

धाग्याचा सुर बदलू नये म्हणून मी इथेच थांबतो. आपण वेगळा लेख लिहील्यास सविस्तर चर्चा होऊ शकते.

या लेखात उल्लेखिलेले अनेक शब्द आहेत ज्या साठी मराठी प्रतिशब्द, वाक्य रचना बनवावे लागत आहेत किंवा समानार्थी वाक्य रचना बनवाव्या लागत आहेत , शोधाव्या लागत आहेत.

गेया काही वर्षांत अनेक परक्या भाषांच्या आक्रमणाला मराठी भाषेला तोंड द्यावे लागत आहे. जो पर्यंत आपणच त्यासाठी प्रतिशब्द, वाक्य शोधुन वापरात आणत नाहीत तो पर्यंत आपल्याला त्या भाषेताल शब्द वापरावे लागतात.

मला वाटते की मिपावर एक स्वतंत्र भाग असावा ज्यात अशी अडचण आली की लोक ते शब्द , वाक्य टाकतील. वाचक , जाणकार मंडळींनी त्यावर प्रतिशब्द, चपखल बसणारी वाक्य रचना सुचवावी.

ही एक सतत, नेहमी चालणारी प्रक्रिया असेल. खासकरुन तांत्रिक विषयांमधील इंग्रजी शब्दांसाठी मराठी प्रतिशब्द बनवणे जरुरी आहे.

उदाहरणार्थ: मला एका क्लाऊड कॉम्प्युटींग कंपनीने नॉलेज क्लाऊड या साठी प्रतिशब्द मागीतला आणि मी बऱ्याच प्रयत्नांनंतर " ज्ञानमंडल" हा शब्द सूचवला . तसेच ऑनलाईन / व्हर्च्युअल एज्युकेशन याला मराठी प्रतिशब्द काय ? आभासी शिक्षण या शब्द योग्य नाही असे मला वाटते.

मराठी प्रतिशब्द या बद्दल एक वेगळा भाग बनवा मिपा मध्ये

नवीन भाग बनवायला जमेल कि नाही ते माहिती नाही. पण कमीत कमी वेगळा धागा असावा, त्यात तज्ञपुर्ण चर्चा व्हावी.

कुमार१'s picture

3 Oct 2022 - 12:26 pm | कुमार१

**मिपावर एक स्वतंत्र भाग असावा ज्यात अशी अडचण आली की लोक ते शब्द , वाक्य टाकतील.
>> जरूर असावा.
पण माझ्या दोन सूचना आहेत :

१. त्यात जे मराठी शब्द जमा होतील ते आग्रहाने आणि जाणीवपूर्वक आपण सर्वांनी या संस्थलावर वापरले पाहिजेत.

२.. अजूनही काही सदस्य रोमन लिपीतील सदस्य नावाने वावरत आहेत. त्यांनी प्रथम ते देवनागरीत करून घ्यावे बरे :)

तर्कवादी's picture

3 Oct 2022 - 3:44 pm | तर्कवादी

त्यात जे मराठी शब्द जमा होतील ते आग्रहाने आणि जाणीवपूर्वक आपण सर्वांनी या संस्थलावर वापरले पाहिजेत.

सहमत,
आणि झालंच तर काही लोक्स वीकांतासारखे शब्द वापरतात त्यांनीही ते वापरणं बंद केले तर उत्तमच.

श्रीगुरुजी's picture

3 Oct 2022 - 12:49 pm | श्रीगुरुजी

Virtual/Online Education - संगणकाधारीत शिक्षण, अप्रत्यक्ष शिक्षण, आभासी शिक्षण

सिरुसेरि's picture

3 Oct 2022 - 8:27 pm | सिरुसेरि

इंग्लिश - How are you? या वाक्याला महाराष्ट्रात ठिक ठिकाणी वेग वेगळे प्रतिशब्द / प्रतिवाक्य वापरले जाते . जसे की , " काय काय ?" , "काहि विशेष ? " , "काय कसं चाललय ? " , "काय नवीन खळबळ ? " इत्यादी .

श्रीगुरुजी's picture

3 Oct 2022 - 8:51 pm | श्रीगुरुजी

मराठी प्रतिशब्दांसाठी गामा पैलवान यांनी खूप योगदान दिले असते. ते आपल्या प्रतिसादात अवघड इंग्लिश शब्दांसाठी आवर्जून मराठी प्रतिशब्द वापरायचे. दुर्दैवाने ते भलत्याच मार्गावर वाहवत गेले.

सर टोबी's picture

3 Oct 2022 - 9:07 pm | सर टोबी

मला वाटते कि मराठीचे समृधधिकरण आणि ती सातत्याने कुलसुसंगत करण्याची जबाबदारी एखाद्या व्यासपीठाकडे अगोदरच असावी. असे व्यासपीठ बहुदा प्रसिध्धी लोलुपतेने फारसा गाजावाजा न करता ते काम करीत असावे किंवा पुरतेच बंद म्हणावे असे गतप्राण झाले असावे.

कोणती भाषा जास्त समृदध याच्या तुलनेत न जाता असे म्हणावेसे वाटते कि इंग्रजीने विज्ञान आणि साहित्य या प्रांतामध्ये सढळपणे विविध भाषांमधील शब्द लीलया अंतर्भूत केले आहेत आणि त्याचा परीणाम म्हणून आपण एखादा विचार संपूर्णतः इंग्रजीमध्ये व्यक्त करू शकतो. असा प्रकार मराठीच्या बाबतीतही होऊ शकतो नव्हे होतच आहे. भाषा हि सामान्यजनांच्या वापरातून जिवंत राहते आणि समृदध होते हे जर खरं आहे असे मानले तर कितीतरी नामे, क्रियापदे, क्रियाविशेषणे आणि इतर बरेच व्याकरण घटक अगोदरच मराठी म्हणून मान्यता पावले आहेत. उदा. माझा कॉन्टॅक्ट तुझ्या फोनबुक मध्ये सेव्ह कर!

जाता जाता: सध्याची वर्तमानपत्रे मराठी समृदध करण्याऐवजी अधिकच गचाळ करीत आहेत असे एक निरीक्षण आहे. सध्या नव्यानेच वापरात आलेली नवीन शब्द आणि त्यांचा पूर्वविष्कार याकडे एक नजर टाका. पाडकाम (जमीनदोस्त करणे), झाडपडीच्या घटना (वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना), येवा (धरणात आलेला नविन पाणीसाठा), ठराव पारीत करणे (ठराव मंजूर करणे). काही जण नव्याने रूढ होणारे शब्द संक्षिप्त आहेत असे समर्थन करतील पण ते शब्द वाचणे देखील किळसवाणे वाटते.

१००% सहमत!
मराठी वृत्त संस्थळे आणि वृत्तवाहिन्या यांची मराठी किळसवाण्या दर्जाची घाणेरडी झाली आहे!
कालचं उदाहरण : चांदणी चौकात पूल पाडल्यावर त्याचा मलबा उचलण्याचे काम बाकी आहे.

सामान्य माणूस's picture

3 Oct 2022 - 11:24 pm | सामान्य माणूस

काल आठवडा शेवट चांगला झाला आणि हा धागा आणि त्यावरील प्रतिसाद वाचून आजची सोमवार निळाई पण गायब झाली.

सोपा शब्द? अतिरंजित?अवाजवी?फुललेलं?

कंजूस's picture

4 Oct 2022 - 3:38 am | कंजूस

यासाठी गुजराती - आवजो.
तमिळ - पापोंम. अप्राम पापोंम
मराठी - येतो/येते/या/भेटू पुन्हा/चलू का/ चालतो/नीघ आता/निंगू का?/निघतो/निघुया?

सर टोबी's picture

13 Oct 2022 - 7:49 pm | सर टोबी

काही परदेशी, आकर्षक आणि अदबशीर वाटणारे रीतिरिवाज परंतु ते पाळताना वापरायचे शब्द मात्र मराठी असा काहीसा लेखकांचा आग्रह दिसतोय. नंतर प्रतिशब्दांचा शोध हे जे उपकथानक सुरु झाले त्यातही एका परकीय शब्दाला एकच मराठी प्रतिशब्द असा काहीसा अलिखित प्रवाद दिसतोय. हे दोन्ही प्रकार मला दुराग्रह वाटतात.

असे कितीतरी भारतीय, महाराष्ट्रीयन चालीरीती असतील त्या आपल्याच रितीरिवाजांना शोभून दिसत असतील. मठ्ठ्याचा भुरका मारणे, वरण भात ओरपणे या गोष्टी बुफे किंवा काट्या चमच्यांनी करण्याचा आग्रह जसा अनाठायी तसा मद्याचे प्याले उंचावताना काही तरी मराठीतच बोलायचे हेही अनाठायीच. एक आपलं सुचवून बघतोय. याला टीका समजण्याचे कारण नाही.

जाता जाता: ओव्हर हाइपड् याला वाजवीपेक्षा जास्तच गवगवा झालेले हा पर्याय सुचवावासा वाटतो.

सुबोध खरे's picture

19 Oct 2022 - 10:35 am | सुबोध खरे

उदोउदो हा शब्द कसा वाटतो

चौथा कोनाडा's picture

17 Oct 2022 - 10:33 pm | चौथा कोनाडा

लेगिंग्ज = तंगडीस
LGHDTDRT

ओके आहे ना ?

चौकस२१२'s picture

19 Oct 2022 - 4:15 am | चौकस२१२

- साधारण ज्या वस्तू मराठी भागात ( मुलुख हा शब्द येथे वापरणार होतो पण तो मूळ मराठी नसावा) निर्माण झाल्या नाहीत त्याला ओढून ताणून मराठी शब्द वापरू नये उदाहरण = फॅक्स , इमेल ..
पण त्याच बरोबर खालील पथ्य पाळता येईल का याचा विचार सर्वांनी करावा असे वाटते .

- चांगला मराठी शब्द अस्तित्वात असताना उगाच इतर भाषीय शब्द वापरू नये
उदाहरणे
-"रांगेत उभा राहिलो , कंटाळा आला" हे वापरण्याऐवजी "लायनीत उभा राहिलो बोअर झालो" .. या पेक्षा सरळ पूर्ण इंग्रजीत बोला ना मग ( ते हि धड नाही )
- जीजू??? मेव्हणे / साडू ?

चांगले आणि प्रामाणिक मराठी भाषा वापरा असे म्हणले कि लगेच त्याला "संकुचित वृत्ती असे म्हणले जाते " मग इतके फारसी शब्द तुम्ही कसे चालवून घेता ... (पारस निस फडणवीस दवाखाना ) असे विचारले जाते ... हो खरे आहे पण जो, पशिमेकडून आलेला आक्रमक समाज मराठी भागाशी संबंधित आला त्यांच्या मुळे झाली अशी भेसळ पूर्वी.. मान्य
पण म्हणून मुद्डमून अजून जास्त मराठीची तोड मोड करायची हे काही पटत नाही .

तर्कवादी's picture

19 Oct 2022 - 10:49 am | तर्कवादी

- साधारण ज्या वस्तू मराठी भागात ( मुलुख हा शब्द येथे वापरणार होतो पण तो मूळ मराठी नसावा) निर्माण झाल्या नाहीत त्याला ओढून ताणून मराठी शब्द वापरू नये उदाहरण = फॅक्स , इमेल ..

बर्‍यापैकी सहमत. ओढून ताणून विचित्र शब्द बनवू नये हे नक्कीच.
पण अशा पाश्चिमात्य यंत्रणा वा संकल्पनांना काही खूप सुंदर मराठी शब्द दिले गेल्याची उदाहरणे आहेत
उदा,
टेलिफोन - दूरध्वनी - त्यामुळे "दूरध्वनीवरुन संपर्क साधला" असे वाक्य वाचताना अजिबात खटकत नाही किंबहूना आकर्षकच वाटते
डेटा - विदा - विदा हा छोटासा शब्द तर मला फार आवडतो, ज्या कोणा व्यक्तीने वा संस्थेने हा शोधला / प्रचलित केला त्यांचे मनापासून कौतुक.

-"रांगेत उभा राहिलो , कंटाळा आला" हे वापरण्याऐवजी "लायनीत उभा राहिलो बोअर झालो" .. या पेक्षा सरळ पूर्ण इंग्रजीत बोला ना मग ( ते हि धड नाही )

अगदी सहमत. तसेच "नापास" म्हणण्याऐवजी शक्यतो "अनुत्तीर्ण" म्हणावे आणि अगदी इंग्लिश शब्द वापरायचाच झाला तर "फेल" म्हणावे ना.

- जीजू??? मेव्हणे / साडू ?

"जीजू" शब्द तर डोक्यात जातच होता.. आता ताईची जागासुद्धा दिदीने घेतली.