शिकागो मिपा कट्टा वृत्तांत

श्रीरंग_जोशी's picture
श्रीरंग_जोशी in भटकंती
3 Oct 2022 - 6:16 am

अखेर तो दिवस आलाच ज्याची आम्हाला अनेक वर्षांपासून प्रतीक्षा होती. अमेरिकेच्या मिडवेस्ट भागात मिपाचा कट्टा आयोजित होणे व त्यात आम्हाला सामील होण्याची संधी मिळणे. विजुभाऊंच्या अमेरिका दौर्‍यामुळे हा योग जुळून आला अन १ ऑक्टोबर रोजी शिकागोमध्ये कट्टा आयोजित करण्याचे ठरले. शिकागोमधे दीर्घकाळापासून राहणार्‍या मिपाकर इंन्दुसुता यांनी याकामी पुढाकार घेतला.

उत्सवमूर्ती श्री व सौ विजुभाऊ मिशिगन राज्यातल्या डेट्रॉइटहून कट्ट्यासाठी शिकागोला आले. आयोवा राज्यातील डेमॉइन येथून मिपाकर अनुजा व त्यांचे पती आले. शिकागोत काही महिन्यांपूर्वीच आलेले मिपाकर पुंबा कट्ट्याला आले. मिनेसोटातून मी व मिपाकर जुइ आमच्या कन्येबरोबर आलो. अन हा कट्टा ज्यांच्यामुळे चविष्ट बनला त्या इन्दुसुता यांच्या उपस्थितीने कट्ट्याला बहार आली.

शनिवार १ ऑक्टोबर रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी ११ वाजता मिलेनियम पार्कमधील शिकागो बीनजवळ कट्टा ठरला होता. आम्ही व इन्दुसुता तेथे १०:३० ला पोचलो तर श्री व सौ विजुभाऊ अन अनुजा व त्यांचे पती आधीच पोचलेले होते.

मिलेनियम पार्कमधे पोचताच शिकागो बीनचे प्रथम दर्शन झाले.

पायर्‍या चढून वर पोचल्यावरचे फोटोज

बीनपाशी मिपाकरांना शोधत असताना विजुभाऊंचा मला फोन आला व पाठीमागे वळण्यास सांगितले. वळल्यावर प्रथम पोचलेले मिपाकर दृष्टीस पडले.


फोटोत डावीकडून श्री व सौ विजुभाऊ अन अनुजा व त्यांचे पती.

एकमेकांची ओळख करून घेणे व एकमेकांच्या ठिकाणांना पूर्वी दिलेल्या भेटींबाबत चर्चा करणे सुरू झाले. शनिवार असल्यामुळे शिकागो बीनजवळ पर्यटकांची खूपच वर्दळ होती. पुंबा हे घरून खूप सकाळी निघाले असले तरी काही मेट्रा ट्रेन्सच्या फेर्‍या रद्द झाल्यामुळे त्यांना पोचायला ११:१५ झाले. बीनजवळ बरेच वेळ थांबल्यामुळे इतर कट्टेकर्‍यांनी शेजारच्या द क्राऊन फाउंटनकडे प्रस्थान केले व पुंबा यांना फोनवर तसे कळवले.

पुंबा यांचे आगमन झाल्यावर इन्दुसुता यांनी मिपाच्या प्रथेप्रमाणे कट्ट्याची अधिकृत सुरूवात करण्यासाठी स्वतः बनवलेली बदाम बर्फी सर्वांना खाऊ घातली.

बर्फी अत्यंत चविष्ट असल्याने कट्टेकर्‍यांनी तिचा पुरेपूर आस्वाद घेतला.

नंतर मिसळपाव.कॉम छापलेले कागद घेऊन कट्टेकर्‍यांनी फोटो काढला.

डावीकडून विजुभाऊ, पुंबा, श्रीरंग_जोशी, जुइ व अनुजा

इन्दुसुता यांनी .कॉम हातात धरले होते परंतु त्यांना स्वतःचा फोटो जाहीररीत्या प्रकाशित होऊ द्यायचा नाहीये.

या फाऊंटनमधे दोन बाजूंना दोन मोठाले स्तंभ आहेत. त्यावर एका बाजुने माणसांचे चेहरे दाखवले जातात अन त्यांच्या मु़खातून अधुनमधून पाण्याची धार बाहेर पडते. मधल्या मोकळ्या जागेत अंदाजे तीन-चार इंच खोल पाण्यातून फेरफटका मारता येतो.

या भेटींदरम्यान विजुभाऊंनी त्यांचे दोसतार हे पुरस्कार विजेते पुस्तक भेट दिले. आम्ही त्यावर त्यांची स्वाक्षरीही घेतली.

यानंतर इन्दुसुता यांनी सर्व कट्टेकर्‍यांना मिलेनियम पार्कची गायडेड टूर घडवली.
सर्वप्रथम Jay Pritzker Pavilion

फेरफटक्यादरम्यानचा एक फोटो

नंतर मिलेनियम मॉन्युमेंट

नंतर मिलेनियम पार्कमधील उद्यान

यानंतर सर्वांनी दुपारचे जेवण कुठे घ्यायचे यावर चर्चा केली अन सर्वानुमते उपलब्ध पर्यायांपैकी रोटी मेडिटरेनियन ग्रील या उपहारगृहाची निवड करण्यात आली.

यानंतर इन्दुसुता यांनी घरी प्रयाण केले. तसेच गाडीने ५-६ तासांचा परतीचा प्रवास करायचा असल्याने अनुजा व त्यांच्या पतीनेही कट्टेकर्‍यांचा निरोप घेतला.

नंतर जवळच असलेले बकिंगहम फाउंटन पाहण्यासाठी इतर कट्टेकर्‍यांनी सिटी बसने प्रयाण केले. भव्यता, स्थापत्यसौंदर्य याबाबतीत हे फाउंटन खूपच खास आहे. त्याभोवती फेरी मारायला आम्हाला १५ मिनिटे लागली असावी. त्यानंतर इन्दुसुता यांचे घरी जाण्यासाठी आम्ही सर्व प्रत्यम पायी व नंतर सिटीबसने शिकागो युनियन स्टेशनला गेलो.

एवढ्या गजबजलेल्या परिसरातही काही ठिकाणी मोकळी जागा व तेथील सौदर्यीकरण पाहून आम्हाला कौतुक वाटले.

युनियन स्टेशनचे स्थापत्य बाहेरुन भव्य आहे अन आतून कलात्मक आहे.

पुढच्या ट्रेनला अवकाश असल्याने आम्हाला या स्थापत्यसौंदर्याचा निवांतपणे आस्वाद घेता आला.

ट्रेनमधे बसल्यावर अन ट्रेन सुटल्यावर खिडकीतून टिपलेले दृश्य. इमारतीवर असलेले अ‍ॅन्टेनाजची उंची गृहीत न धरल्यास आजही पश्चिम गोलार्धातली सर्वात उंच इमारत विलिज टॉवर या फोटोत दिसत आहे.

इन्दुसुता यांच्या घरी आम्ही सर्व जण पोचल्यावर फर्मास चहाने आमचे स्वागत झाले. दमलेली मंडळी किंचीत विसावल्यावर विजुभाऊंनी आपल्या पोतडीतून (बॅकपॅकेतून) बासरी काढली. सोबतीला फोनवर तंबोर्‍याची धून वाजवून एकाहून एक मराठी व हिंदी गाणी त्यांनी बासरीवर वाजवून आमचे कान तृप्त केले. अधुनमधून स्वतःचा पहिला मिपा कट्टा, मिपावर नवे असताना घडलेल्या प्रत्यक्ष मिपाकरांच्या भेटी याबाबतचे किस्सेही आम्हाला ऐकवले.

थोड्याच वेळात इन्दुसुता यांनी डिनरच्या जेवणाची मांडामांड केली. मिसळपाव.कॉमचा कट्टा मिसळीशिवाय कसा होईल.
मिसळीतल्या सर्व पदार्थांचे दृश्य पाहून अन तर्रीच्या गंधाने आमच्या तोंडाला पाणी सुटले नसते तर नवलच.

ही मिसळ इतकी चविष्ट होती की आपण अमेरिकेत आहोत हे विसरायला झाले. अक्षरशः भारतात असल्यासारखे वाटले. अमेरिकेत भारतीय अन्न शिजवताना बरेच जिन्नस भारतातल्यासारखे दिसत असले तरी भारतातल्या चवीसारखे नसतात (उदा. शेंगदाणे) त्यामुळे भारतातल्यासारखी चव मिळवणे अत्यंत आव्हानात्मक असते.
मिसळ खाऊन पोट भरलं तरी मनाचं समाधान होत नव्हतं. विजुभाऊंनी मिसळ खाऊन, नाक पुसावे लागल्याची पोचपावती देऊन मिसळीच्या चवीच्या अपेक्षापूर्तीबाबत शिक्कामोर्तब केले. सोबतीला घट्ट ताक व नंतर दहीभातही होते. गोड म्हणून इन्दुसुता यांनी स्वतः पेढे देखील बनवले होते. परंतु थोडे बाजुला ठेवले गेल्याने अन अक्षरशः पोटात जागा न उरल्याने त्यावेळी कुणी पेढ्यांचा आस्वाद घेऊ शकलं नाही. नंतर सर्वांना बदाम बर्फी व पेढ्यांचे पार्सल मिळाले :-).

जिव्हातृप्ती झाल्यावर मग रंगली गप्पांची मैफिल.

मिपावरचे अनेक गाजलेले लेख, मोकलाया दाही दिशा, गाजलेल्या प्रतिक्रिया, कोटिभास्कर मिपाकरांच्या कोट्या अशा अनेक गोष्टी आठवणींच्या कप्प्यांतून अलगदपणे बाहेर आल्या. मिपाकर असल्यामुळे मिळणारे ज्ञान, समाधान व विविध क्षेत्रांतल्या तज्ञ अन अनुभवी मंडळींशी होणार्‍या मैत्री अशा अनेक घटकांबाबत सोदाहरण चर्चा झाली. जगभरात कुठेही असणार्‍या मराठी माणसांना जोडणारे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल स्व. तात्या अभ्यंकर यांना अन ते व्यासपीठ वर्षानुवर्षे जोमाने चालवल्याबद्दल नीलकांत यांना धन्यवाद देण्यात आले.

अनेक उत्तम लेखन करणारे किंवा उत्तम प्रतिक्रिया देणारे मिपाकर आजकाल मिपापासून दुरावल्याने खंत व्यक्त करण्यात आली. तसेच गेल्या काही वर्षांत हे जग अकाली सोडून गेलेल्या बर्‍याच मिपाकरांच्या आठवणी निघून काही क्षणांसाठी मंडळी उदास झाली.

पुंबा हे वयाने बरेच तरुण असुनही मिपाच्या अन मराठी आंतरजालाच्या इतिहासाबाबत त्यांच्या ज्ञानाबाबत इतरांचा अचंबा वाटला. त्यांच्या चौफेर वाचनाला इतरांनी दाद दिली.

व्यक्तिशः मला गेल्या बर्‍याच वर्षांत अशा मनसोक्त गप्पांच्या मैफीलाचा आस्वाद घेता आला नव्हता. ही संधी मला या मिपाकट्ट्यामुळे मिळाली. पॅनडेमिकच्या बंधनांतून जरा मोकळे झाल्याची अनुभूती मिळाली. भारतातले अन इतर ठिकाणचे मिपाकर हजर नसूनही या कट्ट्यासाठी त्यांच्या शुभेच्छांमुळे खूप बरे वाटले. काही वेळा गप्पांमधे आलेल्या किश्शांबाबत काही इरसाल मिपाकरांच्या प्रतिक्रिया काय आल्या असत्या असा विचार करुन मनातल्या मनात हसू आले.

पुन्हा भेटण्याचे अन संपर्कात राहण्याचे ठरवून कट्टेकर्‍यांनी एकमेकांचा निरोप घेतला अन एका अविस्मरणीय कट्ट्याची यशस्वी सांगता झाली.

फोटो सौजन्य - सर्व कट्टेकरी.

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Oct 2022 - 7:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वप्रथम सर्व मिपाकर कट्टाक-यांचे मनापासून अभिनंदन. तुम्ही सर्व आयुष्यातले सर्व व्याप-ताप असतांना कुठून कुठे प्रवास करीत एकमेकांना भेटलात त्याचा तुमच्या इतकाच एक मिपाकर म्हणून आनंद झाला.

'मि स ळ पा व .कॉ म' चे बोर्डची कल्पना आवडली. सर्वांना पाहुन आनंद वाटला. खाद्यपदार्थ, भटकंती भारी. बाकी, तपशीलवार वृत्तांताच्या प्रतीक्षेत.

तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे |
तुझे गीत गाण्यासाठी मिसळ खाऊ दे !

-दिलीप बिरुटे

काय त्या बिल्डींगी, काय ती कारंजी अन काय ती हाटेले.. एकदम ओक्केमधी..

पुंबा यांचे प्रथमच दर्शन झाले. बाकी विजुभौ शेगाव ते शिकागो, असे जगात कुठेही प्रकट होऊ शकतात हे पुन्हा एकदा पटले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Oct 2022 - 8:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>बाकी विजुभौ शेगाव ते शिकागो, असे जगात कुठेही प्रकट होऊ शकतात हे पुन्हा एकदा पटले.

सहमत आहे. पण यात ते जगभर कशासाठी फिरत असतील असा एकउपप्रश्न लपलेला दिसला.

-दिलीप बिरुटे

पण यात ते जगभर कशासाठी फिरत असतील

बासरीवादनासाठी.. अर्थात..

कलंदर मनुष्य आहे. अशांच्या जास्त चवकशा क्रू नये. आता उदा, तुमचे आम्ही विचारतो का? ..

आता उदा, तुमचे आम्ही विचारतो का? ..

सर काय करत असतील असे तुम्हाला वाटते?

तुषार काळभोर's picture

3 Oct 2022 - 8:16 am | तुषार काळभोर

सातासमुद्रापार यशस्वी कट्टा केल्याबद्दल निमंत्रक, संयोजक, आयोजक आणि उत्साहाने दुरून दुरून येऊन सहभागी होणारे कट्टेकरी यांंचं हार्दिक अभिनंदन!!

ता.क.- @श्रीरंग_ वर्षानुवर्षे तेच स्मित :) फक्त यंदा पाचेक किलो अतिरिक्त जाणवताहेत :)

इन्दुसुता's picture

3 Oct 2022 - 8:33 am | इन्दुसुता

छान व्रुत्तांत ( नीट लिहीता आला नाही हा शब्द).
एक अविस्मरणीय दिवस.
लख्ख उन पडलं होतं, पाउस किंवा थंडी नसल्याने आणखीच बहार आली. प्रत्येक ट्रेन वेळेत मिळाली, सगळ्याच गोष्टी वेळेवर झाल्या... पुंबा यांना ( त्यांच्याच घरी) परतायला रात्री मात्र बराच उशीर झाला.
'रोटी' मधील अन्नं अनपेक्षीत रित्या रूचकर होतं....यापुढे माझ्याकडे येणार्या सगळ्या पाहुण्यांना मिलेनियम पार्क बरोबरच रोटीचीही भेट !!!!

सर्वच जण इतरांना प्रथमच भेटत असूनही अज्जिब्बात तसं वाटलं नाही.

पुढील वृत्तांताच्या प्रतीक्षेत.

पुंबा's picture

3 Oct 2022 - 11:45 am | पुंबा

तुम्ही म्हणालात तसं एका मिनिटाचाही फरक न पडता एकदम आरामात पोहोचलो.

सनईचौघडा's picture

3 Oct 2022 - 9:24 am | सनईचौघडा

रंगा इतकी वर्ष तिकडे राहिल्याने गोरा लोकांसारखा तपकीरी तुकतुकीतपणा आताशा जाणवू लागलाय.

बाकी इतक्या साफ चांगल्या स्वछ स्टेशन आणि बाहेरचा परिसर बघायला मन तयार होत नाही हो.
काय आहे पानाच्या पिचकाऱ्या, भिकारी, कोलाहल यांना पहिल्या शिवाय ठेसनात आलो असं वाटतच नाही.

प्रचेतस's picture

3 Oct 2022 - 10:04 am | प्रचेतस

लै भारी कट्टा, लै भारी फोटो. मिलेनियम पार्कचं आर्किटेक्चर एकदम सुरेख आहे. तिथेही आपल्या मिपाचा बॅनर झळकेल असं वाटलं नव्हतं. एकदम मस्त संकल्पना.

श्वेता व्यास's picture

3 Oct 2022 - 10:20 am | श्वेता व्यास

छान कट्टा वृत्तांत.

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Oct 2022 - 10:51 am | राजेंद्र मेहेंदळे

लांबलांबुन लोक एव्हढा वेळ काढुन आणि प्रवास करुन आले हे कौतुकास्पद आहे. प्रचि सुद्धा मस्त.

प्रदीप's picture

3 Oct 2022 - 11:06 am | प्रदीप

तसेच फोटोही.

कर्नलतपस्वी's picture

3 Oct 2022 - 11:36 am | कर्नलतपस्वी

सुंदर फोटो,सुदंर लिखाण व या मागची सुदंर भावना. क्या बात है.

कुणी कुणास पाहिले नाही
चेहरा कसा ओळखावा
परवलीचा शब्द उच्चारता
जो मागे वळून पाहे
तो मिपाकर समजावा.

पुढील वर्षी आलो तर जरूर भेट घ्यायचा प्रयत्न करेन.

पुंबा's picture

3 Oct 2022 - 11:40 am | पुंबा

नक्की या. कट्टा करु.

कर्नलतपस्वी's picture

3 Oct 2022 - 11:39 am | कर्नलतपस्वी

सर्व NRM(Non Resident Mipakar)
नां दसरा व दिवाळीच्या हार्दिक शुभकामना.

श्रीरंग, जुई, छोटी उमा, अनुजा, विजुभाऊ, इंदुसुता या मिपाकरांची आणि सौ. विजुभाऊ व अनुजा यांचे यजमान या सर्व मंडळींची भेट घेऊन गेल्या दोन महिन्यांपासून साचून असलेला एकटेपणा कुठल्या कुठे पळाला. शिकागो कट्टा अगदी अविस्मरणिय ठरेल असा झाला. हा मी सहभाग घेतलेला पहिलाच कट्टा आहे असे वाटलेसुद्धा नाही. खरोखर मिपाकर म्हटले की नवे-जुने, लहान मोठे सारेच भेद गळून पडतात.
श्रीरंग व जुई आणि त्यांची कन्या हे छोटेखानी कुटुंब अगदी 'मृदुनी कुसुमादपि'. श्रीरंग यांनी अतिशय प्रेमाने 'फॉर हियर ऑर टू गो' हे पुस्तक भेट दिले. चि. उमा फारच गोड, हुशार आणि शहाणी मुग्गी आहे. आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे उमाला बाकीच्या मुलांसारखे मोबाईलवेड नाही, आमच्या गप्पा चालू असताना ती चित्रे रंगवण्यात गर्क होती. श्रीरंग आणि जुईंचे सुजाण पालकत्व पाहून भारी वाटले इंदुसुतांचा मायाळू आग्रह अनुभवून अगदी आपल्या घरी आल्यासारखेच वाटत होते. त्यांना अगदी शिकागो शहर पाठ आहे. अतिशय चविष्ट बदाम बर्फी, पेढे, मिसळपाव खाऊन मन तृप्त झाले. अनुजा व त्यांचे यजमान इतक्या दुरून मिपाप्रेमापोटी आले, त्यांच्याशी बोलून फार छान वाटले. विजुभाऊ- सौ विजुभाऊ हे अगदी मेड फॉर इच अदर असे जोडपे आहे. दोघेही अगदी प्रसन्न मनाने प्रत्येक अनुभव एंजॉय करतात. दोघेही अगदी मनमोकळेपणाने कट्ट्यात सहभागी झाले. अगदी प्रेरणादायी. विजुभाऊंच्या बासरीवादनाचे तर क्या कहने! अगदी कान आणि मन तृप्त झाले. विजुभाऊंचे मिपा अन मिपाकरांचे अनेक मजेशीर किस्से, फिरस्तीचे अनुभव, पुस्तके- सिनेमे- कार्टून्स सर्व विषयांवर यथेच्छ गप्पा रंगल्या आणि इंदुसुतांच्या घरून पाय निघवेना अगदी. सुरुवातीला बुजणारा मी थोड्याच वेळात रूळलो आणि गप्पांची गाडी एक एक स्टेशन मागे टाकत सुसाट सुटली. 'मोकलाया दाहि दिश्या'ची आठवण झाली नाही तर तो मिपा कट्टा नव्हेच. कालदेखिल आम्ही मोकलाया आठवून आठवून हसलो. कित्येक नव्या- जुन्या मिपाकरांची, उत्तमोत्तम धाग्यांची आठवण निघाली.
शिकागो शहरात पाहण्यासारखे खुप आहे. हिवाळा सुरू होण्याच्या आधी अजून एक- दोनदा भटकणे होईल. तेव्हा मिपाकरांबरोबर केलेल्या कालच्या भटकंतीची आठवण होईलच.

छानच! चकाचक कट्टा दिसतोय!

कट्टा मस्त झालेला दिसतोय एकदम! फोटोज पण झकास आहेत 👍

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Oct 2022 - 12:51 pm | ज्ञानोबाचे पैजार

मालकांनी सुध्दा लगेच ब्यानर वर फोटो डकवुन टाकला,
वृत्तांत आवडला खादाडीचे फोटो तर कातिल आहेत.
पैजारबुवा,

मिपाकट्टा यशस्वी केल्याबद्दल आयोजकांचे व त्यातील सहभागी व्यक्तींचे हार्दीक अभिनंदन.
आभासी जगतातून प्रत्यक्ष भेटीतील मौज तुम्ही अनुभवलीत.
खाद्यपदार्थांचे फोटो पाहून तोंपासू. सर्वच छायाचित्रे स्पष्ट अन चांगली आली आहेत.
पुढील कट्यास शुभेच्छा!

मुक्त विहारि's picture

3 Oct 2022 - 2:55 pm | मुक्त विहारि

फोटो पण मस्तच

सौंदाळा's picture

3 Oct 2022 - 3:00 pm | सौंदाळा

कट्टा छानच झालेला दिसतोय
मिसळपाव बघून तोंडाला पाणी सुटले.
व्रुत्तांत आणि फोटो मस्तच.

MipaPremiYogesh's picture

3 Oct 2022 - 3:43 pm | MipaPremiYogesh

वाह मस्त झालाय कि कट्टा

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

3 Oct 2022 - 4:37 pm | ॲबसेंट माइंडेड ...

छान झाला कट्टा.

सस्नेह's picture

3 Oct 2022 - 5:05 pm | सस्नेह

आणि खंग्री वृत्तांत!
फोटू पाहून डोळे निवू निवू झाले.
पण दृश्यांपेक्षा प्रिय मिपाकरांचेच फोटो भावले.
रंगाभाऊंना या मस्त वृत्तांता साठी आम्रविकेत आल्यावर भारतातून आणलेले चमचमीत पदार्थ भेट देणेत येतील :) :)
आणि अर्थात जे भेटतील त्या सर्वच मिपाकरांनासुद्धा !

सिरुसेरि's picture

3 Oct 2022 - 6:06 pm | सिरुसेरि

छान कट्टा . छान वर्णन . छान फोटो .

चौथा कोनाडा's picture

3 Oct 2022 - 6:23 pm | चौथा कोनाडा

जबरदस्त, खतरनाक, लै भारी कट्टा.

कट्टेकरी मिपाकर्स आणि पार्क, स्टेशन इ पाहून डोळ्यांचे पोट भरले !
चीयर्स मिपाकर्स !

सौन्दर्य's picture

3 Oct 2022 - 11:10 pm | सौन्दर्य

सर्व प्रथम यशस्वी अशा कट्ट्याचे शिकागो येथे आयोजन केल्याबद्दल सर्व उपस्थितांचे अभिनंदन. मी ह्युस्टन येथे राहत आहे म्हणून मी कट्ट्याला फेसबुकद्वारे उपस्थित राहणार होतो पण काही कारणांमुळे ते शक्य झाले नाही त्याची खंत आहेच. मिपावर फारच थोड्यांचे फोटो आहेत त्यामुळे ह्या कट्ट्याद्वारे 'फेस टू नेम' जोडणे शक्य झाले. फोनद्वारे विजुभाऊ व श्रीरंग तसेच त्यांच्या पत्नीशी बोलणे झाले व कट्ट्याला प्रत्यक्ष न भेटल्याची उणीव थोडी कमी झाली.

कट्ट्याचा 'आँखो देखा हाल' वाचून प्रत्यक्ष कट्ट्यातच आहोत असे वाटले. कट्ट्याचे ओघवते व समर्पक वर्णन व सुंदर तसेच चमचमीत फोटो बघून मन तृप्त झाले. आपले मिपाकर इतके चौफेर कर्तृत्ववान असल्याचे जाणवून आपण त्यांच्या सोबत आहोत ही जाणीव अगदी सुखद वाटली.

पुढील कट्टा ह्युस्टनला व्हावा ही इच्छा आणि आशा दर्शवून मी माझे दोन शब्द आवरतो.

पॉल पॉट's picture

4 Oct 2022 - 12:28 am | पॉल पॉट

अरे वा. साधारणतः आठ-दहा वर्षाआधी झालेल्या मिपाकरांच्या छोटेखानी कट्ट्याला मीही ऊपस्थीत होतो.

पर्णिका's picture

4 Oct 2022 - 12:29 am | पर्णिका

शिकागो मिपा कट्ट्याचा वृत्तांत आवडला... फोटोही मस्त !