सुखी झोपेचा साथी

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
21 Jan 2020 - 11:19 am

शरीरातील विविध इंद्रियांच्या पेशींना एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी ज्या काही संवाद-यंत्रणा आहेत त्यापैकी हॉर्मोन्सचे स्थान महत्वाचे आहे. ही हॉर्मोन्स विशिष्ट ग्रंथीमध्ये (endocrine glands) तयार होतात आणि मग रक्तातून शरीरात सर्वदूर पसरतात. या विशिष्ट ग्रंथी आपल्या मेंदूपासून ते थेट जननेंद्रियापर्यंत विविध ठिकाणी विखुरल्या आहेत. त्या सर्व मिळून पन्नासहून अधिक हॉर्मोन्सची निर्मिती करतात. त्यापैकी थायरॉइड, इन्सुलिन, अ‍ॅड्रिनल आणि जननेन्द्रीयांची हॉर्मोन्स ही सर्वपरिचित आहेत. याव्यतिरिक्त अन्य काही हॉर्मोन्स शरीरात अल्प प्रमाणात तयार होतात आणि त्यांचेही कार्य महत्वाचे असते. अशाच एका तुलनेने अपरिचित हॉर्मोनचा परिचय या लेखात करून देत आहे. त्याचे नाव आहे मेलाटोनिन (melatonin).

मेलाटोनिनचे उत्पादन

आपल्या मेंदूत ‘पिनिअल’ नावाची एक ग्रंथी असते. (चित्र पाहा).

ok

डोळ्यातील दृष्टीपटलातून निघालेले काही विशिष्ट चेतातंतू या ग्रंथीत पोचतात. हे तंतू उद्दीपित झाले की त्याच्या प्रतिसादातून ही ग्रंथी एका अमिनो आम्लापासून मेलाटोनिन तयार करते. ही सर्व प्रक्रिया वातावरणातील प्रकाशाच्या प्रमाणावर अवलंबून असते. दिवसाचा उजेड संपून जसा अंधार पडू लागतो तसे मेलाटोनिनचे उत्पादन वाढू लागते. मग रात्री ते अत्युच्च पातळी गाठते. जसा पुढचा दिवस उगवतो तसे त्या ग्रंथीचे उद्दीपन थांबते आणि मेलाटोनिनचा नाश होतो. अशी ही या हॉर्मोनच्या स्त्रवण्याची तालबद्धता (rhythm) आहे. मात्र माणसाचे वय आणि सवयी यांनुसार या तालबद्धतेत काही बदल होत असतात ते आता पाहू.

मेलाटोनिन आणि झोपेच्या सवयी

ok

“लवकर निजे, लवकर उठे, तयास उत्तम आरोग्य लाभे”, हे आहे पूर्वापार चालत आलेले सुवचन. एकेकाळच्या कृषीप्रधान संस्कृतीत ते पाळले जात होते. पुढे शहरीकरण, औद्योगिकीकरण वगैरे बदलांमुळे आपली जीवनशैली अर्थातच बदलली. जसा कृत्रिम प्रकाश मुबलक उपलब्ध होऊ लागला, तसे आपल्या रात्री उशीरापर्यंत जागण्याचे प्रमाण वाढत गेले. एकंदरीत समाजावर नजर टाकता आपल्याला लोकांच्या झोपण्याच्या वेळेच्या भिन्न सवयी दिसतात.

• जे लोक पहाटे उठतात, त्यांच्या शरीरात रोज मेलाटोनिनचे उत्पादन संध्याकाळी लवकर सुरु होते. या उलट जे रात्री उशिरापर्यंत जागतात, त्यांच्यात ते तुलनेने उशीराच सुरु होते. तसेच ज्यांची झोप जास्तकाळ असते त्यांच्यात मेलाटोनिन अधिक काळ स्त्रवत असते.
• आता माणसाचे वय आणि मेलाटोनिनचे प्रमाण यांचा संबंध पाहू. बाल्यावस्थेत आपली झोप खूप असते आणि त्याचा शरीरवाढीशी संबंध असतो. जसे मूल किशोरवयीन अवस्थेत जाते तसे रोज संध्याकाळची मेलाटोनिनची स्त्रवण्याची वेळ लांबत जाते. त्यामुळे या वयात रात्री अपरात्री जागण्याची प्रवृत्ती वाढीस लागते.

• मध्यमवयीन माणूस जेव्हा वृद्धत्वाकडे झुकतो तेव्हा मेलाटोनिनचे स्त्रवणे निसर्गतः कमी होत जाते. परिणामी झोप कमी होते. भल्या पहाटे उठून घरात चुळबूळ करणारे म्हातारे तरुणांसाठी त्रासदायक असतात !

प्रकाशाचा प्रकार आणि मेलाटोनिनचे प्रमाण
पृथ्वीवर जिथे उत्तम सूर्यप्रकाश ठराविक काळ उपलब्ध असतो तिथे मेलाटोनिनचे नैसर्गिक दैनंदिन चक्र व्यवस्थित काम करते. कृत्रिम प्रकाश आणि मेलाटोनिन उत्पादन यांचे नाते जरा गुंतागुंतीचे आहे. कुठल्याही ‘प्रकाशाचे’ अंतर्गत घटक असतात आणि त्यांच्या विशिष्ट तरंगलांबी असतात. त्यापैकी ४६०-४८० nm या पट्ट्यातील लांबी असलेला ‘नीलप्रकाश’ शरीरातील मेलाटोनिनचे उत्पादन दाबून टाकतो. त्यादृष्टीने आपल्या वापरातील कृत्रिम प्रकाशाचे प्रकार गेल्या शतकभरात कसे बदलत गेले ते पाहणे रंजक ठरेल. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जगभरात बहुतांश लोक पिवळा प्रकाश देणारे बल्ब (incandescent ) वापरत. त्याच्या प्रकाशात ‘नीलप्रकाशाचे’ प्रमाण खूप कमी होते. आता अलीकडील काही वर्षांतील चित्र पाहा. पिवळ्या बल्ब्सचा वापर झपाट्याने कमी होत गेला आणि LED-बल्ब्सचा वापर वाढता राहिला. या आधुनिक बल्ब्सच्या प्रकाशात नीलप्रकाशाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे जर आपण रात्री अशा प्रकाशात – त्यातही झगमगाटात- अधिक काळ वावरलो, तर त्यामुळे मेलाटोनिनचे उत्पादन कमी होते. परिणामी निद्रानाश होऊ लागतो. गेल्या दोन दशकांत तर आपला विविध इ-साधनांचाही वापर खूप वाढला. या सर्व उपकरणांकडे बघत राहिल्याने डोळ्यात नीलप्रकाशाच्या लहरी मोठ्या प्रमाणात जातात.

मेलाटोनिनची अन्य कार्ये
झोपेच्या प्रक्रियेव्यतिरिक्त हे हॉर्मोन शरीरातील अन्य काही यंत्रणांवरही सकारात्मक परिणाम करते. त्या यंत्रणा अशा आहेत:
१. हृदय व रक्तवाहिन्यांचे कार्य
२. श्वसनयंत्रणा
३. रोगप्रतिकारशक्ती वाढविणे
४. पेशींतील ऊर्जानिर्मिती आणि antioxidant कार्य
५. अन्य हॉर्मोन्सवर प्रभाव : विशेषतः जननेन्द्रीयांशी संबंधित हॉर्मोन्स

वरील सर्व कार्ये बघता मेलाटोनिनचा काही आजारांत औषधी उपयोग होऊ शकेल का ही उत्सुकता निर्माण होते. त्या अनुषंगाने वैद्यकात काही संशोधन झालेले आहे. त्यापैकी बरेचसे प्रयोग प्राण्यांवर झालेले आहेत. त्या तुलनेत मानवी अभ्यास अद्याप पुरेसे झालेले नाहीत. संशोधनाचा मुख्य रोख अर्थात मेलाटोनिन हे निद्रानाशावर उपयुक्त आहे का, यावर आहे. या मुद्द्याचा आता आढावा घेतो.

ok

निद्रानाश आणि मेलाटोनिनचा औषधी उपयोग
समाजातील अनेकांना झोपेच्या समस्यांनी ग्रासलेले असते. त्यामध्ये रात्री उशीरापर्यंत झोप न लागणे, अपुरी झोप इत्यादी समस्या आढळतात. त्यावर उपाय म्हणून जीवनशैलीतील बदल आणि काही पारंपारिक घरगुती तसेच वैद्यकीय औषधे उपलब्ध आहेत. गेल्या दोन दशकांत त्यांत मेलाटोनिनची भर पडू पाहत आहे. प्रयोगशाळेत रासायनिक पद्धतीने तयार केलेले हे हॉर्मोन आता गोळ्या आणि द्रवाच्या रूपांत उपलब्ध आहे. अनेक देशांत ते डॉक्टरांच्या चिठ्ठीविना दुकानांतून सर्रास विकले जात आहे. त्याच्या पुरस्कर्त्यांनी या औषधाला अगदी प्रचारकी स्वरूप आणले आहे. पण निद्रानाशासाठी ते खरंच उपयुक्त आहे का, हा वादाचा मुद्दा आहे. तज्ञांची मतेही काहीशी उलटसुलट आहेत. आतापर्यंत झालेल्या संशोधनानुसार काही मुद्दे असे आहेत:

१. खूप लांब पल्ल्याच्या विमानप्रवासानंतर काही काळ लोकांना ‘जेट- लॅग’ जाणवतो. त्यामुळे संबंधित माणूस अवेळी झोपू लागतो. त्यातून त्याचे नैसर्गिक झोप-जाग हे चक्र बिघडते. अशा प्रसंगी मेलाटोनिनच्या वापराचे काही प्रयोग झाले आहेत. पण या समस्येला मुळात ते द्यावे का, हाच मूळ मुद्दा आहे.
२. निद्रानाश या समस्येसाठी रोज झोपेच्या वेळेआधी ४५ मिनिटे मेलाटोनिन घ्यावे असा एक मतप्रवाह आहे. पण हा उपाय प्रत्येकाला लागू पडतोच असे नाही. त्यासाठी प्रत्येक रुग्णाच्या दैनंदिन जीवनशैलीचा अभ्यास करून निर्णय घ्यावा लागतो.

३. झोप व्यवस्थित लागण्यासाठी औषधापेक्षाही रोज संध्याकाळ नंतर प्रकाश-नियंत्रणाचे उपाय सुचवले गेले आहेत :
a) सध्या लोकांचा मोबाईल आणि संगणकाचा वापर खूप आहे. ही उपकरणे रात्री ८ नंतर वापरताना त्यांच्या पटलावरील प्रकाश हा मंद करण्यात यावा. काही उपकरणांत तो नारिंगी रंगछटेकडे झुकवता येतो.
b) काही लोकांना रात्री ८ नंतर भव्य दुकानांत जाण्याची सवय असते. अशा ठिकाणी LED दिव्यांचा अक्षरशः झगमगाट असतो. लेखात वर दिल्याप्रमाणे या प्रकाशझोतात नीलप्रकाशाचा मोठा वाटा असतो. निद्रानाशाची समस्या असणाऱ्यांनी अशा ठिकाणी वावरताना डोळ्यांवर नीलप्रकाशाला अवरोध करणारे गॉगल्स वापरावेत.
c) एक महत्वाची सूचना तर दखलपात्र आहे. ती म्हणजे आपल्या झोपेच्या वेळेच्या तासभर आधी सर्व प्रकारच्या इ-उपकरणांचा वापर बंद करावा !

४. मेलाटोनिन हे औषध म्हणून उपयुक्त ठरण्यासाठी शरीरातील अनेक घटकांचा विचार करावा लागतो. रुग्णाचे वय आणि शारीरिक अवस्था हे प्राथमिक घटक आहेत. त्याच्या पचनसंस्था, यकृत आणि मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित असणे महत्वाचे असते. तसेच एखादा दीर्घकालीन आजार असल्यास मेलाटोनिनच्या उपयुक्ततेवर परिणाम होतो. रुग्ण जर अन्य काही औषधे रोज घेत असेल, तर मेलाटोनिन दिल्यानंतर त्या औषधांचा प्रभाव देखील कमी होऊ शकतो.

५. वरील सर्व मुद्दे बघता मेलाटोनिनच्या औषधी उपयुक्ततेबद्दल बऱ्याच शंका उपस्थित होतात. एक औषध म्हणून प्रमाणित मात्रेत ते प्रौढासाठी सुरक्षित आहे. मुलांत आणि किशोरावस्थेत मात्र त्याचा वापर टाळलेला बरा. मुळात त्याची गरज आणि उपयुक्तता वादग्रस्त आहे. सध्या तरी निद्रानाशाच्या रुग्णासाठी पारंपरिक औषधांचाच वापर करावा. सर्व नेहमीचे उपाय थकले असतील तरच मेलाटोनिनच्या पर्यायाचा विचार व्हावा, असे तज्ञ सांगतात. मुळात ते झोप ‘आणणारे’ औषध नसून झोपेचे एक नियंत्रक आहे.

मेलाटोनिनचे अन्य औषधी उपयोग
काही प्रकारच्या डोकेदुखींत त्याचा उपयोग होऊ शकतो. मेलाटोनिनच्या antioxidant गुणधर्माचा एका क्षेत्रात चांगला वापर करता येतो. ज्या लोकांना किरणोत्सर्गाला जास्त प्रमाणात सामोरे जावे लागते, त्यांच्यात किरणोत्सर्गाचे दुष्परिणाम कमी होण्यासाठी मेलाटोनिनचा वापर गरजेनुसार करता येतो.

याव्यतिरिक्त अन्य काही आजारांत मेलाटोनिन उपयुक्त असल्याचे जे काही दावे केले आहेत त्यात मात्र तथ्य नाही. असे काही आजार म्हणजे कर्करोग, फिट्सचा विकार, मासिक पाळीतील वेदना आणि काही मनोविकार. यासंदर्भात अजून भरपूर संशोधनाची गरज आहे.
गेल्या १० वर्षांत प्रगत देशांत मनःशांतीसाठी (!) उठसूठ मेलाटोनिन घ्यायची लाट आलेली दिसते. हे हॉर्मोन अधिकृत औषधाव्यतिरिक्त खुल्या बाजारात देखील ‘’वनस्पतीजन्य’ वगैरे लेबले लावून विकले जाते. ते जीवनसत्व असल्याचा अपप्रचार देखील होत असतो. त्यामुळेच त्याचा गैरवापर वाढत गेला. बिगर औषधी स्वरूपातल्या मेलाटोनिनच्या गोळ्यांमधील शुद्ध मेलाटोनिनचे प्रमाण नियंत्रित नाही. त्यामध्ये अन्य हॉर्मोन्स वा रसायनांची भेसळ आढळली आहे. शालेय वयातील मुलांनी त्याचा अनियंत्रित वापर केल्याच्या काही घटना घडल्या आहेत. त्यातून त्यांना डोकेदुखी, वर्तणुकीतील बदल, प्रमाणाबाहेर झोपणे आणि झोपेत अंथरुणात लघवी होणे असे दुष्परिणाम झाल्याचे दिसते.

सरतेशेवटी एक महत्वाचा मुद्दा. आपली रोजची झोप लागण्याची प्रक्रिया ही गुंतागुंतीची आहे. त्यामध्ये अनेक चेतातन्तूंची कार्ये आणि बरीच रसायने भाग घेतात. त्या सर्वांच्या समन्वयातून आपले नैसर्गिक ‘झोप-जाग’ चक्र कार्यरत असते. मेलाटोनिन हा या मोठ्या प्रक्रियेतील फक्त एक घटक आहे. तेव्हा विविध निद्राविकारांवर तो काही एकमेव रामबाण उपाय होऊ शकत नाही. किंबहुना त्याच्यावरील मानवी संशोधन अजूनही अपुरे आहे. सामान्यजनांनी त्यासंबंधीची प्रसारमाध्यमांतील अर्धवट आणि प्रचारकी माहिती वाचून वैद्यकीय सल्ल्याविना त्याचा औषध म्हणून स्व-वापर करू नये हे उत्तम.
****************************************************

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

तपशीलवार माहितीपूर्ण लेख. आवडला.

जालिम लोशन's picture

21 Jan 2020 - 5:42 pm | जालिम लोशन

नेहमी प्रमाणे ऊत्तम.

सुमेरिअन's picture

22 Jan 2020 - 12:43 am | सुमेरिअन

माझ्यासाठी खूप महत्वाचा लेख!

मला रात्री लवकर झोप येत नाही. वय ३४ वर्षे. आजवर कुठला 'मेडिकल' उपाय वापरला नव्हता. मी ३ आठवड्यांपूर्वी ऍमेझॉन वरून मेलॅटोनीन(३ mg) च्या टॅब्लेट्स ऑर्डर केल्या.
https://www.amazon.com/gp/product/B0149LAJTW/ref=ppx_yo_dt_b_asin_title_...
पहिल्या रात्री हाल्फ, दुसऱ्या रात्री १.५ आणि नंतर १-२ दिवसांनी २ टॅब्लेट्स घेतल्या. थोडा फार फरक जाणवला.
या लेखामधून मला अतिशय महत्वपूर्ण माहिती मिळाली (पहिले बरंच गूगल केलं होतं, पण हा लेख सोप्या पद्धतीनी १०० पट अधिक माहिती देऊन गेला). अनेक धन्यवाद!

कुमार१'s picture

22 Jan 2020 - 8:02 am | कुमार१

* आजी, जा लो ,
धन्यवाद !

* सुमेरीअन,
तुम्हाला कोणतेही औषध न घेता शांत झोप मिळो, यासाठी शुभेच्छा !

चांगली झोप येण्यासाठी "वेटेड ब्लॅन्केट" चा खूप उपयोग होतो असे ऐकिवात आहे.
कोणास या ब्लॅन्केटचा अनुभव आहे का?

मध्यंतरी आजारपणानंतर झोपेचा फार त्रास सुरू झाला होता, अंथरुणात पहुडल्यावर अनेक तास झोप लागतच नसे, त्यामुळे ते वजनदार ब्लँकेट मागवले. ते पांघरून तर अजिबात झोपताच आले नाही. घरच्या सगळ्या मंडळींना (बायको, मुलगा, सून) हाच अनुभव आल्याने ते परत केले. एवढे ओझे शरीरावर घेतल्यानेच कसेतरी वाटते. झोप कसली येणार ?
कुणाला वापरून बघायचे असल्यास ते परत करता येईल अश्या ठिकाणाहूनच (अ‍ॅमॅझोन वगैरे) मागवावे.

चित्रगुप्त, तुमचा वेटेड ब्लॅंकेटचा अनुभव आवर्जून येथे सांगितल्या बद्दल धन्यवाद.
ह्या ब्लॅंकेटचे वजन तुमच्या शरीराच्या वजनाच्या १० ते १५% असावे असे सांगतात.
तुम्ही वापरलेल्या ब्लॅंकेटचे वजन ह्या प्रमाणात होते का?
बेडरूम मधील तापमान आणि उजेड नियंत्रित होता का?

सुरवातीला एक ते दोन दिवस (म्हणजे रात्र) अंगावर जड वजन असल्यासारखे वाटेल परंतु एकदा सवय झाली हि चान्गला अनुभव येतो.
काही लोकांना कितीही उकडत असले तरी अंगावर एखादी पातळ चादर घेतल्याशिवाय झोप येत नाही अश्या लोकांना उपयोग होईल असे वाटते.

अर्थात हा अनुभव व्यक्तिसाक्षेप असेल हेही तितकेच खरे आहे.

आमच्यासारख्या 'घुबड'* लोकांना निश्चितच फायदा होईल असा लेख. धन्यवाद.

*(कितीही दमलेलो असलो, काहीही झालं तरी रात्री दोन-तीन वाजेपर्यंत झोप काही उतरत नाही डोळ्यांत. आणि झोप लागलीच तरी पहाटे पाचला जाग येतेच येते. चोवीस तासांपैकी फार फार तर तीन ते चार तासच झोप होते माझी. त्यामुळे गाढ झोपू शकणाऱ्या माणसांप्रती मला विलक्षण आदर आहे :-) )

आयला आणि आम्हाला तुमचा हेवा..
कारण मझ्यसरखे लोक असे आहेत ज्याना रात्री १० वाजले की डोळे मिटायला लागतात

कुमार१'s picture

22 Jan 2020 - 11:20 am | कुमार१

आमच्यासारख्या 'घुबड'* लोकांना निश्चितच फायदा होईल असा लेख.

>>>>> सही !
चामुंडराय,
त्याबद्दल काहीच माहिती नाही. वाचायला उत्सुक.
एस,
जवळजवळ दीड वर्षांनी तुमची भेट होतीय. शुभेच्छा आणि शुभरात्री !!

सुधीर कांदळकर's picture

22 Jan 2020 - 11:57 am | सुधीर कांदळकर

मॅलॅटोनीनचे नावही ऐकले नव्हते. मॅलॅटोनीनच्या गुणधर्माचे वर्णन कुठेही उदात्तीकरण न करता वस्तुनिष्ठ असे केले आहे. आपल्या लेखनातला हा गुण मला फारच आवडतो.

प्रकाश आणि झोप यांच्या परस्परसंबंधाचा आयझॅक अ‍ॅसिमॉव्ह यांनी त्यांच्या फाउंडेशन सिरीज कादंबर्‍यात फार छान वापर केलेला आहे. किंबहुना प्रकाश आणि मानवी मानसिक संतुलन याचाच संबंध दाखवला आहे.

नॉर्वेस्वीडनफिनलंडसारख्या देशात उच्च अक्षांशावर राहणार्‍या लोकांना दिवस्/रात्र यांच्या लांबीत होणार्‍या फरकामुळे मानसिक तणाव आणि झोपेबद्दलच्या समस्या यांचा सामना करावा लागतो असे ऐकून्/वाचून आहे. या विषयावर आणखी एक लेख लिहावा अशी नम्र विनंती.

रच्याकने मी मात्र झोपेच्या बाबतीत राजा आहे बरं का. मला उजेड, आवाज- अगदी ढोलताशे देखील यांचा त्रास होत नाही. रात्री नऊसाडेनऊला हमखास झोप येते. फक्त डास वगैरे आले वा हाक मारून उठवले तरच झोपेतून उठतो. अगदी चित्रवाणीवर संगीताचा कार्यक्रम वा चेंडूफळी/फुटबॉल्/टेनिस सामना पाहता पाहता पण कधीकधी झोप लागते. मुंबईत अख्ख्या कॉलनीत जास्तीत जास्त झोपा काढणारा माणूस म्हणून आमचे उत्तमांग माझा सन्मान करीत असे.

छान लेखाबद्दल धन्यवाद.

मॅलॅटोनीनचे नावही ऐकले नव्हते.
हेच म्हणतो. मॅलॅटोनीनचा सध्या वापर करतोय, उपयोगी आहे. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Vaseegara | Geethiyaa Varman | Music Cover

मदनबाण's picture

20 Aug 2022 - 7:17 pm | मदनबाण

युट्युबवर इकडचे तिकडचे व्हिडियो पाहताना अचानक ओशोंचा एक व्हिडियो माझ्या पाहण्यात आला. त्याचे सार म्हणुन मी माझ्या श्वसन प्रक्रियेत बदल केले. या नंतर मला कोणतीही गोळी / मॅलॅटोनीन ची गोळी खावी लागली नाही. तसेही मला औषधे खायला आवडत नाहीत, त्यात झोपेसाठी लागणे अजुन त्रासदायक वाटायचे पण आता त्याची गरज अजुन तरी भासली नाही.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हृदयी वसंत फुलताना-Hridayi Vasant Phultana Full Song :- Takatak 2

कुमार१'s picture

21 Aug 2022 - 9:39 am | कुमार१

श्वसन प्रक्रियेत बदल केले.

>>> उत्तम ! हे नैसर्गिक उपाय चांगलेच.

कुमार१'s picture

22 Jan 2020 - 12:42 pm | कुमार१

सुधीर,
तुमचा प्रतिसाद अगदी रंजक असल्याने त्याची स्वतंत्र दखल आवश्यक.

१. आयझॅक अ‍ॅसिमॉव्ह यांनी त्यांच्या फाउंडेशन सिरीज कादंबर्‍यात >>>>
याबद्दल आम्हाला ओळख करून द्यायची जबाबदारी तुमचीच आहे !

२. नॉर्वे, स्वीडन, फिनलंडसारख्या देशात झोपेबद्दलच्या समस्या>>>>
होय, हा विषय तसा रोचक आहे. सवडीने नक्की वाचन करेन.

३. अख्ख्या कॉलनीत जास्तीत जास्त झोपा काढणारा माणूस>>>>

हे तुमचे बिरूद आयुष्यभर टिको, अशीच शुभेच्छा ! हे सर्वोच्च सुख आहे हेवेसानल ....

रच्याकने....
तुमचा तो ‘उत्तमांग’ शब्द लै झकास असून तो आमच्या उत्तमांगाला सांगण्यात येईल !!

मुक्त विहारि's picture

22 Jan 2020 - 4:30 pm | मुक्त विहारि

माहितीपर लेख आवडला.

वामन देशमुख's picture

22 Jan 2020 - 9:24 pm | वामन देशमुख

सर्वसाधारणपणे, बेडवर गेल्यावर दोन ते पाच मिनिटात मला डाराडूर झोप लागते. सहा ते सात तासांची झोप पुरते. सकाळी सहाच्या नंतर उठण्यासाठी अलार्मची गरज क्वचितच भासते.
मी कोणत्या कॅटेगरीत आहे?

कुमार१'s picture

23 Jan 2020 - 7:46 am | कुमार१

तुम्ही एकदम नैसर्गिक व आरोग्यपूर्ण शैलीत आहात, असे म्हणतो .
असेच राहा, शुभेच्छा !

मराठी कथालेखक's picture

23 Jan 2020 - 3:17 pm | मराठी कथालेखक

सुमेरिअन , एस ,
मी लिहलेल्या (माझ्या अनुभवावर आधारित) धाग्याचा दुवा देतो. हे उप्तादन काही दिवस सलग नक्की वापरुन बघा असे मी सुचवेन.
उत्पादन परिचय : झोप येण्याकरिता चहा

श्वेता२४'s picture

23 Jan 2020 - 3:31 pm | श्वेता२४

मुलगा लवकर झोपत नसल्याने या काही वर्षात झोपेची ठरावीक वेळ पाळली जात नाही. मुलगा पूर्ण अंधार केल्याशिवाय झोपतच नाही. पण अंधार केला की साधारण अर्धा तासात झोपतो. त्यामुळे तुम्ही दिलेली माहिती माझ्या अनुभवाबरोबर एकदम जुळली.धन्यवाद

धन्यवाद मराठी कथालेखक! ऍमेझॉन वरून ऑर्डर केलं आहे. वापरून गुण आला कि सांगतो.

कुमार१'s picture

24 Jan 2020 - 7:45 am | कुमार१

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार .
चहाची माहिती उपयुक्त

नेहमीप्रमाणेच छान आणि माहितीपूर्ण लेख!

झोपेच्या वेळेच्या तासभर आधी सर्व प्रकारच्या इ-उपकरणांचा वापर बंद करावा !

हे आचरणात आणणे थोडे कठीण वाटतंय, पण त्यादृष्टीने प्रयत्न नक्की करण्यात येतील 😀
धन्यवाद आणि पुढील लेखनास शुभेच्छा!

इथल्या चर्चेतून एक लक्षात आले. मेलाटो. हे ऑनलाईन खुल्या बाजारात देखील मिळत असल्याने काही लोक ते वैद्यकीय सल्ल्याविना घेत आहेत; जे योग्य नाही. त्या अनुषंगाने काही नव्या संशोधनाची भर घालतो:

१. अंथरुणात पडल्यावर झोप येण्यास जो बराच वेळ लागतो, तो मेलाटो.च्या वापराने फक्त १० मिनिटे कमी होतो.

२. मेलाटो.हे निद्रानाशापेक्षाही दाह प्रतिबंधक आणि कर्करोगोपचार-पूरक म्हणून अधिक उपयुक्त ठरू शकेल.

३. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी मेलाटो.चा स्व-वापर टाळावा. कारण त्या आजाराची औषधे आणि मेलाटो. यांची शरीरात अनिष्ट मारामारी होऊ शकते.
४. काही संधिदाह आणि ऑटोइम्यून आजारांच्या रुग्णांनीही त्याचा वापर टाळावा.

तुमच्या सर्व लेखांप्रमाणेच माहितीप्रद आणि सुबोध. क्लिष्ट शास्त्रीय माहिती सर्व सामान्यांना समजेल अशा भाषेत सांगण्याची तुमची हातोटी विलक्षण आहे.
"झोपेच्या वेळेच्या तासभर आधी सर्व प्रकारच्या इ-उपकरणांचा वापर बंद करावा" हे आचरणात आणण्याचा अवधड प्रयत्न करणे आले.

डॉ श्रीहास's picture

29 Jan 2020 - 7:25 pm | डॉ श्रीहास

सर अतिशय मोलाचा विषय घेतल्याबद्दल तुमचे आभार _/\_

माझी काही मतं मांडतो , ह्यावर चर्चा होणं अजून मोलाचं आहे
१.दिर्घकालीन आजार हृदयविकार,मधूमेह आणि पार्किसन्स असणाऱया रूग्णामध्ये झोपेच्या तक्रारी
इतरांपेक्षा बऱ्याच जास्त आढळतात परंतू ह्यावर पेशंट किंवा डाॅक्टर फारसं लक्ष देतांना आढळत नाहीत !!
२.Obstructive Sleep Apnoea (OSA) आणि Restless leg syndrome .... ह्यावर जनमानसात आणि डाॅक्टर प्रचंड अज्ञान दिसतं , मी थोडसं का होईना ह्यात काम करत असल्यानी मला जाणवलं आहे . ह्यावर आपण सर्व मिपाकर डाॅक्टर मंडळींनी मिळून दीर्घ लेखमाला लिहायला हवी !!
३.Depression आणि बऱ्याच मानसिक आजारांमधल्या रुग्णांची झोप पुरेशी न होत असल्यानी त्यांची लक्षणं कमी होण्याऐवजी वाढतात किंवा औषधांची मात्रा वाढतांना दिसते.
४.आहारात मॅग्नेशीयम ची कमतरता हे देखील झोप कमी होण्याचं अतिमहत्वाचं कारण आहे.
५.व्यायाम किंवा शारीरिक श्रमाचा अभाव हे सर्वात महत्वाच्या कारणांपैकी एक ज्यावर कोणीही काही करणं तर सोडा बोलतांना आढळत नाही.
६.Blue light filter glasses ... चष्म्यांच्या काचा वापरूनही मेलाॅटोनीनचे प्रमाण कमी होतं असं वाचण्यात आलं आहे परंतू खात्रीलायक माहिती मिळाली नाहीये. सध्याच्या स्मार्टफोन मधे ब्ल्यु लाईट फिल्टर चं ॲप किंवा सेटींग आहेत (तुम्ही सांगीतलं आहेच) त्यावापरूनही बघणं महत्वाचं ठरेलच.

कुमार१'s picture

29 Jan 2020 - 7:38 pm | कुमार१

बरेच दिवसांनी तुम्ही भेटलात, आनंद झाला.
OSA वर तुम्ही लिहाच .

व्यायाम किंवा शारीरिक श्रमाचा अभाव हे सर्वात महत्वाच्या कारणांपैकी एक ज्यावर कोणीही काही करणं तर सोडा बोलतांना आढळत नाही.
>>>
+१११११११११...... अगदी !

कुमार१'s picture

18 Apr 2020 - 9:47 am | कुमार१

कोविदने लादलेल्या संचारबंदीमुळे लोकांच्या झोपेवर काही परिणाम झाल्याचे दिसले. त्यातील काही निरीक्षणे:

१. रोज सकाळी उठून कामावर जायचे नसल्याने ‘उशीरा झोपे, उशीरा उठे’ अशी सवय लागतेय. त्यातून आळशीपणा अंगात मुरतोय.
२. ज्यांनी घरकाम व छंदात रमवून घेतले आहे त्यांची झोप छान होत आहे. पण ज्यांना ‘घरी बसून काय करू’ या प्रश्नाने छळले आहे, त्यांची झोप मात्र बिघडते आहे.

३. कॉलेज तरुण/ तरुणी जाम खूष आहेत. रात्री हवे तेवढे जागून सकाळी मनाप्रमाणे केव्हाही उठता येतंय. हे त्यांच्यासाठी स्वर्गसुख आहे !

४. एकूणच मोबाईल व कम्प्युटरचा वापर वाढल्याने डोळ्यांवरचा ताण वाढतो आहे.

..... एकूण आपले जैविक घड्याळ अनियमित होताना दिसतंय.

नेहेमीसारखाच माहितीपूर्ण आणि उपयोगी लेख - प्रश्नोत्तरे तर आणखीनच छान!

व्यायाम/शारीरिक श्रमाचा दिनक्रमात नुस्ता पुरेसाच नव्हे तर साधारणपणे रोज त्याच वेळी समावेश असणे याचा झोपेकरता तर बराच फायदा होतोच पण त्यातून एकूणच तब्येत चान्गली राखणे हे ही सोपे जाते.

इतर काही: रात्रीच्या जेवणात काय खाल्ले असेल यावर ही स्वस्थ झोप लागणे अवलम्बून असते - जसे जर तळकट खाल्ले असेल तर झोप अस्वस्थ असू शकते.

पारम्परिक "हळद घातलेले कोमट दूध" किन्वा "काही क्लिष्ट वाचणे" अशा गोष्टीन्चा झोप येण्याकरता कितपत हमखास उपयोग होतो?

कुमार१'s picture

19 Apr 2020 - 10:19 am | कुमार१

धन्यवाद.

पारम्परिक "हळद घातलेले कोमट दूध" किन्वा "काही क्लिष्ट वाचणे" अशा गोष्टीन्चा झोप येण्याकरता

>>>

झोप चांगली येण्यासाठी रात्री ‘काय खावे /करावे’ हा विषय तसा क्लिष्ट आहे. यात व्यक्तीसापेक्षता अधिक आहे. पुरेसे शास्त्रीय प्रयोग करून सिद्ध झालेल्या गोष्टी कमी आहेत.

काही मुद्दे नोंदवतो:
१. क्लिष्ट वाचणे : याने मेंदूला थकावट येऊन जांभया येऊ शकतात. मला याचा चांगला अनुभव आहे.

२. खाणे व झोप : बदाम, अक्रोड व चीज यांत मेलाटोनीन असते. त्यामुळे रात्री ते खाल्ल्यास उपयोग होऊ शकेल.

३. चहा वगैरेत केफिन असल्याने ते झोप येण्यात अडथळा निर्माण करू शकते. म्हणून रात्री ही पेये टाळावीत, असा एक मतप्रवाह आहे.

या गोष्टींचे सरसकटीकरण करता येत नाही. व्यक्तिगत अनुभवानुसार ठरवावे.

मदनबाण's picture

19 Apr 2020 - 5:42 pm | मदनबाण

माहितीपूर्ण लेखन !

अवांतर :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jaathikkathottam... :- Thanneer Mathan Dinangal

सुमेरिअन's picture

29 Jul 2020 - 12:33 am | सुमेरिअन

कुमार साहेब, इकडे अमेरिकेला मेलॅटोनीन स्टोअरमधे किंवा online सर्रास मिळते. मी मागे बोललो तसं मी ३ mg वाल्या टॅबलेट्सची एक बाटली बोलावली होती (तुमचा लेख येण्याच्या २ आठवडे आधी).

गेल्या काही महिन्यातला माझा अनुभव असा - अर्धी टॅबलेट (१.५ mg) हा परफेक्ट डोस आहे माझ्यासाठी (अर्ध्या तासात झोप लागते आणि सकाळी drowsy / sleepy वाटत नाही. माझं वय ३४). On an average २ आठवड्यातून एकदा अर्धी टॅबलेट घेतो मी (अगदीच झोप येत नसेल उशिरापर्यंत तेव्हा किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी काही महत्वाची मीटिंग असेल तेव्हा). १.५ mg इन २ विक्स किंवा १ वीक - हे acceptable असू शकतं का? (आपण लिहिल्याप्रमाणे मेलॅटोनीन घ्यायलाच नको हे जाणून आहे. आणि मी दिलेल्या तुटपुंज्या माहितीच्या आधारावर कदाचित डायरेक्ट असा उत्तर पण देता येणार नाही. तरी पण हि शंका आपल्याला विचारावी वाटली)

डॉ श्रीहास's picture

27 Aug 2020 - 1:38 pm | डॉ श्रीहास

मॅग्नेशिअम सप्लीमेंट्स सुरू करा , मेलाटाॅनीन फक्त खूप मोठा प्रवास किंवा जेट लॅग साठीच वापरा.

कुमार१'s picture

29 Jul 2020 - 8:37 am | कुमार१

सुमेरीअन,

आता इथून सल्ला म्हणजे तुम्ही जे कंसात लिहिलं आहे तोच !
मला असे वाटते की तुम्ही एकदा निद्रातज्ञांशी सल्लामसलत करा. स्वतःच्या मनाने असे एखादे हॉर्मोन तरुण वयातच लावून घेणे योग्य नाही. त्यांच्याशी सल्लामसलत केल्यावर ते तुम्हाला अन्य काही गोष्टी देखील सुचवू शकतील.

झोपेच्या संदर्भात शक्यतो निसर्गाला जवळ असणाऱ्या उपायांकडे माणसाने वळावे.

सुमेरिअन's picture

31 Jul 2020 - 3:11 am | सुमेरिअन

नक्कीच! धन्यवाद कुमार साहेब!

कुमार१'s picture

2 Feb 2021 - 11:44 am | कुमार१

ज्येष्ठांची दुपारची झोप आणि त्याचा आकलनक्षमतेवरील परिणाम हा एक संशोधनाचा रोचक विषय आहे. यावर आतापर्यंत अनेक संशोधने झालीत आणि त्यांचे निष्कर्ष उलट-सुलट आहेत. त्यांचा आढावा घेणारा एक शास्त्रीय लेख नुकताच वाचला. त्यातील काही मुद्दे :

१. वाढत्या वयानुसार शरीरातील दाहप्रक्रिया वाढत जातात. शरीराचा यावरील एक नैसर्गिक प्रतिसाद म्हणून झोप काम करते. दाहाच्या प्रमाणानुसार झोपेचे प्रमाण वाढते.

२. दुपारच्या झोपेचा कालावधी दहा मिनिटे ते दीड तास असल्यास त्याचा आकलनक्षमतेवर चांगला परिणाम होतो. मात्र दोन तासांहून अधिक काळ असल्यास दुष्परिणाम होऊ शकतो.

३. रात्रीची झोप कमी झाल्यास पुढच्या दिवशीची दुपारची झोप जास्त येणे हे नैसर्गिकच. पण रात्रीची व्यवस्थित असूनही जर दुपारची दीर्घकाळ होत असेल तर तज्ञांचा सल्ला घ्यावा.

बापूसाहेब's picture

11 Mar 2021 - 6:23 pm | बापूसाहेब

१. वाढत्या वयानुसार शरीरातील दाहप्रक्रिया वाढत जातात. शरीराचा यावरील एक नैसर्गिक प्रतिसाद म्हणून झोप काम करते. दाहाच्या प्रमाणानुसार झोपेचे प्रमाण वाढते.

दाहप्रक्रिया म्हणजे काय??

अजुन एक.. सध्या WFH असल्यामुळे दिवसातील जागेपनातील जवळपास 70-80% वेळ स्क्रीन समोर जातो. लॅपटॉप, मोबाईल किंवा टीव्ही..
त्यामुळे झोपेवर काही परिणाम होऊ शकतो का?? कधीकधी पडल्या पडल्या झोप लागते आणि 9-9.5 तास काही जाग येत नाही.. . आणि कधीकधी पहाटे 4 वाजले तरी झोप येत नाही.. डोळयांवर झोप दाटून येते पण प्रयत्न केला तरी झोप लागत नाही....

बदललेल्या या लाइफस्टाइल मुळे असं अजुन कोणाला होते का??

कुमार१'s picture

11 Mar 2021 - 6:47 pm | कुमार१

१.

दाहप्रक्रिया म्हणजे काय??

दाहप्रक्रिया म्हणजे . आयुष्यभर शरीरावर जंतू वा अन्य पर्यावरणीय घटकांचे ‘हल्ले’ होत असतात. त्यावर शरीरपेशी जो प्रतिसाद देतात त्यालाच दाहप्रक्रिया म्हणतात. वाढत्या वयानुसार अशा अनेक प्रक्रियांमुळे काही प्रमाणात शरीरहानी होऊ लागते.

२.

लॅपटॉप, मोबाईल किंवा टीव्ही..
त्यामुळे झोपेवर काही परिणाम होऊ शकतो का??

होय, अर्थातच त्याचा परिणाम होतो. म्हणूनच लेखात हे वाक्य दिले आहे :

झोपेच्या वेळेच्या तासभर आधी सर्व प्रकारच्या इ-उपकरणांचा वापर बंद करावा !

कुमार१'s picture

11 Mar 2021 - 7:02 pm | कुमार१

दाहप्रक्रिया म्हणजे Inflammation .

कुमार१'s picture

11 Mar 2021 - 5:05 pm | कुमार१

Benzodiazepines गटातील झोप येण्याची औषधे टाळावीच हे सुचविणारे एक छान व्यंगचित्र :

ok

ती घेणे म्हणजे मेंदूवर हातोडा मारून त्याला चूप बसवणे !

मराठी_माणूस's picture

11 Mar 2021 - 6:45 pm | मराठी_माणूस

Benzodiazepines हे मॉडर्न मेडीसिन ह्या गटात येते का ?

कुमार१'s picture

11 Mar 2021 - 6:51 pm | कुमार१

होय,

उदा. diazepam ( Calmpose )

मराठी_माणूस's picture

11 Mar 2021 - 7:04 pm | मराठी_माणूस

मॉडर्न मेडीसिन बाबत काहीतरी टीकात्मक ?

कुमार१'s picture

11 Mar 2021 - 7:18 pm | कुमार१

होय
या गोळ्या लोक डॉ च्या सल्ल्याविना उठसूठ घेत असतात
. त्या तशा घेऊ नका हे सुचविणारे चित्र.

कर्नलतपस्वी's picture

18 Mar 2021 - 3:34 am | कर्नलतपस्वी

सुदंर माहितीपुर्ण, क्लिष्ट विषय सोप्या साध्या शब्दात मांडलाय. सर्वानांच काही तरी घेण्यासारखे, धन्यवाद
आयुष्यात शिस्तबद्ध जगण्यास फार महत्त्वाचे. बायोलाँजीकल क्लॉक काही असते का?
वय वर्षे सहासष्ट, आजपर्यंत रात्री दहानंतर जागलो नाही साडेपाच नंतर झोपलो नाही. अर्थात काही अपवादात्मक परिस्थितीत ही सवय पाळू शकलो नाही. दुपारी तीस ते चाळीस मीनीटे वामकुक्षी .नियमित व्यायाम आणि साधे शाकाहारी भोजन सारख्या सवयीमुळे स्वास्थ्य ठिक. प्राप्त परिस्थितीत शिस्तबद्ध जिवन जगल्यास निद्रानाश कमी होईल असे वाटते.

माहितीपूर्ण लेख आवडला. नीट झोप लागण्याबद्दल लेखात मांडलेले मुद्दे खरेतर साधे-सरळ असले , तरी एकूणातच हल्लीचे कमालीचे बेगडी वातावरण आणि निर्बुद्ध करमणूकीचा अखंड कोसळणारा धबधबा, यातून त्या साध्या गोष्टी पाळणे सुद्धा कठीण होऊन बसले आहे.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जगभरात बहुतांश लोक पिवळा प्रकाश देणारे बल्ब (incandescent ) वापरत. त्याच्या प्रकाशात ‘नीलप्रकाशाचे’ प्रमाण खूप कमी होते. आता अलीकडील काही वर्षांतील चित्र पाहा. पिवळ्या बल्ब्सचा वापर झपाट्याने कमी होत गेला आणि LED-बल्ब्सचा वापर वाढता राहिला. या आधुनिक बल्ब्सच्या प्रकाशात नीलप्रकाशाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे जर आपण रात्री अशा प्रकाशात – त्यातही झगमगाटात- अधिक काळ वावरलो, तर त्यामुळे मेलाटोनिनचे उत्पादन कमी होते. परिणामी निद्रानाश होऊ लागतो. गेल्या दोन दशकांत तर आपला विविध इ-साधनांचाही वापर खूप वाढला. या सर्व उपकरणांकडे बघत राहिल्याने डोळ्यात नीलप्रकाशाच्या लहरी मोठ्या प्रमाणात जातात.

.... हे खूपच महत्वाचे कारण आहे.
अमेरिकेत एक गंमतशीर प्रकार बघायला मिळतो. रात्री बाहेर फिरायला निघाले की कोणत्या घरात गोरे अमेरिकन रहात आहेत आणि कोणत्यात भारतीय, हे घरातल्या प्रकाशावरून सहज ओळखता येते. अमेरिकनांच्या घरात पिवळे दिवे तर भारतियांच्या घरात हमखास पांढरे दिवे लागलेले असतात.
अलिकडे मी माझ्या चित्रकलेच्या खोलीत ५००० केल्विन चे दिवे वापरतो आहे. पिवळट आणि निळसर यांच्या मधला पांढरा प्रकाश यातून मिळतो.
बाकी संध्याकाळचे जेवण सात-साडेसात पर्यंत आटोपणे, झोपण्यापूर्वी एक तास मोबाईल. टीव्ही बगैरे बंद करून पायी फिरायला जाणे, आवश्यक तेवढा व्यायाम करत रहाणे, करमणुकीच्या अतिरेकापेक्षा काहीतरी सृजनात्मक छंदात वेळ घालवणे हे नक्कीच हितकारक ठरावे.

कुमार१'s picture

18 Mar 2021 - 8:14 am | कुमार१

वरील दोन्ही प्रतिसाद सुंदर !
कर्नल,

बायोलाँजीकल क्लॉक काही असते का?

होय. अर्थातच आपल्या मेंदूमध्ये एक जैविक घड्याळ असते. त्याचा लेखात झोपजाग चक्र असा उल्लेख केलेला आहे.

तुमची जीवनशैली उत्तम आहे. शुभेच्छा !
…………………………..

कुमार१'s picture

18 Mar 2021 - 8:16 am | कुमार१

चित्रगुप्त,

अमेरिकनांच्या घरात पिवळे दिवे तर भारतियांच्या घरात हमखास पांढरे दिवे लागलेले असतात.
५००० केल्विन चे दिवे वापरतो आहे. पिवळट आणि निळसर यांच्या मधला पांढरा प्रकाश

>>>>
अगदी रोचक निरीक्षणे आहेत.

यावरून पंधरा वर्षापूर्वीच्या माझ्या परदेशातील घरातील परिस्थिती आठवली. मला दिलेले घर हे ब्रिटिश धाटणीचे होते. सर्व खोल्यांमध्ये त्यांनी मुळात पिवळे दिवे दिले होते. सुमारे दोन वर्ष मी तेच वापरत होतो. नंतर मात्र आमच्या कुटुंबीयांनी, “या सर्व पिवळ्या प्रकाशात फार रोगट व वाटते बुवा !” असा कौटुंबिक ठराव केला आणि एके दिवशी आम्ही ते सर्व पिवळे बदलून पांढरे दिवे लावल्याचे आठवते.

व्यक्तिगत वाचनासाठी पिवळा बल्ब बसलेला टेबलदिवा सर्वात उत्तम, असे आम्हाला नेत्रतज्ञांनी शिक्षणादरम्यान सांगितले होते. पांढऱ्या ट्यूबचा प्रकाश वाचनास तितका चांगला नाही. तरीसुद्धा एकंदरीत आपण भारतीय ‘लख्ख पांढरा प्रकाश म्हणजे कसे प्रसन्न वाटते’ या विचारांचे आहोत.

रात्री हॉटेल रुमवर लवकर झोप येत नव्हती. गप्पा. मग उद्या आपल्याला एवढे फिरायचे आहे,तेव्हा झोप येऊन उपयोग नाही असे दहा वेळा म्हटल्यावर लगेच झोप आली.

चौकस२१२'s picture

18 Apr 2021 - 4:59 pm | चौकस२१२

Melatonin वर बरीच वर्षे खूप बंधने होती ऑस्ट्र्रेलियात ..ज्या काळी उत्तर अमेरिकेत आणि सिंगापोर सारखया ठिकाणी सहज मिळत असे ! असे का असावे ! तिन्ही ठिकाणचे सरकार जागरूक आणि औषध प्रशासन कडक आहे !

कुमार१'s picture

18 Apr 2021 - 5:46 pm | कुमार१

चौकस,
एकंदरीत हे झोपेसाठी औषध म्हणून अजूनही वादाच्या भोवऱ्यात आहेच. अमेरीकेत सुद्धा AASM सारख्या निद्रा अभ्यास संघटना त्याला विरोध करतात.
ऑस्ट्रेलियानेही परवानगी देताना विशिष्ट वयोगटाच्या वर वगैरे वगैरे अशा काही अटी व शर्ती घातलेल्या दिसतात.

कुमार१'s picture

17 Feb 2022 - 9:18 pm | कुमार१

मेलाटोनिन संदर्भातील काही नवे संशोधन:

गेल्या दशकात मेलाटोनिन औषधाचा खप प्रगत देशांमध्ये सुमारे पाचपट वाढला आहे (बऱ्याच ठिकाणी ते डॉक्टरांच्या चिट्ठीविना मिळत असल्यामुळे). हे औषध म्हणून घेणे सर्वांसाठी सुरक्षित नाही - विशेषता मधुमेही आणि मधुमेहपूर्व अवस्था असलेले लोक.

मेलाटोनिनची शरीरातील पातळी वाढली असता ते इन्सुलिनला काही प्रमाणात विरोध करते. काही लोकांना रात्री उशिरा जेवायची सवय असते आणि त्यानंतर तर ते पुरेसे वेळाचे अंतर न ठेवता झोपी जातात. जसजशी रात्र वाढत जाते तसे मेलाटोनिनचे प्रमाण निसर्गता वाढते. खूप उशिराने जेवण केल्यास ग्लुकोजचा चयापचय बिघडतो. त्यातूनच ग्लुकोज- रक्तपातळी वाढण्याकडे कल होतो.

कुमार१'s picture

24 Mar 2022 - 12:51 pm | कुमार१

अमेरिकेत गेली कित्येक वर्षे दोन भिन्न मोसमांत ‘डे-लाइट सेविंग टाइम (DST) ची संकल्पना राबवली जाते. यानुसार दरवर्षी Spring मध्ये घड्याळे एक तास पुढे नेली जातात, तर Autumn मध्ये ती पुन्हा पूर्ववत केली जातात. व्यवसाय आणि विरंगुळा या दोन्ही दृष्टीने त्याचे काही फायदे असल्याने ही कल्पना अस्तित्वात आली.

नुकतेच अमेरिकेच्या संसदेने ‘कायमस्वरूपी डीएसटी’ हे विधेयक मंजूर केले आहे. परंतु या निर्णयाविरोधात निद्रातज्ञांच्या वैद्यकिय संघटनेने आवाज उठवला आहे.

त्यांच्या मते असा कायमस्वरूपी बदल वैयक्तिक आणि सामाजिक आरोग्यासाठी चांगला नाही. आपल्या शरीराचे अंतर्गत जैविक घड्याळ सूर्यानुसार चालत असते. आपण जेव्हा कृत्रिमरीत्या घड्याळाच्या वेळा बदलतो त्यातून हृदय व मेंदूकार्यात बिघाड, काही मनोविकार आणि वाहनांचे अपघात या सर्व गोष्टींमध्ये वाढ होते असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

दक्षिण कोरिया : निद्रानाशाची गंभीर समस्या

*जागतिक अर्थव्यवस्थेत पहिल्या दहा क्रमांकात मोडणारा हा देश. कित्येक नागरिक दिवसाचे १४ तास किंवा अधिक काळ कार्यालयीन काम करतात.
* मात्र इथे काही लाख नागरिकांना निद्रानाशाची समस्या भेडसावते आहे. त्यातील कित्येक जण झोपेच्या गोळ्यांचे व्यसनी झालेले आहेत.
* काही लोकांच्या झोपेत चालत जाण्याच्या सवयीने अपघातही होत आहेत.

* एकंदरीत इथला निद्रानाश-संबंधित उद्योग (औषधे, विशिष्ट गाद्या, उश्या, इ.) भरभराटीस आला आहे.

कुमार१'s picture

6 Aug 2022 - 9:25 pm | कुमार१

"मध्यरात्रीनंतरचे मन" या गृहीतकावर आधारित एक संशोधन वाचनात आले.
मध्यरात्रीनंतर झोप न लागल्यामुळे जागे असणे हे तब्येतीस हानिकारक आहे.

नैसर्गिक जैविक घड्याळाच्या विरुद्ध वागल्यास अशा समस्या उद्भवतात:
१. नकारात्मक विचार
२. निर्णयक्षमतेवर विपरीत परिणाम
३.मनात धोकादायक कल्पनांचा संचार

महिन्याभरापूर्वी meletonin चा वापर jet lag विरुद्ध करून पाहिला. मला पूर्वी jet lag असताना ४ तास झोप लागत असे, ती ७ तासांवर जाऊन, खूप फरक पडला.

इथे सर्व तपशील दिलेले आहेत.
https://www.frontiersin.org/articles/10.3389/fphys.2019.00927/full

सुमारे अडीच वर्षांपूर्वीचा हा लेख आणि सगळे प्रतिसाद पुन्हा वाचले.
आत्ता आठवले की काही वर्षांपूर्वी मी ओशोंच्या पुस्तकात वाचून झोपताना मी 'जिबरिश' हा प्रकार करायचो. जिबरिश म्हणजे निरर्थक, असंबद्ध बडबड करणे. जिबरिश करताना संताप, राग, आनंद, दु:ख, कुरकुर, रडणे, जोरात हसणे, विनवणी करणे, उदासी, उत्साह वगैरे भाव स्वरांच्या चढ-उतारातून आणि शब्दांच्या फेकीतून व्यक्त करण्यातही खूप मजा येते.

माझ्या अनुभवाप्रमाणे झोप लागण्यापूर्वी आणि झोप लागल्यावरही बराच काळ आपल्या मनात (त्या दिवसभरातले अनेक प्रसंग, शिवाय झोपण्यापूर्वी बघितलेले सिनेमे वा अन्य करमणुकीचे कार्यक्रम वगैरेंशी संबंधित) अनेक शब्दांच्या/विचारांच्या लड्याच्या लड्या सतत उलगडत जात असतात. शब्द आणि प्रतिमांचे अगदी काहूर माजलेले असते. (बहुधा त्यालाच आपण 'स्वप्न' म्हणतो).
जिबरिश केल्याने त्या सर्व शब्द/प्रतिमा/भावना आदिंच्या कोलाहलाचा निचरा होऊन शांत, गाढ झोप लागते.
कधीकधी आवडती जुनी गाणी मोठ्याने किंवा मनातल्या मनात म्हणत रहाण्याचाही प्रयोग करून बघितलेला आहे.
झोपण्यापूर्वी अर्धा-तास आधी टीव्ही, मोबाईल इत्यादींचा वापर बंद करून घरात अगदी कमित कमी कमी प्रकाश ठेवणे, आणि अंगणात, घरातल्या घरात, बाहेर किंवा गच्चीवर वगैरे पायी चालत जिबरिश्/गाणी/स्तोत्रे वगैरेंचा प्रयोग नक्कीच लाभदायक असते. बाकी शारीरिक मेहनतीचे महत्व तर वादातीत आहेच.

कुमार१'s picture

7 Aug 2022 - 9:35 am | कुमार१

१.

महिन्याभरापूर्वी meletonin चा वापर jet lag विरुद्ध करून पाहिला.

>>
छान. विशिष्ट कारणासाठी असा मर्यादित वापर आवडला.
....
२.

झोपताना मी 'जिबरिश' हा प्रकार करायचो.

>>
सुरेख !कल्पना आवडली
मला घरी झोप लागण्यासाठी काही अडचण येत नाही.
प्रवासात किंवा परगावी झोप लागण्यास अडचण येऊ शकते. तेव्हा मी पाठ असलेल्या 1-2 कविता लागोपाठ म्हणत बसतो

जेम्स वांड's picture

20 Aug 2022 - 8:46 pm | जेम्स वांड

नेहमीप्रमाणे अत्युत्कृष्ट लेख,

Meletonin म्हणजे निसर्गाचा एक चमत्कारच म्हणायला हवा जैव अभियांत्रिकी. ह्याचा संबंध हा कित्येक बॉडी फंक्शन सोबत असतो हे वाचून नवल वाटले सर.

केस गळती सोबत सुद्धा meletonin लिंक असते का ??

मला झोप ह्या विषयी पण खूप रस आहे, कच्ची झोप किंवा हलकी झोप, त्या दरम्यान दिसणाऱ्या ब्रेन वेव्ह किंवा अतिशय गाढ झोप, त्याला बहुतेक रॅपिड आय मुव्हमेंट REM SLEEP म्हणतात ना ? ह्या झोपेचा कालावधी हा म्हणे काही मिनिटे ते जास्तीत जास्त एखाद तास असू शकतो, ह्या झोपेत (टेक्निकली ही साखरझोेप) डोळ्याची बुबुळे वेगाने डावी उजवीकडे अन् वर खाली मुव्ह करतात हे खरे आहे का ?

I mean if true, this is some creepy engineering nature has fitted into us sir !

कुमार१'s picture

21 Aug 2022 - 9:45 am | कुमार१

केस गळती सोबत सुद्धा melatonin लिंक असते का ?

>>>
केसांचे आरोग्य व melatonin हे संशोधन अजून प्रायोगिक आहे. ठाम निष्कर्ष काढता येत नाही.

...

डोळ्याची बुबुळे वेगाने डावी उजवीकडे अन् वर खाली मुव्ह करतात हे खरे आहे का ?

होय, या झोपेत स्वप्ने पडतात.

जेम्स वांड's picture

20 Aug 2022 - 8:56 pm | जेम्स वांड

कित्येकदा झोपेत असताना (खासकरून पालथे झोपलेले असताना) आपण खूप उंचावरून फेकले गेले आहोत अन् कुठंतरी (एखाद टणक पृष्ठभागावर) आपण पालथेच Land झालो आहोत अशी फिलिंग येऊन एकदम झपकन जाग येते, अश्यावेळी श्वास स्लाईटली चढलेला असतो आणि लिटरली आपण खूप उंचावरून पडल्याचे फिलिंग येते.

हा प्रकार अजून कोणासोबत झाला आहे का ? असे होणे नॉर्मल आहे का ? एक जण म्हणलं की हा एकच्युअली आपला ब्रेन हॉट बूट होण्याचा एक प्रकार असतो हॉट रिस्टार्ट सारखा, एक म्हणलं की ब्रेन असा रिस्टार्ट होऊ शकत नाही हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे. अजून एक निरीक्षण म्हणजे हा प्रकार वय वर्षे १४-२६ भरपूर झाला, आधी नाही, २६ नंतर हा प्रकार थोडा कमी झाला अन् ३३ क्रॉस केल्यावर पूर्णच बंद झालं

हे नेमकं काय असेल ??

#MeToo

तुषार काळभोर's picture

21 Aug 2022 - 11:25 am | तुषार काळभोर

मला गाढ झोपेतही असं झालंय.
बर्‍याचदा झोप लागत असताना एक थोडा वेगळा प्रकार होतो - पायरीवरून पाय घसरल्यावर, फुटपाथवरून पाय घसरून अचानक रस्त्यावर आल्यावर जसा एक सौम्य मानसिक धक्का बसतो, तसं होतं.

कुमार१'s picture

25 Sep 2022 - 4:24 pm | कुमार१

नारकोलेप्सी नावाचा एक दीर्घकालीन निद्राविकार असतो. यामध्ये दिवसा प्रचंड झोप वारंवार येत राहते परंतु रात्री ती लागण्यास खूप वेळ लागतो. अशा लोकांमध्ये स्नायू देखील एकदम शिथिल पडतात.
या विकाराच्या कारण मीमांसेत orexin या रसायनाचा अभाव आढळून आला आहे. त्यासाठी काही जनुकीय घटक जबाबदार असतात.

त्यांच्यावरील उपयुक्त संशोधन केल्याबद्दल शरीरविज्ञानातील ब्रेक थ्रू हा मानाचा पुरस्कार अमेरिका व जपानच्या प्रत्येकी एक संशोधकांना २०२३ साठी एकत्रित जाहीर झाला.

कुमार१'s picture

17 Mar 2023 - 4:36 pm | कुमार१

आजच्या(शुक्रवार, 17 मार्च) जागतिक निद्रादिना निमित्त सर्वांना उत्तम झोप लागण्यासाठी शुभेच्छा !

या दिवसाचे एक वैशिष्ट्य आहे. दरवर्षी तो 17 मार्चलाच येत नाही. तो दिवस ठरवण्याचे एक शास्त्र आहे. एखाद्या वर्षी ज्या दिवशी मार्च- विषुवदिन असेल, त्याच्या आधीचा शुक्रवार हा निद्रादिन धरला जातो.

2008 ते 2023 या वर्षांचे निरीक्षण केले असता असे दिसेल, की हा दिन 14 ते 20 मार्च या दरम्यान बदलत राहिलेला आहे.

कंजूस's picture

17 Mar 2023 - 6:54 pm | कंजूस

हमे मेलाटोनिन.

कुमार१'s picture

20 May 2023 - 11:54 am | कुमार१

शिफारस :
झोपू आनंदे : घोरासुराचा वध!
- डॉ. अभिजित देशपांडे

गेल्या पाच वर्षांत मात्र ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’ या प्रख्यात वैद्यकीय नियतकालिकात दोन लेख प्रसिद्ध झाले आहेत. ऑस्ट्रेलियातील आदिवासी एक लांबलचक असलेले, कर्ण्यासारखे ‘डिजीरिडू’ नावाचे वाद्य वापरतात. घनगंभीर आवाज करणारे हे ‘डिजीरीडू’ अनेकांनी आमीर खानच्या ‘दिल चाहता है’ या सिनेमात ‘जाने क्यूँ लोग प्यार करते है’ या गाण्यामध्ये ऐकले आहे.