नोव्हेंबर १५, १६, २०२१
सुरक्षित समुद्रकिनारे, हाकेच्या अंतरावर डोंगर-टेकड्यांवरची हिरवाई, पुरातन देवालये, मत्स्यव्यवसायाचं महत्त्वाचं केंद्र असणारं बंदर, डॉल्फिनची उपस्थिती, जलदुर्ग व किनारी दुर्ग एकाच ठिकाणी, काजूची मोठी बाजारपेठ, कृषी विद्यापीठ अशी अनेक वैशिष्ट्ये मिरवणारा दापोली आणि परिसर नेहमीचं पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय असतो. मुंबई-पुण्यावरून इथे अगदी पाच-सात तासात पोहोचता येत असल्यानं जवळपास वर्षभर दापोली परिसर पर्यटकांनी फुललेला असतो.
घाऊक पर्यटकांच्या अशा गर्दीतही थोडा बाजूला पडल्यासारखा आणि त्यामुळेचं माझ्यासारख्या गर्दीपासुन अंतर राखत कोकण अनुभवण्याची मनस्वी इच्छा बाळगणाऱ्या माणसाला आंजर्ले-केळशीचा नयनरम्य परिसर नेहमीचं खुणावत असतो. इथे यायची संधी मी सहसा सोडत नाही. नुकतीचं जवळच्या मित्रांसोबत आंजर्ल्याची दोन-तीन दिवसांची निवांत भटकंती करण्याचा योग आला.
सकाळी लवकर पुण्यातून निघून, ताम्हिणी-माणगाव-लोणेरे फाटा-मंडणगड-आंजर्ले असा प्रवास करत दुपारच्या जेवणाला मुक्कामाला पोचलो. त्याअगोदर ताम्हिणीत थोडी वाट वाकडी करून कुंडलिका व्हॅलीचं रौद्र दर्शन ही पार पडलं होतं.
जेवणानंतर थोडावेळ आराम करून समुद्रस्नानाचा सोपस्कार आटोपून मासळी बाजाराची मौज अनुभवण्यासाठी हर्णे बंदर गाठले. थोडीफार खरेदी करून त्या बाजारातील ना-ना प्रकारच्या माशांचे ढीग, सजवून ठेवलेले पर्यटक पसंतीचे मासे, कोळीणी आणि पर्यटक ग्राहक यांच्यातील "अर्थ"पुर्ण संवाद यांची मजा घेत थोडा वेळ तिथे घालवून सुवर्णदुर्गाच्या आडून मावळतीला जाणारा सूर्य नारायण अनुभवत पुन्हा मुक्कामाच्या ठिकाणी आंजर्ल्यात आलो.
रात्री अगदी किनाऱ्यावर बसून समुद्र गाजेच्या पार्श्वभुमीवर जेवण झालं. रात्रीच्या अंधारात किनाऱ्याच्या कडेने दूरपर्यंत फेरफटका मारला, किनाऱ्यावरून दिसणारा ताडाचा कोंड टेकडीवरील दिपगृहाचा नजारा ही अनुभवला. फेसाळणाऱ्या भरतीच्या लाटा, दूरवर चंद्रप्रकाशात मध्येच चमकणारे पाणी आणि समुद्राच्या धीरगंभीर गाजेशिवाय इतर कुठलाचं आवाज नसणारे वातावरण अनुभवत वेळ मजेत गेला. पहिला दिवस जरा धावपळीतचं गेला, उद्या मात्र ती कसर भरून काढू अशी मनाची समजूत काढीत पाठ टेकवली.
सकाळी लवकर उठून आंजर्ल्याच्या उभागर आणि भंडारवाड्यातून फेरफटका मारला. दुतर्फा कौलारू घरे व त्यांच्या बरोबरीने दिसणारी सिमेंट काँक्रीटची तरीही कोकणी बाज धरून ठेवलेली दुमजली, क्वचित त्याही वर एखादा मजला वा उतरत्या पत्र्याचं छप्पर असलेली आधुनिक घरे, क्वचित लाकडी माडीची, लांब रुंद ओटे असलेली, कोरीव लाकडी खांबांवर पडवी तोलून धरलेली घरे तर काही शेवटच्या घटका मोजणारी, जीर्ण शिर्ण झालेली घरे, काहीतरी चक्क पडलेली सुद्धा.....
कौलारू घरे बहुतांश रिकामीचं, कदाचित पोटापाण्यासाठी विखुरली गेलेली. कधीकाळी ती ही भरलेली असतील, राबती-जागती, खेळतीही असतील. आज मात्र निपचित पडलेली वाटतात, असं असलं तरी प्रत्येक घर आजूबाजूला झाडांची श्रीमंती मात्र टिकवून आहे.
साधारण दोन-अडीच किलोमीटर लांबीचा किनारा लाभलेलं जोग नदीच्या खाडी मुखाशी वसलेले हे अत्यंत शांत, टुमदार, माडांच्या गर्दीत वसलेलं असं गाव. मुरुड-कर्दे-हर्णे अशा पर्यटक पसंतीच्या ठिकाणांना चिकटून असलं तरी पण अजूनही फारशी गर्दी नाही, त्यामुळे बऱ्यापैकी स्वच्छ समुद्रकिनारा आणि नीरव शांतता. किनाऱ्याला लागुनच छान घरगुती जेवण व परवडणाऱ्या दरात निवासाची व्यवस्था करणाऱ्या स्थानिकांची घरे. सरंगा, हलवा, सुरमई, कोळंबी, बांगडा पासून शुद्ध शाकाहारी जेवण, उकडीचे मोदक व ताजी थंडगार सोलकढी म्हणजे स्वर्गसुखचं....
गावाच्या मागच्या बाजूला टेकडीवर गावचा राखणदार असलेला कड्यावरचा गणपती, दापोलीकडून येणारा आणि गावाला बाहेरून वळसा घालून केळशीकडे जाणाऱ्या एका गाडीमार्गाचा फाटा थेट या कड्यावरच्या गणपतीकडे जातो तर त्याच मार्गाचा दुसरा फाटा खाली गावात उतरतो. शेजारच्या मुर्डी गावातूनही एक जुनी वाट खाडीपुलाच्या पुढून आंजर्ल्यात उतरते, हाच पुर्वीचा मुख्य मार्ग होता. याच मार्गाने पुढे उभागाराकडे जाताना बँक ऑफ इंडियाच्या थोडं पुढून एक फरसबंद पायवाट आपल्याला टेकडीवरील खोदलेल्या पायऱ्यांवरून गावातून थेट कड्यावरच्या गणपतीकडे घेऊन जाते, इथून जाताना पहिल्याच टप्प्यावर गणपतीचं पाऊल असलेला खडक लागतो व तिथून पुढे पाच मिनिटं चालत आपण अत्यंत सुंदर अशा मंदिरात जाऊन पोहोचतो. मुळचं दगडी चिऱ्यात बांधलेलं आणि वरून संगमरवरी गिलावा केलेलं अतिशय सुंदर, स्वच्छ, प्रसन्न मुर्ती स्थापित असलेलं मंदिर. मंदिरापुढे भली मोठी बाव व प्रांगणात एक शिवमंदिर ही आहे. वातावरण स्वच्छ असेल तर या टेकडीवरून खाली समुद्राचा अनुपम नजारा डोळ्यांचे पारणे फेडतो.
इथून आल्या वाटेनं परत खाली उतरून, उभागाराच्या रस्त्यावर एक आत जाणारी वाट आपल्याला भंडारवाड्याकडे नेते तर डाव्या बाजूची तरी बंदराकडे जाते. किनाऱ्यावर जायचं म्हणजे भंडारवाड्याच्या निमुळत्या गल्लीतून जाणारी वाट पकडावी लागते, गल्लीच्या तोंडालाचं दोन्ही अंगाला दोन वाण सामानाची दुकानं, तिथून पुढं एक मंदिर व त्यापुढुन किनाऱ्याकडे नेणारी अजून चिंचोळी होत जाणारी वाट. आजूबाजूला माडांची दाटी, त्यातून डोकं वर काढणारी पर्यटकांसाठी बांधलेली निवास-न्याहारीची सोय असलेली घरं, पश्चिमेकडुन येणारे वारे अंगावर झेलत, लाल चिऱ्यांची कुंपणे पार करत आपण समुद्रकिनाऱ्यावर पोहोचतो. पूर्ण किनाऱ्याला दगडी अडसर घालून पावसाळ्यात उधाणणाऱ्या सिंधू-सागराला बांध टाकून थोपवायचा यशस्वी प्रयत्न केलाय. पावसाळा आणि उन्हाळ्याचा शेवटचा काळ सोडला तर इतरवेळी बऱ्यापैकी स्वच्छ पाणी, लहान आणि सातत्यपुर्ण लाटा, वॉटर स्पोर्टच्या अनुपस्थितीमुळे पर्यटकांचाही ओढा कमी व त्यामुळे बऱ्यापैकी स्वच्छ म्हणावा असा किनारा, अल्प प्रमाणात का होईना पण ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी मिळुन येणारीं जागा अशी थोडी वेगळीही ओळख आहे इथली.
अशा प्रकारे गावाची सफर पार पडल्यावर पुन्हा एकदा समुद्रस्नान व तिथूनचं थेट डॉल्फिन सफारीच्या मोहिमेवर आम्ही प्रस्थान ठेवलं, नदी ज्या ठिकाणी समुद्राला मिळते तिथल्या भागात व तिथून पुढील खोल समुद्रात ठिकठिकाणी थोडा-थोडा वेळ थांबे घेत आमची ही डॉल्फिन दर्शनाची मोहीम सुरू होती. मोहिमेदरम्यान एकेकाळी तुळोजी आंग्रेंचं मुख्य ठाणं असा नावलौकिक असलेल्या सुवर्णदुर्गाचं अतिशय मनोहारी दर्शन झालं. किल्ल्याची बाहेरील तटबंदी अजूनही मजबुत वाटते. डॉल्फिन महाशय काही आमच्यावर प्रसन्न झाले नाहीत व इतरही काही सांगण्यासारखे दर्शन या सफरीत झाले नाही त्यामुळे तासाभराने आटोपते घेत दुपार होता-होता आम्ही पुन्हा आंजर्ल्याचा किनारा गाठला व उकडीच्या मोदकांवर ताव मारून पुन्हा एकदा समुद्रस्नानाचा आनंद घेण्यासाठी पाण्यात उतरलो.
दुपारच्या जेवणानंतर रूममध्येच मस्त ताणून दिली. उठल्यावर संध्याकाळी पुन्हा समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारत मनसोक्त फोटोसेशन करीत सुर्यास्त अनुभवला. संपुर्ण किनाऱ्यावर अगदी मोजकेच लोक, संध्याकाळच्या ओहोटीवेळी खोल गेलेले पाणी व त्यामुळे उघडी पडलेली थोड्याशा सोनेरी झाकाची वाळू, त्या वाळूवर पाण्याने व त्यातील जीवांनी कोरलेली सुरेख नक्षी, दूरवर खोल समुद्रात दिसणाऱ्या मासेमारी नौका व अविरतपणे कानी पडणारी समुद्र गाज या सर्व पार्श्वभुमीवर क्षितिजावर पाण्यात बुडणारा लालबुंद गोळा असा स्वर्गीय नजारा किनाऱ्यावर शांतपणे बसून डोळ्यात साठवून घेतला.
सुर्यास्तानंतर सर्वजण मिळून पुन्हा एकदा कड्यावरच्या गणपतीला दर्शनासाठी गेलो. मंदिरात हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच भाविक होते. प्रसन्न शांतता इथं अनुभवायला मिळाली. अंधार होता-होता तिथून परतून जेवण उरकून पुन्हा समुद्राची गाज ऐकत पुन्हा किनाऱ्यावर वेळ घालवला व रात्री बऱ्याच उशिरा झोपायला गेलो ते सकाळी लवकर उठून परतीचा मार्ग पकडण्यासाठी........
प्रतिक्रिया
14 Jul 2022 - 6:26 pm | कर्नलतपस्वी
पहिल्यांदा ९२ मधे व नंतर२०१३ मधे गेलो होतो.पहिल्या व दुसऱ्या भेटीत जाणवण्या इतका फरक झाला होता.
पहिल्या भेटीतले चुलीवरचे माडाच्या झावळ्यावर गरम केलेले पाणी आता भिंतीवरच्या गीझरच्या डब्यात जाऊन बसले होते. वेलकम ड्रिंक म्हणून दिलेली सोलकढी आता ऑन डिमांड झाली होती तरीही मस्तच.
आजही कोकणात जायचं म्हटंल की घरचे उडीवर निघतात.
15 Jul 2022 - 12:31 pm | चक्कर_बंडा
15 Jul 2022 - 12:33 pm | चक्कर_बंडा
14 Jul 2022 - 6:44 pm | सतिश गावडे
कुंडलिका व्हॅली ताम्हिणी घाट रस्त्याला लागूनच असलेल्या प्लस व्हॅलीहून वेगळी आहे का?
14 Jul 2022 - 11:02 pm | सुखी
बहुतेक त्याचीच एक बाजू प्लस valley मध्ये जाऊन मिळते
15 Jul 2022 - 7:22 pm | चक्कर_बंडा
कुंडलिका व्हॅली ही ताम्हिणी घाटातून लोणावळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर अगदीच दीड-एक किलोमीटर वर आहे. प्लस व्हॅली म्हणून जी जागा सांगितली जाते ती या फाट्यापासून सरळ मुख्य ताम्हिणी घाट रस्त्यावर थोडीशीच पुढं आहे. उतरून चालत तिथं पोहोचावे लागते.
दोन्ही जागा वेगवेगळ्या असल्या तरी तिथून दिसणारी दरी एकच आहे.
17 Jul 2022 - 10:55 am | सतिश गावडे
धन्यवाद, आले लक्षात.
14 Jul 2022 - 7:48 pm | कंजूस
फोटोही भारी.
15 Jul 2022 - 7:22 pm | चक्कर_बंडा
धन्यवाद....
14 Jul 2022 - 7:57 pm | धर्मराजमुटके
छान वर्णन ! कोकण, केरळ आणि असेच समुद्रलगतची ठिकाणे म्हणजे शुद्ध शाकाहारी खाण्याची मारामार म्हणून मला पाहायच्या यादित टाकता येत नाहीत.
14 Jul 2022 - 10:13 pm | कंजूस
कर्नाटक जरा बरे.
14 Jul 2022 - 10:58 pm | सुखी
उकडीचे मोदक
सोलकढी
दडपे पोहे अन् मिरगुंड
घावन
नारळाचे दूध अन् वरण भात
नारळाच्या दुधात केलेले केळाचे शिकरण
फणसाची भाजी
आंबे असतील तेव्हा काही बोलायची सोय नाहीच
अजून काय शोधत आहात शाकाहार मध्ये
यादीत काही पदार्ध विसरले असतील तर माझी चूक म्हणून दुर्लक्ष करा
16 Jul 2022 - 10:28 am | सुबोध खरे
हायला
लष्करात जाईपर्यंत मी मांसाहार केलाच नव्हता
पण कोकणात कधी शाकाहाराच्या असंख्य पदार्थांमुळे मांसाहार काय असतो हे पाहण्याची गरजही पडलेली नव्हती
भाकरी, पानगी, सांदण( फणसाचं) काजूची, कडव्या वालाची, काळ्या वाटाण्याची, पावट्याची उसळ डाळिंब्या, उकडलेल्या वालाच्या शेंगा, पांढरा कांदा, तोंडली पासून पोपटी, चुलीवर भाजलेला बटाटा, रताळं, उरलेल्या भाताचा सकाळी साखरभाताचा/ फोडणीच्या भाताचा नाष्टा, भाताचे कांदे भात वांगी भात सारखे असंख्य प्रकार मी लहानपणी सुटीत खाल्लेले आहेत.
बाकी उन्हाळ्यात आंबे, फणस, करवंद, जांभळं हे तर होतेच. कोकम सरबत, आंब्याचं पन्हं, कोयाडे सारखे असंख्य पदार्थ सहज स्मरणात येतात
16 Jul 2022 - 9:31 pm | धर्मराजमुटके
मी जिथे फक्त आणि फक्त शाकाहारी पदार्थच बनतात असे हॉटेल शोधतो. कारण शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी अशी पाटी लिहिलेल्या हॉटेलात शाकाहार करणे म्हणजे मांसाहार केल्यासारखेच आहे.
बाकी तुम्ही दिलेली यादी छानच आहे. एखादे शुद्ध शाकाहारी कोकणी घर पाहून याचा आस्वाद घेतलाच पाहिजे.
15 Jul 2022 - 7:24 pm | चक्कर_बंडा
फक्त एवढ्या कारणासाठी टाळू नका......कोकणातील भटकंतीची वेगळीच मजा आहे.....
21 Jul 2022 - 1:08 pm | टर्मीनेटर
हेच म्हणतो!
मुटके साहेब आता कोकणात 'होम स्टे'ची उत्तम सोय जवळपास सर्वच ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे घरगुती रुचकर शुद्ध शाकाहारी जेवण सहज मिळू शकते.
14 Jul 2022 - 8:44 pm | रंगीला रतन
झकास भटकंती.
15 Jul 2022 - 7:26 pm | चक्कर_बंडा
धन्यवाद....
14 Jul 2022 - 8:56 pm | Bhakti
सुंदर समुद्रकिनारा आहे हा!!
इथे केलेली धमाल आठवली !
~~~~~~~~
~~~~~~~~
15 Jul 2022 - 7:25 pm | चक्कर_बंडा
हो, सुंदर आणि शांत, निवांत जागा आहे.....
15 Jul 2022 - 7:21 am | प्रमोद देर्देकर
तुमची प्रवास वर्णन करण्याची एक वेगळी शैली आहे. तुमचे सर्व लिखाण आवडते. सर्वच जिवधन, रायरेश्वर लिखाणातील Photo खूप सुरेख आहेत.
15 Jul 2022 - 7:26 pm | चक्कर_बंडा
मनापासून आभार.....
15 Jul 2022 - 10:19 am | सौंदाळा
भारीच
हर्णैहुन आंजर्लेला येतानाचा घाटातला आणि कड्यावरच्या गणपतीच्या देवळामागून काढलेला सुवर्णदुर्ग, हर्णै बंदर आणि अथांग समुद्र याचा फोटो पण पाहिजे :)
हा भाग खूपच सुंदर आहे
15 Jul 2022 - 7:29 pm | चक्कर_बंडा
धुक्यामुळे बऱ्याच जागी फोटो काढता आले नाही, समुद्रातून सुवर्णदुर्ग अफलातून दिसत होता, त्यावेळी समुद्रस्नानामधूनच होडीवर गेल्यामुळे कॅमेरे नव्हतेच जवळ.....
टेकडीवरून समुद्र दिसलाच नाही एवढं धुकं होतं, सकाळी आणि संध्याकाळी ही....
15 Jul 2022 - 7:35 pm | पॉपकॉर्न
कृपया रहाण्याची सोय आणि त्यांचे संपर्क दिलेत तर बरे होईल.
17 Jul 2022 - 3:32 pm | चौथा कोनाडा
नेहमी प्रमाणे भारी लिहिलंय!
सुंदर प्रचि आणि तितकेच उस्फुर्त लेखन.
आय लव्ह कोकण! कधीही जा, कोकण भुरळ घालत नाही असे होत नाही.
कोकण चा विकास व्हावा पण डेव्हलपमेंट होऊ नये!
निरागसपणा असाच टिकून राहावा !
17 Jul 2022 - 3:33 pm | चौथा कोनाडा
नेहमी प्रमाणे भारी लिहिलंय!
सुंदर प्रचि आणि तितकेच उस्फुर्त लेखन.
आय लव्ह कोकण! कधीही जा, कोकण भुरळ घालत नाही असे होत नाही.
कोकण चा विकास व्हावा पण डेव्हलपमेंट होऊ नये!
निरागसपणा असाच टिकून राहावा !
17 Jul 2022 - 3:34 pm | चौथा कोनाडा
नेहमी प्रमाणे भारी लिहिलंय!
सुंदर प्रचि आणि तितकेच उस्फुर्त लेखन.
आय लव्ह कोकण! कधीही जा, कोकण भुरळ घालत नाही असे होत नाही.
कोकण चा विकास व्हावा पण डेव्हलपमेंट होऊ नये!
निरागसपणा असाच टिकून राहावा !
17 Jul 2022 - 6:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फोटो, वर्णन. आवडले. लिहिते राहावे.
-दिलीप बिरुटे
21 Jul 2022 - 12:59 pm | टर्मीनेटर
मस्त भटकंती व फोटोज 👍
दापोली आणि गुहागर परिसरात खूप प्रेक्षणीय स्थळे आहेत. माझ्या गेल्या वर्षीच्या दीर्घ कोकण दौऱ्यात हर्णे, केळशी, आंजर्ले, वेळास अशा आधी भेट देऊन झालेल्या ठिकाणी पुन्हा जाण्याचा विचार होता पण कार्यक्रमात अनपेक्षित बदल होत गेल्याने तिथे नाही जाऊ शकलो. पण मध्यंतरीच्या काळात नावारूपाला आलेल्या पन्हाळेकाझी लेणी पाहण्यासाठी पुन्हा त्या परिसराला लवकरच भेट द्यायचा विचार आहे!
28 Jul 2022 - 7:10 am | अत्रुप्त आत्मा
मसससंस्स्त
28 Jul 2022 - 11:17 am | गोरगावलेकर
फोटो व माहिती दोन्ही सुरेख.
पूर्वी केळशीला धावती भेट देत आंजार्ले-हर्णे-दापोली मार्गे प्रवास केला आहे. आपला लेख वाचून परत जायची इच्छा प्रबळ होते आहे