रंगदृष्टीचे तिरंगी सूत्र

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
11 Jul 2022 - 8:57 am

पृथ्वीवरील जीवसृष्टीत निसर्गाने अनेक रंगांची उधळण केलेली आहे. ती अर्थातच मनमोहक आहे. विविध वनस्पती आणि प्राणी हे भिन्नरंगी असून ते वेळोवेळी आपापले ‘रंग’ दाखवत असतात ! मानवनिर्मित अनेक गोष्टीही रंगीत आहेत. विविध रंगांच्या दर्शनातून मनात वेगवेगळे भाव उमटतात. आपल्या दैनंदिन जीवनातील सुसूत्रता अनेक रंगांवर आणि रंगबदलांवर अवलंबून आहे. मुळात आपल्याला रंगज्ञान होण्यासाठी आपले डोळे व मेंदू यांच्यातील विशिष्ट यंत्रणा कारणीभूत आहेत. या अद्भुत व अमूल्य अशा जीवशास्त्रीय प्रणालीवर दृष्टिक्षेप टाकण्यासाठी हा लेख.

निसर्गातील ज्या विद्युतचुंबकीय लहरी आपल्या डोळ्यांना जाणवतात त्याला आपण प्रकाश म्हणतो. या प्रकाशलहरी भिन्न तरंगलांबीच्या असतात. त्यांची लांबी नॅनोमीटर्समध्ये मोजतात. अशा विविध लहरींच्या मिश्रणातून आपल्याला रंगज्ञान होते.
रंगज्ञानाच्या किचकट प्रक्रियेची सुरुवात प्रकाशकिरण डोळ्यात शिरण्यापासून होते. ती समजण्यासाठी आपण डोळ्यांची अंतर्गत रचना थोडक्यात पाहू.

ok

डोळ्याच्या सर्वात आतील थराला दृष्टीपटल (retina) म्हणतात. त्यामध्ये दोन प्रकारच्या प्रकाशसंवेदी पेशी असतात. त्यांना त्यांच्या आकारानुसार दंडपेशी (rods) व शंकुपेशी (cones) अशी नावे आहेत (वरील चित्रातील निळ्या रंगाच्या).
रंगज्ञान शंकूपेशीमुळे होत असल्याने आता फक्त त्यांच्याबद्दल माहिती घेऊ. या पेशींची एकूण संख्या सुमारे ६० ते ७० लाख असते. त्या प्रखर प्रकाशात सर्वाधिक कार्यक्षम असतात. या पेशींमध्ये एक रंगद्रव्य असते, जे एक प्रथिन आणि ‘अ’ जीवनसत्व यांच्या संयोगातून तयार होते.

शंकुपेशींचे तीन प्रकार असतात : L, M व S.
त्यापैकी L ची संख्या सर्वाधिक असते. त्या खालोखाल M आणि सर्वात कमी S असतात. या प्रत्येक प्रकाराचे एक वैशिष्ट्य आहे. संबंधित प्रकार प्रकाशाच्या एका विशिष्ट तरंगलांबीला सर्वाधिक संवेदी असतो. म्हणजेच,
L (= Long) : लाल रंग (560nm)
M (= Medium) : पिवळा ते हिरवा रंग (530nm)
S (= Short) : निळा रंग (420nm).

ok

जेव्हा एखाद्या तरंगलांबीचा प्रकाश डोळ्यात शिरतो तेव्हा तो वरील तीन पैकी किमान दोन प्रकारच्या शंकूपेशींना उत्तेजित करतो. त्या दोघांच्या परस्पर सहकार्यातून विशिष्ट संदेश तयार होतात. त्यातूनच प्रमुख रंग आणि त्यांच्या दरम्यानच्या अन्य रंगछटांचे ज्ञान होते. रंगज्ञानाच्या या थिअरीला तिरंगी प्रणाली (trichromatic)असे म्हणतात. थॉमस यंग या प्रसिद्ध वैज्ञानिकांनी हे मूलभूत संशोधन केले.
अन्य एका थिअरीनुसार आपली दृष्टीयंत्रणा ही निव्वळ एक सुटा रंग पारखत नाही. परंतु, रंगांमधील परस्परविरोधीपणावरून आपल्या मेंदूत रंगप्रतिमा उमटतात. रंगांच्या अशा परस्परविरोधी जोड्या म्हणजे :
• लाल विरुद्ध हिरवा
• निळा विरुद्ध पिवळा, आणि
• काळा विरुद्ध पांढरा
या दोन्ही थिअरीज वैज्ञानिक जगतात मान्य झालेल्या आहेत.

डोळा -मेंदू संदेशवहन

रंगीत प्रकाशामुळे शंकूपेशींमध्ये तयार झालेले संदेश चेतातंतूंच्या अनेक थरांतून शेवटी मेंदूतील दृष्टीकेंद्रात पोचतात. हे केंद्र मेंदूच्या पाठीमागच्या भागात असते. इथे त्या संदेशाचे विश्लेषण होऊन अंतिम रंगज्ञान होते.

रंगांचे आकलन
इथे एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. एखादा माणूस जेव्हा असे म्हणतो की, अमुक एक गोष्ट या ठराविक रंगाची आहे, तेव्हा ते त्याचे व्यक्तिगत आकलन असते. अशा आकलनात काही प्रमाणात व्यक्तीभिन्नता आढळते. दृष्टीयंत्रणा आणि मानसिकता यांच्या संयोगातून एखाद्या व्यक्तीचे रंगांचे आकलन ठरते. प्रत्येक रंगाच्या अनेक छटा असतात. त्या सर्व छटा सर्वच माणसांना एकाच प्रकारे समजत नाहीत; त्याबाबत मतैक्य होतेच असे नाही. या संदर्भात काही वांशिक भेदही आढळले आहेत. प्रमुख रंगांच्या अधल्यामधल्या छटांना कोणती नावे द्यायची यावरून मानवी समूहांत मतभेद आहेत.
या संदर्भात एक ठळक उदाहरण म्हणजे नामिबिया व अंगोलात राहणारे हिंबा या जमातीचे लोक. गुरांचे पालन हा त्यांचा पारंपरिक पिढीजात व्यवसाय आहे. गाई-म्हशींच्या अंगावरील विशिष्ट खुणा बारकाईने ओळखण्याच्या गरजेतून त्यांची दृष्टी तीक्ष्ण झालेली आहे. या लोकांचे रंगाकलन हे अन्य मानवी समूहांपेक्षा काहीसे भिन्न आहे. अनेक रंगछटांना त्यांनी त्यांच्या प्रणालीतील वेगळी नावे दिलेली आहेत.

रंगज्ञान आणि जैविक उत्क्रांती

सस्तन प्राणी उत्क्रांतीच्या सर्वात वरच्या पायरीवर आहेत. त्यांना निसर्गातील विविध गोष्टींचे रंगज्ञान होणे का गरजेचे असावे हे आता पाहू. माकडे, वानरे आणि माणसांचे एक वैशिष्ट्य म्हणजे दिवसा काम करणे व अन्न शोधणे. वनस्पतींची ताजी(हिरवी) पाने आणि पिकलेली फळे हा भरण-पोषणासाठीचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. पाने व फळांच्या रंगांवरूनच त्यांचे कच्चे अथवा पिकलेपण प्राणीमात्रांना समजू लागले. अन्नशोध या प्राथमिक गरजेसाठी रंगज्ञान आवश्यक ठरलेले दिसते. त्या अनुषंगाने डोळे व मेंदूत तशा चेतायंत्रणा विकसित झालेल्या असाव्यात.

रंगदृष्टीदोष
डोळ्याद्वारा होणारे रंगज्ञान हे नैसर्गिक वरदान आहे. परंतु काही जणांच्या बाबतीत या संदर्भात कमतरता आढळते. अजिबात रंग न ओळखता येणारे लोक दुर्मिळ आहेत. परंतु रंग अर्धवटपणे ओळखणे किंवा दोन रंगांमध्ये गोंधळ होणारे लोक बऱ्यापैकी असतात. अशा लोकांना दैनंदिन आयुष्यात काही समस्या जाणवतात. कच्चे व पिकलेले फळ लांबून ओळखता न येणे, कपडे खरेदी करताना अनुरूप रंगांची निवड न जमणे आणि रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण दिव्यांचा रंग न समजणे ही त्याची ठळक उदाहरणे. या लोकांच्या बाबतीत रंग ओळखण्याचा गोंधळ असला तरी त्यांची मूलभूत दृष्टी मात्र स्वच्छ असते. रंगदृष्टीदोष हा विशेष तज्ञांचा प्रांत असून त्याची व्याप्ती बरीच मोठी आहे. या लेखात त्याचा थोडक्यात आढावा घेतो.

कारणमीमांसा
ज्या कारणांमुळे हा दृष्टीदोष उद्भवतो त्यामध्ये अनुवंशिक बिघाड हे प्रमुख कारण आहे. असा दोष जन्मजात असून तो प्रामुख्याने पुरुषांमध्ये आढळतो. स्त्रियांत तो तुलनेने खूप कमी असतो. याचे कारण थेट गुणसूत्रांच्या पातळीवरील आहे. पुरुषाची सूत्रे XY तर स्त्रीची XX असतात. रंगज्ञानासंबंधीची जनुके X गुणसूत्रावर असतात. त्यामुळे फक्त एका X मधील जनुकीय बिघाडाने देखील पुरुषात हा दोष उत्पन्न होतो. तर स्त्रीमध्ये दोष उत्पन्न व्हायला दोन्ही X मध्ये बिघाड असावा लागतो. एखाद्या स्त्रीची रंगदृष्टी वरकरणी जरी निकोप असली तरी तिच्या एका X गुणसूत्रात बिघाड असू शकतो. अशी स्त्री या दृष्टीदोषाची निव्वळ वाहक असते; तिला झालेल्या मुलग्यात हा दोष दिसू शकतो.

अनुवंशिक बिघाडामध्ये दोन प्रकारचे रंगदोष दिसून येतात :
१. लाल-हिरव्या रंगांचा पारखदोष : याचे प्रमाण सर्वाधिक आहे. हा दोष समाजातील ८% पुरुष तर अवघ्या अर्धा टक्के स्त्रियांमध्ये आढळतो.
२. निळ्या-पिवळ्याचा पारखदोष .

बिगर-अनुवंशिक कारणे अशी आहेत :
• वृद्धापकाळ
• अपघातात मेंदूला झालेली इजा
• दृष्टिपटलाची झीज होणारे आजार
• लेझर किंवा नीलातीत किरणांचा दीर्घ संसर्ग
• औषधांचे दुष्परिणाम : यामध्ये क्षयरोगावर दिले जाणारे ethambutol आणि पुरुषाच्या लैंगिक दुर्बलतेवर दिले जाणारे Viagra यांचा समावेश आहे.

व्यवसायिक मर्यादा
जन्मजात रंगदृष्टीदोष असलेल्या व्यक्तीला दैनंदिन जीवनात विशेष सरावाने ‘रंगज्ञान’ करून घ्यावे लागते. वाहतूक नियंत्रण दिवे ओळखणे हे त्याचे एक महत्त्वाचे उदाहरण. या यंत्रणेमध्ये वरपासून खालपर्यंत रंगीत दिव्यांचे क्रम ठरलेले असतात. ते जाणून (आणि अन्य लोकांचे अनुकरण करून) अशी व्यक्ती त्यांचा अर्थ समजून घेते. मात्र काही विशिष्ट नोकरी आणि व्यवसायांमध्ये असा दोष असलेल्या व्यक्तींना घेता येत नाही. अशा व्यवसायांची ही काही उदाहरणे :
रेल्वे व विमानाचे पायलट
• लष्करी सेवा
• भूगर्भशास्त्र अभ्यास

अशा व्यवसायांमध्ये इच्छुक उमेदवारांची निवड करताना त्यांच्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये रंगदृष्टी चाचणीचा विशेष समावेश केलेला असतो.

वैद्यकीय पेशात सुद्धा खरेतर निरोगी रंगदृष्टीची गरज आहे. काविळीच्या रुग्णाचा रंग, सूक्ष्मदर्शकाखाली दिसणारे विविध जंतू आणि पेशींचा रंग, तसेच विविध दुर्बिणींद्वारा केलेल्या शरीराच्या अंतर्गत तपासण्यांमध्ये रंग अचूक ओळखण्याचे महत्त्व नक्कीच आहे. भारतीय वैद्यक परिषदेचा एक पूर्वापार नियम होता, की वैद्यकीय शिक्षण-प्रवेश घेण्यासाठी रंगदृष्टी निरोगी पाहिजे. परंतु 2017 मध्ये या नियमाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाचा निकाल याचिकाकर्त्याचे बाजूने लागला. मग न्यायालयीन आदेशानुसार भारतीय वैद्यक परिषदेने समिती नेमून तो नियम काढून टाकलेला आहे.
जागतिक वैद्यक विश्वातही या मुद्द्यावर बराच खल झालेला आहे आणि तज्ञांत त्याबाबत मतांतरे आहेत.
सामान्य नागरिकांना रस्त्यावर स्वयंचलित वाहने चालवण्यासाठी जो परवाना काढावा लागतो त्यासाठी वैद्यकीय चाचणी द्यावी लागते. रंगदृष्टीची कमतरता असलेल्या नागरिकांना वाहन परवाना द्यावा की नाही यासंबंधी अनेक देशांमध्ये बरीच चर्चा आणि नियमबदल झालेले आहेत. भारतात 2020 मध्ये संबंधित मंत्रालयाने यासंदर्भात पत्रक काढलेले आहे.
सौम्य ते मध्यम दोष असलेल्या व्यक्तींना वाहन परवान्यासाठी अडवले जाऊ नये असे त्यात म्हटले आहे. फक्त तीव्र दोष असलेल्या लोकांबाबत तज्ञांच्या मतानुसार निर्णय घेतला जावा असे निर्देश आहेत.

निदान चाचण्या
रंगदृष्टीदोषाचे निदान करण्यासाठी काही चाचण्या उपलब्ध आहेत. त्यापैकी सर्वात सोपी असलेली चाचणी म्हणजे Ishihara चाचणी. या चाचणीचे नाव Ishihara या जपानी संशोधकांवरून देण्यात आलेले आहे. तिचा चाळणी चाचणी म्हणून वापर केला जातो. यामध्ये एकूण ३८ चित्रांचे तक्ते असतात. प्रत्येक तक्त्यामध्ये विविध आकाराचे व रंगांचे ठिपके असतात. त्यांच्या दरम्यान एखादा अंक किंवा आकृती काढलेली असते (चित्र पाहा):

ok
या ‘दडलेल्या” गोष्टी उमेदवाराने अचूक ओळखणे अपेक्षित असते. तक्त्यांची रचना आणि सूत्रे वेगवेगळी असतात. काही तक्त्यांमध्ये दाखवलेला अंक (किंवा आकृती) निरोगी व्यक्तीच बरोबर वाचते तर दोष असलेली व्यक्ती गोंधळते. या उलट अन्य काही तक्त्यांत याच्या बरोबर उलट सूत्र असते. उमेदवाराने प्रत्येक तक्ता विशिष्ट बल्बच्या प्रकाशात ३ सेकंदात ओळखायचा असतो. सर्व तक्ते दाखवून झाल्यानंतर संबंधिताने किती बरोबर ओळखले यावरून गुणांकन केले जाते. साधारणपणे 85% गुण मिळाल्यास रंगदृष्टी निकोप मानली जाते.(वरील चित्रातील अंक कोणता आहे ते वाचकांनी प्रतिसादात जरूर लिहावे !)

लहान मुले किंवा अशिक्षित व्यक्तीसाठी या तक्त्यांत काही वेगळ्या प्रकारच्या सुधारणा केलेल्या असतात, ज्यात अंक ओळखण्याऐवजी एखाद्या रंगीत रेषेचा मार्ग बोटाने तपासून पाहिला जातो. उमेदवार या चाचणीत अनुत्तीर्ण झाल्यास याहून वरच्या पातळीवरील काही चाचण्या केल्या जातात. संशोधन पातळीवर Anomaloscope हे महागडे उपकरण वापरून अंतिम खात्रीशीर माहिती मिळवता येते.
एखाद्याला रंगदृष्टीदोष असल्याचे लहानपणीच समजल्यास चांगले असते. त्यादृष्टीने शाळांमध्ये अनौपचारिक प्रकारे चाचणी घेण्यासाठी The Curious Eye यासारखी पुस्तके आंतरजालावर उपलब्ध आहेत. त्यांचा वापर प्राथमिक चाळणी चाचणी म्हणून सामान्य माणसालाही करता येतो.

उपचार
अनुवंशिक असलेल्या या दोषावर तो “बरा” करणारा उपचार अजून तरी उपलब्ध नाही ! तडजोड म्हणून काही उपायांच्या मदतीने संबंधितांना रंगासंबंधीची कामे करताना थोडीफार मदत होऊ शकते. हे उपाय असे असतात :
१. विशिष्ट प्रकारची कॉन्टॅक्ट लेन्स एकाच डोळ्यात घालून वापरणे.

२. मोबाईल ॲप्स : यामध्ये विशिष्ट प्रकारचे रंग code स्वरूपात परिवर्तित करून दाखवले जातात.

3. Eyeborg : हे उपकरण दोष असलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर बसवतात त्याला एक अन्टेना असते. तिच्या द्वारा विविध रंगांचे संदेश उपकरणात येतात. नंतर त्या संदेशांचे भिन्न ध्वनिलहरीमध्ये रूपांतर केले जाते.

एक मुद्दा स्पष्ट आहे. वरीलपैकी कुठल्याही उपायांनी ज्या प्रकारचा दृष्टिदोष आहे तो रंग मेंदूच्या पातळीवर “ओळखता” येत नाही. फक्त रंगांच्या संबंधित कामे करताना काही प्रमाणात साहाय्य होते.

समारोप
दृष्टीपटलातील शंकुपेशी आणि मेंदूच्या समन्वयातून आपल्याला रंगज्ञान होते. या क्षमतेमध्ये अनुवांशिक कमतरता असलेले बऱ्यापैकी लोक (प्रामुख्याने पुरुष) समाजात आहेत. या लेखाच्या वाचकांपैकीही काहीजण असे असू शकतील. त्यांना दैनंदिन व्यवहारापासून ते विशिष्ट व्यवसाय अंगीकारण्यात पर्यंत काही अडचणी व मर्यादा येतात. अन्य काही कौशल्यांच्या मदतीने त्यावर काही प्रमाणात मात करता येते. या सर्वांचा आढावा लेखात घेतला. तो वाचकांना उपयुक्त वाटेल अशी आशा आहे.
......................................................................................................
दृष्टी या विषयावरील पूर्वीचे लेखन : ‘अ’ जीवनसत्व : निरोगी दृष्टीचा मूलाधार

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Jul 2022 - 2:28 pm | ज्ञानोबाचे पैजार

मला बरेच दिवस असा प्रश्न पडला आहे की लाल असे म्हटल्यावर माझ्या मेंदूत जी प्रतिमा उभी रहाते तशीच प्रतिमा दुसर्‍या व्यक्तीच्या डोळ्यासमोर उभी रहात असेल का?

पैजारबुवा,

कुमार१'s picture

11 Jul 2022 - 4:11 pm | कुमार१

माझ्या मेंदूत जी प्रतिमा उभी रहाते तशीच प्रतिमा दुसर्‍या व्यक्तीच्या डोळ्यासमोर उभी रहात असेल का?

>>> अगदी बरोबर.
कोणी लाल म्हणेल त्यालाच कोणी तांबडा वगैरे म्हणेल.
म्हणूनच हे लेखात दिले आहे :

एखादा माणूस जेव्हा असे म्हणतो की, अमुक एक गोष्ट या ठराविक रंगाची आहे, तेव्हा ते त्याचे व्यक्तिगत आकलन असते. अशा आकलनात काही प्रमाणात व्यक्तीभिन्नता आढळते.

वामन देशमुख's picture

11 Jul 2022 - 5:57 pm | वामन देशमुख

रंगजाणिवांच्या विश्वाची शरीर-वैद्यक परिप्रेक्ष्यातून मांडणी करणारा हा लेख आवडला. या चर्चेत भर घालण्याची माझी पात्रता नाही. पण तज्ज्ञ मिपाकर्स भर घालतीलच.

---

उत्तर 74 आहे का?

---

अवांतर: रंगांच्या तंत्रविश्वात -

वेगवेगळ्या माध्यमांवर रंग उमटवण्याच्या वेगवेगळ्या प्रणाली असतात - त्यांपैकी RGB CMYK RYB ह्या काही.
रंग उमटवण्याच्या प्रणाली

लेखानुरूप चर्चा सुरु राहायला हवी; इथेच आवरते घेतो.

कुमार१'s picture

11 Jul 2022 - 6:34 pm | कुमार१

धन्यवाद !
तुम्ही रेखाटलेल्या प्रणाली सुंदर व अनुरुप आहेत हे सांगणे न लगे.

श्वेता व्यास's picture

12 Jul 2022 - 9:47 am | श्वेता व्यास

रोचक माहिती !

Bhakti's picture

12 Jul 2022 - 12:14 pm | Bhakti

छान रंगीत लेख.

मालविका's picture

12 Jul 2022 - 12:28 pm | मालविका

लेख मनापासून वाचला. माझा मुलगा यातल्या partial colour blind प्रकारात येतो . लहान असताना मी त्याला रंग शिकवले. पण तेव्हा जाणवल नाही कधी. लहान आहे म्हणून चुकीचे रंग सांगतो असं वाटायचं. साधारण ६ वर्षाचा झाल्यावर आम्ही मुद्दाम त्याला रंग विचारायला लागलो. पण पोपटपंची करून त्याला माहित झालं होत. त्यामुळे हिरवा रंग दाखव म्हटलं कि पानांचा सांगायचा. पण खोडाचासुद्धा हिरवाच सांगायचा. डॉक्टरला दाखवल्यावर डॉक्टरनि कन्फर्म केलं कि त्याला रंगदृष्टिदोष आहे. त्याला लाल, निळा, हिरवा, पिवळा असे मेन रंग कळतात पण त्याची शेड कमी जास्त झाली कि गोंधळतो. त्याला देखील याची कल्पना दिलेली आहे. त्यामुळे चित्रकला हा विषय आम्ही ऑप्शनला टाकलाय (म्हणजे त्यात त्याला किती का मार्क मिळेना आम्ही लक्ष देत नाही)तसंच शाळेत देखील सांगून ठेवलेलं आहे ,नाही त्याला जमलं तर सोडून द्या.आपणहून केलं तर ठीक आहे.
डॉक्टरनि याच कारण अनुवंशिकता हे सांगितल्यावर आमची ट्यूब पेटली. माझ्या दादाला सेम प्रॉब्लेम होता. आणि जेव्हा इतर भावंडांशी हा विषय झाला तेव्हा माझ्या मामाला देखील रंग कळत नाहीत हे कळले. आता आजोबा हयात नसल्याने आणखी पाठी जाणे शक्य नाही. पण निदान आईकडून हा अनुवंशिकतेने आलाय. मामा - दादा आणि आता माझा मुलगा असा याचा प्रवास आहे. मामाच्या मुलाला हा दोष नाही किंवा दादाच्या दोन्ही मुलांना हा दोष नाही. अर्थात फार मेजर काही नसल्याने आणि त्यावर उपाय नाही हे डॉक्टर नि स्पष्ट सांगितल्याने आमचं रुटीन कुठे बिघडलं नाही. फक्त आता मुलाच्या करियर च्यादृष्टीने विचार करता लेखात म्हटल्याप्रमाणे काही ऑप्शन्स रद्द करावे लागले.
डॉक्टरना जेव्हा विचारले तेव्हा स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले, कि जे पूर्णपणे रंगदृष्टिदोष असतात त्यांना ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर कसा दिसेल त्याप्रमाणे जग दिसत असत. त्यातही थोड्या शेड्स असतातच. मग ते लोक त्या शेड्स ना लाल, निळा, पिवळा हि नावं देऊन त्यांच्या डोक्यात शेड्स पक्क्या करतात.
लहान असताना आम्ही दादाला रंग काळात नाहीत तेव्हा खूप हसायचो. मुद्दाम दादाला हा रंग कोणता आहे ? विचारायचो आणि त्याने चुकीचे सांगितल्यावर हसायचो. तेव्हा आई, आजी कोणाला असं काही असेल याची माहिती नव्हती. आता नेट वर वाचून, वगैरे माहिती असल्याने आम्ही वेळेत जाऊन डॉक्टरला दाखवून सल्ला घेतला. अर्थात आधी म्हटल्याप्रमाणे दादाचे देखील नुकसान काही झाले नाही. गाडी चालवताना सिग्नल जगभरात सेम असतात. लाईट ऑन /ऑफ कळतो. त्यामुळे वरचा लाईट लागला कि लाल सिग्नल लागला हे कळतं. त्यामुळे ड्रायविंगला प्रॉब्लेम येत नाही. त्यात इथे गावाकडे सिग्नल नसल्याने मोठ्या शहरात जाईल तेव्हाचाच प्रश्न असतो. पण तरीही कधीही त्याच्या हातून अपघात झाला नाही कि मुंबई - पुण्यात आल्यावर सिग्नल तोडल्याबद्दल पावती फाडावी लागली नाही.
प्रतिसाद फारच मोठा झाला पण माझ्या अनुभवाचा विषय असल्याने जरा जास्त लिहिले गेले .

कर्नलतपस्वी's picture

12 Jul 2022 - 12:36 pm | कर्नलतपस्वी

कागा सब तन खायियो ,चुन चुन खायियो मास
दो नैना मत खायियो ,इनमे पिया मिलन की आस

कुमार१'s picture

12 Jul 2022 - 12:37 pm | कुमार१

सर्व नवीन प्रतिसादकांचे उत्साहवर्धनाबद्दल आभार !
..
मालविका,
सुंदर अनुभवजन्य प्र.
त्यातले काही मुद्दे स्वतंत्रपणे घेतो.

कुमार१'s picture

12 Jul 2022 - 1:47 pm | कुमार१


त्यामुळे चित्रकला हा विषय आम्ही ऑप्शनला टाकलाय

>>>
हरकत नाही. पण ..

हेही रोचक आहे :
1. Clifton Pugh हे ऑस्ट्रेलियाचे नामवंत चित्रकार. त्यांना रंगदृष्टीदोष होता. त्यामुळे त्यांना इच्छा असूनही नौदलात प्रवेश मिळाला नाही. पुढे ते उत्तम दर्जाचे चित्रकार झाले आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवली.

2. Jin Kim या कोरीआच्या कलाकारांनी Animation क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवली. त्यांनाही हा दोष होता.

कुमार१'s picture

12 Jul 2022 - 3:11 pm | कुमार१

दोष असलेल्या व्यक्तींना सिग्नल ओळखायला मदत व्हावी म्हणून कॅनडामधील हे नियंत्रक दिवे पहा. प्रत्येक रंगाचा दिवा वेगळ्या आकाराच्या मुशीत बसवला आहे :

ok

लाल दिवा : चौरस चौकट
पिवळा दिवा : हिर्‍याच्या आकाराची
हिरवा : वर्तुळाकार

तर्कवादी's picture

14 Jul 2022 - 10:00 pm | तर्कवादी

रत्येक रंगाचा दिवा वेगळ्या आकाराच्या मुशीत बसवला आहे :

आपल्याकडेही लाल दिवा गोल व स्थिर असतो, पिवळा चालू बंद (ब्लिंक) होतो व हिरवा बाणाच्या स्वरुपात असतो

कुमार१'s picture

15 Jul 2022 - 7:33 am | कुमार१

होय, बरोबर आणि चांगले निरीक्षण.
हिरवा दिवा बाण स्वरूपात दाखवण्याचे तंत्र भारतात गेल्या दोन दशकांपासून दिसून येते आहे.

माझ्या लहानपणी मला आठवते त्यानुसार तीनही रंगाचे दिवे हे निव्वळ प्रकाशगोल असायचे.

Nitin Palkar's picture

12 Jul 2022 - 8:46 pm | Nitin Palkar

जटील तांत्रिक माहिती बऱ्यापैकी सुगम करून सांगितलीत.

नचिकेत जवखेडकर's picture

13 Jul 2022 - 6:17 am | नचिकेत जवखेडकर

छान माहिती. वर नितीन पालकर म्हणतात त्याप्रमाणे जातील माहिती सोपी करून सांगितलीत. धन्यवाद!

कुमार१'s picture

13 Jul 2022 - 7:44 am | कुमार१

सर्व नवीन प्रतिसादकांचे उत्साहवर्धनाबद्दल आभार !

आपणा सर्वांच्या सहभागानेच चर्चा चांगली होत आहे. तुमचे प्रतिसाद माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. हा विषय तसा क्लिष्ट आहे. त्यामध्ये शरीरशास्त्र, जनुकशास्त्र, पदार्थविज्ञान आणि गणित या सर्व अभ्यासशाखांचा संबंध येतो. काही मुद्दे तसे क्‍लिष्ट असून त्यांना सोपे करण्याच्या मर्यादा आहेत.

परंतु या विषयातील व्यक्तिगत अनुभव आणि विषयाचे सामाजिक अंग या गोष्टी सर्वांना आवडतील या उद्देशानेच हे लेखन केले.

काही स्त्रियांमध्ये एक्स गुणसूत्रावर एक विशिष्ट प्रकारचा जनुकबदल झालेला असतो. त्यातून त्यांच्या दृष्टीपटलात ४ प्रकारच्या शंकुपेशी निर्माण होतात. (लेखात म्हटल्याप्रमाणे निरोगी व्यक्तीत फक्त ३ प्रकारच्या असतात). या चौथ्या प्रकारच्या पेशीमुळे अशा स्त्रियांना एका अतिरिक्त तरंगलांबीचा प्रकाश दिसू शकतो. याला रंगदृष्टीचे चौरंगी सूत्र असे म्हटले जाते. अशा स्त्रिया सामान्यांपेक्षा कित्येक पट अधिक रंग(छटा) पाहू शकतात.
…..

याव्यतिरिक्त मानवी उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातूनही काही रंजक मुद्दे पुढे आले आहेत. तीन प्रकारच्या शंकुपेशी व तिरंगी सूत्र ही अंतिम उत्क्रांती आहे काय? तर तसे नसावे. अजून काही हजार वर्षांनी अशी शक्यता आहे, की चौथ्या प्रकारची शंकुपेशी माणसांमध्ये तयार होऊ शकते. त्या परिस्थितीत मानवाने उत्क्रांतीचा वरचा टप्पा गाठलेला असेल आणि रंगदृष्टीही चौरंगी सूत्रावर आधारलेली असू शकते.

तर्कवादी's picture

14 Jul 2022 - 10:02 pm | तर्कवादी

अशा स्त्रिया सामान्यांपेक्षा कित्येक पट अधिक रंग(छटा) पाहू शकतात.

अशा स्त्रियांना कपडे खरेदी करताना सामान्यांपेक्षा कित्येक पट अधिक वेळ लागत असावा :)

अनिंद्य's picture

14 Jul 2022 - 8:00 pm | अनिंद्य

क्लिष्ट विषय सोपा करून सांगण्यात तुमची हातोटी आहे, लेखात पुन्हा एकदा प्रत्यय आला.

पु ले शु

मुक्त विहारि's picture

14 Jul 2022 - 8:08 pm | मुक्त विहारि

आणि मालविका यांचा प्रतिसाद पण आवडला ...

कुमार१'s picture

14 Jul 2022 - 8:37 pm | कुमार१

धन्यवाद मंडळी.
तुमच्या प्रोत्साहनामुळेच लेखनासाठी नेहमी प्रेरणा मिळते.
........
अजून काही....

मासे व पक्ष्यांच्या काही जातींमध्ये दृष्टीचे चौरंगी सूत्र असते. पक्ष्यांना त्यांचे अन्न शोधणे आणि पुनरुत्पादनासाठी जोडीदार निवडण्यासाठी नीलातित (UV) प्रकाशदृष्टीची गरज असते. त्यामुळे त्यांच्यात चौथ्या प्रकारच्या शंकुपेशी आहेत.

पृष्ठवंशीय प्राण्यांचे पूर्वज खरेतर चौरंगी दृष्टीचे होते. पुढे उत्क्रांती दरम्यान पहिले सस्तन प्राणी दुरंगी दृष्टीचे झाले. माकड आणि वानर यांच्यापासून तिरंगी सूत्र दिसू लागले.

….. आता इथून पुढच्या उत्क्रांतीमध्ये मानव पुन्हा चौरंगी दृष्टीकडे जाणार काय, हा सध्याच्या संशोधनाचा विषय आहे !

कुमार१'s picture

14 Jul 2022 - 8:37 pm | कुमार१

धन्यवाद मंडळी.
तुमच्या प्रोत्साहनामुळेच लेखनासाठी नेहमी प्रेरणा मिळते.
........
अजून काही....

मासे व पक्ष्यांच्या काही जातींमध्ये दृष्टीचे चौरंगी सूत्र असते. पक्ष्यांना त्यांचे अन्न शोधणे आणि पुनरुत्पादनासाठी जोडीदार निवडण्यासाठी नीलातित (UV) प्रकाशदृष्टीची गरज असते. त्यामुळे त्यांच्यात चौथ्या प्रकारच्या शंकुपेशी आहेत.

पृष्ठवंशीय प्राण्यांचे पूर्वज खरेतर चौरंगी दृष्टीचे होते. पुढे उत्क्रांती दरम्यान पहिले सस्तन प्राणी दुरंगी दृष्टीचे झाले. माकड आणि वानर यांच्यापासून तिरंगी सूत्र दिसू लागले.

….. आता इथून पुढच्या उत्क्रांतीमध्ये मानव पुन्हा चौरंगी दृष्टीकडे जाणार काय, हा सध्याच्या संशोधनाचा विषय आहे !

तर्कवादी's picture

14 Jul 2022 - 10:07 pm | तर्कवादी

माहितीपुर्ण लेखाबद्दल धन्यवाद डॉक्टर
istotine व अन्य काही eye drops रंगदृष्टीदोषावर गुणकारी असल्याचा दावा करतात. याबद्दल काही सांगू शकाल काय ?
istotine

कुमार१'s picture

15 Jul 2022 - 8:00 am | कुमार१

चांगला प्रश्न.
आता हा मुद्दा मुळातून समजून घेऊ. अनुवंशिकतेने आलेल्या रंगदृष्टी दोषावर “बरा” करणारा सध्या कोणताही उपाय नाही. कारण हा दोष जनुकीय पातळीवरचा आहे. तो अंतिम “बरा” (cure) करायचा असल्यास जनुकीय उपचारच करावे लागतील. हे सध्या तरी उपलब्ध नाहीत.

आपल्या दृष्टीपटलात दंडपेशी व शंकुपेशी असून त्यांच्यामुळे आपल्याला अनुक्रमे सामान्य दृष्टी आणि रंगदृष्टी प्राप्त होते. जर का दृष्टपटलाची झीज सुरू झाली तर आपली संपूर्ण दृष्टीच अधू होऊ लागते, ज्यामध्ये रंगदृष्टी देखील अंतर्भूत आहे !

वरील दावा करणारे औषध उत्पादक असा युक्तिवाद करतील, की आमच्या औषधाने दृष्टिपटलाची झीज थांबते. याचा अर्थ असा असतो, की जी काही संपूर्ण दृष्टी आहे ती आधीइतकी टिकून राहील, अधिक वाईट होणार नाही.
परंतु त्या औषधाचा निव्वळ रंगदृष्टी सुधारण्यासाठी काहीही संबंध नाही.

एकंदरीत तो फसवा युक्तिवाद असतो !

टर्मीनेटर's picture

19 Jul 2022 - 7:16 pm | टर्मीनेटर

नेहमीप्रमाणेच उत्तम लेख!
एका दृष्टीक्षेपात चित्रातला आकडा मला 74 वाटला.

ह्या लेखाची लिंक रंगदृष्टीची समस्या असलेल्या माझ्या शारजास्थित मित्राला पाठवत आहे. तो केरळी असला तरी उत्तमरीत्या मराठी वाचू -बोलू शकतो. पंधरा एक वर्षांपूर्वी तो भारतातून यूएई ला स्थलांतरित झाला तेव्हा ह्या समस्येमुळे त्याला तिथला वाहन चालवण्याचा परवाना मिळू शकला नाही!

वैद्यकीय पेशात सुद्धा खरेतर निरोगी रंगदृष्टीची गरज आहे. काविळीच्या रुग्णाचा रंग, सूक्ष्मदर्शकाखाली दिसणारे विविध जंतू आणि पेशींचा रंग, तसेच विविध दुर्बिणींद्वारा केलेल्या शरीराच्या अंतर्गत तपासण्यांमध्ये रंग अचूक ओळखण्याचे महत्त्व नक्कीच आहे. भारतीय वैद्यक परिषदेचा एक पूर्वापार नियम होता, की वैद्यकीय शिक्षण-प्रवेश घेण्यासाठी रंगदृष्टी निरोगी पाहिजे. परंतु 2017 मध्ये या नियमाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाचा निकाल याचिकाकर्त्याचे बाजूने लागला. मग न्यायालयीन आदेशानुसार भारतीय वैद्यक परिषदेने समिती नेमून तो नियम काढून टाकलेला आहे.

न्यायालयाचा हा निवाडा मला तरी पटला नाही!

कुमार१'s picture

19 Jul 2022 - 7:47 pm | कुमार१

धन्यवाद.

१.74 अगदी बरोबर !

२. रंगदोष असलेल्या व्यक्तींना वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासंबंधी जगभरातच धोरण एकंदरीत शिथिल आहे. अगदी पाश्चात्त्य देशांमध्ये सुद्धा.
तोच संदर्भ देऊन भारतीय न्यायालयात बाजू मांडण्यात आली होती. इथल्या एका संदर्भानुसार तैवान मध्ये धोरण कडक दिसते

https://onlinelibrary.wiley.com/doi/full/10.1111/j.1444-0938.2009.00434.x

काही देशांमध्ये मूलभूत वैद्यकीय पदवीला काहीच अडथळा ठेवलेला नाही. परंतु पुढे योग्य ती पदव्युत्तर शाखा निवडावी असे समुपदेशन केले जाते.

कुमार१'s picture

19 Jul 2022 - 8:18 pm | कुमार१

रंगदृष्टीदोष राहू द्या, त्याही पुढची ही घटना आहे:

एका पूर्ण अंध डॉक्टरने पदव्युत्तर नीट ही परीक्षा पार केली असून त्याने एमडी मानसोपचार या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मागितला होता परंतु तज्ञ समितीने त्याचा अर्ज फेटाळला आहे.
त्याविरुद्ध संबंधित डॉक्टर सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. जगभरात या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अंधांना प्रवेश दिला गेल्याची उदाहरणे आहेत.

आता आपले न्यायालय काय निर्णय देते हा उत्सुकतेचा विषय राहील.
संदर्भ

"आता आपले न्यायालय काय निर्णय देते हा उत्सुकतेचा विषय राहील."

बापरे... गंभीर प्रकरण आहे!

कुमार१'s picture

28 Oct 2022 - 10:21 am | कुमार१

जगातील प्राचीन संस्कृतींमध्ये असलेल्या
भिन्न ‘रंगज्ञाना’वर प्रकाश टाकणारा एक छान लेख:

त्यांच्या व आजच्या आपल्या ‘रंगज्ञाना’त बराच फरक आहे. विविध वस्तूंच्या शोधानुसार रंगज्ञान विकसित होत गेले.