रायरेश्वर मोहीम
जून ११,१२, २०२२
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुका आणि सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या सीमेवर असलेलं रायरेश्वर पठार हे इतिहासाच्या पानांमध्ये अत्यंत महत्त्वाचं ठिकाणं म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक महिन्यांपासून रायरेश्वरच्या या पवित्र भूमीला भेट द्यायचं नियोजन सुरू होत, ज्या भूमीवर साक्षात छत्रपतींनी श्रीदेव रायरेश्वराच्या चरणी रुधिरार्पण करीत स्वराज्यनिर्मितीची शपथ घेतली त्या भूमीला भेट द्यायचा योग ज्या दिवशी आला तो दिवस अनायासे तिथीनुसार शिवराज्याभिषेकाच्या पूर्वसंध्येचा दिवसचं निघाला. शनिवारी दुपारी पुण्यातून निघून पुणे- दिवेघाट- सासवड- कपूरहोळ- भोर- आंबेघर- आंबवडे- कोर्ले मार्गे संध्याकाळी साडे-पाचच्या सुमारास केंजळगड व रायरेश्वराच्या मधल्या खिंडीतील वाट ज्याला श्वानदरा वा सुनदरा असे म्हंटले जाते तिथे पोहोचलो. इथून एका बाजूला प्रस्तर आणि दुसऱ्या बाजूला दरी यामध्ये लावलेल्या लोखंडी शिडीमार्गाच्या पायथ्याला पोहोचलो. संपुर्ण पठार व पायथा पावसाळी ढगांच्या धुक्यात हरवून गेले होते. पलीकडील संपुर्ण खोरे धुक्यात बुडून गेलं होतं. अलीकडील केंजळगड मात्र त्यातही स्पष्ट ओळखू येत होता पण इतर डोंगर मात्र दृष्टिपल्याड होते.
मुक्काम व जेवणाच्या सोयीसाठी रायरेश्वर पठारावरील रहिवासी तथा 'रायरेश्वर फोर्ट कॅम्पिंग' चे संचालक बंधू त्रिकुट सचिन - सुनील- संदीप जंगम यांच्याशी आधीच बोलणं झालं होतं. आंबवड्यापासूनचं त्यांना फोन लावायचा प्रयत्न सुरू होता पण संपर्क होत नव्हता. वरती वाडीत जाऊनच चौकशी करू असं ठरवून शिडीमार्गे पठारावर साधारण पंधरा मिनिटांतच चढून आलो. वर येताच वनखात्याने केलेली कामे नजरेत भरली. जागोजागी पठारावरील पाहण्यासारखी ठिकाणे, जैवविविधता व इतर महत्त्वपुर्ण माहिती देणारे प्रशस्त व सुंदर फलक तसेच रायरेश्वरवाडीकडे जाण्यासाठी इंटरलॉकींग ब्लॉक्सने बांधलेला साधारण 4 फूट रुंदीचा रस्ता. अजूनही अनेक विकासकामे सुरू असल्याच्या खुणा जागोजागी होत्या. या रस्त्याने रमतगमत जाताना काही दिवसांपुर्वी लागून गेलेल्या वनव्याच्या खुणाही दिसून येत होत्या. साधारण 20 मिनीटे अगदी आरामात चालत आम्ही एका छप्पर नसलेल्या लाकडी शेडपाशी पोहोचलो. तिथे आम्हाला आमच्या या दोन दिवसांच्या वाडीतील मुक्कामाचे यजमान जंगम कुटुंबियांपैकी संदीप भेटला. पुढे येत त्याने आमची विचारपूस केली व मी नाव सांगताच तुमचीच वाट पाहत थांबलो होतो हे ही सांगितलं. तो जिथे उभा होता तिथूनच आत पन्नास-साठ फुटांवर आमची कॅम्प साईट होती. आम्ही एकूण ६ जण होतो त्यातील ४ जण तिथे पोहोचलो होतो, आमचे दोन मित्र उशिराने येणार असल्याने त्यांना यायला वेळ होता. संदीपने आम्हाला आमचे टेंट्स दाखवले, मोठ्या आकाराचे टेंट्स ज्यात एकामध्ये ४ लोक झोपू शकतील असे दोन टेंट्स आमच्यासाठी तेथे तयार होते.
टेंट्स पाहिल्यानंतर संदीपबरोबर आम्ही वाडीकडे चालू लागलो. पाच-सात मिनिटांतच पाण्याच्या टाक्यापाशी पोहोचलो. गोमुखातून सुरू असलेली करंगळीएवढी पाण्याची धार आणि बाजूने दोन थरात अलीकडच्या काळात पुनर्बांधणी केलेलं टाकं असं एकंदरीत त्याचं स्वरूप होत. संपुर्ण वाडी पिण्यासाठी हेच पाणी वापरते. स्वच्छ, थंड चवीचं पाणी इथं वर्षभर उपलब्ध असते. टाक्याजवळून दोन वाटा फुटत होत्या, त्यातील एक वाट रायरेश्वर देवालयाची तर दुसरी कच्ची व चढण असलेली वाट वाडीतील संदीपच्या घराकडे जाणारी. इथे आम्हाला दर्शनासाठी जायला सांगून आमच्या चहा-नाश्त्याची सोय करायला संदीप घराकडे गेला. दुसऱ्या वाटेने वर चढत दोनच मिनिटात आम्ही रायरेश्वराच्या देवालयापाशी पोहोचलो. इथे दुसऱ्या एका ग्रुपबरोबर असलेला संदीपचा भाऊ सचिन भेटला. बाहेर हातपाय धुवूनचं मंदिरात या असे त्याने सांगितलं, जवळच पाण्याने भरलेल्या बादल्या होत्या. तिथे हातपाय धुवून आम्ही मंदिर प्रांगणात प्रवेश केला.
भिंतींचे पुरातन दगड देवालयाचा थोर इतिहास सांगत होत्या, आवारात दोन भग्न नंदी व दगडी पणती दृष्टीस पडली. मंदिर पूर्वाभिमुख आहे. समोरील बाजूस छोटीशी जिर्णोद्धारीत पडवी, तिथेच डाव्या हाताला दगडी खांबावर एक झीज झालेला देवनागरीतील शिलालेख आहे. त्यावर रायरेश्वर ही अक्षरं तेवढी मला वाचता आली. हा शिलालेख बऱ्याच अलीकडील काळातील असावा असे वाटते. मंदिराचं मुळ स्वरूप कायम ठेवता अनेकदा जीर्णोद्धार झालेला असावा, आताही मंदिराचं छप्पर उतरत्या पत्र्यांनी झाकलेलं आहे. या पडवी नंतर मग सभामंडप व शेवटी जवळपास सर्व शिवमंदिरात असतो तसा खोलगट भागातील गाभारा अशी रचना, गाभाऱ्यात फरशी बसवलेली आहे. समोरील बाजूस शिवरायांचं सवंगड्यांसहित स्वराज्याची शपथ घेतानाचं चित्र काचेच्या फ्रेममध्ये लावलं आहे. तसेच एक शोभेची ढाल-तलवार ही लावून ठेवलेली आहे. प्रत्यक्ष शिवछत्रपतींचे पाय लागलेल्या व ते एकेकाळी बसलेल्या गाभाऱ्यात आम्ही आहोत ही जाणीव रोमांचित करणारी होती. दुसऱ्याच दिवशी, तिथीनुसार शिवराज्याभिषेक होता. त्याअनुषंगाने, मनात अनेकानेक विचारांची आवर्तने एकामागून एक गर्दी करीत होती.
महाराजांनी राज्याभिषेकाचा निर्णय कशा परिस्थितीत घेतला असावा बरं ???
कारण शिवरायांचं संपुर्ण चरित्र पाहावं तर "श्रीमंत योगी" , हे राज्य श्रींचं म्हणून ते तटस्थपणे हा सर्व व्याप उपसत होते. मनात आणलं असतं तर मांडलिकत्व स्वीकारून मोठमोठे वाडे-महाल उभे करून आयुष्यभर ऐशोआरामात राहिले असते. पण राजांनी गडकिल्ले निवडले, डोंगरदऱ्यातील भटकंती निवडली. गैरसोयीतील कष्टप्रद वास्तव्य स्वीकारलं. म्हणजे एक प्रकारचं वैराग्यचं की...
अशा या राजाला ३२ मण सोन्याचं सिंहासन वा छत्र-चामरं-मोर्चेल-अंबारीधारी हत्ती यांची पत्रास ती काय असणार ???
हा सगळा सव्यापसव्य मांडला तो महाबली शहाजीराजे आणि आऊसाहेब जिजाऊ यांच्या हिंदूपदपादशाहीच्या स्वप्नाला कुणी जहागिरदारांची वेडी महत्वाकांक्षा समजू नये म्हणून, धड मिसरूड ही न फुटलेल्या वयात, रायरेश्वराच्या साक्षीनं सुरू केलेल्या स्वराज्य यज्ञाला कुणी पोराटोरांची शिळोप्याची शेकोटी समजू नये म्हणून, कान्होजी,माणकोजी, दादोजी, नेतोजी, मुरारबाजी, तानाजी, बाजी या आणि अशा असंख्य अनाम वीरांच्या सर्वोच्च त्यागाचं कुणी वांड कुणबटांचं फुटकळ बंड समजुन हेटाळणी करू नये म्हणून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शतकानुशतके परकीय आक्रमकांच्या टोळधाडींनी स्वत्व गमावून बसलेल्या भूमीला व स्वाभिमान हरवलेल्या तिच्या लेकरांना पुन्हा पाय रोवून मुकाबला करण्याची, संघर्ष करण्याची प्रेरणा देण्यासाठी आमचा राजा शककर्ता छत्रपती झाला....
होय !!! स्वाभिमानाचं पुन:रोपण करण्यासाठीच रायगडावर मराठेशाहीचं सिंहासन उभं ठाकलं.......
अगदी पुढील भक्त दर्शनासाठी ताटकळल्याची चाहूल लागेपर्यंत आम्ही गाभाऱ्यात बसून हेच विचार, हीचं जाणीव अंगी मुरवत होतो. छत्रपतींच्या उपकारांचं ऋण मूकपणे व्यक्त करीत होतो.
तिथून बाहेर आल्यावर रायरेश्वराचा वारसा सांभाळणाऱ्या पुजारी जंगम यांना भेटलो, त्यांच्याकडून मंदिरासंबंधी जुजबी माहिती मिळवली व त्यांच्या सेवेप्रती कृतज्ञता म्हणून काही निधी दान केला. त्यांनी त्यांच्या नियमानुसार लगेच त्याची पावतीही दिली. समोरील चौथऱ्यावर जाऊन पुतळा पहावा असेही सुचवले. मंदिरातून बाहेर पडल्यावर समोरील बाजूस दोन चौथऱ्यांवर शिवरायांचा एक अर्धाकृती तर दुसरा सिंहासनाधिष्ठीत छोटासा पुतळा आहे. तसेच डाव्या बाजूला एक प्रशस्त शेड बांधण्यात आलीय जिथे साधारण पन्नासेक पर्यटक आरामात राहू- बसू शकतात.
तिथून निघून आम्ही सचिनबरोबर त्याच्या घराकडे निघालो. पुजारी जंगमांनीही वेळ झाल्याने मंदिर बंद करून आमची सोबत केली. मंदिराच्या समोरील बाजूस खालची वाडी तर मागील बाजूस वरची वाडी मिळून साधारणपणे चाळीसेक उंबरा व अडीचशे-तीनशे डोकी. जवळपास सर्वच जंगम, बहुतेक घरे कच्ची, कुडा-मातीच्या भिंतींची, पत्र्याचं उतरतं छप्पर, शेणाने सारवलेल्या जमिनींची. पावसाळी मोसमात पठारावर तीन महिने बेफाम कोसळणाऱ्या पावसाला तोंड द्यायची जय्यत तयारी सर्वच घरात दिसत होती. पडव्यांच्या बाजूला गवताची शाकरणी करून आत गुरांचा चारा आणि सुका लाकूडफाटा भरून ठेवला होता.
भिजण्यापासून धोका असलेल्या सर्वच वस्तू संरक्षित करायचं काम चालू होतं. सगळी लगबग न्याहाळत, फोटो काढत आम्ही आमचे यजमान जंगमांच्या घरात विसावलो.
अर्धा तास वाट पाहिल्यानंतर गरम भजी आणि चहा आमच्यासमोर आला व तात्काळ उदरात गडपही झाला.
एव्हाना अंधार पडला होता व आमचे उशिरा निघालेले दोन मावळे मित्र अजूनही आंबेघर परिसरातच रस्त्यात होते, वडतुंबी-कोर्लेपासून पुर्ण जवळपास निर्मनुष्य घाटरस्त्याने त्यांना अंधारात यायचे होते व रायरेश्वराची शिडीही रात्रीच्या अंधारात चढावी लागणार म्हणून आम्हाला काळजी वाटत होती. त्यामुळे, जेवणासाठी साडेनऊ-दहा वाजता परत यायचं नक्की करून आम्ही जंगम कुटुंबीयांचा तात्पुरता निरोप घेऊन कॅम्प साईटवर आलो. तिथे थोडावेळ स्थिरस्थावर होऊन परत रायरेश्वराच्या शिडीकडे आमच्या येणाऱ्या मित्रांची वाट पाहण्यासाठी म्हणून गेलो. रात्रीच्या गर्द अंधारात त्या छोट्याशा वाटेने वाहत्या वाऱ्याच्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर चालत जाणे थ्रिलिंग अनुभव होता. जोडीने चेष्टा-मस्करी अविरत चालू होती.
समुद्रसपाटीपासून तब्बल १३४० मीटर उंचीचं, अंदाजे सात-आठ किलोमीटर लांब व दीड-दोन किलोमीटर रुंद असं अवाढव्य पठार, समोर रात्रीच्या अंधारात महाबळेश्वर- पाचगणीतील दिव्यांची रोषणाई लक्ष वेधून घेत होती. खाली दरीत ही छोट्या गावांमधील, वाड्या-वस्त्यांवरील लुकलुकणारे दिवे दिसत होते. समोर चालतांना रातकिड्यांचा आवाज, जागोजागी मोठमोठ्या बेडकांचे टुणकन उडी मारून आडवं जाणं, बाजूंच्या माळरानात होणारी खुसफूस असं एकंदरीत अंगावरील केस ताठ करणार वातावरण होतं. पंधरा-वीस मिनिटांच्या ट्रेल नंतर आम्ही पुन्हा शिडीचा रस्ता जिथे पठाराला मिळतो त्या जागी येऊन पोहोचलो व खालून येणाऱ्या मित्रांची वाट पाहू लागलो. मित्रांचे फोन लागत नव्हते याचा अर्थ ते घाटात जवळ असण्याची शक्यता होती. वाट बघण्यात काही वेळ गेला व अचानक एकदाचा फोन लागला व त्यानंतर दुसऱ्याचं मिनिटाला पहिला मित्र पठारावर पोचला, दुसरा ही त्याच्या मागेच होता. रात्रीच्या गच्च अंधारात दोघेचं पूर्ण घाट व त्यानंतर ही अंगावर येणारी शिडीची वाट विंचु-काट्यांच्या साम्राज्यात चढून आले होते त्याबद्दल मनात त्यांचं कौतुक होतं पण तोंडावर उशीर केल्याबद्दल शिव्याच होत्या. पुढची दहा मिनिटं तिथे चेष्टा-मस्करी-शिव्यांना नुसता उत आला होता. त्याचा पहिला बहर ओसरल्यावर आम्ही पुन्हा आमच्या टेंट्सकडे चालू लागलो.
टेंट्सवर पोहोचून, रात्री झोपायचे कपडे चढवले व जेवणासाठी वाडीकडे निघालो, मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात चालत जात असताना अचानक वाटेच्या मधोमध काळ्याकभिन्न वृश्चिक महाशयांनी अचानकचं दर्शन दिलं. त्यांचं छायाचित्र काढून व त्यांना तिथेच निरोप देऊन आम्ही जेवणासाठी जंगमांकडे पोहोचलो. एक ग्रुप आमच्याआधी येऊन जेवणाचा आस्वाद घेत होता म्हणून अर्धा-पाऊण तास वाट पाहिल्यावर सव्वा-दहाच्या सुमारास आमचा नंबर लागला.
नाचणीची भाकरी, पिठलं, वरण-भात, मिक्स रस्सा भाजी, ठेचा, लोणचं, मस्त भाजलेला पापड आणि गोडासाठी शिरा असा बेत होता. सर्वच जण दणकून जेवलो.
जेवताना पठारावरील शेतीविषयी गप्पा सुरु होत्या, प्रचंड पाऊस पडणाऱ्या या ठिकाणी भात पीक घेतलं जातं नाही हे ऐकून आश्चर्य वाटलं. पठारावर कायम अति-थंड वातावरण राहते, भाताला दाणा पोसण्याच्या काळात दमट हवामान लागते, तशी परिस्थिती इथं नसल्याने दाणा पोसला जात नाही व जेमतेम उत्पादनही येत नाही त्यामुळे पठारावर खरिपात नाचणी व रब्बीत गहू ही मुख्य पीक घेतली जातात. शेतीसाठी व दुधासाठी गुरं पाळली जातात, देशी जातीचीच गुरं इथल्या पावसात टिकू शकतात. यामुळे तसेंच दुर्गमतेमुळे व्यावसायिक दूधधंदा इथं जवळपास नाही. उपलब्धता असेल तेव्हा दुधाचे तूप करून विकले जाते तेवढंच. रायरेश्वरावर शाकाहार कटाक्षाने पाळला जात असल्याने कोंबड्या, शेळ्या, बकऱ्या वा तत्सम प्राणीही कोणी पाळत नाहीत. किराणा, भाजीपाला, सिलेंडर व इतर गरजेच्या वस्तू खालून डोक्यावर वाहत आणाव्या लागतात. कुणाला घरासंबंधी डागडुजी वा घरबांधणी करायची असेल तरी सर्व सामान डोक्यावर वाहणे याला सध्यातरी पर्याय नाही. त्यामुळे बांधकामाच्या खर्चात तब्बल पाच-सात पट एवढी वाढ होते म्हणून मग स्थानिक उपलब्ध साधनांचा वापर करूनचं कच्ची घरे बांधणी-दुरुस्ती केली जाते. विजेची उपलब्धता असल्याने आताशा घरात TV सेट्स दिसू लागलेत पण ऐहिक सुखाच्या साधनांची तशी वानवाच म्हणावी लागेल, अशी परिस्थिती चांगली का वाईट याला सापेक्षतेची फुटपट्टी लावून उत्तर देणेच क्रमप्राप्त ठरावं.
ही सर्व माहिती घेत-घेत जेवण उरकलं व पुन्हा कॅम्प साईटवर पोहोचलो. आता वेळ कॅम्प फायरची होती. पण पावसाने ओली झालेली जमीन, बोचरा थंडगार वारा यात आग काही पेटेना, संदीप मदतीला होता तरी अग्निदेवता काही प्रसन्न व्ह्यायच नाव घेत नव्हती. अर्धा तास ना-ना खटपटी व एक पुर्ण काडेपेटी खर्ची घालून छोटीशी आग पेटवून देऊन संदीपने आमचा निरोप घेतला, तो घरात पोहोचला असेल नसेल तोपर्यंत आमचा कॅम्प फायर विझला ही.
मग त्या बिचाऱ्याला पुन्हा त्रास देण्याऐवजी आम्हीच आमच्या परीने खटपटी सुरू केल्या, तब्बल तासभर आदबल्या नंतर आमचा कॅम्प फायर पेटला, बोचऱ्या वाऱ्यात व ओलसर वातावरणात त्याचा जीव तसा जेमतेमचं होता पण त्याच्याभोवतीने आमच्या गप्पांचा फड चांगलाच रंगला, बॅकग्राऊंडला आवडती गाणी सुरू होतीच, जुन्या आठवणी व चेष्टा-मस्करीत दोन-अडीच तास कसे सरले समजलेच नाही. सरतेशेवटी पहाटे अडीचला आम्ही झोपण्यासाठी टेंट्स मध्ये शिरलो, उत्तम दर्जाचे सुरक्षित टेंट्स, स्वच्छ अंथरूण-पांघरून, आतमध्ये उजेडाला एक चार्जेबल दिवा अशी छान व्यवस्था होती. बाहेर वाहणाऱ्या थंड-बोचऱ्या वाऱ्यांचा फक्त आवाज आत येत होता बाकी काही नाही. अशा उबदार टेंटमध्ये लगेच झोप लागली.
सकाळी पावणे-सहाच्या दरम्यान जाग आली. आरडाओरडा करून सर्वांनी एकमेकांना उठवलं व आमची पठार फेरी सुरू झाली. एवढ्या सकाळीही पठारावर उजाडलं होतं व खाली दरीत तर चक्क ऊन पडल्याचा आभास होत होता.
रायरेश्वरावरून सर्व दिशांना नजर फिरवली की, त्या उंचीवरून कमळगड, केंजळगड, कोल्हेश्वर, तोरणा, पाचगणी, पांडवगड, पुरंदर, महाबळेश्वर, राजगड, रायगड, रोहिडा,लिंगाणा, वज्रगड, वैराटगड, सिंहगड दुर्ग दिसतात. तर नाखिंदा या रायरेश्वरच्या पश्चिम टोकावरून प्रतापगडही दिसतो. खाली धोम जलाशय, जांभळी बंधारा व दुसऱ्या टोकावरून नीरा-देवघर जलाशय असा नजारा दिसतो. ढगांचे वेगवेगळ्या आकारात- रंगात चालणारे खेळ डोळ्यांचे पारणे फेडतात असंच म्हणावं लागेल.
रायरेश्वराचे पठार हे साधारण ५ ते ६ किलोमीटर पसरलेले आहे. या पठारावर वर्षाऋतुचा पहिला बहर ओसरल्यावर भरपूर रानफ़ुले उगवतात तेंव्हा हे पठार स्वर्गीय अनुभूती देते. ही पठारफेरी आटपून आम्ही आन्हिके उरकण्यासाठी पुन्हा जंगमांकडे पोहोचलो, सर्वात मिळून एकच स्वच्छतागृह असल्याने थोडा वेळ लागला पण सर्व कार्यक्रम साग्रसंगीत पार पडला. त्यानंतर गरमागरम पोहे व पोह्यांबरोबर आलेल्या लिंबाच्या फोडी साध्या काळ्या चहात पिळून त्याला लेमन टी बनवून प्राशन करायचा आनंद घेऊन आम्ही पुन्हा रायरेश्वराच्या दर्शनाला गेलो.
त्यानंतर वेळ होती ती या गडाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एकाच ठिकाणी सात ते आठ विविध रंगाची माती पाहायला मिळते त्या ठिकाणी संदीप आमच्याबरोबर होता. शेत- पाणंद रस्ता, चढ-उताराची वाट चालत एका टेकडीच्या उतारावर ही अगदी दोन-तीन हजार वर्ग फुट भरेल एवढीच जागा, त्यामध्ये निळी, हिरवी, लाल, तांबडी, पिवळी, काळी, जांभळी आणि निळसर रंगाची माती आढळते. या पठारावरची आणखी वैशिष्ट्ये म्हणजे पावसाळ्यात याठिकाणी वाहणारा रिव्हर्स वाटरफाॅल व रिव्हर्स व्हाॅइस पाँइट, सनसेट पाँइट, तसेच एक लेणे ही आहे, पण समोर डोंगरावरून आमच्याच दिशेने येणारा जोरदार पाऊस पाहता आम्ही मागे फिरलो व पुन्हा वाडीकडे चालू लागलो.
वाडीत पोहोचता-पोहोचता आम्हाला जोरदार पावसाने गाठलेचं, आडोशाला म्हणून आम्ही लागलेल्या पहिल्याच घराच्या परसदाराच्या पडवीत शिरलो. घरमालक कृष्णा जंगम हे साधारण साठीपलीकडे झुकलेले गृहस्थ इथे त्यांच्या प्रेमळ पत्नी पार्वतीबाई यांच्या साथीनं राहतात. शेती व गुर पाळून गुजराण करतात, त्यांचा नवी मुंबईत छोटीशी नोकरी करणारा नातू जमेल तसं येऊन-जाऊन त्यांची काळजी घेत असतो. आम्ही तिथे असताना तो ही गावी आला होता. त्याच्याबरोबर आणि कृष्णा आजोबांबरोबर नाव-गाव अशा जुजबी चौकशीपासून सुरु झालेल्या गप्पा चांगल्याच रंगल्या. पार्वती आजी ही काही वेळाने आम्हाला सामील झाल्या. वाडीत राहताना येणाऱ्या अडचणी, जमिनीवरील मालकी हक्काचे कज्जे, वाडीला रस्त्याची असणारी प्रचंड निकड, अपेक्षित विकासकामे, प्रस्थापित राजकारण्यांविरोधातील नाराजी याबद्दल आजोबा भरभरून बोलले. पार्वती आज्जीनी आग्रह करून आमच्यासाठी चहा बनवला. गप्पाच्या ओघात हे ही कळले की वाडीवरील दोन-शिक्षकी शाळेतील लातूर आणि बीड भागातील शिक्षक हे आजोबांकडे तब्बल सात वर्षे राहत होते. याशिवाय, साधारण दशकभरापुर्वी रोहिडा किल्ल्यावरील रोहिडेश्वराच्या मंदिर जीर्णोद्धारासाठी आजोबांनी श्रमदान म्हणून सिमेंट गोण्या डोक्यावरून वाहून गडावर नेण्याची सेवा दिली होती. या अशा साध्या माणसांशी गप्पा मारता-मारता तासभर भुर्रकन उडून गेला, एव्हाना पाऊसही थांबला होता. आजी-आजोबांचा निरोप घेऊन आम्ही तिथून निघालो, वाटेत त्यांचा एक फोटो घ्यायची इच्छा झाली म्हणून परत फिरलो, दोघांचा एक छानसा फोटो घेतला, त्यांना ही दाखवला व या साध्याशा कृतीबद्दल त्यांनी दिलेल्या आशीर्वादांचा स्वीकार करीत निघालो.
पुन्हा आमचे यजमान जंगमांकडे आलो. आता त्यांचा निरोप घेण्याची वेळ होती. दोन दिवसांच्या पाहुणचाराबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले. त्यांनी अगदी काही दिवसांपुर्वीच सुरू केलेल्या रायरेश्वर फोर्ट कॅम्पिंग या व्यवसायाची उत्तरोत्तर भरभराट होत राहावी अशा मनापासून शुभेच्छा दिल्या व पुन्हा कॅम्प साईटवर आलो. बॅगांची आवराआवर करून टेंट्स खाली केले व रायरेश्वर पठार उतरण्यासाठी शिडीच्या वाटेवर चालू लागलो. एव्हाना ऊन पडले होते व उकडायला ही लागले होते. तुरळक संख्येने पर्यटक गडावर पोहोचायला सुरवात झाली होती. अर्ध्या तासात शिडी मार्गाने आम्ही पायथ्याला पोहोचलो. बॅगा गाडीत टाकल्या पुन्हा एकदा रायरेश्वराचा निरोप घेत परतीचा मार्ग धरला.
परतीच्या मार्गावर वाट थोडी वाकडी करून निगुडघरच्या प्रसिद्ध हॉटेल सार्थक येथे जेवणासाठी गेलो. जेवण करून भोरच्या राजवाड्याला धावती भेट द्यावी म्हणून भोरमध्ये गेलो. तिथे गेल्यावर समजले की कोरोना काळापासून राजवाडा पर्यटकांसाठी बंद आहे, त्यामुळे बाहेरूनच थोडं फिरून राजवाडा पाहिला व नीरा घाटावर आलो, निरेचं वाहतं पाणी पाहत काही काळ घालवला व पुन्हा गाडी काढून पुण्याच्या वाटेकडे लागलो. कपूरहोळ-सासवड मार्गे दिवेघाटाच्या अलीकडे किगा आईस्क्रीम इथे पुन्हा एक थांबा घेत आईस्क्रीम चा आस्वाद घेतला व दिवेघाट-हडपसर मार्गे घर गाठलं.
बऱ्याच दिवसांपासून मनात असलेला अजून एक ट्रेक पूर्ण झाल्याच्या समाधानात रात्री निवांत झोपलो. आता तयारी पुढील भरगच्च पावसाळी ट्रेक्सची........
रायरेश्वर फोर्ट कॅम्पिंग विषयी थोडंस - रायरेश्वर येथील शंकर जंगम व त्यांची तीन मुले सचिन-सुनील-संदीप यांनी काही दिवसांपूर्वीच पर्यटकांच्या सोयीसाठी या व्यवसायाला मोठी गुंतवणूक करीत सुरुवात केलीय. निसर्गाची आवड असणाऱ्या व निसर्गात राहण्याच्या आनंदासाठी थोडी गैरसोय सोसण्यास ना नसणाऱ्या पर्यटकांसाठी रायरेश्वर फोर्ट कॅम्पिंग हा एक उत्तम पर्याय आहे. उबदार टेंट्स, स्वच्छ अंथरूण-पांघरून, घरगुती साधं जेवण एवढं सगळं हे कुटुंब तुमच्यासाठी आनंदाने करायची तयारी ठेवतं. रायरेश्वराची दुर्गमता लक्षात घेता, ते देणारी सेवा ही अतिशय उत्तम अशीच म्हणावी लागेल. पण त्याचवेळी हे ही लक्षात ठेवावे लागेल की लक्झरी सोयी सुविधेला चटावलेल्या व वाट पाहण्याची सवय नसलेल्या लोकांना इथे आनंद मिळणार नाही.
रायरेश्वर फोर्ट कॅम्पिंगच्या जंगम बंधूंपर्यंत पोहोचण्यासाठी वर दिलेल्या फोटोतील नंबर्सवर संपर्क करावा......
प्रतिक्रिया
15 Jun 2022 - 10:26 pm | धनावडे
छानच झाली तुमची भटकंती.
फक्त एक दुरुस्ती ते धोम खोर नसून जांभळी खोर आहे.
16 Jun 2022 - 10:55 am | चक्कर_बंडा
धन्यवाद
जांभळी बंधारा आणि धोम धरण दोन्ही दिसतात तिथून म्हणून धोम खोरे शब्द वापरला. दुरुस्ती करतो.
16 Jun 2022 - 6:48 am | कर्नलतपस्वी
धाग्याने बांधून ठेवले.एका दमात वाचून काढला.वाचताना एवढा आनंद तर पहाताना किती आसा विचार मनात आला.
धन्यवाद
16 Jun 2022 - 11:30 am | चक्कर_बंडा
धन्यवाद..
16 Jun 2022 - 11:31 am | चक्कर_बंडा
धन्यवाद..
16 Jun 2022 - 6:48 am | कर्नलतपस्वी
धाग्याने बांधून ठेवले.एका दमात वाचून काढला.वाचताना एवढा आनंद तर पहाताना किती आसा विचार मनात आला.
धन्यवाद
16 Jun 2022 - 7:06 am | प्रचेतस
मस्तच लिहिलंय. रायरेश्वर अफाट आहे. दुसरं महाबळेश्वरच जणू मात्र अशा ठिकाणी रात्री कॅम्पफायर करून गाणी बिणी लावणे पटत नाही.
16 Jun 2022 - 10:57 am | चक्कर_बंडा
शेकोटीचं चुकलंच, सकाळी जुन्या वनव्याच्या खुणा सगळीकडे दिसल्यावर हे प्रकर्षाने जाणवलं.
16 Jun 2022 - 7:44 am | Bhakti
मस्त!
21 Jun 2022 - 7:45 pm | चक्कर_बंडा
धन्यवाद...
16 Jun 2022 - 8:36 am | कंजूस
पण लांब पडतं म्हणून गेलो नाही. तंबू आवडले. एक घ्यायचा विचार आहे.
फोटो मोजके चांगले आले आहेत mazi mobile चे.
16 Jun 2022 - 11:14 am | चक्कर_बंडा
फोटोबाबत मी तसा अडाणीचं, जसे जमेल तसे काढतो.
16 Jun 2022 - 8:37 am | कंजूस
दुरुस्ती.
16 Jun 2022 - 9:05 am | विजुभाऊ
छान मस्त लिहीलय. अगदी तेथे गेल्यासारखे वाटले
16 Jun 2022 - 11:15 am | चक्कर_बंडा
धन्यवाद
16 Jun 2022 - 9:37 am | sunil kachure
रायरेश्वर ल दोन तीन वेळा गेलो आहे .पण धोम च्या बाजू नी . पहिल्या वेळी गेलो तेव्हा आम्ही सहा मित्र होतो.आणि ३ बाईक.
तेव्हा जिथे लोखंडाची शिडी आहे त्याच्या खालपर्यंत बाईक घेवून गेलो होतो.
मोठमोठे दगड टाकलेले होते रस्त्यात.रस्ता बनवायचा विचार असावा.
बाईक वर बसून तो चढ चढणे केवळ अशक्य होते..
लोखंडाचा शिडी वरून वर चढून जावे लागते.
जास्त वयस्कर व्यक्ती किंवा ज्याला बिलकुल सवय नाही त्याच्या साठी ते अवघड काम आहे.
आमच्या बरोबर मुंबई मध्ये राहणारा आणि कधीच डोंगर दर्यात न गेलेला मित्राचा भाचा होता.
येताना त्याला बसून त्या शिड्या उतरव्या लागल्या.
आम्हाला सवय आहे त्या मुळे सहज चढणे उतरणे झाले.
वर विस्तृत पठार,एक मंदिर जिथे स्वराज्याची शपथ घेतली ते आहे
एक पाण्याचे टाक आहे तेथील च पाणी पिण्यासाठी वापरता असावेत.
येताना घट उतरताना एक बाईक चे मागचे चाक पंक्चर झाले..रात्र झाली होती..
पाठच्या सीट वरील मित्र दुसऱ्या बाईक वर शिफ्ट केला .टायर tube नंतर बदलावी लागली .
16 Jun 2022 - 11:18 am | चक्कर_बंडा
मी भोर मार्गे आलो, संपुर्ण रस्ता अगदी शिडीपर्यंत चांगला म्हणावा असा आहे.
20 Jun 2022 - 11:02 am | गोरगावलेकर
फोटो, माहिती व आपण केलेले वर्णन सर्वच छान
21 Jun 2022 - 7:44 pm | चक्कर_बंडा
धन्यवाद....
20 Jun 2022 - 10:50 pm | रीडर
छान माहिती आणि वर्णन
21 Jun 2022 - 7:44 pm | चक्कर_बंडा
धन्यवाद...
21 Jun 2022 - 7:51 pm | चौथा कोनाडा
+१
व्वा, भन्नाट भटकंती वृतांत!
24 Jun 2022 - 7:16 am | चौकस२१२
बरोब्बर चौकोनी माथा असलेला डोंगर तो कोणता ? आणि भौगोलिक दृष्ट्या हा असं बर्रोअबर कसा तयार झाला असेल?
वाई जवळून पाहिल्याचे आठवतंय
24 Jun 2022 - 7:50 am | धनावडे
पांडवगड
24 Jun 2022 - 8:10 am | प्रचेतस
केंजळगड आहे तो
24 Jun 2022 - 9:01 am | धनावडे
वाई जवळून केंजळगड नाही दिसत, त्यांनी वाई जवळून पाहिलाय म्हणजे तो केंजळगड नसेल.
24 Jun 2022 - 9:34 am | प्रचेतस
ते लेखातील फोटोच्या अनुषंगाने म्हणत आहेत असे वाटते, रायरेश्वराहुन दिसतो तो केंजळगड.
चौकस यांनी वाईवरून पाहिला तो पांडवगड.
24 Jun 2022 - 4:20 pm | चक्कर_बंडा
केंजळगड, आकार साधारणत: गांधी टोपीसारखा आहे. रायरेश्वराच्या अगदी समोर केवळ एका खिंडीने वेगळा झालेला आहे.
त्याच्या विशिष्ट आकाराबद्दल म्हणाल तर, आपलं पुर्ण पठारचं ट्रॅप रॉक्सने बनलंय, त्यातही बेसाल्ट हा मुख्य जो घाटमाथ्यावर ही विपुल प्रमाणात आढळतो व डोंगरमाथ्याला विशेष असे आकार यायला ही हाच खडक कारणीभूत आहे. काही ठिकाणी मजबुत, काही ठिकाणी ठिसूळ असा तर काही ठिकाणी तासला जाऊ शकेल असा ही.
नैसर्गिक ऊन, वारा, पावसाचा तसेच अल्प प्रमाणात मानवी हस्तक्षेपाचा (किल्ले, लेणी, मंदिरे) परिणाम असे विशिष्ट आकार दिसण्यामागे असावा असे वाटते.
28 Jun 2022 - 4:32 pm | राजेंद्र मेहेंदळे
रायरेश्वरला उन्हाळ्यात गेलो होतो एकदा. आता हे फोटो बघुन पावसाळ्यात जावेसे वाटते आहे. रहायची सोय असेल तर फारच उत्तम. बघुया कधी जमतेय ते.
30 Jun 2022 - 1:05 pm | चक्कर_बंडा
राहण्यासाठी वॉटरप्रूफ टेंट्सची सोय आहे. जास्त पाऊस असेल तर मंदिरापाशी मोठी शेड आहे तसेच वाडीत विनंतीवरून कुठेही रात्री झोपण्याची सोय नक्कीच होऊ शकते.
29 Jun 2022 - 5:13 pm | प्रसाद_१९८२
छान माहिती आणि वर्णन.
या टेंट व जेवणखाण्याचा साधरण खर्च किती आहे ?
30 Jun 2022 - 1:12 pm | चक्कर_बंडा
साधारणपणे, एक हजार रुपयात, दोन वा तीन जणांमध्ये एक टेंट, संध्याकाळचा चहा, रात्रीचे जेवण, दुसऱ्या दिवशी सकाळचा नाश्ता-चहा असं पॅकेज आहे.
शाकाहारी घरगुती जेवण तसेच बिन दुधाचा चहा.
9 Jul 2022 - 4:53 am | nutanm
अजून जास्त फोटोज् टाकायला हवेत, तसेच एक लोखंडी शिडी मार्गाचा फोटो टाकायला हवा, आणि पाण्याची टाके आम्हा टिपिकल शहरवासियांच्या माहितीसाठी कृपया टाकावीत. कारण आम्ही नाही कधी बघितली ना कधी ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे गड किल्ले चढून बघण्याची शक्यता , त्यामुळे आदरणीय महाराजांच्या गडकिल्ल्यांची थोडीतरी कल्पना येईल.
15 Jul 2022 - 7:34 pm | चक्कर_बंडा
नक्कीच, सुचना अंमलात आणायचा प्रयत्न करतो.