औषध-प्रवेश (२) : इंजेक्शन्सचे अस्त्र

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
23 May 2022 - 5:07 am

भाग १ इथे : https://www.misalpav.com/node/50235
....................
या भागात आपण औषधे देण्याचे जे शरीरमार्ग बघणार आहोत ते असे :
· इंजेक्शनद्वारा दिलेली औषधे
· इंजेक्शनचे अतिविशिष्ट मार्ग
· स्थानिक मार्ग
ok

इंजेक्शन
इंजेक्शन हा मुळातच लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणालाच नकोसा वाटणारा प्रकार ! त्याची कमी-अधिक भीती प्रत्येकाच्या मनात असते. इंजेक्शनचे नाव काढतात भोकाड पसरणारी मुले हे तर सार्वत्रिक दृश्य. परंतु, एरवी व्रात्य मुलांना इंजेक्शनवाल्या डॉक्टरांची भीती दाखवणारे पालक, जेव्हा स्वतःवर इंजेक्शन घ्यायची वेळ येते तेव्हा त्यांची अवस्था थोडीफार लहान मुलासारखीच झालेली असते. :)

या प्रकारात त्वचेतून सुई टोचून औषध शरीरात सोडले जाते. खालील परिस्थितीत या मार्गे औषध देण्याचा निर्णय घेतला जातो:
१. काही औषधे पचनसंस्थेद्वारे शोषली जाऊ शकत नाहीत. तर अन्य काही (उदा. इन्सुलिन) पचनसंस्थेतच नाश पावतात.
२. बेशुद्धावस्थेतील रुग्ण
३. जेव्हा औषधाचा परिणाम तातडीने होण्याची गरज असते तेव्हा.

या प्रकारे औषध देण्याचे ३ उपप्रकार आहेत :
१. सामान्य इंजेक्शन : जेव्हा औषध द्रव स्वरूपात लहान प्रमाणात द्यायचे असते तेव्हा ते सिरींजमध्ये भरून सुईद्वारा टोचले जाते.
२. इन्फ्युजन : जेव्हा द्रव औषध मोठ्या प्रमाणात द्यायचे असते तेव्हा ते अन्य द्रावणात मिसळून रक्तवाहिनीतून हळूहळू सोडले जाते.
३. इम्प्लांट : यात एखादे औषध त्वचेवर छेद घेऊन तिच्याखाली ठेवले जाते.

सामान्य इंजेक्शन : हा प्रकार तिघांमध्ये सर्वाधिक वापरला जाणारा असल्याने त्याबद्दल सविस्तर पाहू. सामान्य इंजेक्शन शरीरात ४ प्रकारे देता येते :

१. स्नायूंमध्ये.
२. रक्तवाहिनीत
३. त्वचेखालच्या निकटच्या भागात
४. त्वचेमध्येच

१. स्नायूंमध्ये (IM) :

ok
हा प्रकार खूप औषधांच्या बाबतीत वापरला जात असल्याने सर्वपरिचित आहे. आपल्यातील प्रत्येकाने कधी ना कधी या प्रकारचे इंजेक्शन घेतलेले असते. अलीकडील उदाहरण म्हणजे कोविडची लस. या प्रकारे इंजेक्शन देताना शरीरातील तीन जागा गरजेनुसार निवडता येतात :

अ) दंडाची बाहेरील बाजू : इथे २ ml पर्यंत द्रव टोचता येतो. इथून टोचलेल्या औषधाच्या शोषणाची गती चांगली असते.
आ) खुब्यावर : इथे ८ ml पर्यंतचा द्रव टोचता येतो. मात्र येथून होणारी शोषणाची गती वरील १ पेक्षा कमी असते.
इ) मांडीची बाहेरील बाजू : इथे ५ ml पर्यंत द्रव टोचता येतो. ही जागा लहान मुलांमध्ये निवडली जाते.

स्नायूमध्ये टोचलेले औषध हळूहळू झिरपत रक्तप्रवाहात पोचते. जी औषधे स्नायूदाह करणारी असतात ती या प्रकारे देता येत नाहीत; ती थेट रक्तवाहिनीतच द्यावी लागतात.

२. रक्तवाहिनीतून दिलेले इंजेक्शन (IV):
याप्रकारे दिलेले औषध थेट रक्तप्रवाहात जात असल्याने त्याची पूर्ण मात्रा शरीरासाठी उपलब्ध होते.
सर्वसाधारणपणे या प्रकारचे इंजेक्शन नीलावाहिन्यांमधून (veins) देतात. या वाहिन्या त्वचेखालोखाल असतात आणि त्या त्वचेवरून सहज दिसतात. बहुतेक वेळा कोपर किंवा मनगटाच्या पुढील बाजूच्या नीलांची निवड केली जाते.

या इंजेक्शनचे दोन प्रकार आहेत :
a. एका दमात दिलेले इंजेक्शन : यात सिरींजमध्ये द्रव भरून तो रक्तवाहिनीत सोडला जातो. अशा प्रकारे जास्तीत जास्त १० ml द्रव देता येतो. रक्तात शिरलेले औषध आधी हृदय, मग फुफ्फुसे आणि मग रोहिणी वाहिन्यांद्वारा सर्व शरीरात पोचते. अशा औषधी इंजेक्शनचा परिणाम सुमारे 20 ते 40 सेकंदात दिसतो. अशा इंजेक्शनचे एक उदा. म्हणजे Calcium gluconate.

b. हळू दिलेले इन्फ्युजन : जेव्हा एखादे औषध मोठ्या प्रमाणात बऱ्याच वेळासाठी द्यायचे असते तेव्हा या पद्धतीचा वापर केला जातो. यात मूळ औषध एखाद्या सलाईनच्या बाटलीमध्ये मिसळले जाते. आणि मग हे मिश्रण थेंब थेंब स्वरूपात रक्तात सोडले जाते. रुग्णालयात दाखल झालेल्या विविध प्रकारच्या रुग्णांच्या बाबतीत अशा प्रकारे औषधे दिली जातात.

c. रोहिणीवाहिन्यांतून (arteries) दिलेले इंजेक्शन (IA):
याचा वापर अत्यंत मर्यादित असून काही ठराविक आजारांतच केला जातो. अशा प्रकारे दिलेले औषध फक्त निवडक पेशींपुरते काम करते. उदाहरणार्थ, एखाद्या कर्करोगाची गाठ. अशा प्रकारे इंजेक्शन दिल्याने त्याचा जास्तीत जास्त परिणाम संबंधित गाठीवर होतो आणि संपूर्ण शरीरावर होणारे दुष्परिणाम कमीत कमी राहतात. तसेच विशिष्ट रोहिणीमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्यासही या प्रकारे इंजेक्शन देतात.

३. त्वचेच्या खालच्या निकटच्या मेदथरात (SC):
अशी इंजेक्शन्स सहसा दंड/मांडीच्या बाहेरील बाजूस किंवा पोटावर देतात. स्नायूमध्ये दिलेल्या इंजेक्शनपेक्षा यात कमी प्रमाणात औषध टोचता येते. त्या औषधाचे शोषण स्नायूपेक्षा कमी गतीने परंतु तोंडाने घेतलेल्या औषधापेक्षा जास्त गतीने होते. या प्रकारात ३ उपप्रकार असून त्यांची उदाहरणे अशी आहेत :
a. एका दमात दिलेले इंजेक्शन: इन्सुलिनचा एक डोस किंवा रक्तगुठळ्यांच्या उपचारासाठी दिलेले हेपारिन ही त्याची परिचित उदाहरणे.
b. इन्फ्युजन : सध्या विविध प्रकारचे इन्शुलिन पंप उपलब्ध आहेत. त्यातून गरजेनुसार इन्शुलिन शरीरात सोडले जाते.
c. इम्प्लांट : यात त्वचेवर छोटीशी शस्त्रक्रिया करून औषध आत छोट्या वडीच्या स्वरूपात ठेवले जाते. गर्भनिरोधक हॉर्मोन्स हे याचे उत्तम उदाहरण आहे. अशा वडीतून संबंधित औषध सुमारे 3 ते 5 वर्षे हळूहळू शरीरात सोडले जाते.

४. त्वचेमध्ये दिलेले इंजेक्शन (ID) :
साधारणपणे ते हाताच्या कोपर ते मनगट या पट्ट्यातील पुढच्या बाजूस दिले जाते. अशा प्रकारे दिलेले औषध रक्तप्रवाहात जवळजवळ शोषले जात नाही. याची ठळक उदाहरणे :
a. काही रोगांसाठी लसीकरण
b. रोगनिदान चाचण्यांसाठी टोचलेला द्रव.
….

पारंपरिक इंजेक्शन पद्धतीत सिरींजमध्ये औषध भरले जाते आणि तिला जोडलेल्या सुईमार्फत शरीरात सोडले जाते. यामध्ये रुग्णाला सुई टोचणे हा भाग वेदनादायी असतो. त्या दृष्टीने सुईविरहित इंजेक्शन ही संकल्पना गेल्या दशकात मांडली गेली. त्यावर अव्याहत संशोधन चालू आहे. या तंत्रज्ञानात विशिष्ट औषध खालील प्रकारे त्वचेतून आत वेगाने सोडले जाते :
· धक्का लहरींचा वापर
· वायुदाबाचा वापर
· सूक्ष्म वीजवापर
· लेझर तंत्र

ok
या नव्या पद्धतीचे फायदे आणि तोटे दोन्ही लक्षात घ्यावे लागतील.
· फायदा : काही औषधे मुळातच घट्ट व चिकट स्वरूपाची असतात. ती पारंपरिक इंजेक्शनने देता येत नाहीत. ती देणे आता शक्य होईल.
· तोटा : औषध त्वचेखाली सोडण्यासाठी उच्च दाबाचा वापर केला जातो. त्यातून त्वचेखालील थरांना इजा होऊ शकते.
· एक महत्त्वाचे : या नव्या तंत्राने रक्तवाहिनीतून इंजेक्शन देता येत नाही. इंजेक्शनचे बाकी वर वर्णन केलेले इतर मार्ग या प्रकारे हाताळता येतील.
........................

औषधे देण्याचे अतिविशिष्ट मार्ग
काही आरोग्य समस्यांमध्ये एखादे औषध संपूर्ण रक्तप्रवाहात मिसळण्याऐवजी शरीराच्या ठराविक भागापुरतेच आणि तातडीने तिथे पोचणे आवश्यक असते. अशा प्रसंगी या विविध मार्गांचा अवलंब केला जातो.

A. पाठीच्या कण्यातील मज्जारज्जू
त्याच्या अंतर्गत भागात इंजेक्शनच्या माध्यमातून औषधे देता येतात. मुख्यत्वे हे मार्ग ठराविक शस्त्रक्रियांच्या पूर्वी भूल देण्यासाठी वापरतात. यामध्ये दोन उपप्रकार आहेत :
१. Epidural : हा प्रकार बाळंतपणाच्या वेदना कमी करण्यासाठी बऱ्यापैकी वापरला जातो.
२. स्पायनल : यात औषध मज्जारज्जूच्या आत असलेल्या द्रवात सोडले जाते.
काही आजारांमध्ये रुग्णास असह्य वेदना होत असतात तेव्हादेखील या मार्गाद्वारे वेदनाशामक औषध देता येते.

B. थेट मेंदूच्या अंतरंगात (पोकळीत) इंजेक्शन:
मेंदूच्या विशिष्ट ट्युमरमध्ये हा मार्ग वापरतात.

C. थेट हृदयात दिलेले इंजेक्शन
जेव्हा काही कारणाने अचानक हृदयक्रिया बंद पडते तेव्हा Adrenalineचे इंजेक्शन एका लांब सुईतून थेट हृदयात देता येते. एकेकाळी या मार्गाचा वापर करण्यात येत असे. परंतु अलीकडे अशा प्रसंगात वापरण्यासाठी अन्य चांगले मार्ग उपलब्ध झाल्यामुळे सहसा या मार्गाचा वापर केला जात नाही. तसेही हा मार्ग कटकटीचा व इजा पोचवणारा असतो.

D. सांध्यामध्ये दिलेले इंजेक्शन
काही प्रकारच्या संधिदाहांत स्टिरॉइड्सचे इंजेक्शन हे विशिष्ट सांध्यांमध्ये देता येते.

E. लिम्फ ग्रंथींमध्ये
काही ऑटोइम्यून आजारांमध्ये इथे इंजेक्शनद्वारा मूळ पेशी देण्यात येतात.

F. हाडाच्या गाभ्यात इंजेक्शन: आणीबाणीच्या परिस्थितीत, विशेषतः लहान मुलांमध्ये जेव्हा नीलारक्तवाहिनी इंजेक्शनसाठी सापडू शकत नाही तेव्हा या मार्गाचा अवलंब करता येतो.

G. अन्य मार्ग : उदरपोकळी तसेच फुप्फुसे आणि त्यांच्या आवरणांच्या मधल्या पोकळीत थेट औषध देता येते.

H. विविध स्थानिक मार्ग : डोळे, कान, योनी, गुदद्वार आणि त्वचा
या अवयवांच्या सौम्य आजारांत काही औषधे थेंब किंवा मलम स्वरुपात दिली जातात. डोळ्यांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेपूर्वी डोळ्यामध्ये स्थानिक भूल देणारे थेंब आता नित्यनेमाने वापरले जातात.

त्वचेवर लावायची औषधे तेल, मलम आणि औषधी पापुद्रा या स्वरुपात असतात. अलीकडे काही वेदनाशामक औषधे अशा पापुद्र्याच्या स्वरूपात मिळतात, जो त्वचेवरची लावून ठेवता येतो. त्यातून औषध हळू गतीने दीर्घकाळ बाहेर पडत राहते.

I. शरीराच्या एखाद्या भागाची छोटी शस्रक्रिया करताना स्थानिक भूलकारक औषध इंजेक्शन किंवा फवाऱ्याच्या स्वरुपात दिले जाते.

J. योनीमार्गे गर्भाशयात बसवलेली गर्भनिरोधक साधने : या साधनांद्वारा काही प्रकारची गर्भनिरोधक औषधे तिथे दीर्घकाळ साठवून ठेवली जातात. 1980- 90 च्या दशकात ‘तांबी’ (Copper T) हे खूप वापरात होते. अलीकडे अशा साधनांमध्ये प्रोजेस्टेरॉनशी संबंधित रसायने वापरलेली असतात.
........................................................

औषध आणि दवाखाना - अगदी नकोनकोसे वाटणारे शब्द ! पण करता काय ? जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येकाला कधी ना कधी कुठले तरी औषध घ्यायची वेळ येतेच. आधुनिक वैद्यकानुसार औषधे घेण्याचे तब्बल २३ मार्ग/ प्रकार आपण या लेखद्वयात पाहिले. अर्थात हा आकडा अंतिम समजू नये ! सामान्यज्ञानाच्या मर्यादेत एवढे पुरे म्हणून विवेचन थांबवले आहे.

काही औषधे गोळी/ फवारा/ इंजेक्शन या सर्व स्वरूपात उपलब्ध असतात (उदा. स्टिरॉइड्स). पण काही औषधे त्यांच्या शोधापासून आजतागायत इंजेक्शन स्वरूपातच उपयुक्त ठरली आहेत. (उदाहरणार्थ इन्सुलिन). अर्थात त्यामागे जैवरासायनिक कारणे आहेत. अशी औषधे गोळीरूपात आणण्याचे संशोधकांचे आटोकाट प्रयत्न अनेक दशकांपासून चालू आहेत. त्याला भविष्यात यश येवो.

आपल्या वाचकांपैकी......
· जे तरुण आहेत त्यांना कुठलाही दीर्घकालीन आजार मागे न लागो ही इच्छा;

· जे मध्यमवयीन आहेत त्यांच्यातील काहीजणांना कुठला तरी आजार झालेला असू शकेल. त्याचे उपचार मोजक्या गोळ्या /फवाऱ्यापुरते मर्यादित राहोत ही सदिच्छा;

आणि
· ज्यांच्यावर दीर्घकालीन इंजेक्शनरुपी औषध घेण्याची वेळ आलेली आहे, त्यांना ते सहन करण्याची ताकद मिळो ही प्रार्थना.
.................................................................
समाप्त

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

नगरी's picture

23 May 2022 - 7:12 am | नगरी

छान व माहितीपूर्ण लेख. आता या औषधांचे निष्कसन कसे होते? माझ्या माहिती प्रमाणे जवळपास सर्व औषधे लघवी वाटे बाहेर पडतात,म्हणजेच किडनीवर लोड.पॅरॅसिटोमोल अपवाद

कुमार१'s picture

23 May 2022 - 7:56 am | कुमार१

सर्व रासायनिक औषधांचा चयापचय यकृतात होतो. त्यानंतर तयार झालेले पदार्थ पाण्यात विरघळणारे असतात. त्यामुळे ते सहजगत्या मूत्रपिंडाच्या माध्यमातून लघवीत उत्सर्जित केले जातात.

ठराविक औषधांचा अल्प भाग शौच आणि घामाद्वारे बाहेर पडतो. विशिष्ट प्रकारची भूलकारक औषधे चयापचयानंतर श्वासातूनही बाहेर पडतात.

पॅरासिटॅमॉल हा काही अपवाद नाही. त्याचे भवितव्य वर उल्लेखिलेल्या मार्गानेच असून मुख्यत्वे ते पदार्थ लघवीवाटे बाहेर पडतात.

Bhakti's picture

23 May 2022 - 8:43 am | Bhakti

खुपचं छान माहिती.
हेपारिनचे घेतलेले २४० डोस आठवले.

कुमार१'s picture

23 May 2022 - 9:06 am | कुमार१

"*हेपारिनचे घेतलेले २४० डोस >>>>

कोविड दरम्यान का पूर्वी अन्य कारणासाठी?

Bhakti's picture

23 May 2022 - 10:34 am | Bhakti

प्रेग्नंसी दरम्यान ८ महिने घेतले होते.गर्भातल्या बाळाला रक्त पुरवठा नीटसा होत नाही , असं doctor ना लक्षात आलं.पोटावरच्या बेंबीच्या आसपास त्वचेवर घेतले.

तर्कवादी's picture

23 May 2022 - 7:01 pm | तर्कवादी

माहितीपुर्ण लेख.
पुर्वी कुत्रा चावल्यावर पोटावरच १४ इंजेक्शन्स घ्यावे लागायचे असे ऐकून आहे. पुढे ह्या इंजेक्शन्स्ची संख्या कमी झाली. बहुधा आता पोटावरही दिले जात नाही.

कुमार१'s picture

23 May 2022 - 7:14 pm | कुमार१

कुत्रा चावल्यावर पोटावरच १४ इंजेक्शन्स

>>
तुम्ही म्हणताय ती अ‍ॅन्टीरेबिजची पोटावरची 14 इंजेक्शन्स प्रकार आता खूप जुना झाला !

आता अलीकडील २ प्रकार म्हणजे :
१. त्वचेमध्ये देणे (ID) : डब्ल्यूएचओनुसार
२. स्नायूंमध्ये देण्याचा पर्याय (IM) सुद्धा उपलब्ध आहे.
देशानुसार यातील एक पर्याय निवडला जातो

प्रमोद देर्देकर's picture

23 May 2022 - 8:43 pm | प्रमोद देर्देकर

सलाईन मधून किंवा इंजेकशनद्वारे हवेचा बुडबुडा आत गेला तर धोकादायक असतो ना?

मग त्यावर मात कशी करतात?. आणि जर गेला तर काय लक्षणं आहेत व काय उपाय आहे?

कुमार१'s picture

23 May 2022 - 9:35 pm | कुमार१

*इंजेक्शनद्वारा रक्तप्रवाहात हवा जाणे
>>>
१. प्रत्येक वेळेस याची लक्षणे दिसतातच असे नाही.
,२. हवेचा बुडबुडा छोटा असेल तर तो सूक्ष्म रक्तवाहिन्यांमध्ये विघटित होतो.
३.मोठ्या प्रमाणात हवा गेल्यास फुफुसाना आणि हृदयाला धोका संभवतो

रुग्णालयात काही विशिष्ट प्रकारच्या प्रोसिजर्स करताना या गोष्टीचा धोका संभवतो. तो कमीत कमी करता येईल यादृष्टीने खालील प्रतिबंध करता येतो :
१.रुग्णाला सोफ्यावर आरामात बसल्यासारखे बसवणे
२. त्याचे डोके पायांपेक्षा खालच्या पातळीवर ठेवणे
उपचार:
ही घटना घडल्याचे लक्षात आले तर तातडीने रुग्णाला डाव्या कुशीवर आणि पुन्हा एकदा डोक्याची पातळी खाली ठेवणे
इथे चित्र पहा :
https://en.m.wikipedia.org/wiki/Trendelenburg_position

खूप त्रास होऊ लागला असेल तर१०० % ऑक्‍सिजन आणि अन्य आणीबाणीचे उपाय करतात.

तुषार काळभोर's picture

23 May 2022 - 10:37 pm | तुषार काळभोर

एकदा दुसरीला असताना उजवा हात मोडला होता. तेव्हा एकदा पूर्ण भूल दिली होती. (ऑपरेशन नव्हते झाले. केवळ प्लास्टर केलेले). त्यावेळी तळहाताच्या मागे इंजेक्शन दिलं होतं बहुतेक.
नंतर अकरावीला (परत) उजवा हात मोडला. यावेळी प्रकरण गंभीर असल्याने हातात दोन रॉड बसवले. (अजून आहेत). ऑपरेशन असल्याने पूर्ण भूल होती. तेव्हा उत्सुकता म्हणून इंजेक्शन दिल्यापासून आकडे मोजायला सुरुवात केली. सहा पर्यंत मोजू शकलो. ही साधारण नऊला दिली आणि दुपारी दोनला हळू हळू शुद्ध आली. रात्री नऊ दहापर्यंत मी गुंगीत होतो.
तिसऱ्यांदा केवळ स्थानिक भूल म्हणून पोटामागील एका मणक्यात भूल दिली. इन्स्टंट बधीर :D ही सुद्धा सकाळी दहाला दिली, दुपारी तीनपर्यंत बधिरपणा होता.

भुली संबंधी अवांतर प्रश्न:
१. भूल द्यायच्या आधी रात्रभर खायचे प्यायचे नसते. ते का?
२. अपघातासारख्या इमर्जन्सीमध्ये भूल कशी देतात? तेव्हा तर दहा बारा तास वाट बघता येणार नाही.
३. भूल किंवा कोणतेही इंजेक्शन हातातील शिरेतून दिल्यावर ते हृदयामार्गे संपूर्ण शरीरात पोहचायला कितीवेळ लागतो?

कुमार१'s picture

24 May 2022 - 5:59 am | कुमार१

चांगले प्रश्न
१.
आपण जागृतावस्थेत असताना जर का जठरातील अन्न आणि द्रव ढेकरेच्या रूपात अन्ननलिकेत वर आले, तर प्रतिक्षिप्त क्रियेमुळे ते श्वसनमार्गात अजिबात जात नाही. ही अतिशय महत्त्वाची संरक्षक प्रतिक्षिप्त क्रिया आहे.

मात्र, जेव्हा संपूर्ण शरीराला भूल दिली जाते तेव्हा भूल इंजेक्शनच्या प्रभावाने वरील प्रतिक्षिप्त क्रिया खूप कमी झालेली असते. जर का रुग्णाने शस्त्रक्रियेच्या आधी व्यवस्थित भरपेट खाल्लेले असेल, आणि टेबलवर झोपलेले असताना ते अन्नपाणी जर वरच्या दिशेने आले, तर त्यातून ते श्वसनमार्गे फुफ्फुसात जाण्याचा धोका असतो
(Pulmonary aspiration).

कुमार१'s picture

24 May 2022 - 6:04 am | कुमार१

*अपघातासारख्या इमर्जन्सीमध्ये भूल
>>>
अशा आणीबाणीच्या परिस्थितीत भूलतज्ञ आणि शल्यक्रियातज्ञ यांनी एकमेकांशी चर्चा करून तारतम्याने निर्णय घ्यायचा असतो.

अपघाताचे स्वरूप, कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रियेची तातडी हे सर्व मुद्दे लक्षात घ्यावे लागतात.

एका बाजूला तातडीची गरज तर दुसर्‍या बाजूला अस्पिरेशनचा धोका हे दोन मुद्दे तराजूत ठेवून फायदे व तोटे याचा हिशोब करावा लागतो. त्यानुसार निर्णय घेतला जातो.

कुमार१'s picture

24 May 2022 - 7:16 am | कुमार१

*शिरेतून दिल्यावर ते हृदयामार्गे संपूर्ण शरीरात पोहचायला कितीवेळ लागतो? >>
याचे उत्तर लेखात दिलेले आहे:

शा औषधी इंजेक्शनचा परिणाम सुमारे 20 ते 40 सेकंदात दिसतो.

Bhakti's picture

24 May 2022 - 7:27 am | Bhakti

@तुषार
जरा अवांतर प्रश्न,मेटल डिटेक्टरमधून तुम्ही जातांना सायरन वाजता का? हातातल्या rod मुळे.मी असे किस्से ऐकून आहे :)

अजून तरी नाही :)
मंदिरे आणि मॉल सारख्या ठिकाणी असलेले मेटल डिटेक्टर्स दिखाव्याकरता असावेत. कधी वाजतात, कधी वाजत नाहीत. वाजतात तेव्हा खिशातील नाणी, चावी यामुळे वाजत असावीत.
पण विमानतळावर कधीच वाजत नाहीत. तरी प्रत्येक वेळी भीती वाटते, इथूनच माघारी पाठवतात की काय!!

कुमार१'s picture

24 May 2022 - 9:55 am | कुमार१

या विषयावर काही शोधनिबंध प्रसिद्ध झालेले दिसतात. उदाहरणार्थ :

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC1964703/

त्या अभ्यासानुसार 47 टक्के लोकांमध्येच धातूचे रॉड डिटेक्टरने ओळखले गेले. गुडघ्यामधले सहज ओळखले जातात परंतु खुब्यामधले नाही, असे दिसते.

पण विमानतळावर कधीच वाजत नाहीत. तरी प्रत्येक वेळी भीती वाटते, इथूनच माघारी पाठवतात की काय!!

विमानतळावरील मेटल डिटेक्टर वाजत नाही असा माझाही अनुभव आहे (माझ्या उजव्या मनगटात टिटॅनियमची प्लेट आहे)
आणि वाजला तरी घाबरण्याचे कारण नाही. हॉस्पिटलमधून सर्टिफिकेट घेवून ठेवा आणि विमानप्रवासाच्या वेळी त्याची प्रत जवळ बाळगा. खासकरुन आंतरराष्ट्रीय प्रवासाचे वेळी दक्षता घ्यायला हवी.

सुबोध खरे's picture

24 May 2022 - 11:32 am | सुबोध खरे

. अपघातासारख्या इमर्जन्सीमध्ये भूल कशी देतात? तेव्हा तर दहा बारा तास वाट बघता येणार नाही.

तातडीची शस्त्रक्रिया असेल तर जठरात नळी टाकून आत असलेले सर्व पदार्थ खेचून बाहेर काढतात आणि जठर परत सलाईनने धुवून घेतात.(gastric lavage) म्ह

णजे बेशुद्धावस्थेतून शुद्धीत येताना भूल देण्याच्या औषधामुळे जरी उलटी झाली तरी पोटातील आम्ल मिश्रित पदार्थ फुप्फुसात जात नाहीत.

तुषार काळभोर's picture

24 May 2022 - 5:57 pm | तुषार काळभोर

धन्यवाद, डॉक्टर

कुमार१'s picture

24 May 2022 - 12:48 pm | कुमार१

**तेव्हा तर दहा बारा तास वाट बघता येणार नाही
>>>
हा मुद्दा आलाच आहे तर याबद्दल उपयुक्त लिहितो. दहा ते बारा तास हे फार अतिरिक्त आहेत. त्यातून शस्त्रक्रिया संपल्यानंतर काही अन्य समस्या निर्माण होतात.

मी एका ज्येष्ठ भूलतज्ञांशी चर्चा केली. त्यांनी सांगितल्यानुसार खाण्यापिण्याचा प्रकार आणि तो भूलीच्या अगोदर किती तास बंद पाहिजे याचे कोष्टक असे आहे :

* भरपेट जेवण : ८ तास
* हलके जेवण : ६ तास
*अपारदर्शक द्रव : ४ तास
*पारदर्शक द्रव (शहाळे फक्त पाणी) : २ तास

कुमार१'s picture

24 May 2022 - 1:35 pm | कुमार१

हे कोष्टक फक्त नियोजित शस्त्रक्रियेसाठी लागू आहे हेवेसांनल.

तर्कवादी's picture

24 May 2022 - 2:47 pm | तर्कवादी

पण प्रत्यक्षात या कोष्टकाप्रमाणे रग्णालये काम करत नाहीत.
माझी मनगटाची शस्त्रक्रिया सकाळी होणार होती तर रात्रीपासूनच पाणी पिण्यास मनाई केली होती.

कुमार१'s picture

24 May 2022 - 3:19 pm | कुमार१

बरोबर आहे तुमचं. बऱ्याचदा अतिरिक्त काळजीपोटी तो कालावधी वाढवून ठेवला जातो. अगदी आंतरराष्ट्रीय संदर्भ पाहिले तरी ६ तासांच्यावर शिफारस नाही.
किंबहुना दीर्घकाळ बिनपाण्याचा उपास घडवल्याने डीहायड्रेशन आणि ग्लुकोजची पातळी कमी होणे अशा समस्या देखील काही वेळेस उद्भवतात.

फक्त एक आहे. वृद्ध रुग्ण, वेगवेगळ्या प्रकारच्या सहव्याधी असल्या तर मग डॉक्टरांच्या तारतम्यानुसार तो कालावधी योग्य तेवढा वाढवता येतो.

तरुणांच्या बाबतीत तो कोष्टकाप्रमाणे असायला काहीच हरकत नाही.

तुषार काळभोर's picture

24 May 2022 - 5:56 pm | तुषार काळभोर

माझा अंदाज असा होता. मला वाटायचं की ग्लुकोज ची पातळी कमी झाल्याने भुलीचा परिणाम लवकर/योग्य प्रकारे होत असावा.
आज बरेच शंकानिरसन झाले :)

जेम्स वांड's picture

26 May 2022 - 9:34 am | जेम्स वांड

तुका पैलवान आमचे फक्त पैलवान नाही तर आयर्न मॅन उर्फ लोहपुरुष असल्याचे नवीनच कळले

माहितीपुर्ण लेख. बारावी नंतर डॉक्टरकी (आमच्या आजीचा शब्द) ला जायला हवे होते :-)
धन्यवाद कुमार१ !!

कुमार१'s picture

25 May 2022 - 8:41 am | कुमार१

**बारावी नंतर डॉक्टरकीला जायला
>>>
त्याचं काय आहे ना...
दुरून डोंगर साजरे किंवा
शेजाऱ्याची हिरवळ सुंदर !
असं असतंय ते. :))

सुक्या's picture

25 May 2022 - 11:59 pm | सुक्या

शेजाऱ्याची हिरवळ सुंदर !
रसिक दिसताय डॉक्टर साहेब :-) (कृपया हळू घ्या)

बाकी तुमचे लेख माहीतीपुर्ण असतात. क्लिष्ट विषय सहज सोपा करुन सांगण्याची तुमची हातोटी विलक्षण आहे.

विजुभाऊ's picture

25 May 2022 - 12:45 pm | विजुभाऊ

मला पोटाच्या ऑपरेशनसाठी पाठीच्या मणक्यात इंजेक्षन दिले होते.
हे इंजेक्षन कसे काम करते.
दुसरे म्हणजे
इंजेक्षन वाटे औषधे देता येतात हे सर्वप्रथम कोणी शोधून काढले

कुमार१'s picture

25 May 2022 - 12:55 pm | कुमार१

स्नायूतील इंजेक्शनचा शोध अतिप्राचीन असावा (500 AD.) असे विकिपेडिया म्हणते.

तुम्हाला दिलेली भूल स्पायनल प्रकारची असणार. त्याबद्दल जरा वेळाने लिहितो.

सन 1650 ;: पास्कल यांनी हायड्रोलिकस चे प्रयोग केले त्यातून सिरींज कल्पनेचा उगम झाला.

1660 :Christopher Wren यांनी कुत्र्यांमध्ये शिरेतून इंजेक्शनचा प्रयोग केले.

Drs Major and Esholttz : यांनी वरील पद्धत वापरून माणसांमध्ये प्रयोग केले परंतु रुग्णांचा मृत्यू झाला. तेव्हा निर्जंतुकीकरण वगैरे गोष्टी आलेला नव्हत्या.

यानंतर दोनशे वर्ष असे प्रयोग बंद ठेवले होते !

कुमार१'s picture

25 May 2022 - 2:08 pm | कुमार१

Spinal anaesthesia

जेव्हा शरीराच्या बेंबीपासून ते तळपायापर्यंतच्या भागातील शस्त्रक्रिया करायची असते तेव्हा या प्रकारच्या भूलीचा वापर केला जाऊ शकतो.

संपूर्ण शरीराला जेव्हा भूल दिली जाते तेव्हा रुग्ण बेशुद्धावस्थेत जातो. सर्वांगीण भूल देण्याचे काही अंगभूत तोटे असतात. म्हणून शरीराच्या खालच्या भागापुरतीच बधिरीकरणची गरज असल्यास या प्रकाराचा उपयोग होतो.

आपल्या पाठीच्या कण्यात जो मज्जारज्जू असतो त्याच्या भोवताली दोन थरांमध्ये आवरणे असतात. दोन थरांमध्ये CSF हा द्रव असतो. पाठीच्या कमरेजवळच्या भागातून या द्रवामध्ये विशिष्ट सुई घातली जाते आणि मग तिच्याद्वारा बधिर करणारे औषध सोडले जाते.

या प्रकारचे बधिरीकरण सर्वप्रथम 1898 मध्ये जर्मनीमध्ये केले गेले.

शुभावि's picture

28 May 2022 - 6:14 pm | शुभावि

पाठीतून भूल दिली असेल तर भुलीचे इंजेक्शन दिलेली जागा नंतर दुखते का?

sunil kachure's picture

28 May 2022 - 6:34 pm | sunil kachure

माझे तर इंजेक्शन ची जागा नंतर दुखली नाही.आता पाच वर्ष झाली असतील ऑपरेशन ला अजून तरी दुखले नाही.

कुमार१'s picture

28 May 2022 - 8:04 pm | कुमार१

साधारणतः आशा भुलीच्या जोडीने काही वेदनाशामक औषधेही दिली जातात. त्यांचा प्रभाव शस्त्रक्रियेनंतर सहा तासांपर्यंत टिकतो. त्यामुळे बहुसंख्य रुग्णांमध्ये वेदना जाणवत नाही.
अर्थात शस्त्रक्रियेच्या प्रकारानुसार काहीशी व्यक्तिसापेक्षता राहिल.

मनक्यात इंजेक्शन दिले होते.बेंबी मध्ये harnia चे ऑपरेशन होते.
पण इंजेक्शन दिल्या नंतर मला सर्व समजत होते.dr शी बोलत पण होतो.
त्यांनी एक जाळी टाकण्या ऐवजी दोन टाकल्या हे ऑपरेशन चालू असताना च सांगितले.भुल तज्ञ dr मात्र डोक्या जवळ पूर्ण वेळ उभ्या होत्या.
प्रश्न हा आहे की ठराविक भाग च कसा संवेदना नसणार केला जातो.बाकी सर्व शरीर संवेदनशील असते.
हे कसे घडते.

कुमार१'s picture

25 May 2022 - 2:30 pm | कुमार१

हे कसे घडते ते वरच्या प्रतिसादात मी दिलेच आहे. तुमच्या प्रश्नात एक अन्य उपप्रश्न दडलेला आहे. त्याबद्दल आता लिहितो.

जेव्हा आपल्याला संपूर्ण शरीराला भूल द्यायची असते तेव्हा आपण ते औषध मुख्य रक्तप्रवाहात सोडतो. त्यामुळे ते मेंदूपर्यंत पोचते. परिणामी रुग्ण बेशुद्धावस्थेत जातो आणि शरीर संवेदनेला बधीर होते.

स्पायनल भूलीच्या प्रकारात आपण कमरेच्या इथून CSF द्रवामध्ये बधिर करणारे औषध सोडतो. त्यामुळे शरीराचा फक्त खालचा अर्धा भाग बधिर होतो. मेंदू ठणठणीत जागा असतो !

मात्र या प्रकारच्या भूलीच्या वेळेसही भूलतज्ञाला सर्वांगीण भूलीइतकेच दक्ष रहावे लागते. रुग्णाच्या हृदयकार्य व श्वसनासंबंधी काहीही अडचण निर्माण झाल्यास तातडीने हालचाली कराव्या लागतात.

कुमार१'s picture

25 May 2022 - 4:00 pm | कुमार१

गर्भनिरोधना संबंधी असल्याने इथे लिहितो.

उद्यानशेती संघटनेच्या विद्यमाने नव्या प्रकारचे पर्यावरणपूरक निरोध तयार केलेले आहेत.
हे वापरून झाल्यावर कुंडीतल्या मातीत पुरता येतात. तिथे त्यांचे नैसर्गिक विघटन होते.

तर्कवादी's picture

25 May 2022 - 7:00 pm | तर्कवादी

पर्यावरणपूरक निरोध

खरेतर पर्यावरणपूरक++ म्हणायला हवे...निरोध वापरणे हेच मुळात अतिशय पर्यावरणपूरक आहे . :). (लोकसंख्या नियंत्रणात रहात असल्याने )

पुर्वी कुत्रा चावल्यावर पोटावरच १४ इंजेक्शन्स घ्यावे लागायचे असे ऐकून आहे.

बॉसकडे कोणी गेला की एक महर्षी टिप्पणी करायचा: आता याला १४ इन्जेक्शने घ्यावी लागणार

विविध प्रकारच्या व्हेहिकल्सबद्दल माहिती घ्यायला आवडेल.
छान लेखांबद्दल धन्यवाद.

तर्कवादी's picture

25 May 2022 - 11:17 pm | तर्कवादी

बॉसकडे कोणी गेला की एक महर्षी टिप्पणी करायचा: आता याला १४ इन्जेक्शने घ्यावी लागणार

हा हा... म्हणजे १४ पेग :)

कुमार१'s picture

26 May 2022 - 5:34 am | कुमार१

विविध प्रकारच्या व्हेहिकल्सबद्दल माहिती

>>म्हणजे...
Drug carrier का ?
ही माहिती द्यायला माझ्यापेक्षा तुमच्यासारखे औषधशास्त्रज्ञ जास्त योग्य ठरतील. :)

चौकस२१२'s picture

26 May 2022 - 8:01 am | चौकस२१२

कुमारजी .. रोचक माहिती दिलीत .. आपल्या सारख्यांनी मिपा च्या बाहेर जाऊन स्वतःचा ब्लॉग किंवा इतर प्रसिद्धी माध्यमातून विस्तृत जाणते पर्यंत पोचवण्यस्तही प्रयत्न करावेत अशी विनन्ती

एक प्रश्न
४. त्वचेमध्ये दिलेले इंजेक्शन (ID) :
साधारणपणे ते हाताच्या कोपर ते मनगट या पट्ट्यातील पुढच्या बाजूस दिले जाते. अशा प्रकारे दिलेले औषध रक्तप्रवाहात जवळजवळ शोषले जात नाही. याची ठळक उदाहरणे :
a. काही रोगांसाठी लसीकरण

मग लस जर रक्तप्रवहात जात नाही तर दंडातून ती दीर्घकाळासाठी म्हणून असते तर ती कोठे जाते आणि करते यावर वेगळा लेख लिहाल का?

एक अनुभव

सुईविरहित इंजेक्शन ही संकल्पना गेल्या दशकात मांडली गेली. त्यावर अव्याहत संशोधन चालू आहे. या तंत्रज्ञानात विशिष्ट औषध खालील प्रकारे त्वचेतून आत वेगाने सोडले जाते :

· लेझर तंत्र

मी एकदा थोडे दिवस एकाउद्योगात संशोधनात्मक कि ज्यांनी हे तंत्र विकसित करण्याचा प्रयत्न केलं होता , कल्पना अशी कि टोचताना जी वेदना होते ती भासू नये म्हणून त्वचेवर स्थानिक जागी लावण्याचे भूल देणार जे औषद मिळते हळू वेगाने भूल देते.. म्हणून एका लेसर किरणांद्वारे ३ मी मी चा गोल भाग थोडा जाळायचा ( अबलेट ) आणि मग लावयायाचे जेणे करून ते लवकर शोषले जाईल आणि त्वचा बधिर होईल आणि मग इंजेकशन द्यायचे .. पुढे पैसे सॅमसंपले किंवा इतर काही कारणाने तो उद्योग बंद पडला

कुमार१'s picture

26 May 2022 - 8:44 am | कुमार१

आस्थेने प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी आहे ! तुम्ही उपस्थित केलेले दोन मुद्दे चांगले असून त्याची स्वतंत्रपणे दखल घेतो.

१.

आपल्या सारख्यांनी मिपा च्या बाहेर जाऊन स्वतःचा ब्लॉग किंवा इतर प्रसिद्धी माध्यमातून विस्तृत
>>>

जालावर लिहिण्यापूर्वी (आणि नंतरही काही काळ) मी आरोग्यविषयक काही लेख एका दैनिकाकडे पाठवत असे. ते मानधनाशिवायच प्रसिद्ध झाले. त्यावर त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांचे अजब स्पष्टीकरण मिळाले ते असे:

"

आम्ही वृत्तपत्राच्या पुरवणीतील कुठल्याच लेखाला मानधन देत नाही".

पण त्याचदैनिकाचे एक धोरण असे होते :

त्यांचेकडे अनाहूत लेखकांसाठी काही सदरे आहेत. त्यापैकी ‘अनुभव’ प्रकारातले एक सदर मुख्य अंकात होते. यात वाचक-लेखक दैनंदिन सामान्य जीवनातले सपक अनुभव लिहायचे – जेमतेम ३०० शब्दांत. त्याला ते किरकोळ मानधन देत असत.
या दैनिकाच्या पुरवणीत निरनिराळ्या वारी विज्ञान, तंत्रज्ञान, समाजशास्त्र इत्यादी विषयांवर तज्ञांचे लेख येत असतात. हे अभ्यासपूर्ण लेख आकाराने पुरेसे मोठे असून ते संबंधित तज्ञांनी लिहिलेले असतात. पण या लेखांना मात्र अजिबात मानधन नसते. या सर्व तज्ञांनी लेखन ही समाजसेवा समजावी अशी या दैनिकाची अपेक्षा आहे !
..............
असले विचित्र धोरण पाहिल्यानंतर मी वृत्तपत्रांना टाटा केला.
मिपा व माबोवर वाचकांशी होणारी चर्चा मला पुरेसे समाधान देते. काही सुजाण वाचक इथल्या लेखांचे दुवे त्यांच्या मित्रपरिवारात पाठवत असतात. तेवढा प्रसार होतो ते ठीक म्हणायचे.

कुमार१'s picture

26 May 2022 - 9:18 am | कुमार१

*मग लस जर रक्तप्रवहात जात नाही तर ती कोठे जाते?
>>
हा अपेक्षित आणि स्वाभाविक प्रश्न आहे. यातील विज्ञान हे गुंतागुंतीचे आहे आणि त्यावर सवडीने स्वतंत्र विचार करता येईल. तूर्त थोडक्यात सांगतो.

त्वचेमध्ये काही विशिष्ट प्रकारच्या इम्यून पेशी असतात. त्यांचे स्थानिक लिंफ ग्रंथींशी दळणवळण असते. या समन्वयातून लसीकरणानंतर शरीरात अँटीबॉडीज होतात. तसेच अन्य प्रकारची रोगप्रतिकारशक्तीही निर्माण होते.

चौकस२१२'s picture

26 May 2022 - 8:07 am | चौकस२१२

संपूर्ण भूल दिली असेल आणि ती उतरल्यावर रुग्णालयात आईसक्रीम असा माझा अनुभव आहे ते का?
( हा अनुभव एक देशातील आहे - सर्व देशात असेलंच अशी प्रथा असे नाही )

कुमार१'s picture

26 May 2022 - 9:35 am | कुमार१

*संपूर्ण भूल दिली असेल आणि ती उतरल्यावर रुग्णालयात आईसक्रीम >>>

आईस्क्रीम असा नियम नक्कीच नाही !
साधारण सूत्र असे आहे. रुग्णांना सुरुवातीस विविध प्रकारचे द्रवपदार्थ द्यावेत. त्यानंतर गिळायला सोपे जातील असे मऊ पदार्थ द्यावेत. म्हणून परदेशात आईस्क्रीम /जेली/ पुडींग अशी परंपरा असावी.

भारतात आपण पेज किंवा खीर देऊ शकतो.

जेम्स वांड's picture

26 May 2022 - 9:40 am | जेम्स वांड

मेनंजायटीसची तपासणी करताना किंवा इतर काही न्यूरॉलॉजीकल प्रोसिजर्समध्ये मणक्यातून सेरेब्रो स्पायनल फ्लूईड काढतात त्या सिरिंजला इतकी भली मोठी सुई का असते हो ? ते जंगम प्रकरण पाहूनच धास्ती वाटते मला तरी, खूप दुखत असेल न ते ?

बाकी आम्ही पडतो चिकन हार्ट, त्यातही आमच्या पोरीला अगदी लसीचे इंजेक्शन द्यायचे असले तरी माझा जीव कालवतो, फुलराणी आहे न ती बाबाची, गंमत म्हणजे आमची झाशीवाली तयार असते, परवाच सेकंड बूस्टर दिलं तेव्हा स्वतःच पेडला म्हणाली "डॉक्टर अंकल आय एम रेडी फॉर इंजेक्शन" मायला मलाच भडभडून आलं एकदम, त्यामुळे तिला सुया टोचताना सोबत उभं राहायचं डिपार्टमेंट तिच्या आईकडे दिलं आहे पर्मनंट आम्ही

**त्या सिरिंजला इतकी भली मोठी सुई का असते हो ? खूप दुखत असेल न ते ? >>>

चांगला प्रश्न.( या लेखातील भूल या विषयावर अनेक चांगले प्रश्न येत आहेत).

मुळात ही मोठ्या आकाराची सुई एकदम मणक्यात घालत नाहीत. त्यापूर्वी संबंधित भागाच्या त्वचेवर स्थानिक भूलीचे इंजेक्शन दिले जाते.

या सुईचा व्यास रक्त काढण्याच्या सुईपेक्षा मोठा का, हा प्रश्न स्वाभाविक आहे.
रक्ताशी तुलना करता CSF हे घट्ट व चिकट (viscous) आहे. पारंपरिक मोठ्या व्यासाच्या सुयांमधून ते काढल्यानंतर काही रूग्णांना डोकेदुखी होते.

त्यादृष्टीने अलीकडे कमी व्यासाच्या सुया वापरण्याबाबत संशोधन झालेले आहे. अर्थात खूप कमी व्यासाची वापरून चालणार नाही कारण मग तो द्रव बाहेर यायला त्रास होईल.

त्यामुळे या दोन्हींचा सुवर्णमध्य साधेल अशा व्यासाची सुई वापरतात.
......

* डिपार्टमेंट तिच्या आईकडे >>> ते बर असतंय.:))

Bhakti's picture

26 May 2022 - 10:29 am | Bhakti

:)होय होय

त्यामुळे तिला सुया टोचताना सोबत उभं राहायचं डिपार्टमेंट तिच्या आईकडे दिलं आहे पर्मनंट आम्ही

हे डिपार्टमेंट आईकडेच असते.मुलीचा बाबा धीट नसतोच मुळी,हळवाच असतो!

जेम्स वांड's picture

27 May 2022 - 7:56 am | जेम्स वांड

&#128557

मध्यरात्री बाप घरी आल्यावर झोपेतून उठून बाबा तुझे पाय चेपून देते म्हणणाऱ्या पोरींचे बाप तर अजूनच हळवे असतात, पोरगं आईचं असतं कायम अन पोरगी बापाची

कुमार१'s picture

27 May 2022 - 8:25 am | कुमार१

पण...
एकदा का मुले प्रौढ झाली की मग मात्र वेगळा अनुभव येतो !
मुलगी आईची चांगली मैत्रीण होते. परंतु मुलगा वडिलांपासून काहीसा दूर जातो..... :)

जेम्स वांड's picture

28 May 2022 - 9:58 pm | जेम्स वांड

तोवर बबडी अंगभर नाचण्याचे सुख अनुभवायचे.

नंतर पोरं मोठी झाली का हाती लागत नाहीत बारकी आहेत तोवर हाती लागतील तेव्हा धरून त्या जॉन्सन/ हिमालयाच्या बेबी पावडरचा छातीभरून सुगंध घेत मुके घेऊन टाकावेत पोरांचे, नंतर एकदा पाय फुटले का पोरे हाती लागत नाहीत.

sunil kachure's picture

26 May 2022 - 10:30 am | sunil kachure

मी जेव्हा २५ वर्षाचा असेन तेव्हा .थोडे बर वाटत नव्हते म्हणून डॉक्टर कडे गेलो.
ताप वैगेरे होता..
डॉक्टर नी खुभ्यात इंजेक्शन दिले पण इंजेक्शन
दिल्यावर काहीच वेळात कमरे खालचा भाग सुन्न झाला..
पाय ची सुद्धा हालचाल करणे अशक्य झाले.
मी घाबरलो.पण dr बोलले घाबरु नको .थोडा वेळ तिथेच झोपवून ठेवले.
काही वेळात सर्व ठीक झाले.
Dr हे कशा मुळे घडले असेल.औषध तर चुकीचे नसणार.
इंजेक्शन चुकीच्या जागी दिले गेल्या मुळे घडले असेल का?

कुमार१'s picture

26 May 2022 - 11:22 am | कुमार१

खुब्यावरील इंजेक्शनच्या बाबतीत sciatic nerve ला इजा संभवते.
म्हणून ते काळजीपूर्वक द्यायचे असते.
अर्थात इथून निव्वळ ऐकीव माहितीवर कुठलेही मत देणे बरोबर नाही.

कर्नलतपस्वी's picture

29 May 2022 - 6:40 am | कर्नलतपस्वी

मस्त अनुभव होता.१,२आणी ३ बत्ती गुल.

कुमार१'s picture

29 May 2022 - 8:31 am | कुमार१

सहमत.
अजून याचा स्वानुभव नाही. परंतु ज्यांनी घेतला आहे त्यांच्याकडून असेच मजेदार कथन ऐकले आहे.

लहानपणी एकदा वर्तनमापत्रात इंजेक्शन्सविषयी एक लेख वाचला होता, त्यानंतर इंजेक्शन्सविषयी मनात भीती (Phobia) निर्माण झाला, आणि अजूनही बऱ्याच प्रमाणात आहे. एकदा तर प्लेटलेट्स दान करण्यासाठी गेलो तर Freak Out होत होतं. नंतर २००७ ला काही कारणांमुळे जवळपास आठवडाभर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो, त्यावेळी मात्र सुईची सगळी हौस फिटली. सलाईन २४/७ आणि इंजेक्शन्स, काही इंजेक्शन्स नाभीच्या त्वचेखाली आणि काही सलाईनच्या कनेक्शनमधून शिरेत दिले, जसजसा इंजेक्शन्समधील द्राव शिरेतून जायचा तसतसा दाह व्हायचा.

हा लेख तुम्हीच लिहीला आहे का?
खुप साधर्म आहे.

-----------
विश्लेषण : औषधांना कसं समजतं शरीरात कोठे जायचं? जाणून घ्या
https://www.loksatta.com/explained/explained-how-medicine-know-where-you...

कुमार१'s picture

22 Jun 2022 - 11:57 am | कुमार१

दुवा दिल्याबद्दल धन्यवाद !
तो लेख मी लिहिलेला नाही.

लोकसत्तेतील लेखावर कालची तारीख आहे. (21 जून).
तो गोळाबेरीज करून लिहिल्या सारखा वाटतो खरा.
माझा मिपावरील लेख १६ मे २०२२ चा आहे

अधिक काय बोलणे ?
:)
असे अनुभव अधून-मधून येत आहेत....

कुमार१'s picture

22 Jun 2022 - 12:00 pm | कुमार१

भाग १ : १६ मे
भाग २ : २३ मे

सुबोध खरे's picture

24 Jun 2022 - 9:53 am | सुबोध खरे

लेख भंपक आहे.

औषधे शरीरभर पसरतात आणि त्याचा परिणाम शरीरभर दाखवतात.

आपले केवळ लक्ष दुखऱ्या भागावर केंद्रीत झालेले असल्यामुळे आपल्याला असे वाटते कि औषध बरोबर तेथे पोचले आहे.

युरोकायनेज किंवा स्ट्रेप्टो कायनेज हे औषध शरीरात कुठेही रक्ताची गुठळी झाली असेल तर ती विरघळवण्यासाठी वापरली जातात. यात कोरोनरी आर्टेरि मध्ये गुठळी होऊन हृदयविकार आला असेल तर हे औषध तातडीचे म्हणून वापरले जाते किंवा मेंदूच्या रक्तवाहिनीत गुठळी होऊन पक्षाघात झाला असेल तर हे औषध ६ तासाच्या आत देऊन हि गुठळी विरघळवता येते. पण याचा परिणाम म्हणून काही रुग्णांना अगोदरच्या काही दिवसात शरीरात जेथे इजा होऊन रक्तस्त्राव झालेला असेल आणि रक्त थांबलेले असेल ( रक्ताची गुठळी होऊन) तर ती गुठळी सुद्धा विरघळून शरीरात कुठेही रक्तस्त्राव होऊ शकतो.

हीच प्रक्रिया घोणस गटाचा साप चावल्यामुळे होते. या गटाचे सर्पविष आपल्या रक्ताच्या गुठळ्या विरघळवायचे काम करत असल्यामुळे रुग्णाला शरीरभर रक्तस्त्राव होतो आणि भयानक असे रक्ताचे फोड येतात.

viper bite गुगल केल्यास हि भयानक चित्रे दिसू शकतील.

पॅरासिटॅमॉल, क्रोसीन हे औषध जसे अंगदुखी साठी उपयुक्त आहे तसेच ते तापासाठी उपयुक्त आहे. अंगदुखी आहे कि ताप आहे हे औषधाला कसे समजेल. (तापाचे) तापमान नियंत्रक केंद्र मेंदूच्या तळाशी असते तर अंगदुखी शरीरभर कुठेही असते.

लोकसत्तेच्या एकंदर दर्जा आजकाल शंकास्पद झालेला आहे.

सुबोध खरे's picture

24 Jun 2022 - 9:53 am | सुबोध खरे

मी लोक त्तेच्या लेखाबद्द्ल लिहिले आहे.

कुमार१'s picture

24 Jun 2022 - 10:30 am | कुमार१

समजले :)
सहमत आहे!

नगरी's picture

24 Jun 2022 - 7:04 pm | नगरी

मला वाटले कुमार सरांबद्दलच लिहिले

नगरी's picture

24 Jun 2022 - 7:41 pm | नगरी

मी लहान होतो तेव्हा भारत रशिया मैत्री वगैरे प्रकरणे चालू होती. तेव्हा राशियातून रशियन शिकण्याची पुस्तकेही येत असत. पण आज एक प्रश्न आज पडतो , शास्त्रीन्ना कसे मारले असेल? कदाचित मी काही केजीबी च्या कथा वाचल्या होत्या त्यात instant kill down without any evidence असे वाचले होते,खरेच असे होऊ शकते?

सुबोध खरे's picture

24 Jun 2022 - 8:02 pm | सुबोध खरे

त्यांच्या पार्थिवाचे ना शव विच्छेदन झाले ना कसून चौकशी.

प्रकरण दाबून टाकले

मग मृत्यूचे कारण सारखी य: कश्चित गोष्ट कशी बाहेर येणार?

कुमार१'s picture

24 Jun 2022 - 8:16 pm | कुमार१

हा विषय रंजक आहे खरा, परंतु त्यासंदर्भात विषबाधातज्ञ नीट सांगू शकतील.

पूर्वीच्या काळी जेव्हा शरीरात गेलेली विषे ओळखण्याचे तंत्रज्ञान फारसे उपलब्ध नव्हते त्याकाळी आर्सेनिक, thallium किंवा तत्सम काही रसायने खुनासाठी वापरली जात. संबंधिताला दिसणारी लक्षणे काही आजारांशी मिळतीजुळती असायची. त्यामुळे विष देणाऱ्याचे फावत असे.

सध्याच्या काळात विषबाधा ओळखण्याचे तंत्रज्ञान खूप प्रगत झाले आहे. त्यामुळे विषबाधा केली असता पुरावा मिळणार नाही हे अवघड वाटते.

अर्थात मी या शाखेचा तज्ञ नसल्यामुळे याहून अधिक लिहिणे बरोबर नाही.

न्याय वैद्यकशास्त्रातील एक प्रसिद्ध अवतरण असे आहे:

Dead men tell tales !

कुमार१'s picture

22 Jul 2022 - 9:07 pm | कुमार१

धन्यवाद
सविस्तर उपयुक्त.

कुमार१'s picture

27 Jul 2022 - 10:15 am | कुमार१

इंजेक्शनचा आत्महत्येसाठी असा झालेला वापर पाहून दुःख झाले

आदरांजली.

कुमार१'s picture

18 Oct 2022 - 5:53 am | कुमार१

हाडांच्या जंतुसंसर्गासाठी स्थानिक औषध रोपण करण्याचे नवे तंत्रज्ञान विकसित होत आहे. यामध्ये एखादे प्रतिजैविक बोन सिमेंटमध्ये मिसळून या मिश्रणाचा implant हाडांमध्ये केला जातो त्यातून उपयुक्तता खूप वाढते

कुमार१'s picture

4 Apr 2023 - 11:24 am | कुमार१

तामिळनाडूतील ग्लोबल फार्मा या कंपनीने बनवलेले डोळ्यांचे औषधी थेंब अमेरिकेतील लोकांसाठी बऱ्यापैकी वापरले गेले. या औषधी थेंबांमधून सुमारे 68 जणांना Pseudomonas या जंतूचा संसर्ग झाला आणि तो गंभीर स्वरूपाचा होता.

परिणामी तीन जणांचा मृत्यू आणि आठ जणांना आपले डोळे गमवावे लागले आहेत.

ग्लोबल फार्मा उद्योगाची अमेरिकी औषध प्रशासनाकडून तपासणी झाली असता तिथल्या औषध निर्मितीमध्ये अनेक त्रुटी आढळलेल्या आहेत. निर्जनतुकीकरणाविषयी बेफिकिरी ही त्यातील महत्त्वाची बाब.

त्या कंपनीच्या डोळ्यांच्या औषधी थेंबांमधून संबंधित लोकांना Pseudomonas या जंतुसंसर्गाचा त्रास झाला. हा जिवाणू चांगल्यापैकी घातक आहे. जर त्याने व्याधीग्रस्त लोकांच्या शरीरात शिरकाव केला तर अनेक अवयवांना गंभीर इजा होतात. डोळ्यांना झालेली इजा खूपदा शोकांतिक ठरते.

या जंतू विरोधात औषधे असूनही अलीकडे तो पारंपरिक औषधांना दाद देईनासा झालेला आहे.

कुमार१'s picture

4 Apr 2023 - 11:55 am | कुमार१

आता कंपनीने बाजारातील सर्व बाटल्या परत मागवल्यात.
https://www.fda.gov/safety/recalls-market-withdrawals-safety-alerts/glob...
….

या दुर्घटनेनंतर भारतात केंद्रीय आणि राज्य पथकांनी अप्रमाणित औषधांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात धडक कारवाई चालू केली आहे.

76 औषध कंपन्यांची तपासणी होऊन त्यापैकी 18 जणांचा परवाना रद्द झाला आहे.

सिरुसेरि's picture

7 May 2023 - 9:54 pm | सिरुसेरि

उपयुक्त माहिती .

--- D. सांध्यामध्ये दिलेले इंजेक्शन
काही प्रकारच्या संधिदाहांत स्टिरॉइड्सचे इंजेक्शन हे विशिष्ट सांध्यांमध्ये देता येते. --

माझ्या माहितीप्रमाणे पेन मॅनेजमेंट तज्ञ जास्त करुन त्यांच्या संधिदाहांत संबंधी pain management clinical procedures मध्ये या स्टिरॉइड्सचे इंजेक्शन चा वापर करतात . बरेचदा शरीरातील अनेक विशिष्ट सांध्यांमध्ये खुप वापर झाला / झीज झाली तर तेथील बाह्य भागावर सुज येते . हि सुज सांध्यांच्या आतील भागांमधे दुषित पाणी / synovial fluid / joint inflammation / joint effusion या स्वरूपात जमा होते . अल्ट्रा सोनोग्राफी , एम आर आय या माध्यमांमधुन याचा तपास करता येतो . अल्ट्रा सोनोग्राफी , एम आर आय यांच्या रीपोर्ट मधे याचा उल्लेख effusion / joint effusion किंवा fluid असा होतो. हि सुज शोधणे व ती extract करणे / शरीराबाहेर काढण्यामधे orthopedic तज्ञांपेक्षा pain management तज्ञांचा जास्त उपयोग होतो . हि सुज extract करणे / शरीराबाहेर काढ्ण्याच्या कृतीला joint aspirate procedure असे म्हणतात . त्यानंतर joint inflammation कमी व्हावे म्हणुन मेडिकल मान्यताप्राप्त स्टिरॉइड्सचे इंजेक्शन चा वापर केला जातो . गुडघेदुखी व अन्य सांधेदुखी कमी होण्यासाठी या pain management clinical procedures चा उपयोग होतो . अनेक मोठ्या hospitals मधे pain management तज्ञांचा वेगळा विभाग असतो तसेच त्यांची क्लिनिक्सही असतात . या विभागातर्फे गुडघेदुखी व अन्य सांधेदुखी या संबधी operations postpone करणे वा टाळण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात जसे की - स्टेम सेल थेरपी , प्लासमा सेल थेरपी , पी आर पी इंजेक्शन्स .