रावळगुंडवाडी स्पेशल : हुलग्याची ओट्टिगे आमटी

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture
हणमंतअण्णा शंकर... in पाककृती
29 Apr 2022 - 5:03 pm

ह्या आमटीची दीक्षा मला आमच्या मल्लाप्पा नावाच्या शेजार्‍याने दिली.
मल्लाप्पाने दोन लग्नं केली. पहिली बायको एका वर्षातच गेली. मल्लाप्पाची पहिली बायको त्याची प्रेयसी. तिला साखरपुड्याच्या दिवशी मल्लाप्पाने कुडल संगमाला पळवून नेली आणि लग्न केले. मूळची रेसिपी तिची असं मल्लाप्पा म्हणतो. नंतर ती वारल्यावर मल्लप्पाच्या आईनं त्याचं लग्न परस्पर ठरवून टाकलं. लग्नाच्या दिवशी हा परत कुडल संगमाला एकटाच पळून गेला. दोन दिवस तसाच ऐक्य लिंगाजवळ बसून राहिला. शेवटी कुणी भटक्या साधूने त्याला समजावून परत प्रपंचात ढकलले. काही वर्षांनी रावळगुंडवाडीला परत आल्यावर ते साधू म्हणजे गुरुबसव महास्वामीजी होते असं त्याला एका दुकानातल्या फोटोवरून कळालं. मल्लाप्पा यथावकाश संसारात रमला. पहिल्या बायकोची रेसिपी दुसर्‍या बायकोने स्वीकारली आणि तिला तिची ट्विस्ट दिली. तीही कालांतराने आजारपणात गेली. दोन मुलं बागलकोटला विटांचा व्यापार करतात. त्यामुळे एकट्या मल्लाप्पाला त्याची एक बहिण आणि तिचं कुटुंब सांभाळतं. मल्लाप्पा कधीतरी भावुक झाला की स्वतः ओट्टिगे आमटी करतो. अलिकडे तू खूपदा भावुक होतो त्यामुळे मला ती आमटी खूपदा खायला मिळते.

मूळ आमटी काळ्या हुलग्याची आहे.

काळ्या हुलग्याला देशावर, पश्चिम महाराष्ट्रात काय म्हणतात ते ठाउक नाही. परंतु हुलगा म्हणजे बायडिफॉल्ट कुळीथ असं समजलं जातं. आमच्याकडे हुलगा म्हणजे काळा हुलगा. कुळथाला मी तपकिरी हुलगा म्हणतो. दोन्हीतला फरक नीट समजावा म्हणून हा फोटो पाहा. काळा हुलगा आणि तपकिरी हुलगा यातला फरक चाणाक्षांच्या लगेच लक्षात येईल. इतर लोक मला वेड्यात काढतील म्हणून मी आधीच माफी मागून ठेवतो. ( हुलगा म्हणजे कुळीथच फक्त नाही हे समजून काही जणांच्या भावना प्रचंड दुखावू शकतात, कारण आजकाल डायवर्सिटी असणे, मतवैभिन्य असणे म्हणजे काहीतरी भयंकरच गोष्ट झालेली आहे, असो ). दोघांच्या चवीत मात्र प्रचंड फरक आहे.

text

हुलगा या नावाच्या गोंधळाचा फायदा घेऊन मी सध्या कर्मभूमीत काळा हुलगा उपलब्ध नसल्याने कुळीथ वापरून ही आमटी केली. हा माझा ट्विस्ट. मल्लाप्पाभार्या मला माफ करतील अशी आशा आहे. परंतु, काळ्या हुलग्याचीच आमटी मला खूप चवदार लागते.

काळा हुलगा शिजायला खूप वेळ लागतो. त्यामुळे तो आधी एखाददिवस भिजवून ठेवावाच. कुळीथही भिजवूनच घ्यावे. प्रमाण एक-दोन माणसांसाठी सांगतो. आमट्या शिळ्या होतात तशा चविष्ट लागतात. म्हणून दोनजण हे प्रमाण एकटाच दोनवेळेस किंवा दोन एकावेळेस असं समजून चालतो. दोन सर्विंग्ज म्हणू हवं तर.

हे कालवण तसे अजिबात अवघड नाही.. कुणीतरी अगदीच इम्प्रोवाईज करत करत ओट्टिगे आमटीला हे स्वरूप आणलं आहे. मला स्वत:ला वाटतं की ही आमटी मल्लाप्पाच्या भार्यांनीच संस्कारित केली आणि मल्लाप्पाने तिचे नामकरण केले. कारण ओट्टिगे आमटी अशी काही स्पेशल आमटी इतर कुठेही केली जात नाही. किंबहुना नावातच इम्प्रोवाईज करण्याला इतका स्कोप आहे की कोणत्याही आमटीला ओट्टिगे आमटी म्हणता येईल.

हुलगा भिजवून घ्यावा इतकीच आवर्जून करण्याची गोष्ट आहे. अजूनएक म्हणजे, ब्याडग्या मिरच्या घातलेला घरचा कांदा-लसूण मसाला हवा. (हा अगदीच नसेल तर विकतचा कांदा लसूण मसालाही चालेल.) एक कोवळा लांबुकळा दोडका शिरा सोलून कापून ठेवावा. लहान तुकडे करावेत. चकत्या नकोत.. कोवळा दोडका म्हणजे ज्यामध्ये तिळाएवढ्या बिया असतात तो दोडका. दोडका नसेल तर लहान झुकिनीसुद्धा चालेल. माझ्या कर्मभूमीत झुकिन्या मिळत असल्याने मि झुकिनीच वापरली..
शेंगदाण्याचे मूठ्भर कूट आणि भाजलेले फोलफटरहित शेंगदाणे आवडतील तसे. दोन चमचे बेसनपीठ. आणि पालकाची पानं.

एक वाटी भिजवलेला काळा हुलगा जवळ जवळ १२-१५ शिट्ट्या करून कुकर मध्ये शिजवावा. तपकिरी हुलगा ४ ते ५ शिट्टया. एक वाटी हुलग्याला तिप्पट चौपट पाणी ठेवावे. पाचपट पाणी ठेवले तरी चालेल. शिजल्यावर हुलगा चाळून घ्यावा. पाणी वेगळं करावं. पाण्याचा रंग काळा किंवा तपकिरी काळ्सर असेल. घाबरून जाऊ नये. आणि ते फेकून देऊ नये. आमटी करायला ते लागणार आहे.

आमटीला तेलाची फारशी गरज नाही. न के बराबर गोडेतेल घातले तरी चालेल.

थोड्याश्या गोडेतेलात नेहमीची यशस्वी फोडणी द्यावी (मोहरी नसली तरी चालेल.. जिरे हवेत).. कांदा लसूण आलं परतून घ्यावेत. (लसूण चेचून घ्यावेत. लसणीच्या पाकळ्या थोड्याश्याच जास्त घ्याव्या. कांदा बारीक कापा किंवा उभा कापा, काही अडचण नाही.). फोडणी करपू द्यायची नाही. हिंगाची एखादी चिमूट फुरफुरावी.

देशी लहान ताजे टोमॅटो असतील तर आवर्जून घालावेत. नसतील तर आमसूल. आमसूलही नसेल तर चिंचेचे पाणीही चालेल. जशी आंबट चव हवी तसे हे कॉम्बीनेशन करावे.

एक मोठा चमचा मसाला घालून तेल सुटेपर्यंत न करपू देता परतून घ्यायचं. कांदा लसूण मसाला नसेल तर ( गोडा मसाला + लाल तिखट ) सुद्धा चालेल.. आमटी पुरेशी झणझणीत व्ह्यायला हवी..धन्याची सुगंधी पूड एखाद चमचा टाकावी.

हुलगे घालून एकदा वाफ काढावी..

ही हुलग्याची भाजी झाली.. आता हळूहळू हुलग्याचे शिजवून वेगळे केलेले पाणी ओतत जावे..

कूट आणि दोडका किंवा झुकिनी घालून किंचित शिजू द्यावे. दोडका शिजायला जरासा वेळ लागतो.. त्यामुळे अंदाजाने दोन्ही अगदी चिपचिपित आणि बिलबिलीत होऊ द्यायचा नाही. दाणे सुद्धा टाकावेत.. एखादी उकळी आली की बेसन पीठ टाकावं. दोडका शिजत आला की पालकाची पानं टाकावीत. पानं हिरवी राखण्याचा प्रयत्न करायचा आहे. अगदी काळसर शिजवू नयेत. जर काळे हुलगे फुटत असतील तर बेसन पीठ अर्धेच टाकावे. तपकिरी हुलग्यासाठी मात्र दोन चमचे बेसन पीठ.. प्रकरण पळीवाढ ठेवायचे आहे. अगदी घट्ट चिखल करायचा नाही आणी अगदीच पाणचटसुद्धा नाही. म्हणून पाणी अंदाजाने कमी जास्त करायचे. चवीनुसार मीठ. (म्हणजे चव घेत घेत थोडे थोडे करत मीठ वाढवत नेणे)

मल्लापा हे सगळे तन्मयतेने करतो म्हणून आमटीतल्या विविध गोष्टींचा बॅलन्स राहतो. दोडके, दुधी, झुकिनी, भोपळा या भाज्या वापरून मी आतापर्यंत ओट्टिगेचे प्रकार बनवले आहेत.. काही गोष्टी गंडल्या तरी 'पौष्टिक आहे' या पुस्तीखाली पोटात ही आमटी ढकलली आहे. कदाचित मल्लाप्पाच्या हाताची चव एखादेवेळेस येईल या आशेवर तरी मी ही करत राहीन. उपजत आळस हे ही कारण आहेच. त्यामुळे हा इम्प्रोवायजेशनला खूप स्कोप असलेली आमटी माझ्या घरातही आली असावी.

याला मिक्स आमटी का म्हणतात ते एव्हाना लक्षात आलेच असेल. उर्वरित फोटो लवकरच चढवतो.

प्रतिक्रिया

Bhakti's picture

29 Apr 2022 - 7:03 pm | Bhakti

छान!
काळा हुलगा अजून चाखला नाही.

हणमंतअण्णा, नमस्कारा.
लेखनाला बागलकोटी झणझणीतपणा दिल्याने आवडले. फोटोतले काळे हुलगे मला एका ठिकाणी वेलावर मिळाले आहेत. मी ते काढायला गेलो तर त्यिंना वाटले की शेंगा काढायला आलो. मी बोललो की दोन चार बियाणं म्हणून घेतो. बरं म्हणाले. पण वेल फार मोठा होता.
असो.
विजापुरा आणि बदामीला स्थानिक खानावळीत तिकडचे जेवण जेवलो आहे. फार चटकदार असते. ज्वारीच्या पातळ भाकरी,सहा सुक्या चटण्या, बारीक चवळी उसळ,ताक वगैरे.

तिकडच्या पाककृती लिहित जावा.

प्राची अश्विनी's picture

29 Apr 2022 - 7:38 pm | प्राची अश्विनी

पाकृतली गोष्ट भारी आवडली.

धर्मराजमुटके's picture

29 Apr 2022 - 7:46 pm | धर्मराजमुटके

आमटी खाण्यात स्वारस्य असेलच असे नाही पण तुमची लेखनशैली आणि मल्लपाची गोष्ट आवडली.

वरील दोन्ही प्रतिसादांशी सहमत.
लेखणीत मज्जा आहे तुमच्या

कॉमी's picture

30 Apr 2022 - 1:03 pm | कॉमी

मस्त!

कर्नलतपस्वी's picture

30 Apr 2022 - 9:11 pm | कर्नलतपस्वी

हुलग्याच माडग याचा उल्लेख शिवकालीन साहित्या मधे सापडतो.
हुलगा,कुळीथ,काळे वाल,कडवे वाल,बिरड्या हल्ली कुणालाच येत नाही.
आई गेल्यानंतर कधीतरी माम्या मावश्यांकडे सटी सामाशी खायला मिळतात.

अनिंद्य's picture

2 May 2022 - 1:38 pm | अनिंद्य

मलप्पा आणि त्याच्या द्विभार्यांची कहाणी, हणमंत अण्णा आणि मलप्पाची मैत्री, ओट्टिगे आमटीची रेसीपी लिहिण्याची पद्धत... एकूणच प्रकरण आवडले.

जेम्स वांड's picture

7 May 2022 - 5:38 am | जेम्स वांड

लेखन आवडले, एकंदरीत ही आमटी झणझणीत होणार ह्याची हमी वाटते, काळे हुलगे अन तपकिरी हुलगे वगैरे प्रकरणे एकंदरीत कळली नाहीत पण चाचपडत गूगल करत सामान एकत्र करून हा प्रयोग नक्की करण्यात येईल,

बाकी आमटीच्या फोटोजची वाट पाहतोय खास

sunil kachure's picture

7 May 2022 - 12:55 pm | sunil kachure

काळा हुल्गा म्हणून जो तुम्ही फोटो टाकला आहे तो काळा घेवडा आहे.पश्चिम महाराष्ट्र मध्ये जास्त करून सातारा जिल्ह्यात हा खूप होतो.आणि रोज च्या जेवणात असतो.
त्याच्या डाळी ची आमटी आणि मटण असा coise दिला तर मी काळ्या घेवडयाची आमटी च निवडेन.
इतका सातारा भागात प्रसिद्ध आहे तो.

कर्नलतपस्वी's picture

10 May 2022 - 7:21 pm | कर्नलतपस्वी

पुणे जिल्ह्य़ात सुद्धा भरपूर होतो. गावकरी काळे पोलीस सुद्धा म्हणतात. कारण माहीत नाही.हुल्ग्याला कुळीथ म्हणून म्हणतात.

सविता००१'s picture

11 May 2022 - 3:42 pm | सविता००१

आमच्या शेजारच्या^कडे हे काळे पोलीस कायम असतात. त्यांच्यामुळेच ही उसळ कळली आम्हाला.
आमटीची पद्धत आणि तिची गोष्ट- दोन्ही आवडली आहे. करून पाहीन

मुक्त विहारि's picture

13 May 2022 - 12:06 am | मुक्त विहारि

तुम्ही कर्नाटक साईडचे का?

आमटी बनवायची पद्धत वेगळीच आहे आणि ती आवडली.