पानकम आणि कोसांबरी

यश राज's picture
यश राज in पाककृती
10 Apr 2022 - 5:00 am

नमस्कार मिपाकर्स.

आज रामनवमी व त्याबद्दल आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा.

रामनवमी निमीत्त आज मी दोन पाककृती मिपावर सादर करत आहे.
पानकम व कोसांबरी.

दक्षिण भारतामध्ये( प्रामुख्याने कर्नाटक, आंध्र व तमिळनाडू) मध्ये भगवान राम यांना या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो.

भारतीय(हिंदू) पंचांगा प्रमाणे वर्षाचे ६ ऋतू मध्ये विभाजन होते व त्या त्या ऋतू मध्ये वातावरणातल्या बदलानुसार आहार विहार सुद्धा ठरलेला असतो व त्याप्रमाणे देवांचा नैवेद्य ही बनवला जातो.

होळी गेल्यानंतर वातावरणात उकाडा सुरू होतो व त्याचबरोबर मानवी शरीरामध्ये सुद्धा उष्णता निर्माण व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आपल्याला दाह शमवणारे काहीतरी थंड असे खावेसे वाटते.
नेमके तेच लॉजिक या दोन पदार्थामध्ये वापरले आहे.
पानकम आणि कोसांबरी दोघे पदार्थ शरीरात शीतलता प्रदान करतात आणि त्याचाच नैवेद्य प्रभू राम यांना दाखवला जातो.

चला बघुया आता या दोन्ही पदार्थ कसे बनवतात

१. पानकम

पानकम/पानका किंवा पानगं म्हणजेच संस्कृत मध्ये मधुर पेय.

साहित्य :
गूळ १ वाटी
थंड पाणी २ वाटी.
सुंठ पाव चमचा
काळी मिरी पावडर पाव चमचा.
वेलची पूड अर्धा चमचा
१ लिंबाचा रस
चिमुटभर मीठ.
तुळशीची पाने

कृती

सर्वप्रथम एका भांड्यात थंड पाणी घेवून त्यात गूळ पूर्ण विरघळू द्यायचा. नंतर गुळाचे पाणी दुसऱ्या भांड्यात गाळून घ्यायचे जेणेकरून काही कचरा असेल तर निघून जाईल.
आता गुळाच्या पाण्यात पाव चमचा सुंठ पावडर , अर्धा चमचा वेलची पूड व पाव चमचा काळी मिरी पावडर टाकून व्यवस्थित ढवळून घ्यायचं.
नंतर त्यात लिंबाचा रस आणि चिमुटभर मीठ टाकून परत एकदा ढवळून घ्यायचं.
मस्त गारेगार पानकम तयार आहे. ते एका ग्लास मध्ये काढून त्यावर तुळशीची पाने सोडावी व सर्व्ह करावा.

Panakam

२. कोसांबरी

कोसांबरी किंवा कोसमल्ली म्हणजेच मुगाची भिजलेल्या डाळीची कोशिंबीर.

साहित्य :
२/३ तास भिजवलेली मुगाची डाळ
१ काकडी चिरलेली.
१ कैरी किसलेली
१ वाटी खोवलेला नारळ.
कोथिंबीर १/२ वाटी
१ लिंबाचा रस.
कढीपत्ता
२ मिरची चिरलेली
मोहरी
मीठ चवीप्रमाणे.

कृती
सर्वप्रथम भिजवलेली मुंगाची डाळ एका चाळणीत काढून पूर्ण पाणी निथळू द्यावे.
डाळ आता एका भांड्यात काढून घ्यावी. त्यात बारीक चिरलेली काकडी, किसलेली कैरी व खोवलेला नारळ टाकून व्यवस्थित हलवून घ्यावे. नंतर त्यात लिंबाचा रस,चवीप्रमाणे मीठ, चिरलेली मिरची व कोथिंबीर टाकून परत हलवून घ्यावे.
आता मोहरी आणि कडीपत्ता याचा गरमागरम तडका तयार करावा व या मिश्रणात सोडावा.
आपली कोसांबरी तयार आहे. ती एका बाउल मध्ये सर्व करावी.

kosambari

panakam and kosambari

या दोन्ही रेसिपी मी आमच्या यूट्यूब चॅनल वर टाकल्या आहेत.

प्रतिक्रिया

यश राज's picture

10 Apr 2022 - 5:17 am | यश राज

मी मोबाईल वरून इमेज फ्लिकर वर अपलोड केल्या होत्या आणि तीच लिंक इथे दिली होती तरी फोटोज् दिसत नाहीत.
मी प्रयत्न करतोय फोटोज् टाकण्याचा. बघुया.

1)kosamambari

https://flic.kr/p/2ndtQ5h

2)पानाकम panakam
https://flic.kr/p/2ndwjtu

_______
हे एकदम वेगळेच पदार्थ आहेत.

कॉमी's picture

10 Apr 2022 - 9:20 am | कॉमी

छान.
पन्ह आणि कैरीची डाळ आठवली.

सस्नेह's picture

4 May 2022 - 3:40 pm | सस्नेह

गुळाचं पन्हं आणि डाळीची कोशिंबीर (कोसांबरी ?)!

Bhakti's picture

10 Apr 2022 - 1:57 pm | Bhakti

छान!
कोसांबरी केली.
नंतर मिक्सरमध्ये फिरवली ,वाटलेली कैरी काकडी डाळ :)

वामन देशमुख's picture

10 Apr 2022 - 3:18 pm | वामन देशमुख

पानकं हे खरंच सुवासिक, सुमधुर पेय आहे. मुख्यतः आंध्रातील हिंदू श्री रामनवमीला करतात; नंतरही अनेकदा करतात.

पाकृ इथे लिहील्याबद्धल धन्यवाद. अनेक मिपाकर कदाचित करून बघतील.

---

अवांतर: कोसांबरी, पानकं, उगादि पच्चडि, कैरीचे पन्हे, कच्च्या कैरीचे सरबत, लिंबू सरबत, कैरी-काकडी-डाळ, सातूचे पीठ... असे (बहुधा उन्हाळा-स्पेसिफिक) साधेसोपे पदार्थ निर्माण करणाऱ्यांना प्रणाम.

---

सवांतर: पानकं (आंध्र तेलुगू उच्चार ) पानगं / पानकं (तामिळ उच्चार)

यश राज's picture

10 Apr 2022 - 3:46 pm | यश राज

कंजूस जी, कॉमी जी, भक्ती ताई व वामन जी आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद .

अवांतर: कोसांबरी, पानकं, उगादि पच्चडि, कैरीचे पन्हे, कच्च्या कैरीचे सरबत, लिंबू सरबत, कैरी-काकडी-डाळ, सातूचे पीठ... असे (बहुधा उन्हाळा-स्पेसिफिक) साधेसोपे पदार्थ निर्माण करणाऱ्यांना प्रणाम.

अगदी अगदी मनातलं बोललात.

अनिंद्य's picture

10 Apr 2022 - 5:14 pm | अनिंद्य

खूप छान.

ऋतुमानानुसार सुयोग्य वेळी - साधे, सोपे, सुंदर पदार्थ हेच तर आपल्या देशातील खानपानाचे वैशिट्य आहे.

यश राज's picture

11 Apr 2022 - 12:34 pm | यश राज

धन्यवाद अनिंद्य.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

11 Apr 2022 - 4:12 am | हणमंतअण्णा शंकर...

>> सर्व्ह करावा << या पाच अक्षरांच्या ऐवजी 'वाढावा' हा साधा सोपा सुटसुटीत तिनाक्षरी शब्द का सुचत नसेल बरं?
नैवेद्य दाखवताना उद्या लोक देवालापण 'आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सब्सस्क्राईब करायला विसरू नका' असं समर्पयामि म्हंटल्यावर म्हणणार नक्की!!!
ह. घ्या.

यश राज's picture

11 Apr 2022 - 12:36 pm | यश राज

कधी कधी मराठी लिहिता बोलता आपसूक इंग्लिश शब्द घुसतात . पुढच्या वेळेस नक्की काळजी घेईल.

वामन देशमुख's picture

11 Apr 2022 - 6:16 am | वामन देशमुख

या दोन्ही रेसिपी मी आमच्या यूट्यूब चॅनल वर टाकल्या आहेत.

Liked, commented, subscribed and shared

यश राज's picture

11 Apr 2022 - 12:37 pm | यश राज

खूप खूप धन्यवाद वामनजी

मुक्त विहारि's picture

11 Apr 2022 - 7:43 am | मुक्त विहारि

धन्यवाद

यश राज's picture

11 Apr 2022 - 12:38 pm | यश राज

धन्यवाद मुवी

कर्नलतपस्वी's picture

12 Apr 2022 - 9:53 am | कर्नलतपस्वी

आमचा एक घनिष्ठ कन्नडिगा मीत्राकडे राम,कृष्ण जन्म आसतो. त्याचाच कडे हे पदार्थ खाल्ले.
कैरीची डाळ व पन्हे सारखेच.
धन्यवाद