घोळ - वाघजाई घाट - तेल्याची नाळ - घोळ ट्रेक १९.१२.२०२१

Vivek Phatak's picture
Vivek Phatak in भटकंती
21 Mar 2022 - 1:28 pm

घोळ - वाघजाई घाट - तेल्याची नाळ - घोळ ट्रेक १९.१२.२०२१

सह्याद्रीतल्या घाटवाटांचे ट्रेक म्हणजे मनाला अतीव आनंद देणारे. निसर्गाच्या अगदी जवळ नेणारे, निसर्गाशी एकरूप व्हायला लावणारे. इथे जाऊन इथला सुखवणारा नेत्रदीपक निसर्ग पाहून, आनंदीत रोमांचित न होणारा माणूस विरळाच. हां, मात्र त्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात, भरपूर पायपीट करायची तयारी असावी लागते. पण खरं सांगतो ह्या घाटवाटांमध्ये फिरताना, वेळ किती गेला आणि पायपीट किती केली ह्याचं भानच राहत नाही इतका तो निसर्ग आपल्याला भरभरून आनंद देतो.

तर असाच एक सर्वांग सुंदर घाटवाटेचा ट्रेक करायचा योग आला तो आमच्या STF (Sahyadri Trekkers Foundation) मुळे. सकाळी बरोब्बर ४.४० ला ठरलेल्या वेळी आमचा शेवटचा पीक अप, वडगाव ब्रीजखाली घेऊन, आमची बस पानशेतच्या काठाने वळणावळणाच्या रस्त्याने घोळ ह्या वेल्हा तालुक्यातल्या गावाकडे निघाली. अडीच तीन तासांचा प्रवास करून, मधेच पानशेतला फोटोग्राफी करून ८.१५ ला आम्ही घोळला पोचलो. वेल्हा तालुक्यातले घोळ हे ३०-३५ घरांचे अतिशय टुमदार गाव. लोकसंख्या १०० च्या आसपास. गावातील तरुण मंडळी कामानिमित्त मुंबई/पुण्यात. गावात फक्त वयस्कर मंडळी. ट्रेकर्स ना मदत करणारी, वाट दाखवणारी.

.

.

.

ट्रेकला न लागणारे जास्तीचे सामान बसमधेच ठेऊन, बॅगपॅक व्यवस्थित भरून गावातून पोळेकर मामांना वाट दाखवायला बरोबर घेऊन, आम्ही मंडळी ८.३०/८.४५ च्या सुमारास निघालो. पोळेकर मामा, वय वर्ष फक्त ६६, पिळदार पांढऱ्या मिशा, शरीरयष्टी अतिशय काटक, पायात slippers, हातात काठी आणि खांद्याला एक पिशवी अश्या वेशात वाट दाखवायला सर्वात पुढे. त्यांच्याही पुढे एक काळे भुभू, त्यानेही संपूर्ण ट्रेक आमच्या बरोबर केला. सुरवातीला १५-२० मिनिटांचा डांबरी रस्ता संपल्यावर ट्रेकची सुंदर वाट सुरू झाली.

.

सकाळच्या कोवळ्या उन्हात, सुखद थंड आणि आल्हाददायक वातावरणात ट्रेकची मस्त सुरुवात झाली. वाट सुरुवातीला काही काळ मोकळ्या रानातून निघाल्यावर मस्त दाट जंगलात शिरली. भरगच्च झाडोऱ्यामुळे ऊन अजिबातच लागत नव्हते. वाटेत काही ओढे, वॉटर फॉल पण लागले. पण सध्या त्यात पाणी नव्हते. ओढ्याच्या काठाने तर कधी दरीच्या बाजूने जाणारी वाट पार करताना मजा येत होती. तासाभराने सोनेरी गवताचे एक मोठे पठार लागले. मधोमध एकच झाड होते. वारा छान सुटला होता त्यामुळे डोलणाऱ्या गवतावर छान लाटा येत होत्या. संपूर्ण पठारभर पसरलेले सोनेरी गवत आणि त्यावरची अगदी आखीव रेखीव पायवाट अगदी ठसठशीत दिसत होती, जणू केसातला व्यवस्थित पडलेला भांग.

.

.

.

.

.

पठारावरून समोर कोकणदीवा किल्ला, त्याच्या उजवीकडे कावळ्या बावळ्याची खिंड तर डावीकडे गेळ्याचा बंडा स्पष्ट दर्शन देत होते. कोकणदीव्याला जायला घोळ गावातून वाट आहे. इथे पोटात थोडं इंधन भरून, मनसोक्त फोटोज् काढून अगदी अनिच्छेनेच पुढे निघालो. वाट पुढेही जंगलातूनच होती. छोटी छोटी निळी जांभळी नाजूक फुले जागोजागी दिसत होती. कोकणदीवा झाडांच्या अधूनमधून दर्शन देत होता. हीच वाट पुढे कुंभेवाडीला जाते म्हणून हिला कुंभ्याची वाट सुध्धा म्हणतात. गावकरी नेहमी लागणारे सामान सुमान कुंभेवाडीतून आणतात त्यामुळे वाट छान मळलेली आहे.

.

.

.

.

.

.

तासाभराने परत एका ओढ्याकाठी थांबलो. ह्या ओढ्याला पाणी होते त्यामुळे रिकाम्या बाटल्या भरून घेतल्या थोडे चाऊम्याऊ खाऊन पुढें निघालो. पुढे कुंभेवाडी बाजूला ठेवत उजवीकडे निघालो ते पुन्हा एकदा दाट जंगलात घुसलो. संपूर्ण दगडी ऊतरण होती. त्यामुळे loose rocks बघून काळजीपूर्वक उतरायला लागत होते. बडदेमाची जवळ पोचलो तेव्हा साडे बारा वाजून गेले होते. भूक तशी फार लागली नव्हती. पण पुढे दिड दोन तासांच्या पायपीटी नंतर तेल्याच्या नाळेची खडी चढाई चढायची होती आणि आणखी पुढे जाऊन जेवायला थांबलो असतो तर लगेच नाळ चढायला त्रास झाला असता त्यामुळे बडदेमाची जवळच मस्त झाडाखाली जेवणाचे डबे उघडले.

.

.

.

.

इथून पहिल्यांदाच कुर्डूगडाचे दर्शन झाले. दोन वर्षापूर्वी जुलै महिन्यात भर पावसाळ्यात धामणहोळहून लिंग्याघाट उतरून कुर्डूगडाला गेलो होतो आणि निसणीच्या वाटेने परत धामणहोळ गाठले होते ते आठवले. त्यावेळी लिंग्या घाटातला अजस्त्र धबधबा पाहिला होता आणि त्या धबधब्याच्याच वाटेने वाहत्या पाण्यातून घाट उतरला होता त्या आठवणीने रोमांच उभे राहिले. एक adventurous ट्रेक होता तो.

असो, डबे खाऊन पुढे लगेचच मार्गस्थ झालो. वाट दाट जंगलातूनच होती. पुढे ते काळे भुभु, मामा, अय्यर(ट्रेक साथी) त्याच्या मागे मी आणि माझ्या मागे दोघे तिघे असे निमुळत्या जंगल वाटेने पुढे चाललो होतो. बाकी ग्रुप मागे होता. मला बाजूच्या दाट झाडीतून गुर गुर असा आवाज ऐकल्याचा भास झाला. मामा पण संशयाने बघून पुटपुटले जनावर आहे की काय म्हणून. पण लगेच झपाझप पुढे निघाले. आम्ही पण स्पीड वाढवला. काही अंतरावर जंगलात काही गावकरी कंदमुळे शोधत होती त्यामुळे हायसे वाटले. जंगल पार करत बोरमाचीला पोचलो तेव्हा १.३०/१.४५ झाले होते. ७-८ घरें होती. माचीवर मोजकीच माणसे होती. रिकाम्या पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. घरातल्या आयाबायांनी लगेच घरातून पाण्याचे हंडे आणून आम्हाला पाणी भरून दिले. खूप आपुलकीने विचारपूस केली. खूप प्रेमळ लोकं डोंगरात राहणारी.

.

.

.

.

आता गाव पार करून १५-२० मिनिटात आम्ही तेल्याच्या नाळेत पोचणार होतो. वाट शेतातून जात होती. शेताच्या बाजूच्या झाडीत २ बैल चरत होते. त्यातला एक उधळला. तो इतक्या जोरात मुसंडी मारून आमच्या समोरून पळाला की क्षणभर कळलेच नाही काय होतंय ते. आमच्या पासून ५० फुटावर रागात जाऊन उभा राहिला. आमच्यात एकाने लाल रंगाचा टीशर्ट घातला होता. त्याला लगेच काही जणांनी तो काढायला सांगितला. कदाचीत तो रंग बघून बैल उधळला की काय म्हणून. पण खरंच प्रसंग बाका होता. मामांनी चुचकारून त्याला शांत करायचा प्रयत्न केला. तोपर्यंत हळूच आम्ही पुढे सटकलो. मागच्या मंडळींना वॉकीटॉकी वरून खबरदार करून आम्ही पुढे जाऊन थांबलो.

.

.

आता आम्ही नाळेच्या पायथ्याशी होतो. सगळे आल्यावर नाळ चढायला सुरुवात केली. छोट्या मोठ्या दगड धोंड्यांनी बनलेली. पाय देण्यासाठी, सुटलेले दगड काळजी पूर्वक avoid करत चढावे लागत होते. चढण पण कसली, अगदी छातीवर येणारी वळणावळणाची. त्यामुळे आम्ही फटाफट उंची गाठत होतो. ज्यांना सवय नाही, त्यांच्या गुडघ्यावर ताण येणं, पायात गोळे येणे असे होते. सतत वर न बघता व्यवस्थित पायाखाली बघून चढत गेल्यास दडपण येत नाही. वर पाहिल्यास, अजुन खुप चढायचंय म्हणून दडपण येते. मामा मात्र (वय फक्त ६६) वेगाने वर वर चढत होते. नाळ संपायला आल्यावर थोडे थांबलो. पाणी ब्रेक घेतला. फोटो सेशन केले. वरून दिसणारा नजारा मात्र अप्रतिम होता. कुर्डूगड अजुन स्पष्ट दिसत होता. पुढच्या 15 मिनिटात नाळेचा टॉप गाठला. तासभर लागला संपूर्ण नाळ चढायला.

.

.

.

.

.

मागची लोकं अजुन बरीच मागे होती. एका मुलीच्या पायाला cramp आला होता. आम्ही न थांबता पुढे जायचे ठरवले. पुढच्या पाऊण तासात म्हणजे 4.15 वाजता घोळ गावात पोचलो. हापश्याचे पाणी उपसून मस्त फ्रेश झालो. थोड्या थोड्या वेळाने बाकीची मंडळी येत राहिली. सगळी मंडळी यायला 5.30 वाजले. मस्त गरमा गरम चहा पिऊन 6 वाजता पुण्याकडे रवाना झालो. 8 तासांची निसर्गाच्या कुशीतली पायपीट एक वेगळेच समाधान देऊन गेली त्यामुळे ट्रेकच्या आठवणी घोळवत बसमध्ये झोपेच्या अधीन केव्हा गेलो ते कळलेच नाही. जागा झालो तेव्हा बस खडकवासला पार करून पुण्यात शिरत होती आणि घड्याळात 9 वाजत आले होते.

विवेक फाटक

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

21 Mar 2022 - 8:17 pm | चौथा कोनाडा

अप्रतिम लिहिलं आहे!
अतिशय ओघवते वर्णन आणि तितकेच समर्पक फोटो.

पुढच्या ट्रेक बद्दल वाचायला नक्की आवडेल.

धन्यवाद..मध्यंतरी बरेच ट्रेक्स झाले. त्याचे वर्णनही मी misal pav वर टाकायचा प्रयत्न केला. पण सारखा error येत होता. आज जमलं म्हणून टाकले. आता बाकीच्या ट्रेक्सचे वर्णन मी टाकायचा प्रयत्न करीन.

चौथा कोनाडा's picture

21 Mar 2022 - 9:20 pm | चौथा कोनाडा

नक्की टाका.
लेखन शैली मस्तच आहे

खुप छान वर्णन केलय ट्रेकचं..फोटोही छान आहेत. वाचतानाच ट्रेक केल्यासारखं वाटलं

Vivek Phatak's picture

22 Mar 2022 - 10:31 am | Vivek Phatak

धन्यवाद..

कपिलमुनी's picture

22 Mar 2022 - 12:08 am | कपिलमुनी

सुंदर फोटो आणि छान वर्णन !
इतर ट्रेक्स च्या वृतांताच्या प्रतीक्षेत

Vivek Phatak's picture

22 Mar 2022 - 10:33 am | Vivek Phatak

धन्यवाद कपिलमुनी..

कर्नलतपस्वी's picture

22 Mar 2022 - 7:31 am | कर्नलतपस्वी

मागची लोकं अजुन बरीच मागे होती. एका मुलीच्या पायाला cramp आला होता. आम्ही न थांबता पुढे जायचे ठरवले.

आशा ट्रेकिंग मधे आसे अनुभव येत असतात. बावीस वर्षाचा असताना बालटाल ते अमरनाथ, काश्मीरमधील अनुभव आसाच.
पण पायपीट ची मजाच काही और है,मस्त वर्णन तर तुम्हाला किती मजा आली असेल याचा अंदाज येतो.
पुढचा भाग लवकर येऊ द्यात.

धन्यवाद कर्नलतपस्वी..तुमचेही अनुभव share करा.

गोरगावलेकर's picture

22 Mar 2022 - 9:42 am | गोरगावलेकर

आमची मजल कर्नाळा, लोहगड विसापूरसारख्या छोट्या ट्रेकपुरती मर्यादित. नुकताच गावच्या भेटीत केलेल्या एका अपरिचित किल्याचा छोटासा ट्रेक आठवला

गोरगावलेकर साहेब, सुरवात लहानलहान treks करुनच होते. नन्तर सवय झाल्यावर आपोआप मोठे ट्रेक करायला लागतो आपण.
आपणही कराल..