पहिल्याच भेटीत कोकणानं आपलंसं केलं होतं:
कोकण प्रवास: प्रकाशचित्रे: भाग १
२२ व २३ नोव्हेंबर २०१७
कर्दे ते बुरोंडी ह्या आडवाळणाच्या रस्त्याने झालेला निसर्गरम्य प्रवास डोळ्यात साठवत, आम्ही गणपतीपुळेच्या दिशेने निघालो.
कर्देहून गणपतीपुळे जेमतेम १२० किमी अंतर. पण कोकणातला प्रवासही निवांत, वेळेचं गणित विसरायला भाग पाडणारा.
बोरिवली ता. दापोली
एक शाळा, रंगीबेरंगी, तरीही भोवतालच्या निसर्गात सामावून गेलेली.
नारळ आंबा काजूच्या बागेतून डोकावणारं कौलारू घर.
दाभोळ-धोपावे जेट्टी
या आधी आमची उडी फक्त माणसं वाहून नेणाऱ्या होडी पर्यंतच होती.
तीन-चार चारचाकी, त्याहून जास्त दुचाकी आणि साधारण ५० प्रवासी अशी वशिष्ठी नदीतील जेट्टी सफर आमच्यासाठी नवीन.
खारफुटीच्या सानिध्यात, खाडीच्या एका कोपऱ्यात विश्रांतीसाठी पहुडलेली एक नौका.
गुहागर
विस्तीर्ण समुद्रकिनारा. काहीशा रौद्र भासणाऱ्या लाटा.
वेळणेश्वर
उच्चारताना जिभेला खूप वळणे पडली तरी कानांना गोड वाटणारं, वेळणेश्वर.
मुख्य शिवमंदिर.
महाविष्णू लक्ष्मी मूर्तीही सुंदर.
हेदवी
एरव्ही घाई गर्दीत वावरणारी, इथे मात्र दुपारच्या उन्हात निवांत वामकुक्षी घेत असलेली, एसटी.
मनुष्यवस्ती पासून थोडंसं अलिप्त, एका छोट्या टेकडीवरील, साधंसुधं, निवांत, प्रसन्न असं दशभुजा लक्ष्मी गणेश मंदिर.
हजारो किलोमीटर प्रवास करून कोकणची सफर करायला आलेले सीगल पक्षी.
गणपतीपुळे
निसर्गाचा कॅनव्हासच मुळात क्षितिजापर्यंत पसरलेला, अथांग!
पहाटेच्या मंद धुक्याने क्षितिजाला जवळ आणून ठेवल्यासारखं वाटलं.
आठ द्वार देवतांपैकी एक असलेल्या, पश्चिमद्वार देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लंबोदर गणपतीचं सुंदर मंदिर.
निरोपाचा क्षण
शांत तरीही ऊर्जा देणाऱ्या निळ्या रंगाच्या सूक्ष्म छटा हळुवारपणे चितारणं फक्त निसर्गाच्या चित्रकारालाच शक्य असावं.
आपण फक्त स्तब्ध व्हायचं.
समाप्त.
प्रतिक्रिया
21 Feb 2022 - 10:36 am | अनिंद्य
सुंदर चित्रे, सुंदर वर्णन.
21 Feb 2022 - 11:19 am | कंजूस
कोकण अनुभवणं एक कला आहे.
21 Feb 2022 - 11:30 am | चौथा कोनाडा
क्या बात ! रमणीय कोकण पाहून डोळे निवले !
हेदवी, वेळणेश्वरला जाऊन बरीच वर्षे जाहली.
पुन्हा मोहीम काढावयास हवी.
श्रीगणेशाचा हा सुंदर धागा पकडून पुन्हा श्रीगणेशा करायला हवा !
सुंदर चित्रे, सुंदर वर्णन ! श्रीगणेशा _/\_
21 Feb 2022 - 2:10 pm | अनन्त्_यात्री
"अनंत हस्ते कमलावराने
देता, किती घेशिल दो कराने" हे कोकणाच्या बाबतीत अगदी खरंय.
21 Feb 2022 - 3:40 pm | ॲबसेंट माइंडेड ...
छान आहेत सगळे फोटो.
21 Feb 2022 - 5:14 pm | Bhakti
सुंदर!
22 Feb 2022 - 12:39 pm | टर्मीनेटर
सर्व फोटोज आवडले 👍
22 Feb 2022 - 7:50 pm | श्रीगणेशा
धन्यवाद अनिंद्य, कंजूस, चौ को, अनन्त्_यात्री, ॲबसेंट माइंडेड, भक्ती, टर्मीनेटर _/\_
22 Feb 2022 - 9:27 pm | सरिता बांदेकर
छान आहेत फोटो. कोकण किनारे मला नेहमीच आवडतात.
आणि कुठच्याही ऋुतूमध्ये मस्तच वाटतं.