३० जानेवारी २०१३: न्यू यॉर्क, टोरांटो, लंडन, पॅरिस, दुबई, जोहान्सबर्ग, जकार्ता व नवी दिल्ली येथे दिमाखदार सोहळ्यांद्वारे रिसर्च इन मोशन कंपनीच्या नव्या फोन ऑपरेटिंग सिस्टम ( ब्लॅकबेरी १०) व दोन नव्या फोन्सच्या लॉन्च इव्हेंटचा दिमाखदार सोहळा झाला.
याच सोहळ्यात कंपनीने आपले नाव बदलून ब्लॅकबेरी ठेवत असल्याचे जाहीर केले.
ब्लॅकबेरी झेड१० ब्लॅकबेरी क्यू१०
साधारण २००० च्या दशकात साध्या फोन्सपासून वापरकर्त्यांना तुलनेत स्मार्ट फोन्सकडे वळवण्याची यशस्वी कामगिरी कंपनीने केली होती. फोनमधे ईमेलाची जोडणी व फिजिकल QWERTY कीबोर्ड अशा सुधारणा टप्प्याटप्प्याने करत कॉर्पोरेट क्षेत्रात कंपनीने उत्तम बस्तान बसवले. इतर फोन्सच्या तुलनेत माहितीच्या सुरक्षेच्या बाबतीत ब्लॅकबेरी फोन्स अधिक परिणामकारक होते. या सर्व काळात नोकिया कंपनी मोबाइल फोन्सच्या व्यावसायिक वापरकर्त्यांच्या संख्येच्या बाबतीत लक्षणीयरित्या पहिल्या क्रमांकावर होती. मायक्रोसॉफ्टही कॉर्पोरेट क्षेत्रातल्या फोन्सच्या बाजारात बस्तान बसवण्यासाठी हातपाय मारत होती. पण त्यांना फारसे यश मिळत नव्हते.
२००७ मधे अॅपलने आयफोन बाजारात आणला व पुढच्या दोन वर्षात अमेरिका व काही देशांत या उत्पादनाने वेगवान घोडदौड केली. याच काळात गूगलने विकत घेऊन विकसीत केलेल्या अॅन्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारे फोन्सही जम बसवू लागले होते. या फोन्समधल्या आधुनिक सुविधा व नावीन्यपूर्ण कल्पना पाहून ब्लॅकबेरी फोन्स वापरणारे त्यांच्याकडे वळू लागले. रिसर्च इन मोशन आता फोनवरील अनेक सुविधांच्या बाबतीत कॅच-अप गेम खेळू लागली. जसे टच स्क्रीन कंट्रोल इत्यादी. एवढे करूनही सोडून जाणार्या वापरकर्त्यांचे प्रमाण कमी होईना.
यावर जालीम उपाय म्हणून त्यांनी २०१० साली QNX ऑपरेटिंग सिस्टिमच्या कंपनीला विकत घेतले. QNX वर आधारीत नावीन्यपूर्ण फोन ऑपरेटिंग सिस्टिम बनवायला कंपनीने सुरुवात केली. मल्टी-टच टच स्क्रीन, जेस्चर कंट्रोल्स, सहजपणे करता येणारे मल्टी-टास्कींग तसेच हे सर्व उपलब्ध करून देताना माहितीच्या सुरक्षेची उत्तम यंत्रणा. या ओएस साठी पहिले ब्लॅकबेरी एक्स (रोमन १०) असे नाव ठरले होते. प्रत्यक्षात ब्लॅकबेरी १० हेच नाव वापरले गेले. वर उल्लेखलेल्या सोहळ्यानंतर नवे फोन्स प्रत्यक्ष ग्राहकांना मिळायला २०१३ चा मार्च महिना उजाडला.
मी स्वतः स्मार्टफोन वापरायला खूप उशिरा सुरुवात केली. सप्टेंबर २०११ मधे मी पहिला स्मार्टफोन घेतला ब्लॅकबेरी टॉर्च ९८१०. जेव्हा नवा झेड १० माझ्या हातात पडला तेव्हा झालेला आनंद अवर्णनीय होता. आयुष्यात प्रथमच कुठलेही मोठे उत्पादन मी बाजारात आल्या दिवशी विकत घेतले होते.
तेव्हापासून पुढची पावणेआठ वर्षे मी हा व ब्लॅकबेरी लीप हे दोन फोन वापरले. आंतरजालाचा अतिरेकी वापर करणार्या माझ्यासारख्या वापरकर्त्यासाठी ब्लॅकबेरी हबसारख्या सोयी असणारी ओएस फारच उपयुक्त होती. ब्लॅकबेरी १०चा व्हर्चुअल कीबोर्ड आपल्या वापरानुसार शब्द लक्षात ठेवून ऑटो कम्प्लिटचे पर्याय सुचवित असे. मिपावर मी फोनवरून टंकत असणारे मराठी शब्द देवनागरी लिपीत मला सहजपणे मिळत असत. तसेच कीबोर्डच्या दोन अक्षर रेषांदरम्यानच ऑटो कम्प्लिटचे पर्याय मिळत असल्याने टंकणारे बोट न उचलता केवळ वरच्या दिशेने फ्लिक करून वेगवान टंकन करता येत असे. या इतका सोयिस्कर व्हर्चुअल कीबोर्ड नंतर मला आय ओएस वर मिळू शकला नाही.
ब्लॅकबेरी १० फोन्समधे स्क्रीनच्या वर एक लहानसा एल इ डी दिवा होता. आलेल्या नोटिफिकेशन नुसार त्यात सात पैकी सेट केलेला नेमका रंग दिसत असे. उदा. नव्या ईमेलासाठी मी तांबडा, नव्या एसएमएससाठी हिरवा, मेसेंजरच्या संदेशासाठी आकाशी, कॅलेंडर इव्हेंट रिमाइंडरसाठी पांढरा असे रंग सेट केले होते. फोनला हात न लावताही आठ-दहा फुटांवरून कुठल्या प्रकारचे संदेश आपल्याला मिळाले आहेत हे कळत असे. अलार्म लावण्यासाठी अॅनालॉग घड्याळाभोवती अलार्मच्या वेळेचा डॉट सरकवून अलार्मची वेळ सेट करता येत असे. तास व मिनिट पाठोपाठ सेट करण्यापेक्षा हे खूप सोपे होते.
मुख्य म्हणजे यासारख्या अनेक सोयीसुविधा ऑपरेटिंग सिस्टिमच्या कोअर फंक्शनॅलिटीतच होत्या. प्रत्येक गोष्टीसाठी थर्ड पार्टी अॅपवर विसंबण्याची गरज नसायची. ब्लॅकबेरी कंपनीच्या व ब्लॅकबेरी फोन्स आवडणार्यांच्या दुर्दैवाने ब्लॅकबेरी १० ओएस बाजारात यशस्वी होऊ शकली नाही.
माझ्या अनुमानाप्रमाणे ही ओएस व संबंधीत फोन्स दोन वर्षे आधीच बाजारात आले असते तर कदाचित अजूनही मुख्य प्रवाहात आपले अस्तित्व राखून असते. पहिल्या वर्षी अनेक दशलक्ष फोन्स खपले तरी नंतर अत्यंत वेगाने घसरण होऊन कदाचित काही हजार (किंवा लक्ष) वापरकर्ते उरले. पुढच्या कुठल्याच फोनला पहिल्या दोन एवढा प्रतिसाद मिळू शकला नाही.
गेल्या तेरा महिन्यांपूर्वीच मी ब्लॅकबेरी १० वर चालणारा फोन वापरणे थांबवले. आजही अनेक कामे करताना ब्लॅकबेरी १० च्या सुटसुटीतपणाची आठवण येते. आज ब्लॅकबेरी १० व त्या पूर्वीच्या ब्लॅकबेरी ७ ओएसच शेवटचा दिवस आहे. यानंतर ब्लॅकबेरी कंपनीद्वारे या उपकरणांसाठी कुठलाही सपोर्ट मिळणार नाही व जालाद्वारे मिळणार्या अनेक सुविधाही चालणार नाहीत. जीवनातल्या अनेक चांगल्या गोष्टींचा अंत एक दिवस येतोच. त्याविषयी निराश होण्याऐवजी अनेक वर्षे मिळालेल्या समाधानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा लेखनप्रपंच.
माझ्या ब्लॅकबेरी झेड १० व लीप फोन्सचे फोटोज.
२०१३ साली ब्लॅकबेरी झेड १० ने काढलेले काही फोटोज
गुडबाय ब्लॅकबेरी १०!!
प्रतिक्रिया
4 Jan 2022 - 11:12 am | गवि
गेले ते दिवस. राहिल्या त्या आठवणी. खपली काढलीत.
यासारखा intutive (मराठी प्रतिशब्द?) कीबोर्ड अन्य बघितला नाही. पुढील अक्षरांच्या की वरच पुढील शब्द. आणि तो वर उडवला की झाले.
इ मृ शां दे
4 Jan 2022 - 2:29 pm | सर टोबी
अंतहप्रेरणा जाणणारा, मनकवडा
4 Jan 2022 - 3:00 pm | गवि
धन्यवाद.
4 Jan 2022 - 11:23 am | कंजूस
नंतर आइफोनसाठी याला वाइटहौसातून डच्चू दिला.
5 Jan 2022 - 1:32 am | श्रीरंग_जोशी
ओबामा त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या काळात ब्लॅकबेरी ८८३० वर्ल्ड एडिशन फोन वापरत होते. त्यांना कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षी अति-सुरक्षिते केलेला अॅन्ड्रॉइड फोन देण्यात आला.
खालील परिच्छेद या बातमीतून साभार - Obama finally upgraded from his BlackBerry.
5 Jan 2022 - 10:53 am | कंजूस
अतिसुरक्षित आइफोन एका गुन्हेगाराचा उघडून देण्यास आईफोन कंपनीने नकार दिला होता. आमच्या करारात बसत नाही. पण तो ही एका hackerने कोर्टाला उघडून दिला. मग ते तंत्रज्ञान भारताने सिक्युरटीसाठी विकत घेतले होते.
4 Jan 2022 - 12:15 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
रम्य आठवणी.. ब्लॅक्बेरी पास्पोर्टपण चांगला होता. २०१३-१४ च्या सुमारास भारतात तो ४८-५० हजारापर्यंत मिळायचा. १३ मेगा पिक्सेल कॅमेरा. की-पॅड असल्याने आमच्यासारख्या ज्येष्ठ मंडळीना बरा वाटायचा.
5 Jan 2022 - 1:41 am | श्रीरंग_जोशी
ब्लॅकबेरी पासपोर्ट जोरदार फोन होता. मी दुकानात जाऊन हाताळून पाहिला होता. त्याचा किबोर्ड कॅपॅसिटिव टच कॅपेबल होता. त्यावर बोटे फिरवून स्क्रीनवर स्क्रोल करता येत असे. ब्लॅकबेरी १०चा व्हर्चुअल किबोर्ड आवडत असल्याने मी पासपोर्ट फोन घेणे टाळले.
चार वर्षांपूर्वीच्या चूक भूल द्यावी घ्यावी या मराठी मालिकेत सुकन्या कुलकर्णी ब्लॅकबेरी पासपोर्ट वापरताना दाखवल्या होत्या.
तसेच चार वर्षांपूर्वी तारक मेहता का उलटा चष्मा या प्रसिद्ध मालिकेत पिंकू ब्लॅकबेरी झेड १० फोन वापरताना एकदा दाखवला होता.
4 Jan 2022 - 2:57 pm | चौथा कोनाडा
नॉस्टेल्जिक करणारा रोचक लेख. आपण वापरतो त्या वस्तू, ते तंत्रज्ञान वापरातून बाहेर पडताना वाईट वाटतेच, आणि फोन तर खुपच जवळची वस्तू !
अश्या वस्तूंनी दिलेले सुख चिरस्मरणीयच !
नविन काहीतरी रुळताना काही सरावाची झालेली वैशिष्टे आपण नंतर मिस् करत असतो !
माझे दोन तीन उच्चभ्रू मित्र ब्लॅकबेरी वापरायचे. मी आपलं साधा नोकिया. त्यांचे ब्लॅकबेरी वापरणे पाहून मलाही खुप मोह व्ह्यायचा, पण नाही घेऊ शकलो.
थोड्याच काळात अॅण्ड्रॉईडचा बोलबाला सुरू झाला. शॉप्स वरचे नोकियाचे बोर्ड हटून बाजारपेठ सॅमसंगने काबीज करायला सुरूवात केली होती.
मग मी पण पहिला स्मार्ट फोन सॅमसंग हा २०१३ ला घेतला ! हळूहळू ते ब्लॅकबेरीवाले मित्र आयफोनकडे वळले, नंतर ब्लॅकबेरी क्वचित कुणाकडे तरी दिसु लागला.
गेल्या ३-३.५ वर्षात तर मी कुणाकडेच नाही पाहिला.
पण, नोकिया काय, ब्लॅकबेरी काय, इतिहास निर्माण करणारे फोन्स. वेळोवेळी त्यांच्या कौतुकाची कहाणी संभाषणात येतच राहिल !
4 Jan 2022 - 3:35 pm | अनिंद्य
मी पण ब्लॅकबेरी फॅन ! लेखामुळे नॉस्टॅल्जिया अनुभवला. ब्लॅकबेरी साधारण १० वर्षे वापरला - ३ वेगवेगळे मॉडेल्स. ओबामा आणि व्हाईटहाऊस वापरतात तोच फोन आम्ही वापरतो म्हणून भाव खाल्लाय :-)
BBN सुविधा तर फारच कामाची, BB to BB उत्तम कनेक्ट होता तो. .. मालदीवला सैन्य उठाव झाला असतांना त्यांनी सर्व नेटवर्क बंद केले होते, त्यावेळीही BB समहाऊ व्यवस्थित चालत होता !!!
....शब्द लक्षात ठेवून ऑटो कम्प्लिटचे पर्याय .... त्यासाठी शंभर पैकी १०० मार्क त्याला !
पहिल्या screen touch मॉडेलचा keypad थोडा छोटा होता माझ्यासाठी, किंवा माझ्या फताड्या हाता-बोटांमुळे तीन अक्षरे एकत्र टाईप होत कधी कधी :-)
मग एकदा साधारण १२०० कॉन्टॅक्ट कसेसे उडाले आणि हजार हिकमती करूनही परत मिळवता आले नाहीत. तस्मात ब्लॅकबेरीची गच्छंती होऊन सफरचंदाच्या पार्टीत मी आलो ते आजवर.
सुंदर लेख !
4 Jan 2022 - 4:07 pm | राजेंद्र मेहेंदळे
२००५-०६ साली कधीतरी सिंगापुरहुन आलेल्या क्लायंटकडे ब्लॅकबेरी बघितला होता तेव्हा त्याला फोनवर ऑफिसची ई मेल्स चेक करताना आणि टाईप करताना पाहुन फारच आश्चर्य वाटले होते. तेव्हा माझ्याकडे लॅपटॉपसुद्धा नसायचा तर हे म्हणजे सुखवस्तुपणाची चैनच झाली.
पुढे मग कधीमधी हायर मॅनेजमेंट मंडळींकडे ब्लॅकबेरी दिसत असे, आणि मिनिटागणिक ते फोन चेक करताना बघुन त्यांच्या "कार्यमग्नतेची" मजा वाटत असे. पण २०१० मधे हळुहळु बटणाचे फोन जाउन स्मार्ट्फोन (सिम्बियन्,अँड्रॉईड्,विंडोज वगैरे) येउ लागले आणि मोबाईलवर ई मेल चेक करणे सोपे झाले त्यामुळे ब्लॅकबेरीकडे कधी वळलोच नाही. झेड १० चे ही आकर्षण वाटले नाही. तरीही डेटासेंटरमध्ये ई मेल सर्वर बरोबरच स्वतंत्र ब्लॅकबेरी सर्वरही असायचा आणि कुठलीही मेंटेनन्स अॅक्टिव्हिटी संपली की एक टेस्ट मेल पाठवुन ब्लॅकबेरी आणि लॅपटॉपवर ते एकदमच येतेय की नाही हे पाहिले जायचे.
मात्र स्मार्ट्फोन्स प्रगत होत गेले आणि ई मेल सिस्टीमही कमालीच्या बदलत गेल्या. आतातर एकंदर मायक्रोसॉफ्टने ई मेलची बाजारपेठ काबीज केली आहे आणि ऑफिस ३६५ मुळे सगळेच अॅझुर क्लाऊड्वर गेले असल्याने ऑफिसमध्ये एखादा साधारण ई मेल सर्वर सिंक अप साठी ठेवला /नाहि ठेवला तरी चालते. शिवाय टिम्स मुळे तर टेक्स्ट आणि वॉईस कॉलिंगही फोनवरच आल्याने(आणि पर्सनल कॉलिंगसाठी व्हाटस अप सारखी अॅपही फोनवर असल्याने) डेस्क फोन नावाचा प्रकारही गायब झाला आहे. कालाय तस्मै नमः
4 Jan 2022 - 4:13 pm | प्रचेतस
समयोचित लेख.
श्रीरंगचं ब्लॅकबेरीविषयक प्रेम माहित असल्याने आज सकाळी पेपरला ही बातमी वाचल्यावर असा काही लेख किंवा प्रतिक्रिया येईल असं वाटलंच होतं.
5 Jan 2022 - 12:19 am | सौन्दर्य
ब्लॅकबेरी कधीही वापरला नाही तरी कंपनीत जीएम व वरच्या हुद्द्यावरच्या लोकांच्या हातात दिसत असे. नोकियापासून सुरु केलेला प्रवास सध्या आय फोन वर येऊन थांबला आहे.
5 Jan 2022 - 9:28 am | श्रीरंग_जोशी
सर्व वाचकांचे अन अनुभवकथन करणार्या प्रतिसादकांना मनःपूर्वक धन्यवाद.
ब्लॅकबेरी झेड १० फोनचा वापर असलेली डिसेंबर २०१३ मधली एक रोचक बातमी.
नेल्सन मंडेला यांच्या निधनानंतर मेमोरियल सर्विस दरम्यान डेन्मार्कच्या तत्कालिन पंतप्रधानांनी ब्रिटिश पंतप्रधान व अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर स्वतःच्या झेड १० फोनने सेल्फी काढली. यासाठी त्यांच्यावर टिका झाली.
Obama poses for selfie with Cameron, Danish PM at Mandela memorial service.
Danish PM Defends Obama Selfie.
5 Jan 2022 - 1:33 pm | मदनबाण
आमच्या हापिसात जे मॅनेजर लोक्स उसगावात होते, त्यांना बहुतेक क्लायंट ही काळीबेरी वाटायचा. सेंट फ्रॉम काळीबेरी असं स्वाक्षरी असलेला मेल आला की आम्हाला कळायचे की याला काळा बेरी पावली ! :) बाकी तुमच्या कडुन काळीबेरी चा उल्लेख या आधी काहीवेळा झाला असल्याने तुमच्या या डार्लिगवर लेख येइल असे गृहित धरले होते. :)
आम्ही बापडे अँड्रॉइड प्रेमी...कधी नोकिया कधी मोटो पण केवळ आणि केवळ क्लिन ओएस प्रेमी. :) सध्या मोटो एज २० फ्युजन वापरतोय.
बादवे... साधारण २ आठवड्यापूर्वी मोबाईलवर एक डॉक्युमेंटरी पाहिली होती ती इथे देउन ठेवतो.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Maai Bappa Vithala
5 Jan 2022 - 11:21 pm | बापूसाहेब
आम्ही बापडे अँड्रॉइड प्रेमी...कधी नोकिया कधी मोटो पण केवळ आणि केवळ क्लिन ओएस प्रेमी. :) सध्या मोटो एज २० फ्युजन वापरतोय.
मदनबाण जी .
या फोन बद्दल तुमचा review काय आहे. किती दिवसापासून वापरताय?? या फोनचा कॅमेरा क्वालिटी, स्पीड , डिस्प्ले कसा आहे. ?
नवीन फोन घेण्याच्या विचारात आहे. रेडमी, poco , oppo vivo असल्या कंपन्यांचा वैताग आलाय. आणि चायनीज ब्रँड नको आहे.. त्यामुळे इतर पर्याय चाचपतोय. आयफोन च्या वाट्याला जायचा विचार नाही.. कारण ७०-८०,००० फोन वर गुंतवणे हे खिश्याला परवडणारे नाही.. तर्किक दृष्ट्या पटत नाही. आणि मला वयक्तिक आयफोन हा फक्त शो ऑफ करण्यासाठी असलेला फोन वाटतो.
बाकी ब्लॅकबेरी आमच्या इथे पण मॅनेजर लोक किंवा onsite la जाऊन बसलेले लोक वापरायचे. (२०११ च्या आसपास ) .
सेंट फ्रॉम ब्लॅकबेरी अस signature मध्ये असलेल्या लोकांचा हेवा वाटायचा. नंतर ती जागा सेंट फ्रॉम आयफोन ने घेतली.
6 Jan 2022 - 9:33 am | श्रीरंग_जोशी
भारतातल्या आयफोन्सच्या किमती पाहता शो ऑफ शी संबंध जोडणे पटण्यासारखे आहे. २०१६ अन्द २०२० च्या SE मॉडेल्स मुळे आयफोन बजेट सेगमेंटमधेही उत्तम कामगिरी करत आहे असे दिसते. तेरा महिन्यांपूर्वी मी अडीच वर्षांच्या पोस्टपेड कॉन्ट्रॅक्टवर iPhone SE 2020 घेतला. ते करताना चार वर्षे वापरलेला आयफोन ७ ट्रेड-इन केल्याने नव्या SE फोनसाठी अधिक मुल्य द्यावे लागले नाही. अनेक वर्षे एकच फोन वापरणार्यांसाठी आयफोन व्हॅल्यु फॉर मनी असतो. माझ्या पूर्वीच्या हापिसात ऑन-कॉल फोन म्हणून २०१० चे आयफोन ४ हे मॉडेल २०१९ पर्यंत चालवले गेले. तो फोन ९ वर्षे व्यवस्थित चालत होता ;-).
छायाचित्रणाची आवड अन गती नसतानाही कुणी आयफोन प्रो / प्रो मॅक्स अन सॅमसंगचे महागडे फ्लॅगशिप फोन्स वापरत असेल तर त्यालाही शो-ऑफ म्हणता येईल.
6 Jan 2022 - 8:45 pm | मदनबाण
या फोन बद्दल तुमचा review काय आहे.
फोन चांगला आहे, एकदा चार्ज केला की २ दिवस आरामात चालतो.
किती दिवसापासून वापरताय??
वरती श्रीरंग ने म्हंटले आहे :- आयुष्यात प्रथमच कुठलेही मोठे उत्पादन मी बाजारात आल्या दिवशी विकत घेतले होते.
अगदी असेच माझ्या बाबतीत या वेळी झाले, फ्लिपकार्टवर उपलब्ध झाल्यावर [ सप्टेंबर २०२१ ] फ्लॅश सेल मध्ये मी घेतला.
या फोनचा कॅमेरा क्वालिटी, स्पीड , डिस्प्ले कसा आहे. ?
कॅमेरा ओक्के आहे, म्हणजे लयं भारी पण नाही आणि फार भिकारपण नाही.स्पीड चांगला आहे. डिस्प्ले १ नंबर आहे. [ HDR10+ ,90 Hz , 6.7” Ultra-wide AMOLED display ] स्क्रॅच गार्ड शिवाय वापरु नये.
रेडमी, poco , oppo vivo असल्या कंपन्यांचा वैताग आलाय.
मी या फोन्सच्या जाहिरातींकडे देखील पाहत नाही.
चायनीज ब्रँड नको आहे.
या बाबतीत मात्र निराशा आहे ! :( चायनीज कंप्युटर जायंट Lenovo ने गुगल कडुन $2.9 billion मोजुन २०१४ मध्ये Motorola Mobility विकत घेतली आणि जगातील ३ क्रमांकाची स्मार्टफोन बनवणारी कंपनी बनली. गुगल ला मोटोरोलाच्या फोन पेक्षा त्यांच्या फोन संबंधी विवध पेटंट्स मध्ये रस होता आणि ती स्वतःकडे ठेवुनच त्यांनी लेनोव्हाला विकली.
मी ही कंपनी चायनीज असुन देखील तिचा मोबाईल वापरतोय कारण, हा फोन हिंदूस्थानातच बनवला जातो. जसा मोटोरोला फोन आधी होता त्याच स्वरुपात तो आजही विकला जातोय आणि यात मोटोरोलाचे नाममात्र अॅप्लिकेशन असुन इतर कोणतेही चायनीज अॅप्स यात प्रिइंस्टॉल येत नाहीत.यात जाहिराती येत नाही आणि यात डेटा प्रोटेक्ट करणारी बिझनेस ग्रेड सिक्युरिटी दिलेली आहे.तसेच अँड्रॉइडचे प्युअर व्हर्जन वापरण्याचा जो आनंद आणि समाधान असते ते यात मिळते तसेच पुढील किमान २ वर्षांसाठी ओए अपग्रेड [ बहुतेक २] आणि स्किक्युरिटी अपडेट्स पुरवण्याचे कंपनीने त्यावेळी जाहिर केले होते. यामुळे काळ जाईल तसा फोन अधिक प्रगत आणि अधिक वेगवान होइल. आधीही मोटोरोला वापरण्याचा अनुभव असल्याने मला माझे नोकिया प्रेम आवरुन ते मोटोवर न्यावे लागले आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Subah Subah Jab Khidki Khole... :- Yash (1996)
12 Jan 2022 - 7:55 am | जेम्स वांड
आजकाल तर सॅमसंग ते रेडमीची डबडी पण भारतातच तयार होतात, रेडमीच्या डब्यांवर तर छापील असते मेक इन इंडिया/ मेड इन इंडिया वगैरे, तो विषयच बाद आहे, पण
फॉर द लव ऑफ स्टॉक अँड्रॉइड मला तुमचा रिव्यु आवडला, प्युअर व्हॅनिला वापरणे एक नशा आहे च्यामारी, केवळ प्युअर अँड्रॉइडची मजा हवी म्हणून मी एकेकाळी नोकिया ५, नोकिया ७ प्लस हे वापरले आहेत, कार्ल झाईस लेन्सेस अन ऑप्टिकल झूम असलेली प्रकरणे ती, पण त्यांच्यात बेटा एकच दोष ते म्हणजे त्यांचे चार्जिंग पोर्ट्स लवकर ढिले होत मग मात्र कागदाचे पृष्ठाचे तुकडे वगैरे लावून चार्ज करण्याची चिंधीगिरी पण करावी लागली होती.
आता तुमचा रिव्यु पाहून मोटो पहावा वाटतोय.
12 Jan 2022 - 10:17 am | सुबोध खरे
माझ्याकडे वन प्लस फाईव्ह टी आहे ज्याची ऑक्सिजन ओ एस हि जवळ जवळ प्युअर अँड्रॉइड आहे.
नव्या वन प्लस मध्ये आता ओपो ची कलर ओ एस येऊ लागली आहे. त्याबद्दल लोकांना समाधान नाही.
हा फोन गेली चार वर्षे वापरात आहे. एकदाही एकही दिवस बंद झाला नाही किंवा कोणताही त्रास नाही.
६४ जी बी हार्ड डिस्क आणि ६ जीबी रॅम आहे त्यामुळे लोण्यासारख्या मुलायम चालतो आहे.
चालतो आहे तोवर चालवणार आहे उगाच खर्च करून मिळणार काही नाही.
12 Jan 2022 - 10:38 am | जेम्स वांड
चालतोय तोवर चालवायचा, उगाच खर्च करत बसलो तर टेक्नॉलॉजीच्या पेसमध्ये राहायच्या नादात माणूस भिकेला लागायचं एखादवेळी.
बाकी जवळजवळ स्टॉक व्हॅनिला आणि प्युअर अँड्रॉइड स्टॉक व्हॅनिला ह्यात मजबूत अंतर असतेच हा अनुभव, उगाच नाहीत गूगलचे पिक्सेल भाव खाऊन जात.
12 Jan 2022 - 1:31 pm | सॅगी
तुमच्या बाकी प्रतिसादाशी सहमत आहे, मी आता वनप्लस ६टी वापरतोय गेली ३ वर्षे, बा़की सर्व ठीक चालले आहे पण बॅटरी बॅकअप आता बर्यापैकी कमी झाला आहे.
तेवढे एक सोडले तर फोन एकदम मक्खन चालतोय..
12 Jan 2022 - 7:32 pm | मदनबाण
आजकाल तर सॅमसंग ते रेडमीची डबडी पण भारतातच तयार होतात, रेडमीच्या डब्यांवर तर छापील असते मेक इन इंडिया/ मेड इन इंडिया वगैरे, तो विषयच बाद आहे, पण
हो हे खरंय... मोटो चायनिज कंपनी असली तरी इतर चायनिज फोन मध्ये जो चावटपणा असतो तो मोटोत तरी अजिबात पहायला मिळत नाही, देशात बनवला जातो हे आपल्या मनाचं समाधान [ कारण कंपनी शेवटी चायनीज ]
मी एकेकाळी नोकिया ५, नोकिया ७ प्लस हे वापरले आहेत
मी नोकिया ७.१ आणि ८.१ वापरला आहे, वडिलांचा जुना मोटो त्यांना वाचण्यास सहजता देत नव्हता म्हणुन मग मी माझा ८.१ त्यांना देउन मी मोटोवर गेलो.
नोकियाला अजुन मिडरेंज फोन मध्ये लोकांना काय अपेक्षित आहे तेच कळत नाही असे माझे व्यक्तिगत मत आहे. नोकियावाले अजुनही मिडरेंज फोन मध्ये eMMC 5.1 स्टोरेज टाईप देतात ! कुठल्या जमान्यात ही कंपनी आहे ते कळतच नाही. मोटोच्या फोन मध्ये किमान त्यांनी UFS 2.2 दिले आहे हे पाहुनच मग मी फोनचे बाकी फिचर्स पाहिले.
स्टोअरेज, डिस्प्ले आणि बॅटरी हे ३ मुख्य गुण मला हवे तसे मिळाले म्हणुन मोटोवर स्वीच झालो.
बाजारात मिड रेंज मध्ये ज्या दोन फोन मध्ये विशेष स्पर्धा आहे त्यांचा एक व्हिडियो देउन ठेवतो.
Moto Edge 20 Fusion Vs OnePlus Nord CE
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मुस्कुराहट की बनावट में छुपाए हमने गम, दिखावट की हंसी से दुनिया के सामने खड़े हैं हम |
6 Jan 2022 - 9:24 am | श्रीरंग_जोशी
प्रतिसादासाठी धन्यवाद. मदनबाण. फोन या विषयावर लेख लिहिताना तुमच्या तुमच्या लुमियासाठी { Microsoft Nokia Lumia } या धाग्याचे स्मरण झाले होते. काही वर्षांपूर्वी तुम्ही विंडोज फोनचे चाहते होते असे दिसते.
यावरुन आठवले - चार वर्षांपूर्वी भारतात आलो होतो तेव्हा आमच्या घरी चार कुटूंब सदस्य चार वेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर चालणारे फोन वापरत होते. अॅन्ड्रॉइड, ब्लॅकबेरी, आयफोन अन विंडोज फोन. फोन रिव्ह्यु करणारे अन अॅप डेव्हलप करणारे सोडल्यास एकाच कुटूंबात असे घडण्याची शक्यता फारच दुर्मिळ असावी :-) .
काळीबेरी उल्लेखावरुन मिपाकर रेवतीतैंचे ब्लॅकबेरीसाठी करवंदी अन आयफोन्ससाठी सफरचंदी हे उल्लेख आठवले :-).
6 Jan 2022 - 8:45 pm | मदनबाण
काही वर्षांपूर्वी तुम्ही विंडोज फोनचे चाहते होते असे दिसते.
हो, त्यावेळी उपलब्ध असलेले अँड्रॉइडचे व्हर्जन वापरण्यास आकर्षक वाटेनासे झाले होते आनि विंडोजे ओएस बद्धल बरीच हवा झाली होती. फोन देखील अगदी स्लिम आणि आकर्षक होता तेव्हा त्या टेक्नॉलॉजी आणि ओएसला ट्राय मारण्यासाठी स्विच झालो होतो...पण विंडोज टिकाव धरु शकला नाही आणि अँड्रॉइडच्या पुढील ओएस च्या सुधारित आवृत्त्या येत गेल्या मग काय ! बॅक टू पॅव्हेलियन. :)
मिपाकर रेवतीतैंचे ब्लॅकबेरीसाठी करवंदी अन आयफोन्ससाठी सफरचंदी हे उल्लेख आठवले
हा.हा.हा... आज्जे आणि तिच्या पाशवी शक्तीधारी मैत्रीणी मिपा लोकातुन अंतरधान पावल्या आहेत असे दिसते ! काय झाले कोणास ठावूक ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Subah Subah Jab Khidki Khole... :- Yash (1996)
6 Jan 2022 - 10:04 am | श्रीरंग_जोशी
तुम्ही दिलेला Springboard चा माहितीपट नुकताच पाहिला. खूप आवडला. ब्लॅकबेरी १० मधले जेस्चर कंट्रोल ९-१० वर्षांपूर्वी खूप नाविन्यपूर्ण असले तरी Palm WebOS वाल्यांनी तो प्रकार पूर्वीच उपलब्ध करुन दाखवला होता. आयफोन (अन बहुधा अॅन्ड्रॉइडला) जेस्चर कंट्रोल्स आणण्यासाठी २०१७ साल उजाडावे लागले.
कुणाला लहान पिटुकला फोन वापरायचा असल्यास Palm Phone 2 हा ३.३ इंची स्क्रीनवाला फोन उपलब्ध आहे.
5 Jan 2022 - 7:32 pm | सुबोध खरे
२००६ ते २००९ या काळात या काळात कॉर्पोरेट क्षेत्रात ( पवई आणि बीकेसी) काम करत असताना बरेच हुच्चभ्रू लोक हा वापरताना दिसत.
"आपण कोणी तरी मोठे आहोत' हे दाखवण्यासाठी कॉर्पोरेट हॉंचो लोकांमध्ये हे काळं बेरं वापरणं (आणि ते हातात बाळगणं) सक्तीचं असल्यासारखं होतं.
आपण २४ x ७ काम करतो हे लोकांना दाखवणे (कदाचित तेवढे काम करतही असतील/ निदान उपलब्ध तरी असतील) हे स्टाईल स्टेटमेंट असावं.
माझ्या सारखया डॉक्टरला सुस्पष्ट आवाज ऐकू येणारा/पलीकडे पोचवणारा नोकिया ३३०० जास्त महत्त्वाचा वाटत होता. कदाचित आमच्या रुग्णालयाने तो फुकट दिला होता मग आपण कशाला पैसे फुकट घालवा (आणि रुपये १००० पर्यंत बिल रुग्णालय भरत असे) म्हणूनही असेल.
सुरक्षितता ज्यांना फार महत्त्वाची असेल त्यांना ठीक आहे.
पण चार पैसे खिशात आहेत म्हणून काळं बेरं "शो ऑफ" करणारे लोकच जास्त होते.
6 Jan 2022 - 1:46 am | विंजिनेर
मस्त होता ब्लॅकबेरी आणि वापरायला ही क्युट वाटायचा मात्र इमेलच्या न थांबणार्या ओघामुळे रात्री-बेरात्री अंधारात लुकलुकणारा तो लाल दिवा बघून मी अस्वस्थ होत असे झोपमोडसुद्धा ह्वायची - जणू काही लोकं इमेल्स (त्यांच्या दिवसा) पाठवतायेत आणि मी मात्र त्या इमेल्स न वाचता इथे झोपा काढतोय :)
नंतर आयफोन आला आणि मग मी सुखाने पुनश्च डाराडूर झोपू लागलो :)
6 Jan 2022 - 3:06 am | कंजूस
मोटो g51
https://youtu.be/ipBNpq8vwg8
किंवा
Moto g31
6 Jan 2022 - 11:09 am | बापूसाहेब
6.8 inch स्क्रीन खूप मोठी वाटते. या कारणामुळे G६० घेतलेला कॅन्सल केला.
6 Jan 2022 - 12:12 pm | कंजूस
फोन लांबडा करतात हातात पकडता यावा म्हणून. पण खिशात राहात नाही. Blackberry phones रुंद होते. पीडीएफसाठी मोठा tab च लागेल. पण tab मध्ये काही apps येत नाही म्हणतात.
6 Jan 2022 - 8:58 pm | बोलघेवडा
आयफोन मध्ये काय विशेष आहे आणि तो एवढा महाग का असतो हे अजूनही कळलेलं नाही.
6 Jan 2022 - 9:41 pm | कंजूस
ती हुआवेनी काढली होती.
11 Jan 2022 - 10:48 am | योगी९००
फार छान लेख... एकेकाळी गेमिंगमध्ये काम करताना ब्लॅकबेरीवर गेम पोर्ट करताना झालेले कष्ट आठवले. पुर्वीच्या काळी कॉर्पोरेट जगतात ब्लॅकबेरीचा वापर जास्त व्हायचा याचे अजुन एक कारण म्हणजे या फोनवरील by default email client जो होता तो कंपनीच्या इमेल सर्व्हीसला सहज connect व्हायचा. तसेच किबोर्डमुळे इमेल वापरणे पण सोपे व्हायचे.
पण मला सर्वात आवडलेला फोन म्हणजे नोकियाचा N९००. माझा मिपावरील user-id पण यावरूनच प्रेरीत आहे. हा फोन अजूनही माझ्याकडे आहे. यात असे बरेच features होते की ते आयफोन किंवा अॅन्ड्रॉईडवर फार उशिरा आले. नोकिया त्यांच्या चांगल्या फोनचे मार्केटींग व्यवस्थित करू शकली नाही हेच खरे.
11 Jan 2022 - 1:15 pm | तुषार काळभोर
मी हा फोन २०१० ते २०१४ असा साडेपाच वर्षे वापरला. आजतागायत इतका उत्कृष्ट फोन मी पाहिला नाही.
६०० मेगाहर्ट्झचा कॉर्टेक्स प्रोसेसर, २५६ एमबी रॅम, बत्तीस जीबी स्टोरेज, मीमो५ ही फुल्ल लिनक्स ओएस, पाच (खर्या) मेगा पिक्सेलचा कार्ल झेस कॅमेरा.
फुल्ल क्वेर्टी कीबोर्ड (अगदी कंट्रोल-सी, एक्स, व्ही, एस, ए या शॉर्टकटसह!), लिनक्सप्रमाणे अॅप्स डाउनलोड करायला ४-५ वेगवेगळ्या रिपॉझिटरीज, कमांड प्रॉम्प्ट.
हा फोन एक प्रॉपर मोबाईल पीसी होता.
अजूनही मेलेल्या अवस्थेत मी जपून ठेवलाय.
तो मेल्यावर मग दोन वर्षे लुमिया वापरला.
त्यानंतर अॅन्ड्रॉइडवर आलो, पण सुरुवातीपासून स्टॉक/निअर-स्टॉक फोनच वापरलेत.
11 Jan 2022 - 2:18 pm | कंजूस
मला ते सिंबिअन ओएस 40,60 सुद्धा परवडत नव्हते तर एन ९०० दूरच. पण त्या सर्व नोकिआ फोन्सबद्दल वाचत होतो.
आताची नोकिया वेगळी आहे. लायसन फी देऊन दुसरी एक कंपनी फोन बनवते. पम मजा गेलीच.
12 Jan 2022 - 8:01 am | जेम्स वांड
नोकिया फिनलंडमधील कंपनी बंद झाली मोबाईल व्यवसायातून तेव्हा तिथेच काम करणारे काही इंजिनियर्स, ग्राफिक डिझायनर्स अन मार्केटिंग मॅनेजर्सने एकत्र येऊन एचएमडी ग्लोबल ही कंपनी स्थापन करून नोकिया कंपनीचे नाव अन लोगो वापरायचे हक्क मिळवले आणि कंपनी सुरू केली, स्टॉक अँड्रॉइड उत्तम असतात त्यांचे फक्त बॅटरी कॅपसिटी अन लॅग्ज मध्ये काम करायला हवे आहे भरपूर.
11 Jan 2022 - 2:12 pm | कंजूस
Micromax,
Carbon,
Intex,
..
..
..
12 Jan 2022 - 8:06 am | जेम्स वांड
सुरू झाली ती सनातनी नारळ श्रीफळ असणाऱ्या नोकिया ३३१० पासून, त्यावेळी एसबीआय मध्ये असणाऱ्या एका मित्राच्या वडिलांना बँकेने ब्लॅकबेरी दिला होता (नाव आठवत नाही साल अंदाजे २००५ अन QWERTY कीपॅड होते त्या फोनला) , तो आवडल्यामुळे पण न परवडल्यामुळे नंतर तसलाच कीबोर्ड असणारा सॅमसंग गॅलेक्सी स्टार घेतला होता. तो सोडून नंतर मोटो जी फर्स्ट जनरेशन, मोटो नंतर मात्र नोकिया ७ प्लस घेऊन वापरला , तो आमच्या दिवट्यानं पाण्यात फेकला म्हणून आता जुलमाचा रामराम केल्यागत सॅमसंग ए२१एस वापरतोय
12 Jan 2022 - 11:44 am | अनिंद्य
We are not dead - BlackBerry
आत्ताच हे वाचले !
https://www.moneycontrol.com/news/trends/blackberry-5g-we-are-not-dead-b...
12 Jan 2022 - 1:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उत्तम लेख आणि आठवणी. आपल्याला कधीच आवडला नाही ब्लॅकबेरी. पण ते उच्च लोकांची पसंत वगैरे असे वाटायचे.
आयफोनचंही तसं, माझा रेग्युलर अँड्रॉइडवाला एक मित्र दोनेक महिण्यात आयफोनला कंटाळून बाहेर पडला.
अजिबात युजर फ्रेंडली वाटत नाही. लोक लै भारी सेक्युरीटी वगैरे म्हणतात. च्यायला, काय आहे फोन मधे सेक्युरीटी वगैरे.
-दिलीप बिरुटे