कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप -१

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in भटकंती
22 Dec 2021 - 10:50 am

मारुतीच्या शेपटी सारखा वाढतच चाललेल्या लॉकडाऊन कालावधीचा फारच कंटाळा आलेला असतानाच्या काळात मिपावर दुर्गविहारी ह्यांची गोव्यातल्या किल्ल्यां बद्दलची सुंदर माहितीपुर्ण लेखमालिका आणि गोरगावलेकर ताईंची कोकण व तळ कोकणातल्या भटकंतीची मस्त मस्त प्रवासवर्णने वाचून असे काही टेम्पटेशन आले होते की ह्या आधीच्या कोकण-गोवा भेटींमध्ये तिथल्या अनेक बघायच्या राहिलेल्या गोष्टी पहाण्यासाठी प्रवासावरचे निर्बंध थोडेफार शिथिल झाल्यावर त्वरीत ह्या ठिकाणांना भेट देण्यापासुन स्वतःला रोखू शकलो नाही.

COVID-19 मुळे लागू करण्यात आलेले अनेक निर्बंध स्थानिक परिस्थिती नुसार काही ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात कायम असल्यामुळे तर काही अन्य कारणांमुळे ठरवलेल्यापैकी सगळीच ठिकाणे पाहता आली नसली तरी काही किल्ले, मंदिरे आणि समुद्रकिनारे अशा याआधी न बघीतलेल्या अनेक गोष्टी ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्याचा शेवटचा आठवडा आणि फेब्रुवारीच्या पहिल्या दोन आठवड्यात केलेल्या कोकण, तळ-कोकण आणि गोवा सफरीत बघता आल्या.

बायकोचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरु असले तरी असे अचानक पंधरा-वीस दिवसांसाठी बाहेर पडणे तिला शक्य नव्हते मग एकट्यासाठी कार घेऊन जाण्याची काहीच आवश्यकता नसल्याने माझ्या ‘पल्सर १५०’ ह्या बाईक वरून ही सोलो रोड ट्रिप करण्याचा निर्णय घेतला.

कोकण, तळ कोकण आणि गोव्यातल्या अनेक भागांत पर्यटन तसेच इतरही काही कारणांसाठी कित्येकदा जाणे झाले असले तरी किनारी मार्गाने मात्र कधी प्रवास घडला नव्हता त्यामुळे ज्या ठिकाणचे रस्ते सुस्थीतीत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली तेवढा प्रवास किनारी मार्गाने करायचे ठरवले आणि त्या अनुषंगाने गुगल मॅप्सच्या सहाय्याने प्रवासाचे सोयीस्कर मार्ग, एकुण अंतर ह्याचा अभ्यास करून मुक्कामाची ठिकाणे निश्चित करायला घेतली.

थोड्या अभ्यासांती खालील प्रमाणे
ट्रिपचा कच्चा आराखडा तयार झाला.

जातानाच्या प्रवासात
पेण - भरणे नाका - रत्नागिरी - कुडाळ ह्या प्रत्येक ठिकाणी १ रात्र मुक्काम.

पाचव्या दिवशी गोव्यात पोहोचल्यावर ४ ते ५ रात्री करमळीला मुक्काम करुन
गोव्यातील शक्य तेवढे किल्ले पाहुन झाल्यावर कुडाळ - रत्नागिरी - भरणे नाका असा उलट क्रमाने परतीचा प्रवास करत ह्या तिन्ही ठिकाणी आवश्यकतेनुसार प्रत्येकी ४ ते ५ रात्री मुक्काम.

करमळी, कुडाळ, रत्नागिरी आणि भरणे नाका ह्या ठिकाणांना केंद्रस्थानी ठेउन त्यांच्या आसपासच्या परिसरातील पर्यटन स्थळे पाहण्यासाठी जाऊन येऊन होणाऱ्या सुमारे दोन हजार किलोमीटर्सच्या ह्या प्रवासासाठी वीस ते पंचवीस दिवस लागतील ह्याचा अंदाज आला. अर्थात एवढे दिवस लागण्यामागे दोन कारणे होती.

पहिले महत्त्वाचे कारण म्हणजे आता काही त्रास होत नसला तरी आधी केलेल्या अति बाईकिंग मुळे मणक्यातली गॅप कमी होऊन उद्भवलेल्या नर्व्ह कॉम्प्रेशनच्या समस्येमुळे असह्य पाठदुखीने बेजार होऊन गेल्या वर्षी हॉस्पिटलमध्ये ॲडमीट व्हावे लागले होते.

तिथून सुटका होताना मिळालेला (पण माझ्यासाठी प्रत्यक्ष आचरणात आणण्यास अशक्य कोटीतला असा 😀) 'ह्यापुढे कधीही बाईक न चालवण्याचा' डॉक्टरी सल्ला खुंटीला टांगून ही सफर बाईकवरून करण्याचा मांडलेला प्रस्ताव घरच्या मंडळींकडून बिनविरोध पास करून घेण्यासाठी सलग मोठ्या अंतराचे टप्पे गाठण्याचे टाळुन एखाद दुसरा अपवाद वगळता दिवसभरातला प्रवास जास्तीत जास्त शंभर ते सव्वाशे की.मी. एवढा मर्यादित राहील अशा प्रकारे दौऱ्याची एैसपैस आखणी केली होती.

आणि दुसरे कारण म्हणजे पुर्वीपासुनच पर्यटन करताना घाई-गडबड, अनावश्यक दगदग टाळुन शरीराला व पर्यायाने मनाला कष्ट / त्रास होऊ न देता निवांतपणे आणि प्रसन्न चित्ताने भटकंती करत पर्यटन स्थळांचा आनंद घेणे पसंत असल्याने रोज प्रवास न करता अधेमधे विश्रांती घेण्यासाठी काही मोकळे दिवसही त्यात धरले होते.

सर्व प्रवासासाठी ठरवलेल्या मार्गांचे आणि पर्यायी मार्गांचे गुगल मॅप्सवर साठवून ठेवलेले नकाशे आणि मुक्कामासाठी निश्चित केलेली ठिकाणे ह्या दोन गोष्टी सोडल्या तर कुठलेही नियोजन नसलेली पण त्यामुळेच अगदी लवचिक, स्वछंद, उनाड अशी ही भटकंती होती.

एक दिवसही कुठल्या हॉटेलमध्ये मुक्काम करायचा नसल्याने अमुक तारखेला तमुक ठिकाणच्या हॉटेलमध्ये बुकिंग केले आहे म्हणून त्या दिवशी तिथे पोचलेच पाहिजे असेही काही बंधन नव्हते त्यामुळे आणखीन दोन-चार दिवस वाढले किंवा कमी झाले तरी काही फरक पडत नव्हता.

ऑफिसची कामे मार्गी लावल्यानंतर २० जानेवारी २०२१ रोजी घरी जेवण झाल्यावर दुपारी तीनच्या सुमारास मी सहलीला सुरुवात केली आणि प्रवासातील पहिला टप्पा गाठण्यासाठी पेणच्या दिशेने निघालो.

पळस्पे फाट्यावर चहा पिण्यासाठी एक दहा-पंधरा मिनिटांचा थांबा घेतला आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात करून सव्वा पाचच्या सुमारास ७५ की.मी. चा प्रवास पूर्ण करून पेणच्या जवळ असलेल्या आमच्या विकएंड होमवर पोचलो.

घरी जाऊन थोडावेळ आराम केला आणि मग फ्रेश होऊन एका पूर्व नियोजित कार्यक्रमाला जाण्यासाठी साडे सहाला खाली उतरलो.

पहिल्या लॉकडाऊनचा संपूर्ण कालावधी मी ह्या ठिकाणी व्यतीत केलेला असल्याने आता इथला मित्रपरिवार चांगलाच विस्तारला आहे. मी आज इकडे मुक्कामाला येणार आहे हे माहित असल्याने आमच्या घरापासून चालत पाच सात मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका मित्राच्या फार्म हाऊसवर संध्याकाळी सात वाजता आमची सहा जणांची मैफिल रंगणार होती तिथे जायला चालत निघालो.

माझ्या आधी दोन मेम्बर्स चिकन आणि ब्लेंडर्स प्राईडच्या २ बाटल्या घेऊन तिथे पोचले होते. आज काय विशेष विचारले तर म्हणे स्टार्टर म्हणुन कौलावर बनवलेला चिकन सुक्खा आणि नंतर जेवायला शाही बिर्याणी असा मेनू ठरवला आहे.

रायगड जिल्ह्यात फार्म हाऊसवर होणाऱ्या पार्टीज मध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी ह्या दोन महिन्यांमध्ये जणू काही अलिखित नियम असल्या प्रमाणे स्टार्टर म्हणुन बहुतेक वेळा 'पोपटी' लावली जाते.
मातीच्या मडक्या मध्ये तळाला आणी मधे भांबूर्डीचा पाला वालाच्या/पावट्याच्या शेंगा, बटाटे, अंडी आणि चिकन अशा गोष्टी भरल्यावर पुन्हा भांबूर्डीचा पाला भरून मडक्याचे तोंड बंद केले जाते. मग ते मडके उपडे ठेऊन त्याच्या भोवती लाकडे आणी भरपूर पेंढ्याचा ढीग रचून जाळ पेटवला जातो. त्यात घातलेल्या वालाच्या/पावट्याच्या शेंगा, बटाटे, अंडी आणि चिकन अशा गोष्टी भांबूर्डीच्या पाल्यातील पाण्याच्या अंशावर चांगल्या शिजतात आणि चवीलाही फार छान लागतात.

पोपटी बरेचदा खाल्ली आहे आणि आवडतेही, इतकेच नाही तर मला ती लावताही येते. पण आज ह्या मंडळींनी कौला वरचे चिकन ही काहीतरी नवीनच टूम काढली होती. निदान माझ्यासाठी तरी हा प्रकार नवीन होता.

फार्म हाऊसचा केअर टेकर आणि त्याची बायको हा पदार्थ बनवण्यासाठी चिकन मॅरीनेट करण्याच्या तयारीला लागले तोवर बाकीचे तीन मेम्बर्सही हजर झाले.

सगळ्यांच्या गळाभेटी झाल्यावर मग प्याले भरले गेले आणि गप्पा सुरू झाल्या.
ह्या पाच जुन्या मित्रांच्या ग्रूपमध्ये माझा प्रवेश गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात झाला असला तरी आम्हा सर्वांचे खुप घनिष्ट संबंध निर्माण झाले आहेत.

धमाल मस्तीच्या वातावरणात मीठ आणि चाट मसाला भुरभुरलेल्या काकडी, गाजर, टोमॅटो आणि बिटच्या चकत्या खात व्हिस्कीचा पहिला राउंड झाल्यावर एकाने ते कौलावरचे चिकन बनवायला घेण्याचे फर्मान सोडले.
केअर टेकरने त्यासाठी बाहेर काही दगड रचून चुल वगैरे मांडुन त्यावर दोन कौले ठेउन बाकी सगळी तयारी केलेली होतीच, फर्मान ऐकल्यावर त्याने जाळ पेटवला. मला तो प्रकार कसा बनवतात हे बघायची उत्सुकता होती त्यामुळे मीही बाहेर आलो.

कौलावरचे चिकन

1

2

बनवताना तेलाचा मुबलक वापर करावा लागत असला तरी हा पदार्थ त्यावर थोडे लिंबु पिळुन खाताना चवीला मात्र एकदम झकास लागत होता. सलाड आणि ह्या चिकन सुक्खा सोबत चौथा राउंड सुरू असताना साडे दहाच्या सुमारास आमच्या बरोबर असलेल्या मित्राच्या हॅाटेलचा कर्मचारी रिक्षाने शाही बिर्याणीचा टोप, रायता आणि पापड घेउन आला.

साडे अकरा वाजता जेवण झाल्यावर दोन गाड्यांतुन सर्व जण आपापल्या घरी जायला निघालो. अगदीच जवळ घर असल्याने पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देऊन मला सोडल्यावर बाकीची मंडळी पेणच्या दिशेने निघुन गेली.

उनाड भटकंतीच्या सलामीचा दिवस आणि गोव्याला जाण्यापुर्वीचा ‘वॅार्म अप’ छान झाला होता 😀

उद्याचा भरणे नाक्यापर्यंतचा प्रवास १४५ कि.मी. चा होता. सकाळी अकरा वाजेपर्यंत निघुन अगदी रमत गमत गेलो असतो तरी पाच वाजेपर्यंत पोचणे सहज शक्य असल्याने सकाळी लवकर उठण्याची गरज नव्हती.

पुढचा भाग :
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप -२

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

22 Dec 2021 - 11:03 am | कुमार१

मस्त सुरवात...
वाचतोय

टर्मीनेटर's picture

22 Dec 2021 - 11:44 am | टर्मीनेटर

धन्यवाद कुमार१ साहेब 🙏

मित्रहो's picture

22 Dec 2021 - 11:21 am | मित्रहो

डॉक्टरांनी बाइकवर जाऊ नको असे सांगितल्यावर १०० किमी सुद्धा बाइक चालवणे धाडसाचेचे होते.
कौलावरचे चिकन नवीन प्रकार आहे. याआधी ऐकला नव्हता.

टर्मीनेटर's picture

22 Dec 2021 - 11:47 am | टर्मीनेटर

धन्यवाद मित्रहो 🙏

जेम्स वांड's picture

22 Dec 2021 - 11:33 am | जेम्स वांड

ह्याला म्हणतात परफॉर्मन्स !!!!!

आत्ता खरड लिहिली अन पाच मिनिटांच्या आत प्रोजेक्ट डिलिव्हरी कंप्लीट ! काय पण उरक म्हणावा संजुभाऊंचा ! &#129315 &#129315 &#129315

नेहमीप्रमाणे उत्तम सुरुवात, पल्सर १५० म्हणजे लैच मोठं धाडस केले, एका जुन्या बायकरला दुसऱ्या जुन्या बायकरचा सल्ला द्यावे म्हणले तर आता बाईक बदला, नर्व्ह कॉम्प्रेशनला कमी त्रास होईल अशा हिशोबाने छानपैकी क्रूझर घ्या एक, मी तर फार भारीमध्ये न घुसता सरळ एक ऍव्हेंजर सजेस्ट करेन दादा. छानपैकी बकेट सिटिंग अरेंजमेंट आणि क्रुझिंगचे सुख, बायकिंग सोडू नका पण काळजी घ्या, छानपैकी लोवर बॅक एक्झरसाईज करा, योगाभ्यास केल्यास अजून फायदा मिळावा. मोटरसायकलिंग एक सालव्हेशन असते त्यात वेगळी मजा आहे.

बाकी, कौलावरचे चिकन आवडले. एकदम हैद्राबादी पत्थर का गोष्त आठवले, पातळ कापलेल्या मटणाच्या पट्ट्या किंवा चिकनचे तुकडे कडप्पा दगडाच्या पातळ आयताकृती तुकड्यांवर भाजलेले असतात ते अजूनच मस्त लागते, हैद्राबादी पत्थर गोष्तचे हे रायगड जिल्हा व्हर्जन आवडले आहे बरेच, नेक्स्ट टाईम हे करताना एक प्रयोग करा, चिकन मटन कौलावर शिजवताना जवळपास ८०% झाले की त्यावर सरळ (थोडी सावधानी बाळगून) एक क्वार्टर ओल्ड मोंक ओतावी शिंपडून, अल्कोहोल एकदम पेटतो (स्मोकी फ्लेवर) आणि बाष्पीभवन होऊन पण उडतो, मोंक मुळात व्हॅनिला नोट सिग्निफिकंट असणारे ड्रिंक आहे, त्यातील तो हलका व्हॅनिला फ्लेवर भाजत असलेल्या चिकन/ मटनमध्ये नीट इन्फ्युज होतो, भयंकर तुफान फरक पडतो चवीत, सोबत डीप म्हणून तिखट टाबेस्कॉ सॉस ठेवावा, मज्जानी लाईफ.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत

(एनफिल्डर फॉरेवर) वांडो

टर्मीनेटर's picture

22 Dec 2021 - 12:06 pm | टर्मीनेटर

आत्ता खरड लिहिली अन पाच मिनिटांच्या आत प्रोजेक्ट डिलिव्हरी कंप्लीट !

वांड भाऊ,
मी हा धागा प्रकाशित करत असताना त्याच वेळेस तुम्ही खरड लिहीत होतात हा योगायोग म्हणावा की टेलिपथीचा काही प्रकार असावा? 😀

असो, व्यायाम विषयक चांगले सल्ले, काही चांगल्या सूचना आणि प्रतिसादासाठी आभार!

माझी उंची बऱ्यापैकी असल्याने कमी उंचीच्या बाईक चालवताना मला अवघडल्या सारखे होते, पायात क्रॅम्पस येतात. तसेही जड गाड्या वापरायचीच सवय अंगवळणी पडली असल्याने ही पल्सर १५० त्यातल्यात्यात बरी वाटते. आधीची पल्सर २२० होती, गाडी दमदार होती, तिचे वजनही जास्ती होते, पण बायकोला मागे बसताना त्रास व्हायचा त्यामुळे ती बदलली! बघू पुढे मागे ही बदलताना अव्हेंजरचा विचार करता येईल.

धन्यवाद 🙏

कंजूस's picture

22 Dec 2021 - 11:35 am | कंजूस

एक वर्ष झालं हो त्या ट्रिपला. नवं टाका.

टर्मीनेटर's picture

22 Dec 2021 - 12:13 pm | टर्मीनेटर

काय हो कंजूस काका!
हे प्रवासवर्णन लिहावे असे तुम्हीच खरडीत सुचवले होते ना 😀
तेव्हा दुबईची रखडलेली मालिका आधी पूर्ण करतो मग हे लिहिण्याचा प्रयत्न करतो असे तुम्हाला सांगितले होते! विसरलात की काय? 😀

सौंदाळा's picture

22 Dec 2021 - 12:57 pm | सौंदाळा

मी पण सुचवले होते.
प्रतिसादात माझा उल्लेख नसल्यामुळे तुमचा निषेध :)
सफर मस्तच चालु झाली आहे. भरपूर भाग लिहायला (इन्क्लुडिंग जेवण वर्णने) आणि दणकून तुमच्या स्टाईलमधे फोटो टाकायला अजिबात कंजूसी करु नका.
पुभाप्र.

टर्मीनेटर's picture

23 Dec 2021 - 10:45 am | टर्मीनेटर

ओहोहो... सौंदाळा साहेब, प्रतिसादात तुमचा उल्लेख केला नाही त्याबद्दल माफी असावी. खरंतर सूचना तुमची होती आणि तिला कंजूस काकांनी अनुमोदन दिले होते!

भरपूर फोटो टाकण्याची खात्री देऊ शकतो पण खादाडी बद्दल कितपत लिहू शकीन त्याबद्दल साशंक आहे.
धन्यवाद 🙏

कंजूस's picture

22 Dec 2021 - 1:46 pm | कंजूस

आताच्या वर्ष अखेर वातावरणासाठी आणखी एक मिनी राईड करून वर्णन येऊ द्या. कित्येक जण बाहेर जायला न मिळाल्याने ट्रिप वर्णनावरच तहान भागवत आहेत.

प्रसाद गोडबोले's picture

22 Dec 2021 - 1:27 pm | प्रसाद गोडबोले

भारीच !

पुढील भागाच्या प्रतिक्शेत !

गोरगावलेकर's picture

22 Dec 2021 - 2:00 pm | गोरगावलेकर

लेखाच्या सुरुवातीलाच माझी आठवण काढल्याबद्दल धन्यवाद .
फार्म हाऊस, एखादे रिसॉर्ट किंवा गावी मळ्यात होणाऱ्या आमच्या ग्रुपमधील सदस्यांच्या मैफिली पहिल्या आहेत. अगदी परफेक्ट वर्णन.
मालिका जबरदस्त होणार यात शंका नाही.

@ मार्कस ऑरेलियस आणि गोरगावलेकर
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Dec 2021 - 2:58 pm | राजेंद्र मेहेंदळे

दमदार सुरुवात झालेली आहे. दोन वर्षे वर्क फ्रॉम होम मुळे कंटाळलेल्या मनाला असे लेख वाचुन जरा तरतरी येते.
आता फिरण्यावरती पुर्वीसारखी जाचक बंधने नाहीयेत, तरीही घरच्या सगळ्यांची वेळ जुळत नसल्याने आणि ऑफिसच्या कटकटींमुळे बाहेर पडणे होत नाही ते नाहीच.
पुढच्या भटकंतीला शुभेच्छा आणि पुभाप्र. येउद्या पटापट.

मस्त सुरुवात झाली एकदम. पहिला दिवस तर फारच झकास गेला तुमचा :)

पुढचे भाग पटापट येऊ द्यात.

अनिंद्य's picture

22 Dec 2021 - 4:01 pm | अनिंद्य

'गोवा मूड' सेट करणारा पहिला दिवस :-)

येउद्या वर्णनं - दुधाची तहान ताकाच्या वासावर भागवू आम्ही.

पु भा प्र

@ राजेंद्र मेहेंदळे, प्रचेतस आणि अनिंद्य
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

अथांग आकाश's picture

22 Dec 2021 - 6:21 pm | अथांग आकाश

झकास सुरूवात!
पार्टी पण दणदणीत झाली आहे!!
A

तर्कवादी's picture

22 Dec 2021 - 7:58 pm | तर्कवादी

पंधरा-वीस दिवसांच्या सोलो ट्रिपला घरातून परवानगी मिळवणे ही सर्वात मोठी गोष्ट :)
त्यानंतर कामातून सूटी घेणे ही दुसरी मोठी गोष्ट ..
मला वाटतंय व्हिटॅमिन (बी १२, डी) , कॅल्शियम यांच्या योग्य सप्लिमेंटने तुम्ही तुमच्या त्रासावर पुर्ण मात करु शकाल. अर्थात योग्य डॉक्टरचा सल्ला घ्या.

बाकी सोलो बाईक ट्रिप ही एक आनंददायी गोष्ट..त्यात तुम्हाला मुक्कामी मित्रमंडळी पण भेटलीत म्हणजे दुधात साखर दारुत बर्फ ...
मी नुकतीच तीन चर्षाच्या गॅपनंतर दोन दिवसांची (सरड्याची धाव..!!) सोलो बाईक ट्रिप केली.

टर्मीनेटर's picture

23 Dec 2021 - 11:11 am | टर्मीनेटर

@ तर्कवादी

टर्मीनेटर's picture

23 Dec 2021 - 11:10 am | टर्मीनेटर

व्हिटॅमिन (बी १२, डी) , कॅल्शियम यांच्या योग्य सप्लिमेंटने

बरोबर आहे, मला डिस्चार्ज मिळाला तेव्हा ह्या सप्लिमेंट घ्यायचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मी ३-४ महिने त्या गोळ्या घेतल्याही होत्या, पुढे मात्र दुसऱ्या डॉक्टरांनी त्या घेणे बंद करायचा सल्ला दिला आणि आहारात काही बदल करायला सांगितले.

मी नुकतीच तीन चर्षाच्या गॅपनंतर दोन दिवसांची (सरड्याची धाव..!!) सोलो बाईक ट्रिप केली.

माझीही ही ट्रिप तुमच्या प्रमाणे दोनच दिवस 'सोलो' राहिली, पुढच्या टप्प्यापासून अनपेक्षित पणे एक साथीदार मिळाल्याने तिचे स्वरूप 'बाईक ट्रिप' असे झाले 😀

Nitin Palkar's picture

22 Dec 2021 - 8:18 pm | Nitin Palkar

तुमच्या हातखंडा शैलीत सुरेख वर्णन आणि प्र चि. सोलो राईडला शुभेच्छा आणि पुढिल लेखाच्या प्रतीक्षेत....

टर्मीनेटर's picture

23 Dec 2021 - 10:55 am | टर्मीनेटर

@ अथांग आकाश आणि Nitin Palkar
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

23 Dec 2021 - 4:56 pm | ॲबसेंट माइंडेड ...

छान सुरूवात.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

टर्मीनेटर's picture

24 Dec 2021 - 10:12 am | टर्मीनेटर

धन्यवाद ॲबसेंट माइंडेड ...

अभ्या..'s picture

23 Dec 2021 - 4:58 pm | अभ्या..

जोरात है बाबा कारभार.
लगे रहो लेकीन पीठ को संभालकर.
समदु:खी हावोत आपण त्याबबतीत. :(

टर्मीनेटर's picture

24 Dec 2021 - 10:21 am | टर्मीनेटर

अभ्या.. मेरे दोस्त हैं किधर आज कल तुम? दिखताईच नैये...

समदु:खी हावोत आपण त्याबबतीत. :(

हो ना भावा... :(

तुषार काळभोर's picture

23 Dec 2021 - 8:18 pm | तुषार काळभोर

एवढा वेळ बाईकरोडट्रीप साठी काढणं हेच लई मोठं अचिव्हमेंट आहे!

पहिल्या दिवशी एवढा कल्ला! पुढील वीस दिवस झक्कास असणार यात शंका नाही!!

टर्मीनेटर's picture

24 Dec 2021 - 10:38 am | टर्मीनेटर

वीस दिवस!!

अक्खा २०२० भटकंतीच्या दृष्टीने भाकड गेल्यावर ती कसर २०२१ मध्ये भरून काढायला नको का पैलवान भाऊ 😀

श्रीगणेशा's picture

23 Dec 2021 - 11:40 pm | श्रीगणेशा

भारी एकदम!
एवढा मोठा प्रवास आणि एकट्यानेच? मुक्कामाच्या ठिकाणी समजू शकतो की नवीन ओळख, गप्पा-गोष्टी होतात, वगैरे. पण शंभर दीडशे किमी बाईकवरचा प्रवास, तेही सलग काही दिवस, कंटाळा न येता कसा करता येतो याविषयी जाणण्याची उत्सुकता आहे.

टर्मीनेटर's picture

24 Dec 2021 - 10:36 am | टर्मीनेटर

@ श्रीगणेशा

एवढा मोठा प्रवास आणि एकट्यानेच?

एकट्यानेच करायचा असे ठरवून निघालो तर होतो पण पुढच्या टप्प्यात साथीदार लाभल्याने मग तो प्रवास दुकट्याने झाला... पुढे कार्यक्रमातही अनेक बदल होत गेले.
प्रतिसादासाठी आभार 🙏

जेम्स वांड's picture

24 Dec 2021 - 12:27 pm | जेम्स वांड

तुम्ही ना पिक्चरांसाठी टिझर/ ट्रेलर एडिट करण्याचा जोडधंदा पण सूरु करा कसे लवकर!

उत्सुकता ताणणे कोई सिखे इनसे, लवकर पार्ट २ टाका अन सिरीज विनाथांबा आशियाड बस सारखी सोडा बिनधास्त आता दादर पुणे टाईप.

टर्मीनेटर's picture

24 Dec 2021 - 12:59 pm | टर्मीनेटर

😀 😀 😀

घेतांव आज लिव्हायला.

रंगीला रतन's picture

24 Dec 2021 - 11:13 pm | रंगीला रतन

लई भारी सूरवात…. और आंदो.

सिरुसेरि's picture

3 Jan 2022 - 2:39 pm | सिरुसेरि

मस्त भ्रमंती .

एक_वात्रट's picture

19 Jan 2022 - 11:50 am | एक_वात्रट

कित्येक जण बाहेर जायला न मिळाल्याने ट्रिप वर्णनावरच तहान भागवत आहेत.

दोन वर्षे वर्क फ्रॉम होम मुळे कंटाळलेल्या मनाला असे लेख वाचुन जरा तरतरी येते.

ह्या दोन्ही प्रतिसादांशी अक्षरशः १००% सहमत. टर्मीनेटर, तुमचे प्रवासवर्णन ही आमच्यासाठी खरंच एक पर्वणी असते. तुम्ही प्रवासात दिसलेल्या ठिकाणांची सविस्तर वर्णने तर करताच शिवाय तुम्हाला प्रवासात भेटलेल्या लोकांचे, तिथल्या सामाजिक, राजकीय परिस्थितीचे एक चित्रही आमच्यासमोर उभे करता.

सुरुवात तर दमदार झाली आहे, दुसरा तिसरा भाग आलेला दिसतो आहे, आता चौथ्या भागाच्या प्रतिक्षेत.

टर्मीनेटर's picture

25 Jan 2022 - 11:04 am | टर्मीनेटर

रंगीला रतन, सिरुसेरी & एक_वात्रट
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏