हे डोंगरकड्या

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जे न देखे रवी...
23 Nov 2021 - 10:14 pm

हे डोंगरकड्या
---------------------------------------------
हे डोंगरकड्या ,
गड्या , काय डौलात उभा आहेस तू !
छाती पुढे काढून

हे डोंगरकड्या ,
तुझ्या उन्नत छातीवर
बरसत असतील मेघ
अन त्यांच्या मोतियांची माळही
रुळत असेल तिच्यावर
अन तूही ते मोती
अलगद सोडत असशील
तुझ्या पायागती
भरभरून

हे डोंगरकड्या ,
हिवाळ्यात धुक्याची शाल लपेटत असशील
तुझ्या त्या छातीभोवती
तरुणीच्या धवल अवगुंठनासारखी
अन गार वारंही गपगुमान
बाजूबाजूने वाहून निघून जात असेल
तुझ्या पोलादी छातीला नमून

हे डोंगरकड्या ,
ग्रीष्मात तुझ्या कड्यावरचं गवत
पिवळं - पिवळं पडत असेल
एखाद्या बुजुर्गाच्या छातीवरचे
केस न केस पांढरे झाल्यासारखं
अनुभवी अन पोक्त बुजूर्गच तूही
खरंतर आतून

पण गड्या ,
आजकाल जमाना बदललाय
किरकोळ माणसंही छाती फुगवून चालतात
त्यांच्या छातीच्या पिंजऱ्यात हृदय नाही रे
तर फत्तर भरले आहेत
ज्यांना पाझर फुटत नाही काळजातून

ते कधी तुझी उन्नत छाती फोडतील
माहिती नाही
कधी तुला सपाट करतील
जमीनदोस्त करतील
वणवा लावतील तुझ्यावरच्या फुलोऱ्याला
माहिती नाही
घेतील सातबारा बदलून
अरे , गायबही करून टाकतील
एखाद्यावेळी नकाशातून

आमच्याही छातीत धडधडतं रे
पण मजेत रहा
त्यांची नजर तुझ्यावर पडेपर्यंत
तगून रहा
यांचं पाप यांनाच फेडायचं आहे - मागून !
हे डोंगरकड्या …
---------------------------------------------------------

हे ठिकाण

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

24 Nov 2021 - 12:19 am | चित्रगुप्त

----- पण कुणास ठाऊक,
पडेल तुझ्या प्रेमात एकादा वेडा,
झपाटलेला कलावंत...
आणून छिन्नी हातोडी
करेल करामत रात्रंदिवस ...
घडवेल तुझ्यातून एक अद्वितीय मूर्ती
दशदिशात पसरेल मग तुझी कीर्ती..
गगन ठेंगणं होईल तुला
जीव ओवाळून टाकतील रसिक,
कलासक्त जगभरातले...
कुणास ठाऊक...

.

कर्नलतपस्वी's picture

24 Nov 2021 - 11:05 am | कर्नलतपस्वी

आवडले, सगळीकडे तेच चालू आहे. एखादाच वेरुळ अजिंठा, भुलेश्वर सारखा नशीबवान. बाकी सगळे लवासा अँम्बी व्हॅली.

कर्नलतपस्वी's picture

24 Nov 2021 - 11:05 am | कर्नलतपस्वी

आवडले, सगळीकडे तेच चालू आहे. एखादाच वेरुळ अजिंठा, भुलेश्वर सारखा नशीबवान. बाकी सगळे लवासा अँम्बी व्हॅली.

बिपीन सुरेश सांगळे's picture

8 Jan 2022 - 1:23 pm | बिपीन सुरेश सांगळे

कर्नलजी
चित्रगुप्त
खूप आभारी आहे