body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}
.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}
.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}
चित्रकार विशाल कामत एका रेल्वे स्टेशनवर गाडीची वाट पाहत उभे होते. त्यांच्याबरोबर त्यांचे दोघे मित्रसुद्धा उभे होते. प्रथम दर्जाचा डबा कुठे येणार याची त्यांना हमालाने कल्पना दिली होती. त्यांच्याकडे दोन-तीन मोठ्या सूटकेसेस होत्या. थोड्याच वेळात गाडी आली. या स्टेशनवर ती फारच थोडा वेळ थांबणार होती. त्यांना जरा गडबड करावी लागणार होती. त्यात त्यांचा उजवा गुडघा आज जरा जास्त दुखत होता. आज प्रथम दर्जाचा डबा जरा मागेच थांबला. त्यांचा हमाल आणि त्यांचे दोन्ही मित्र सामान घेऊन डब्याकडे धावले. विशाल आपली काठी टेकत शक्य तेवढ्या गडबडीने डब्याकडे निघाले. त्यांचे सामान डब्यात चढवले गेले. मित्र गाडीत चढले, तेवढ्यात गाडी सुरू झाली. विशालसुद्धा डब्यापर्यंत पोहोचले. त्यांच्या मित्रांनी त्यांना आत घेण्यासाठी हात पुढे केला, पण विशाल जागच्या जागी जणू खिळून उभे राहिले. त्यांना आपला पायसुद्धा उचलता येईना. कुणीतरी मणामणाच्या बेड्या पायात घातल्या आहेत, असे त्यांना वाटले त्यांनी आपला हात पुढे केला, पण तो डब्याच्या दारापर्यंत पोहोचलाच नाही. त्यांच्यासमोरून वेग घेत गाडी निघून जाऊ लागली. विशाल कामत तसेच असाहाय्यपणे जाणाऱ्या गाडीकडे पाहात उभे राहिले. मग शेवटचा डबासुद्धा हळूहळू त्यांच्या डोळ्यासमोरून पुढे गेला. आता त्यांना त्या डब्याची फक्त शेवटची बाजू दिसत होती.. तो काळा रंग आणि एक पिवळ्या रंगाची फुली त्यांना कितीतरी वेळ पुढे पुढे जाताना दिसत होती. विशाल हताशपणे त्या शेवटच्या डब्याकडे पाहत राहिले. आपले पाय हलवायचा त्यांनी खूप प्रयत्न केला. मग ते जोरात ओरडले, “अरे थांबा, गाडी थांबवा कुणीतरी.”
विशाल कामतांना मग एकदम दचकून जाग आली. ते आपल्या बेडरूममध्ये झोपले होते. त्यांचे सारे अंग घामाने निथळून गेले होते. छातीची धडधड त्यांची त्यांनासुद्धा स्पष्ट एकू येत होती. त्यांनी मग आपले पाय हलवून बघितले. ते हलल्यावर त्यांना बरे वाटले.
"काय स्वप्न तरी! माझी कुठली गाडी चुकली कुणास ठाऊक? काय या स्वप्नाचा अर्थ?” विशाल स्वताःशीच पुटपुटले. मग आपल्या पलंगाजवळ असलेल्या बाटलीतून थंड पाणी प्यायल्यानंतर त्यांना जरा बरे वाटले. त्यांनी पहिले तर सकाळचे आठ वाजले होते. दात ब्रश करतानासुद्धा ते मघाशी पडलेल्या स्वप्नाचा विचार करत होते. मग त्यांनी चहा करून घेतला आणि ते आपल्या बंगल्याचा दरवाजा उघडून बाहेरचा पेपर घेऊन आले. त्यांच्या outhouseमध्ये राहणारे त्यांचे नोकर रघू आणि रखमा कालपासून गावी गेले होते. त्यामुळे आज ब्रेकफस्ट आणि जेवण बाहेरून मागवावे लागणार होते किवा स्वतःच करावे लागणार होते.
आम्लेट-ब्रेडचा ब्रेकफस्ट करतानासुद्धा ते स्वप्न त्यांची पाठ सोडत नव्हते.
आज त्यांच्याकडे पैसा, प्रसिद्धी सर्व काही होते. मग काय त्यांच्या हातातून निसटले होते? त्यांच्या चित्रांना परदेशातूनसुद्धा भरपूर मागणी होती. निगडी प्राधिकरणात त्यांनी हा प्रशस्त बंगला बांधला होता. काय कमी होते त्यांना?
त्यांची प्रेयसी - मृणाल त्यांच्याबरोबर नव्हती. जिच्यावर त्यांनी जिवापाड प्रेम केले, तिने त्यांना लग्नाला नकार दिला होता जवळजवळ तीसेक वर्षापूर्वी. पण ती जखम अजूनही ताजी होती. त्या वेळी विशाल अजूनही चित्रकार म्हणून स्थिरस्थावर झाले नव्हते. मृणालला श्रीमंत नवरा हवा होता. त्यांच्यावरचे प्रेम विसरून तिने डॉक्टर गुप्तेंशी लग्न केले होते. विशालना अजूनही वेडी आशा होती की मृणालला पश्यात्ताप होईल आणि ती परत येईल, त्यांच्या प्रेमाचा विजय होईल..
ब्रेकफस्ट करताना असेच काही तरी विचार त्यांच्या मनात होते.. नेहमीसारखे. त्यांच्या जीवनात अनेक मुली आल्या होत्या, पण त्यांची खरी प्रेयसी मृणालच होती. ती त्यांच्याकडे परत यायला हवी.. त्यांचे ते कायमचे स्वप्न होते. पण हे आजचे स्वप्न काय दर्शवत होते? ती आता कधीच येणार नाही?
अशा विचारात सकाळचे अकरा केव्हा वाजले, त्यांचे त्यांना समजले नाही. दारावरची बेल वाजते. विशाल सोफ्यावर बसून पेपर वाचत होते. खरे म्हणजे आत्ता त्यांची कॉफी प्यायची वेळ होती. पण त्यांची कामवाली बाई रखमा आज येणार नव्हती. त्यांना स्वतः उठून कॉफी करायला लागणार होती. आत्ता कोण आले कुणास ठाऊक? असे म्हणत ते सोफ्यावरून उठले, हातातल्या काठीवर भार टाकत ते दारापर्यंत गेले. आजकाल त्यांचे गुडघे खूप दुखत असत. उजवा जरा जास्तच. त्यांनी दरवाजा उघडला. कोणीतरी एक मध्यमवयीन बाई बाहेर उभी होती.
गोरीपान, सडपातळ पण बांधेसूद शरीरयष्टी, पोनीटेल आणि डोळ्यावर सोनेरी काड्यांचा चश्मा आणि कानात चेहऱ्याच्या मानाने जरा मोठ्याच वाटाव्यात अश्या रिंग्ज. हिरव्या रंगाचा तिला खूप शोभून दिसणारा पंजाबी ड्रेस. कपाळावर ड्रेसच्या रंगाचीच टिकली. आज जर ही इतकी सुंदर दिसत आहे, तर तरुणपणी किती सुंदर असेल.. असे विशालना वाटून गेले.
“काय विशाल, कसा आहेस? आत येऊ का? फार बिझी नाहीयेस ना?“ तिने एका मागोमाग प्रश्न विचारले. विशाल क्षणभर गोंधळात पडले. आपल्याला नावाने हाक मारणारी कोण ही? पण लगेच लक्षात आले..
अरे, ही तर मृणाल. आपली प्रियतमा. मृणाल सबनीस.. नव्हे, मृणाल गुप्ते. अरे, किती सुंदर दिसते अजूनही! विशालना आपण क्षणभर स्वनात आहोत असेच वाटले. पण ते लगेच सावरले.
“अरे! मृणाल! एक क्षणभर ओळखलेच नाही बघ मी तुला. ये, आत ये.” विशाल कामत एकदम गोंधळून गेले होते. ज्या मुलीवर त्यांनी एकेकाळी.. एकेकाळी का? आजसुद्धा जिवापाड प्रेम केले आणि अजूनही करत होते, ती मृणाल अशी अचानक समोर कशी काय आली? त्यांच्या हातातील काठी जरा लडबडली. त्यांनी मग आपला डावा हात आपल्या उजव्या हातावर ठेवून काठी घट्ट पकडली, तरीही त्यांचा जरासा तोल गेलाच. मृणालनेच त्यांचा खांदा धरून त्यांना सावरले.
“सावकाश, विशाल! चल, आपण आत जाऊ.” असे म्हणत तिने त्यांचा दंड धरून त्यांना आतमध्ये सोफ्यापर्यंत आणले.
“असू दे. मी ठीक आहे. फक्त जरा गुडघे दुखतात. ये, आत ये.” असे म्हणत त्यांनी आपला हात सोडवून घेतला आणि ते सोफ्यावर बसले. त्यांचा हा एल शेप सोफा होता. मृणालही त्यांच्या समोरच्या बाजूला बसली. ती चौकस नजरेने सभोवार बघू लागली. खूप मोठा दिवाणखाना, पण समान सगळीकडे अस्ताव्यस्त पडलेले. भिंतीवर समोरच्या बाजूकडे wide स्क्रीन टीव्ही. त्याच्याखाली एक सुरेख वॉल युनिट. त्यावर विशाल कामतांनी मिळवलेली अनेक बक्षिसे. काही शो पिसेस. एका भिंतीवर त्यांना आवडणारे व्हॅन गॉघचे सेल्फ पोट्रेट..
“अरे वा! सुरेख सजवलाय की दिवाणखाना! मस्त वाटतंय.” मृणाल हसत म्हणाली.
“हो. पण ही कामवाली बाई काल आणि आज आलेली नाही, त्यामुळे जरा सगळे अस्ताव्यस्तच झालेय. तू कशी आहेस? आणि माझे घर कसे सापडले?”
“त्यात काय अवघड आहे? तू एक प्रसिद्ध चित्रकार आहेस बाबा! बरेच दिवस यायचे मनात होते. आज सवड मिळाली, आले!” मृणाल हसत म्हणाली. विशालनी बघितले की मृणालचे काही चुकार केस पांढरे झाले होते. चश्म्यातून डोकावणारे डोळे अजूनही तसेच मिश्कील आणि गहिरे, पण डोळ्याखाली काळी वर्तुळे आली होती आणि चेहरा जरा ओढल्यासारखा दिसत होता. म्हातारी व्हायला लागली की ही! पण मग त्यांचे त्यांनाच हसू आले. आपणही काही तरुण राहिलो नाही. साठी नुकतीच ओलांडली की आपण..
“का हसलास?” मृणाल म्हणाली.
“किती काळ लोटला नाही आपल्याला भेटून? आपण दोघेही म्हातारे व्हायला लागलो असे वाटले, म्हणून हसू आले.” विशाल म्हणाले.
“तू झाला असशील म्हातारा. मी अजिबात नाही!” मृणाल हसत म्हणाली.
“बाकी तू कशी आहेस? तुझी प्राध्यापकी अजून चालू आहे की नाही? आपणा भेटून तीस-एक वर्षे तरी नक्की झाली असतील.” विशाल म्हणाले.
“अरे हो! किती प्रश्न? मी तशी बरी आहे. तुला दिसते तशीच आहे. पुढच्या वर्षी मी निवृत्त होईन, पण अजून तरी मी तत्त्वज्ञान शिकवते आहे. मुलांना कितपत समजते कुणास ठाऊक, पण मला खूप काही समजले आहे असे मला वाटते.“
“आणि डॉक्टर गुप्ते काय म्हणतायत? तुमची मुले काय करतात?”
“विशाल, तू जगाच्या खूप मागे आहेस का? आपल्या प्रेयसीबद्दल तुला हेही माहीत असू नये की काय? आम्हाला मूलबाळ नाही आणि आमचा तीन वर्षांपूर्वीच घटस्फोट झाला. आता मी सौ. गुप्ते नाही, मी आता माझे पूर्वीचेच नाव लावते - मृणाल सबनीस.”
“अरे! मला खरच काही माहित नव्हते आणि तू माझी प्रेयसी तेव्हाही होतीस आणि आत्ताही आहेस, पण.. तुझ्या दृष्टीने मी तुझा प्रियकर होतो की नाही कुणास ठाऊक? मी तुला लग्नाचे विचारले, तेव्हा तू काय म्हणालीस? होय.. संसार करायला फक्त रंग आणि कॅनव्हास पुरत नाहीत, स्वप्ने प्रत्यक्षात येण्यासाठी खिशात पैशाची ऊब असावी लागते ..be practical and forget about me! डॉक्टर गुप्ते तर वैभवाच्या शिखरावर होते तू लग्न केलेस तेव्हा. मी तुला शुभेछ्या दिल्या आणि तुझ्या जीवनातून बाहेर आलो. मग मी तिकडे डोकावूनसुद्धा पाहिले नाही. पण तुमचा घटस्फोट का झाला?“
“डॉक्टरांनी सगळा पैसा दारूत उडवला. मग आपल्याच हॉस्पिटलमधल्या नर्सच्या प्रेमात पडले. तिच्यावर पैशाची खैरात केली. मला सगळे असह्य झाले. मी पार उद्ध्वस्त होऊन गेले.”
विशालनी चमकून मृणालकडे पाहिले. तिने त्यांना नकार दिला असला, तरी ती सुखात असावी असेच त्यांना वाटत होते.. नव्हे, ती खूप सुखात आहे अशीच त्यांची आत्तापर्यंत कल्पना होती. ते आपल्या जागेवरून उठले आणि मृणालजवळ गेले. तिचा हात त्यांनी आपल्या हातात घेतला आणि तिच्या शेजारी बसत ते म्हणाले,
“मला खरेच हे काहीच माहित नव्हते. मला हे ऐकून खूप वाईट वाटले. तू इतक्या कठीण प्रसंगाला सामोरे गेलीस आणि मी.. काहीच करू शकलो नाही. मला माफ कर.”
मृणालने त्यांचा हात आपल्या दोन्ही हातांनी आपल्या हातात घेऊन दाबला आणि हलकेच आपल्या गालावर ठेवला. तिच्या डोळ्यातून आता अश्रू आले होते आणि विशाल कामतांचा हात त्या अश्रूंनी ओला झाला होता. त्यांच्या जीवनात अनेक स्त्रिया आल्या होत्या, पण त्यांच्या दृष्टीने मृणाल त्यांची पहिली आणि शेवटची प्रेयसी होती. त्यांच्याही डोळ्यात अश्रू जमा झाले.
“तेव्हा मला समजले की माझ्या नकाराने तुला काय वाटले असेल! मला आठवते, त्या नकारानंतर तू काढलेले ते ऑइल पेंटिंग - उद्ध्वस्त नावाचे. एका वृक्षाखाली चिमणीचे एक पिल्लू मरून पडले आहे आणि त्या पिल्लाची आई हताशपणे एकटक आपल्या पिल्लाकडे पाहत आहे.. मागे उंच उंच इमारती, त्यामागून डोकावणारा तो लालबुंद मध्यान्हीचा सूर्य आणि त्या सर्व चित्रावर व्यापून टाकणारे रंग. रक्ताचा आभास निर्माण होईल अशी लालबुंद रंगांची उधळण, त्या चिमणीच्या डोळ्यातून दिसणारी ती हताश भावना. तुला किती बक्षिसे मिळाली त्या चित्रासठी. तुझे किती नाव झाले, किती पैसा मिळाला!” मृणाल भावविवश होऊन म्हणाली.
विशालनी एकदम मृणालच्या हातातून आपला हात सोडवून घेतला.
“त्या चिमणीच्या डोळ्यातील हताश भावना.. खरे तर माझीच होती.. मृणाल, तुझ्या नकारातून आलेली.” विशाल म्हणाले. मग काही वेळ दोघेही एकमेकांकडे पाहत तसेच शांत बसून राहिले. आपापल्या मनाच्या खोल गाभाऱ्यात स्वतःचाच शोध घेत राहिले. मग विशाल एकदम भानावर आले.
“अरे , किती मी वेंधळा झालो आहे! तुला साधे पाणीसुद्धा विचारले नाही. तुला काय आवडते? चहा की कॉफी? की ज्यूस घेणार?“
“अरे, आज तुझी कामाची बाई आज आली नाहीये ना? मग मीच आपल्याला मस्त कॉफी करते. मला फक्त सगळे कुठे आहे ते दाखव.” मृणाल म्हणाली. विशाल तिला किचनमध्ये घेऊन गेले. मृणालने कॉफी केली आणि कॉफीचे दोन मग भरले आणि ते दोघे परत दिवाणखान्यात आले. कॉफी पिताना परत त्यांच्या गप्पा सुरू झाल्या.
“माझे जाऊ दे. तू लग्न वगैरे का केले नाहीस?“ मृणाल म्हणाली.
“नाही केले. मला मैत्रिणी बऱ्याच आहेत, पण मी पत्नी ही पदवी कुणालाही देऊ शकलो नाही. तो मान फक्त तुझा होता. तरुणपणी मी खूप मैत्रिणी केल्या. कलाकार आहे ना मी? पण मन कुठेच गुंतले नाही.. आणि मग राहिला तो फक्त व्यवहार. प्रेम आणि आपुलकी नसलेला फक्त व्यवहार.“ विशाल म्हणाले.
“आमच्या लग्नातसुद्धा शेवटी फक्त व्यवहारच उरला होता. घटस्फोट होताना कुणाला किती इस्टेट मिळणार यावर आमची भांडणे झाली. खरे तर फार इस्टेट उरलीच नव्हती, पण होती त्यासाठी मला कोर्टाची पायरी चढावी लागली. माझ्या हक्कासाठी मला भांडावे लागले.” मृणाल खिन्नपणे म्हणाली.
विशाल शांतपणे आपल्या प्रेयसीकडे पाहत राहिले. आपल्याला पैशासाठी झिडकारले या मृणालने.. पण तिलाच पैशासाठी कोर्टात जावे लागावे, याचे त्यांना वाईट वाटले. ती आपल्या जीवनात आली असती, तर आम्ही दोघेही सुखी झालो असतो का? नक्कीच झालो असतो. पण या जर-तरला काही अर्थ आहे का? पण इतक्या वर्षांनंतर आज ती इथे का आली? त्यांना कळत नव्हते, पण मृणाल येण्याचा त्यांना आनंद नक्की झाला होता.
“मला अजूनही तुझे ते जगप्रसिद्ध चित्र नेहमी आठवते - प्रेम आणि आपुलकी - Love and Affection. एक सुंदर तरुणी एका कुत्र्याच्या पिल्लासमोर वाकून त्याच्या डोक्यावरून हात फिरवण्यासाठी हात पुढे करत आहे. ते पिल्लू घाबरले आहे आणि आपल्या निरागस डोळ्याने त्या तरुणीकडे पाहत आहे. जणू त्या तरुणीच्या मनात आपल्याला इजा तर करायची नाही ना? याची खातरी करून घेत आहे. दोन पाय पुढे आणि आपल्या शरीराची कमान करून ते पाहत आहे. ती तरुणी मोठ्या प्रेमाने आपला हात पुढे करून आहे. तिच्या डोळ्यात प्रेम आणि आपुलकी स्पष्ट दिसत आहेत.. असे ते चित्र नेहमी माझ्या डोळ्यासमोर येते. ते कुत्र्याचे पिल्लू तर आता एकदम आपले शेपूट हलवायला लागेल असे वाटते. किती जिवंत चित्र! मला खूप आवडले होते ते चित्र. पण परदेशात त्याचा लिलाव झाला आणि किती तरी कोटी रुपयात ते विकले गेले. माझ्या आवाक्यात नव्हते ते विकत घेणे!” मृणाल म्हणाली.
मग तिने एक दीर्घ निश्वास सोडला आणि पुढे झुकून तिने विशाल कामतांचा हात हातात घेतला आणि ती म्हणाली, “त्या चित्राचा चित्रकार माझ्या आवाक्यात होता. पण मी मूर्खपणा करून त्याला नकार दिला आणि त्याच चित्रकाराचे चित्र माझ्या आवाक्याबाहेर जावे? माझे नशीब! दुसरे काय?“
“थोडक्यात काय, मृणाल, माणसापेक्षा चित्राची किमत जास्त! कितीतरी चित्रकार जिवंत असेपर्यंत त्यांच्या चित्रांना कोणी विचारत नव्हते. त्यांना दोन वेळचे जेवणसुद्धा मिळायचे नाही आणि ते मेल्यावर त्यांच्या चित्रांना प्रचंड किमत मिळते!” विशाल म्हणाले आणि अगदी खळखळून हसले. आज कितीतरी वर्षाने ते असे मनमोकळे हसले होते.
“पण या बाबतीत तू नशीबवान आहेस. पैसा आणि प्रसिद्धी तुला जिवंतपणीच मिळते आहे.” मृणाल म्हणाली. मग तिच्या एकदम लक्षात आले की आपण विशाल कामतांचा हात आपल्या हातात धरून ठेवला आहे. तिने गडबडीने तो सोडला आणि ती आपल्या पायाकडे पाहत तशीच बसून राहिली. थोडा वेळ असाच शांततेत गेला. बंगल्याच्या आवारात असलेल्या बागेतील झाडावरच्या पक्षांचे किलबिलाट तेवढे ऐकू येत होते. मध्येच रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनाचे हॉर्न शांततेवर एखादा ओरखडा मारल्यासारखे ऐकू जात होते, तेवढाच काय तो आवाज.“
"मृणाल, तू आल्याने मला खूप बरे वाटले बघ. आज किती तरी वर्षांनी मी एवढा मनमोकळा हसलो आहे. पण तू आजच कशी काय आलीस?"
“विशाल, मी तुला दुखावून डॉक्टर गुप्ते यांच्याशी लग्न केले खरे, पण माझ्या मनातील अपराधी भावना काही केल्या मी विसरू शकले नाही. तुझी माफी मागायची खूप वेळा ठरवले मी! पण खरे सांगू? धीर झाला नाही. तुझी सगळी बित्तंबातमी ठेवत होते. काही समारंभात आपण समोरसुद्धा आलो होतो, पण मीच तुला टाळून निघून गेले. मग तो घटस्फोट आणि ती भांडणे.. पण आज मी माझा सगळा धीर एकवटून आले आहे. विशाल, मी तुला नाकारून खूप मोठी चूक केली. मला शक्य असेल तर माफ कर! येते मी.“ असे म्हणून मृणाल पटकन उठली आणि दरवाज्याकडे निघाली.
“मृणाल! एक मिनिट थांब.” विशाल म्हणाले. आपल्या काठीचा आधार घेऊन ते उभे राहिले आणि हळूहळू एक एक पाऊल टाकत मृणालपाशी आले. अगदी तिच्या जवळ जाऊन उभे राहिले आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाले, “मृणाल, मी तुला माफ केले आहे असे मी म्हणालो, तर तुझ्या मनावरचे थोडे ओझे कमी होईल काय? तू माझ्यापासून काहीतरी लपवते आहेस. अशी एकदम जाऊ नकोस. आपण किती वर्षांनी भेटतो आहोत. अशी जाऊ नकोस. मी आपल्यासाठी जेवण मागवतो. मला खूप काही तुला सांगायचे आहे, कितीतरी वर्षांपासून साचून राहिलेले.”
मृणालने आपले डोळे पुसले आणि ती परत येऊन सोफ्यावर बसली. मग विशालनी फोन करून जेवण मागवले. मग ती दोघे एकमेकाकडे पाहत कितीतरी वेळ तसेच शांतपणे बसून राहिले. मग विशालनी मृणालला आपला बंगला दाखवला. आपली काही पूर्ण आणि अपूर्ण चित्रे दाखवली. मग त्यांनी गप्पा मारत जेवण केले.
त्या दोघांनीही आपल्या जीवनातील अनेक घटना एकमेकांना सांगितल्या. कितीतरी वेळ ती दोघे असेच काहीतरी बोलत राहिले. मग विशालनी एक मोठा सुस्कारा सोडला आणि ते म्हणाले,
“मृणाल, आज मलासुद्धा एक कबुलीजबाब द्यायचा आहे. तुझ्या नकारामुळे मी पार कोलमडून गेलो होतो. तुझ्या आवडीचा तो लेखक ..कामू का कोण?”
“हो, अल्बर्ट कामू.”
“त्याचे वाक्य मला सारखे आठवायचे - 'मनुष्यापुढे एकच महत्त्वाचा प्रश्न असतो - आत्महत्या करायची की नाही करायची?‘ मी कितीतरी वेळा आत्महत्या करायचा निश्चय केला. पण मला माझ्या कलेसाठी जगायला हवे, म्हणून मी तो विचार सोडून दिला आणि एक आशा.. तुला तुझी चूक कळेल आणि तू परत येशील.” विशालना पुढचे वाक्य बोलताच आले नाही. एक हुंदका त्यांच्या गळ्यात दाटून आला. आपले अश्रू दिसू नयेत म्हणून त्यांनी आपली मान फिरवली. खिशातून रुमाल काढला आणि त्याच्याआड आपला चेहरा लपवला.
मृणाल आपल्या जागेवरून उठली आणि काहीही न बोलता विशाल कामतांच्या शेजारी येऊन बसली. मग आपले दोन्ही हात त्यांच्या खांद्याभोवती वेढून त्यांना घट्ट मिठी मारली. तिच्याही डोळ्यातून आता अश्रुधारा येत होत्या. कितीतरी वेळ ते दोघे तसेच बसून राहिले.
“मृणाल, मला जाणवते आहे की अजूनही आपल्यामधील प्रेम जिवंत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. मी एकदा तुला विचारले होते, आज पुन्हा एकदा विचारतो - माझ्याशी लग्न करशील? ज्या पैशासाठी तू मला सोडून गेलीस, तो आज माझ्याकडे खूप आहे. मला अजूनही तू तितकीच प्रिय आहेस” विशाल म्हणाले.
“विशाल, मला काय बोलावे ते समजत नाही. माझे तेव्हाही तुझ्यावर प्रेम होते आणि आजही आहे. फक्त मी जरा जास्त व्यावहारिक विचार केला. पण मी प्रेमही गमावले आणि पैसाही. तू माझ्यावरच्या प्रेमासाठी आजपर्यंत अविवाहित राहिलास, माझ्यावर प्रेम करत राहिलास, पण मला तुला येऊन भेटावे असे वाटले नाही.. आजपर्यंत. आणि आज मी आले. आजच का? याचे कारण तू विचारात होतास ना?“ मृणाल म्हणाली आणि थोडा वेळ शांत बसली अजूनही ते एकमेकांच्या मिठीत होते. मृणालने आपले हात विशालांच्या खांद्यावरून काढून घेतले. मग आपली नजर खाली वळवत ती म्हणाली,
“खरे म्हणजे.. मीच तुला लग्नाचे विचारण्यासाठी आज आले होते. मी मध्यंतरी एक वर्षासाठी अमेरिकेला एका कॉलेजमध्ये शिकवायला गेले होते. तेवढ्या वेळात माझ्या धाकट्या भावाने माझ्या खोट्या सह्या करून बँकेतील माझ्या सगळ्या ठेवी काढून घेतल्या. मी परत आले, तर मी जवळजवळ कफल्लक झाले होते. माझा राहता flat आणि माझे अमेरिकेत शिल्लक राहिलेले पैसे एवढेच माझ्याकडे होते. मग मला तुझी आठवण झाली. ज्या पैशासाठी मी तुला सोडून गेले, त्याच पैशासाठी मी परत तुझ्याकडे आले. तुझ्याशी लग्न करण्यासाठी. पण मी इथे आले, तुझ्याशी बोलू लागले आणि माझी मलाच लाज वाटायला लागली. मी परत जायचे ठरवून निघाले, पण तू मला अडवलेस. मला खरेच असे वाटायला लागले आहे की मी तुझ्या योग्यतेची नाही. मी एक स्वार्थी आणि पैशासाठी प्रेम विकणारी आणि त्याच पैशासाठी तुझ्याकडे परत येणारी.. मी एक नालायक बाई आहे. मला जाऊ दे.”
मग मृणाल सोफ्यावरून उठली आणि मन खाली घालून बसलेल्या विशाल कामातांकडे आपल्या अश्रुभरल्या डोळ्याने पाहत म्हणाली,
“गुड बाय विशाल”
ती जाताना बघून विशाल एकदम उठले आणि त्यांनी मृणालचा हात धरला आणि ते म्हणाले,
“छान. बरे वाटले मला. प्रेमाची पहिली परीक्षा तरी तू पास झालीस! सत्य सांगितलेस. मला सोडून जातानाहि तू सत्यच सांगितले होतेस. तुला असे वाटते की तू मला योग्य नाहीस, पण मी तरी तुझ्या योग्य आहे की नाही.. कुणास ठाऊक? तू गेल्यानंतर मी किती मुलींच्या सहवासात आलो, माझे मलाच सांगता येणार नाही. मी जरी लग्न केले नसले, तरी कितीतरी मुलींचा भोग घेतला.. जणू तुझ्यावर आणि तुझ्या आठवणींवर सूड उगवण्यासाठी. मी तरी कुठे तुला योग्य आहे?"
“अरे, पण ते मी तुला नकार दिल्यावर. आजही तू माझ्यावर तेवढेच प्रेम करतोस, हे मला दिसत का नाही?”
“मलाही दिसते आहे मृणाल, तुझे माझ्यावर प्रेम आहे ते. तसे नसते, तर तू येण्याचे खरे कारण न सांगता मला सहज फसवू शकली असतीस. पण तू तसे केले नाहीस. मला असे वाटते की आपल्या दोघांच्याही प्रेमाला परत उमलायची संधी आपण दोघांनीही द्यायला हवी. त्याच्यावरची काजळी झटकायला हवी. परत एकदा सुरुवात करू या. कदाचित.. नाही, मला खातरी आहे, आपण दोघेही एकमेकांसाठीच जन्माला आलो आहोत.
मी काय केले हे तू विसर आणि तू काय केलेस ते मीही विसरतो. आज मलाही तुझी गरज आहे. मलाही माझ्यावर प्रेम करणारी, माझी काळजी घेणारी सखी मला हवी आहे. तुलाही प्रेमाबरोबरच आर्थिक स्थिरता देणारा जोडीदार हवा आहे. आपल्या दोघांनाही एकमेकांची गरज आहे.”
“म्हणजे आपण गरजेपोटी लग्न करायचे?"
“काय हरकत आहे? नाहीतरी बरीचशी लग्ने गरजेपोटीच होतात की! शारीरिक गरज, सामाजिक गरज, स्थिरतेची गरज.. तू तरी डॉक्टर गुप्त्यांशी लग्न केलेस, तेव्हा आर्थिक स्थिरतेसाठीच केलेस की!” विशाल म्हणाले.
“तू म्हणतोस ते खरे असले, तरी कसेतरीच वाटते. निदान आपल्या बाबतीततरी तसे असू नये. आपण फक्त आपल्यावरच्या प्रेमासाठीच लग्न करायला हवे.” मृणाल जरा अस्वस्थपणे म्हणाली. जणू तिला पूर्वीचीच चूक पुन्हा करायची नव्हती.
“आपण अशी आशा करू की आपण सुरुवात जरी गरजेतून केली असली, तरी आपण लवकरच खऱ्या प्रेमाला उपलब्ध होऊ. आपल्या उरलेल्या जीवनात गडकरी म्हणतात तसे ‘क्षण एक पुरे प्रेमाचा.. वर्षाव पडो मरणांचा..’ असा एक क्षण जरी मिळाला खऱ्या प्रेमाचा, तरी मला पुरे आहे.” विशाल म्हणाले.
आणि त्यांनी आपला हात मृणालपुढे केला. मृणालसह एका नव्या विश्वात पाउल टाकण्यासाठी..
पण मृणालचा हात त्यांच्या हातात आला नाही.
कसलातरी आवाज झाला, म्हणून त्यांनी वळून पाहिले - त्यांच्या मोबाइलची बेल वाजत होती कर्कशपणे. विशालनी दचकून आपल्या मोबाइलकडे पाहिले. त्यांच्या शेजारच्या टेबलावर ठेवलेला मोबाइल वाजत होता. त्यांनी आपल्या पुढे केलेल्या हाताकडे आश्चर्याने पहिले. मृणाल तिथे नव्हती. आत्ता आपण मृणालशी बोलत होतो.. एकदम कुठे गेली ही? त्या आलिशान बंगल्यात त्यांच्याशिवाय कोणीही नव्हते.
विशाल एका सुंदर दिवास्वप्नात रंगून गेले होते. जे सत्यात यावे असे त्यांना नेहमी वाटे, असे एक रम्य स्वप्न. मृणाल आलीच नव्हती.. येणारही नव्हती. ते उगीचच एका मृगजळाच्या मागे धावत होते.
एक अनावर हुंदका त्यांच्या गळ्यात दाटून आला. डोळ्यातून अश्रूंचा ओघ सुरू झाला आणि त्यांना अचानक आजच्या सकाळी पडलेल्या स्वप्नाचा अर्थ स्पष्टपणे समजला. एक जीवघेणे सत्य त्यांना जाणवले - मृणाल परत केव्हाही येणार नव्हती.
आपल्या भकास आणि त्यांच्याशिवाय कोणीही नसलेल्या दिवाणखान्याकडे पाहत ते स्वताःशीच बोलल्यासारखे म्हणाले,
“You have missed the train my friend, you have missed it. मित्रा, तुझी गाडी चुकली आहे.. केव्हाच चुकली आहे.”
जयंत नाईक
प्रतिक्रिया
2 Nov 2021 - 11:35 am | मुक्त विहारि
छान लिहिले आहे
3 Nov 2021 - 9:30 am | जेम्स वांड
पण मला कळली नाही , माझा दोष समजा, मृणालचा मृत्यू झाला आहे अन विशाल भ्रमिष्ट झाले आहेत असे काहीसे आहे का ?
सॉरी पण विचारल्याशिवाय राहवलं नाही म्हणून विचारतोय, कथा खुलवण्याची शैली निर्विवाद सर्वोत्तम वाटली हे पण सांगतो ह्या निमित्ताने.
3 Nov 2021 - 12:00 pm | Jayant Naik
आधीच सांगतो हे मृगजळ आहे. ते विशाल कामत यांच्या मनात आहे. कदाचित मृणाल सुखात असेल..ती याना विसरून सुद्धा गेली असेल. ती संकटात असेल...मग माझ्याकडे याचना करत येईल हा विशाल यांचा स्वार्थाने उमटलेला विचार आहे. कुठेतरी त्यांना असे वाटते आहे...अजूनही...की काहीतरी व्हावे आणि मृणाल परत यावी. मग त्या साठी ती सुखी नसेल तरच आता परत येईल त्यातूनच हे सगळे विचारांचे मृगजळ.
4 Nov 2021 - 8:27 am | Vinayak Khot
1. गोष्टीमध्ये दोन अनपेक्षित twist आहेत. त्यामुळे गोष्टीची एकदम दिशाच बदलून जाते आणि गोष्टीतील कुतूहल वाढते.
2. माणसाच्या स्वभावाबद्दल तुम्ही जे लिहिले आहे, तेही महत्त्वाचे आहे. पैश्याच्या मोहामुळे किंवा पैसे कमी पडतील या भीतीमुळे माणूस जे निर्णय घेतो, त्यामुळे अनेकवेळा त्याला पासच्याताप करायची पाळी येते.
3. तुमच्या गोष्टी नेहमीच हलक्या फुलक्या असतात. त्या मुळे या आजकालच्या tension मय जीवनात असे कांही वाचायला बरे वाटते. ही गोष्ट सुद्धा अशीच रिलॅक्स करणारी आहे.
Keep it up.
5 Nov 2021 - 8:33 am | Jayant Naik
अगदी बारकाईने गोष्ट वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार.
4 Nov 2021 - 9:03 pm | ज्ञानोबाचे पैजार
आवडली, शिर्षका मूळे शेवट काय असेल याचा अंदाज वाचताना येत होता, पण त्यामुळे कुठे रसभंग झाला नाही, वाचताना मजा आली
पैजारबुवा,
5 Nov 2021 - 8:36 am | Jayant Naik
गोष्टीचे नाव बदलावे का? असा विचार मी केला होता. पण हे नाव इतके चपखल बसले होते की ते बदलण्याचा धीर झाला नाही. आपल्या अभिप्रायाबद्दल आभार.
5 Nov 2021 - 10:24 am | Jayant Naik
गोष्टीचे नाव बदलावे का? असा विचार मी केला होता. पण हे नाव इतके चपखल बसले होते की ते बदलण्याचा धीर झाला नाही. आपल्या अभिप्रायाबद्दल आभार.
4 Nov 2021 - 9:19 pm | चौथा कोनाडा
खुप छान कथा. ओघवती लेखनशैली आवडली.
माणसाच्या मनात वेडी आशा कायम वास करत असते.
भास वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा सत्यात उतरतात.
कामत यांना जरी खात्री वाटत असेल की ट्रेन चुकली असेल, तरीमनातील निःसीम प्रेमामुळे ते कायम ट्रेनमध्येच असतील !
5 Nov 2021 - 8:40 am | Jayant Naik
याला आशावाद म्हणावं की दिवास्वप्न? कुणास ठाऊक? पण माणसाच्या मनात ती नेहमीच घर करून असते हे निश्चित.
9 Nov 2021 - 5:30 pm | श्वेता व्यास
कथा आवडली.
13 Nov 2021 - 10:48 pm | Jayant Naik
अभिप्रायाबद्दल आभार.
9 Nov 2021 - 6:17 pm | कंजूस
जमली.
13 Nov 2021 - 10:48 pm | Jayant Naik
धन्यवाद
12 Nov 2021 - 7:01 am | तुषार काळभोर
अतिशय छान कथा.
13 Nov 2021 - 10:49 pm | Jayant Naik
आपला आभारी आहे.
15 Nov 2021 - 10:25 am | सौंदाळा
सुंदर कथा
19 Nov 2021 - 11:41 pm | Jayant Naik
आभार.
17 Nov 2021 - 11:18 pm | चित्रगुप्त
चांगली रंगवली आहे चित्रकाराची कथा.
कोणताही कलावंत जात्याच कल्पनेत रमणारा व्यक्ती असतो. त्यातील काही कल्पना कलाकृतींच्या माध्यमातून व्यक्त होतात तर बर्याचश्या कल्पना फक्त कल्पना म्हणूनच अस्तित्वात रहातात. काही कल्पना जन्मभर मनात घोळत रहातात. विशाल कामत यांची मृणालबद्दलची ही कल्पना त्या प्रकारची वाटते.
काही व्यक्तींच्या बाबतीत भूतकाळातील अमूक एक घटना घडली नसती तर आपले जीवन वेगळ्या प्रकारे कसे व्यतीत झाले असते, या विषयीच्या विविध कल्पना जन्मभर मनात घोळत असतात.
- हे मी स्वतःच्या अनुभवावरून लिहीतो आहे. माझ्या मनात अश्या जन्मभर घोळत असलेल्या काही कल्पना आहेत आणि त्यांना अजूनही विविध फाटे फुटत असतात.
19 Nov 2021 - 11:47 pm | Jayant Naik
प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग येतात. नंतर असे वाटते की मी जरा दुसरा निर्णय घेतला असता तर काय घडले असते. मग स्वप्नरंजन सुरू होते.
18 Nov 2021 - 7:05 pm | स्मिताके
सुरुवातीला गाडी चुकल्याचे स्वप्न सूचक आहे, तरीसुध्दा शेवटपर्यंत उत्सुकता कायम ठेवण्याचे अवघड काम कुशलतेने हाताळले आहे असे वाटले.
19 Nov 2021 - 11:47 pm | Jayant Naik
बरोबर आहे.