body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}
.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}
.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}
'हिवाळा, उन्हाळा पुन्हा पावसाळा' असे ऋतुचक्र अव्याहतपणे सुरू असते. दिवाळी आली की सर्वांना वेध लागतात ते म्हणजे गुलाबी थंडीचे. गेल्या काही वर्षांत सर्वच ऋतूंवर पावसाळ्याने अतिक्रमण केले आहे. सध्या पुण्यात सकाळी हिवाळा, दुपारी उन्हाळा आणि संध्याकाळी पावसाळा असा ट्रिपल धमाका सुरू आहे. संक्रातीनंतर हवेतील गारवा हळूहळू कमी होऊ लागतो. होळीनंतर तर चांगलेच तापू लागते. पुढील दोन-तीन महिने 'डोक्याला ताप' देणारा उन्हाळा केवळ एप्रिल महिन्यात येणाऱ्या आंब्यामुळे सुखावह वाटतो. कलिंगड, खरबूज, फणस अशी अनेक फळे उन्हाळ्यात मिळतात. मात्र जंगलाचा राजा सिंह आल्यावर इतर प्राणी जसे चिडीचूप बसतात, तसे फळांचा राजा आंब्याचे आगमन झाल्यावर इतर फळांचा रुबाब कमी होतो.
वसंत ऋतूचे आगमन झाले की आंब्याच्या झाडावरील मोहोराचे कैरीत रूपांतर होऊ लागते. दिसामासाने कैऱ्या मोठ्या होऊ लागतात. तारुण्याची लाली गालावर चढू लागते. अशा अल्लड आंबटगोड पाडाच्या कैर्यांना हलकेच झाडावरून उतरवले जाते आणि मस्त गवताची उबदार दुलई अंथरली जाते.
पूर्वी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हापूस आणणारे लोक म्हणजे श्रीमंत असे समजले जायचे. मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात यायला हापूसला मे महिना उजाडायचा. म्हणूनच कदाचित १ मे 'कामगार दिन' म्हणून ओळखला जात असावा.
आंब्याच्या अनेक जाती आहेत. सर्वोत्तम चव अर्थातच रत्नागिरी हापूस! तिथल्या लाल मातीत वाढलेली आणि खाऱ्या वाऱ्याला दिवसरात्र तोंड देणारी हापूसची कलमे कमालीचे सुंदर आंबे देतात. पातळ साल, केशरी रंग, भरपूर गर, पिकल्यानंतर सालीवर पडणाऱ्या रेशमी सुरकुत्या. लाकडी पेटीतून आणलेले आंबे जसे पिकू लागतात, तसा घरभर दरवळ पसरतो. आंब्याला 'खाऊ का गिळू' असे होते आपल्याला. आपण हापूसचे कौतुक केल्यावर महाराष्ट्राबाहेरील लोकं त्यांच्या दशेहरा, केशर, लंगडा वगैरे आंब्याची वारेमाप स्तुती करतात. हे सर्व आंबे चवीला चांगले असले, तरी अस्सल हापूसपुढे नावाप्रमाणेच 'लंगडे' वाटतात. महाराष्ट्रातील मराठी भाषा आणि हापूस आंबा - दोन्ही 'अमृतातेही पैजा जिंके' आहेत. काही दर्दी लोकांच्या मते 'कापून खायला हापूस श्रेष्ठ, परंतु आमरसासाठी पायरी जास्त चांगला'. उत्तम पायरी मिळाल्यास रसात तो हापूसपेक्षा अनेकदा भाव खाऊन जातो, हे बाकी खरे.
'तोतापुरी आंबा' म्हणजे खानदानी कुटुंबात जन्म झाल्याने चांगले रंगरूप लाभावे, पण अंगी गुण खास काही नाही. दिसायला छान परंतु विशेष चव नाही. केवळ हापूसचा सीजन संपला तरीही पावसाळा चालू होईपर्यंत मिळतो, हीच काय ती जमेची बाजू. सुंदर चेहऱ्याला नजर लागू नये म्हणून काळं तीट लावावं तसा 'शेपू' आंबा आहे. असल्या फळाला आंबा म्हणणे म्हणजे पुलंच्या भाषेत 'गांडुळाला शेष म्हणण्यापैकी' आहे.
अस्सल हापूस ओळखणे आणि निवडणे ही अतिशय अवघड कला आहे. नुसता देठाचा वास घेऊन ओळखण्याइतके सोपे अजिबात नाही. आंब्याचा आकार, वजन, देठाजवळील खड्डा, चोचीकडील वास असा अवघड मामला आहे. आपण एवढे तयारीचे नसाल तर ओळखीच्या माणसाकडून (चार पैसे जास्त गेले तरी) आंबे घेणे उत्तम.
लहानपणी हापूस आंबा चिरताना त्याचे 'कमळ' करून एकेक चौकोनी तुकडा खायला भारी मजा वाटायची. आंबा कापून, सोलून, पिळून खाताना अप्रतिम लागतोच; शिवाय साखरांबा, आमरस, मिल्कशेक, मस्तानी असे सगळेच पदार्थ उत्कृष्ट. माझ्या बाबांच्या ऑफिसच्या मित्रमंडळींची दर मे महिन्यात आमरस, पुरी आणि कांदा भजी अशी 'आम आदमी पार्टी' असायची. आमरस कितीही केला तरी शक्यतो उरत नाहीच. अगदीच उरला, तर ताटाला तुपाचा हात लावून उन्हात ठेवून आंब्याची पोळी करावी. ताटलीला तुपाचा हात लावून त्यावर आमरसाचा पातळ थर ह्या रूपात आमरस उन्हात बसतो. आंबा पोळी हे आंब्याचे आणखी लोभस रूप. गोल, तलम, गुळगुळीत आंबापोळी आंब्याचे सारे गुण घेऊन पुन्हा अवतरते. मंडईत हापूस भरपूर आला क्प मग पिकलेले आंबे आणि दूध शनिवार पेठेतील 'देवयानी'कडे नेऊन आंबा आईस्क्रीम करून घ्यायचे हा देखील एक आवडता कार्यक्रम.
हापूस जीव की प्राण असला, तरी 'खाईन तर हापूसशी, नाहीतर उपाशी' असली माझी भूमिका नाही. ८४ दशलक्ष कोटी योनीतून फिरत फिरत आपणास मौल्यवान असा मानव जन्म प्राप्त होतो, तो चहा पिण्यासाठी आणि आंबे खाण्यासाठी! त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींना कधीच नाही म्हणू नये. हापूस आणि पायरी खालोखाल रायवळ आंबादेखील मला आवडतो. माझी आई माहेरची 'आंबेकर' आणि राहायची 'आमराई' आळीत. तिथल्या परसातील रायवळ आंबा माझ्या आजी-आजोबांसोबत खातानाची नुसती आठवण झाली, तर क्षणार्धात मन भोरच्या आमराई आळीत भुर्र्कन जाते. कॉलेजात असताना लूनावरून मित्रांबरोबर सिंहगडला जाताना वाटेत उत्तमनगरला थांबून पाच रुपयाला डझन 'गोटी आंबे' घ्यायचो. प्रत्येकी एक डझन आंबे खाल्ल्यावर जरा पोटात रस गेल्यासारखे वाटायचे.
पूर्वी असे ऐकले होते की कोकणातील सर्वात उत्तम हापूस गल्फला आणि युरोपला एक्स्पोर्ट होतो. आपल्याकडे भारतात जो मिळतो, तो कमी दर्जाचा आंबा. मी युरोपलादेखील आंबा खाल्ला आणि गेली सात-आठ वर्षे गल्फमध्ये खातोय. माझा अनुभव असा आहे की गल्फमध्ये एक्स्पोर्ट क्वालिटी आंबे मिळत असले, तरी पुण्या-मुंबईच्या आंब्याची सर नाही. अर्थात पुण्या-मुंबईपेक्षा कोकणात जास्त उत्तम आंबे मिळतात, कारण ते झाडावर ७५% पिकलेले असतात. बाहेरगावी पाठवताना ५०% पिकलेले झाडावरून उतरवून (पावडर लावून) आपल्याला मिळतात.
माझ्या दोन्ही मुलींनादेखील आंबा प्रचंड आवडतो. मागच्या वर्षी अक्षय्य तृतीया आणि रमजान ईद १४ मेला होत्या. इकडे आखातात ईदला आठवडाभर सुट्टी असते. त्यामुळे मी खरे तर सुट्टी घेऊन थेट कोकणांत अस्सल हापूस दोघी मुलींना मनसोक्त खाऊ घालण्याचा विचार केला होता. ह्या कोरोनामुळे नाकावरील मास्कमुळे आंबे घेताना धड वास घ्यायचीदेखील सोय राहिली नाही. त्यामुळे हे वर्षदेखील इथेच 'एक्स्पोर्ट क्वालिटी' आंबे खाऊनच काढावे लागले. उत्तम पिकलेला रत्नागिरी हापूस त्याच आमराईत बसून निवांत खाण्याचे स्वप्न ह्या वर्षी स्वप्नच राहिले आहे. रत्नागिरीच्या काशी-विश्वेश्वराच्या मनात असेल तर हा योग पुढच्या वर्षी जुळून येईल.
दर वर्षी निसर्ग इतका सुंदर नटून-थटून इतका मोहक फळांचा राजा आपल्यासाठी घेऊन येतो. आपण त्याचे स्वागतही तसेच जोरदार करायला हवे. केवळ सणासुदीला चांदीची भांडी काढण्यापेक्षा मोसमातील पहिला आमरस करतेवेळी चांदीच्या वाटीतून प्यायला हवा. ह्या सोन्यासारख्या फळाला निदान चांदीचे कोंदण द्यायला पाहिजे.
~ सरनौबत
प्रतिक्रिया
2 Nov 2021 - 6:49 pm | पाषाणभेद
तोंपासू लेख.
छान लिहीले आहे अगदी.
4 Nov 2021 - 4:03 pm | सरनौबत
धन्यवाद पाषाणभेद
2 Nov 2021 - 6:57 pm | Rajesh188
आंब्याचे वर्णन वाचता वाचता कोकणात आंब्याच्या बागेत च पोचलो.
4 Nov 2021 - 4:02 pm | सरनौबत
थँक्स राजेश
3 Nov 2021 - 9:19 am | जेम्स वांड
धमाल आहे, खूप खूप आवडले, आवडणारच कारण विषय गोड आहे ना !.
ह्या वाक्यावर शिरसाष्टांग दंडवत आणि कचकून सहमती आमची.
4 Nov 2021 - 4:01 pm | सरनौबत
थँक्स वांड भाऊ. चहा आणि हापूस - दोन्ही जिव्हाळ्याचे विषय
3 Nov 2021 - 9:03 pm | चित्रगुप्त
मिपा दिवाळीअंकात फराळाला हापुसचे आंबे म्हणजे पर्वणीच. खूप छान वर्णन केले आहे.
आमचा उभा जन्म आधी इंदौर, मग दिल्ली अश्या निर्हापुस प्रांतांमधे गेल्याने हापुस खायला मिळण्याचे प्रसंग फारच थोडे, तेही चांगले पन्नाशीत वगैरे पोचल्यावर आले. दिल्लीत कॅनॉट प्लेशीत "अल्फान्सो अल्फान्सो" असे पुकारत विकणारे बसलेले असायचे, पण साधे पेरू वगैरेपण ते चौपट-पाचपट किंमतीत विकतात हे ठाऊक असल्याने कधी भाव विचारायचेही साहस केले नाही. त्यांचे मुख्य गिर्हाईक म्हणजे गोरे परदेशी. असो. थोडक्यात म्हणजे हापुसच्या बाबतीत आम्ही कपाळकरंटे. दिल्लीत लाऊडस्पीकरावर रात्ररात्र चालणारा "आंबे तार दे" चा कर्णकटु गजर, हेच आमचे नशीब. तुम्ही या बाबतीत नशीबवान, याबद्दल अभिनंदन.
4 Nov 2021 - 4:00 pm | सरनौबत
धन्यवाद चित्रगुप्त साहेब. दिल्लीत आंब्याची मजा नाही. मी दिल्लीतल्या थंडीत मटर-पनीर, गाजर हलवा आणि कुल्लड मध्ये मसाला दूध प्यायले आहे त्याचे चव अजून रेंगाळते आहे
3 Nov 2021 - 10:02 pm | मुक्त विहारि
सुदैवाने, 1975 पासूनच हापूसचे आणि माझे सूत जुळले
दर वर्षी न चुकता हे फळ पदरी पडतेच
बलसाड केशर, हा माझा जास्त आवडीचा
4 Nov 2021 - 3:57 pm | सरनौबत
धन्यवाद मुक्तविहारी
3 Nov 2021 - 11:09 pm | मालविका
हापूस माझ्या जिव्हाळ्याचा विषय! यापूर्वी हापूस वर एक लेख लिहिला होता त्याची आठवण झाली
4 Nov 2021 - 3:56 pm | सरनौबत
धन्यवाद मालविका. चिपळूण जवळच्या गावात स्वतःची हापूस आंब्याची बाग तुमची म्हणजे खरंच नशीबवान
7 Nov 2021 - 10:12 am | ॲबसेंट माइंडेड ...
छान लेख.
7 Nov 2021 - 7:17 pm | तुषार काळभोर
तुम्ही आखाताऐवजी आम्रविकेत जास्त रमला असता ;)
10 Nov 2021 - 9:36 am | ज्ञानोबाचे पैजार
कितीही खाल्ले तरी मन त्रुप्त होत नाही आणि याच्या बद्दल कितीही वाचले तरी कंटाळा येत नाही.
कालच "सकाळ" मधे बातमी वाचली की रत्नागिरी हापुसची पहिली पेटी मार्केट यार्डात दाखल झाली. वाचताना आपण "कामगार" असल्याचे प्रचंड दु:ख झाले. आज ते दु:ख जरा कुठे हलके होत होते तो वर तुमचा लेख वाचनात आला आणि जखम पुन्हा भळभळली, ही जखम भरुन येण्याकरता अजून किमान सहा महिने प्रतिक्षा करावी लागणार आहे.
असल्या जीवघेण्या लिखाणाचे प्रायश्र्चित्त म्हणून तुम्ही एक आंबा कट्ट्याचे आयोजन करावे,
पैजारबुवा,
10 Nov 2021 - 12:49 pm | चौथा कोनाडा
चवदार हापुस सारखाच रसाळ चविष्ट लेख !
🍑
लेख आवडला हेवेसांनल !
13 Nov 2021 - 6:17 pm | सरनौबत
धन्यवाद चौथा कोनाडा, पैजारबुवा, तुषार, ॲबसेंट माइंडेड
15 Nov 2021 - 7:50 am | जुइ
लेख अगदी चविष्ट झाला आहे. हापुस आणि पायरी आवडता. काही प्रमाणात लालबागही खाल्ला आहे. गेल्या बर्याच वर्षांपासून इथे जुन मध्ये देवगड हापुस चाखला आहे. २ वर्षांपासुन करोना कृपेने तेही बंद झाले आहे.
मातोश्रींचे बालपण आमराइत गेल्याने बर्याच चविष्ट आठवणी तिच्याकडून ऐकल्या आहेत.
15 Nov 2021 - 8:43 am | प्राची अश्विनी
आमृतानुभव आवडला.
15 Nov 2021 - 8:58 am | सुधीर कांदळकर
अगदी खरें. मी सध्या मालवणजवळच राह्तो.
आणखी एक गंमत आहे. डोंगरी आंबा हा आगरी म्हणजे सपाटीवरच्या आंब्यापेक्षा रंगारूपाने आणि चवीला सरस असतो. त्याशिवाय सेंद्रीय आंबा चवीला अफलातूनच लागतो. जुने लोक सांगत की पूर्वीसारखा स्वादिष्ट आंबा आता मिळत नाही. तें सेंद्रीय आंबा खाल्ल्यावर कळलें. रासायनिक खते घातल्यावर स्वाद हमखास बदलून जातो. त्यामुळे आता सेंद्रीय शेतीकडे कल वाढला आहे.
असो. मस्त लेख. धन्यवाद.