body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}
.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}
.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}
छोट्या अभयला नेहमी आजोबांचा राग यायचा. आजी कशी गोष्टी सांगते, कधीकधी गाणीसुद्धा म्हणते. पण आजोबा कसले तरी कागद आणि भिंग घेऊन बसलेले असतात. आजी सांगायची, “तू नको लक्ष देऊस. तू माझ्याकडे ये, मी तुला गोष्ट सांगते.”
मग अभय आजोबांशी कट्टी करायचा.
पण अभय जसा मोठा झाला, तसं त्याच्या लक्षात आलं की आजोबा सगळ्यांच्या सह्या घेतात कागदावर आणि त्या सह्या भिंगातून बघत बसतात. एक दिवस शाळेतून येताना एका वहीत त्याने भरपूर सह्या जमा करून आणल्या - अगदी टीचर्स, शिपाई, वर्गातली मुलं अशा एकंदरीत ३०-३५ सह्या होत्या आणि आजोबा घेतात तशा एका पानावर एकच.
घरी आल्याबरोबर त्याने आजोबांना ती वही दाखवली, “हे बघा आजोबा, मीसुद्धा आणल्यात सह्या. आता मला शिकवा भिंगातून काय बघायचं ते.”
“अरे अभय, असं नसतं काही. तू लहान आहेस अजून. तुला नाही कळणार या गोष्टी. तू मोठा झालास की मी शिकवेन हो तुला ही विद्या.”
“म्हणजे आजोबा ही विद्या आहे का? पण विद्या म्हणजे काय?” अभय विचारत होता.
“अरे, विद्या म्हणजे स्टडी. ती शिकावी लागते. त्यासाठी खूप तपश्चर्या करावी लागते. तू आता जा, वेळ आली की मी शिकवेन तुला.” आजोबा म्हणाले.
पण अभय मोठा म्हणजे आजोबांच्या दृष्टीने ती विद्या शिकण्यायोग्य व्हायच्या आधीच आजोबा गेले.
आई आणि आजी म्हणत होत्या, ते सर्व बाड टाकून द्यावं. पण ते सगळं अभयने आपल्या ताब्यात घेतलं.
जमेल तसं तो आजोबाची टिपणं वाचायला लागला. त्याने स्वत:ही काही सह्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली.
त्याच्या लक्षात आलं की लोकांची सही बघता बघता आपल्याला काहीतरी भास होतोय, तो भास म्हणजे काय हे त्याला कळत नव्हतं.
अभयनेसुद्धा आता नोंदी करायला सुरुवात केली. आता तो पण झपाटल्यासारखा सह्यांचा अभ्यास करायला लागला. प्रत्येक व्यक्तीच्या अनेक सह्या घेतल्या. प्रत्येक सही करतानाची वेळ, आजूबाजूची परिस्थिती आणि त्या व्यक्तीची स्वत:ची मन:स्थिती यावरून सहीमधला बारीकसा फरक त्याच्या लक्षात यायला लागला.
असं करता करता अभयला कधी कधी भास व्हायला लागले. एकदा बाबांनी सही करून चेक अभयला दिला. चेक बघून अभयला भास झाला की बाबांच्या डाव्या हाताला प्लॅस्टर घातलं आहे. अभयने दुर्लक्ष केलं आणि तो कॉलेजला गेला. संध्याकाळी तो घरी आला, तर घरी कुणी नव्हतं. शेजारच्या साठेकाकूंनी चावी दिली आणि सांगितलं, “अरे अभय, तुझ्या बाबांची स्कूटर स्लिप झाली. त्यांना घेऊन तुझी आई हॉस्पिटलमध्ये गेली आहे. येतीलच थोड्या वेळात. काळजी करू नकोस.”
आता अभयच्या थोडं थोडं लक्षात यायला लागलं - आपल्याला सही बघितल्यावर जे भास होतात, ते भास म्हणजे भविष्यात घडणाऱ्या घटना आहेत. तो थोडा गांगरून गेला. त्याने याबद्दल त्यांच्या डॉक्टरांशी बातचीत केली आणि त्यांनी त्याला मानसोपचारतज्ज्ञाकडे पाठवलं. पण त्यांनी त्याची समजूत घातली की हा कदाचित योगायोग असेल.
नंतर हा विषय अभयने कुणाकडे काढला नाही, पण त्याचा अभ्यास सुरूच होता.
अभयचं शिक्षण पूर्ण झालं. त्याची नोकरी सुरू झाली. आयुष्य अगदी व्यवस्थित चालू होतं. मध्ये मध्ये त्याला भास होत होते, तो प्रत्येक प्रसंग नोंद करून ठेवत होता. त्या नोंदींचा कसा उपयोग होईल हे त्याला माहीत नव्हतं, पण आजोबांप्रमाणे अभयसुद्धा पद्धतशीरपणे सगळं नोंदवून ठेवत होता.
असेच दिवस जात होते..
अभयला कंपनीच्या कॉन्फरन्ससाठी औरंगाबादला जायचं होतं. कंपनीने फाउंटन हॅाटेलमध्ये त्याचं बुकिंग केलं होतं.
अभय औरंगाबादला पोहोचला. फाउंटन हॅाटेल खूपच छान होतं. अभय खूश झाला.
हॉटेलच्या मॅनेजरने अभयसमोर रजिस्टर ठेवलं आणि अभयला सांगितलं, “सर, तुमचे डिटेल्स लिहा आणि सही करा.”
अभयने काय काय डिटेल्स लिहायचे म्हणून वरच्या एंट्रीजवर नजर टाकली आणि तो चमकलाच. रजिस्टर बंद करून मॅनेजरकडे परत दिलं.
“काय झालं सर? तुम्ही तुमचे डिटेल्स नाही लिहिलेत. तुम्हाला रूम नकोय का?”
अभय म्हणाला “मला रूम हवी आहे, पण तुमच्याइकडे मी नाही थांबू शकत.”
मॅनेजर थोडा धास्तावला आणि म्हणाला, ”का सर? तुम्हाला चार्जेस जास्त वाटतायत का? मी सरांशी बोलून बघतो काही कमी करता येतंय का?”
अभय म्हणाला, “नको, तुम्ही कुणाशी बोलू नका. मी इकडे नाही राहू शकत. पण तुम्ही जरा काळजी घ्या, आजची रात्र तुम्हा सगळ्यांना भारी जाणार आहे.”
एवढं बोलून अभय तिथून बाहेर पडला. दुसरं हॉटेल शोधून त्यात चेक इन केलं आणि शांतपणे पडून राहिला. जे बघितलं आणि जाणवलं ते खरं होऊ नये, म्हणून मनोमन देवाची प्रार्थना करू लागला.
दुसऱ्या दिवशी कॉन्फरन्स होती. पण सगळे जण एकाच विषयाची चर्चा करत होते - फाउंटन हॉटेलमध्ये रात्री लागलेल्या आगीची. सगळे अभयला विचारत होते की त्याने फाउंटन हॅाटेलला बुकिंग केलं होतं ना? मग तिकडच्या आगीतून तो सहीसलामत कसा?
अभय सगळ्यांना सांगून दमला की त्याने फाउंटन हॅाटेलमध्ये चेक इन केलंच नाही आणि कॉन्फरन्स हॉलजवळच्या सिटी हॉटेलमध्ये रूम घेतली.
संध्याकाळी अभय हॉटेलवर आला, तेव्हा एक हवालदार त्याची वाट बघत होता. त्याने अभयला सांगितलं की “साहेबांनी बोलावलं आहे. तुम्ही माझ्याबरोबर चला.” अभयला साहेबांनी का बोलावलंय हे मात्र सांगितलं नाही.
अभय त्याच्याबरोबर पोलीस व्हॅनमध्ये बसून पोलीस स्टेशनला पोहोचला. त्याला एका रूममध्ये बसवून तो हवालदार निघून गेला. बराच वेळ गेला, कुणी फिरकलंच नाही. काय चाललंय, अभयला काही कळतंच नव्हतं. त्याला कशाला बोलावलं होतं, त्याचा काय गुन्हा होता ते न सांगता त्याला तसंच बसवून दबाव वाढवण्याचा प्रयत्न चालू होता की काय?
थोड्या वेळाने स्टेशन इन चार्ज आले.
“अचानक हॉस्पिटलमधून निरोप आला म्हणून गेलो, म्हणून तुम्हाला असं बसवून ठेवावं लागलं.”
“काही हरकत नाही सर, पण मला कशाला बोलावलं इकडे? कुणीच काही सांगत नाहीय.”
इन्स्पेक्टर जाधव म्हणाले, ”काही नाही, तुमची जरा चौकशी करायची होती. तुमचं बुकिंग फाउंटन हॉटेलमध्ये होतं, मग तिकडे न राहता तुम्ही त्या सिटी लॉजमध्ये का गेलात?”
“काही नाही साहेब, अहो, ते हॉटेल कॉन्फरन्स हॉलपासून लांब होतं, म्हणून मी विचार केला की कॉन्फरन्स हॉलजवळ असलं तर बरं पडेल, म्हणून मी सिटी लॉजमध्ये गेलो.”
“हो, पण जाण्याआधी तुम्ही त्या रिसेप्शन काउंटरवरच्या माणसाला काही वेगळंच कारण सांगितलंत. ते काय होतं? आणि रजिस्टरवर डिटेल्स लिहायला घेतल्यावर तुमच्या लक्षात आलं का, की फाउंटन हॉटेल कॉन्फरन्स हॉलपासून लांब आहे ते?”
“नाही, तसंच काही नाही. मला माझ्या कलीगचा मेसेज आला की तो सिटी लॉजमध्ये राहणार आहे, म्हणून मीसुद्धा तिकडे गेलो.”
“बरं, मग मला तो मेसेज दाखवा.”
“नाही, तो मेसेज मी डिलीट केलाय. मोबाइलची मेमरी फुल्ल आहे, त्यामुळे मला काही गोष्टी रोज डिलीट कराव्या लागतात.”
“ठीक आहे. तुमचा मोबाइल नंबर द्या. आम्ही कंपनीमधून डिटेल काढतो आणि हे शहर सोडून कुठेही जाऊ नका.”
“अहो, पण काय झालंय ? मी काय केलंय?”
“तुम्ही काय केलंय हेच आम्ही शोधून काढतोय. तुम्ही त्या रिसेप्शनवरच्या माणसाला काय सांगितलंत? आजची रात्र काळजी घ्या. त्याचा अर्थ काय? तुम्ही गेलात आणि त्या रात्री उशिरा त्या हॉटेलमध्ये आगीने तांडव केलं. दहा लोक हॉस्पिटलमध्ये आहेत.” इ. जाधव म्हणाले.
“अहो, मी काहीच केलं नाही. त्या रजिस्टरवरच्या सह्या बघितल्यावर मला जाणवलं की या लोकांवर संकट येणार आहे. काय संकट ते मला नाही जाणवलं, पण आपण तिकडे राहायला नको, म्हणून मी तिकडून निघालो.”अभय म्हणाला.
हे ऐकल्यावर इन्सपेक्टर जाधवांनी टेबलवर जोरात लाठी आपटली आणि हवालदाराला सांगितलं की “हा आपल्याला येडा पांडू समजतोय.”
इ. जाधव आता जरा कडक आवाजात म्हणाले, ”तू सांगणार आहेस का तू तिकडे काय करून ठेवलंस? तुला आग लावायला कुणी सांगितलं?”
अभयला कळेना की या इ. जाधवांना कसं सांगावं.
अभय म्हणाला, ”हे बघा सर, मला माहीत आहे तुमचा कुणाचा यावर विश्वास नाही बसणार, पण हे एक शास्त्र आहे, जे माझ्या आजोबांनी शोधून काढलं. पण त्यांना त्यात एव्हढं यश मिळालं नाही. मला थोडं थोडं जमतंय, पण कुणाचा माझ्यावर विश्वास बसत नाही. मी सही बघून सांगू शकतो काही होणार असेल तर. आणि त्या रजिस्टरमध्ये ज्या काही सह्या बघितल्या, त्यावरून मला जाणवलं की इकडे काहीतरी भयंकर होणार आहे, म्हणून मी तिकडे न राहण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मला सही दाखवा, मी तुम्हाला सांगू शकतो तुमच्या आयुष्यातले काही महत्त्वाचे प्रसंग.”
इ. जाधव बाहेर गेले आणि त्यांनी दोन प्रकारच्या सह्या आणल्या. एक कागद पुढे केला आणि विचारलं, “मला किती मुलं आहेत?”
अभयने कागद हातात घेतला, नीट निरखून बघितला आणि हसायला लागला. तो म्हणाला, “काय साहेब मस्करी करताय. ही तुमची सही नाहीय. आणि या व्यक्तीला दुसरं मूल होऊ घातलंय. म्हणजे या व्यक्तीची बायको गरोदर आहे.”
मग इ जाधवांनी दुसरा कागद पुढे केला.
“सर, हीसुद्धा सही तुमची नाहीय. ही सही एका स्त्रीची आहे. ती सध्या खूप तणावात आहे, तिचं जमलेलं लग्न कदाचित मोडेल म्हणून. पण तिला सांगा, ज्याच्याशी तिचं लग्न ठरतंय, ती व्यक्ती काहीतरी मार्ग काढेलच आणि लग्न सुरळीत पार पडेल आणि वैवाहिक जीवनही चांगलं जाईल. हा दोन महिन्यांचा काळ थोडा कठीण आहे, पण तिने धीर सोडू नये.”
आता इ. जाधव चकित झाले. त्यांनी सर्व स्टाफला बोलावलं आणि अभयला सांगितलं की "सांग, यापैकी कुणाची ही सही आहे." अभयने बरोबर सबइन्सपेक्टरकडे बोट दाखवलं आणि म्हटलं, "याला दुसरं मूल होणार आहे." नंतर त्याने बिगर युनिफॉर्ममधल्या क्लार्ककडे बोट दाखवून म्हटलं, ”या खूप तणावात आहेत सध्या. यांची सही आहे ती.”
इ. जाधव आता विचारात पडले होते. ते तसेच बाहेर निघून गेले. त्यांनी त्यांच्या माणसांना सांगितलं की ”आता जाऊ द्या त्याला. सकाळी परत १० वाजता बोलवून घ्या.”
अभय पोलीस स्टेशनमधून निघाला, तेव्हा विचार करत होता की यांनी आपल्याला चौकशीसाठी का बोलावलंय.
सकाळी १० वाजता तो पोलीस स्टेशनला पोहोचला. आता त्याने ठरवल्याप्रमाणे इ. जाधवांना विचारलं, ”साहेब, तुम्ही माझी चौकशी का करताय?”
तेव्हा त्याला इ. जाधवांनी सांगितलं की “तू त्या रिसेप्शनवरच्या माणसाला सांगितलंस आजची रात्र काळजी घ्या. आणि त्याच रात्री भयंकर आग लागली. मग सीसीटीव्हीमध्ये तुला बघून आम्ही शोध घेतला तू कुठे राहिला आहेस. आता तू आग लावलीस की तो एक अपघात होता, याची चौकशी आम्ही करतोय.”
अभय म्हणाला, ”खरं म्हणजे माझंच चुकलं. मी असं निघून जाण्याऐवजी होणाऱ्या घटना टाळायचा प्रयत्न करायला हवा होता. पण सर, तुम्हीच सांगा, कुणी माझ्यावर विश्वास ठेवला असता का? मी कसं सांगणार होतो की या रजिस्टरवर ज्यांनी एंट्री केल्यात त्यांच्या जिवाला धोका आहे?”
इ. जाधव म्हणाले, “मला पटलंय अभय तुझं म्हणणं. पण आज कमिशनरसाहेब येणार आहेत तुला भेटायला. त्यांची भेट झाल्यावर तू जाऊ शकतोस.”
कमिशनरसाहेब आल्यावर त्यांनी अभयकडून सर्व काही समजून घेतलं आणि पोलीस दलाला त्याच्या या विद्येचा काही उपयोग करून घेता येईल का, याचा विचार करायला त्यांनी अभयला सांगितलं.
अभय पोलीस स्टेशनमधून निघाला. आता त्याला घरचे वेध लागले होते.
घरी पोहोचल्यावर रमाने विचारलं, “काय रे, कॉन्फरन्स लांबली तुझी? आणि तू फाउंटन हॅाटेलला उतरणार होतास ना, मग सिटी लॉजला का उतरलास?”
“आई, मी तुला सर्व नंतर सांगतो. आता मला झोपू दे. खूप दमलोय मी.”
“बरं, झोप तू. आधी गरम गरम खिचडी खा, म्हणजे शांत झोप लागेल तुला.”
सकाळी जेव्हा अभयने आईला सर्व सांगितलं, तेव्हा ती एवढंच म्हणाली, ”अरे, म्हणूनच बाबांनी त्यांच्या या अभ्यासाबद्दल कधीच कुणाला सांगितलं नाही. तूसुद्धा काही बोलू नकोस याबद्दल.” अभयने काही न बोलता फक्त मान हलवली.
असेच दिवस जात होते. ज्यांच्या ज्यांच्या सहीचा नमुना मिळत होता, त्याचा अभ्यास चालूच होता. वह्यांवर वह्या भरून नमुने मिळाले होते. अभय कधी कधी अस्वस्थ असायचा, पण त्याने कधीच कुणाला काही सांगितलं नाही.
एक दिवस मात्र अभय बोलला, कुणाचीही काहीही पर्वा न करता बोलला. आपल्या बोलण्यावर ठाम राहिला आणि लोकांना त्याचं ऐकावं लागलं.
कंपनीचे सीईओ आले होते. मीटिंग्जवर मीटिंग्ज सुरू होत्या. बरेच डिसिझन्स घेतले गेले. अभय मनापासून सर्व करत होता. पण ज्या दिवशी सीईओ जायला निघाले, तेव्हा अभयने सांगितलं की “सर, तुम्ही आज या फ्लाइटने जाऊ नका. आजचा दिवस थांबा, उद्या जा.”
पण सीईओंना कारण काय सांगायचं, ते अभयला समजत नव्हतं. त्याच्या हेड ऑफिसमध्ये महत्त्वाच्या मीटिंग होत्या. पुढच्या आठवड्यात जॅपनीज डेलिगेट्स येणार, त्यांच्यासाठी तयारी करायची होती.
सीईओ श्री. राव अभयला विचारत होते, “मि. अभय, काय पोरकटपणा चालवलाय तुम्ही? तुम्ही आताच्या आता निघून जा, नाहीतर मला मेमो द्यावा लागेल.”
अभय आपल्या सांगण्यावर ठाम होता. तो म्हणाला, ”सर, तुम्ही मला डिसमिस केलं तरी चालेल, पण तुम्हाला त्या विमानाने प्रवास करू देण्याची रिस्क मी नाही घेऊ शकत.”
आता मात्र सगळेच बुचकळ्यात पडले होते. अभय म्हणत होता, "थोडा वेळ थांबा, तुम्हाला कळेलच सगळं."
आता अभयने सीईओ राव यांची रूम बाहेरून बंद केली आणि सिक्युरिटीला सांगितलं की,
“हे दार जर उघडलंस तर गाठ माझ्याशी आहे.” आणि अभय तिकडेच सिक्युरिटीच्या जागेवर पहारा देत उभा राहिला.
साठेसाहेबांनी आता पोलिसांना फोन केला आणि सांगितलं की “आम्हा सगळ्या स्टाफसकट आमच्या सीईओ रावना होस्टेज केलंय. लवकर येऊन आम्हाला सोडवा.” पोलिसांनी विचारलं की “ज्याने तुम्हाला होस्टेज केलंय, त्यांच्याकडे हत्यार आहे का?”
यावर साठेसाहेबांनी सांगितलं की “अहो साहेब, आमच्याच एका स्टाफने आम्हाला कोंडून ठेवलंय.”
“पण त्यांना काय हवंय? त्यांच्या मागण्या काय आहेत?”
“अहो, त्या अभयचं म्हणणं आहे की आमच्या सीईओ राव यांनी आज विमान प्रवास करू नये. म्हणून अभयने आम्हा सगळ्यांना कोंडून ठेवलंय.”
इ. पाटीलांना आता हसू आवरेना, त्यांनी साठेंना विचारलं, ”अहो, मग राहू देत ना आजच्या दिवस त्यांना. उद्या जातील ते. आज त्यांना पुणे दर्शन करू देत.”
साठे म्हणाले, ”अहो साहेब, मस्करी नाहीय ही. तुम्ही लवकर या. रावसाहेबांना विमान पकडायचं आहे.”
थोड्या वेळातच इ. पाटील आले. त्यांनी अभयला बाजूला करून ऑफिसचा दरवाजा उघडला. सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पण अभय ठाम होता. त्याने इ. पाटीलांना सांगितलं की “तुम्ही मला अरेस्ट करा, तुरुंगात टाका, काहीही करा, पण मी आज रावसाहेबांना जाऊ देणार नाही म्हणजे नाही.”
इ. पाटीलांनी अभयला विचारलं, “काय रे, तुला काय गांजा कमी पडला काय? तू त्यांना का जायला देत नाहीयेस?”
अभय म्हणाला, ”हे बघा, मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. पण थोडा वेळ थांबा, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि मि. रावसुद्धा माझे आभार मानतील. पण आता तुम्ही माझं ऐका, यांना थांबवा.”
पाटीलही चक्रावले होते. हा माणूस या रावसाहेबांना थांबवायला काहीही करायला तयार होता. त्यांनी रावसाहेबांना सांगितलं की “जर हा माणूस तुम्हाला थांबवण्यासाठी काहीही करायला तयार आहे, तर आपण बघू या पुढे काय होतंय.”
विमानाची वेळ झाली. आता अभय रिलॅक्स झाला होता. अभय रावसरांना पुण्यात थांबवण्यात यशस्वी झाला होता. तासाभरात विमान बंगळुरू एअरपोर्टला लँड होणार होतं.
अभयने इ. पाटीलांना सांगितलं होतं की “तुम्ही थोडा वेळ थांबा, तुम्हाला सर्व खुलासा करतो.”
विमान लँडिंगच्या वेळी एका पक्ष्याची विमानाच्या इंजिनाला धडक लागली आणि विमानाच्या इंजीनला आग लागली. विमान लँड होताना क्रॅश झालं. विमानातलं कुणीच वाचलं नाही. टीव्हीवर बातमी बघताच सीईओ राव यांनी प्रथम अभयला मिठी मारली. त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते.
आता परत अभयला पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायचं होतं. पण रावसरांच्या विनंतीवरून पोलिसांनी अभयला तिथेच प्रश्न विचारायला सुरुवात केली.
“तुला कसं कळलं की त्या विमानाला काहीतरी होणार आहे?”
अभयने शांतपणे सांगितलं, “मला कसं कळलं हे मी जरी तुम्हाला सांगितलं, तरी तुमचा विश्वास नाही बसणार.”
इ. पाटील अभयला म्हणाले, ”बोल, आम्ही ऐकतोय.”
अभय सांगू लागला, ”हे एक शास्त्र आहे. माझ्या आजोबांनी याचा शोध लावला, पण कधीच कुणाला याबद्दल सांगितलं नाही. मी लहान असताना त्यांना खूप प्रश्न विचारायचो. पण त्यांनी कधीच मला काही सांगितलं नाही. मी लहान असतानाच ते गेले. मी मोठा झाल्यावर त्यांच्या नोट्स बघितल्या आणि झपाटल्यासारखा याचा अभ्यास सुरू केला. पुष्कळ लोकांच्या सह्या गोळा केल्या. वेगवेगळ्या क्षेत्रांतले लोक, मग त्यांनी ते क्षेत्र का निवडलं असेल वगैरे गोष्टींचा मी अभ्यास केला आणि काही बाबतीत टाचणंही करून ठेवली. हे सगळं करता करता मला कधी कधी सही करणाऱ्या माणसाच्या जिवाला जर धोका असेल, तर जाणवायला लागलं. पाटीलसाहेब, तुम्हाला काही वर्षांपूर्वी औरंगाबादमधल्या फाउंटन हॉटेलला लागलेली आग आठवतेय का? मी त्या रात्री तिकडे राहणार होतो, पण जेव्हा रजिस्टरवरच्या सह्या बघितल्या, तेव्हा मी तिकडे न राहण्याचा विचार केला आणि सिटी लॉजला राहिलो. पण जाता जाता मी रिसेप्शनवरच्या माणसाला रात्री काळजी घ्यायला सांगितलं आणि मीच घातपात केलाय म्हणून मला पोलिसांनी पकडलं. मी निर्दोष आहे हे सिद्ध करताना मला फार त्रास झाला. घरी आल्यावर आईला वचन दिलं की मी हा अभ्यास थांबवीन. पण गेले दोन दिवस जेव्हा मी रावसरांच्या सह्या बघत होतो, तेव्हा मला जाणवत होतं यांच्यावर गंडांतर आहे, मृत्युयोग आहे, म्हणून मी आईला दिलेलं वचन मोडून सरांना थांबवण्यासाठी हे सगळं केलं. आता त्यांना पुढची काही वर्षं काही धोका नाहीय. त्यांची खूप प्रगती होणार आहे.”
हे सगळं भराभर बोलून अभय थांबला. रूममध्ये शांतता पसरली होती. प्रथम इ. पाटील भानावर आले. त्यांनी अभयला सांगितलं की “ठीक आहे, पण मी तुझ्यावर तेव्हाच विश्वास ठेवीन, जेव्हा तू मला तुझ्या आजोबांच्या वह्या दाखवशील.”
साठेसाहेबांनी इ. पाटीलांना सांगितलं की “सर, तुम्हाला आम्ही इकडे बोलावलं, पण आमची अभयविरुद्ध काहीच तक्रार नाहीये.”
इ. पाटील अभयला म्हणाले, ”अभय, यापुढे तू तुझ्या या विद्येचं काय करावं हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे. पण तुला जर असं काही जाणवलं तर तू पोलिसांची मदत घ्यावीस. आणि हा माझा आदेश आहे.”
अभय ने इ. पाटीलांना सांगितलं की “नक्कीच सर, मी यापुढे पोलिसांची मदत घेईन.”
बाहेर ऑफिसमध्ये अभयच्या सत्काराची तयारी चालू होती. पण अभयने नम्रपणे सगळ्यांना सांगितलं, “मी हा सत्कार स्वीकारू शकत नाही. मला खूप वेळा जाणवलं होतं की समोरच्या व्यक्तीवर गंडांतर आहे, पण मी सगळ्यांना नाही वाचवू शकलो. रावसरांना वाचवू शकलो याचा मला आनंद होतोय, पण माझ्या आजूबाजूच्या सर्व लोकांना संकटापासून वाचवीन, तेव्हाच सत्कारास पात्र होईन.”
आणि इ. पाटीलांची परवानगी घेऊन अभय ऑफिसमधून निघाला. अभयचे सगळे कलीग अभय गेल्यावर त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत प्रार्थना करत राहिले, “देवा, अभयला त्याच्या कामात यश दे.”
सौ सरिता सुभाष बांदेकर
प्रतिक्रिया
3 Nov 2021 - 9:52 am | जेम्स वांड
ऑकल्ट टच असणाऱ्या कथांना जसं गूढ वलय असतं तसं जाणवतं आहे, मस्त शैली अन वर्णन, शेवट थोडा अर्धवट वाटला, नंतर अभयच्या विद्येची मदत पोलिसांना कशी झाली वगैरे थोडं असतं तर अजून भारी वाटलं असतं, हे माझं वैयक्तिक मत आहे हो.
3 Nov 2021 - 1:27 pm | चौथा कोनाडा
व्वा, अ ति श य रोचक कथा ! +१००१
वाचायला सुरुवात केली ते शेवटालाच येऊन थांबलो !
👌
झकासमस्त शैली. अभयच्या पुढच्या मोहिमेची उत्सुकता लागली !
पुढचा भाग नक्की येऊ देत !
3 Nov 2021 - 10:27 pm | मुक्त विहारि
छान सिनेमा होऊ शकतो
5 Nov 2021 - 12:00 am | स्मिताके
छान कल्पना आणि उत्कंठा वाढवणारी शैली आवडली.
5 Nov 2021 - 10:24 pm | कर्नलतपस्वी
अभीनंदन
6 Nov 2021 - 12:37 am | तर्कवादी
सुरेख आणि आटोपशीर...
6 Nov 2021 - 12:14 pm | चित्रगुप्त
वेगळ्याच विषयावरील कथा आवडली.
6 Nov 2021 - 12:14 pm | चित्रगुप्त
वेगळ्याच विषयावरील कथा आवडली.
6 Nov 2021 - 12:46 pm | श्वेता व्यास
कथाविषय आणि कथा दोन्ही आवडले.
6 Nov 2021 - 2:03 pm | रंगीला रतन
सही रे सही :=)
मस्त कथा.
7 Nov 2021 - 5:42 pm | सरिता बांदेकर
मन:पूर्वक धन्यवाद,
जेम्स,चौ.को.,मुवि,स्मिता,कर्नल,तर्कवादी, श्वेता,चित्रगुप्त,रंगीला रतन तुम्हा सर्वांचे आभार.
मी जरा साशंक होते या विषयावर लिहीलेलं लोकांना आवडेल का,पण नक्की अभयने मदत केलेल्या लोकांबद्दल लिहीन पुढच्या भागात.
युरोपमध्ये एक संशोधक होता त्याने ‘ सही ‘या विषयावर खूप संशोधन केले आहे.मी कॅालेजमध्ये असताना त्याबद्दल वाचलं होतं. म्हणून लिहीलं.त्याने एक खून होण्यापासून रोखला होता. दुर्दैवाने मला त्याचे नांव आठवत नाहीय.
पण ही कथा त्यावरून प्रेरणा घेऊन लिहीली आहे.
7 Nov 2021 - 7:19 pm | तुषार काळभोर
रोमांचक कथा.. या कल्पनेवर कथामालिका करता येईल...
8 Nov 2021 - 9:43 pm | सरिता बांदेकर
धन्यवाद. लोकांना आवडेल का याचाच विचार करत ही कथा लिहीली. आता असं वाटतंय पुढचे भाग लिहायला हरकत नाही.
12 Nov 2021 - 11:36 pm | सौंदाळा
कथा छानच पण त्या मानाने शेवट अगदीच साधा वाटला.
आंबोळी यांच्या 'कंदील' कथेची आठवण झाली.
13 Nov 2021 - 1:19 am | अनन्त अवधुत
सहीवरून स्वभाव सांगणे माहिती होते, पण ह्या कथेने ते प्रकरण वेगळ्याच स्तरावर नेले.
शेवट थोडा घाईत केला असे वाटते.
13 Nov 2021 - 9:12 am | Bhakti
छान कथा.
13 Nov 2021 - 10:27 am | सरिता बांदेकर
धन्यवाद,
अ.अ.,भक्ती,सौ.
होय शेवट घाईत झाला माझ्याकडून कारण मी साशंक आहे या कल्पनेला कसा प्रतिसाद मिळेल.
अनंतजी होय सहीवरून स्वभाव कळतो.थोडाफार.
मी कॅालेजमध्ये असताना ज्योतिष शास्राचा अभ्यास म्हणून सह्या गोळा करून काही टिपणं लिहीली होती.
ती वाचल्यावर लक्शात आलं काही गोष्टी खऱया झाल्या आहेत. म्हणून ही कथा रचली.
पण नंतर लोकांना आवडेल की नाही ही शंका आली म्हणून अर्धवट सोडली.
13 Nov 2021 - 10:27 am | सरिता बांदेकर
धन्यवाद,
अ.अ.,भक्ती,सौ.
होय शेवट घाईत झाला माझ्याकडून कारण मी साशंक आहे या कल्पनेला कसा प्रतिसाद मिळेल.
अनंतजी होय सहीवरून स्वभाव कळतो.थोडाफार.
मी कॅालेजमध्ये असताना ज्योतिष शास्राचा अभ्यास म्हणून सह्या गोळा करून काही टिपणं लिहीली होती.
ती वाचल्यावर लक्शात आलं काही गोष्टी खऱया झाल्या आहेत. म्हणून ही कथा रचली.
पण नंतर लोकांना आवडेल की नाही ही शंका आली म्हणून अर्धवट सोडली.