body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}
.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}
.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}
जानबाच्या मिशा भल्यादांडग्या होत्या. माणूस चिमणीएवढा, पण मिशा दांडग्या. काळ्याभोर.. अगदी कलप लावल्यासारख्या. त्याला मधून मधून मिशांवरून हात फिरवण्याची सवय होती. म्हणजे मिशांना ताव दिल्यासारखं नाही, तर नुसताच हात फिरवल्यासारखं. पण त्या मिशा त्याच्या खंगलेल्या, पडलेल्या चेहर्यावर एकदम पिळक्या, बाहेरून लावल्यासारख्या दिसत असत. जानबा माणूस म्हणाल तर एकदम फाटका. घरचं बरं होतं, अगदीच काही उपासमार होण्यासारखं नव्हतं, पण जानबाचा चेहरा कायम उपासमारीने मरायला टेकल्यासारखा दिसत असे. त्याचे रडके डोळे सदा झोपेला आल्यासारखे आणि बोट बोट खोल गेलेले दिसत असत. गाल खपाटीला गेलेले आणि चेहर्यावरची रयाच पार गेलेली. बरं, त्याचं खाणंही चारचौघासारखं - किंबहुना चारचौघांपेक्षा जरा चढंच होतं. परडीच्या जेवणाला गव्हाची हुग्गी खायला बसला की दोन-तीन पत्रावळी तरी हमखास उठवणार. शिवाय भात, वांग्याची भाजी, हापळा आणि शाक घेणार ते वेगळंच. पण एवढं खाऊनही त्याच्या अंगाला म्हणून लागत नसे. कायम मरतमढंच. सकाळ-संध्याकाळ तो माप दीड माप म्हशीचं दूध पीत असे, पण अंग आहे तसंच. त्याचा आवाजही अगदी कुरकुरा, बारीक आणि तक्रार केल्यासारखा होता. त्यांने काहीही सांगितलं तर ते खरं वाटत नसे. दादा त्याला शेंगातली भांगलण सगळी झाली का "जानबा, कस्पाट सगळं पाक निघालं का" असं विचारत आणि त्यावर होय म्हणून जानबा जे सांगत असे, ते नाही म्हणून सांगितल्यासारखंच वाटत असे. त्याच्या अंगावर कपडे अगदी स्वच्छ असत, पण त्याच्या सासनकाठीसारख्या अंगावर ते बुजगावण्यासारखे दिसत असत आणि चालताना त्याचे झोल जात असत. कधीकधी चालताना जानबाचा ज्या बाजूचा हात त्याच बाजूचा पाय पुढे पडत असे. अगदी आत्ता पानावरून उठला आणि हात धुवायला निघाला, तरी आत्ता पडतो की मग पडतो अशी जानबाची चाल असे.
जानबाची स्वत:ची अशी काही जमीन नव्हती. कुणाच्या तरी शेतावर कामाला जायचं आणि पोटाला खायचं, असंच त्याचं धोरण होतं. बरं, येऊन जाऊन दोघं दाल्ला-बायको. काय पोटाला पोर नाही की बाळ नाही. दोघांना लागून लागून लागणार किती? जानबा पैल्यापासून माणूस कमरेत ढिलाच. त्याला हलकी कामंच जमत असत. भांगलायचं काम झालं, तरी दोन्ही टाइम भांगलण्याइतका त्याच्यात जोर नव्हता. नांगरट किंवा औताला तर जानबा काहीच कामाचा नव्हता. त्याच्या बरोबरीचे लोक पहाटे उठून गहू नाहीतर खपली कापायला जात आणि जानबाला सात वाजून गेले तरी झोप आवरत नसे. माळ्याचा सदा आणि हुसन्या शिकलगार दोघं दीस उजाडायच्या आत एक एकर गहू आडवा करत. "जानबा, लई जड काम न्हाई लगा. पाटेच्या पारी घवू मऊ पडल्येला अस्तुय. लोनी कापल्यावानी हात चालतुय सरासरा. चल की एखांदेळा" त्यांच्यातलाच कुणीतरी जानबाला म्हणत असे, पण जानबाचं एक नाही की दोन नाही. पाटलाच्या मळ्यात कामाला जाणारे लोक बैलं जोडून बघता बघता दोन एकर उसाची भरणी करून टाकत. बोदावर घातलेला ताग मोडून मातीआड होई आणि सरीतला ऊस हिरव्या-पिवळ्या नागाने चिरडीला येऊन फडी काढावी तसा वर येई. वाफसा आलेल्या काळ्याभोर जमिनीतून बारीक वाफांच्या लाटा उठत आणि एका रांगेत तरारलेला हिरवाकाळा ऊस आणि त्याच्या पायाला असलेली गावंदरी जमीन हे चित्र बघणार्याच्या नजरेत मावत नसे. काळ्याभोर उसात मध्ये मध्ये डोलणारी पिवळ्याधमक फुलावर आलेली मोहरीची रोपं वार्यांने हलत असत आणि ती एखाद्या काळ्याशार पण जवान बाईने गळ्यात सोन्याचं नवीन डोरलं घालावं आणि तिने ताक करताना तिच्या हलत्या अंगाबरोबर तिच्या गळ्यावर उजेड पडून ते डोरलं लकलकावं, तशी दिसत. तरणे गडी इरेला पडून भाकरीचा टाइम व्हायच्या आत सगळी भरणी संपवून टाकण्याची भाषा करत आणि जानबा एका अंगाला बसून जांभया देई. हलकी कामं, तीपण दुपारपर्यंत, असलं काही असलं तरच जानबाचा काहीतरी उपयोग होता. तो आपला एक टाइम कुणाकडं तरी भांगलायला जाई आणि मग दुपारची भाकरी खाऊन झाली की घरात म्हातार्या माणसासारखा गडद झोपून टाके. सकाळी न्ह्यारीला दूध भाकरी आणि खर्डा खाल्ला असला तर जानबा बारा वाजायच्या आतच ताक कण्या खाई आणि खालवर वाकळा घेऊन निवांत झोपून जाई. कुणी शेतकरी माणूस गावाला गेला आणि त्याच्या गाईम्हशींना दिवसभर वैरण टाकायची असली, पाणी दाखवायचं असलं तर तेवढं जानबाला कसंबसं जमत असे. त्या शेतकर्याला परत यायला उशीर झाला आणि त्याची म्हैस अगदीच गरीब असली, तर जानबा तिच्या धारेला बसत असे. त्यातून अनोळखी हात बघून त्या म्हशीनं जरा पाय उचलल्यासारखा केला की जानबा घाबरून मागच्या मागं धडपडत असे आणि त्याने काढलेलं माप दोन माप दूध लवंडत असे. जानबा मग त्या म्हशीला आपल्या फाटक्या अंगाला आणि किरट्या आवाजाला न शोभेल अशा चार शिव्या घालत असे आणि उरलेलं दूध काढण्याच्या भानगडीत न पडता म्हशीच्या रेडकाला तिच्या कासेला लावत असे. दूध मिळालं नाही म्हणून त्या शेतकर्याची बायको जानबाला शिव्या घालत असे आणि सगळं दूध पिऊन पोट बिघडलेलं रेडकू पुढं चार दिवस डरंगाळत असे.
गावात जानबासारखा दाखवायला शेळपट माणूस नव्हता, तशी त्याच्या बायकोसारखी - सोनाबाईसारखी बाईही नव्हती. सोनाबाई रूपाने असूने इतकी देखणी आणि अंगाने असूने इतकी जवान होती. तिचा रंग सिनेमाच्या पोस्टरमधल्या बाईसारखा होता आणि तिच्या नाकाला झकास टोक होतं. चिमकुरा काढला तर रक्त येईल अशी तिची कातडी होती. सोनाबाई तरणी होती आणि मागनं-पुढनं चांगली गोल भरलेली होती. तिचे दात एकसारखे आणि अगदी स्वच्छ होते. तिच्या बरोबरीच्या बायकांसारखी दातवण नाहीतर तंबाखूची मिश्री लावायची सवय तिला नव्हती. तिच्या डोळ्यांसारखे घारे डोळे तर कधीकधी माळावर लमाणांची पालं पडत त्यातल्या बायकांचे कधी असले तर असतील असं वाटत असे. तिची लुगडी साधी पण स्वच्छ असत आणि तिनं एखाद्या वेळी दंड घातलेलं लुगडं जरी नेसलं, तरी ते बघणार्याला कळूने अशा खुबीनं ती ते नेसत असे. एकावर एक निर्या घातलेलं नऊवारी लुगडं नेसून सोनाबाई अंगभर पदर घेत असे. चुकून वार्याने तिचा पदर बाजूला गेला, तर तिचं सपाट आणि खरवसाच्या रंगाचं पोट दिसत असे. पाठीचा कणा ताठ ठेवून सोनाबाई रस्त्यानं चटाचटा चालायला लागली की काही कामधंदा नसलेली सकाळपासून पांढरीधोट कापडं घालून उगीचच एस टी स्टँडवर कुठे ह्याच्याबरोबर म्हैस बघायला जा, कुठे त्याचा कागद आहे म्हणून तालुक्याला जा, कुठे याच्या शेतात पाणी दाखवायला पाणक्या आलाय म्हणून त्याच्याबरोबर जा असं करत दिवस काढणारी माणसं उगीच खाकरा काढत आणि एकमेकांना डोळे घालत. पण सोनाबाई देखणी असली आणि तिचा नवरा असला मिलमिशा असला, तरी ती बाई सैल कासोट्याची नव्हती. तिच्यासारख्या देखण्या बाईवर गावातल्या शंभर लोकांचा डोळा होता, पण सोनाबाईचा नाद करायची कुणात शामत नव्हती. तिच्याकडे वाकड्या नजरेनं बघणं तर सोडाच, पण तिच्याशी बोलतानाही कुणी लघळपणा केला असता, तर सोनाबाईने सरळ चपलेला हात घातला असता. जानबासारखा ह्यांगशा नवरा असूनही सोनाबाई गावात अब्रूनं राहत होती. आपण बरं आणि आपलं काम बरं असा सोनाबाईचा ठेका होता.
सोनाबाई कामाला वाघ होती. आई माजघरातल्या भिंती उभ्याने सारवायला घेत असे, तेव्हा तिला हाताखाली सोनाबाईच लागत असे. गडी माणसासारखी सोनाबाई शिडीवर चढून पोतेर्याने सरासरा उजव्या-डाव्या हाताने भिंत सारवून घेत असे आणि मातीचा खमंग वास सुटलेलं माजघर नवीन होऊन बसत असे. उन्हाळ्याच्या दिवसांत घरी दिक्क नाही तेवढे पाव्हणे येत आणि आई अगदी सैपाकाला नाही तरी वरकामाला तरी हटकून सोनाबाईला बोलावणं पाठवत असे. आई एकीकडे भाकरी करता करता सोनाबाईला कामं सांगे आणि सोनाबाई आपण बरं आणि आपलं काम बरं असं म्हणून भराभरा ती कामं उरकत जाई. चार बारड्या भिजवून ठेवलेलं धुणं धुऊन वाळत घालणं, भाजीला बावच्या किंवा वरणे निवडून देणं, धुण्या-भांड्याची अंबू आली नाही की पडलेली सगळी भांडी घासून स्वयांपाकघरातल्या कट्ट्यावर पालथी घालणं आणि साळुत्याने सगळं घर झाडून घेणं हे सगळं सोनाबाई झपाझप करत असे. मक्याच्या कणसाची उसळ करायची झाली तर सोनाबाई घुसळलेल्या ताकावराचं लोणी काढावं तशी सरासर कणसं सोलत असे आणि बघता बघता ती खिसून परातभर पांढराशुभ्र खीस काढत असे. आईची फोडणी होईपर्यंत सोनाबाई बुरकुंडं परड्याच्या कौलावर वाळत घालून, हातपाय धुऊन दुसर्या कामाला लागलेली असे. परत खिसताना एक दाणा खाली सांडणार नाही की लवंडणार नाही. सोनाबाईचं काम एकदम स्वच्छ आणि टापटिपीचं. आणि उरका तर एवढा की सकाळी लवकर उठून, अंग धुऊन, आमच्या घरातली कामं करून आपल्या घरातली कामं करून भाकरी बांधून घेऊन ती शेतावर सगळ्यांच्या आधी कामाला लागत असे. पावसाळा सुरू झाला आणि मरका, चिरचिरा पाऊस सुरू झाला की गावातल्या टाण बायकासुद्धा थंडीतापाने आजारी पडत आणि दिवसदिवस टक्कुचं बांधून डोस्कं धरून बसत. सोनाबाई आजारी म्हणून पडल्याचं कुणाला आठवत नव्हतं. पावसाळ्यात शेतातली कामं थंड होत, त्या वेळी सोनाबाई कुणाकुणाच्या घरी कामाला जात असे. एखाद्या बाळ-बाळंतिणीला तेल लावून, अंग रगडून ऊन पाण्याने अंघोळ घालणं म्हणा, एखाद्याच्या घरच्या खपल्या, हुलगे, तूर निवडून देणं म्हणा, कुणाच्या घराची दळणं करणं म्हणा. सोनाबाईचं काही ना काही चालूच असे. एवढं करून तिच्या बरोबरीच्या सगळ्या बायकांपेक्षा तिचं घर जास्त स्वच्छ असे. सकाळी कितीही गडबड असली, तरी सोनाबाईच्या घरासमोरचा शेणकाला चुकत नसे. तिच्या घरासमोरच्या अगदी लहान बागेत तिने लावलेले झेंडू तरारलेले असत आणि उन्हाळ्यात राती तिच्या परड्यातल्या मोगर्याच्या सुगंधाने सगळी गल्ली घमघमत असे.
आपण बरं आणि आपलं काम बरं असं माणसाने राहिलेलं जगाला आवडत नाही. सोनाबाई लोकांच्यात मिळून मिसळून राहत असली, तरी इतर बायकांसारख्या कुणाच्या माघारी चहाड्या करणं, वचावचा तोंड करणं, रस्त्यात निष्कारण अर्धा अर्धा तास इकडचं तिकडचं बोलत उभारणं, तोंडाला पदर लावून फिदीफिदी हसणं असलं काही ती करत नसे. तिला व्यवहार चांगला समजत होता. कुणाची म्हातारी अंथरुणावर पडून असली आणि तिला अन्न गोड लागत नसलं की सोनाबाई आपणहोऊन तिच्या घरी उदंड साखर घातलेली शाबूची खीर म्हणा, घासभरच का होईना, मऊ भात, तूप आणि लालभडक लिंबाच्या लोणच्याच्या दोन फोडी म्हणा, अगदी म्हातारीला काहीच गळ्याखाली उतरत नसलं तर मूठभर देशी मूग भाजून त्यात कणभर खडेमीठ घालून केलेलं कढण नाहीतर हिंग, मीठ आणि जिर्याची पूड घातलेलं पेलाभर ताजं ताक असलं काहीतरी घेऊन जात असे आणि म्हातारीला स्वत:च्या हातानं भरवून तिचा आशीर्वाद घेत असे. कुणाच्या घरी म्हैस व्याली आणि सोनाबाईच्या घरी गडूभर पिवळाजर्द गिन्ना आला, तर त्यात जोंधळ्याची मूठ टाकल्याशिवाय तो गडू सोनाबाईच्या घरून तसाच परत जात नसे. दिवाळीत चार घराचं फराळाचं सोनाबाईच्या घरी येत असे, पण सोनाबाईच्या घरनं जाणार्या कडाकण्या सगळ्यात खुसखुशीत असत आणि तिच्यासारखे खमंग धपाटे तर गावात कुणाला करायला येत नसत. एवढं सगळं असूनही सोनाबाईबद्दल गावातल्या बायका काही बरं बोलत नसत. तोंडावर कुणी काही म्हणत नसे, पण तिच्या माघारी तिला ‘लई हाय व्हयमाली’ असं तिच्यासंगटच्या बायका म्हणत. तिच्या रूपाला, तिच्या हुर्रीला आपण कुठे पुरं पडत नाही. याबद्दल असलेला तो दुस्वासच असे. सोनाबाईच्या हे कानावर येत नव्हतं असं नाही, पण त्यामुळं तिचं मन कधी कडू झालं नाही. सोनाबाई वेगळीच होती.
आबा पुर्या मापाचा आणि उभ्या आडव्या अंगाचा गडी होता. तो रंगानं सावळा होता, पण त्याचे हातपाय वडाच्या झाडाच्या फांद्यासारखे होते. दणकट अंगाचा आबा दिसायला देखणा आणि स्वभावानं साधा आणि प्रेमळ होता. खेडेगावात नुसती दोन वेळची भाकरी खाऊन जगणंसुद्धा एवढं अवघड होतं की ती पीडा विसरायला म्हणा नाहीतर आणखी कशाला म्हणा, आबाच्या बरोबरीचा प्रत्येक जण कसल्या ना कसल्या नादात गुंतलेला होता. कुणी संध्याकाळ झाली की गावातच राजरोसपणे चालणार्या सुंदाच्या देशी दारूच्या गुत्त्यावर जात, पाच-दहा रुपयांची गावठी दारू उभ्याउभ्याच घशात ओतत आणि पोटात आणि डोक्यात तो जाळ घेऊन शिव्या देत घराकडे चालू लागत. ते न करणारे स्वस्तात मिळणार्या कडक बिड्या ओढत. गावातल्या शेतांत कुठेकुठे आडोशाला लावलेली गांजाची झाडं होती. तो माल विकणारेही लोक होते. चिलमीत गांजा भरून त्या चिलिमी लावणारे लोक, संख्येने कमी, पण होतेच. बाकी पान-तंबाखू खाणारे तर सगळेच. आबा सुपारीसुद्धा खात नसे. कधीतरी गावाच्या जत्रेला बैलगाड्यांच्या शर्यती बघून परत येताना त्याच्या शिणेच्या लोकांनी फारच आग्रह केला, तर आबा एखादी बडीशेपेची बिडी ओढत असे, पण तेसुद्धा गंमत म्हणून नाकातून धूर काढण्यासाठी. पण तेही नाहीच.
आमच्या रानाच्या बांधाला लागून आबाचं रान होतं. त्याच्यासारखा शेतकरी गावात नाही असं लोक म्हणत असत आणि ते खरं होतं. त्याची तीन एकराची पट्टी त्यानं दृष्ट लागावी अशी स्वच्छ ठेवली होती. त्याच्या रानात ऊस तर होताच, तर ऊस मोठा होईपर्यंत आबा त्यात हरनमुन्याची पिकं घेत होता. शेंगा म्हणा, मिरची म्हणा, फुलवर म्हणा, तूर म्हणा, उसात काही ना काही पीक आबा घेतच असे. वैशाखात उन्हाचा ताव वाढला आणि रखरख सुरू झाली की अचानक विहिरीचं पाणी आटत असे. बाकीच्यांचा ऊस मरगळून मान टाके, पण आबा हरप्रकारे ह्या तळ्यातनं पाणी ओढ, ह्याच्याकडनं पाण्याची एक पाळी घे असं करून ऊस जगवत असे. उसातल्या कडेच्या चार सर्यांत घातलेल्या कडवळावर आबाची बायको दोन म्हशी बाळगून होती आणि त्या दुधावर ती आबाच्या दोन पोरींच्या शाळेचा आणि म्हातारा-म्हातारीच्या दवापाण्याचा खर्चा बाहेर काढत होती. बघावं तेव्हा आबा शेतात राबताना दिसत असे. जाता-येता सरीतलं तणकाट तो खुरप्यांनं नाही तर हातानं उपसून टाकत असे. त्याच्या शेतातल्या दोनच सर्यांत घातलेल्या बावच्या काढायला गेलं की बुट्टी भरून जाई आणि एका अंगाला घातलेले कांद्याचे तरु सरसरून वाढून बसत.
जानबा आबाच्या हाताखाली बारकीसारकी कामं करत असे. कधी वेळ पडली तर आणि दुसरा कुणी धड अंगाचा गडी घावला नाही, तर जानबा नाविलाजानं आबाच्या शेतात पाण्याची दारं धरायला येत असे. एरवी तो नुसताच आबाच्या पुढंमागं करत असे, सतरांदा आपल्या चंचीतलं पान खात असे आणि पाणी जोरात असलं की जानबाच्या हातातलं खोरं घेऊन फसफसा दुसर्या सरीला पाणी लावणार्या आबाच्या पैलवानासारख्या दिसणार्या अंगाकडं बघत असे. आबा दुसरी सरी पाण्याला लावत असे आणि आपल्या डोक्यावरचं बांधल्यालं सोडून त्यानं आपलं घामेजलेलं कपाळ, छाती पुसत असे. पाणी सापासारखं सळ्ळंसळ्ळं करत सरीतनं पळत असे आणि जानबा बांधावर उभा राहून कमरेला तराटणी देत असे. सोनाबाई आणि तिच्या गडणी नानाकडे कधी भांगलायला, कधी शेंगा काढायला, कधी बावच्या तोडायला हजरीवर येत असत.
आवंदा पाऊसकाळ चांगला झाला आणि तरणा म्हातारा पाऊस हूं म्हणून पडला. आगाप पेरणी केलेल्यांच्या हातात चार पैसे आले आणि दोन-चार एकर रान असलेल्यांनी आपल्या कारभारणीला एखादा सोन्याचा डाग केला. शेतकरी माणसाला काय, वेळच्या वेळी पाऊस पडला, पिकावर तांबेरा, मर असं काही आलं नाही, मळणीच्या वेळी आभाळ स्वच्छ झालं आणि आडत्याकडं बरा दर घावला तरच सणवार आणि तरच यात्राजत्रा. नाहीतर कसली जत्रा आणि कसलं काय. यंदा बिरोबाची जत्रा मोठी भरली होती. जत्रेच्या मिरवणुकीत इस्त्रीची खड कापडं घातलेला आबा नदर हलूने असा दिसत होता. पालखी घेतलेल्या माणसांच्या पायावर पाणी घालायला सोनाबाई आली, तेव्हा तिनं आपल्या लांब आणि कुरळ्या केसांचा अंबाडा बांधला होता आणि त्यावर चाफ्याच्या फुलांचा गजरा घातला होता. नवं लुगडं नेसलेली आणि खणाचं झंपर घातलेली सोनाबाई चाफ्याच्या गजर्यासारखीच दिसत होती. तिच्या हालचालीबरोबर तिच्या गोर्या दंडात रुतलेल्या झंपराची सोनेरी कड चमकत होती. कमरेवर कळशी घेऊन सोनाबाई पालखीच्या समोर आली आणि तिथं गलका करणार्या बायाबापड्यांनी तिला आपल्या मनानंच वाट करून दिली. सोनाबाईनं पालखीला पाणी घातलं आणि मान वर करून बघितलं. समोर नवी कापडं घातलेला भरदार छातीचा आबा तिला दिसला. तिचं काळीज लक्कन हलल्यागत झालं. नानानं सोनाबाईकडं बघितलं. त्याच्या अंगातनं सळक गेल्यावाणी झाली. कायम शेतात राबणारा आबा आज सोनाबाईच्या काळजात घुसल्यावाणी झाला. कायम शेतात भांगलणीला येणारी सोनाबाई आज आबाच्या नदरेला निराळीच दिसली. गावात अब्रू सांभाळून असलेल्या दोन सज्जन माणसांच्या पायाखालची भुई सरकल्यावाणी झाली. ‘बिरोबाच्या नावानं चांगभलं’ असा गलका चालू होता. भंडार्याचा धुरळा उठला होता. सोनाबाई तिच्या घराच्या चौकटीला टेकाण देऊन उभी होती. दिस मावळतीला आला होता.
गावात असल्या गोष्टी लपून राहात नाहीत. आमच्या गावात काही भानगडी नव्हत्या असं नाही. त्यावरनं भांडणं होत, बायका एकमेकींच्या झिंज्या धरत, गडीमाणसं फरशीनं तोडण्याची भाषा करत. त्यात नवीन काय नव्हतं. पण आबा आणि सोनाबाई यांच्या चर्चेनं गाव ढवळल्यावाणी झालं. कुणी त्यांना दोघांना उसात जाताना बघितलं, कुणी भलत्या वेळी आबाच्या खोपीतनं सोनाबाईला बाहेर येताना बघितलं, कुणी तळ्याच्या पलीकडच्या अंगाला आबाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेल्या सोनाबाईला बघितलं. कुणी आंब्याच्या झाडाखाली सोनाबाईच्या गटर्यातली गुळाची पोळी खाताना आबाला बघितलं. एक का दोन. लोकांना काय, जानबाला हसायला अजून एक कारण मिळालं झालं. सोनाबाईसमोर काही बोलायची कुणाची छाती नव्हती, आणि जानबालापण कुणी तोंडावर काही बोललं नाही, पण स्टँडावरची माणसं जानबा चहा पीत बसलेला असला की त्याला "मग, जानबा, पेडं कवा देतुयास?" असं त्याला विचारायला लागली. कधी नव्हे ते आबा सांज झाली की कुणाशी भाषा न करता आपल्या घराकडं जायला लागला आणि रात्रीची भाकरी खाऊन झाली की शेतावरच्या खोपीत मुक्कामाला जायला लागला. आबाची बायको शहाणी. विहिरीवर धुणी धुवायला येणार्या बायकांच्या अच्च्याविच्च्या बोलण्याकडं लक्ष द्यायला लागू नये म्हणून ती मैलभर लांब असलेल्या तळ्यावर जायला लागली. जानबा आधीच तोंडानं अधू माणूस. आता तर त्याची दातखीळ बसल्यावाणी झाली. कधी मनात आलं तर तो कुणाच्या तरी लांबच्या शेतावर एक टाइम भांगलायला जाई, नाहीतर मग गप्प घरात बसून राही. सोनाबाई सरळ मानेनं कामं करत होती. नवर्याला भाकरी करून वाढत होती. कधी कानावर काही आलं तर तिकडं लक्ष नसल्यासारखं दाखवत होती. सहा महिने-वर्ष निघून गेलं.
सोनाबाईला साप चावला, तेव्हा ती मोगलाड्याच्या रानात भांगलायला गेली होती. एकाच वेळी सगळ्या बायकांनी भांगलायला सुरुवात केली होती. पण तासाभरातच सोनाबाई बाकीच्या बायकांच्या चांगली कासराभर पुढे गेली होती. जमिनीला चांगली घात आली होती आणि हातातलं खुरपं जसं फिरेल तसं तण आपल्या मनानंच निघून आल्यासारखं हातात येत होतं. सोनाबाई आपल्या नादातच सपासप हात चालवत होती. सोनाबाईनं डावा हात पुढं केला, तसा त्या भुजंगानं तिचा अंगठाच फोडला. बाई किंचाळली, पण हातासरशी तिनं सापाचे दोन तुकडे केले. मोगलाड्याचं रान सडकेपासनं आतल्या अंगाला. हाताला लागेल त्या कापडाची झोळी करून दोन दांडग्या गड्यांनी सोनाबाईला सडकेपर्यंत आणलं, तोवर तिच्या तोंडाला फेस आला होता आणि भेंडीच्या कळीसारखा रंग असलेली सोनाबाई काळीनिळी पडायला लागली होती. कुणीतरी एक्क्या गाडी करून सोनाबाईला गावात आणलं. जानबा नुसताच चावडीवर पान खात एकटाच बसलेला होता. त्याला बातमी कळली, तसा तो हेलपाटत घराकडं धावला. जंगमाची भागी आणि आई हातातला स्वैपाक अर्धवट टाकून सोनाबाईच्या घरी धावल्या. सोनाबाईला गाडीतनं खाली काढंस्तवर तिचा श्वास लागला होता. तिच्या आजूबाजूला बायका कालवा करत होत्या. जानबा आला आणि त्याला काय बोलावं सुधरंना. “सोना, आगं सोना..” तो कसाबसा म्हणाला. आईनं सोनाबाईला मांडी दिली. पंथाला लागलेल्या सोनाबाईनं कसेबसे डोळे उघडले. एकदा डोळे भरून आपल्या मालकाला बघितलं आणि दोन्ही हात जोडले. सोनाबाईची मान लटकी पडली. सोनाबाई गेली.
सोनाबाईला पोचवायला निम्मा गाव लोटला होता. जानबाला उजव्या-डाव्या अंगानं धरून लोक घेऊन आले, तेव्हा तो शुद्धीवर नसल्यासारखाच होता. सोनाबाईकडचे, जानबाकडचे सागे सोयरे गोळा झाले होते. सोनाबाईच्या आठवणीवर आठवणी निघत होत्या, कालवा होत होता. आबा आला तसा बायकांचा गलका कमी झाला. कधी काय बोलायचं याचं भान नसलेली परटीण आबाला, सगळ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाली, "गुणाची बाई, पण नाशिवली भाड्यांनं."
हातावर पोट असलेल्याला पुरण काय नाहीतर मरण काय, कशातच गुतून पडून चालत नाही. सोनाबाईला निरोप दिल्यावर तिसर्याच दिवशी कावळा शिवायला पाहिजे होता. सोनाबाईच्या घरी तिच्या आवडीचं जेवण करायचं चाललं होतं. गव्हाची खीर, घोसावळ्याची भजी, केळीच्या कोक्याची भाजी, बाजरीची भाकरी, लोणी.. सगळ्या पदार्थांबरोबर सोनाबाईच्या आठवणी निघत होत्या. सोनाबाईला पोचवून आल्यापासून जानबा घरात एका बाजूला बसून होता. ना कुणाशी बोलणं, ना रडणं.
संध्याकाळची वेळ होती. दादा, आबा, आणि चार लोक असे सोप्यात बसले होते. रोजची बोलणी. काय कामं झाली, काय राहिली. उद्याची काय जुळणी. मिरचीचं तरु आणायचं होतं, मोटारीचा फुटबॉल गळत होता, त्याचं चामडं बदलायला पाहिजे होतं, तो मिस्त्री कुठंतरी गावाला जाऊन बसला होता. एक ना दोन. दारात पायताणं वाजली. जानबा होता.
“उद्या निवद दादा.” जानबा दादांची नजर टाळत जानबा म्हणाला. “आक्कांच्या हाताच्या पोळ्या गोड लागत हुत्या तिला. उद्याला चार पोळ्या आक्कास्नी जमत असल तर निवदाला करून देता का ईचारायला आल्तो.”
“मला हे काय सांगायला पाहिजे का, जानबा? “ आई आतनं गहिवरलेल्या आवाजात म्हणाली. “सोना घरची होती आमच्या. तू सांगितलं नसतंस तरीही मी करून देणारच होते. उद्या सकाळी येऊन घेऊन जा पोळ्या.”
जानबानं खाली बघतच मान हलवली. काही बोलायचं असल्यासारखी त्याच्या गळ्याची हालचाल झाली, पण तो काही बोलला नाही. दादा हिशेब लिहीत होते. बाकीची माणसं गेली होती. जानबा घुटमळल्यासारखा थांबला.
“आता काय जानबा?” दादांनी विचारलं.
“झालं ते झालं दादा.” आपल्या मिशांवरनं हात फिरवत जानबा बोलू लागला. “तिचा शेर हुता, तवर संगट हुती म्हनायची तिची. जवर हुती तवर मला काय कमी पडू दिली न्हाई दादा ती. धा बारा वर्स मला सुकात ठेवली ती.”
“आणि आबा?”
“आबा भला मानूस हाये दादा. मला खायम सांबाळून घेतलेलं हाये त्यानं, खायम. मनात काळं न्हाई त्याच्या. गुदस्ता मी पंधरादीस हांतरूण धरून पडलो. घरात पैका न्हाई. सोना मला हितल्या दवाखान्यात घिऊन गेली तर त्यो डाक्टर म्हनला म्होरं न्ह्या. बरं उसाभरीला कोण माणूस न्हाई की काणूस न्हाई. आबानं बगीतला सगळं. मोठ्या दवाखान्यात सोना संगट हुती, पर आबा दोनी टाईम भाकरी, दूद लावून देत हुता. बील भरायच्या टायमाला हितली कामं टाकून सोता आला आबा. सोता. मी असला खुळा, त्या दवाखान्यातलं काय सुदरतंय व्हय मला? तितं कुनाचा मेळंच न्हाई. मी असा फाटका मानूस, करून करून काय करनार? आबा पळून खेळला तितं. त्यो हुता म्हून वाचलो दादा.”
“हूं” दादा म्हणाले.
“दुसरं काय आता तुमाला म्हायती, जगाला म्हायती. आपल्या अंगाला करटं झाल्याली, आणि ती जगाला दाकवत फिरू म्हणता व्हय तुमी?”
"काय व्हय नव्ह ते कानावर येत हुतं जानबा." दादा म्हणाले.
"खरी गोष्ट दादा. आणि लबाड कशाला बोला? जे तुमी ऐकलासा ते खरं हुतं दादा. आबाचं जाऊ द्या दादा. सबंद जनिम त्याच्या रानात राबलो तरी फिटणार न्हाई येवडं रिण करून ठेवलाय त्यो माज्यावर. पर मी सोनाला इचारलो दादा. सरळ इचारलो , काय मार न्हाई की झोड न्हाई. सरळ रात्रीचं जेवण झाल्यावर तिच्यासमोर बसून तिला इचारलो. म्हनलो बाई, हे अशानअसं कानावर यायला लागलंय माझ्या. आता काय खरंखोटं तूच सांग मला."
"मग?"
"सांगितली मला ती दादा. खरं खरं सगळं सांगितली. बायको पाक हुती मनानं दादा. डोरल्यावर हात ठिवून म्हनाली, तुमच्यासंगं लगीन लागलेलं हाये. मरूपत्तूर तुमानी अंतर देनार न्हाई. पर तुमच्या कानावर आलेलं खरं हाय. सरळ मनाची हुती सोना. कोन असं सांगितला असता काय? मी एकदा तिच्याकडं बगीतलो आनि तिला माफ करून टाकलो. तिला पण आनि आबाला पन. पर तुमची शपथ दादा, दुसरा कोन असता तर त्याचं नाव घेतल्यावर त्वांड कडूझार झालं असतं माझं. पित्त वकल्यावाणी वकलो असतो मी. पन आबा तसा मानूस न्हाई दादा. मर्द मानूस त्यो. त्याच्यावाणी मानूस समोर आसल्यावर आमच्या बाईला वासना झाली तर त्यात काय मग?”
जानबा खाकरून थांबला. त्यानं उगीचच इकडं तिकडं बगितल्यासारखं केलं.
“आपल्या थाळीत आपली अर्दी भाकरी. त्यानं भूक भागंना तर हिकडं तिकडं बगनार की मानूस. मी म्हनलं, कुटं वांदं करत बसता? मी न्हाई बोललो दादा. कुटं बोललो न्हाई, कुनाला बोललो न्हाई.” पायताणाकडं बघत जानबा बोलला. “चार लोकात गेलो तर आपली बदनामी हुनार. बायको लाकात एक हुती दादा माझी. पर मीच लंडका पडलो, त्याला कोन काय करनार? भरून वतून भरून वतून इचार केलो मी दादा. मग मी म्हनलो की माजं जाऊ द्या, तिला तरी तिचं सुक मिळू दे. मी डोळं मिटून घेतलो दादा. गब्बसलो मी. माजं र्हाउंद्या, मी काय असून नसल्यावाणी, पर माजी बायकु उपाशी र्हायली न्हाई. तिची भूक भागली. सुकानं गेली ती. जाताना मला मालक म्हनून हात जोडून गेली. सोनं झालं तिचं.” जानबानं आपल्या मिशा पुसल्या.
जानबा बोलायचा थांबला. डाव्या पायानं, उजव्या पायानं त्यानं पायताणं इकडं तिकडं केली. शेवटी नाविलाज झाल्यासारखी त्यानं ती पायात घातली. आणि काही बोलायचं असल्यासारखं त्यानं तोंड उघडलं, पण काहीच न बोलता तो वळला. भेलकांडत, अंगाला झोले देत तो चालू लागला. अंधारात दिसेनासा झाला.
सन्जोप राव
प्रतिक्रिया
2 Nov 2021 - 2:09 pm | प्रकाश घाटपांडे
ग्रामीण बाजाचे संवादी चित्रण.जानबाच्या जगण्याच तत्वज्ञान ऐकायला र.धों.हवे होते.
2 Nov 2021 - 2:37 pm | श्वेता२४
खूप दिवसांनी एक उत्तम कथा वाचायला मिळाली.
2 Nov 2021 - 3:17 pm | सौंदाळा
रावसाहेब, उत्तम कथा आणि मांडणी
मधली काही वर्णनं तर खासच
2 Nov 2021 - 3:29 pm | राघवेंद्र
कथा आवडली!!!
2 Nov 2021 - 4:04 pm | श्वेता व्यास
कथा आवडली, सगळ्याच पात्रांना न्याय मिळाल्यासारखी वाटली.
2 Nov 2021 - 6:21 pm | पाषाणभेद
व्वा! उत्तम कथा झालीय.
जानबा, सोनाबाईसारखे जगात असतात.
3 Nov 2021 - 1:16 pm | Rajesh188
पण जे वर्णन कथेत केले आहे ते जुने आहे.
आता खेडी वेगळी आहेत. भाषा आणि सर्वच बदलले आहे.
3 Nov 2021 - 1:43 pm | मुक्त विहारि
कथा आवडली ...
3 Nov 2021 - 1:58 pm | राजेंद्र मेहेंदळे
पण कथा मस्त फुलवली आहे. पुर्ण चित्र डोळ्यापुढे उभे राहिले
3 Nov 2021 - 2:13 pm | जेम्स वांड
बिपीन कार्यकर्ते एकदा म्हणाले होते , संजोप रावांचे लेखन वाच का ती प्रचिती आज दिसली.
साष्टांग दंडवत,
सोनाबाईचे पात्र वाचून अतिशय सहजच तिची तुलना मोनिका बेलुचीनं रंगवलेल्या मलेना सोबत झाली, बरीच साम्यस्थळे असलेली, दोन स्त्री पात्रे, गावच्या चर्चेची झालेली, भरपूरच सहन केलेली, मलेनाचा नवरा एकंदरीत परत येतो महायुद्धानंतर ती जगते, पण सोनाबाई किमान मेली तरी सुखानं गेली (जानबाच्या तत्वज्ञानानुसार) , प्रस्तुत आहे का नाही माहिती नाही पण ही मलेना - सोनाबाई तुलना झाली मनात इतकं नक्की.
3 Nov 2021 - 4:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सत्तरीच्या काळातली ग्राम जीवनातील एखाद्या गावातली एखादी सत्य कथा वाटावी इतकी ती कथा वास्तव वाटली. लेखनात शब्दसामर्थ्याने उभं केलेला काडीमोडीचा जानबा. सोनाबाईचं सुंदरतेचं आलेलं वर्णन वाचून कथा काहीतरी झोल उभा करणार अशी पाल मनात चुकचुकलीच होती. ग्राम जीवनातली, भाषा, ते शब्द, ती लय आणि हळूहळू गावातल्या वेगवेगळ्या पात्रांबरोबर कथा सिनेमाच्या पडद्यावर सरकत जावी अशी ती कथा सरकत गेली. कथेतला शेवट योग्य वेळी आणि योग्य न्याय देऊन झाला असेच वाटले. मजा आली. कथेने निर्भळ आनंद दिला. मनापासून आभार. लिहिते राहावे.
संजोपराव आंतरजालावर प्रसिद्ध असलेले हरहुन्नरी लेखक आहेत हे अनेकांना माहिती असेल. आम्ही त्यांचे जुने फॅन आहोत. लेखक म्हणून चांगलं व्यक्तिमत्त्व. आता एवढे तेवढे माणूस म्हटले की गुणदोष चालायचेच. ( ह. घ्या)
-दिलीप बिरुटे
4 Nov 2021 - 1:24 pm | प्रदीप
रावांच्या लिखाणाला, मृदगंधाप्रमाणे, जीएंच्या शैलीचा नेहमी सुवास सहजपणे असतो, तसाच तो येथेही आहे. कथेतील पात्रे, त्यांचा परिसर, त्यांचे परस्पर संबंध ह्यांतील वर्णने खमंग झणझणीत आहेत, त्यांतून त्यांनी अनेक खास ग्रामीण बोलीतील शब्द वापरले आहेत, ते पात्रांच्या, स्थळांच्या व प्रसंगांच्या वर्णनांना अधिक उठाव देतात.
मात्र कथेचा शेवट थोडा अधिक 'टोकदार' असावयास हवा होता, असे वाटले.
ह्या कथेमुळे मिपा दिवाळी अंकाला विशेष बहार आली आहे. संजोप रावांना ह्या अंकासाठी लिहीते करणार्या संपादक मंडळाचे खास अभिनण्दन.
5 Nov 2021 - 12:58 pm | सोत्रि
तंतोतंत! मी मिपावर आयडी घेण्यास उद्युक्त करणाऱ्या ज्या कसदार लेखकांचं लेखन कारणीभूत होतं त्यात संजोपरावांचा नंबर पहिला होता.
ही कथा वाचल्यावर संजोपरावांच्या लेखणीचा फॅन असल्याचं सार्थक झालं, दंडवत!!
-(संजोपरावांचा पंखा) सोकाजी
5 Nov 2021 - 10:12 pm | कर्नलतपस्वी
१९७२-७३- च्या दुष्काळात मावळात एका खेड्यात दुष्काळी कामावर काम करताना बरीच आशा प्रकारच्या व्यक्ति जवळून पहायला मिळाल्या. भाषा ओघवती आणी प्रत्येक शब्द चपखल वापरला आहे. " सैल कासोट्याची" या दोनच शब्दात व्यक्ती रेखा उठुन दिसते. आजच्या पिढीला हा वाक्प्रचार कदाचित समजेल न समजेल. पुढे कथे मधे याचाच विरोधाभास सक्षमतेने उभा करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत .
लेखकाचे अभिनंदन.
5 Nov 2021 - 11:03 pm | सुक्या
उत्तम कथा आणि मांडणी . .. बारकावे दाद द्यावे असे मांडले आहेत . .
6 Nov 2021 - 12:08 am | चित्रगुप्त
कमालीच्या ताकदीची कथा. अप्रतीम, चपखलपणे रंगवलेल्या तिन्ही व्यक्तिरेखा. खास गावाकडले शब्द आणि वाक्यरचना. अगदी प्रत्येक वाक्याला टाळ्या, कौतुकाचे स्मित (हल्लीच्या भाषेत 'लाईक्स') आणि वारंवार डोळ्यात तरळणारे सौंदर्यानुभीतीचे आनंदाश्रू...
पुन्हा पुन्हा वाचण्यासारख्या या अप्रतिम कथेतली आवडलेली वाक्ये उधृत करायची म्हटली तर संपूर्ण कथाच परत लिहावी लागेल. मनःपूर्वक अभिनंदन संजोपराव. असेच लिहीत राहून मिपाचा झेंडा सदैव तळपत ठेवावा.
6 Nov 2021 - 12:39 am | गवि
अ प्र ति म.
सलाम..!!
6 Nov 2021 - 7:14 am | अभिजीत अवलिया
सर्व व्यक्तिरेखा छान रंगवल्या आहेत.
10 Nov 2021 - 2:12 pm | ज्ञानोबाचे पैजार
वाचताना जाम मजा आली,
काही शब्दप्रयोग / वाक्ये तर कहर आहेत.
पैजारबुवा,
10 Nov 2021 - 9:41 pm | बिपीन सुरेश सांगळे
गामीण भागातली , ग्रामीण भाषेतली कथा खूप आवडली . अस्सल एक गावरान चित्र उभं केलंत आपण .
जानबा कुठेतरी आठवणीत राहील . असे लोक असतात अन त्यांचं दुःख हे लोकांचं खोड्या काढायचं साधन असतं . हे दुर्दैव !
10 Nov 2021 - 11:46 pm | सुखीमाणूस
सामान्य माणसाचे परिस्थितीशी जुळवुन घेत जगणे खुप छान रेखाटले आहे.
10 Nov 2021 - 11:55 pm | स्मिताके
एखादा चित्रपट पाहिल्यासारखी कथा समोर उभी राहिली! ग्रामीण वातावरण, भाषा, व्यक्ती सर्व सुरेख भट्टी जमलेली उत्कॄष्ठ अस्सल गावरान कथा.
आभारी आहे.
11 Nov 2021 - 1:14 pm | अनिंद्य
सशक्त कथाबीज, अवघड वळणाचे नाते, ग्रामीण भाषेचा एक वेगळाच बाज.
सुंदर जुळून आले सर्व.
जय हो !
11 Nov 2021 - 1:14 pm | तुषार काळभोर
लेखकाचं नाव उघडून लेख वाचावा आणि दिवस सार्थकी लागावा, असे फार मोजके लेखक आहेत.
धन्यवाद, सन्जोपराव!
11 Nov 2021 - 8:05 pm | मदनबाण
ग्राम्य भाषेतील सुरेख लिखाण...
मदनबाण.....
19 Nov 2021 - 8:59 am | सुखी
नजरेसमोर पात्र उभी राहतात अगदी __/\__
20 Nov 2021 - 12:04 pm | आंबट गोड
मिलमिश्या, ह्यांगशा, अच्च्या विच्च्या, डरंगाळत...हे शब्द नवीन आहेत. :-)
काळ्याभोर उसात मध्ये मध्ये डोलणारी पिवळ्याधमक फुलावर आलेली मोहरीची रोपं वार्यांने हलत असत आणि ती एखाद्या काळ्याशार पण जवान बाईने गळ्यात सोन्याचं नवीन डोरलं घालावं आणि तिने ताक करताना तिच्या हलत्या अंगाबरोबर तिच्या गळ्यावर उजेड पडून ते डोरलं लकलकावं, तशी दिसत. ....ह्या आणि अशा वर्णनांनी बहार आली...!!!
22 Oct 2022 - 8:28 pm | तिमा
मागच्या वर्षाची कथा या दिवाळीला वाचली. आवडली. रावांच्या कथांचं पुस्तक व्हायला पाहिजे.
23 Oct 2022 - 2:34 am | nutanm
सुंदर शब्दचित्रच आहे जणू. सोनाबाई वर्णनावरून तंतोतंत डोळ्यांसमोर उभी रहाते . पण शेवटी दुःखी कथाच केलीय अपेक्षेप्रमाणे . सोनाबाईला मारून टाकून विनाकारण शोकान्त कथा केलीय. अशाच प्रकारची कथा याच धाग्यावर वाचलेली वाटते व असे वाटते की, खेडेगावात कायम हेच चालते का तरणीताठी व भरदार बाई असली की तिचा नवरा बुळचट व तो इतक्या सहजी दुसरर्या पुरूषाकडे तिला जाऊ देतो. नेहमीच तिचे दुसर्या पुरूषाशी व तो पण चांगला भरदार वरंगेल, त्याला त्याची बायकोमुले वत्यांची काहीच पर्वा नाही? किंवा गावात काय म्हणतील? याची क्षिती नाही? गाव किंवा छोट्या शहरात तर आम्ही ऐकलेय मोठ्या शहरांपेक्षा जास्त अब्रूने व लोकांची पर्वा करून रहावे लागते. लेखकांनी आता जरा कथेचा प्रकार (form) बदलून कथा लिहाव्यात , या एकाच type च्या कथा पुरेत. हा नेहमीचाच फाॅर्म झाला.
23 Oct 2022 - 2:35 am | nutanm
सुंदर शब्दचित्रच आहे जणू. सोनाबाई वर्णनावरून तंतोतंत डोळ्यांसमोर उभी रहाते . पण शेवटी दुःखी कथाच केलीय अपेक्षेप्रमाणे . सोनाबाईला मारून टाकून विनाकारण शोकान्त कथा केलीय. अशाच प्रकारची कथा याच धाग्यावर वाचलेली वाटते व असे वाटते की, खेडेगावात कायम हेच चालते का तरणीताठी व भरदार बाई असली की तिचा नवरा बुळचट व तो इतक्या सहजी दुसरर्या पुरूषाकडे तिला जाऊ देतो. नेहमीच तिचे दुसर्या पुरूषाशी व तो पण चांगला भरदार वरंगेल, त्याला त्याची बायकोमुले वत्यांची काहीच पर्वा नाही? किंवा गावात काय म्हणतील? याची क्षिती नाही? गाव किंवा छोट्या शहरात तर आम्ही ऐकलेय मोठ्या शहरांपेक्षा जास्त अब्रूने व लोकांची पर्वा करून रहावे लागते. लेखकांनी आता जरा कथेचा प्रकार (form) बदलून कथा लिहाव्यात , या एकाच type च्या कथा पुरेत. हा नेहमीचाच फाॅर्म झाला.
23 Oct 2022 - 2:35 am | nutanm
सुंदर शब्दचित्रच आहे जणू. सोनाबाई वर्णनावरून तंतोतंत डोळ्यांसमोर उभी रहाते . पण शेवटी दुःखी कथाच केलीय अपेक्षेप्रमाणे . सोनाबाईला मारून टाकून विनाकारण शोकान्त कथा केलीय. अशाच प्रकारची कथा याच धाग्यावर वाचलेली वाटते व असे वाटते की, खेडेगावात कायम हेच चालते का तरणीताठी व भरदार बाई असली की तिचा नवरा बुळचट व तो इतक्या सहजी दुसरर्या पुरूषाकडे तिला जाऊ देतो. नेहमीच तिचे दुसर्या पुरूषाशी व तो पण चांगला भरदार वरंगेल, त्याला त्याची बायकोमुले वत्यांची काहीच पर्वा नाही? किंवा गावात काय म्हणतील? याची क्षिती नाही? गाव किंवा छोट्या शहरात तर आम्ही ऐकलेय मोठ्या शहरांपेक्षा जास्त अब्रूने व लोकांची पर्वा करून रहावे लागते. लेखकांनी आता जरा कथेचा प्रकार (form) बदलून कथा लिहाव्यात , या एकाच type च्या कथा पुरेत. हा नेहमीचाच फाॅर्म झाला.
23 Oct 2022 - 2:37 am | nutanm
सुंदर शब्दचित्रच आहे जणू. सोनाबाई वर्णनावरून तंतोतंत डोळ्यांसमोर उभी रहाते . पण शेवटी दुःखी कथाच केलीय अपेक्षेप्रमाणे . सोनाबाईला मारून टाकून विनाकारण शोकान्त कथा केलीय. अशाच प्रकारची कथा याच धाग्यावर वाचलेली वाटते व असे वाटते की, खेडेगावात कायम हेच चालते का तरणीताठी व भरदार बाई असली की तिचा नवरा बुळचट व तो इतक्या सहजी दुसरर्या पुरूषाकडे तिला जाऊ देतो. नेहमीच तिचे दुसर्या पुरूषाशी व तो पण चांगला भरदार वरंगेल, त्याला त्याची बायकोमुले वत्यांची काहीच पर्वा नाही? किंवा गावात काय म्हणतील? याची क्षिती नाही? गाव किंवा छोट्या शहरात तर आम्ही ऐकलेय मोठ्या शहरांपेक्षा जास्त अब्रूने व लोकांची पर्वा करून रहावे लागते. लेखकांनी आता जरा कथेचा प्रकार (form) बदलून कथा लिहाव्यात , या एकाच type च्या कथा पुरेत. हा नेहमीचाच फाॅर्म झाला.